भाषा

ENहिગુ
ग्रंथ पाठ

ज्ञानेश्वरी · अध्याय 4

4.1

आजि श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गीतानिधान देखिलें ।
आता स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें

4.2

आधी विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे

4.3

जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळ आणि सुस्वादु ।
तं भला जाहला विनोदु । कथेचा इये

4.4

कैसी आगळिक दैवाची । जे गंगा वोळली अमृताची ।
हो कां जपतपें श्रोतयांची । फळा आली

4.5

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचे घर रिघावें ।
मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें

4.6

हा अतिसो अतिप्रसंगे । सांडूनि कथाचि ते सांगे ।
जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते

4.7

ते वेळी संजयों रायातें म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें ।
जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे

4.8

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगे माते देवकीसी ।
जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंसी बोलत

4.9

देवी लक्ष्मीयेवढी जवळीक । तेही न देखे या प्रेमाचे सुख ।
आणि कृष्णस्नेहाचें पिक । यांतेचि आथी

4.10

सनकादिकांच्या आशा । वाढिनल्या होत्या कीर बहुवसा ।
परी त्याही येणें माने यशा । येतीचिना

4.11

या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम ।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें

4.12

हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।
मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे

4.13

एर्‍हवीं हा योगिया नाडळे । वेदार्थासी नाकळे ।
जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना

4.14

तें हा निजस्वरूप । अनादि निष्कंप ।
परी येणे मानें सकृप । जाहला असे

4.15

हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी ।
कैसा याचिये आवडी । आवरला असे

4.16

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची

4.17

मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी ।
निरूपिली बरवी । मनूप्रती

4.18

मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।
ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा

4.19

मग आणिकही या योगाते । राजर्षि जाहले जाणते ।
परी तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी

4.20

जे प्राणियां कामी भरू । देहाचिवरी आदरु ।
म्हणोनि पडला विसरु । आत्मबोधाचा

4.21

अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि ।
जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां

4.22

एर्‍हवीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाऊवें काय करावीं ।
सांगे जात्यंधा रवी । काय आथी

4.23

कां बहिरयांचां आस्थानीं । कवणे गीतातें मानी ।
कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे

4.24

पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते ।
ते काऊळे केवीं चंद्रातें । ओळखती

4.25

तैसे वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती ।
ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वराते

4.26

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला ।
म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये

4.27

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता ।
सांगितला आम्हीं तत्वता । भ्रांति न करीं

4.28

हें जीवींचे निज गुज । परी केवीं राखों तुज ।
जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां

4.29

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा ।
मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा

4.30

तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ।
जरी संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही

4.31

तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें ।
परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं

4.32

तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी ।
एथ विस्मो काय अवधारीं । कृपानिधी

4.33

तूं संसारश्रांतांची साऊली । अनाथ जीवांची माऊली ।
आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा

4.34

देवा पांगुळ एकादें विईजे । तरी जन्मोनि जोजारू साहिजे ।
हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां

4.35

आतां पुसेन जें मी कांही । तेथ निकें चित्त देईं ।
तेवींचि देवें कोपावें ना कांही । बोला एका

4.36

तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता ।
ते नावेक मज चित्ता । मानेचिना

4.37

जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं ।
तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला

4.38

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा ।
म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु

4.39

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांही काय जाणिजे ।
हें लटिके केवीं म्हणिजे । एकिहेळां

4.40

परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैशी सांगावी ।
जे तुवांचि तया रवीं केवीं । उपदेशु केला

4.41

तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता ।
तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज

4.42

तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी ।
बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपली तूं

4.43

मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें ।
ते समस्तही स्मरें । धनुर्धरा

4.44

म्हणोनि आघवें । मज मागील आठवें ।
मी अजुही परि संभवे । प्रकृतिसंगे

4.45

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे ।
ते प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं

4.46

माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे ।
तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं

4.47

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।
एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे

4.48

तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।
तैं साकारपणे नटें नटीं । कार्यालागीं

4.49

ते वेळी आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें ।
मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं

4.50

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं

4.51

ते वेळी आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें ।
मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं

4.52

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं

4.53

दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानू गिंवशीं ।
धर्मासी नीतीशी । शेंज भरी

4.54

मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर

4.55

स्वसुखे विश्व कोंदे । धर्मचि जगीं नांदे ।
भक्तां निघती दोंदें । सात्विकाचीं

4.56

तैं पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे ।
जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा

4.57

ऐसेया काजालागी । अवतरें मी युगीं युगीं ।
परि हेंचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया

4.58

माझे अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें ।
हें अविकार जो जाणे । तो परममुक्त

4.59

तो चालिला संगे न चळे । देहींचा देहा नाकळे ।
मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं

4.60

एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती ।
वाटा केवेळीं न वचती । क्रोधाचिया

4.61

जे सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले ।
कां आत्मबोधे तोषले । वीतराग जे

4.62

जे तपोतेजाचिया राशी । कां एकायतन ज्ञानासी ।
जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप

4.63

ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले ।
जे मज तयां उरले । पदर नाहीं

4.64

सांगे पितळेची गंधिकाळिक । जे फिटली होय निःशेख ।
तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाईजे

4.65

तैसे यमनियमीं कडसले । ते तपोज्ञानीं चोखळले ।
मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा

4.66

एर्‍हवीं तरी पाहीं । जे जैसे माझां ठाईं ।
भजती तया मीही । तैसाचि भजे

4.67

देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनसीळ ।
जाहलें असे केवळ । माझां ठायीं

4.68

परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले ।
तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व

4.69

म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती ॥
देवी देवो म्हणती । अचर्चातें

4.70

जें सर्वत्र सदा सम । तेथे विभाग अधमोत्तम ।
मतिवशें संभ्रम । विवंचिती

4.71

मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।
मानिलीं देवतांतरें । उपासिती

4.72

तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावति समस्त ।
परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तूं

4.73

वाचूंनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाही सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं

4.74

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे ।
कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें

4.75

ना तरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीटी ।
पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें

4.76

तैसा समस्तां यां भजनां । मी साक्षिभूतु पैं अर्जुना ।
एथ प्रतिफळे भावना । आपुलाली

4.77

आतां याचिपरी जाण । चार्‍ही आहेती हे वर्ण ।
सृजिले म्यां गुण - । कर्मभागें

4.78

जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें ।
कर्में तदनुसारें । विवंचिली

4.79

एथ एकचि हे धनुष्यपाणी । परीं जाहले गा चहूं वर्णीं ।
ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें

4.80

म्हणोनि आईकें पार्था । हे वर्णभेदसंस्था ।
मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं

4.81

हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।
ऐसे जेणे जाणितलें । तो सुटला गा

4.82

मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें ।
कर्मे केलीं समस्तें । धर्नुधरा

4.83

परी तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरलीं ।
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली । मोक्षहेतु

4.84

एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना ।
आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे

4.85

मर्म म्हणिजे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण ।
ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले

4.86

जैसें का कुडें नाणें । खर्‍याचेनि सारखेपणें ।
डोळ्यांचेहि देखणें । संशयी घाली

4.87

तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाति कर्में ।
जे दुजी सृष्टि मनोधर्में । करूं शकती

4.88

वाचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी ।
म्हणोनि आतां तेचि परियेसीं । सांगेन तुज

4.89

तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेथ विश्वाकारु संभवे ।
ते सम्यक आधीं जाणावें । लागे एथ

4.90

मग वर्णाश्रमासि उचित । जे विशेष कर्म विहित ।
तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसीं

4.91

पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें ।
येतुलेनि येथ कांही न गुंफे । आपैसेंचि

4.92

एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन ।
परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा

4.93

जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता ।
कर्मसंगे निराशता । फळाचिया

4.94

आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।
ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे

4.95

परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा ।
तरी तो इहीं चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा

4.96

जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे ।
तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहे

4.97

अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ।
तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ

4.98

तैसे सर्व कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें ।
मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा

4.99

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसे न चलतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असतां

4.100

तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे ।
जैसें जळीं जळामाजीं न बुडे । भानुबिंब

4.101

तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केले ।
न भोगितां भोगिलें । भोग्यजात

4.102

एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।
हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो

4.103

जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।
परी फळापेक्षा कहीं । संचरेना

4.104

आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन ।
येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना

4.105

ज्ञानाग्निचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें ।
तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं

4.106

जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु ।
नित्यता उल्हासु । होऊनि असे

4.107

जो संतोषाचां गाभारां । आत्मबोधाचिया वोगरा ।
पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां

4.108

कैसा अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी ।
सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेसीं

4.109

म्हणोनि अवसरें जें जें पावे । तेणेचि तो सुखावे ।
जया आपुले आणि परावें । दोन्ही नाहीं

4.110

तो दिठी जें पाहे । ते आपणचि होऊनि जाये ।
आइकें तें आहे । तोचि जाहाला

4.111

चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले ।
ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो

4.112

हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेवांचूनि नाहीं ।
आता कवण तें कर्म कायी । बाधी तयातें

4.113

हा मत्सरु जेथ उपजे । तेतुले नुरेचि जया दुजें ।
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी

4.114

म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि तो कर्मरहितु ।
सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं

4.115

तो देहसंगे तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे ।
पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला

4.116

ऐसाही परी कौतुकें । जरी कर्मे करी यज्ञादिकें ।
तरी तियें लया जाती अशेखें । तयाचांचि ठायीं

4.117

अकाळींची अभ्रें जैसी । उर्मीविण आकाशीं ।
हारपती आपैशीं । उदयलीं सांती

4.118

तैशीं विधीविधान विहितें जरी आचरे तो समस्तें ।
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा

4.119

जें हें हवन मी होता । कां इये यज्ञीं हा भोक्ता ।
ऐसीया बुद्धीसि नाही भंगता । म्हणऊनियां

4.120

जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें ।
तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि

4.121

म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आले जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा

4.122

आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचे पाणिग्रहण जाहलें ।
मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें

4.123

जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसी ।
गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें

4.124

तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे ।
जेणे आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा

4.125

दैवास्तव देहाचे पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण ।
जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगें

4.126

आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक ।
तयांते यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे

4.127

एथ संयमाग्निहोत्री । जे युक्तित्रयांच्यां मंत्रीं ।
यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं

4.128

एकां वैराग्यरवि विवळे । तंव संयती विहार केले ।
तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ

4.129

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांची इंधने पळिपलीं ।
तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें

4.130

मग वाक्यविधीचिया निरवडी । विषयआहुति उदंडी ।
हवन केलें कुंडी । इंद्रियाग्नीचां

4.131

एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा ।
आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला

4.132

तो उपशमें निहटिला । धैर्यें वरी दाटिला ।
गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें

4.133

ऐसे समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें ।
जे उज्जीवन जहालें । ज्ञानाग्नीचें

4.134

पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु ।
मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु

4.135

मन तयाचे मोकळें । तेचि पेटवण घातलें ।
जें यमदमीं हळुवारलें । आइतें होतें

4.136

तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा ।
स्नेहेंसी नानाविधा । जाळिलिया

4.137

तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांचिया आहुती ।
तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया

4.138

पाठीं प्राणक्रिचेनि स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं ।
तेथ अवभृत समरसीं । सहजें जाहलें

4.139

मग आत्मबोधींचे सुख । जे संयमाग्नीचें हुतशेष ।
तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं

4.140

एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं ।
या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य तें एक

4.141

एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती ।
एक योगयागुही आहाती । जे सांगितले

4.142

एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे ।
ज्ञाने ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु

4.143

हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडे ।
परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें

4.144

ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले ।
म्हणोनि आपणपां तिहीं केले । आत्महवन

4.145

मग अपाग्नीचां मुखी । प्राणद्रव्यें देखी ।
हवन केलें एकीं । अभ्यासयोगें

4.146

एकु अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती ।
ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा

4.147

एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें ।
प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती

4.148

ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ ।
जिहीं यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले

4.149

जया अविद्याजात जाळितां । जे उरलें निजस्वभावता ।
जेथ अग्नि आणि होता । उरेचिना

4.150

जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे ।
मागुते जेथूनि वोसरे । क्रियाजात

4.151

विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे ।
जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना

4.152

ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट ।
तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रे

4.153

ऐसे शेषामृते धाले । कीं अमर्त्यभावा आले ।
म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासे

4.154

येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि ।
जें योगयागु न करितीचि । जन्मले सांते

4.155

जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई ।
म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा

4.156

ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग ।
ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती

4.157

परि तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें ।
येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना

4.158

अर्जुना वेदु जयांचे मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ ।
जयां नव्हाळियेचे फळ । स्वर्गसुख

4.159

ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती ।
जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं

4.160

देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन ।
जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं

4.161

जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी ।
जें भुकेलिया धणी । साधनाची

4.162

जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली ।
जेणें इंद्रिये विसरलीं । इंद्रियसंगु

4.163

मनाचे मनपण गेलें । जेथ बोलाचे बोलपण ठेलें ।
जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसें

4.164

जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे ।
जेथ न पाहता सहज भेटे । आपणपें

4.165

तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें ।
तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं

4.166

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।
तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी

4.167

तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें ।
आणि अगर्वता करावें । दास्य सकळ

4.168

मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें ।
जेणे अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये

4.169

जयाचेनि वाक्यौजिवडें । जाहलें चित्त निधडें ।
ब्रह्माचेनि पाडे । निःशंकु होय

4.170

ते वेळीं आपणपेया सहितें । इये अशेषेंही भूतें ।
माझां स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं

4.171

ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारू जाईल ।
जैं गुरुकृपा होईल । पार्था गा

4.172

जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु ।
व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी

4.173

तर्ही ज्ञानशक्तीचेनि पाडें । हें आघवेंची गा थोकडें ।
ऐसे सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानी इये

4.174

देखें विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कवडसा ।
तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना

4.175

तया कायसें हें मनोमळ । हें बोलतांचि अति किडाळ ।
नाहीं येणें पाडें हे ढिसाळ । दुजें जगीं

4.176

सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली ।
तिये प्रळयींचे वाहुटळी । काय अभ्र पुरे

4.177

कीं पवनाचेनि कोंपें । पाणियेंचि जो पळिपें ।
तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठे काइ

4.178

म्हणोनि असे हें न घडे । तें विचारितांचि असंगडे ।
पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे

4.179

एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें के आहे ।
जैसें चैतन्य कां नोहे । दुसरे गा

4.180

या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे ।
कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें

4.181

ना तरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे ।
तरी उपमा ज्ञानी घडे । पंडुकुमरा

4.182

म्हणूनी बहुतीं परीं पाहतां । पुढतपुढती निर्धारिता ।
हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि

4.183

जरी अमृताचि चवी निवडिजे । तरी अमृतासारखी म्हणिजे ।
तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेसींचि

4.184

आतां यावरि जे बोलणे । ते वायां वेळु फेडणें ।
तंव सांचचि जी हे पार्थु म्हणे । जें बोलत असां

4.185

परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें
तंव तें मनोगत देवें । जाणितलें

4.186

मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देयीं गोठी ।
सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज

4.187

तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां ।
जयां ठायीं इंद्रियां । मानु नाही

4.188

जो मनाचि चाड न सांगे । जो प्रकृतीचे केलें नेघे ।
जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला

4.189

तयातेंचि गिंवसित । हेंहें ज्ञान पांवे निश्चित ।
जयामाजि अचुंबित । शांति असे

4.190

तें हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।
मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा

4.191

मग जेऊति वास पाहिजे । तेऊति शांतीचि देखिजे ।
तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारितां

4.192

ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु ।
सांगता असे अपारु । परि असो आतां

4.193

अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥
ऐकें जया प्राणियाचां ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं ।
तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग

4.194

शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह ।
तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना

4.195

अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे ।
तरी तेथ जिव्हाळा कांही आहे । प्राप्तीचा पैं

4.196

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसीं ।
तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण

4.197

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे ।
तैं मरण आले आलें असे फुडें । जाणों ये कीं

4.198

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे ।
तो संशये अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं

4.199

मग संशयी जरी पडला । तरी निभ्रांत जरी नासला ।
ति ऐहिकपरत्रा मुकला । सुखासी गा

4.200

जया काळज्वरु आंगी बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे ।
आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी

4.201

तैसे साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।
संशयी तो नोळखे । हिताहित

4.202

हा रात्रिदिवसु पाहीं जैसा । जात्यंधा ठाउवा नाहीं ।
तैसे संशयीं असतां काहीं । मना न ये

4.203

म्हणऊनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियासी

4.204

येणें कारणे तुवा त्यजावा । आधी हाचि एकु जिणावा ।
जो ज्ञानाचिया अभावा- । माजी असे

4.205

जैं अज्ञानाचे गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे ।
म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्वासाचा

4.206

हृदयी हाचि न समाये । बुद्धींते गिंवसूनि ठाये ।
तेथ संशयात्मक होये । लोकत्रय

4.207

ऐसे जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे ।
जरी हाती होय बरवें । ज्ञानखड्ग

4.208

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे ।
मग निःशेष खता फिटे । मानसींचा

4.209

याकारणे पार्था । उठीं वेगीं वरौता ।
नाशु करोनि हृदयस्था । संशयासी

4.210

ऐसे सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया

4.211

तंव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा ।
कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल

4.212

ते कथेची संगति । भावाची संपत्ति ।
रसाचि उन्नति । म्हणिपेल पुढां

4.213

जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी ।
सज्जनाचिये आयणी । विसांवा जगी

4.214

तो शांतुचि अभिनवेल । ते परियेसा मऱहाठे बोल ।
जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित

4.215

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।
शब्दाची व्याप्ती तेणें पाडें । अनुभवावी

4.216

ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा ।
बोल व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावे

4.217

हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणतीं स्वभावें ।
तरी निकें चित्त द्यावें । हें विनंती माझी

4.218

जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।
जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता

4.219

आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे ।
तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा

4.220

सहजे मलयानिळु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।
आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या

4.221

तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी ।
तेवीचि कानाकरवीं । म्हणवी बापु माझा

4.222

तैसे कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें ।
मग संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें

4.223

जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि कां बांधावीं कटारें ।
रोग जाये दुधें साखरे । तरी निंब कां पियावा

4.224

तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी

4.225

म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका ।
ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तीदासु

मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0

Esc