ज्ञानेश्वरी · अध्याय 7
मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो ।
कृष्ण सागंती जो । योगरुप
सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें ।
की तेचि अवसरी पाहुणे । पातलों आम्ही
कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे ।
कीं तेंचि चवी करुनि पाहिजे । तंव अमृत आहे
तैसे आम्हां तुम्हां जाहले । जें आडमुठी तत्व फावलें ।
तंव धृतराष्ट्रे म्हणितलें । हें न पुसों तूंते
तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें ।
जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया
हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला ।
एऱहवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं ये
परि तैं तैसें कैसेनि होईल । जात्यंधा कैसें पाहेल ।
तेवींचि येरु से घेईल । म्हणौनि बिहे
परि आपण चित्तीं आपुलां । निकियापरि संतोषला ।
जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा
तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें ।
आतां आदरेंसी बोलणें । घडेल तया
तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा ।
जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला
तैसें गीतार्थाचें सार । जे विवेकसिंधूचे पार ।
नाना योगविभवभांडार । उघडलें कां
जें आदिप्रकृतीचें विसवणें । जे शब्दब्रह्मासि न बोलणें ।
जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे
तो अध्याय हा सहावा । वरि साहित्याचिया बरवा ।
सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां
सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांही पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रुपाची हे
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलु भुजाहि आविष्करें । आलिंगावया
ऐशी इंद्रिये आपुललिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे
हें असोतु या बोलाचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं ।
ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी
आता आत्मप्रभा नीच नवी । तेचि करुनी ठाणदिवी ।
जो इंद्रियांतें चोरुनि जेवी । तयासीचि फावे
येथ श्रवणाचेनि पांगे- । वीण श्रोतयां होआवें लागे ।
हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा
आहाच बोलाचि वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे । मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचिमाजीं
ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाइल ।
एरव्हीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची
परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांते कडसावें ।
जे एथ अधिकारिये स्वभावें । निष्कामकामु
जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराचि कुरोंडी ।
ते वांचुनी एथींची गोडी । नेणती आणिक
जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे ।
आणि तो हिमांशुचि जेवि खाजें । चकोराचें
तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गांवो ।
म्हणौनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं
परी अनुवादलो मी प्रसंगे । तें सज्जनी उपसाहावें लागे ।
आतां सांगेन काय श्रीरंगे । निरोपिलें जें
परि निवृत्तिकृपादीपौजियेडें । देखेन मी
जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे ।
जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ
ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सापडे ।
जरी दैवयोगें चढे । परिसु हातां
तैसी सद्गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे ।
म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे
तेणें कारणें मी बोलेन । बोली अरुपाचे रुप दावीन ।
अतींद्रिय परि भोगवीन । इंद्रियांकरवीं
आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ।
हे साही गुणवर्य । वसती जेथ
म्हणोनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु ।
तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होई आतां
आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानी । एऱहवी विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते
सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगी तोचि संन्यासु ।
पहातां ब्रह्मीं नाही अवकाशु । दोहींमाजीं
जैसें नामाचेनि अनारिसपणें । एका पुरुषाते बोलावणें ।
कां दोहीं मार्गीं जाणें । एकचि ठाया
नातरी एकचि उदक सहजें । परी सिनानां घटीं भरिजें ।
तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें
आइकें सकळ संमते जगीं । अर्जुना गा तोचि योगी ।
जो कर्में करुनि रागी । नोहेचि फळीं
जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुध्दीवीण सहजें ।
आणि तेथींची तियें बीजें । अपेक्षीना
तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें ।
जें जेणें अवसरें । करणें पावे
तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं ।
आणि बुध्दीही करोनि फळवेरीं । जायेचिना
ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं ।
तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु
वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडीन बध्दक ।
तरी टांकोटांकी आणिक । मांडिचि तो
जैसा क्षाळुनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु ।
तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां
गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळी आधींच आहे सहजें ।
की तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती
म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां ।
आहे योगसुख स्वभावता । आपणापांचि
ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी
जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे ।
ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया
आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था ।
तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं
येणें यमनियमाचेनि तळवटें । रिगे असनाचिये पाउलवाटें ।
येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा
मग प्रत्याहाराचा आधाडा । बुध्दीचियाहि पाया निसरडा ।
जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग
तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें ।
नखी लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची
ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें ।
क्रमी ध्यानाचें चवरें । सांडे तंव
मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीचि हांव ।
जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय
जेथ पुढील पैस पारुखे । मागील स्मरावें तें ठाके ।
ऐसिया सरिसीये भूमिके । समाधी राहे
येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु ।
तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगेन आइकें
तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा ।
जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे
जयाचें सुखदुःखाचेनि आंगे । झगटलें मानस चेवो नेघे ।
विषय पासींही आलियां से न रिगे । हे काय म्हणौनि
इंद्रियें कर्माच्या ठायी । वाढीनलीं परी कहीं ।
फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं
असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला ।
तोचि योगारूढु भला । वोळखें तूं
तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां ।
सांगे तया ऐसी योग्यता । कवणें दीजे
तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें ।
कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये
पै व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रित होइजे ।
ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा
पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो ।
ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि
म्हणऊनि आपणचि आपणपेया । घातु कीजतु असे धनंजया ।
चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना
हा विचारुनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होइजे ।
तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली
एऱहवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी ।
जो आत्मबुध्दी शरीरीं । चारुस्थळी
कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे ।
कीं असते आपुले डोळे । आपण झांकी
कां कवणु एकु भ्रमलेपणे । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे ।
ऐसा नाथिला छंद अंतःकरणें । घेऊनि ठाके
एऱहवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुध्दी तैशी नोहे ।
देखा स्वप्नींचेनि घायें । की मरे साचें
जैसी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें ।
तेणें उडावें परी न पुरे । मनशंका
वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी ।
टिटांतु नळी । धरुनि ठाके
म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां ।
कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें
ऐसा काजेंवीण आतुंडला । तो सांग पां काय आणिकें बांधला ।
मग नोसंडी जऱही नेला । तोडुनि अर्धा
म्हणऊनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु ।
येर स्वंयबुध्दी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे
तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।
परमात्मा परौता । दुरी नाहीं
जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरे तेंचि होये ।
तैसें जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपीं
हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा ।
नलगे मिळो जाणें आकाशा । आना ठाया
तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला ।
तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे
आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणीं ।
इयें न समाती कांही बोलणीं । मानापमानांची
जे जिये वाटा सुर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये ।
तैसे तया पावे तें आहे । तोचि म्हणऊनि
देखैं मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा ।
तैशी शुभाशभें योगीश्वरा । नव्हती आनें
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विचारितां जाहला वावो ।
मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि
आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी ।
ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण
ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुके ।
जेणें जिंतलीं एके । इंद्रिये गा
तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे ।
जेणें सानें थोर नेणिजे । कवणें काळीं
देखे सोनियाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ ।
आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी
पाहता पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें ।
देखें दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा
तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु ।
हा भावभेद विचित्रु । कल्पुं कैंचा
तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।
मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला
मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी ।
काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे
ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाचि बुध्दी चराचरीं ।
होय साम्याची उजरी । निरंतर
जे ते विश्वाळंकाराचें विसुरे । जरी आहाती आनानें आकारें ।
तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में
ऐसें जाणणें जें बरवें । ते फावलें तया आघवें ।
म्हणौनि आहाचवाहाचें न झकवे । येणे आकारचित्रें
घापे पटामाजी दृष्टी । दिसे तंतूंचि सैंघ सृष्टी ।
परी तो एकवांचुनि गोठी । दुजी नाहीं
ऐसेनि प्रतीती हे गवसे । ऐसा अनुभव जयातें असे ।
तोचि समबुध्दी हें अनारिसें । नव्हे जाणें
जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो ।
जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासी
जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिध्दितें विये ।
देखें स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा
विपायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता ।
हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि
पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें ।
मग आपणपांचि आपण असे । अखंडित
ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी ।
सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकी । तोचि म्हणऊनि
ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें ।
आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले
जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु ।
जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची
प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठें ।
तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे
जयाचेनि आंगीकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे ।
म्हणौनि जग हें वेसजे- । वीण असे तया
हां गा नांवचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचे ।
गुण एकेक काय तयाचे । आकळशील तूं
म्हणोनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणांची लक्षणें ।
दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें
ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी ।
तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन
म्हणोनि तें तैसे बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें ।
केलें मनचि वेगळवाणें । भोगावया
जया सोहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु ।
तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा
विपायें अंहभाव ययाचा जाईल । मी तेंचि हो जरी होईल ।
तरी मग काय कीजेल । एकलेया
दिठीचि पाहतां निविजे । कां तोंड भरोनि बोलिजे ।
नातरी दाटुनि खेंव दीजे । ऐसें कोण आहे
आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं ।
ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें
इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हातासनें ।
बोलामाजि मन मनें । आलिंगुं सरले
हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें ।
कृष्णसुखाचेंचि रुपडें । वोतलें गा
हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी ।
मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे
तैसें जाहले अनंता । ऐंसे तरी मी न म्हणतां ।
जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ
पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज ।
परी पुढें वालभाचे भोज । नाचत असे
आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी ।
पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काइ
म्हणौनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा ।
कीं सुखे श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो
यावरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।
तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं
हो का आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची ।
पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा
पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे ।
ऐसा अर्जुने तो सहजें । पढिये हरी
पाहां पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे ।
ते पतीहून काय न वर्णिजे । पतिव्रता
तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा ।
जे तो त्रिभुवनाचिया दैवां । एकायतनु जाहला
जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे ।
पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची
तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव ।
काय नादातें हन बरव । जिणोनी आली
हां हो नवल नोहे देशी । मऱहाटी बोलिजे तरी ऐसी ।
वाणें उमटताहे आकाशीं । साहित्यरंगाचें
कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्था पडे गार ।
हेचि श्लोकार्थकुमुदी तरी फार । साविया होती
चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी ।
तेणें विवळले अंतरी । तेथ डोलु आला
तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें ॥
नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें
देवकीया उदरीं वाहिला। यशोदा सायासें पाळिला ॥
कीं शेखीं उपेगा गेला । पांडवासी
म्हणऊनि बहु दिवस वोगळावा । कां अवसरु पाहोनि विनवावा ।
हाही सोसु तया सदैवा । पडेचिना
हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी ।
देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां
एऱहवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा ।
परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी
जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होईजेल ।
काय जाहलें अभ्यासिजेल । सांगाल जे
हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं ।
ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा
हें आंगे म्या होइजो का । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां ।
तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करुं म्हणती
देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें ।
मग जोडलिया कवणीकडे । अपुरें असे
तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणोनि ब्रह्मही होय तो कौतुकें ।
परि कैंसा भारें आतला पिके । दैवाचेनि
जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी ।
तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुहि न साहे
मग ऐका जें पांडवें । म्हणितले ब्रह्म म्यां होआवें ।
तें अशेषही देवें । अवधारिलें
तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले ।
परि उदरा वैराग्य आहे आलें । बुध्दीचिया
एऱहवीं दिवस तरी अपुरे । परि वैराग्यवसंताचेनि भरें ।
जे सोंहभाव महुरें । मोडोनि आला
म्हणोनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लागेल आतां ।
हो विरक्तु ऐसा अंनता । भरंवसा जाहला
म्हणे जें जें हा अधिष्ठील। तें आरंभींच यया फळेल ।
म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां
ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं ।
अर्जुना हा अवधारीं । पंथराजु
तेथ प्रवृत्तितरुच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी ।
जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनि
पैं योगवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं ।
कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला
तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें ।
कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडुनियां
पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिध्द जाहाले ।
आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें
हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे ।
रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये
चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे ।
आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख
निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा ।
निश्चळपणें धनुर्धरा । चालणें येथिंचें
येणें मार्गें जया ठाया जाइजे । तो गांवो आपणचि होइजे ।
हें सांगो काय सहजें । जाणसी तूं
तेथ म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां ।
कां आर्तीसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी
तवं श्रीकृष्ण म्हणती ऐसें । हें उत्संखळ बोलणें कायसें ।
आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिले तुवां
तरी विशेषे आतांचि बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल ।
म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पहावें
जेथ आराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे ।
वैराग्यासी दुणीव चढे । देखलिया जें
जो संती वसविला ठावो । संतोषासि सावावो ।
मना होय उत्सावो । धैर्याचा
अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभव वरि ।
ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ
जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा ।
पाखांडियाही आस्था । समूळ होय
स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां ।
तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे
ऐसेनि न राहतयातें राहावी । भ्रमतयातें बैसवी ।
थापटुनि चेववी । विरक्तीतें
हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे ।
ऐसे शृंगारियांहि उपजे । देखतखेंवो
जें येणें मानें बरवंट । आणि तैसेच अतिचोखट ।
जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे
आणिकही एक पहावें । साधकीं वसतें होआवें ।
आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना
जेथ अमृताचेनि पाडें । मुळेहीसकट गोडें ।
जोडती दाटें झाडें । सदा फळतीं
पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें ।
निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ
हा आतपुही अळुमाळु । जाणिजे तरी शीतळु ।
पवन अति निश्चळु । मंद झुळके
बहुत करुनि निःशद्ब । दाट न रिगे श्वापद ।
शुक हन षट्पद । तेउतें नाहीं
पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें ।
कवणें एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो
निरंतर नाही । तरी आलीं गेलीं कांहीं ।
होतु कां मयुरेंही । आम्ही ना न म्हणों
परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा ।
तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय
दोहींमाजी आवडे तें । जें मानलें होय चित्तें ।
बहुतकरुनि एकांते । बैसिजे गा
म्हणोनि तैसें ते जाणावें । मन राहातें पाहावें ।
राहेल तेथ रचावें । आसन ऐसें
वरि चोखट मृगसेवडी । माजी धूतवस्त्राची घडी ।
तळवटीं अमोडी । कुशांकुर
सकोमळ सरिसे । सुबध्द राहती आपैसे ।
एकें पाडें तैसें । वोजा घाली
परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल ।
नीच तरी पावेल । भूमिदोषु
म्हणौनि तैसें न करावें । समभावें धरावें ।
हें बहु असो होआवें । आसन ऐसें
मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण ।
करुनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे
तैसें स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्विकें भरे ।
जंव काठिणपण विरे । अहंभावाचे
विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे ।
मनाची घडी घडे । हृदयामाजीं
ऐसें ऐक्य हें सहजें । फावें तंव राहिजे ।
मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी
आतां आंगाते आंग करी । पवनातें पवनु धरी ।
ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे
प्रवृत्ती माघौति मोहरे । समाधि ऐलाडि उतरे ।
आघवें अभ्यासु सरे । बैसतखेंवो
मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं ।
तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं
चरणतळें देव्हडी । आधारद्रुमाचा बुडीं ।
सुघटितें गाढीं । संचरीं पां
सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यु पीडिजे ।
वरी बैसे तो सहजें । वामचरणु
गुद मेंढ्राआंतौति । चारी अंगुळें निगुतीं ।
तेथ सार्ध सार्ध प्रांती । सांडुनियां
माजि अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तराभागें ।
नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि
उचलिले कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे ।
गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें
मग शरीर संचु पार्था । अशेषुही सर्वथा ।
पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय
अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण ।
वज्रासन गौण । नाम यासी
ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे ।
तेथ अपानु आंतलीकडे । वोहोंटो लागे
तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे ।
तंव बाहुमुळीं दिसे । थोरवी आली
माजी उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें ।
नेत्रद्वारीची कवाडें । लागूं पहाती
वरचिलें पाती ढळती । तळींची तळीं पुंजाळती ।
दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें ।
ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं
ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे ।
म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय
आतां दिशांचि भेटी घ्यावी । कां रुपाची वाट पहावी ।
हे चाड सरे आघवी । आपैसया
मग कंठनाळ आटे । हनुवटी हे हडौति दाटे ।
ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं
माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे ।
तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा
नाभीवरी पोखे । उदर हें थोके ।
अंतरीं फांके । हृदयकोशु
स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभीस्थानातळवटीं ।
बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो
ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे ।
तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची
कल्पना निमे । प्रवृत्ती शमे ।
आंग मन विरमे । सावियाचि
क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली ।
हे आठवणही हारपली । न दिसे वेगां । २१३ ॥
जो मुळबंधे कोंडला । अपानु माघौता मुरडला ।
तो सवेंचि वरी सांकडला । फुगु धरी
क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायी गाजे ।
मणिपुरेंसी झुंजे । राहोनियां
मग थांवली ते वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी ।
बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली
भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे ।
कफपित्ताचे थारे । उरों नेदी
धांतुचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी ।
आंतली मज्जा काढी । अस्थिगत
नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी ।
साधकांते भेडसावी । परि बिहावें ना
व्याधीतें दावी । सवेंचि हरवी ।
आप पृथ्वी कालवी । एकवाट
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।
शक्ती करी उजगरा । कुंडलिनीते
नागाचें पिलें । कुंकुमें नाहलें ।
वळण घेऊनि आलें । सेजे जैसें
तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी ।
अधोमुख सर्पिणी । निजैली असे
विद्युलतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी ।
पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी
तैसी सुबध्द आटली । पुटीं होती दाटली ।
तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय
तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सुर्याचें आसन मोडलें ।
तेजाचे बीज विरुढलें । अंकुरेशीं
तैशी वेढियातें सोडती । कवतिकें आंग मोडिती ।
कंदावरी शक्ती । उठली दिसे
सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविलीं तें होय मिष ।
मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू
तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी ।
तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली
मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी ।
मांसाची वडवाळी ।आरोगुं लागे
जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस ।
पाठी एकदोनी घांस । हियाही भरी
मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वीचे खंड भेदी ।
झाडा घे संधी । प्रत्यंगाचा
आधार तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी ।
त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं
अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे ।
तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची
मग सप्तधांतूच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी ।
आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत
नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळे बारा ।
तो गचिये धरुनि माघारा । आंतु घाली
तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे ।
तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती
एऱहवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परि कुंडलिनी नावेकु दुश्चित्त होती ।
ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसीं एथें
आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां काहीं नुरवी ।
आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां
ऐसी दोनी भुतें खाये । ते वेळी संपूर्ण धाये ।
मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं
तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें ।
तेणें तियेचेनि पीयूषे । प्राणु जिये
तो अग्नि आंतूनि निघे । परि सबाह्य निववूंचि लागे ।
ते वेळी कसु बांधिती आंगे । सांडिला पुढती
मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायुचें ।
जाय म्हणऊनि शरीराचे । धर्मु नाहीं
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।
साही पदर फुटती । चक्रांचे हे
मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु ।
तो वातीवरी पवनु । गिवसितां न दिसे
बुध्दीची पुळिका विरे । परिमळु घ्राणी उरे ।
तोही शक्तिसवें संचरे । मध्यमेमाजी
तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें ।
कानवडोनि मिळे । शक्तिमुखीं
तेणें नातकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे ।
जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु
तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें ।
कोंदली राहे रसें । वोतलेनि
तैसे पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे ।
वरी त्वचेचेनि पदरें । पांगुरली असे
जैसी आभाळाची बुंथी । करुनि राहे गभस्ती ।
मग फिटलिया दीप्ति । धरूं नये
तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातवडा ।
तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय
मग काश्मीराचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ ।
नातरि संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग ।
की अंतर्जोतीचें लिंग । निर्वाळिलें
कुंकुमाचे भरींव । सिध्दरसांचे वोतींव ।
मज पाहतां सावेव । शांतिचि ते
तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप ।
कीं संतोषतरूचें रोप । थांवलें जैसें
तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा ।
नाना सासिंनला मळा । कोंवळिकेचा
हो कां जे शारदियेचे वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें ।
कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी
तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पिये ।
मग देहाकृति बिहे । कृतांतु गा
वृध्दाप्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे ।
लोपली उघडे । बाळदशा
वयसा तरी येतुलेवरी । एऱहवी बळाचा बळार्थु करी ।
धैर्याची थोरी । निरुपम
कनकद्रुमाचां पालवीं । रत्नकळिका नित्य नवी ।
नखें तैसीं बरवीं । नवीं निघती
दांतही आन होती । परि अपाडें सानेजती ।
जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची
माणिकुलियांचिया कणिया । सावियाची अणुमानिया ।
तैसिया सर्वांगीं उधवती अणिया । रोमांचियां
करचरणतळें । जैसीं कां रातोत्पळें ।
पाखाळीं होती डोळे । काय सांगो
निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें ।
मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची
तैशीं पातिचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे ।
आधिलीची परि होये । गगना कळिती
आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें ।
जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं
मग समुद्रपैलाडी देखे । स्वर्गींचा आलोचु आइके ।
मनोगत ओळखे । मुंगियेचे
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे ।
येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिध्दी
आइकें प्राणाचा हातु धरुनि । गगनाची पाउटी करुनी ।
मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली
ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा ।
जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली
जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची कंरडी ।
जे प्राणाची उघडी । जन्मभूमी
हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली ।
तंव अनाहताचां बोलीं । चावळे ते
शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें ।
तें तेणें आइकिलें । अळुमाळु
घोषाच्या कुंडी । नादचित्रांची रुपडीं ।
प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं
हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परि कल्पितें कैचें आणिजे ।
तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं
विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाही पवना ।
तंव वाचा आथी गगना । म्हणोनि घुमे
तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमों लागे ।
तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । फिटलें सहजें
आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें ।
जेथ चैतन्य आधातुरें । करुनि असिजे
तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनियां परमेश्वरी ।
तेजाची शिदोरी । विनियोगिली
बुध्दीचेनि शाकें । हातबोनें निकें ।
द्वैत जेथ न देखे । तैसें केलें
ऐसी निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहली ।
ते वेळी कैसी गमली । म्हणावी पां
हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनेसळी ।
ते फेडुनियां वेगळी । ठेवली तिया
नातरी वारयाचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निमटली ।
कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं
तैशी हृदयकमळवेऱहीं । दिसे सोनियाची जैशी सरी ।
नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली
मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे ।
तैसें शक्तीचे रुप मावळे । शक्तीचिमाजीं
तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एऱहवी तो प्राणु केवळ जाणिजे ।
आतां नाद बिंदु नेणिजे । कला ज्योती
मनाचा हन मारु । कां पवनाचा धरु ।
ध्यानाचा आदरु । नाहीं परी
हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी ।
हे महाभूतांची फुडी । आटणी देखां
पिंडे पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतीचा दंशु ।
परि दाऊनि गेला उद्देशु । महाविष्णु
तया ध्वनिताचें केणें सोडुनी । यथार्थाची घडी झाडुनी ।
उपलविली म्यां जाणुनि । ग्राहीक श्रोते
ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचे रुप हारपे ।
मग तो डोळ्यांमाजी लपे । जगाचिया
एऱहवीं आधिलाची ऐसें । सावयव तरी दिसे ।
परी वायूचें कां जैसें । वळिलें होय
नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा ।
कां अवयवचि नभा । निवडला तो
तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर ।
हें पद होतां चमत्कार । पिंडजनी
देखें साधकु निघोनि जाय । मागां पाउलांची वोळ राहे ।
तेथ ठायी ठायी होये । हे अणिमादिक
परि तेणें काय काज आपणयां । अवधारी ऐसा धनंजया ।
लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं
पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।
तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं
पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें ।
मग तोही निगे अंतरें । गगना मिळे
ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये ।
परि शक्तीपण तें आहे । जंव न मिळे शिवीं
मग जालंधर सांडी । ककारांत फोडी ।
गगनाचिये पाहाडीं । पैठी होय
ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।
पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली
पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरी ।
भरती गमे सागरीं । सरिता जेवीं
मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी । सोहंभावाच्या बाह्या पसरुनी ।
परमात्मलिंगा धांवोनि । आंगा घडे
तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें ।
तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये
पैं मेघाचेनि मुखीं निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला ।
तो मागुता जैसा आला । आपणपेयां
तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।
तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा
आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें ।
ऐशिये विवंचनपुरतें । उरेचिना
गगनीं गगन लया जाये । ऐसें जे कांहीं आहे ।
तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके
म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु ।
जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे
अर्जुना एऱहवीं तरी । इया अभिप्रायाचा गर्वु धरी ।
ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली
भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे ।
सडेया प्राणा सांकडें । गगना येतां
पाठीं तेथेंचि तो भासळला । तंव शब्दाचा दिवो मावळला ।
मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा
आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनसीचि ठावो नाहीं ।
तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया
म्हणोनि आखरामाजीं सांपडे । कीं कानावरी जोडे ।
हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुध्दी गा
जैं कही दैवें । अनुभविलें फावे ।
तैं आपणचि हें ठाकावें । होऊनिया
पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि ।
बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा
ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।
वाराही जेथ न शिरे । विचाराचा
जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।
अनादि जें अगण्य । परमतत्व
जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु ।
जेथ आदि आणि अंतु । विरोनि गेले
जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ ।
जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा
जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज ।
एवं पार्था जें निज । स्वरुप माझें
ते हे चर्तुभुज कोंभेली । जयाची शोभा रुपा आली ।
देखोनि नास्तिकीं नोकिली । भक्तवृंदें
तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष ।
जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तीवेरीं
आम्ही साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें ।
ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें ।
वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें
कां जें आपण आतां देवो । हा बोलिलो जो उपावो ।
तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती ।
हें सांगतियाची रीती । कळलें मज
देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता ।
मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केंवी
म्हणऊनि एथ कांही । अनारिसें नाहीं ।
परि नावभरी चित्त देई । बोला एका
आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु ।
परि न शकें करुं पांगु । योग्यतेचा
सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिध्दि जाये ।
तरी हाचि मार्ग सुखोपायें । अभ्यासीन
नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल ।
तरी योग्यतेवीण होईल । तेचिं पुसों
जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण ।
मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो
हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरुपिलें ।
तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके
कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांही ।
तेथ कृष्णा म्हणती तरी काई । धनुर्धरा
हें काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांही साधारण ।
तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिध्दि जाय
पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे ।
कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभी फळें
तरी तैसी एथ कांही । सावियाचि केणी नाहीं ।
आणि योग्यांची काई । खाणी असे
नावेक विरक्तु । जाहला देहधर्मी नियतु ।
तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया
येतुलालिये आयणीमाजि येवढें । योग्यपण तूतेंही जोडे ।
ऐसें प्रसंगे सांकडें । फेडिलें तयाचें
मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था ।
अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं
जो रसनेद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला ।
तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया
अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी ।
आहारातें तोडी । मारुनियां
निद्रेचिया वाटा न वचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे ।
तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा
म्हणोनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नव्हावा ।
कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको
आहार तरी सेविजे । परि युक्तीचेनि मापें मविजे ।
क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती
मपितलां बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे ।
निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें
जागणें जरी जाहलें । तरी व्हावे तें मितलें ।
येतुलेनि धातुसाम्य संचले । असेल सुखें
ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे भातें ।
तै संतोषासी वाढतें । मनचि करी
बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तंव आंत सुख वाढे ।
तेथें सहजचि योगु घडे । नाभ्यासितां
जैसें भाग्याचिये भडसें । उद्यमाचेनि मिसें ।
मग समृध्दीजात आपैसें । घर रिघे
तैसा युक्तीमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके ।
आणि आत्मसिद्धीची पिके । अनुभवु तयाचा
म्हणोनि युक्ती हे पांडवा । घडे जया सदैवा ।
तो अपवर्गाचिये राणिवा । अळंकरिजे
युक्ती योगाचे आंग पावे । ऐसें प्रयाग जें होय बरवें ।
तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें
तयातें योगायुक्त म्हण । हेंही प्रसंगे जाण ।
तें दीपांचे उपलक्षण । निर्वातींचिया
आतां तुझें मनोगत जाणोनि । कांही एक आम्ही म्हणोनि ।
तें निकें चित्त देउनी । परिसावें गा
तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्ष नव्हसी ।
तें सांग पा काय बिहसी । दुवाडपणा
तरी पार्था हें झणें । सायास घेशीं हो मनें ।
वायां बागूल इये दुर्जनें । इंद्रिये करिती
पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी ।
तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे
ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इद्रिंयां दुःखे ।
एऱहवी सोपें योगासारिखें । कांही आहे
म्हणोनि आसनाचिया गाढीका । जो आम्ही अभ्यासु सांगितला निका ।
तेणे होईल तरी हो कां । निरोधु यया
एऱहवी तरी येणें योगें । जै इद्रिंया विंदाण लागे ।
तै चित्त भेटों रिगे । आपणपेयां
परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांते आपण देखे ।
देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व हें मी
तिये ओळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे ।
मग चित्तपण समरसें । विरोनि जाय
जयापरतें आणिक नाहीं । जयातें इद्रिंयें नेणती कहीं ।
तें आपणचि आपुलिया ठायीं । होऊनि ठाके
मग मेरुपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरे ।
दाटिजो पां परि भरें । चित्त न दटे
कां शस्त्रें वरी तोडिलिया । देह अग्निमाजीं पडलिया ।
चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये
ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे ।
आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे
जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी ।
संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें
जे योगाची बरव । संतोषाची राणीव ।
ज्ञानाची जाणीव । जयालागीं
तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागें ।
देखिलें तरी आंगें । होईजेल गा
तरि तोचि योगु बापा । एके परि आहे सोपा ।
जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे
हा विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे ।
तरी हियें घालूनि मुके । जीवितांसी
ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी ।
सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धी नांदे
बुद्धी धैया होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।
हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं
याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं ।
हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें
आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला ।
जैसा कृतनिश्चयाचिया बोला । बाहेरा नोहे
जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें ।
नाही तरी घालावें । मोकलुनी
मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेऊनि येईल ।
ऐसेनि स्थैर्याची होईल । सवे ययां
पाठीं केतुलेनि एके वेळी । तया स्थैर्याचेनि मेळें ।
आत्मस्वरुपाजवळें । येईल सहजें
तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल ।
आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें
आकाशीं दिसे दुसरें । ते अभ्र जैं विरे ।
तै गगनचि कां भरे । विश्व जैसें
तैसे चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।
ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें
या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं ।
संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां
तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें ।
तेथ लवण जैसें जळातें । सांडु नेणे
तैसें होय तिये मेळीं । मग साम्यरसाचिया राऊळीं ।
महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे
ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी ।
हें पार्था नागवे तरी । आन ऐकें
तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं ।
आणि तैसेंति माझ्या ठायीं । सकळ असे
हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें ।
बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा
एऱहवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना ।
सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे
भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें ।
केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो
मग तो एक हा मियां । बोलता दिसतसे वायां ।
एऱहवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहें
दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा ।
तो माझ्या ठायी तैसा । मी तयामाजीं
जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि माने अवकाशु ।
तैसा माझेनि रुपें रुपसु । पुरुष तो गा
जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेचि किरीटी ।
देखिला जैसा पटीं । तंतु एकु
कां स्वरुपें तरी बहुतें आहाती । परि तैसी सोनीं बहुवें न होती ।
ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें
ना तरी वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपे नाहीं लाविलीं ।
ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया
तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पा कैसेनि अडे ।
जो प्रतीतीचेनि पाडें । मजसी तुके
माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें ।
तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला
आतां शरीरीं तरी आहे । परि शरीराचा तो नोहे ।
ऐसें बोलवरी होये । तें करु ये काइ
म्हणोनि असो तें विशेषें । आपणपेयांसारिखें ।
जो चराचर देखे । अखंडित
सुखदुःखादि वर्मे । कां शुभाशुभे कर्में ।
दोनी ऐसी मनोधर्में । नेणेचि जो
जें समविषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व ।
तें मानी जैसे अवयव । आपुले होती
हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें ।
मी ऐसें स्वभावें । बोधा आलें
तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती ।
परि आम्हांतें ऐसीचि प्रतीती । परब्रह्मचि हा
म्हणोनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे ।
ऐसे साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा
हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं ।
जे साम्यापरौति जगीं प्राप्ति नाहीं
अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा ।
परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें ।
एऱहवी राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया
म्हणोनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल ।
कां राहा म्हणितलिया राहेल । महावातु
जें बुध्दीतें सळी । निश्चयाते टाळी ।
धैर्येसी हातफळी । मिळऊनि जाय
जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।
बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा
जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो ।
तें मन आपुला स्वभावो । सांडील काई
म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य होईल ।
हें विशेषेंही न घडेल । तयालागीं
तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि ।
यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा
परि वैराग्यचेनि आधारें । जरि लाविलें अभ्यासाचिये मोहरें ।
तरि केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल
कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिले गोडीचिया ठाया सोके ।
म्हणोनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे
एऱहवीं विरक्ती जयांसि नाही । जे अभ्यासीं न रिघती कहीं ।
तयां नाकळे हें आम्हीही । न मनू कायी
परी यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे ।
केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देऊनी
या जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं ।
तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगे
म्हणोनि मनाचा निग्रह होये । ऐसा उपाय जो आहे ।
तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों
तरी योगसाधन जितुकें । कें अवघेचि काय लटिकें ।
परि आपणयां अभ्यास न ठाके । हेंचि म्हण
आंगी योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ।
काय महदादि हें सकळ । आपु नोहे
तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके ।
साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ
तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिया याची मातुही नेणों ।
म्हणोनि मनातें जी म्हणों । अनावर
हा आतां आघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा ।
योगपरिचयो आम्हां । जाहला आजी
परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया ।
तो तूंवांचूनि फेडावया । समर्थु नाहीं
म्हणोनि सांगे गोविंदा । कवण एकु मोक्षपदा ।
झोंबत होता श्रध्दा । उपायेंविण
इद्रिंयग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटा लागला ।
आत्मसिद्धीचिया पुढिला । नगरा यावया
तंव आत्मसिद्धी न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि ।
ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु
जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ ।
विपायें आलें केवळ । वसे ना वर्से
तैसी दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली ।
आणि अप्राप्तीही सांडवली । श्रध्दा तया
ऐसा वोलांतरला काजीं । जो श्रध्देचांचि समाजीं ।
बुडाला तया हो जी । कवण गति
तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था ।
तया मोक्षावांचुनि अन्यथा । गती आहे गा
परि एतुलेंचि एक घडे । जें माझारी विसवावें पडे ।
तेंही परि ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं
एऱहवी अभ्यासाचा उचलतां । पाउलीं जरी चालतां ।
तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिध्दीतें
परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणऊनि विसांवा तरी निकाचि ।
पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे
ऐसें कवतिक हें कैसें । जें शतमखा लोक सायासें ।
ते तो पावे अनायासें । कैवल्यकामु
मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग ।
भोगितांही सांग । कांटाळे मन
हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता ।
ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य
पाठीं जन्मे संसारी । परि सकळ धर्माचिया माहेरीं ।
लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा
जयातें नीतिपंथे चालिजे । सत्यधूत बोलिजे ।
देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टी
वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु ।
सारासारविचारु । मंत्री जयाते
जयाचा कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता ।
जयातें गृहदेवता । आदि ऋध्दि
ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी ।
तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु
अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्य श्रोत्री ।
महासुखक्षेत्रीं । आदिवंत
जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं ।
जे कूंजते कोकिल वनीं । संतोषाचां
जे विवेकग्रामींचां मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं ।
तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे
मोटकी देहाकृती उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे ।
सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा
तैसी दशेची वाट न पहातां । वयसेचिया गांवा न येतां ।
बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें
तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे ।
मग सकळ शास्त्रे स्वयंभें । निघती मुखें
ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम ।
स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा
अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे ।
ऐसें जन्म पार्था गा जे । तें तो पावे
आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि ।
मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे
तेथ सदैवा आणि पायाळा । वरि दिव्यांजन होय डोळां ।
मग देखे जैसीं अवलीळा । पाताळधनें
तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय ।
तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धी तयाची
बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना ।
पवन सहजें गगना । मिळोंचि लागे
ऐसें नेणों काय आपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें ।
समाधी घर पुसे । मानसाचें
जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय आरंभरंभेचा गौरवु ।
की वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रुपा आला
हा संसारु उमाणितें माप । का अष्टांगसामग्रीचें द्वीप ।
जैसे परिमळेंचि धरिजे रुप । चंदनाचें
तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धिभांडारीहूनि काढिला ।
दिसे तेणें मानें रुढला । साधकदशे
जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्त्रांचिया आडी ।
लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची
म्हणोनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें ।
मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये
पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां ।
मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय
तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचे पवनपण सरे ।
आपणपां आपण मुरे । आकाशही
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।
म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं
ऐसी ब्रह्माची स्थिती । जे सकळां गतींसी गती ।
तया अमूर्ताची मूर्ती । होऊनि ठाके
तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांची पाणिवळें झाडिलीं ।
म्हणोनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका
आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभिन्न ।
जैसे लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके
तैसें विश्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये ।
तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा
जया लाभाचिया आशा । करुनि धैर्यबाहूंचा भंरवसा ।
घालीत षट्कर्माचा धारसा । कर्मनिष्ठ
कां जिये एकी वस्तुलांगी । बाणोनि ज्ञानाची व्रजांगी ।
झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा
अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा ।
झोंबती तपिये चाडा । जयाचिया
जें भजतियांसी भज्य । याज्ञिकांचे याज्य ।
एवं जें पूज्य । सकळां सदा
तेंचि तो आपण । स्वयं जाहला निर्वाण ।
जें साधकांचें कारण । सिद्ध तत्व
म्हणोनि कर्मनिष्ठां वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु ।
तापसांचा आद्यु । तपोनाथु
पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहले मनोधर्मा ।
तो शरीरीचि परि महिमा । ऐसी पावे
म्हणोनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें ।
योगी होई अंतःकरणें । पंडुकुमरा
अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देव जाणिजे ।
आणि सुखसर्वस्व माझें । चैतन्य तो
जया भजता भजन भजावें । हे भक्तिसाधन जें आघवें ।
ते मीचि जाहलों अनुभवें । अखंडीत
मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरुप बोली निर्वचे ।
ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती
तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा ।
तरी मी देह तो आत्मा । हेचि होय
ऐसे भक्तचकोरचंद्रें । त्रिभुवनैकनरेंद्रे ।
बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे
तेथ आदिलापासोनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था ।
दुणावली हें यदुनाथा । पावों सरले
कीं सावियाचि मनीं तोषला । जे बोला आरिसा जोडला ।
तेणें हरिखें आतां उपलवला । निरुपील
तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसे उघडा ।
तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजांचा
जें सात्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें ।
सहजें निरोळले वाफे । चतुरचित्ताचे
वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनयाऐसा ।
म्हणोनि पेरावया धिंवसा । निवृतीसी
ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरुंनी केलें कोडें ।
माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें
म्हणऊनि येणे मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचचि लागे ।
हें असो सांगों श्रीरंगे । बोलिले जें
परी ते मनाचा कानी ऐकावें । बोल बुद्धीचां डोळां देखावें ।
हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया
अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयाआंतौते ।
हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये
हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती ।
सुखाची वाहविती । लाखोली जीवां
आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदे । नागर बोलिजेल विनोदें ।
तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0