भाषा

ENहिગુ
ग्रंथ पाठ

ज्ञानेश्वरी · अध्याय 10

10.1

नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया

10.2

नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला

10.3

नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा

10.4

नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा

10.5

नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्‍भवभुवना । श्रीगुरुराया

10.6

तुमचा अनुग्रहो गणेशु । जैं दे आपुला सौरसु ।
तैं सारस्वतीं प्रवेशु । बाळकाही आथी

10.7

जी दैविकीं उदार वाचा । जैं उद्देशु दे नाभिकाराचा ।
तैं नवरससुधाब्धीचा । थावो लाभे

10.8

जी आपुलिया स्‍नेहाची वागेश्वरी । जरी मुकेयातें अंगिकारी ।
तो वाचस्पतीशीं करी । प्रबंधुहोडा

10.9

हें असो दिठी जयावरी झळके । कीं हा पद्मकरु माथां पारुखे ।
तो जीवचि परि तुके । महेशेंसीं

10.10

एवढें जिये महिमेचें करणें । तें वाचाबळें वानूं मी कवणें ।
कां सूर्याचिया आंगा उटणें । लागत असे ?

10.11

केउता कल्पतरुवरी फुलौरा ? । कायसेनि पाहुणेरु क्षीरसागरा ? ।
कवणें वासीं कापुरा । सुवासु देवों ?

10.12

चंदनातें कायसेनि चर्चावें । अमृतातें केउतें रांधावें ।
गगनावरी उभवावें । घडे केवीं ?

10.13

तैसें श्रीगुरूचें महिमान । आकळितें कें असे साधन ? ।
हें जाणोनि मियां नमन । निवांत केलें

10.14

जरी प्रज्ञेचेनि आथिलेपणें । श्रीगुरूसामर्थ्या रूप करूं म्हणे ।
तरि तें मोतियां भिंग देणें । तैसें होईल

10.15

कां साडेपंधरया रजतवणी । तैशीं स्तुतींचीं बोलणीं ।
उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हेंचि भलें

10.16

मग म्हणितलें जी स्वामी । भलेनि ममत्वें देखिलें तुम्हीं ।
म्हणौनि कृष्णार्जुनसंगमीं । प्रयागवटु जाहलों

10.17

मागां दूध दे म्हणतलियासाठीं । आघविया क्षीराब्धीची करूनि वाटी ।
उपमन्यूपुढें धूर्जटी । ठेविली जैसी

10.18

ना तरी वैकुंठपीठनायकें । रुसला ध्रुव कवतिकें ।
बुझाविला देऊनि भातुकें । ध्रुवपदाचें

10.19

तैसी जे ब्रह्मविद्यारावो । सकळ शास्त्रांचा विसंवता ठावो ।
ते भगवद्‍गीता वोंविये गावों । ऐसें केलें

10.20

जे बोलणियाचे रानीं हिंडतां । नायकिजे फळलिया अक्षराची वार्ता ।
परि ते वाचाचि केली कल्पलता । विवेकाची

10.21

होती देहबुद्धी एकसरी । ते आनंदभांडारा केली वोवरी ।
मन गीतार्थसागरीं । जळशयन जालें

10.22

ऐसें एकेक देवांचें करणें । तें अपार बोलों केवीं मी जाणें ।
तऱही अनुवादलों धीटपणें । ते उपसाहिजो जी

10.23

आतां आपुलेनि कृपाप्रसादें । मियां भगवद्‍गीता वोंवीप्रबंधें ।
पूर्वखंड विनोदें । वाखाणिलें

10.24

प्रथमीं अर्जुनाचा विषादु । दुजीं बोलिला योगु विशदु ।
परि सांख्यबुद्धीसि भेदु । दाऊनियां

10.25

तिजीं केवळ कर्म प्रतिष्ठिलें । तेंचि चतुर्थीं ज्ञानेंशीं प्रगटिलें ।
पंचमीं गव्हरिलें । योगतत्त्व

10.26

तेचि षष्ठामाजीं प्रगट । आसनालागोनि स्पष्ट ।
जीवात्मभाव एकवट । होती जेणें

10.27

तैसी जे योगस्थिती । आणि योगभ्रष्टां जे गती ।
तें आघवीचि उपपत्ती । सांगितली षष्ठीं

10.28

तयावरी सप्तमीं । प्रकृतिपरिहार उपक्रमीं ।
करूनि भजती जे पुरुषोत्तमीं । ते बोलिले चाऱही

10.29

पाठीं सप्तमींची प्रश्नसिद्धी । बोलोनि प्रयाणसमयसिद्धी ।
एवं ते सकळवाक्यअवधि । अष्टमाध्यायीं

10.30

मग शब्दब्रह्मीं असंख्याकें । जेतुला कांहीं अभिप्राय पिके ।
तेतुला महाभारतें एकें । लक्षें जोडे

10.31

तिये आघवांचि जें महाभारतीं । तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं ।
आणि जो अभिप्रावो सातेंशतीं । तो एकलाचि नवमीं

10.32

म्हणौनि नवमींचिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया ।
बिहाला मग मी वायां । गर्व कां करूं ?

10.33

अहो गूळासाखरे मालयाचे । हे बांधे तरी एकाचि रसाचे ।
परि स्वाद गोडियेचे । आनआन जैसे

10.34

एक जाणोनियां बोलती । एक ठायें ठावो जाणविती ।
एक जाणों जातां हारपती । जाणते गुणेंशीं

10.35

हें ऐसें अध्याय गीतेचे । परि अनिर्वाच्यपण नवमाचें ।
तो अनुवादलों हें तुमचें । सामर्थ्य प्रभू

10.36

अहो एकाचि शाटी तपिन्नली । एकीं सृष्टीवरी सृष्टी केली ।
एकीं पाषाणीं वाऊनि उतरलीं । समुद्रीं कटकें

10.37

एकीं आकाशीं सूर्यातें धरिलें । एकीं चुळींचि सागरातें भरिलें ।
तैसें मज मुकयाकरवीं बोलविलें । अनिर्वाच्य तुम्हीं

10.38

परि हें असो एथ ऐसें । राम रावण झुंजिन्नले कैसे ।
राम रावण जैसे । मीनले समरीं

10.39

तैसें नवमीं कृष्णाचें बोलणें । तें नवमीचियाचि ऐसें मी म्हणें ।
या निवाडा तत्त्वज्ञु जाणें । जया गीतार्थु हातीं

10.40

एवं नवही अध्याय पहिले । मियां मतीसारिखे वाखाणिले ।
आतां उत्तरखंड उवाइलें । ग्रंथाचें ऐका

10.41

जेथ विभूति प्रतिविभूती । प्रस्तुत अर्जुना सांगिजेती ।
ते विदग्धा रसवृत्ती । म्हणिपैल कथा

10.42

देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें ।
तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि

10.43

मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मऱहाठी नीट पढतां ।
अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे

10.44

जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें ।
तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना

10.45

तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सोकासनीं ।
शोभती आयणी । चोखट आइका

10.46

उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप ।
चातुर्य म्हणे पडप । जोडलें आम्हां

10.47

तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य ।
मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व

10.48

जो चराचर परमगुरु । चतुर चित्तचमत्कारु ।
तो ऐका यादवेश्वरु । बोलता जाहला

10.49

ज्ञानदेव निवृत्तीचा म्हणे । ऐसें बोलिलें श्रीहरी तेणें ।
अर्जुना आघवियाची मातु अंतःकरणें । धडौता आहासि

10.50

आम्हीं मागील जें निरूपण केलें । तें तुझें अवधानचि पाहिलें ।
तवं टाचें नव्हें भलें । पुरतें आहे

10.51

घटीं थोडेसें उदक घालिजे । तेणें न गळे तरी वरिता भरिजे ।
ऐसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे । ऐसेंचि होतसे

10.52

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । मग चोख तरी तोचि भांडारी कीजे ।
तैसा किरीटी तूं आतां माझें । निजधाम कीं

10.53

ऐसें अर्जुना येउतें सर्वेश्वरें । पाहोनि बोलिलें अत्यादरें ।
गिरी देखोनि सुभरें । मेघु जैसा

10.54

तैसा कृपाळुवांचा रावो । म्हणे आइकें गा महाबाहो ।
सांगितलाचि अभिप्रावो । सांगेन पुढती

10.55

पैं प्रतिवर्षीं क्षेत्र पेरिजे । पिकाची जंव जंव वाढी देखिजे ।
यालागीं नुबगिजे । वाहो करितां

10.56

पुढतपुढती पुटें देतां । जोडे वानियेची अधिकता ।
म्हणौनि सोनें पंडुसुता । शोधूंचि आवडे

10.57

तैसें एथ पार्था । तुज आभार नाहीं सर्वथा ।
आम्ही आपुलियाचि स्वार्था । बोलों पुढती

10.58

जैसें बाळका लेवविजे लेणें । तया शृंगारा बाळ काइ जाणे ? ।
परि ते सुखाचे सोहळे भोगणें । माउलिये दिठी

10.59

तैसें तुझें हित आघवें । जंव जंव कां तुज फावे ।
तंव तंव आमुचें सुख दुणावे । ऐसें आहे

10.60

आतां अर्जुना असो हे विकडी । मज उघड तुझी आवडी ।
म्हणौनि तृप्तीची सवडी । बोलतां न पडे

10.61

आम्हां येतुलियाचि कारणें । तेंचि तें तुजशीं बोलणें ।
परि असो हें अंतःकरणें । अवधान देईं

10.62

तरी ऐकें गा सुवर्म । वाक्य माझें परम ।
जें अक्षरें लेऊनी परब्रह्म । तुज खेंवासि आलें

10.63

परी किरीटी तूं मातें । नेणसी ना निरुतें ।
तरि तो गा जो मी एथें । तें विश्वचि हें

10.64

एथ वेद मुके जाहाले । मन पवन पांगुळले ।
रातीविण मावळले । रविशशी जेथ

10.65

अगा उदरींचा गर्भु जैसा । न देखें आपुलिये मातेची वयसा ।
मी आघवेया देवां तैसा । नेणवे कांहीं

10.66

आणि जळचरां उदधीचें मान । मशका नोलांडवेचि गगन ।
तेवीं महर्षींचें ज्ञान । न देखेचि मातें

10.67

मी कवण पां केतुला । कवणाचा कैं जाहला ।
या निरुती करितां बोला । कल्प गेले

10.68

कां जे महर्षीं आणि या देवां । येरां भूतजातां सर्वां ।
मी आदि म्हणौनि पांडवा । अवघड जाणतां

10.69

उतरलें उदक पर्वत वळघे । जरी झाड वाढत मुळीं लागे ।
तरी मियां जालेनि जगें । जाणिजे मातें

10.70

कां गाभेवनें वटु गिंवसवे । जरी तरंगीं सागरू सांठवे ।
कां परमाणूमाजीं सामावे । भूगोलु हा

10.71

तरी मियां जालिया जीवां । महर्षीं अथवा देवां ।
मातें जाणावया होआवा । अवकाशु गा

10.72

ऐसाही जरी विपायें । सांडूनि पुढीले पाये ।
सर्वेंद्रियांसि होये । पाठिमोरा जो

10.73

प्रवर्तलाही वेगीं बहुडे । देह सांडूनि मागलीकडे ।
महाभूतांचिया चढे । माथयावरी

10.74

तैसा राहोनि ठायठिके । स्वप्रकाशें चोखें ।
अजत्व माझें देखे । आपुलिया डोळां

10.75

मी आदीसिं परु । सकळलोकमहेश्वरु ।
ऐसिया मातें जो नरु । यापरी जाणें

10.76

तो पाषाणांमाजीं परिसु । रसांमाजी सिद्धरसु ।
तैसा मनुष्याकृति अंशु । तो माझाचि जाण

10.77

तो चालतें ज्ञानाचें बिंब । तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ ।
परि माणुसपणाची भांब । लोकाचि भागु

10.78

अगा अवचिता कापुरा- । माजीं सांपडला हिरा ।
वरी पडिलिया नीरा । न निगे केवीं

10.79

तैसा मनुष्यलोकाआंतु । तो जरी जाहला प्राकृतु ।
तऱही प्रकृतिदोषाची मातु । नेणिजे तेथ

10.80

तो आपसयेंचि सांडिजे पापीं । जैसा जळत चंदनु सर्पीं ।
तैसा मातें जाणें तो संकल्पीं । वर्जूनि घालिजे

10.81

तेंचि मातें कैसें जाणिजे । ऐसें कल्पी जरी चित्त तुझें ।
तरी मी ऐसा हें माझें । भाव ऐकें

10.82

जे वेगळालां भूतीं । सारिखे होऊनि प्रकृती ।
विखुरले आहेती त्रिजगतीं । आघविये

10.83

ते प्रथम जाण बुद्धी । मग ज्ञान जें निरवधी ।
असंमोह सहनसिद्धी । क्षमा सत्य

10.84

मग शम दम दोन्ही । सुख दुःख वर्तत जनीं ।
अर्जुना भावाभाव मानीं । भावाचिमाजीं

10.85

आतां भय आणि निर्भयता । अहिंसा आणि समता ।
हे मम रुपची पांडुसुता । ओळख तू

10.86

दान यश अपकीर्ती । ते जे भाव सर्वत्र वसती ।
ते मजचि पासूनि होती । भूतांचा ठायीं

10.87

जैसीं भूतें आहाति सिनानीं । तैसेचि हेही वेगळाले मानीं ।
एक उपजती माझां ज्ञानीं । एक नेणती मातें

10.88

अगा प्रकाश आणि कडवसें । हें सूर्याचिस्तव जैसें ।
प्रकाश उदयीं दिसे । तम अस्तुसीं

10.89

आणि माझें जे जाणणें नेणणें । तें तंव भूतांचिया दैवाचें करणें ।
म्हणौनि भूतीं भावाचें होणें । विषम पडे

10.90

यापरी माझां भावीं । हे जीवसृष्टि आहे आघवी ।
गुंतली असे जाणावी । पंडुकुमरा

10.91

आतां इये सृष्टीचे पालक । तयां आधीन वर्तती लोक ।
ते अकरा भाव आणिक । सांगेन तुज

10.92

तरी आघवांचि गुणीं वृद्ध । जे महर्षींमाजीं प्रबुद्ध ।
कश्यपादि प्रसिद्ध । सप्त ऋषी

10.93

आणिकही सांगिजतील । जे चौदा आंतील ।
स्वायंभू मुख्य मुद्दल । चारी मनु

10.94

ऐसें हे अकरा । माझां मनीं जाहाले धनुर्धरा ।
सृष्टीचिया व्यापारा- । लागोनियां

10.95

जैं लोकांची व्यवस्था न पडे । जैं या त्रिभुवनाचे कांहीं न मांडे ।
तैं महाभूतांचे दळवाडें । अचुंबित असे

10.96

तैंचि हे जाहाले । इहीं लोकपाळ केले ।
अध्यक्ष रचूनि ठेविले । इहीं जन

10.97

म्हणौनि अकरा हे राजा । मग येर लोक यांचिया प्रजा ।
ऐसा हा विस्तारु माझा । ओळख तूं

10.98

पाहें पां आरंभीं बीज एकलें । मग तेंचि विरूढलिया बूड जाहालें । बुडीं कोंभ निघाले । खांदियांचे

10.99

खांदियांपासूनि अनेका । पसरलिया शाखोपशाखा ।
शाखांस्तव देखा । पल्लवपानें

10.100

पल्लवीं फूल फळ । एवं वृक्षत्व जाहालें सकळ ।
तें निर्धारितां केवळ । बीजचि तें

10.101

ऐसें मी एकचि पहिलें । मग मी तें मनातें व्यालें ।
तेथ सप्तऋषि जाहाले । आणि चारी मनु

10.102

इहीं लोकपाळ केले । लोकपाळीं विविध लोक सृजिले ।
लोकांपासूनि निपजले । प्रजाजात

10.103

ऐसेनि हें विश्व येथें । मीचि प्रसवला ना निरुतें ।
परी भावाचेनि हातें । माने जया

10.104

यालागीं सुभद्रापती । हे भाव इया माझिया विभूती ।
आणि यांचिया व्याप्ती । व्यापिलें विश्व

10.105

म्हणोनि गा यापरी । ब्रह्मादिपिपीलिकावरी ।
मीवांचूनि दुसरी । गोठी नाहीं

10.106

ऐसें जाणे जो साचें । तया चेइरें जाहालें ज्ञानाचें ।
म्हणोनि उत्तम मध्यम भेदाचें । दुःस्वप्न तयां

10.107

मी माझिया विभूती । विभूतीं अधिष्ठिलिया व्यक्ती ।
हें आघवें योगप्रतीती । एकचि मानी

10.108

म्हणोनि निःशंकें येणें महायोगें । मज मीनला मनाचेनि आंगें ।
एथ संशय करणें न लगे । तो त्रिशुद्धी जाहला

10.109

कां जे ऐसें किरीटी । मातें भजे जो अभेदा दिठी ।
तयाचिये भजनाचिये नाटीं । सूती मज

10.110

म्हणऊनि अभेदें जो भक्तियोगु । तेथ शंका नाहीं नये खंगु ।
करितां ठेला तरी चांगु । तें सांगितलें षष्ठीं

10.111

तोचि अभेदु कैसा । हें जाणावया मानसा ।
साद जाली तरी परियेसा । बोलिजेल

10.112

तरि मीचि एक सर्वां । या जगा जन्म पांडवा ।
आणि मजचिपासूनि आघवा । निर्वाहो यांचा

10.113

कल्लोळमाळा अनेगा । जन्म जळींचि पैं गा ।
आणि तयां जळचि आश्रयो तरंगा । जीवनही जळ

10.114

ऐसें आघवांचि ठायीं । तया जळचि जेविं पाहीं ।
तैसा मीवांचूनि नाहीं । विश्वीं इये

10.115

ऐसिया व्यापका मातें । मानूनि जे भजती भलतेथें ।
परि साचोकारें उदितें । प्रेमभावें

10.116

देशकाळवर्तमान । आघवें मजसीं करूनि अभिन्न ।
जैसा वायु होऊन गगन । गगनींचि विचरे

10.117

ऐसेनि जे निजज्ञानी । खेळत सुखें त्रिभुवनीं ।
जगद्रूपा मनीं । सांठऊनि मातें

10.118

जें जें भेटे भूत । तें तें मानिजे भगवंत ।
हा भक्तियोगु निश्चित । जाण माझा

10.119

चित्तें मीचि जाहाले । मियांचि प्राणें धाले ।
जीवों मरों विसरले । बोधाचिया भुली

10.120

मग तया बोधाचेनि माजे । नाचती संवादसुखाचीं भोजें ।
आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी

10.121

जैशीं जवळिकेंचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें ।
मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती

10.122

तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी ।
तेथ बोध बोधाचीं लेणीं । बोधेंचि मिरवी

10.123

जैसें सूर्यें सूर्यातें वोंवाळिलें । कीं चंद्रें चंद्रम्या क्षेम दिधलें ।
ना तरी सरिसेनि पाडें मीनले । दोनी वोघ

10.124

तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें ।
ते संवादचतुष्पथींचे । गणेश जाहले

10.125

तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें ।
मियां धाले तेणें उद्गारें । लागती गाजों

10.126

पैं गुरुशिष्यांचां एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती ।
ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती सैंघ

10.127

जैसी कमळकळिका जालेपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणें ।
दे राया रंका पारणें । आमोदाचें

10.128

तैसेंचि मातें विश्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत ।
मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें

10.129

ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें ।
केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जिहीं

10.130

तयां मग जें आम्ही कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं ।
ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल

10.131

कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा ।
ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग

10.132

म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें ।
परि आम्हीं देयावें हेंहि केलें । तिहींची म्हणियें

10.133

आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळें वाढें ।
आणि काळाची दिठी न पडे । हें आम्हां करणें

10.134

लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करूनि स्‍नेहाचिया दिठी । जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे

10.135

तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करूनि ठेवी ।
तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें

10.136

जिये पदवीचेनि पोषकें । ते मातें पावती यथासुखें ।
हे पाळती मज विशेखें । आवडे करूं

10.137

पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड ।
कां जे प्रेमळांचें सांकड । आमुते घरीं

10.138

पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयाचिये वाहणी केले । आम्हीं आंगही शेखीं वेंचिलें । लक्ष्मियेसीं

10.139

परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक ।
सप्रेमळालागीं देख । ठेविलें जतन

10.140

हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं ।
या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा

10.141

म्हणोनि मज आत्मयाचा भावो । जिहीं जियावया केला ठावो ।
एक मीवांचूनि वावो । येर मानिलें जिहीं

10.142

तयां तत्त्वज्ञां चोखटां । दिवी पोतासाची सुभटा ।
मग मीचि होऊनि दिवटा । पुढां पुढां चालें

10.143

अज्ञानाचिये राती- । माजीं तमाचि मिळणी दाटती ।
ते नाशूनि घालीं परौती । करीं नित्योदयो

10.144

ऐसें प्रेमळाचेनि प्रियोत्तमें । बोलिलें जेथ पुरुषोत्तमें ।
तेथ अर्जुन मनोधर्में । निवालों म्हणतसे

10.145

अहो जी अवधारा । भला केरु फेडिला संसारा ।
जाहलों जननीजठरजोहरा- । वेगळा प्रभू

10.146

जी जन्मलेपण आपुलें । हें आजि मियां डोळां देखिलें ।
जीवित हातां चढलें । आवडतसें

10.147

आजि आयुष्या उजवण जाहली । माझिया दैवा दशा उदयली ।
जे वाक्यकृपा लाधली । दैविकेनि मुखें

10.148

आतां येणें वचन तेजाकारें । फिटलें आंतील बाहेरील आंधारें ।
म्हणोनि देखतसें साचोकारें । स्वरूप तुझें

10.149

तरी होसी गा तूं परब्रह्म । जें या महाभूतां विसंवतें धाम ।
पवित्र तूं परम । जगन्नाथा

10.150

तूं परम दैवत तिहीं देवां । तूं पुरुष जी पंचविसावा ।
दिव्य तूं प्रकृतिभावा- । पैलीकडील

10.151

अनादिसिद्ध तूं स्वामी । जो नाकळिजसी जन्मधर्मीं ।
तो तूं हें आम्ही । जाणितलें आतां

10.152

तूं या कालयंत्रासि सूत्री । तूं जीवकळेची अधिष्ठात्री ।
तूं ब्रह्मकटाहधात्री । हें कळलें फुडें

10.153

पैं आणिकही एक परी । इये प्रतीतीची येतसे थोरी ।
जे मागें ऐसेंचि ऋषीश्वरीं । सांगितलें तूंतें

10.154

परि तया सांगितलियाचें साचपण । हें आतां माझें देखतसे अंतःकरण । जे कृपा केली आपण । म्हणोनि देवा

10.155

एऱहवीं नारदु अखंड जवळां ये । तोही ऐसेंचि वचनीं गाये ।
परि अर्थ न बुजोनि ठाये । गीतसुखचि ऐकों

10.156

जी आंधळेयांचां गांवीं । आपणपें प्रगटलें रवी ।
तरी तिहीं वोतपलीचि घ्यावी । वांचूनि प्रकाशु कैंचा ?

10.157

येरवीं देवर्षि अध्यात्म गातां । आहाच रागांगेंसीं जे मधुरता ।
तेचि फावे येर चित्ता । नलगेचि कांहीं

10.158

पैं असिता देवलाचेनिहि मुखें । मी एवंविधा तूंतें आइकें ।
परी तैं बुद्धि विषयविखें । घारिली होती

10.159

विषयविषाचा पडिपाडू । गोड परमार्थु लागे कडू ।
कडू विषय तो गोडू । जीवासी जाहला

10.160

आणि हें आणिकांचें काय सांगावें । राउळा आपणचि येऊनि व्यासदेवें । तुझें स्वरूप आघवें । सर्वदा सांगिजे

10.161

परि तो अंधारीं चिंतामणि देखिला । जेवीं नव्हे या बुद्धी उपेक्षिला । पाठीं दिनोदयीं वोळखिला । होय म्हणौनि

10.162

तैसीं व्यासादिकांचीं बोलणीं । तिया मजपाशीं चिद्रत्‍नांचिया खाणी । परि उपेक्षिल्या जात होतीया तरणी । तुजवीण कृष्णा

10.163

ते आतां वाक्यसूर्यकर तुझे फांकले । आणि ऋषीं मार्ग होते जे कथिले ।
तयां आघवियांचेंचि फिटलें । अनोळखपण

10.164

जी ज्ञानाचें बीज तयांचे बोल । माजीं हृदयभूमिके पडिले सखोल । वरि इये कृपेची जाहाली वोल । म्हणोनि संवादफळेंशीं उठलें

10.165

अहो नारदादिकां संतां । त्यांचिया उक्तिरूप सरिता ।
मी महोदधीं जालां अनंता । संवादसुखाचा

10.166

प्रभु आघवेनि येणें जन्में । जियें पुण्यें केलीं मियां उत्तमें ।
तयांचीं न ठकतीचि अंगीं कामें । सद्‍गुरु तुवां

10.167

एऱहवीं वडिलवडिलांचेनि मुखें । मी सदां तूंतें कानीं आइकें ।
परि कृपा न कीजेचि तुवां एकें । तंव नेणवेचि कांहीं

10.168

म्हणोनि भाग्य जैं सानुकूळ । जालिया केले उद्यम सदां सफळ ।
तैसें श्रुताधीत सकळ । गुरुकृपा साच

10.169

जी बनकरु झाडें सिंपी जीवेंसाटीं । पाडूनि जन्में काढी आटी ।
परि फळेंसी तैंचि भेटी । जैं वसंतु पावे

10.170

अहो विषमा जैं वोहट पडे । तैं मधुर तें मधुर आवडे ।
पैं रसायनें तैं गोडें । जैं आरोग्य देहीं

10.171

कां इंद्रियें वाचा प्राण । यां जालियांचे तैंचि सार्थकपण ।
जैं चैतन्य येऊनि आपण । संचरे माजीं

10.172

तैसें शब्दजात आलोडिलें । अथवा योगादिक जें अभ्यासिलें ।
तें तैंचि म्हणों ये आपुलें । जैं सानुकूल गुरु

10.173

ऐसिये जालिये प्रतीतीचेनि माजें । अर्जुन निश्चयाचि नाचतुसें भोजें । तेवींचि म्हणे देवा तुझें । वाक्य मज मानलें

10.174

तरि साचचि हें कैवल्यपती । मज त्रिशुद्धी आली प्रतीती ।
जे तूं देवदानवांचिये मती- । जोगा नव्हसी

10.175

तुझें वाक्य व्यक्ती न येतां देवा । जो आपुलिया जाणे जाणिवा ।
तो कहींचि नोहे हें स‍द्भावा । भरंवसेनि आलें

10.176

एथ आपुलें वाडपण जैसें । आपणचि जाणिजे आकाशें ।
कां मी येतुली घनवट ऐसें । पृथ्वीचि जाणे

10.177

तैसा आपुलिये सर्वशक्ती । तुज तूंचि जाणूं लक्ष्मीपती ।
येर वेदादिक मती । मिरवती वायां

10.178

हां गा मनातें मागां सांडावें । पवनातें वावीं मवावें ।
आदिशून्य उतरोनि जावें । केउतें बाहीं

10.179

तैसें हें तुझें जाणणें आहे । म्हणोनि कोणाही ठाकतें नोहे ।
आतां तुझें ज्ञान होये । तुजचिजोगें

10.180

जी आपणपयातें तूंचि जाणसी । आणिकातें सांगावयाही तूं समर्थ होसी ।
तरी आतां एक वेळ घाम पुसीं । आर्तीचिये निडळींचा

10.181

हें आइकिलें कीं भूतभावना । त्रिभुवनगजपंचानना । सकळदेवदेवतार्चना । जगन्नायका

10.182

जरी थोरी तुझी पाहात आहों । तरी पासीं उभे ठाकावयाही योग्य नोहों ।
या शोच्यता जरी विनवूं बिहों । तरी आन उपायो नाहीं

10.183

भरले समुद्रसरिता चहूंकडे । परि ते बापियासि कोरडे ।
कां जैं मेघौनि थेंबुटा पडे । तैं पाणी कीं तया

10.184

तैसे गुरु जी सर्वत्र आथी । परि कृष्णा आम्हां तूंचि गती ।
हें असो मजप्रती । विभूती सांगें

10.185

जी तुझिया विभूती आघविया । परि व्यापिती शक्ति दिव्या जिया । तिया आपुलिया दावाविया । आपण मज

10.186

जिहीं विभूतीं ययां समस्तां । लोकांतें व्यापूनि आहाती अनंता ।
तिया प्रधाना नामांकिता । प्रगटा करीं

10.187

जी कैसें मियां तूंतें जाणावें । काय जाणोनि सदा चिंतावें ।
जरी तूंचि म्हणों आघवें । तरि चिंतनचि न घडे

10.188

म्हणोनि मागां भाव जैसे । आपुले सांगितले तुवां उद्देशें ।
आतां विस्तारोनि तैसे । एक वेळ बोलें

10.189

जयां जयां भावाचां ठायीं । तूंतें चिंतितां मज सायासु नाहीं ।
तो विवळ करूनि देईं । योगु आपुला

10.190

आणि पुसलिया जिया विभूती । त्याही बोलाविया भूतपती ।
येथ म्हणसी जरी पुढती । काय सांगों

10.191

तरी हा भाव मना । झणें जाय हो जनार्दना ।
पैं प्राकृताही अमृतपाना । ना न म्हणवे जी

10.192

जे काळकूटाचें सहोदर । जें मृत्यूभेणें प्याले अमर ।
तरि दिहाचे पुरंदर । चौदा जाती

10.193

ऐसा कवण एक क्षीराब्धीचा रसु । जया वायांचि अमृतपणाचा आभासु । तयाचाही मीठांशु । जे पुरे म्हणों नेदी

10.194

तया पाबळेयाही येतुलेवरी । गोडियेचि आथि थोरी ।
मग हें तंव अवधारीं । परमामृत साचें

10.195

जें मंदराचळु न ढाळितां । क्षीरसागरु न डहुळितां ।
अनादि स्वभावता । आइतें आहे

10.196

जें द्रव ना नव्हे बद्ध । जेथ नेणिजती रस गंध ।
जें भलतयांही सिद्ध । आठवलेंचि फावे

10.197

जयाची गोठीचि ऐकतखेंवो । आघवा संसारु होय वावो ।
बळिया नित्यता लागे येवों । आपणपेंया

10.198

जन्ममृत्यूची भाख । हारपोनि जाय निःशेख ।
आंत बाहेरी महासुख । वाढोंचि लागे

10.199

मग दैवगत्या जरी सेविजे । तरी तें आपणचि होऊनि ठाकिजे ।
तें तुज देतां चित्त माझें । पुरें म्हणों न शके

10.200

तवं तुझें नामचि आम्हां आवडे । वरि भेटी होय आणि जवळिक जोडे । पाठीं गोठी सांगसी सुरवाडें । आनंदाचेनी

10.201

आतां हें सुख कायिसयासारिखें । कांहीं निर्वचेना मज परितोखें ।
तरि येतुलें जाणें जे येणें मुखें । पुनरुक्तही हो

10.202

हां गा सूर्य काय शिळा ? । अग्नि म्हणों येत आहे वोंविळा ।
कां नित्य वाहातया गंगाजळा । पारसेपण असे

10.203

तुंवा स्वमुखें जें बोलिलें । हें आम्हीं नादासि रूप देखिलें ।
आजि चंदनतरूचीं फुलें । तुरंबीत आहों मां

10.204

या पार्थाचिया बोला । सर्वांगें कृष्ण डोलला ।
म्हणे भक्तिज्ञानासि जाहला । आगरु हा

10.205

ऐसा पतिकराचिया तोषा आंतु । प्रेमाचा वेगु उचंबळतु ।
सायासें सांवरूनि अनंतु । काय बोले

10.206

मी पितामहाचा पिता । हें आठवितांही नाठवे चित्ता ।
कीं म्हणतसे बा पंडुसुता । भलें केलें

10.207

अर्जुनातें बा म्हणे एथ कांहीं । आम्हां विस्मो करावया कारण नाहीं । आंगें तो लेंकरूं काई । नव्हेचि नंदाचें

10.208

परि प्रस्तुत ऐसें असो । हें करवी आवडीचा अतिसो ।
मग म्हणे आइकें सांगतसों । धनुर्धरा

10.209

तरी तुवां पुसलिया विभूती । तयांचें अपारपण सुभद्रापती ।
ज्या माझियाचि परि माझिये मती । आकळती ना

10.210

आंगींचिया रोमा किती । जयाचिया तयासि न गणवती ।
तैसिया माझिया विभूती । असंख्य मज

10.211

एऱहवीं तरी मी कैसा केवढा । म्हणोनि आपणपयांही नव्हेचि फुडा । यालागीं प्रधाना जिया रूढा । तिया विभूती आइकें

10.212

जिया जाणतलियासाठीं । आघवीया जाणितलिया होती किरीटी । जैसें बीज आलिया मुठीं । तरूचि आला होय

10.213

कां उद्यान हाता चढिलें । तरी आपैसीं सांपडलीं फळें फुलें ।
तेवीं देखिलिया जिया देखवलें । विश्व सकळ

10.214

एऱहवीं साचचि गा धनुर्धरा । नाहीं शेवटु माझिया विस्तारा ।
पैं गगना ऐशिया अपारा । मजमाजीं लपणें

10.215

आइकें कुटिलालकमस्तका । धनुर्वेदत्र्यंबका ।
मी आत्मा असें एकैका । भूतमात्राचां ठायीं

10.216

आंतुलीकडे मीचि यांचा अंतःकरणीं । भूतांबाहेरी माझीच गंवसणी । आदि मी निर्वाणीं । मध्यही मीचि

10.217

जैसें मेघां या तळीं वरी । एक आकाशचि आंत बाहेरी ।
आणि आकाशींचि जाले अवधारीं । असणेंही आकाशीं

10.218

पाठीं लया जे वेळीं जाती । ते वेळीं आकाशचि होऊनि ठाती ।
तेवीं आदि स्थिती अंतगती । भूतांसि मी

10.219

ऐसें बहुवस आणि व्यापकपण । माझें विभूतियोगें जाण ।
तरी जीवचि करूनि श्रवण । आइकोनि आइक

10.220

याहीवरी त्या विभूती । सांगणें ठेलें तुजप्रति ।
सांगेन म्हणितलें तुज प्रीती । त्या प्रधाना आइकें

10.221

हें बोलोनि तो कृपावंतु । म्हणे विष्णु मी आदित्यांआंतु ।
रवी मी रश्मिवंतु । सुप्रभांमाजीं

10.222

मरूद्‍गणांच्या वर्गीं । मरीचि म्हणे मी शारङ्गी ।
चंद्र मी गगनरंगीं । तारांमाजीं

10.223

वेदांआंतु सामवेदु । तो मी म्हणे गोविंदु ।
देवांमाजी मरुद्‍बंधु । महेंद्र तो मी

10.224

इंद्रियांआंतु अकरावें । मन तें मी हें जाणावें ।
भूतांमाजी स्वभावें । चेतना ते मी

10.225

अशेषांही रुद्रांमाझारीं । शंकर जो मदनारी ।
तो मी येथ न धरीं । भ्रांति कांहीं

10.226

यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु ।
तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला

10.227

मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं ।
शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी

10.228

जो स्वर्गसिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो ।
तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी

10.229

त्रिभुवनींचिया सेनापतीं- । आंत स्कंदु तो मी महामती ।
जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला

10.230

सकळिकां सरोवरांसी । माजीं समुद्र तो मी जळराशी ।
महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी

10.231

अशेषांही वाचा । आंतु नटनाच सत्याचा ।
तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे

10.232

समस्तांही यज्ञांचा पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं ।
जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे

10.233

नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्‍नानादि कर्म ।
नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें

10.234

स्थावरां गिरीवरां आंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु ।
तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा

10.235

कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु ।
तरि ययां वृक्षजातां आंतु । अश्वत्थु तो मी

10.236

देवऋषींआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा ।
चित्ररथु मी गंधर्वां । सकळिकांमाजीं

10.237

ययां अशेषांही सिद्धां- । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा ।
तुरंगजातां प्रसिद्धां- । आंत उचैःश्रवा मी

10.238

राजभूषण गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु ।
पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी

10.239

ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा ।
जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती

10.240

पैं आघवेयां हातियेरां । आंत वज्र तें मी धनुर्धरा ।
जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे

10.241

धेनूंमध्यें कामधेनु । तें मी म्हणे विष्वक्सेनु ।
जन्मवितयांआंत मदनु । तो मी जाणें

10.242

सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता ।
नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी

10.243

अगा यादसांआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु ।
तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे

10.244

आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता ।
तो मी हें तत्त्वता । बोलत आहें

10.245

जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती ।
मग केलियानुरूप होती । भोगनियम जे

10.246

तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु ।
तो मी म्हणे रामु । रमापती

10.247

अगा दैत्यांचिया कुळीं । प्रल्हादु तो मी न्याहाळीं ।
म्हणौनि दैत्यभावादिमेळीं । लिंपेचिना

10.248

पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु ।
श्वापदांमाजीं शार्दूळु । तो मी जाण

10.249

पक्षिजातिमाझारीं । गरुड तो मी अवधारीं ।
यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें

10.250

पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडीं न लगतां धनुर्धरा ।
एकेचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा करी जो

10.251

तयां वहिलियां गतिमंतां- । आंत पवनु तो मी पांडुसुता ।
शस्त्रधरां समस्तां- । माजीं श्रीराम तो मी

10.252

जेणें सांकडलिया धर्माचेन कैवारें । आपणपयां धनुष्य करूनि दुसरें ।
विजयलक्ष्मीये एक मोहरें । केलें त्रेतीं

10.253

पाठीं उभे ठाकूनि सुवेळीं । प्रतापलंकेश्वराचीं सिसाळीं ।
गगनीं उदो म्हणतया हस्तबळीं । दिधली भूतां

10.254

जेणें देवांचा मानु गिंवसिला । धर्मासि जीर्णोद्धारु केला ।
सूर्यवंशीं उदेला । सूर्य जो कां

10.255

तो हातियेरुपरजितया आंतु । रामचंद्र मी जानकीकांतु ।
मकर मी पुच्छवंतु । जळचरांमाजीं

10.256

पैं समस्तांही वोघां- । मध्यें जे भगीरथें आणितां गंगा ।
जन्हूनें गिळिली मग जंघा । फाडूनि दिधली

10.257

ते त्रिभूवनैकसरिता । जान्हवी मी पांडुसुता ।
जळप्रवाहां समस्तां- । माझारीं जाणें

10.258

ऐसेनि वेगळालां सृष्टीपैकीं । विभूती नाम सूतां एकेकीं ।
सगळेन जन्मसहस्रें अवलोकीं । अर्ध्या नव्हती

10.259

जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जैं जीवीं ।
तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं

10.260

कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलुचि काखे सुवावा ।
तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें

10.261

जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ ।
तरी उपडूनियां मूळ । जेवीं हातीं घेपे

10.262

तेवीं माझें विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष ।
तरी स्वरूप एक निर्दोष । जाणिजे माझें

10.263

एऱहवीं वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती ।
म्हणोनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण

10.264

मी आघवियेचि सृष्टी । आदिमध्यांतीं किरीटी ।
ओतप्रोत पटीं । तंतु जेवीं

10.265

ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें ।
परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो

10.266

कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती ।
तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुतीं । अध्यात्मविद्या ते मी

10.267

अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं ।
जो सकलशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना

10.268

जो निर्वचूं जातां वाढे । आइकतयां उत्प्रेक्षे सळु चढे ।
जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होतीं

10.269

ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु ।
अक्षरांमाजीं विशदु । अकारु तो मी

10.270

पैं गा समासांमाझारीं । द्वंद्व तो मी अवधारीं ।
मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी

10.271

मेरुमंदरादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी ।
जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथें

10.272

जो प्रळयतेजा देत मिठी । सगळिया पवनातें गिळी किरीटी ।
आकाश जयाचिया पोटीं । सामावलें

10.273

ऐसा अपार जो काळु । तो मी म्हणे लक्ष्मीलीळु ।
मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी

10.274

आणि सृजिलिया भूतांतें मीचि धरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं ।
शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि

10.275

आतां स्त्रीगणांचां पैकीं । माझिया विभूती सात आणिकी ।
तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील

10.276

तरी नीच नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती ।
आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें

10.277

आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचा ।
आरूढोनि विवेकाचा । मार्गीं चाले

10.278

देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें ।
ते स्मृतिही पैं एथें । त्रिशुद्धी मी

10.279

पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनीं ।
धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी

10.280

एवं नारींमाझारीं । या सातही शक्ति मीचि अवधारीं ।
ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला

10.281

वेदराशीचिया सामा- । आंत बृहत्साम जें प्रियोत्तमा ।
तें मी म्हणे रमा- । प्राणेश्वरु

10.282

गायत्रीछंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजीं माझें ।
स्वरूप हें जाणिजे । निभ्रांत तुवां

10.283

मासांआंत मार्गशीरु । तो मी म्हणे शारङ्गधरु ।
ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी

10.284

छळितयां विंदाणा- । माजीं जूं तें मी विचक्षणा ।
म्हणोनि चोहटां चोरी परी कवणा । निवारूं न ये

10.285

अगा अशेषांही तेजसां- । आंत तेज तें मी भरंवसा ।
विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं

10.286

जेणें चोखाळत दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय ।
माझें स्वरूप हें राय । सुरांचा म्हणे

10.287

सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।
यादवांमाजीं श्रीमंतु । तोचि तो मी

10.288

जो देवकी-वसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळीं गेला ।
तो मी प्राणासकट पियाला । पूतनेतें

10.289

नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मियां अदानवीं सृष्टि केली ।
करीं गिरि धरूनि उमाणिली । महेंद्रमहिमा

10.290

कालिंदीचें हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।
वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें

10.291

प्रथमदशेचिये पहांटे- । माजीं कंसा ऐशीं अचाटें ।
महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं

10.292

हें काय कितीएक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें ।
तरि यादवांमाजीं जाणावें । हेंचि स्वरूप माझें

10.293

आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां- । माजीं अर्जुन तो मी जाणावा ।
म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे

10.294

संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरूनि नेली माझी भगिनी ।
तऱही विकल्पु नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरूप एक

10.295

मुनीआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो ।
कवीश्वरांमाजीं धैर्या ठावो । उशनाचार्य तो मी

10.296

अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं ।
जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे

10.297

पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां ।
सकळ शास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी

10.298

आघवियाचि गूढां- । माजीं मौन तें मी सुहाडा ।
म्हणोनि न बोलतयां पुढां । स्त्रष्टाही नेण होय

10.299

अगा ज्ञानियांचिया ठायीं । ज्ञान तें मी पाहीं ।
आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों

10.300

पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा ।
कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी

10.301

पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरूं नये जेवीं गा ।
तेवीं माझिया विशेष लिंगां । नाहीं मिती

10.302

ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना ।
तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला

10.303

येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं ।
म्हणौनि परिससीं तूं काई । आम्हीं सांगों किती

10.304

यालागीं एकिहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज ।
सर्वभूतांकुरें बीज । विरूढत असे तें मी

10.305

म्हणोनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे ।
एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें

10.306

तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खूण ।
तरी अर्जुना तें तूं जाण । विभूति माझी

10.307

जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया ।
ते ते जाण धनंजया । विभूति माझी

10.308

अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं ।
तेवीं एकाकियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे

10.309

तयांतें एकलें झणीं म्हण । ते निर्धन या भाषा नेण ।
काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे

10.310

तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे ।
तेवीं विश्वविभव तया अंगें । होऊनि आहाति

10.311

तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा ।
ऐसें आथि तें जाण प्राज्ञा । अवतार माझे

10.312

आतां सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष ।
कां जे मीचि एक अशेष । विश्व आहे म्हणोनि

10.313

तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु ।
वायां आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा

10.314

एऱहवीं तरी तूप कासया घुसळावें । अमृत कां रांधूनि अर्धें करावें ।
हां गा वायूसि काय पां डावें । उजवें अंग आहे

10.315

पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी ।
तेवीं माझ्या स्वरूपीं गोठी । सामान्यविशेषाची नाहीं

10.316

आणि सिनाना इहीं विभूतीं । मज अपारातें मविसील किती ।
म्हणोनि किंबहुना सुभद्रापती । असो हें जाणणें

10.317

आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे ।
यालागीं भेदू सांडूनि सरिसें । साम्यें भज

10.318

ऐसें विबुधवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें ।
बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें

10.319

तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें राभस्य बोलिलेती तुम्हीं ।
जे भेदु एक आणि आम्हीं । सांडावा एकीं

10.320

हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारें दवडा कां परौतें ।
तेवीं धसाळ म्हणों देवा तूंतें । तरी अधिक हा बोलु

10.321

तुझें नांवचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां कानां मिळे ।
तयांचिया हृदयातें सांडूनि पळे । भेदु जी साच

10.322

तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें ।
तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें

10.323

जी चंद्रबिंबाचा गाभारां । रिगालियावरीही उबारा ।
परी राणेपणें शारङ्गधरा । बोला हें तुम्हीं

10.324

तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें ।
मग म्हणे तुवां न कोपावें । आमुचिया बोला

10.325

आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं । सांगितली जे विभूतींची कहाणी ।
ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली कीं न मनें

10.326

हेंचि पाहावयालागीं । नावेक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं ।
तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा

10.327

येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें ।
परी देखतसें विश्व आघवें । तुवां भरलें

10.328

पैं राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु ।
या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे

10.329

कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें ।
हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तंव आंतुही आंधळा

10.330

परी असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु ।
कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला

10.331

म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां डोळ्यांप्रती ।
इये आर्तीचां पाउलीं मती । उठती जाहली

10.332

मियां इहींच दोहीं डोळां । झोंबावें विश्वरूपा सकळा ।
एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी

10.333

आजि तो कल्पतरूची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती देखा ।
जें जें येईल तयाचि मुखा । तें तें साचचि करितसे येरु

10.334

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपणचि जाहला ।
तो सद्‍गुरु असे जोडला । किरीटीसी

10.335

म्हणोनि विश्वरूप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणें भंगीं ।
तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा

मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0

Esc