ज्ञानेश्वरी · अध्याय 9
तरि अवधान एकवेळें दीजे । मग सर्व सुखासि पात्र होईजे ।
हें प्रतिज्ञोत्तर माझें । उघड ऐका
परि प्रौढी न बोलें हो जी । तुम्हां सर्वज्ञांचां समाजीं ।
देयावें अवधान हे माझी । विनवणी सलगीची
कां जे लळेयांचे लळें सरती । मनोरथाचे मनौरे पुरती ।
जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हा ऐसी
तुमचेया दिठिवेचिया वोले । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।
ते साऊली देखोनि लोळें । श्रांतु जी मी
प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहो । म्हणोनि आम्ही आपुलिया स्वेच्छा वोलावों लाहों ।
येथ जरी सलगी करू बिहों । तरी निवो कें पां
नातरी बालक बोबडां बोलीं । कां वाकुडां विचुकां पाऊलीं ।
तें चोज करूनि माऊली । रिझे जेवीं
तेवी तुम्हा संतांचा पढियावो । कैसेनि तरि आम्हांवरी हो ।
या बहुवा आळुकिया जी आहों । सलगी करीत
वांचूनि माझिये बोलतीये योग्यते । सर्वज्ञ भवादृश श्रोते ।
काय धड्यावरी सारस्वतें । पढों सिकिजे
अवधारां आवडे तेसणां धुंधुरु । परि महातेजीं न मिरवे काय करूं ।
अमृताच्या ताटी वोगरूं । ऐसी रससोय कैंची
अहो हिमकरासी विंजणे । की नादापुढे आइकवणे ।
लेणियासी लेणें । हें कहीं आथी
सांगा परिमळें काय तुरंबावें । सागरें कवणे ठायीं नाहावें ।
हें गगनचि आडें आघवें । ऐसा पवाडु कैंचा
तैसें तुमचें अवधान धाये । आणि तुम्ही म्हणा हें होये ।
ऐसें वक्तृत्व कवणा आहे । जेणे रिझा तुम्ही
तरि विश्वप्रगटतिया गभस्ती । हातिवेनि न कीजे आरती ।
कां चुळोदकें अपांपती । अर्घ्यु नेदिजे
प्रभु तुम्ही महेशाचिया मूर्ती । आणि मी दुबळा अर्चितसे भक्ती ।
म्हणोनि बेल जऱही गंगावती । तऱही स्वीकाराल की
बाळक बापाचिये ताटीं रिगे । रिगौनि बापातेंच जेवऊं लागे ।
की तो संतोषलेनि वेगें । मुखचि वोडवी
तैसा मी तुम्हांप्रती । चावटी करितसे बाळमती ।
तरी तुम्हीं संतोषिजे ऐसी जाती । प्रेमाची या
आणि तेणे आपुलेपणाचेनि मोहें । तुम्ही संत घेतले असा बहुवे ।
म्हणोनि केलिये सलगीचा नोहे । आभारु तुम्हां
अहो तान्हेयाची लागता झटे । तरी अधिकचि पान्हा फुटे ।
रोषें प्रेम दुणवटे । पढियंतयाचेनि
म्हणऊनि मज लेंकुरवाचेनि बोलें । तुमचें कृपाळूपण निदैले ।
ते चेइलें हें जी जाणवलें । यालागीं बोलिलों मी
एऱहवीं चांदणे पिकविजत आहे चेपणी । कीं वारया धापत आहे वाहणी ।
हां हो गगनासी गंवसणी । घालिजे केवी
आइकां पाणी वोथिजावे न लगे । नवनीतीं माथुला न रिगे ।
तेविं लाजिलें व्याख्यान न निगे । देखोनि जयांते
हें असो शब्दब्रह्म जिये बाजे । शब्द मावळलेया निवांतु निजे ।
तो गीतार्थु मऱहाटिया बोलिजे । हा पाडु काई
परि ऐसियाही मज धिंवसा । तो पुढतियाचि येकी आशा ।
जे धिटींवा करूनि भवादृश्यां । पढियंता होआवें
परि आतां चंद्रापासोनि निवविते । जें अमृताहूनि जीववितें ।
तेणें अवधान कीजो वाढतें । मनोरथा माझिया
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थसिद्धि मती पिके ।
एऱहवी कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही
सहजें तरी अवधारा । वक्तृत्वा अवधानाचा होय चारा ।
तरी दोंदें पेलती अक्षरां । प्रमेयाचीं
अर्थ बोलाची वाट पाहे । तेथ अभिप्रावो अभिप्रायातें विये ।
भावाचा फुलौरा होत जाये । मतिवरी
म्हणूनि संवादाचा सुवावो ढळे । तरी हृदयाकाश सारस्वतें वोळे ।
आणि श्रोता दुश्चिता तरि वितुळे । मांडला रसु
अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्री कीं आहे ।
म्हणऊनि वक्ता तो वक्ताचि नव्हे । श्रोतेनि वीण
परी आतां आमुतें गोड करावें । ऐसे तांदुळी कायसा विनवावे ।
साइखडियाने काइ प्रार्थावें । सूत्रधारातें
काय तो बाहुलियांचिया काजा नाचवी । कीं आपुलियें जाणिवेची कळा वाढवी ।
म्हणऊनि आम्हां या ठेवाठेवी । काय काज
तंव गुरु म्हणती काइ जाहलें । हें समस्तही आम्हां पावलें ।
आतां सांगे जें निरोपिलें । नारायणें
येथ संतोषोनि निवृत्तिदासें । जी जी म्हणऊनि उल्हासें ।
अवधारां श्रीकृष्ण ऐसे । बोलते जाहले
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।
जें हें अंतःकरणींचे गुज । जीवचिये
येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग तुज कां पां मज सांगावे ।
ऐसें काहीं स्वभावें । कल्पिशी जरी
तरी परियेसीं प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा ।
बोलिलिये गोष्टींची अवज्ञा । नेणसी करुं
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो ।
परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड ।
म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे
मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें ।
तरी तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती ।
पैं गा गौप्यही परि तयाप्रती । चावळिजें सुखें
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचूनि आणिक नाहीं ।
म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं । लपवूं नये
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।
तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसीं
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें ।
मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें ।
तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं
मग वारयाचियां धारसां । पडिला कोंडा कां नुरेचि जैसा ।
आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे
तैसें जें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठी ।
लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेचां
जें जाणणेयां आघवेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी ।
जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो
आणि धर्माचें निजधाम । तेंविंचि उत्तमाचे उत्तम ।
पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।
प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया
तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी ।
मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयाहि पडे
परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुखा भरे ।
ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म
पैं गा आणिकही एक याचें । जें हाता आले तरी न वचे ।
आणि अनुभवितां कांहीं न वेचे । वरि विटेहि ना
येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका ।
ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां
एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगीं घालिती उडी ।
ते अनायासें स्वगोडी । सांडिती केविं
तरि पवित्र आणि रम्य । तेविंचि सुखोपायेंचि गम्य ।
आणि स्वसुख परि धर्म्य । वरि आपणपां जोडे
ऐसा अवघाचि सुरवाडु आहे । तरी जनाहातीं केविं उरो लाहे ।
हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवां
पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती
कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणुक एकेचि घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे
नातरी निदैवाचां परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं ।
परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये
तैसा हृदयामध्यें मी रामु । असतां सर्वसुखाचा आरामु ।
कीं भ्रांतासी कामु । विषयावरी
बहु मृगजळ देखोनि डोळां । थुंकिजे अमृताचा गिळितां गळाळा ।
तोडिला परिसु बांधिला गळा । शुक्तिकालाभें
तैसीं अहंममतेचिये लवडसवडी । मातें न पवतीचि बापुडीं ।
म्हणोनि जन्ममरणाची दुथडी । डहुळितें ठेलीं
एऱहवीं मी तरी कैसा । मुखाप्रती भानु कां जैसा ।
कहीं नसे न दिसे ऐसा । वाणीचा नव्हें
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना ।
माझेया विस्तारलेपणाचेनि नांवें । हे जगचि नोहे आघवें ।
जैसें दूध मुरालें स्वभावें । तरि तेंचि दहीं
कां बीजचि जाहलें तरु । अथवा भांगारचि अळंकारु ।
तैसा मज एकाचा विस्तारु । तें हें जग
हें अव्यक्तपणें थिजलें । तेंचि मग विश्वाकारें वोथिजलें ।
तैसें अमूर्तमूर्ति मियां विस्तारलें । त्रैलोक्य जाणें
महदादि देहांतें । इयें अशेषेंही भूतें ।
परि माझां ठायीं बिंबते । जैसे जळीं फेण
परि तया फेणांआंतु पाहतां । जेवीं जळ न दिसे पंडुसुता ।
नातरी स्वप्नींची अनेकता । चेइलिया नोहिजे
तैसीं भूतें इयें माझां ठायीं । बिंबती तयांमाजी मी नाहीं ।
इया उपपत्ती तुज पाहीं । सांगितलिया मागां
म्हणऊनि बोलिलिया बोलाचा आतिसो । न कीजे यालागीं हें असो । तरी मजाआंत पैसो । दिठि तुझी
आमचा प्रकृतीपैलीकडील भावो । जरी कल्पनेवीण लागसी पाहों ।
तरी मजमाजि भूतें हेंही वावो । जे मी सर्व म्हणऊनि
एऱहवीं संकल्पाचिये सांजवेळे । नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे । म्हणोनि अखंडित परि झांवळें । भूतभिन्न ऐसें देखें
तेचि संकल्पाची सांज जैं लोपे । तैं अखंडितचि आहे स्वरुपें ।
जैसें शंका जातखेंवो लोपे । सापपण माळेचें
एऱहवीं तरी भूमीआंतूनि स्वयंभ । काय घडेगाडगेयांचे निघती कोंभ । परि ते कुलालमतीचे गर्भ । उमटले कीं
नातरी सागरींचां पाणीं । काय तंरगाचिया आहाती खाणी ।
ते अवांतर करणी । वारयाची नव्हे
पाहें पां कापसाचां पोटीं । काय कापडाची होती पेटी ।
तो वेढितयाचिया दिठी । कापड जाहला
जरी सोनें लेणें होऊनि घडे । तरी तयाचें सोनेपण न मोडे ।
येर अळंकार हे वरचिलीकडे । लेतयाचेनि भावें
सांगें पडिसादाची प्रत्युत्तरें । कां आरिसां जें आविष्करे ।
तें आपलें कीं साचोकारें । तेथेंचि होतें
तैसी इये निर्मळे माझां स्वरुपीं । जो भूतभावना आरोपी ।
तयासी तयाचां संकल्पीं । भूताभासु असे
तेचि कल्पिती प्रकृती पुरे । आणि भूताभासु आधींच सरे ।
मग स्वरुप उरे एकसरें । निखळ माझें
हें असो आंगीं भरलिया भवंडी । जैशा भोंवत दिसती अरडीदरडी । तैशी आपुलिया कल्पना अखंडीं । गमती भूतें
तेचि कल्पना सांडूनि पाहीं । तरि मी भूतीं भूतें माझिया ठायीं ।
हें स्वप्नींही परि नाहीं । कल्पावयाजोगें
आतां मी एक भूतातें धर्ता । अथवा भूतामाजि मी असता ।
या संकल्पसन्निपाता । आंतुलिया बोलिया
म्हणोनि परियेसीं गा प्रियोत्तमा । यापरी मी विश्वेंसीं विश्वात्मा ।
जो इया लटकिया भूतग्रामा । भाव्यु सदा
रश्मीचेनि आधारें जैसें । नव्हतेंचि मृगजळ आभासे ।
माझां ठायीं भूतजात तैसें । आणि मातेंही भावीं
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु ।
जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते
हा आमचा ऐश्वर्ययोगु । तुंवा देखिला कीं चांगु ।
आतां सांगें कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे
पैं गगन जेवढें जैसें । पवनु गगनीं तेवढाचि असे ।
सहजें हालविलिया वेगळा दिसे । एऱहवीं गगन तेंचि ते
तैसें भूतजात माझां ठायीं । कल्पिजे तरी आभासें कांहीं ।
निर्विकल्पीं तरि नाहीं । तेथ मीच मी आघवे
म्हणऊनि नाहीं आणि असे । हें कल्पनेचेनि सौरसें ।
जे कल्पनालोपें भ्रंशें । आणि कल्पनेसवें होय
तेंचि कल्पितें मुदल जाये । तैं असें नाहीं हें कें आहे ।
म्हणऊनि पुढती तूं पाहें । हा ऐश्वर्ययोगु
ऐसिया प्रतीतिबोधसागरीं । तूं आपणपेयातें कल्लोळु एक करीं ।
मग जंव पाहासी चराचरीं । तंव तूचि आहासी
या जाणणेयाचा चेवो । तुज आला ना म्हणती देवो ।
तरी आतां द्वैतस्वप्न वावो । जालें कीं ना
तरी पुढती जरी विपायें । बुद्धीसि कल्पनेची झोंप ये ।
तरी अभेदबोधु जाये । जैं स्वप्नीं पडिजे
म्हणोनि ये निद्रेची वाट मोडे । निखळ उद्बोधाचेंचि आपणपें घडे ।
ऐसें वर्म जें आहे फुडें । तें दावो आतां
तरी धनुर्धरा धैर्या । निकें अवधान देईं बा धनंजया ।
पैं सर्व भूतांतें माया । करि हरि गा
जिये नांव गा प्रकृती । जे द्विविध सांगितली तुजप्रती ।
एकी अष्टधा भेदव्यक्ती । दुजी जीवरुपा
हा प्रकृतीविखो आघवा । तुंवा मागां परिसिलासे पांडवा ।
म्हणोनि असो काइ सांगावा । पुढतपुढती
तरी ये माझिये प्रकृती । महाकल्पाचां अंती ।
सर्व भूतें अव्यक्तीं । ऐक्यासी येती
ग्रीष्माचां अतिरसीं । सबीजे तृणें जैसीं ।
मागुती भूमीसी । सुलीनें होती
कां वार्षिये ढेंढें फिटे । जेव्हां शारदीयेचा अनुघडु फुटे ।
तेव्हां घनजात आटे । गगनींचें गगनीं
नातरी आकाशाचिये खोंपे । वायु निवांतुचि लोपे ।
कां तरंगता हारपे । जळीं जेवीं
अथवा जागिनलिये वेळे । स्वप्न मनींचें मनीं मावळे ।
तैसें प्राकृत प्रकृती मिळे । कल्पक्षयीं
मग कल्पादीं पुढती । मीचि सृजीं ऐसी वदंती ।
तरी इयेविषयीं निरुती । उपपत्ती आइक
तरी हेचि प्रकृति किरिटी । मी स्वकीया सहजें अधिष्ठीं ।
तेथ तंतुसमवायपटीं । जेविं विणावणी दिसे
मग तिये विणावणीचेनि आधारें । लहानां चौकडियां पटत्व भरे ।
तैसी पंचात्मके आकारें । प्रकृतिचि होये
जैसें विरजणियाचेनि संगें । दूधचि आटेजों लागे ।
तैशी प्रकृति आंगा रिगे । सृष्टिपणाचिया
बीज जळाचि जवळीक लाहे । आणि तेंचि शाखोपशाखीं होये ।
तैसें मज करणें आहे । भूतांचे हें
अगा नगर हें रायें केलें । या म्हणणया साचपण कीर आलें ।
परि निरुतें पाहतां काय शिणले । रायाचे हात
आणि मी प्रकृति अधिष्ठीं तें कैसें । जैसा स्वप्नीं जो असे ।
मग तोचि प्रवेशे । जागृतावस्थे
तरि स्वप्नौनि जागृती येतां । काय पाय दुखती पंडुसुता ।
कीं स्वप्नामाजीं असतां । प्रवासु होय
या आघवियाचा अभिप्रावो कायी । जे हें भूतसृष्टीचें कांहीं ।
मज एकही करणें नाहीं । ऐसाचि अर्थु
जैशी रायें अधिष्ठिली प्रजा । व्यापारे आपुलालिया काजा ।
तैसा प्रकृतिसंगु माझा । येर करणें तें इयेचें
पाहें पां पूर्णचंद्राचिये भेटी । समुद्र भरतें अपार दाटी ।
तेथ चंद्रासि काय किरीटी । उपखा पडे
जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा
किंबहुना यापरी । मी निजप्रकृति अंगीकारीं ।
आणि भूतसृष्टी एकसरी । प्रसवोंचि लागे
जो हा भूतग्रामु आघवा । असे प्रकृतिआधीन पांडवा ।
जैसी बीजाचिया वेलपालवा । समर्थ भूमि
नातरि बाळादिकां वयसां । गोसावी देहसंगु जैसा ।
अथवा घनावळी आकाशा । वार्षियें जेवीं
कां स्वप्नासि कारण निद्रा । तैसी प्रकृति हे नरेंद्रा ।
या अशेषाहि भूतसमुद्रा । गोसाविणी गा
स्थावरा आणि जंगमा । स्थूळा अथवा सूक्ष्मा ।
हे असो भूतग्रामा । प्रकृतिचि मूळ
म्हणोनि भूतें हन सृजावीं । कां सृजिलीं प्रतिपाळावीं ।
इयें करणीं न येती आघवीं । आमुचिया आंगा
जळीं चंद्रिकेचिया पसरती वेली । ते वाढी चंद्रे नाहीं वाढविली ।
तेवि मातें पावोनि ठेलीं । दुरी कर्में
आणि सुटलिया सिंधुजळाचा लोटु । न शके धरुं सैंधवाचा घाटु ।
तेवि सकळ कर्मा मीच शेवटु । ती काइ बांधती मातें
धूम्ररजांची पिंजरी । वाजतिया वायुतें जरी होकारी ।
कां सूर्यबिंबामाझारीं । आंधारे रिगे
हें असो पर्वताचिये हृदयींचें । जेविं पर्जन्यधारास्तव न खोंचे ।
तेविं कर्मजात प्रकृतीचें । न लगे मज
एऱहवीं इये प्राकृतीं विकारीं । एकु मीचि आहे अवधारीं ।
परि उदासीनाचिया परि । करीं ना करवी
दीपु ठेविला परिवरीं । कवणातें नियमी ना निवारी ।
आणि कवण कवणिये व्यापारीं । राहाटे तेंहि नेणे
तो जैसा का साक्षिभूतु । गृहव्यापारप्रवृत्तिहेतु ।
तैसा भूतकर्मीं अनासक्तु । मी भूतीं असें
हा एकचि अभिप्रावो पुढतपुढती । काय सांगो बहुतां उपपत्तीं । येथ एकवेळां सुभद्रापती । येतुलें जाण पां
जे लोकचेष्टां समस्तां । जैसा निमित्तमात्र कां सविता ।
तैसा जगत्प्रभवीं पंडुसुता । हेतु मी जाणें
कां जें मियां अधिष्ठिलिया प्रकृती । होती चराचराचिया संभूती । म्हणोनि मी हेतु हें उपपत्ती । घडे यया
आतां येणें उजिवडें निरुतें । न्याहाळीं पां ऐश्वर्ययोगातें ।
जे माझां ठायीं भूतें । परी भूतीं मी नसें
अथवा भूतें ना माझां ठायीं । आणि भूतांमाजि मी नाहीं ।
या खुणा तुं कही । चुकों नको
हें सर्वस्व आमुचें गूढ । परि दाविलें तुज उघड ।
आतां इंद्रियां देऊनि कवाड । हृदयीं भोगीं
हा दंशु जंव नये हातां । तंव माझें साचोकारेपण पार्था ।
न संपडे गा सर्वथा । जेविं भुसीं कणु
एऱहवीं अनुमानाचेनि पैसें । आवडे कीर कळलें ऐसें ।
परि मृगजळाचेनि वोलांशें । काय भूमि तिमे
जें जाळ जळीं पांगिलें । तेथ चंद्रबिंब दिसे आंतुडलें ।
परि थडिये काढूनि झाडिलें । तेव्हां बिंब कें सांगे
तैसें बोलवरि वाचाबळें । वायांचि झकविजती प्रतीतीचे डोळे ।
मग साचोकारें बोधावेळे । आथि ना होईजे
किंबहुना भवा बिहा या । आणि साचें चाड आथि जरी मियां ।
तरि तुम्हीं गा उपपत्ती इया । जतन कीजे
एऱहवीं वेधली दिठी कवळें । ते चांदणियाते म्हणे पिंवळें ।
तेविं माझां स्वरुपीं निर्मळे । देखाल दोष
नातरी ज्वरें विटाळले मुख । ते दुधातें म्हणे कडू विख ।
तेविं अमानुषा मानुष । मानाल मातें
म्हणऊनि पुढती तूं धनंजया । झणें विसंबसी या अभिप्राया ।
जे इया स्थूलदृष्टी वायां । जाइजेल गा
पैं स्थूलदृष्टी देखती मातें । तेंचि न देखणें जाण निरुतें ।
जैसें स्वप्नींचेनि अमृतें । अमरा नोहिजे
एऱहवीं स्थूलदृष्टी मूढ । मातें जाणती कीर दृढ ।
परि तें जाणणेंचि जाणणेया आड । रिगोनि ठाके
जैसा नक्षत्राचिया आभासा- । साठीं घातु झाला तया हंसा ।
माजीं रत्नबुद्धीचिया आशा । रिगोनियां
सांगे गंगा या बुद्धी मृगजळ । ठाकोनि आलियाचें कवण फळ ।
काय सुरतरु म्हणोनि बाबुळ । सेविली करी
हा निळयाचा दुसरा । या बुद्धी हातु घातला विखारा ।
कां रत्ने म्हणोनि गारा । वेंची जेविं
अथवा निधान हें प्रगटलें । म्हणोनि खदिरांगार खोळे भरिले ।
कां साउली नेणतां घातलें । कुहां सिंहें
तेविं मी म्हणोनि प्रपंचीं । जिहीं बुडी दिधली कृतनिश्चयाची ।
तिहीं चंद्रासाठीं जेविं जळींची । प्रतिमा धरिली
तैसा कृतनिश्चय वायां गेला । जैसा कोण्ही एकु कांजी प्याला ।
मग परिणाम पाहों लागला । अमृताचा
तैसें स्थूलाकारीं नाशिवंते । भरंवसा बांधोनि चित्तें ।
पाहती मज अविनाशातें । तरी कैंचा दिसें
काइ पश्चिमसमुद्राचिया तटा । निघिजत आहे पूर्विलिया वाटा ।
कां कोंडा कांडतां सुभटा । कणु आतुडे
तैसें विकारलें हें स्थूळ । जाणितलेया मी जाणवतसें केवळ ।
काइ फेण पितां जळ । सेविलें होय
म्हणोनि मोहिलेनि मनोधर्में । हेंचि मी मानूनि संभ्रमें ।
मग येथिंचीं जियें जन्मकर्में । तियें मजचि म्हणती
येतुलेनि अनामा नाम । मज अक्रियासि कर्म ।
विदेहासि देहधर्म । आरोपिती
मज आकारशून्या आकारु । निरुपाधिका उपचारु ।
मज विधिविवर्जिता व्यवहारु । आचारादिक
मज वर्णहीना वर्णु । गुणातीतासि गुणु ।
मज अचरणा चरणु । अपाणिया पाणी
मज अमेया मान । सर्वगतासी स्थान ।
जैसें सेजेमाजी वन । निदेला देखे
तैसें अश्रवणा श्रोत्र । मज अचक्षूसी नेत्र ।
अगोत्रा गोत्र । अरुपा रुप
मज अव्यक्तासि व्यक्ती । अनार्तासी आर्ती ।
स्वयंतृप्ता तृप्ती । भाविती गा
मज अनावरणा प्रावरण । भूषणातीतासि भूषण ।
मज सकळकारणा कारण । देखती ते
मज सहजातें करिती । स्वंयभातें प्रतिष्ठिती ।
निरंतराते आव्हानिती । विसर्जिती गा
मी सर्वदा स्वतःसिद्धु । तो कीं बाळ तरुण वृद्धु ।
मज एकरुपा संबंधु । जाणती ऐसे
मज अद्वैतासि दुजें । मज अकर्तायासि काजें ।
मी अभोक्ता कीं भुंजें । ऐसें म्हणती
मज अकुळाचें कुळ वानिती । मज नित्याचेनि निधनें शिणती ।
मज सर्वांतराते कल्पिती । अरि मित्र गा
मी स्वानंदाभिरामु । तया मज अनेकां सुखांचा कामु ।
अवघाची मी असे समु । कीं म्हणती एकदेशी
मी आत्मा एक चराचरीं । म्हणती एकाचा कैंपक्ष करीं ।
आणि कोपोनि एकातें मारीं । हेंचि वाढविती
किंबहुना ऐसे समस्त । जे हे मनुष्यधर्म प्राकृत ।
तयाचि नांव मी ऐसें विपरीत । ज्ञान तयांचें
जंव आकारु एक पुढां देखती । तंव हा देव येणें भावें भजती ।
मग तोचि बिघडलिया टाकिती । नाहीं म्हणोनि
मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें ।
म्हणऊनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी
यालागीं जन्मलेचि ते मोघ । जैसें वार्षियेवीण मेघ ।
कां मृगजळाचे तरंग । दुरुनीचि पाहावे
अथवा कोल्हेरीचे असिवार । नातरीं वोडंबरीचे अळंकार ।
कीं गंधर्वनगरीचे आवार । आभासती कां
सांवरी वाढिन्नल्या सरळा । वरि फळ ना आंतु पोकळा ।
कां स्तन जाले गळां । शेळिये जैसे
तैसें मूर्खाचें तयां जियालें । आणि धिक् कर्म तयांचें निपजलें ।
जैसें सांवरी फळ आलें । घेपे ना दीजे
मग जें कांहीं ते पढिन्नले । तें मर्कटें नारळ तोडिले ।
कां आंधळ्या हातीं पडिलें । मोती जैसें
किंबहुना तयांचीं शास्त्रें । जैशी कुमारींहाती दिधलीं शस्त्रें ।
कां अशौच्या मंत्रें । बीजें कथिलीं
तैसें ज्ञानजात तयां । आणि जें कांहीं आचरलें गा धनंजया ।
तें आघवेंचि गेलें वायां । जे चित्तहीन
पैं तमोगुणाची राक्षसी । जे सद्बुद्धीतें ग्रासी ।
विवेकाचा ठावोचि पुसी । निशाचरी
तिये प्रकृती वरपडे जाले । म्हणऊनि चिंतेचेनि कपोलें गेले ।
वरि तामसीयेचिये पडिले । मुखामाजीं
जेथ आशेचिये लाळे । आंतु हिंसा जीभ लोळे ।
तेवींचि संतोषाचे चाकळे । अखंड चघळी
जे अनर्थाचे कानवेरी । आवाळुवें चाटीत निघे बाहेरी ।
जे प्रमादपर्वतींचि दरी । सदाचि मातली
जेथ द्वेषाचिया दाढा । खसखसां ज्ञानाचा करिती रगडा ।
जे अगस्तीगवसणी मूढां । स्थूलबुद्धी
ऐसे आसुरिये प्रकृतीचां तोंडीं । जे जाले गा भूतोंडीं ।
ते बुडोनि गेले कुंडीं । व्यामोहाचां
एवं तमाचिये पडिले गर्ते । न पविजतीचि विचाराचेनि हातें ।
हें असो ते गेले जेथें । ते शुद्धीचि नाहीं
म्हणोनि असोतु इयें वायाणीं । कायशीं मूर्खाचीं बोलणीं ।
वायां वाढवितां वाणी । शिणेल हन
ऐसें बोलिले देवें । तेथ जी म्हणितलें पांडवें ।
आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा
तरी जयांचिये चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी ।
जयां निजेलियांतें उपासी । वैराग्य गा
जयांचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्म करि राणिवा ।
जयांचें मन ओलावा । विवेकासी
जे ज्ञानगंगे नाहाले । पूर्णता जेऊनि धाले ।
जे शांतीसि आले । पालव नवे
जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडपाचे स्तंभ ।
जे आंनदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले
जयां भक्तीची येतुली प्राप्ती । जे कैवल्यातें परौतें सर म्हणती । जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे
जे आघवांचि करणीं । लेइले शांतीची लेणीं ।
जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज
ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।
जे जाणोनियां सर्व । स्वरुप माझे
मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे ।
परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाही
ऐसें मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ।
परि नवलावो तो सांगावा । असे आइक
तरी कीर्तनाचेनि नटनाचें । नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांचे ।
जे नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें
यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरुनि उठविली ।
यमलोकीं खुंटिली । राहाटी आघवी
यमु म्हणे काय यमावें । दमु म्हणे कवणातें दमावें ।
तीर्थें म्हणती काय खावें । दोष ओखदासि नाहीं
ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्वाचीं दुःखें ।
अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें
ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित ।
योगेंवीण दावित । कैवल्य डोळां
परि राया रंका पाड धरुं । नेणती सानेयां थोरां कडसणी करुं ।
एकसरें आंनदाचे आवारु । होत जगा
कहीं एकाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ।
ऐसें नामघोषगौरवें । धवळलें विश्व
तेजें सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ ।
चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते
मेघ उदार परि वोसरे । म्हणऊनि उपमेसी न पुरे ।
हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन
जयांचे वाचेपुढां भोजे । नाम नाचत असे माझें ।
जें जन्मसहस्त्रीं वोळगिजे । एकवेळ मुखासि यावया
तो मी वैकुंठीं नसें । एक वेळ भानुबिंबींही न दिसें ।
वरी योगियांचींही मानसें । उमरडोनि जाय
परि तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।
जेथ नामघोषु बरवा । करिती ते माझे
कैसे माझां गुणीं धाले । देशकाळातें विसरले ।
कीर्तनसुखें झाले । आपणपांचि
कृष्ण विष्णु हरि गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।
माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती
हें बहु असो यापरी । कीर्तित मातें अवधारीं ।
एक विचरती चराचरीं । पांडुकुमरा
मग आणिक ते अर्जुना । साविया बहुवा जतना ।
पंचप्राणा मना । पाढाऊ घेउनी
बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पौळी पन्नासिली ।
वरी प्राणायामांची मांडिलीं । वाहातीं यंत्रें
तेथ उल्हाटशक्तीचेनि उल्हाटशक्तीचेनि । मनपवनाचेनि सुरवाडें ।
सतरावियेचें पाणियांडे । बळियाविलें
तेव्हां प्रत्याहारें ख्याति केली । विकारांची संपिली बोहली ।
इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु
तंव धारणावारु दाटिले । महाभूतांतें एकवटिलें ।
मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें
तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें जैत रे जैत वाजत ।
दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र
पांटी समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभवराज्यसुखा ।
पट्टाभिषेकु देखां । समरसें जाहला
ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन ।
आतां ऐकें सांगेन । जे करिती एक
तरी दोन्ही पालववेरी । जैसा एक तंतु अंबरीं ।
तैसा मीवांचूनि चराचरीं । जाणती ना
आदि ब्रह्मा करुनी । शेवटीं मशक धरुनी ।
माजी समस्त हें जाणोनी । स्वरुप माझें
मग वाड धाकुटें न म्हणती । सजीव निर्जीव नेणती ।
देखिलिये वस्तू उजू लुंटिती । मीचि म्हणोनि
आपुलें उत्तमत्व नाठवे । पुढील योग्यायोग्य नेणवे ।
एकसरें व्यक्तिमात्राचेनि नांवें । नमूंचि आवडे
जैसें उंचीं उदक पडिलें । तें तळवटवरी ये उगेलें ।
तैसें नमिजे भूतजात देखिलें । ऐसा स्वभावोचि तयांचा
कां फळलिया तरुची शाखा । सहजें भूमीसी उतरे देखा ।
तैसें जीवमात्रां अशेखां । खालावती ते
अखंड अगर्वता होऊनि असती । तयांतें विनयो हेचि संपत्ती ।
जे जयजयमंत्रें अर्पिती । माझांचि ठायीं
नमितां मानापमान गळाले । म्हणोनि अवचितें ते मीचि जहाले ।
ऐसे निरंतर मिसळले । उपासिती
अर्जुना हे गुरुवी भक्ती । सांगितली तुजप्रती ।
आतां ज्ञानयज्ञें यजिती । ते भक्त आइकें
परि भजन करिती हातवटी । तूं जाणत आहासि किरीटी ।
जे मागां इया गोष्टी । केलिया आम्हीं
तंव आथि जी अर्जुन म्हणे । तें दैविकिया प्रसादाचें करणें ।
तरि काय अमृताचें आरोगणें । पुरे म्हणवे
या बोला अनंतें । लागटा देखिलें तयातें ।
कीं सुखावलेनि चित्तें । डोलतु असे
म्हणे भलें केलें पार्था । एऱहवीं हा अनवसरु सर्वथा ।
परि बोलवीतसे आस्था । तुझी मातें
तंव अर्जुन म्हणे हें कायी । चकोरेंवीण चांदिणेंचि नाहीं ।
जग निवविजे हा तयाचां ठायीं । स्वभावो कीं जी
येरें चकोरें तियें आपुलिये चाडे । चांचु करिती चंद्राकडे ।
तेविं आम्ही विनवुं तें थोकडे । देवो कृपासिंधु
जी मेघ आपुलिये प्रौढी । जगाची आर्ति दवडी ।
वांचूनि चातकाची ताहान केवढी । तो वर्षावो पाहुनी
परि चुळा एकाचिया चाडे । जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे ।
तेंविं आर्त का बहु कां थोडें । तरि सांगावें देवा
तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहला आहे ।
तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाही
पैं परिसतु आम्हासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वऱहाडीक करी । ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों
तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु ।
महाभूतें मंडपु । भेदु तो पशु
मग पांचांचे जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण ।
हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान धृत
तेथ मनबुद्धीचिया कुंडा- । आंतु ज्ञानाग्नि धडफुडा ।
साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणें
सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव ।
शांति स्त्रुकस्त्रुव । जीव यज्वा
तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें ।
ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी
तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये ।
आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां
तेव्हां भूतें विषय करणें । हें वेगळालें काहीं न म्हणे ।
आघवें एकचि ऐसें जाणे । आत्मबुद्धी
जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हें विचित्र सेना ।
मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें
आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें ।
ऐसें एकत्वें मानवे । विश्व तया
मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे ।
ऐसे भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें
अथवा अनादि हें अनेक । जे आनासारिखें एका एक ।
आणि नामरुपादिक । तेंही विषम
म्हणोनि विश्व भिन्न । परि न भेदे तयांचें ज्ञान ।
जैसे अवयव तरी आन आन । परि एकेचि देहींचे
कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिये तरुवरा ।
बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं
तेविं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती ।
ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें
येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा ।
जे न भेंदतीं जाणिवा । जाणते म्हणौनि
ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं ।
तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु
पाहें पां बुडबुडा जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे ।
मग विरे अथवा राहे । तऱही जळाचिमाजि
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले ।
आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी
तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही न हो अथवा होआवें ।
परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेलें
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांचि प्रतीति ।
ऐसे बहुधाकारीं वर्तती । बहुचि होउनि
हें भानुबिंब आवडेतया । सन्मुख जैसें धनंजया ।
तैसें ते विश्वा या । समोर सदा
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना ।
वायु जैसा गगना । सर्वांगी असे
तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्भावा ।
तरी न करितां पांडवा । भजन जहालें
एऱहवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें ।
एथ एकें जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी
परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते ।
उपासिती मातें । ते सांगितले
अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं ।
कीं नेणणेयासाठीं मूर्खीं । न पविजेचि मातें
तोचि जाणिवेचा उदयो जरी होये । तरी मुदल वेदु मीचि आहें ।
आणि तो विधानातें जया विये । तो क्रतुही मीचि
मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा ।
यज्ञु प्रगटे पांडवा । तोही मी गा
स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा ।
आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि
होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझें ।
आणि हुतक वस्तू जें जें । तेही मीचि
पैं जयाचेनि अंगेसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगे ।
जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा
अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी ।
तेविं मी चराचरीं । माताही होय
आणि जाहालें जग जेथ राहे । जेंणे जित वाढत आहे ।
तें मीचि वाचूनि नोहे । आन निरुतें
इयें प्रकृतिपुरुषें दोन्ही । उपजलीं जयाचिया अमनमनीं ।
तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी
आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटा । जया गांवा येती गा सुभटा ।
जे वेदांचियां चोहटां । वेद्य जें म्हणिजे
जेथ नाना मतां बुझावणी जाहाली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली ।
चुकलीं ज्ञानें जेथ मिळों आलीं । जे पवित्र म्हणिजे
पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनीनादाकारु ।
तयांचें गा भुवन जो ॐकारु । तोही मी गा
जया ॐकाराचिये कुशी । अक्षरें होती औमकारेंसीं ।
जियें उपजत वेदेंसीं । उठलीं तिन्हीं
म्हणोनि ऋग्यजुःसामु । हे तिन्ही म्हणे मी आत्मारामु ।
एंव मीचि कुलक्रमु । शब्दब्रह्माचा
हें चराचर आघवें । जिये प्रकृती आंत साठवे ।
ते शिणली जेथ विसवे । ते परमगती मी
आणि जयाचेनि प्रकृति जिये । जेणें अधिष्ठिली विश्व विये ।
जो येऊनि प्रकृती इये । गुणातें भोगी
तो विश्वश्रियेचा भर्ता । मीचि गा पंडुसुता ।
मी गोसावी समस्ता । त्रैलोक्याचा
आकाशें सर्वत्र वसावें । वायूनें नावभरी उगें नसावें ।
पावकें दहावें । वर्षावें जळें
पर्वतीं बैसका न संडावी । समुद्रीं रेखा नोलांडावी ।
पृथ्वीया भूतें वाहावीं । हे आज्ञा माझी
म्या बोलविल्या वेदु बोले । म्यां चालविल्या सूर्यु चाले ।
म्यां हालविल्या प्राणु हाले । जो जगातें चाळिता
मियांचि नियमिलासांता । काळु ग्रासितसे भूतां ।
इयें म्हणियागतें पंडुसुता । सकळें जयाचीं
ऐसा जो समर्थु । तो मी जगाचा नाथु ।
आणि गगनाऐसा साक्षिभूतु । तोहि मीचि
इहीं नामरुपीं आघवा । जो भरला असे पांडवा ।
आणि नामरुपांहि वोल्हावा । आपणचि जो
जैसे जळाचे कल्लोळ । आणि कल्लोळ आथी जळ ।
ऐसेनि वसवितसे सकळ । तो निवासु मी
जो मज होय अनन्य शरण । त्याचें निवारीं मी जन्म मरण ।
यालागीं शरणागता शरण्य । मीचि एकु
मीचि एक अनेकपणें । वेगळालेनि प्रकृतीगुणें ।
जीत जगाचेनि प्राणें । वर्तत असे
जैसा समुद्र थिल्लर न म्हणतां । भलतेथ बिंबे सविता ।
तैसा ब्रह्मादि सर्वां भूता । सुहृद तो मी
मीचि गा पांडवा । या त्रिभुवनासी वोलावा ।
सृष्टिक्षयप्रभावा । मूळ तें मी
बीज शाखांतें प्रसवे । मग तें रुखपण बीजीं सामावे ।
तैसे संकल्पें होय आघवें । पाठीं संकल्पीं मिळे
ऐसें जगाचें बीज जो संकल्पु । अव्यक्त वासनारुपु ।
तया कल्पांतीं जेथ निक्षेपु । होय तें मी
इयें नामरुपें लोटती । वर्णव्यक्ती आटती ।
जातींचे भेद फिटती । जैं आकाश नाहीं
तैं संकल्पु वासनासंस्कार । माघौतें रचावया आकार ।
जेथ राहोनि असती अमर । तें निधान मी
मी सूर्याचेनि वेषें । तपें तैं हें शोषे ।
पाठीं इंद्र होऊनि वर्षें । तैं पुढती भरे
अग्नि काष्ठें खाये । तें काष्ठचि अग्नि होये ।
तेवि मरतें मारितें पाहें । स्वरुप माझें
यालागीं मृत्यूचां भागीं जें जें । तेंही पैं रुप माझें ।
आणि न मरतें तंव सहजें । अविनाशु मी
आता बहु बोलोनि सांगावें । तें एकिहेळां घे पां आघवें ।
तरी सतासतही जाणावें । मीचि पैं गा
म्हणोनि अर्जुना मी नसें । ऐसा कवणु ठाव असे ।
परि प्राणियांचें दैव कैसे । जे न देखती मातें
तरंग पाणियेंवीण सुकती । रश्मि वातीवीण न देखती ।
तैसे मीचि ते मी नव्हती । विस्मो देखे
हें आतबाहेर मियां कोंदलें । जग निखिल माझेंचि वोतिलें ।
कीं कैसें कर्म तयां आलें । जे मींचि नाही म्हणती
परि अमृतकुहां पडिजे । कां आपणयातें कडिये काढिजे ।
ऐसें आथी काय कीजे । अप्राप्तासि
ग्रासा एका अन्नासाठीं । अंधु धांवताहे किरीटी ।
आडळला चिंतामणि पायें लोटी । आंधळेपणे
तैसें ज्ञान जैं सांडुनि जाये । तैं ऐसी हे दशा आहे ।
म्हणोनि कीजे तें केलें नोहे । ज्ञानेंवीण
आंधळेया गरुडाचे पांख आहाती । ते कवणा उपेगा जाती ।
तैसें सत्कर्माचे उपखे ठाती । ज्ञानेंवीण
देख पां गा किरीटी । आश्रमधर्माचिया राहाटी ।
विधिमार्गा कसवटी । जे आपणचि होती
यजन करितां कौतुकें । तिहीं वेदांचा माथा तुके ।
क्रिया फळेंसि उभी ठाके । पुढां जयां
ऐसे दीक्षित जे सोमप । जे आपणचि यज्ञाचें स्वरुप ।
तींहीं तया पुण्याचेनि नांवें पाप । जोडिलें देखें
जे श्रुतित्रयांते जाणोनि । शतवरी यज्ञ करुनि ।
यजिलिया मातें चुकोनि । स्वर्गु वरिती
जैसें कल्पतरुतळवटीं । बैसोनि झोळिये पाडी गांठी ।
मग निदैव निघे किरीटी । दैन्यचि करुं
तैसे शतक्रतूं यजिलें मातें । कीं ईप्सिताति स्वर्गसुखांतें ।
आतां पुण्य कीं हें निरुतें । पाप नोहे
म्हणोनि मजवीण पाविजे स्वर्गु । तो अज्ञानाचा पुण्यमार्गु ।
ज्ञानिये तयातें उपसर्गु । हानि म्हणती
एऱहवीं तरी नरकींचें दुःख । पावोनि स्वर्गा नाम कीं सुख । वांचूनि नित्यानंद गा निर्दोष । तें स्वरुप माझें
मज येतां पैं सुभटा । या द्विविधा गा अव्हांटा ।
स्वर्गु नरकु या वाटा । चोरांचिया
स्वर्गा पुण्यात्मकें पापें येईजे । पापात्मकें पापें नरका जाइजे ।
मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य
आणि मजचिमाजीं असतां । जेणें मी दूरी होय पांडुसुता ।
तें पुण्य ऐसें म्हणतां । जीभ न तुटे काई
परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरि ते दीक्षित ।
यजुनि मातें याचित । स्वर्गभोगु
मग मी न पविजे ऐसें । जें पापरुप पुण्य असे ।
तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती
जेथ अमरत्व हेंचि सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन ।
राजधानीभुवन । अमरावती
जेथ महासिद्धींची भांडारें । अमृताचीं कोठारें ।
जियें गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं
जेथ वोळगे देव पाइका । सैघं चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरुंचिया
गंधर्वगान गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणी ।
उर्वशी मुख्य विलासिनी । अंतौरिया
मदन वोळगे शेजारे । जेथ चंद्र शिंपे सांबरें ।
पवना ऐसें म्हणियारें । धांवणें जेथ
पैं बृहस्पति आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण ।
ताटियेचे सुरगण । विकार जेथें
लोकपाळरांगेचे । राउत जिये पदीचे ।
उचैःश्रवा खांचे । खोलणिये
हें बहु असो जे ऐसे । भोग इंद्रसुखासरिसे ।
ते भोगिजती जंव असे । पुण्यलेशु
मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे ।
आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका
जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें ।
तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगो
एवं थितिया मातें चुकले । जीहीं पुण्यें स्वर्ग कामिले ।
तयां अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु
मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं ।
उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती
अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें ।
तैसें स्वर्गसुख जाणावें । वेदज्ञाचें
अर्जुना वेदु जऱही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला ।
कणु सांडूनि उपणिला । कोंडा जैसा
म्हणऊनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण ।
आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी
पैं सर्वभावेंसी उखितें । जे वोपिले मज चित्तें ।
जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे
तैसा मीवाचूनि कांही । आणिक गोमटेंचि नाहीं ।
मजचि नाम पाहीं । जिणेया ठेविलें
ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांते मातें ।
जे उपासिती तयांतें । मीचि सेवीं
ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणी ।
तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली
मग तीहीं जें जें करावे । तें मजचि पडिलें आघवें ।
जैशी अजातपक्षांचेनि जीवें । पक्षिणी जिये
आपुली तहानभूक नेणे । तान्हया निकें तें माउलीसीचि करणें ।
तैसे अनुसरले जे मज प्राणें । तयांचेन काइसेनिहि न लजें मी
तया माझिया सायुज्याची चाड । तरि तेंचि पुरवीं कोड ।
कां सेवा म्हणती तरी आड । प्रेम सुयें
ऐसा मनीं जो जो भावो । तो तो पुढां पुढां लागें तयां देवों ।
आणि दिधलियाचा निर्वाहो । तोहि मीचि करीं
हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा ।
जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी
आतां आणिकही संप्रदायें । परि मातें नेणती समवायें ।
जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती
तेंही कीर मातेंचि होये । कां जे हें आघवें मीचि आहें ।
परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे
पाहे पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे ।
परि पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे
कां दहाहीं इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती ।
आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठाया
तरि करोनि रससोय बरवी । कानीं केविं भरावी ।
फुलें आणोनि बांधावीं । डोळां केविं
तो रसु तो मुखेंचि सेवावा । परिमळु तो घ्राणेंचि घ्यावा ।
तैसा मी तो यजावा । मीचि म्हणोनि
येर मातें नेणोनि भजन । तें वायांचि गा आनेंआन ।
म्हणोनि कर्माचे डोळे ज्ञान । तें निर्दोष होआवें
एऱहवीं पाहें पां पंडुसुता । या यज्ञोपहारां समस्तां ।
मीवांचूनि भोक्ता । कवणु आहे
मी सकळां यज्ञांचा आदि । आणि यजना या मीचि अवधि ।
कीं मातें चुकोनि दुर्बुद्धि । देवां भजले
गंगेचे उदक गंगे जैसें । अर्पिंजे देवपित्तरोद्देशें ।
माझे मज देती तैसें । परि आनानीं भावीं
म्हणऊनि ते पार्था । मातें न पवतीचि सर्वथा ।
मग मनीं वाहिली जे आस्था । तेथ आले
मनें वाचा करणीं । जयांचीं भजनें देवांचिया वाहणी ।
ते शरीर जातियेक्षणीं । देवचि जाले
अथवा पितरांचीं व्रतें । वाहती जयांचीं चित्तें ।
जीवित सरलिया तयांतें । पितृत्व वरी
कां क्षुद्रदेवतादि भूतें । तियेंचि जयांचीं परमदैवतें ।
जींहीं अभिचारिकीं तयांतें । उपासिलें
तयां देहांची जवनिक फिटली । आणि भूतत्वाची प्राप्ती जाहली ।
एवं संकल्पवशें फळलीं । कर्में तयां
मग मीचि डोळां देखिला । जींहीं कानीं मीचि ऐकिला ।
मनीं मी भाविला । वानिला वाचा
सर्वांगीं सर्वाठायीं । मीचि नमस्कारिला जिहीं ।
दानपुण्यादिकें जें कांहीं । तें माझियाचि मोहरा
जिहीं मातेंचि अध्ययन केलें । जे आंतबाहेर मियांचि धाले ।
जयांचे जीवित्व जोडलें । मजचिलागीं
जे अहंकारु वाहत आंगीं । आम्ही हरीचे भूषावयालागीं ।
जे लोभिये एकचि जगीं । माझेनि लोभें
जे माझेनि कामें सकाम । जे माझेनि प्रेमें सप्रेम ।
जे माझिया भुली सभ्रम । नेणती लोक
जयांचीं जाणती मज शास्त्रें । मी जोडें जयाचेनि मंत्रें ।
ऐसे जे चेष्टामात्रें । भजले मज
ते मरणाऐलीचकडे । मज मिळोनि गेले फुडे ।
मग मरणीं आणिकीकडे । जातील केविं
म्हणोनि मद्याजी जे जाहाले । ते माझिया सायुज्या आले ।
जिहीं उपचारमिषें दिधलें । आपणपें मज
पैं अर्जुना माझां ठायीं । आपणपेवीण सौरसु नाहीं ।
मी उपचारीं कवणाही । नाकळें गा
एथ जाणिव करी तोचि नेणे । आथिलेंपण मिरवी तेंचि उणें ।
आम्ही जाहलों ऐसें जो म्हणे । तो कांहींचि नव्हे
अथवा यज्ञदानादि किरीटी । कां तपें हन जे हुटहुटी ।
ते तृणा एकासाठीं । न सरे एथ
पाहें पां जाणिवेचेनि बळें । कोण्ही वेदापासूनि असे आगळें ।
कीं शेषाहूनि तोंडागळें । बोलकें आथी
तोही आंथरुणातळवटी दडे । येरु नेति नेति म्हणोनि बहुडे ।
एथ सनकादिक वेडे । पिसे जाहले
करितां तापसांची कडसणी । कवणु जवळां ठेविजैल शूळपाणी ।
तोहि अभिमानु सांडूनि पायवणी । माथां वाहे
नातरी आथिलेपणें सरिसी । कवणी आहे लक्ष्मियेऐसी । श्रियेसारिखिया दासी । घरीं जियेतें
तियां खेळतां करिती घरकुली । तयां नामें अमरपुरें जरि ठेविलीं । तरि न होती काय बाहुलीं । इंद्रादिक तयांचीं
तयां नावडोनि जेव्हां मोडती । तेव्हां महेंद्राचे रंक होती ।
तियां झाडां येउते जयां पाहती । ते कल्पवृक्ष
ऐसें जियेचियां जवळिकां । सामर्थ्य घरींचियां पाइकां ।
ते लक्ष्मी मुख्यनायका । न मनेचि एथ
मग सर्वस्वें करुनि सेवा । अभिमान सांडूनि पांडवा ।
ते पाय धुवावयाचिया दैवा । पात्र जाहाली
म्हणोनि थोरपण पऱहांचि सांडिजे । व्युत्पत्ति आघवी विसरिजे ।
जैं जगा धाकुटें होइजे । तैं जवळीक माझी
अगा सहस्त्रकिरणाचिये दिठी । पुढा चंद्रुही लोपे किरीटी ।
तेथ खद्योत का हुटहुटी । आपुलेनि तेजें
तैसें लक्ष्मियेचें थोरपण न सरे । जेथ शंभूचेंही तप न पुरे ।
तेथ येर प्राकृत हेंदरें । केविं जाणों लाहे
यालागीं शरीरसांडोवा कीजे । सकळगुणांचें लोण उतरिजे । संपत्तिमदु सांडिजे । कुरवंडी करुनी
मग निस्सीमभावौल्हासें । मज अर्पावयाचेनि मिसें ।
फळ आवडे तैसें । भलतयाचें हो
भक्तु माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात वोडवीं ।
मग देठुं न फेडितां सेवीं । आदरेंशी
पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें ।
तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं
हें असो कायसीं फुलें । पानचि एक आवडे तें जाहलें ।
तें साजुकही न हो सुकलें । भलतैसें
परि सर्वभावें भरलें देखें । आणि भुकेला अमृतें तोखे ।
तैसें पत्रचि परि तेणें सुखें । आरोगूं लागें
अथवा ऐसेंही एक घडे । जे पालाही परि न जोडे ।
तरि उदकाचें तंव सांकडें । नव्हेल कीं
तें भलतेथ निमोलें । न जोडितां आहे जोडलें ।
तेंचि सर्वस्व करुनि अर्पिलें । जेणें मज
तेणें वैकुठापासोनि विशाळें । मजलागीं केलीं राऊळें ।
कौस्तुभाहोनि निर्मळें । लेणीं दिधलीं
दूधाचीं शेजारें । क्षीराब्धीऐसीं मनोहरे ।
मजलागीं अपारें । सृजिलीं तेणें
कर्पूर चंदन अगरु । ऐसेया सुगंधाचा महामेरु ।
मज हातीं लाविला दिनकरु । दीपमाळे
गरुडासारिखीं वाहनें । मज सुरतंरुचीं उद्यानें ।
कामधेनूंचीं गोधनें । अर्पिलीं तेणें
मज अमृताहूनि सुरसें । बोनीं वोगरिलीं बहुवसें ।
ऐसा भक्तांचेनि उदकलेशें । परितोषें गा
हें सांगावें काय किरीटी । तुम्हींचि देखिलें आपुलिया दिठी ।
मी सुदामयाचिया सोडीं गाठीं । पव्हयालागीं
पैं भक्ति एकी मी जाणें । तेथ सानें थोर न म्हणें ।
आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया
येर पत्र पुष्प फळ । तें भजावया मिस केवळ ।
वांचूनि आमुचा लाग निष्फळ । भक्तितत्व
म्हणोनि अर्जुना अवधारीं । तूं बुद्धि एकी सोपारी करीं ।
तरी सहजें आपुलिया मनोमंदिरीं । न विसंबें मातें
जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी ।
अथवा यज्ञीं यजसी । नानाविधीं
नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें ।
तपादि साधनें । व्रतें करिसी
तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें ।
तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा
परि सर्वथा आपुलां जीवीं । केलियाची शंका कांहींचि नुरवीं ।
ऐसीं धुवोनि कर्मे द्यावीं । माझियां हातीं
मग अग्निकुंडी बीजें घातलीं । तियें अंकुरदशे जेविं मुकलीं ।
तेवि न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभें
अगा कर्मे जैं उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें ।
आणि तयातें भोगावया यावें । देहा एका
तें उगाणिलें मज कर्म । तेव्हांचि पुसिलें मरण जन्म ।
जन्मासवें श्रम । वरचिलही गेले
म्हणऊनि अर्जुना यापरि । पाहेचा वेळु नव्हेल भारी ।
हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज
या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखाचिया सागरीं न बुडिजे । सुखें सुखरुपा घडिजे । माझियाचि अंगा
तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा ।
जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं
जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि ।
जे जीवें कर्मे करुनि । भजती मातें
ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझां ठायीं ।
आणि मी तयांचा हृदयीं । समग्र असें
सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे ।
आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं
तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें ।
वांचुनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते
आतां जायांचें लेणें । जैसें आंगावरी आहाचवाणें ।
तैसें देह धरणें । उदास तयांचें
परिमळु निघालिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देठीं ।
तैसें आयुष्याचिये मुठी । केवळ देह
येर अवष्टंभु जो आघवा । तो आरुढोनि मद्भावा ।
मजचि आंतु पांडवा । पैठा जाहला
ऐसें भजतेनि प्रेमभावें । जयां शरीरही पाठीं न पवे ।
तेणें भलतया व्हावें । जातीचिया
आणि आचरण पाहातां सुभटा । तो दुष्कृताचा सेल वांटा ।
परि जीवित वेचिलें चोहटां । भक्तीचिया कीं
अगा अंतींचिया मती । साचपण पुढिले गती ।
म्हणोनि जीवित जेणें भक्ती । दिधलें शेखीं
तो आधीं जरी अनाचारी । तरी सर्वोत्तमुचि अवधारीं ।
जैसा बुडाला महापूरीं । न मरतु निघाला
तयाचें जीवित ऐलथडिये आलें । म्हणोनि बुडालेपण जेवीं वायां गेलें ।
तेवीं नुरेचि पाप केलें । शेवटलिये भक्ती
यालागीं दुष्कृती जऱही जाहला । तरि अनुतापतीर्थीं न्हाला ।
न्हाऊनि मजआंतु आला । सर्वभावें
तरि आतां पवित्र तयाचेंचि कुळ । अभिजात्य तेंचि निर्मळ ।
जन्मलेया फळ । तयासीच जोडलें
तो सकळही पढिन्नला । तपें तोचि तपिन्नला ।
अष्टांग अभ्यासिला । योगु तेणें
हें असो बहुत पार्था । तो उतरला कर्मे सर्वथा ।
जयाची अखंड गा आस्था । मजचिलागीं
अवघिया मनोबुद्धीचिया राहटी । भरोनि एकनिष्ठेचिया पेटी ।
जेणें मजमाजीं किरीटी । निक्षेपिली
क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्तिं निगच्छति ।
तो आतां अवसरें मजसारिखा होइल । ऐसाही भाव तुज जाइल ।
हां गा अमृताआंत राहील । तया मरण कैचें
पै सूर्य जो वेळु नुदैजे । तया वेळा कीं रात्र म्हणिजे ।
तेवीं माझिये भक्तीविण जें कीजे । तें महापाप नोहे
म्हणोनि तयाचिया चित्ता । माझी जवळीक पांडुसुता ।
तेव्हांचि तो तत्वता । स्वरुप माझें
जैसा दीपें दीपु लाविजे । तेथ आदील कोण हें नोळखिजे ।
तैसा सर्वस्वें जो मज भजे । तो मी होऊनि ठाके
मग माझी नित्य शांती । तया दशा तेचि कांती ।
किंबहुना जिती । माझेनि जीवें । ४२९ ॥
एथ पार्था पुढतपुढती । तेंचि तें सांगो किती ।
जरी मियां चाड तरी भक्ती । न विसंबिजे गा
अगा कुळाचिया चोखटपणा नलगा । अभिजात्य झणीं श्लाघा । व्युत्पत्तीचा वाउगा । सोसु कां वहावा
कां रुपे वयसा माजा । आथिलेपणें कां गाजा ।
एक भाव नाहीं माझा । तरी पाल्हाळ तें
कणेंविण सोपटें । कणसें लागलीं आथी एक दाटें ।
काय करावें गोमटें । वोस नगर
नातरी सरोवर आटलें । रानीं दुःखिया दुःखी भेटलें ।
कां वांझ फुलीं फुललें । झाड जैसें
तैसें सकळ तें वैभव । अथवा कुळजातीगौरव ।
जैसें शरीर आहे सावेव । परि जीवचि नाहीं
तैसें माझिये भक्तीविण । जळो तें जियालेंपण ।
अगा पृथ्वीवरी पाषाण । नसती काई
पैं हिंवराची दाट साउली । सज्जनीं जैसी वाळिली ।
तैसीं पुण्यें डावलूनि गेलीं । अभक्तांतें
निंब निंबोळियां मोडोनि आला । तरी तो काउळियांसीचि सुकाळु जाहला ।
तैसा भक्तिहीनु वाढिन्नला । दोषांचिलागीं
कां षड्रस खापरीं वाढिले । वाढूनि चोहटां रात्री सांडिले ।
ते सुणियांचेचि ऐसे झाले । जियापरी
तैसें भक्तीहीनाचें जिणें । जो स्वप्नींही परि सुकृत नेणे ।
तेणे संसारदुःखासी आवंतणें । वोगरिलें गा
म्हणोनि कुळ उत्तम नोहावें । जाती अंत्याही व्हावें ।
वरि देहाचेनि नांवें । पशूचेंही लाभो
पाहें पां सावजें हातिरुं धरिलें । तेणें तया काकुळती मातें स्मरिलें ।
कीं तयाचें पशुत्व वावो जाहलें । पातलिया मातें
अगा नांवें घेता वोखटीं । जे आघवेया अधमांचिये शेवटीं ।
तिये पापयोनीही किरीटी । जन्मले जे
ते पापयोनि मूढ । मूर्ख ऐसे जे दगड ।
परि माझां ठायीं दृढ । सर्वभावें
जयांचिये वाचे माझे आलाप । दृष्टी भोगी माझेंचि रुप ।
जयांचें मन संकल्प । माझाचि वाहे
माझिया कीर्तीविण । जयांचे रिते नाहीं श्रवण ।
जयां सर्वांगीं भूषण । माझी सेवा
जयांचें नाव विषो नेणे । जाणीव मजचि एकातें जाणे ।
जया ऐसें लाभे तरी जिणें । एऱहवीं मरण
ऐसा आघवाचि परि पांडवा । जिहीं आपुलिया सर्वभावा । जियावयालागीं वोलावा । मीचि केला
ते पापयोनीही होतु कां । ते श्रुताधीतही न होतुं कां ।
परि मजसीं तुकितां तुका । तुटी नाहीं
पाहें पां भक्तिचेनि आथिलेपणें । दैत्यीं देवां आणिलें उणें ।
माझें नृसिंहत्व लेणें । जयाचिये महिमे
तो प्रल्हादु गा मजसाठीं । घेतां बहुतें सदा किरीटी ।
कां जें मियां द्यावें ते गोष्टी । तयाचिया जोडे
एऱहवीं दैत्यकुळ साचोकारें । परि इंद्रिही सरी न लाहे उपरें ।
म्हणोनि भक्ति गा एथ सरे । जाति अप्रमाण
राजाज्ञेचीं अक्षरें आहाती । तियें चामा एका जया पडती ।
तया चामासाठीं जोडती । सकळ वस्तु
वांचूनि सोनें रुपें प्रमाण नोहे । एथ राजाज्ञाचि समर्थ आहे ।
तेंचि चाम एक जैं लाहे । तेणें विकती आघवीं
तैसें उत्तमत्व तैंचि तरे । तैंचि सर्वज्ञता सरे ।
जैं मनोबुद्धि भरे । माझेनि प्रेमें
म्हणोनि कुळ जाति वर्ण । हें आघवेंचि गा अकारण ।
एथ अर्जुना माझेपण । सार्थक एक
तेंचि भलतेणें भावें । मन मजाआंतु येतें होआवें ।
आलें तरी आघवें । मागील वावो
जैसे तवंचि वहाळ वोहळ । जंव न पवती गंगाजळ ।
मग होऊनि ठाकती केवळ । गंगारुप
कां खैर चंदन काष्ठें । हे विवंचना तंवचि घटे ।
जंव न घापती एकवटें । अग्नीमाजीं
तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यादि इया ।
जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें
मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भाव होती मज मीनले ।
जैसे लवणकण घातले । सागरामाजीं
तंववरी नदानदींचीं नांवें । तंवचि पूर्वपश्चिमेचे यावे ।
जंव न येती आघवे । समुद्रामाजीं
हेंचि कवणें एकें मिसें । चित्त माझां ठायीं प्रवेशे ।
येतुलें हो मग आपैसें । मी होणे असे
अगा वरी फोडावयाचि लागीं । लोहो मिळो कां परिसाचां आंगीं ।
कां जे मिळतिये प्रसंगीं । सोनेंचि होईल
पाहें पां वालभाचेनि व्याजें । तिया व्रजांगनांचीं निजें ।
मज मीनलिया काय माझें । स्वरुप नव्हतीचि
नातरी भयाचेनि मिसें । मातें न पविजेचि काय कंसें ।
कीं अखंड वैरवशें । चैद्यादिकीं
अगा सोयरेपणेंचि पांडवा । माझें सायुज्य यादवां ।
कीं ममत्वें वासुदेवा- । दिकां सकळां
नारदा ध्रुवा अक्रूरा । शुका हन सनत्कुमारा ।
यां भक्ती मी धनुर्धरा । प्राप्यु जैसा
तैसाचि गोपीसी कामें । तया कंसा भयसंभ्रमें ।
येरा घातकेयां मनोधर्में । शिशुपालादिकां
अगा मी एकुलाणीचें खागें । मज येवों ये भलतेनि मार्गे ।
भक्ती कां विषयें विरागें । अथवा वैरें
म्हणोनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझां ठायीं ।
उपायांची नाहीं । केणि एथ
आणि भलतिया जाती जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें ।
परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि
अगा कवणें एके बोलें । माझेपण जऱही जाहालें ।
तरी मी होणें आलें । हाता निरुतें
यापरि पापयोनीही अर्जुना । कां वैश्य शूद्र अंगना ।
मातें भजतां सदना । माझिया येती
मग वर्णांमाजीं छत्रचामर । स्वर्ग जयांचें अग्रहार ।
मंत्रविद्येसि माहेर । ब्राह्मण जे
जेथ अखंड वसिजे यागीं । जे वेदांची वज्रांगी ।
जयाचिये दिठीचां उत्संगीं । मंगळ वाढे
जे पृथ्वीतळींचे देव । जे तपोवतार सावयव ।
सकळ तीर्थांसी दैव । उदयलें जे
जयाचिये आस्थेचिये वोले । सत्कर्म पाल्हाळीं गेलें ।
संकल्पें सत्य जियालें । जयांचेनि
जयांचेनि गा बोलें । अग्नीसि आयुष्या जाहालें ।
म्हणोनि समुद्रें पाणी आपुलें । दिधलें यांचिया प्रीती
मियां लक्ष्मी डावलोनि केली परौती । फेडोनि कौस्तुभ घेतला हातीं । मग वोढविली वक्षस्थळाची वाखती । चरणरजां
आझूनि पाउलांची मुद्रा । मी हृदयीं वाहें गा सुभद्रा ।
जे आपुलिया दैवसमुद्रा । जतनेलागीं
जयांचा कोप सुभटा । काळाग्निरुद्राचा वसौटा ।
जयांचां प्रसादीं फुकटा । जोडती सिद्धी
ऐसे पुण्यपूज्य जे ब्राह्मण । आणि माझां ठायीं आर्तिंनिपुण ।
आतां मातें पावती हें कवण । समर्थणें
पाहें पां चंदनाचेनि अंगानिळें । शिवतिले निंब होते जे जवळे ।
तिंहीं निर्जिवींही देवांची निडळें । बैसणीं केलीं
मग तो चंदनु तेथ न पवे । ऐसें मनीं कैसेनि धरावें ।
अथवा पातला हें समर्थावें । तेव्हां कायि साच
जेथ निववील ऐसिया आशा । हरें चंद्रमा आधा ऐसा ।
वाहिजत असे शिरसा । निरंतर
तेथ निवविता आणि सगळा । परिमळें चंद्राहूनि आगळा ।
तो चंदनु केविं अवलीळा । सर्वांगी न बैसे
कां रथ्योदकें जियेचिये कासे । लागलिया समुद्र जालीं अनायासें ।
तिये गंगेसि काय अनारिसें । गत्यंतर असे
म्हणोनि राजर्षि कां ब्राह्मण । जयां गती मती मीचि शरण ।
तयां त्रिशुद्धी मीच निर्वाण । स्थितिही मीचि
यालागीं शतजर्जरे नावे । रिगोनि केविं निश्चिंत होआवें ।
कैसेनि उघडिया असावें । शस्त्रवर्षीं
अंगावरी पडतां पाषाण । न सुवावें केविं वोडण ।
रोगें दाटलिया आणि उदासपण । वोखदेंसीं
जेथ चहूंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजे केविं पांडवा ।
तेविं लोका येऊनिया सोपद्रवा । केविं न भजिजे मातें
अगा मातें न भजावयालागीं । कवण बळ पां आपुलां आंगीं ।
काइ घरीं कीं भोगीं । निश्चिंती केली
नातरी विद्या कीं वयसा । यां प्राणियांसि हा ऐसा ।
मज न भजतां भरवसां । सुखाचा कोण
तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें ।
आणि येथ देह तंव असे पडिलें । काळाचां तोंडीं
बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले ।
तिये मृत्युलोकींचिये शेवटिले । येणें जाहालें हाटवेळे
आतां सुखेंसि जीविता । कैची ग्राहिकी कीजेल पांडुसुता ।
काय राखोंडी फुंकिता । दीपु लागे
अगा विषाचे कांदे वाटुनी । जो रसु घेइजे पिळुनी ।
तया नाम अमृत ठेउनी । जैसें अमर होणें
तेविं विषयांचें जें सुख । तें केवळ परम दुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे
कां शीस खांडूनि आपुलें । पायींचां खतीं बांधिलें ।
तैसें मृत्युलोकींचें भलें । आहे आघवें
म्हणोनि मृत्युलोकीं सुखाची कहाणी । ऐकिजेल कवणाचां श्रवणीं । कैंची सुखनिद्रा आंथरुणीं । इंगळाचां
जिये लोकीचा चंद्र क्षयरोगी । जेथ उदयो होय अस्तालागीं ।
दुःख लेऊनि सुखाची आंगी । सळित जगातें
जेथे मंगळाचां अंकुरीं । सवेंचि अमंगळाची पडे पोरी ।
मृत्यु उदराचां परिवरीं । गर्भु गिंवसी
जें नाहीं तयांतें चिंतवी । तंव तेंचि नेइजे गंधर्वीं ।
गेलियाची कवणे गांवीं । शुद्धी न लभे
अगा गिंवसितां आघवा वाटी । परतलें पाउलचि नाहीं किरीटी ।
सैंघ निमालियांचियाचि गोठी । तिंये पुराणें जेथिंचीं
जेथींचिये अनित्यतेची थोरी । करितया ब्रह्मयाचें आयुष्यवेरी ।
कैसें नाहीं होणें अवधारीं । निपटूनियां
ऐसी लोकींची जिये नांदणूक । तेथ जन्मले आथि जे लोक ।
तयांचिये निश्चिंतीचे कौतुक । दिसत असे
पैं दृष्टादृष्टीचिये जोडी । लागीं भांडवल न सुटे कवडी ।
जेथ सर्वस्वें हानि तेथ कोडी । वेंचिती गा
जो बहुवें विषयविलासें गुफें । तो म्हणती उवायें पडिला सापें ।
जो अभिलाषभारें दडपे । तयातें सज्ञान म्हणती
जयाचें आयुष्य धाकुटें होय । बळ प्रज्ञा जिरौनि जाय ।
तयाचे नमस्कारिती पाय । वडिल म्हणुनि
जंव जंव बाळ बळिया वाढे । तंव तंव भोजें नाचती कोडें ।
आयुष्य निमालें आंतुलियेकडे । ते ग्लानीचि नाहीं
जन्मलिया दिवसदिवसें । हों लागे काळाचियाचि ऐसें ।
कीं वाढती करिती उल्हासें । उभविती गुढिया
अगा मर हा बोलु न साहती । आणि मेलिया तरी रडती ।
परि असतें जात न गणिती । गहिंसपणें
दर्दुर सापें गिळिजतु आहे उभा । कीं तो मासिया वेटाळी जिभा ।
तैसे प्राणिये कवणा । वाढविती तृष्णा
अहा कटा हें वोखटें । मृत्युलोकींचें उफराटें ।
एथ अर्जुना जरी अवचटें । जन्मलासी तूं
तरि झडझडोनि वहिला निघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।
जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें
मन्मना भव मद्भक्तो मद्याजी मां नमस्कुरु ।
तूं मन हें मीचि करीं । माझां भजनीं प्रेम धरीं ।
सर्वत्र नमस्कारीं । मज एकातें
माझेनि अनुसंधानें देख । संकल्पु जाळणें निःशेख ।
मद्याजी चोख । याचि नांव
ऐसा मियां आथिला होसी । तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ।
हें अंतःकरणींचें तुजपासीं । बोलिजत असे
अगा आवघिया चोरिया आपुलें । जें सर्वस्व आम्ही असे ठेविलें ।
तें पावोनि सुख संचले । होऊनि ठासी
ऐसें सांवळेनि परब्रह्में । भक्तकामकल्पद्रुमें ।
बोलिलें आत्मारामें । संजयो म्हणे
अहो ऐकिजत असे कीं अवधारा । तंव इया बोला निवांत म्हातारा । जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे
तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला ।
कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा
तऱही दातारु हा आमुचा । म्हणोनि हें बोलतां मैळेल वाचा ।
काइ झालें ययाचा । स्वभावोचि ऐसा
परि बाप भाग्य माझें । जे वृत्तांतु सांगावयाचेनि व्याजें ।
कैसा रक्षिलों मुनिराजें । श्रीव्यासदेवें
येतुलें हें वाडें सायासें । जंव बोलत असे दृढें मानसें ।
तंव न धरवेचि आपुलिया ऐसें । सात्विकें केलें
चित्त चाकाटलें आटु घेत । वाचा पांगुळली जेथिंची तेथ । आपादकंचुकित । रोमांच आले
अर्धोन्मीलित डोळे । वर्षताति आनंदजळें ।
आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे
पै आघवांचि रोममूळीं । आली स्वेदकणिका निर्मळी ।
लेइला मोतियांचीं कडियाळीं । आवडे तैसा
ऐसा महासुखाचेनि आर्तिंरसे । जेथ आटणी होईल जीवदशे ।
तेथे निरोविलें व्यासें । तें नेदीच हों
आणि कृष्णार्जुनाचें बोलणें । घों करी आलें श्रवणें ।
कीं देहस्मृतीचा तेणें । वापसा केला
तेव्हां नेत्रींचें जळ विसर्जी । सर्वांगींचा स्वेदु परिमार्जी ।
तेवींचि अवधान म्हणे हो जी । धृतराष्ट्रातें
आतां कृष्णवाक्यबीजा निवाडु । आणि संजय सात्विकाचा बिवडु । म्हणोनि श्रोतया होईल सुरवाडु । प्रमेयपिकाचा
अहो अळुमाळु अवधान देयावें । येतुलेनि आनंदाचे राशीवर बैसावें । बाप श्रवणेंद्रिया दैवें । घातली माळ
म्हणोनि विभूतींचा ठावो । अर्जुना दावील सिद्धांचा रावो ।
तो ऐका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0