ज्ञानेश्वरी · अध्याय 8
अर्जुन उवाचः किं तद् ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं च किं प्रोक्तमधिदैवं किमुच्यते
सांगा कवण तें ब्रह्म । काइसया नाम कर्म ।
अथवा अध्यात्म । काय म्हणिपे
अधिभूत तें कैसे । एथ अधिदैव तें कवण असे ।
हें उघड मी परियेसें । तैसें बोला
देवा अधियज्ञ तो काई । कवण पां इये देही ।
हें अनुमानासि कांही । दिठी न भरे
आणि नियता अंतःकरणी । तूं जाणिजसी देहप्रयाणी ।
तें कैसेनि हें शारंगपाणी । परिसवा मातें
देखा धवळारी चिंतामणीचा । जरी पहुडला होय दैवाचा ।
तरी वोसणताही बोल तयाचा । परी सोपु न वचे
तैसें अर्जुनाचिया बोलासवें । आलें तेंचि म्हणितलें देवे।
परियेसें गा बरवे । जें पुसिले तुवां
किरीटी कामधेनूचा पाडा । वरी कल्पतरूचा आहे मांदोडा ।
म्हणोनि मनोरथसिद्धीचिया चाडा । तो नवल नोहे
कृष्ण कोपोनि ज्यासि मारी । तो पावे परब्रह्मसाक्षात्कारी ।
मा कृपेने उपदेशु करी । तो कैशापरी न पवेल
जैं कृष्णाचेया होइजे आपण । तैं कृष्ण होय आपुले अंतःकरण ।
मग संकल्पाचे आंगण । वोळगती सिद्धी
परि ऐंसे जें प्रेम । अर्जुनींचि आथि निस्सीम ।
म्हणऊनि तयाचे काम । सदा सफळ
या कारणे श्रीअनंते । तें मनोगत तयाचें पुसतें ।
होईल जाणूनि आइतें । वोगरूनि ठेविलें
जें अपत्य थानी निगे । त्याची भूक ते मातेसीचि लागे ।
एऱहवीं तें शब्दें काय सांगे । मग स्तन्य दे येरी
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायी । हे नवल नोहे कांही ।
परि तें असो आइका काई । जें देव बोलते जाहले
मग म्हणितले सर्वेश्वरें । जें आकारी इये खोंकरें ।
कोंदलें असत न खिरे । कवणे काळी
एऱहवीं सपूरपण तयाचें पहावें । तरि शून्यचि नव्हे स्वभांवें ।
वरि गगनाचेनि पालवे । गाळूनि घेतलें
जें ऐसेंही परि विरूळें । इये विज्ञानाचिये खोळे ।
हालवलेंही न गळे । ते परब्रह्म
आणि आकाराचेनि जालेपणें । जन्मधर्मातें नेणे ।
आकारलोपीं निमणें । नाहीं कहीं
ऐशिया आपुलियाची सहज स्थिती । जया ब्रह्माची नित्यता असती ।
तया नाम सुभद्रापति । अध्यात्म गा
मग गगनी जेविं निर्मळें । नेणों कैंची एक वेळे ।
उठती घनपटळे । नानावर्णे
तैसे अमूर्तीं तिये विशुध्दे । महदादि भूतभेदें ।
ब्रह्मांडाचे बांधे । होंचि लागती
पैं निर्विकल्पाचिये बरडी । कीं आदिसंकल्पाची फुटे विरूढी ।
आणि ते सवेंचि मोडोनि ये ढोंढी । ब्रह्मगोळकांची
तया एकैकाचे भीतरीं पाहिजे । तंव बीजाचाचि भरिला देखिजे ।
माजीं होतियां जातियां नेणिजे । लेख जीवां
मग तयागोळकांचे अंशांश । प्रसवती आदिसंकल्प असमसहास ।
हें असो ऐसी बहुवस । सृष्टी वाढे
परि दुजेनविण एकला । परब्रह्मचि संचला ।
अनेकत्वाचा आला । पूर जैसा
तैसें समविषमत्व नेणों कैचें । वांयांचि चराचर रचे ।
पाहतां प्रसवतिया योनीचे । लक्ष दिसती
येरी जीवभावाचिय पालविये । कांही मर्यादा करूं नये ।
पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य
म्हणूनि कर्ता मुदल न दिसे । आणि शेखीं कारणही कांही नसे ।
माजीं कार्यचि आपैसें । वाढोंचि लागे
ऐसा करितेनवीण गोचरू । अव्यक्तीं हा आकारू ।
निपजे जो व्यापारू । तया नाम कर्म
आतां अधिभूत जें म्हणिपे । तेंहि सांगों संक्षेपें ।
तरी होय आणि हारपे । अभ्र जैसें
तैसें असतेपण आहाच । नाहीं होइजे हें साच ।
जयांतें रूपा आणिती पांचपांच । मिळोनियां
भूतांतें अधिकरूनि असे । आणि भूतसंयोगें तरि दिसे ।
जे वियोगवेळे भ्रंशे । नामरूपादिक
तयातें अधिभूत म्हणिजे । मग अधिदैवत पुरूष जाणिजे ।
जेणें प्रकृतीचें भोगीजे । उपार्जिलें
जो चेतनेचा चक्षु । जो इंद्रियदेशीचा अध्यक्षु ।
जो देहास्तमनीं वृक्षु । संकल्पविहंगमाचा
जो परमात्माचि परि दुसरा । जो अहंकारनिद्रा निदसुरा ।
म्हणोनि स्वप्नींचिया बोरबारा । संतोषें शिणे
जीव येणें नांवें । जयातें आळविजे स्वभावे ।
तें अधिदैवत जाणावें । पंचायतनींचें
आतां इयेचि शरीरग्रामीं । जो शरीरभावातें उपशमी ।
तो अधियज्ञु एथ गा मी । पांडुकुमरा
येर अधिदैवाधिभूत । तेहि मीचि कीर समस्त ।
परि पंधरें किडाळा मिळत । तें काय सांके नोहे
तरि ते पंधरेपण न मैळे । आणि किडाळाचियाही अंशा न मिळे ।
परि जंव असे तयाचेनि मेळें । तव सांकेंचि म्हणिजे
तैसें अधिभूतादि आघवे । हें अविद्येचेनि पालवें ।
झांकलें तंव मानावें । वेगळें ऐसें
तेचि अविद्येची जवनिका फिटे । आणि भेदभावाची अवघि तुटे ।
मग म्हणों एक होऊनि जरी आटे । तरी काय दोनी होती
पैं केशांचा गुंडाळा । वरि ठेविली स्फटिकशिळा ।
ते वरि पाहिजे डोळां । तवं भेदिली गमती
पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें ।
तरि डांक देऊनि सांदिले । शिळेतें काई
ना ते अखंडचि आयती । परि संगें भिन्न गमली होती ।
ते सारिलिया मागौती । जैसी कां तैसी
तेवींचि अहंभावो जाये । तरी ऐक्य तें आधींचि आहे ।
हेंचि साचें जेथ होये । तो अधियज्ञु मी
पैं गा आम्हीं तुज । सकळ यज्ञ कर्मज ।
सांगीतलें कां जें काज । मनी धरूनि
तो हा सकळ जीवांचा विसांवा । नैष्कर्म्यसुखाचा ठेवा ।
परि उघड करूनि पांडव । दाविजत असे
पहिलें वैराग्याइंधनपरिपूर्ती । इंद्रियानळी प्रदीप्तीं ।
विषयद्रव्याचिया आहुती । देऊनिया
मग वज्रासन तेचि उर्वी । शोधूनि आधारमुद्रा बरवी ।
वेदिका रचे मांडवी । शरीराच्या
तेथ संयमाग्नीचीं कुंडे । इंद्रियद्रव्याचेनि पवाडें ।
यजिजती उदंडे । युक्तिघोषे
मग मनप्राण आणि संयमु । हाचि हवनसंपदेचा संभ्रमु ।
येणें संतोषविजे निर्धूमु । ज्ञानानळु
ऐसेनि हें सकळ ज्ञानी समर्पे । मग ज्ञान तें ज्ञेयीं हारपे ।
पाठीं ज्ञेयचि स्वरूपें । निखिल उरे
तया नांव गा अधियज्ञु । ऐसें बोलिला जंव सर्वज्ञु ।
तंव अर्जुन अतिप्राज्ञु । तया पातलें तें
हें जाणोनि म्हणितलें देवें । पार्था परिसतु आहासि बरवें ।
याकृष्णाचिया बोलासवें । येरू सुखाचा जाहला
देखा बालकाचिया धणी धाइजे । कां शिष्याचेनि जाहलेपणें होइजे ।
हें सद्गुरूचि एकलेनि जाणिजे । कां प्रसवतिया
म्हणोनि सात्विकां भावांची मांदी । कृष्णाआंगीं अर्जुनाआधीं ।
न समातसे परी बुद्धी । सांवरूनि देवें
मग पिकलिया सुखाचा परिमळु । कीं निवालिया अमृताचा कल्लोळु ।
तैसा कोंवळा आणि रसाळु । बोलु बोलिला
म्हणे परिसणेयांच्या राया । आइके बापा धनंजया ।
ऐसी जळों सरलिया माया । तेथ जाळितें तेंही जळे
जें आतांचि सांगितलें होतें । अगा अधियज्ञ म्हणितला जयातें ।
जे आदीचि तया मातें । जाणोनि अंतीं
ते देह झोळ ऐसें मानुनी । ठेले आपणपें आपण होऊनी ।
जैसा मठ गगना भरूनी । गगनींचि असे
यें प्रतीतीचिया माजघरीं । तया निश्चयाची वोवरी ।
आली म्हणोनि बाहेरी । नव्हेचि से
ऐसें सबाह्य ऐक्य संचलें । मीचि होऊनि असतां रचिलें ।
बाहेरि भूतांचीं पांचही खवलें । नेणतांचि पडिलीं
आतां उभयां उभेपण नाहीं जयाचें । मा पडिलिया गहन कवण तयाचें ।
म्हणोनि प्रतीतीचिये पोटींचें । पाणी न हाले
ते ऐक्याची आहे वोतिली । कीं नित्यतेचिया हृदयीं घातली ।
जैसी समरससमुद्रीं धुतली । रूळेचिना
पैं अथावीं घट बुडाला । तो आंतबाहेरी उदकें भरला ।
पाठीं दैवगत्या जरी फुटला । तरी उदक काय फुटे
ना तरी सर्पे कवच सांडिलें । कां उबारेनें वस्त्र फेडिलें ।
तरी सांग पां काय मोडलें । अवेवामाजीं
तैसा आकार हा आहाच भ्रंशे । वांचूनि वस्तु ते सांचलीचि असे ।
तेचि बुद्धि जालिया विसुकुसे । कैसेनि आतां
म्हणोनि यापरी मातें । अंतकाळीं जाणत सांते ।
जे मोकलिती देहातें । तें मीचि होती
एऱहवीं तरी साधारण । उरीं आदळलिया मरण ।
जो आठव धरी अंतःकरण । तेंचि होइजे
जैसा कवण एक काकुळती । पळतां पवनगती ।
दुपाउलीं अवचितीं । कुहामाजी पडियेला
आतां तया पडणयाआरौतें । पडण चुकवावया परौतें ।
नाहीं म्हणोनि तेथें । पडावेंचि पडे
तेंवि मृत्यूचेनि अवसरें एकें । जें येऊनि जीवासमोर ठाके ।
तें होणें मग न चुके । भलतयापरी
आणि जागता जंव असिजे । तंव जेणें ध्यानें भावना भाविजे ।
डोळा लागतखेवों देखिजे । तेंचि स्वप्नीं
तेविं जितेनि अवसरें । जें आवडोनि जीवीं उरे ।
तेंचि मरणाचिये मेरे । फार हों लागे
आणि मरणीं जया जें आठवे । तो तेचि गतीतें पावे।
म्हणोनि सदां स्मरावें । मातेंचि तुवां
डोळां जें देखावें । कां कानी हन ऐकावें ।
मनीं जें भावावें । बोलावें वाचे
तें आतं बाहेरि आघवें । मीचि करूनि घालावें ।
मग सर्वीं काळीं स्वभावें । मीचि आहें
अर्जुना ऐसें जाहलिया । मग न मरिजे देह गेलिया ।
मा संग्रामु केलिया । भय काय तुज
तूं मनबुद्धि साचेंसीं । जरी माझिया स्वरूपीं अर्पिसी ।
तरी मातेंचि गा पावसी । हे माझी भाक
हेंच कायिसया वरी होये । ऐसा जरी संदेहो वर्ततु आहे ।
तरी अभ्यासूनि आदीं पाहें । मग नव्हे तरी कोपें
येणेंचि अभ्यासेंसिं योगु । चित्तासि करीं पां चांगु ।
अगा उपायबळें पंगु । पहाड ठाकी
तेविं सदभ्यासें निरंतर । चित्तासि परमपुरूषाची मोहर ।
लावें मग शरीर । राहो अथवा जावो
जें नानागतीतें पाववितें । तें चित्त वरील आत्मयातें ।
मग कवण आठवी देहातें । गेलें की आहे
पैं सरितेचिनि ओघें । सिंधुजळा मीनलें ओघें ।
तें काय वर्तत आहे मागें । म्हणोनि पाहों येते
ना तें समुद्रचि होऊन ठेलें । तेविं चित्ताचें चैतन्य जाहालें ।
जेथ यातायात निमालें । घनानंद जें
जयाचें आकारावीण असणें । जया जन्म ना निमणें ।
जें आघवेंचि आघवेपणें । देखत असे
जें गगनाहून जुनें । जं परमाणूहूनि सानें ।
जयाचेनि सान्निधानें । विश्व चळे
जें सर्वांतें यया विये । विश्व सर्व जेणें जिये ।
हेतु जया बिहे । अचिंत्य जें
देखे वोळंबा इंगळु न चरे । तेजीं तिमिर न शिरे ।
जें दिहाचें आंधारें । चर्मचक्षूसीं
सुसडा सूर्यकणांच्या राशी । जो नित्य उदो ज्ञानियांसी ।
अस्तमानाचें जयासी । आडनांव नाहीं
तया अव्यंगवाणेया ब्रह्मातें । प्रयाणकाले प्राप्ते ।
जो स्थिरावलेनि चित्तें । जाणोनि स्मरे
बाहेरी पद्मासन रचुनी । उत्तराभिमुख बैसोनि ।
जीवीं सुख सूनि । कर्मयोगाचें
आंतु मिनलेनि मनोधर्मे । स्वरूपप्राप्तीचेनि प्रेमें ।
आपेंआप संभ्रमें । मिळावया
आकळलेनि योगें । मध्यमा मध्यमार्गे ।
अग्निस्थानैनि निगे । ब्रह्मरंघ्रा
तेथ अचेत चित्ताचा सांगातु । आहाचवाणा दिसे मांडतु ।
जेथ प्राण गगनाआंतु । संचरे कां
परी मनाचेनि स्थैयैं धरिला । भक्तीचिया भावना भरला ।
योगबळें आवरला । सज्ज होउनी
तो जडाजडातें विरवितु । भ्रूलतांमाजी संचरतु ।
जैसा घंटानाद लयस्थु । घंटेसींच होय
कां झांकलिय घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।
या रीती जो पांडवा । देह ठेवी
तो केवळ परब्रह्म । जया परमपुरूष ऐसें नाम ।
तें माझें निजधाम । होऊनि ठाके
सकळां जाणणेयां जे लाणी । तिये जाणिवेची जे खाणी ।
तयां ज्ञानियांचिये आयणी । जयातें अक्षर म्हणिपे
चंडवातेंही न मोडे । तें गगनचि कीं फुडें ।
वांचूनि जरे होईल मेहुडें । तरी उरेल कैंचे
तेविं जाणणेया जें आकळिलें । तें जाणवलेपणेंचि उमाणलें ।
मग नेणवेचि तया म्हणितलें । अक्षर सहजें
म्हणोनि वेदविद नर । म्हणती जयातें अक्षर ।
जें प्रकृतीसी पर । परमात्मरूप
आणि विषयांचें विष उलंडूनि । जे सर्वेंद्रियां प्रायश्चित देऊनि ।
आहाति देहाचिया बैसोनि । झाडातळी
ते यापरी विरक्त । जयाची निरंतर वाट पाहात ।
निष्कामासि अभिप्रेत । सर्वदा जें
जयाचिया आवडी । न गणिती ब्रह्मचर्यादि सांकडी ।
निष्ठुर होऊनि बापुडी । इंद्रिये करिती
ऐसें जें पद । दुर्लभ आणि अगाध ।
जयाचिये थडिये वेद । चुबुकळिले ठेले
तें तें पुरूष होती । जे यापरी लया जाती ।
तरी पार्था हेचि स्थिती । एक वेळ सांगो
तेथ अर्जुनें म्हणितलें स्वामी । हेंचि म्हणावया होतों पां मी ।
तंव सहजें कृपा केली तुम्ही । तरी बोलिजो कां
परि बोलावें तें अति सोहोपें । तेथें म्हणितलें त्रिभुवनदीपें ।
तुज काय नेणों संक्षेपें । सांगेन ऐक
तरी मना या बाहेरिलीकडे । यावयाची साविया सवे मोडे ।
हें हृदयाचिया डोहीं बुडे । तैसें कीजे
परी हें तरीच घडे । जरी संयमाची अखंडें ।
सर्वद्वारी कवाडें । कळासती
तरी सहजें मन कोंडलें । हृदयींचि असेल उगलें ।
जैसें करचरणीं मोडलें । परिवरू न संडी
तैसें चित्त राहिल्या पांडवा । प्राणाचा प्रणवुचि करावा ।
मग अनुवृत्तिपंथें आणावा । मूर्ध्निवरी
तेथ आकाशीं मिळे न मिळे । तैसा धरावा धारणाबळें ।
जंव मात्रात्रय मावळे । अर्धबिंबीं
तंववरी तो समीरु । निराळी कीजे स्थिरू ।
मग लग्नीं जेविं ॐकारू । बिंबींचे विलसे
तैसें ॐ हें स्मरों सरे । आणि तेथेंचि प्राणु पुरे ।
मग प्रणवांतीं उरे । पूर्णघन जें
म्हणोनि प्रणवैकनाम । हें एकाक्षर ब्रह्म ।
जो माझें स्वरूप परम । स्मरतसांता ॥१ १८॥
यापरी त्यजी देहातें । तो त्रिशुद्धी पावे मातें ।
जया पावनया परौतें । आणिक पावणें नाहीं
तेथे अर्जुना जरी विपायें । तुझ्या जीवीं हन ऐसें जाये ।
ना हें स्मरण मग होये । कायसयावरी अंती
इंद्रियां अनुघडु पडलिया । जीवितचें सुख बुडालिया ।
आंतुबाहेरी उघडलिया । मृत्युचिन्हें
ते वेळीं बैसवेंचि कवणें । मग कवण निरोधी करणें ।
तेथे काह्याचेनि अंतकःरणें । प्रणव स्मरावा
तरि गा ऐशिया ध्वनी । झणें थारा देशी हो मनीं ।
पैं नित्य सेविला मी निदानीं । सेवकु होयें
जे विषयांसि तीळांजळी देऊनी । प्रवृत्तीवरी निगड वाउनी ।
मातें हृदयीं सूनी । भोगताती
परि भोगितया आराणुका । भेटणें नाहीं क्षुधादिकां ।
तेथ चक्षुरादि रंकां । कवण पाडु
ऐसे निरंतर एकवटले । जे अंतःकरणी मजशीं लिगटले ।
मीचि होऊनि आटले । उपासैती
तयां देहावसान जैं पावे । तैं तिहीं मातें स्मरावें ।
मग म्यां जरी पावावें । तरि उपास्ति ते कायसी
पैं रंकु एक आडलेपणें । काकुळती अंती धांवा गा धांवा म्हणे ।
तरि तयाचिये ग्लानी धांवणे । काय न घडे मज
आणि भक्तांही तेचि दशा । तरी भक्तीचा सोसु कायसा ।
म्हणऊनि हा ध्वनी ऐसा । न वाखाणावा
तिहीं जे वेळीं मी स्मरावा । ते वेळीं स्मरला कीं पावावा ।
तो आभारूही जीवा । साहवेचि ना
तें ऋणवैपण देखोनि आंगी । मी आपुलियाचि उत्तीर्णत्वालागीं ।
भक्तांचिया तनुत्यागीं । परिचर्या करीं
देहवैकल्याचा वारा । झणें लागेल या सकुमारां ।
म्हणोनि आत्मबोधाचे पांजिरां । सूयें तयांतें
वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हींवाऐसी करीं साउली ।
ऐसेनि नित्य बुद्धि संचली । मी आणीं तयांतें
म्हणोनि देहांतींचें सांकडें । माझियां कहींचि न पडे ।
मी आपुलियांतें आपुलीकडे । सुखेंचि आणीं
वरचील देहाची गंवसणी फेडुनी । आहाच अहंकाराचे रज झाडुनी ।
शुद्ध वासना निवडुनी । आपणापां मेळवी
आणि भक्तां तरी देहीं । विशेष एकवंकीचा ठाव नाहीं ।
म्हणऊनि अव्हेरू करितां कांही । वियोग ऐसा न वाटे
ना तरी देहांतींचि मियां यावें । मग आपणपें यांतें न्यावें ।
हेंही नाहीं जे स्वभावें । ते आधींचि मज मीनले
येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हे साउले ।
वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींचि आहे
ऐसे जे नित्ययुक्त । तयांसि सुलभ मी सतत ।
म्हणाऊनि देहांतीं निश्चित । मीचि होती
मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी ।
जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे
जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें ।
जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल
जें दुर्मतीचें मूळ । जें कुमार्गाचें फळ ।
जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि
जें संसाराचें बैसणें । जें विकाराचें उद्यानें ।
जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे
जें काळाचा खिचौशिटा । जें आशेचा आंगवठा ।
जन्ममरणाचा वोलिंवटा । स्वभावें जें
जें भुलीचें भरींव । जें विकल्पाचें वोतींव ।
किंबहुना पेंव । विंचुवांचें
जें व्याघ्राचें क्षेत्र । जें पण्यांगनेचें मैत्र ।
जें विषयविज्ञानयंत्र । सुपूजित
जें लांवेचा कळवळा । निवालिया विषोदकाचा गळाळा ।
जें विश्वासु आंगवळा । संवचोराचा
जें कोढियाचें खेंव । जें काळसर्पाचें मार्दव ।
गोरियाचें स्वभाव । गायन जें
जें वैरियाचा पाहुणेर । जें दुर्जनाचा आदर ।
हें असो जें सागर । अनर्थाचा
जें स्वप्नीं देखिलें स्वप्न । जें मृगजळें सासिन्नलें वन ।
जें धूम्ररजांचें गगन । ओतलें आहे
ऐसें जें हें शरीर । तें ते न पवतीचि पुढती नर ।
जे होऊनि ठेले अपार । स्वरूप माझें
एऱहवीं ब्रह्मपणाचिय भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे ।
परि निवटलियाचें जैसें । पोट न दुखे
ना तरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें ।
तेवीं मातें पावलें ते संसारें । लिंपतीचि ना
एऱहवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे ।
ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें
जिये गांवींचा पहारू दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी ।
विळोनि पांतीं उठी एकसरी । चवदाजणांची
जैं चौकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये ।
आणि तैसेंचि सहस्त्र भरिये पाहें । रात्री जेथ
येवढें अहोरात्र जेथिंचें । तेणें न लोटती जे भाग्याचे ।
देखती ते स्वर्गींचे । चिरंजीव
येरां सुरगणांची नवाई । विशेष सांगावी तेथ काई ।
मुद्दल इंद्राचीचि दशा पाहीं । जे दिहाचे चौदा
परि ब्रह्मयाचियाहि आठां पहारांतें । आपुलिया डोळां देखते ।
जे आहाति गा तयांतें । अहोरात्रविद म्हणिपे
तये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।
ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व
पुढती दिहाची चौपाहारी फिटे । आणि हा आकारसमुद्र आटे ।
पाठीं तैसाचि मग पाहांटे । भरों लागे
शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।
मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती
तैसी ब्रह्मदिनाचिये आदी । हे भूतसृष्टीची मांदी ।
मिळे जंव सहस्त्रावधी । निमित्त पुरे
पाठीं रात्रीचा अवसरू होये । आणि विश्व अव्यक्तीं लया जाये ।
तोही युगसहस्त्र मोटका पाहे । आणि तैसेंचि रचे
हें सांगावया काय उपपत्ति । जें जगाचा प्रळयो आणि संभूति ।
इथे ब्रह्मभुवनींचिया होती । अहोरात्रमाजीं
कैसें थोरिवेचें मान पाहें पां । हो सृष्टिबीजाचा साटोपा ।
परि पुनरावृत्तीचिया मापा । शीग जाहला
एऱहवीं त्रैलोक्य हें धनुर्धरा । तिये गांवींचा गा पसारा ।
तो हा दिनोदयीं एकसरां । मांडतु असे
पाठीं रात्रीचा समो पावे । आणि अपैसाचि सांटवे ।
म्हणिये जेथींचें तेथ स्वभावें । साम्यासि ये
जैसें वृक्षपण बीजासि आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।
तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाही ।
जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय
तेंविं आकारलोपासरिसें । जगाचें जगपण भ्रंशे ।
परि जेथ जाहालें तें जैसें । तैसेंचि असे
तैं तया नांव सहज अव्यक्त । आणि आकारा वेळीं तेंचि व्यक्त ।
हें एकास्तव एक सूचित । एऱहवीं दोनी नाही
जैसें आटलिया स्वरूपें । आटलेपण ते खोटी म्हणिपे ।
पुढती तो घनाकारू हारपे । जे वेळीं अळंकार होती
हीं दोन्ही जैशीं होणीं । एकीं साक्षीभूत सुवर्णी ।
तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी । वस्तूच्या ठायी
तें तरी व्यक्त ना अव्यक्त । नित्य ना नाशवंत ।
या दोहीं भावाअतीत । अनादिसिध्द
जें हें विश्वचि होऊनि असे । परि विश्वपण नासिलेनि न नासे ।
अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा
पाहें पां तरंग तरी होत जात । परि तेथ उदक तें अखंड असत ।
तेवीं भूताभावीं नाशिवंत । अविनाश जें
ना तरी आटतिये अळंकारी । नाटतें कनक असे जयापरी ।
तेवीं मरतिये जीवाकारीं । अमर जें आहे
जयातें अव्यक्त म्हणों ये कोडें । म्हणतां स्तुति हें ऐसें नावडे ॥
जें मनबुद्धी न सांपडे । म्हणऊनियां
आणि आकारा आलिया जयाचें । निराकारपण न वचे ।
आकारलोपें न विसंचे । नित्यता गा
म्हणोनि अक्षर जें म्हणिजे । तेवीचि म्हणतां बोधुही उपजे ।
जयापरौता पैसु न देखिजे । या नाम परमगति
परि आघवा इहीं देहपुरीं । आहे निजेलियाचे परी ।
जे व्यापारू करवी ना करी । म्हणऊनियां
एऱहवीं जे शारीरचेष्टा । त्यांमाजीं एकही न ठके गा सुभटा ।
दाही इंद्रियांचिया वाटा । वाहतचि आहाति
उकलूं विषयांचा पेटा । होता मनाचां चोहटा ।
तो सुखदुःखाचा राजवांटा । भीतराहि पावे
परि रावो पहुडलिया सुखें । जैसा देशींचा व्यापारू न ठके ।
प्रजा आपुलालेनि अभिलाखें । करितचि असती
तैसें बुद्धीचें हन जाणणें । कां मनाचें घेणेंदेणें ।
इंद्रियांचें करणें । स्फुरण वायूचें
हे देहक्रिया आघवी । न करितां होय बरवी ।
जैसा न चलवितेनि रवी । लोकु चाले
अर्जुना तयापरी । सुतला ऐसा आहे शरीरीं ।
म्हणोनि पुरूषु गा अवधारीं । म्हणिपे जयातें
आणि प्रकृति पतिव्रते । पडिला एकपत्नीव्रतें ।
येणेंही कारणें जयातें । पुरूषु म्हणों ये
पैं वेदाचें बहुवसपण । देखेचिना जयाचें आंगण ।
हें गगनाचें पांघरूण । होय देखा
ऐसें जाणूनि योगीश्वर । जयातें म्हणती परात्पर ।
जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये
जे तनू वाचा चित्ते । नाइकती दुजिये गोष्टीतें ।
तयां एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें
हें त्रैलोक्यचि पुरूषोत्तम । ऐसा साच जयाचा मनोधर्मु ।
तया आस्तिकाचा आश्रमु । पांडवा गा
जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणीव ।
जें सुखाची राणीव । निराशांसी
जें संतोषियां वाढिलें ताट । जें अचिंता अनाथाचें मायपोट ।
भक्ती उजू वाट । जया गांवा
हें एकैक सांगोनि वायां । काय फार करूं धनंजया ।
पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होइजे
हिंवाचिया झुळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका ।
कां समोर हालिया अर्का । तमचि प्रकाशु
तैसा संसारू जया गांवा । गेला सांता पांडवा ।
होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि
तरी अग्नीमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नि जहालें
पाठीं न निवडेचि कांही केलें । काष्ठपण
ना तरी साखरेचा माघौता । बुध्दिमंतपणेंही करितां ।
परि ऊंस नव्हे पांडुसुता । जियापरी
लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसेंचि केलें ।
आतां आणिक कैंचें तें गेलें । लोहत्व आणी
म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपण न येचि निरूतें ।
तेविं पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं
तें माझें परम । साचोकारें निजधाम ।
हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असें
तेवींचि आणिकेंही एके प्रकारें । जाणतां आहे सोपारें ।
तरि देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी
अथवा अवचटें ऐसें घडे । जे अनवसरें देह सांडे ।
तरि माघौतें येणें घडे । देहासीचि
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेवीती । तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती ।
एऱहवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ति । या दोन्ही अवसराअधीन आहाती ।
तो अवसरू तुजप्रती । प्रसंगें सांगों
तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा ।
पांचै आपुलालिया वाटा । निघती अंती
ऐसा वरिपडिला प्रयाणकाळी । बुद्धीतें भ्रमु न गिळी ।
स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन
हा चेतनावर्गु आघवा । मरणी दिसे टवटवा ।
परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गवसणी होऊनि
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेऱही निर्वाहो ।
हे तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी
पाहें पां वारेन कां उदकें । जैं दिवियांचें दिवेपण झांके ।
तैं असतीच काय देखे । दिठी आपुली
तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंतबाहेरि श्लेष्माआतें ।
तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें तें
ते वेळीं प्राणासि पाणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई ।
म्हणोनि अग्नीवीण देहीं । चेतना न थरे
अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला।
वायां आयुष्यवेळु आपुला । अंधारे गिंवसी
आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें ।
मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं
तंव तया देहश्लेष्माचे चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली ।
तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण
म्हणोनि आधीं अभ्यासु जो केला । तो मरण न येतां निमोनि गेला।
जैसें ठेवणें न दिसतां मालवला । दीपु हातींचा
आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी
आंतु अग्निज्योतीचा प्रकाशु । बाहेरी शुक्लपक्षु आणि दिवसु ।
आणि सा मासांमाजीं मासु । उत्तरायण
ऐशिया समयोगाची निरूती । लाहोनि जे देह ठेविती ।
ते परब्रह्मचि होती । ब्रह्मविद
अवधारीं गा धनुर्धरा । येथवरी सामर्थ्य यया अवसरा ।
तेवींचि हा उजू मार्ग स्वपुरा । यावया पैं
एथ अग्नि हें पहिलें पायतरें । ज्योतिर्मय हें दुसरें ।
दिवस जाणें तिसरें । चौथें शुक्लपक्ष
आणि सामास उत्तरायण । तें वरचील गा सोपान ।
येणें सायुज्यसिद्धिसदन । पावती योगी
हा उत्तम काळु जाणिजे । यातें अर्चिरादि मार्गु म्हणिजे ।
आतां अकाळु तोही सहजें । सांगेन आईक
तरि प्रयाणाचिया अवसरें । वात श्लेष्मां श्लेष्मां।
तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदले ठाके
सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृती भ्रमामाजीं बुडे ।
मन होय वेडें । कोंडे प्राण
अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये ।
तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची
जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ ।
मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होये
कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध ।
आयुष्य मरणाची मर्याद- । वेळु ठाकी
ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।
तेथ जन्में जोडलिये वाहणी । युगचि बुडे
हां गा हातींचें जे वेळीं जाये । ते वेळीं आणिका लाभाची गोठी कें आहे ।
म्हणऊनि प्रयाणीं तंव होये । येतुली दशा
ऐसी देहाआंतु स्थिति । बाहेरि कृष्णपक्षु वरि राती ।
आणि सा मासही वोडवती । दक्षिणायन
इये पुनरावृतीचीं घराणीं । आघवीं एकवटती जयाचिया प्रयाणीं ।
तो स्वरूपसिद्धीची काहाणी । कैसेनि आइके
ऐसा जयाचा देह पडे । तया योगी म्हणोनि चंद्रवरी जाणें घडे ।
मग तेथूनि मागुता बहुडे । संसारा ये
आम्हीं अकाळ जो पांडवा । म्हणितला तो हा जाणावा ।
आणि हाचि धूम्रमार्ग गांवा । पुनरावृत्तीचिया
येर तो अर्चिरादि मार्गु । तो वसता आणि असलगु ।
साविया स्वस्थु चांगु । निवृतीवरी
ऐशिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा ।
म्हणवूनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज
कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें ।
हिताहित जाणावें । हिताचिलागीं
पाहे पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं ।
कां सुपंथ जाणोनियां अडवीं । रिगवत असे
जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके ।
तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे
म्हणोनि फुडें । पारखावें खरें कुडें ।
पारखिलें तरे न पडे । अवसरें कहीं
एऱहवीं देहांतीं थोर विषम । या मार्गाचें आहे संभ्रम ।
जन्में अभ्यासिलियाचें हन काम । जाईल वायां
जरी अर्चिरादि मार्गु चुकलियां । अवचटें धूम्रपंथें पडिलियां ।
तरी संसारपांतीं जुंतलियां । भंवतचि असावें
हे सायास देखोनि मोठे । आतां कैसेनि पां एकवेळ फिटे ।
म्हणोनि योगमार्गु गोमटे । शोधिले दोन्ही
तंव एकें बह्मत्वा जाइजे । आणि एकें पुनरावृत्ते येइजे ।
परि दैवगत्या जो लाहिजे । देहांतीं जेणें
ते वेळी म्हणितलें हें नव्हे । वायां अवचटें काय पावे ।
देह त्यजुनि वस्तु होआवें । मार्गेचि कीं
तरी आतां देह असो अथवा जावो । आम्ही तों केवळ वस्तूचि आहों ।
कां जे दोरीं सर्पत्व वावो । दोराचिकडुनी
मज तरंगपण असे कीं नसे । ऐसें हें उदकासी कहीं प्रतिभासे ।
तें भलतेव्हां जैसें तैसें । उदकचि कीं
तरंगाकारें न जन्मेचि । ना तरंगलोपें न निमेचि ।
ते विदेही जे देहेंचि । वस्तु जाहले
आतां शरीराचें तयाचिया ठाईं । आडनांवही उरलें नाहीं ।
तरि कोणें काळें काई । निमे तें पाहें पां
मग मार्गातें कासया शोधावें । कोणें कोठूनि कें जावें ।
जरी देशकालादि आघवें । आपणचि असे
आणि हां गा घटु जे वेळीं फुटे । ते वेळीं तेथींचें आकाश लागे नीटे वाटे ।
वाटा लागे तरि गगना भेटे । एऱहवीं काय चुके
पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारूचि जाये ।
येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडें ।
तया सोऽहंसिद्धा न पडे । योगियांसी
याकारणें पांडुसुता । तुवां होआवे योगयुक्ता ।
येतुलेनि सर्वकाळीं साम्यता । आपणपां होईल
मग भलतेथ भलतेंव्हा । देहबंध असो अथवा जावा ।
परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवे ।
माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना
येणें बोधें जो योगी होये । तयासीचि या बोधाचें नीटपण आहे ।
कां जे भोगातें पेलूनि पाहें । निजरूपा ये
पैं गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा ।
तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो
जरी वेदाध्ययनाचे जालें । अथवा यज्ञाचें शेतचि पिकलें ।
कीं तपोदनांचें जोडलें । सर्वस्व हन जें
तया आघवां पुण्याचा मळा । भार आंतौनि जया ये फळा ।
तें परब्रह्मा निर्मळा । सांटी न सरे
जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळां न दिसे सानें ।
पाहा पां वेदयज्ञादि साधनें । जया सुखा
जें विटे ना सरे । भोगितयाचेनि पवाडें पुरे ।
पुढती महासुखाचें सोयरें । भावंडचि
ऐसें दृष्टीचेनि सुखपणें । जयासी अदृष्टाचें बैसणें ।
जें शतमखाही आंगवणें । नोहेचि एका
तयातें योगीश्वर अलौकिकें । दिठीचेनि हाततुकें ।
अनुमानती कौतुकें । तंव हळुवार आवडे
मग तया सुखाची किरीटी । करुनियां गा पाउटी ।
परब्रह्मचिये पाटीं । आरूढती
ऐसें चराचरैकभाग्य । जें ब्रह्मेशां आराधनेयोग्य ।
योगियांचे भोग्य- । भोगधन जें
जो सकळ कळांची कळा । जो परमानंदाचा पुतळा ।
तो जिवाचा जिव्हाळा । विश्वाचिया
जो सवर्ज्ञतेचा वोलावा । जो यादवकुळींचा कुळदिवा ।
तो श्रीकृष्णजी पांडवा- । प्रति बोलिला
ऐसा कुरुक्षेत्रींचा वृत्तांतु । संजयो रायासी असे सांगतु ।
तेचि परियेसा पुढां मातु । ज्ञानदेव म्हणे
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0