भाषा

ENहिગુ
ग्रंथ पाठ

ज्ञानेश्वरी · अध्याय 3

3.1

तत् किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव

3.2

तेथ कर्म आणि कर्ता । उरेचिना पाहतां ।
ऐसें मत तुझें अनंता । निश्चित जरी

3.3

तरी मातें केवी हरी । म्हणसी पार्था संग्रामु करीं ।
इये लाजसीना महाघोरीं । कर्मीं सुता

3.4

हां गा कर्म तूंचि अशेष । निराकारासी निःशेष ।
तरी मजकरवीं हें हिंसक । कां करविसी तूं

3.5

तरीं हेंचि विचारीं हृषीकेशा । तूं मानु देसी कर्मलेशा ।
आणि येसणी हे हिंसा । करवित अहासी

3.6

देवा तुवांचि ऐसें बोलावें । तरी आम्हीं नेणतीं काय करावें ।
आता संपले म्हणे पां आघवें । विवेकाचे

3.7

हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अपभ्रंशु तो कैसा ।
आतां पुरला आम्हां धिंवसा । आत्मबोधाचा

3.8

वैद्यु पथ्य वारूनि जाये । मग जरी आपणचि विष सुये ।
तरी रोगिया कैसेनि जिये । सांगे मज

3.9

जैसे आंधळे सुईजे आव्हांटा । कां माजवण दीजे मर्कटा ।
तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आम्हां

3.10

मी आधींचि कांही नेणें । वरी कवळिलों मोहें येणें ।
कृष्णा विवेकु या कारणें । पुसिला तुज

3.11

तंव तुझी एकेकी नवाई । एथ उपदेशामाजीं गांवाई ।
तरी अनुसरलिया काई । ऐसें कीजे

3.12

आम्हीं तनुमनुजीवें । तुझिया बोला वोटंगावें ।
आणि तुवांचि ऐसें करावें । तरी सरलें म्हणे

3.13

आतां ऐसियापरी बोधिसी । तरी निकें आम्हां करिसी ।
एथ ज्ञानाची आस कायसी । अर्जुन म्हणे

3.14

तरी ये जाणिवेचे कीर सरलें । परी आणिक एक असें जाहलें ।
जें थितें हें डहुळलें । मानस माझें

3.15

तेवींचि कृष्णा हें तुझें । चरित्र कांहीं नेणिजे ।
जरी चित्त पाहसी माझें । येणे मिषें

3.16

ना तरी झकवितु आहासी मातें । की तत्वचि कथिलें ध्वनितें ।
हे अवगमतां निरुतें । जाणवेना

3.17

म्हणोनि आइकें देवा । हा भावार्थु आतां न बोलावा ।
मज विवेकु सांगावा । मर्‍हाटा जी

3.18

मी अत्यंत जड असें । परी ऐसाही निकें परियसें ।
कृष्णा बोलावें तुवां तैसें । एकनिष्ठ

3.19

देखें रोगातें जिणावें । औषध तरी द्यावें ।
परी तें अतिरुच्य व्हावें । मधुर जैसें

3.20

तैसें सकळार्थभरित । तत्व सांगावे उचित ।
परी बोधे माझें चित्त । जयापरी

3.21

देवा तुज ऐसा निजगुरु । आणि आर्तीधणी कां न करूं ।
एथ भीड कवणाची धरूं । तूं माय आमुची

3.22

हां गा कामधेनूचें दुभतें । देवें जाहलें जरी आपैतें ।
तरी कामनेची कां तेथें । वानी कीजे

3.23

जरी चिंतामणि हातां चढे । तरी वांछेचे कवण सांकडे ।
कां आपुलेनि सुरवाडें । इच्छावें ना

3.24

देखें अमृतसिंधूतें ठाकावें । मग तहाना जरी फुटावें ।
मग सायासु कां करावे । मागील ते

3.25

तैसा जन्मांतरी बहुतीं । उपासिता लक्ष्मीपती ।
तूं दैवें आजि हातीं । जाहलासी जरी

3.26

तरी आपुलेया सवेसा । कां न मगावासी परेशा ।
देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे

3.27

देखें सकळार्तीचें जियालें । आजि पुण्य यशासि आलें ।
हे मनोरथ जहाले । विजयी माझे

3.28

जी जी परममंगळधामा । देवदेवोत्तमा ।
तूं स्वाधीन आजि आम्हां । म्हणऊनियां

3.29

जैसां मातेचां ठायीं । अपत्या अनवसरु नाहीं ।
स्तन्यालागूनि पाहीं । जियापरी

3.30

तैसें देवा तूंते । पुसिजतसें आवडे तें ।
आपुलेनि आर्तें । कृपानिधि

3.31

तरी पारत्रिकीं हित । आणि आचरितां तरी उचित ।
ते सांगें एक निश्चित । पार्थु म्हणे

3.32

या बोला अच्युतु । म्हणतसे विस्मितु ।
अर्जुना हा ध्वनितु । अभिप्रावो

3.33

जे बुद्धियोगु सांगतां । सांख्यमतसंस्था ।
प्रकटिली स्वभावता । प्रसंगे आम्हीं

3.34

तो उद्देशु तूं नेणसी । म्हणोनि क्षोभलासि वायांचि ।
तरी आता जाण म्यांचि । उक्त दोन्ही

3.35

अवधारीं वीरश्रेष्ठा । यें लोकीं या दोन्ही निष्ठा ।
मजचिपासूनि प्रगटा । अनादिसिद्धा

3.36

एकु ज्ञानयोगु म्हणिजे । जो सांख्यीं अनुष्ठीजे ।
जेथ ओळखीसवें पाविजे । तद्रूपता

3.37

एक कर्मयोगु जाण । जेथ साधकजन निपुण ।
होवूनिया निर्वाण । पावती वेळे

3.38

हे मार्गु तरी दोनी । परि एकवटती निदानीं ।
जैसे सिद्धसाध्यभोजनीं । तृप्ति एकी

3.39

कां पूर्वापर सरिता । भिन्ना दिसती पाहतां ।
मग सिंधूमिळणीं ऐक्यता । पावती शेखीं

3.40

तैसीं दोनी ये मतें । सूचिती एका कारणातें ।
परी उपास्ति ते योग्यते - । आधीन असे

3.41

देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा ।
सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां

3.42

तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे ।
मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी

3.43

तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें ।
सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती

3.44

येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें ।
पूर्णता अवसरें । पावतें होती

3.45

वांचोनि कर्मारंभ उचित । न करितांचि सिद्धवत ।
कर्महीना निश्चित । होईजेना

3.46

कां प्राप्तकर्म सांडिजे । येतुलेनि नैष्कर्म्या होईजे ।
हें अर्जुना वायां बोलिजे । मूर्खपणें

3.47

सांगें पैलतीरा जावें । ऐसें व्यसन कां जेथ पावे ।
तेथ नावेतें त्यजावें । घडे केवीं

3.48

ना तरी तृप्ति इच्छिजे । तरी कैसेनि पाकु न कीजे ।
कीं सिद्धुही न सेविजे । केवीं सांगें

3.49

जंव निरार्तता नाहीं । तंव व्यापारु असे पाहीं ।
मग संतुष्टीचां ठायीं । कुंठे सहजें

3.50

म्हणोनि आइकें पार्था । जया नैष्कर्म्यपदीं आस्था ।
तया उचित कर्म सर्वथा । त्याज्य नोहे

3.51

आणि आपुलालिया चाडे । आपादिले हे मांडे ।
कीं त्यजिलें हें कर्म सांडे । ऐसें आहे

3.52

हें वायाचि सैरा बोलिजे । उकलु तरी देखों पाहिजे ।
परी त्यजितां कर्म न त्यजे । निभ्रांत मानी

3.53

जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान ।
जि चेष्टा गुणाधीन । आपैसी असे

3.54

देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें ।
तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे

3.55

सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रीचे तेज गेलें ।
हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे

3.56

ना तरी प्राणापानगति । की निर्विकल्प जाहली मति ।
की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया

3.57

हे स्वप्नावबोधु ठेले । कीं चरण चालो विसरले ।
हे असो काय निमाले । जन्ममृत्यू

3.58

हें न ठकेचि जरी कांही । तरी सांडिले तें कायी ।
म्हणोनि कर्मत्यागु नाही । प्रकृतिमंतां

3.59

कर्म पराधीनपणे । निपजतसे प्रकृतिगुणें ।
येरीं धरीं मोकलीं अंतःकरणें । वाहिजे वायां

3.60

देखें रथीं आरूढिजे । मग निश्चळा बैसिजे ।
मग चळा होऊनि हिंडिजे । परतंत्रा

3.61

कां उचलिलें वायुवशें । चळें शुष्क पत्र जैसें ।
निचेष्ट आकाशे । परिभ्रमे

3.62

तैसें प्रकृतिआधारें । कर्मेंद्रियविकारें ।
मिष्कर्म्युही व्यापारे । निरंतर

3.63

म्हणऊनि संगु जंव प्रकृतिचा । तंव त्यागु न घडे कर्माचा ।
ऐसियाहि करूं म्हणती तयांचा । आग्रहोचि उरें

3.64

जे उचित कर्म सांडिती । मग नैष्कर्म्य होऊं पाहती ।
परी कर्मेंद्रियप्रवृत्ती । निरोधूनि

3.65

तयां कर्मत्यागु न घडे । जें कर्तव्य मनीं सापडे ।
वरी नटती तें फुडे । दरिद्र जाण

3.66

ऐसे ते पार्था । विषयासक्त सर्वथा ।
वोळखावे तत्वता । येथ भ्रांति नाहीं

3.67

आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन ।
या नैराश्याचे चिन्ह । धनुर्धरा

3.68

जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु ।
बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा

3.69

तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचे भय न धरी ।
प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें

3.70

तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी ।
परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना

3.71

तो कामनामात्रें न घेपे । मोहमळें न लिंपे ।
जैसे जळीं जळें न शिंपें । पद्मपत्र

3.72

तैसा संसर्गामाजि असे । सकळांसारिखा दिसे ।
जैसें तोयसंगे आभासे । भानुबिंब

3.73

तैसा सामन्यत्वें पाहिजे । तरी साधारणुचि देखिजे ।
येरवीं निर्धारितां नेणिजे । सोय जयाची

3.74

ऐसां चिन्हीं चिन्हितु । देखसी तोचि तरी मुक्तु ।
आशापाशरहितु । वोळख पां

3.75

अर्जुना तोचि योगी । विशेषिजे जो जगीं ।
म्हणोनि ऐसा होय यालागीं । म्हणिपे तूंते

3.76

तूं मानसा नियमु करीं । निश्चळु होय अंतरी ।
मग कर्मेंद्रियें हीं व्यापारीं । वर्ततु सुखें

3.77

म्हणशी नैष्कर्म्य होआवें । तरी एथ तें न संभवे ।
आणि निषिद्ध केवीं राहाटावें । विचारी पां

3.78

म्हणोनि जें जें उचित । आणि अवसरेंकरून प्राप्त ।
तें कर्म हेतुरहित । आचर तूं

3.79

पार्था आणिकही एक । नेणसी तूं हे कवतिक ।
जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे

3.80

देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे ।
तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे

3.81

स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां ।
म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं

3.82

हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे ।
तैंचि बंधु पडे । संसारिकु

3.83

म्हणोनि स्वधर्मानुष्ठान । ते अखंड यज्ञयाजन ।
जो करी तया बंधन । कहींच नाहीं

3.84

हा लोकु कर्में बांधिला । जो परतंत्रा भुतला ।
तो नित्ययज्ञाते चुकला । म्हणोनियां

3.85

आतां येचिविशीं पार्था । तुज सांगेन एकी मी कथा ।
जैं सृष्ट्यादि संस्था । ब्रह्मेनि केली

3.86

तें नित्ययागसहितें । सृजिलीं भूतें समस्तें ।
परी नेणतीचि तिये यज्ञातें । सूक्ष्म म्हणऊनी

3.87

तें वेळीं प्रजीं विनविला ब्रह्मा । देवा आश्रयो काय एथ आम्हां ।
तंव म्हणे तो कमळजन्मा । भूतांप्रति

3.88

तुम्हां वर्णविशेषवशें । आम्हीं हा स्वधर्मुचि विहिला असे ।
यातें उपासा मग आपैसे । काम पुरती

3.89

तुम्हीं व्रतें नियमु न करावे । शरीरातें न पीडावें ।
दुरी केंही न वचावे । तीर्थासी गा

3.90

योगादिक साधनें । साकांक्ष आराधनें ।
मंत्रयंत्रविधानें । झणीं करा

3.91

देवतांतरा न भजावें । हें सर्वथा कांहीं न करावे ।
तुम्हीं स्वधर्मयज्ञीं यजावें । अनायासें

3.92

अहेतुकें चित्तें । अनुष्ठां पां ययातें ।
पतिव्रता पतीतें । जियापरी

3.93

तैसा स्वधर्मरूप मखु । हाचि सेव्य तुम्हां एकु ।
ऐसें सत्यलोकनायकु । म्हणता जहाला

3.94

देखा स्वधर्मातें भजाल । तरी कामधेनु हा होईल ।
मग प्रजाहो न संडील । तुमतें सदा

3.95

जें येणेचिकरूनि समस्तां । परितोषु होईल देवतां ।
मग ते तुम्हां ईप्सीता । अर्थांते देती

3.96

या स्वधर्मपूजा पूजितां । देवतागणां समस्तां ।
योगक्षेमु निश्चिता । करिती तुमचा

3.97

तुम्हीं देवतांते भजाल । देव तुम्हां तुष्टितील ।
ऐसी परस्परें घडेल । प्रीति तेथ

3.98

तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । ते आपैसे सिद्धी जाईल ।
वांछितही पुरेल । मानसींचे

3.99

वाचासिद्धी पावाल । आज्ञापक होआल ।
म्हणिये तुमतें मागतील । महाऋद्धि

3.100

जैसें ऋतुपतींचे द्वार । वनश्री निरंतर ।
वोळगे फळभार । लावण्येंसी

3.101

तैसें सर्व सुखेंसहित । दैवचि मूर्तिमंत ।
येईल देखा काढत । तुम्हापांठी

3.102

ऐसे समस्त भोगभरित । होआल तुम्ही अनार्त ।
जरी स्वधर्मैकनिरत । वर्ताल बापा

3.103

कां जालिया सकल संपदा । जो अनुसरेल इंद्रियमदा ।
लुब्ध होऊनियां स्वादां । विषयांचिया

3.104

तिहीं यज्ञभाविकीं सुरीं । जे हे संपत्ति दिधली पुरी ।
तयां स्वमार्गीं सर्वेश्वरीं । न भजेल तो

3.105

अग्निमुखीं हवन । न करील देवतापूजन ।
प्राप्त वेळे भोजन । ब्राह्मणांचे

3.106

विमुखु होईल गुरुभक्ती । आदरु न करील अतिथी ।
संतोषु नेदील ज्ञाती । आपुलिये

3.107

ऐसा स्वधर्मक्रियारहितु । आथिलेपणे प्रमत्तु ।
केवळ भोगासक्तु । होईल जो

3.108

तया मग अपावो थोरु आहे । जेणें तें हातीचे सकळ जाये ।
देखा प्राप्तही न लाहे । भोग भोगूं

3.109

जैसें गतायुषीं शरीरीं । चैतन्य वासु न करी ।
कां निदैवाचां घरीं । न राहे लक्ष्मी

3.110

तैसा स्वधर्मु जरी लोपला । तरी सर्व सुखांचा थारा मोडला।
जैसा दीपासवे हरपला । प्रकाशु जाय

3.111

तैसी निजवृत्ति जेथ सांडे । तेथ स्वतंत्रते वस्ती न घडे ।
आइका प्रजाहो हे फुडें । विरंचि म्हणे

3.112

म्हणऊनि स्वधर्मु जो सांडील । तयातें काळु दंडील ।
चोरु म्हणूनि हरील । सर्वस्व तयांचे

3.113

मग सकळ दोष भंवते । गिंवसोनि घेती तयातें ।
रात्रिसमयीं स्मशानातें । भूतें जैशी

3.114

तैशी त्रिभुवनींची दुःखे । आणि नानाविध पातकें ।
दैन्यजात तितुकें । तेथेंचि वसे

3.115

ऐसें होय तया उन्मत्ता । मग न सुटे बापां रुदतां ।
परी कल्पांतीहीं सर्वथा । प्राणिगण हो

3.116

म्हणोनि निजवृत्ति हे न संडावी । इंद्रिये बरळों नेदावीं ।
ऐसें प्रजांते शिकवी । चतुराननु

3.117

जैसें जळचरां जळ सांडे । आणि तत्क्षणीं मरण मांडे ।
हा स्वधर्मु तेणें पाडें । विसंबों नये

3.118

म्हणोनि तुम्ही समस्तीं । आपुलालिया कर्मीं उचितीं ।
निरत व्हावें पुढतपुढती । म्हणिपत असे

3.119

देखा विहित क्रियविधी । निर्हेतुका बुद्धी ।
जो असतिये समृद्धी । विनियोगु करी

3.120

गुरु गोत्र अग्नि पूजी । अवसरीं भजे द्विजीं ।
निमितादिकीं यजी । पितरोद्देश

3.121

या यज्ञक्रिया उचिता । यज्ञेशीं हवन करितां ।
हुतशेष स्वभावतः । उरे जें जें

3.122

तें सुखे आपुलां घरीं । कुटुंबेसीं भोजन करी ।
कीं भोग्यचि तें निवारी । कल्मषातें

3.123

तें यज्ञावशिष्ट भोगी । म्हणोनि सांडिजे तो अधीं ।
जयापरी महारोगीं । अमृतसिद्धी

3.124

कां तत्वनिष्ठु जैसा । नागवे भ्रांतिलेशा ।
तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा

3.125

म्हणोनि स्वधर्में जें अर्जें । तें स्वधर्मेचि विनियोगिजे ।
मग उरे तें भोगिजे । संतोषेंसीं

3.126

हें वांचूनि पार्था । राहाटों नये अन्यथा ।
ऐसी आद्य ही कथा । मुरारी सांगे

3.127

जें देहचि आपणपें मानिति । आणि विषयांते भोग्य म्हणती ।
यापरतें न स्मरती । आणिक कांही

3.128

हे यज्ञोपकरण सकळ । नेणसांते बरळ ।
अहंबुद्धी केवळ । भोगूं पाहती

3.129

इंद्रियरुचीसारखे । करविती पाक निके ।
ते पापिये पातकें । सेविती जाण

3.130

जे संपत्तिजात आघवें । हे हवनद्रव्य मानावें ।
मग स्वधर्मयज्ञें अर्पावें । आदिपुरुषी

3.131

हें सांडोनिया मूर्ख । आपणपेयांलागीं देख ।
निपजविती पाक । नानाविध

3.132

जिहीं यज्ञु सिद्धी जाये । परेशा तोषु होये ।
तें हें सामान्य अन्न न होये । म्हणोनियां

3.133

हें न म्हणावें साधारण । अन्न ब्रह्मरूप जाण ।
जे जीवनहेतु कारण । विश्वा यया

3.134

अन्नस्तव भूतें । प्ररोह पावति समस्तें ।
मग वरिषु या अन्नाते । सर्वत्र प्रसवे

3.135

त्या पर्जन्या यज्ञीं जन्म । यज्ञाते प्रगटी कर्म ।
कर्मासि आदि ब्रह्म । वेदरूप

3.136

मग वेदांते परापर । प्रसवतसे अक्षर ।
म्हणऊनि हे चराचर । ब्रह्मबद्ध

3.137

परी कर्माचिये मूर्ति । यज्ञीं अधिवासु श्रुती ।
ऐकें सुभद्रापती । अखंड गा

3.138

ऐशीं आदि हे परंपरा । संक्षेपे तुज धनुर्धरा ।
सांगितली या अध्वरा । लागौनियां

3.139

म्हणून समूळ हा उचितु । स्वधर्मरूप क्रतु ।
नानुष्ठी जो मत्तु । लोकीं इये

3.140

तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥
जो कुकर्में इंद्रियांसी । उपेगा गेला

3.141

तें जन्म कर्म सकळ । अर्जुना अति निष्फळ ।
जैसे कां अभ्रपटळ । अकाळींचे

3.142

कां गळा स्तन अजेचे । तैसें जियालें देखें तयाचें ।
जया अनुष्ठान स्वधर्माचें । घडेचिना

3.143

म्हणोनि ऐकें पांडवा । हा स्वधर्मु कवणे न संडावा ।
सर्वभावें भजावा । हाचि एकु

3.144

हां गा शरीर जरी जाहलें । तरी कर्तव्य वोघें आले ।
मग उचित कां आपुले । वोसंडावे

3.145

परिस पां सव्यसाची । मूर्ती लाहोनि देहाचि ।
खंती करिती कर्माची । ते गावंढे गा

3.146

देखें असतेनि देहकर्में । एथ तोचि एकु न लिंपे कर्में ।
जो अखंडित रमे । आपणपांचि

3.147

जे तो आत्मबोधें तोषला । तरी कृतकार्यु देखें जाहला ।
म्हणोनि सहजे सांडवला । कर्मसंगु

3.148

तृप्ती झालिया जैसीं । साधने सरती आपैसीं ।
देखें आत्मतुष्टीं तैसीं । कर्मे नाही

3.150

म्हणऊनि तूं नियतु । सकळ कामरहितु ।
होऊनियां उचितु । स्वधर्में रहाटें

3.151

जे स्वकर्मे निष्कामता । अनुसरले पार्था ।
कैवल्य पर तत्वतां । पातले जगी

3.152

देखें पां जनकादिक । कर्मजात अशेख ।
न सांडिता मोक्षसुख । पावते जाहले

3.153

याकारणे पार्था । होआवी कर्मीं आस्था ।
हे आणिकाही एका अर्था । उपकारेल

3.155

जे आचरता आपणपेयां । देखी लागेल लोका यया ।
तरी चुकेल हा अपाया । प्रसंगेचि । १५४ ॥
देखें प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले ।
तयाही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं

3.156

मार्गीं अंधासरिसा । पुढे देखणाही चाले जैसा ।
अज्ञाना प्रकटावा धर्मु तैसा । आचरोनि

3.157

हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय वोजे ।
तिहीं कवणेपरी जाणिजे । मार्गांते या

3.158

एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती ।
तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ

3.159

हें ऐसें असे स्वभावें । म्हणोनि कर्म न संडावे ।
विशेषें आचरावें । लागे संती

3.160

आता आणिकाचिया गोठी । तुज सांगो काय किरीटी ।
देखें मीचि इये राहाटी । वर्तत असे

3.161

काय सांकडे कांही मातें । कीं कवणें एकें आर्तें ।
आचरें मी धर्मातें । म्हणसी जरी

3.162

तरी पुरतेपणालागी । आणिकु दुसरा नाहीं जगीं ।
ऐसी सामुग्री माझां अंगी । जाणसी तूं

3.163

मृत गुरूपुत्र आणिला । तो तुवां पवाडा देखिला ।
तोही मी उगला । कर्मीं वर्ते

3.164

परी स्वधर्मीं वर्तें कैसा । साकांक्षु कां होय जैसा ।
तयाचि एका उद्देशा - । लागोनियां

3.165

जे भूतजात सकळ । असे आम्हांचि आधीन केवळ ।
ते न व्हावें बरळ । म्हणोनियां

3.166

आम्ही पूर्णकाम होऊनी । जरी आत्मस्थिती राहुनी ॥
तरी हे प्रजा कैसेनि । निस्तरेल

3.167

इहीं आमुची वास पाहावी । मग वर्तती परी जाणावी ।
ते लौकिक स्थिती अवघी । नासिली होईल

3.168

म्हणोनि समर्थु जो एथें । आथिला सर्वज्ञते ।
तेणे सविशेषें कर्मातें । त्यजावे ना

3.169

देखे फळाचिया आशा । आचरे कामुकु जैसा ।
कर्मी बहरु होआवा तैसा । निराशाही

3.170

जे पुढतपुढती पार्था । हे सकळ लोकसंस्था ।
रक्षणीय सर्वथा । म्हणऊनियां

3.171

मार्गाधारे वर्तावें । विश्व हें मोहरें लावावें ।
अलौकिक नोहावें । लोकांप्रति

3.172

जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी ।
म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा

3.173

तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता ।
न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी

3.174

तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी ।
नैष्कर्मींही दावावी । आचरोनि

3.175

तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगी ।
तो कर्मबंधु आंगी । वाजेलना

3.176

जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाही मनीं ।
परी लोकसंपादणी । तैशीच करिती

3.177

देखें पुढिलाचें वोझें । जरी आपुला माथां घेईजे ।
तरी सांगे कां न दाटिजे । धनुर्धरा

3.178

तैसी शुभाशुभें कर्में । जिये निफजति प्रकृतिधर्में ।
तियें मूर्ख मतिभ्रमें । मी कर्ता म्हणे

3.179

ऐसा अहंकाराधिरूढ । एकदेशी मूढ ।
तया हा परमार्थ गूढ । प्रगटावा ना

3.180

हें असो प्रस्तुत । सांगिजेल तुज हित ।
तें अर्जुना देऊनि चित्त । अवधारी पां

3.181

जे तत्वज्ञियांचां ठायीं । तो प्रकृतिभावो नाहीं ।
जेथ कर्मजात पाहीं । निपजत असे

3.182

ते देहाभिमानु सांडुनी । गुणकर्में वोलांडुनी ।
साक्षिभूत होऊनी । वर्तती देहीं

3.183

म्हणूनि शरीरी जरी होती । तरी कर्मबंधा नाकळती ।
जैसा कां भूतचेष्टा गभस्ती । घेपवेना

3.184

एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे ।
प्रकृतिचेनि आटोपें । वर्ततु असे

3.185

इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें ।
तें परकर्म बलात्कारें । आपादी जो

3.186

परी उचिते कर्में आघवीं । तुवा आचरोनि मज अर्पावीं ।
परी चित्तवृत्ती न्यासावी । आत्मरूपीं

3.187

हें कर्म मी कर्ता । कां आचरेन या अर्था ।
ऐसा अभिमानु झणें चित्ता । रिगो देसी

3.188

तुवां शरीरपरा नोहावें । कामनाजात सांडावें ।
मग अवसरोचित भोगावे । भोग सकळ

3.189

आतां कोदंड घेऊनि हातीं । आरूढ पां इये रथीं ।
देईं आलिंगन वीरवृत्ती । समाधानें

3.190

जगीं कीर्ती रूढवीं स्वधर्माचा मानु वाढवीं ।
मग भारापासोनि सोडवी । मेदिनी हे

3.191

आतां पार्था निःशंकु होई । या संग्रामा चित्त देईं ।
एथ हें वांचूनि कांही । बोलों नये

3.192

हें अनुपरोध मत माझें । जिहीं परमादरे स्वीकारिजे ।
श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे । धनुर्धरा

3.193

तेही सकळ कर्मी वर्ततु । जाण पां कर्मरहितु ।
म्हणोनि हें निश्चितु । करणीय गा

3.194

नातरी प्रकृतिमंतु होऊनी । इंद्रियां लळा देऊनी ।
जे हें माझे मत अव्हेरुनी । ओसंडिती

3.195

जे सामान्यत्वें लेखिती । अवज्ञा करूनि देखिती ।
कां हा अर्थवादु म्हणती । वाचाळपणें

3.196

ते मोहमदिरा भ्रमले । विषयविखें घारले ।
अज्ञानपंकी बुडाले । निभ्रांत मानीं

3.197

देखें शवाचां हातीं दिधलें । जैसे कां रत्न वायां गेलें ।
नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे

3.198

कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।
मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना

3.199

तैसे ते पार्था । जे विमुख या परमार्था ।
तयांसी संभाषण सर्वथा । करावे ना

3.200

म्हणोनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती ।
सांगे पतंग काय साहती । प्रकाशातें

3.201

पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचूक मरण ।
तेवीं विषयाचरण । आत्मघाता

3.202

म्हणोनि इंद्रिये एकें । जाणतेनि पुरुखें ।
लाळावीं ना कौतुकें । आदिकरूनि

3.203

हां गा सर्पेंसी खेळों येईल । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल ।
सांगे हाळाहाळ जिरेल । सेविलिया

3.204

देखें खेळतां अग्नि लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ।
तैसा इंद्रिया लळा दिधला । भला नोहे

3.205

एर्‍हवीं तरी अर्जुना । या शरीरा पराधीना ।
कां नाना भोगरचना । मेळवावी

3.206

आपण सायासेंकरूनि बहुतें । सकळहि समृद्धिजातें ।
उदोअस्तु या देहातें । प्रतिपाळावे कां

3.207

सर्वस्वें शिणोनि एथें । अर्जवावीं संपत्तिजातें ।
तेणें स्वधर्मु सांडुनी देहातें । पोखावें काई

3.208

मग हें तंव पांचमेळावा । शेखीं अनुसरेल पंचत्वा ।
ते वेळीं केला कें गिंवसावा । शीणु आपुला

3.209

म्हणूनि केवळ देहभरण । ते जाणें उघडी नागवण ।
यालागी एथ अंतःकरण । देयावें ना

3.210

एर्‍हवीं इंद्रियाचियां अर्था - । सारिखा विषयो पोखितां ।
संतोषु कीर चित्ता । आपजेल

3.211

परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक स्वस्थु ।
जंव नगराचा प्रांतु । सांडिजेना

3.212

बापा विषाची मधुरता । झणे आवडी उपजे चित्ता ।
परी तो परिणाम विचारितां । प्राणु हरी

3.213

देखें इंद्रियीं कामु असे । तो लावी सुखदुराशे ।
जैसा गळीं मीनु आमिषें । भुलविजे गा

3.214

परी तयामाजि गळु आहे । जो प्राणातें घेऊनि जाये ।
तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपणें

3.215

तैसें अभिलाषें येणें कीजेल । जरी विषयाची आशा कीजेल ।
तरी वरपडा होईजेल । क्रोधानळा

3.216

जैसा कवळोनियां पारधी । घातेचिये संधी ।
आणि मृगातें बुद्धीं । साधावया

3.217

एथ तैसीची परी आहे । म्हणूनि संगु हा तुज नोहे ।
पार्था दोन्ही कामक्रोध हे । घातुक जाणें

3.218

म्हणऊनि हा आश्रयोचि न करावा । मनींही आठवो न धरावा ।
एकु निजवृत्तीचा वोलावा । नासों नेदीं

3.219

अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला ।
तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें

3.220

येरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा ।
परि आचरतेनि आचरावा । आपुलाचि

3.221

सांगे शूद्रघरीं आघवीं । पक्वाने आहाति बरवीं ।
तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला

3.222

हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे ।
अथवा इच्छिलेंही पाविजे । विचारीं पां

3.223

तरी लोकांचीं धवळारें । देखोनियां मनोहरें ।
असतीं आपुलीं तणारें । मोडावीं केवीं

3.224

हें असो वनिता आपुली । कुरुप जरी जाहली ।
तरी भोगितां तेचि भली । जियापरी

3.225

तेवीं आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु ।
तरी स्वधर्मचि सुरवाडु । पारत्रिकीचा

3.226

हां गा साकर आणि दूध । हें गौल्य कीर प्रसिद्ध ।
परी कृमीदोषीं विरुद्ध । घेपें केवीं

3.227

ऐसेनिही जरी सेविजेल । तरी ते आळुकीची उरेल ।
जे तें परिणामीं पथ्य नव्हेल । धनुर्धरा

3.228

म्हणोनि आणिकांसी जे विहीत । आणि आपणपेयां अनुचित ।
तें नाचरावे जरी हित । विचारिजे

3.229

या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता ।
तोहि निका वर उभयतां । दिसतसे

3.230

ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङगपाणी ।
तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा

3.231

हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें ।
परि पुसेन कांही आपुले । अपेक्षित

3.232

तरी देवा हें ऐसें कैसें । जे ज्ञानियांचीही स्थितीही भ्रंशे ।
मार्ग सांडुनि अनारिसे । चालत देखों

3.233

सर्वज्ञुही जे होती । हे उपायही जाणती ।
तेही परधर्में व्यभिचरति । कवणें गुणें

3.234

बीजा आणि भुसा । अंधु निवाडु नेणे जैसा ।
नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां

3.235

जे असता संगु सांडिती । तेचि संसर्गु करिता न धाती ।
वनवासीही सेविती । जनपदातें

3.236

आपण तरी लपती । सर्वस्वें पाप चुकविती ।
परी बलात्कारे सुइजती । तयाचिमाजी

3.237

जयांची जीवें घेती विवसी । तेचि जडोनि ठाके जीवेंसीं ।
चुकविती ते गिंवसी । तयातेंचि

3.238

ऐस बलात्कारु एकु दिसे । तो कवणाचा एथ आग्रहो असे ।
हें बोलावे हृषिकेशें । पार्थु म्हणे

3.239

तंव हृदयकमळारामु । जो योगियांचा निष्कामकामु ।
तो म्हणतसे पुरुषोत्तमु । सांगेन आइक

3.240

तरी हे कम क्रोधु पाहीं । जयांते कृपेची साठवण नाहीं ।
हें कृतांताचां ठायीं । मानिजती

3.241

हे ज्ञाननिधीचे भुजंग । विषयदरांचे वाघ ।
भजनमार्गीचे मांग । मारक जे

3.242

हे देहदुर्गीचे धोंड । इंद्रियग्रामीचे कोंड ।
यांचे व्यामोहादिक बंड । जगामाजि

3.243

हे रजोगुण मानसाचे । समूळ आसुरियेचे ।
धायपण ययांचे । अविद्या केले

3.244

हे रजाचे कीर जाहले । परी तमासी पढियंते भले ।
तेणें निजपद यां दिधले । प्रमादमोह

3.245

हे मृत्यूचां नगरीं । मानिजति निकियापरी ।
जे जीविताचे वैरी । म्हणऊनियां

3.246

जयांसि भुकेलियां आमिषा । हें विश्व न पुरेचि घांसा ।
कुळवाडी यांची आशा । चाळित असे

3.247

कौतुकें कवळितां मुठीं । जिये चौदा भुवनें थेंकुटीं ।
तें भ्रांति तिये धाकुटी । वाल्हीदुल्ही

3.248

जे लोकत्रयाचें भातुके । खेळताचि खाय कवतिकें ।
तिच्या दासीपणाचेनि बिकें । तृष्णा जिये

3.249

हें असो मोहे मानिजे । यांते अहंकार घेपे दीजे ।
जेणे जग आपुलेनि भोजें । नाचवित असे

3.250

जेणें सत्याचा भोकसा काढिला । मग अकृत्य तृणकुटा भरिला ।
तो दंभु रूढविला । जगीं इहीं

3.251

साध्वी शांती नागवली । मग माया मांगी शृंगारिली ।
तियेकरवी विटाळविली । साधुवृंदे

3.252

इहीं विवेकाची त्राय फेडिली । वैराग्याची खाली काढिली ।
जितया मान मोडिली । उपशमाची

3.253

इहीं संतोषवन खांडिले । धैर्यदुर्ग पाडिले ।
आनंदरोप सांडिले । उपडूनियां

3.254

इहीं बोधाची रोपे लुंचिली । सुखाची लिपी पुसली ।
जिव्हारीं आगी सूदली । तापत्रयाची

3.255

हे आंगा तव घडले । जीवींचि आथी जडले ।
परी नातुडती गिंवसले । ब्रह्मादिकां

3.256

हें चैतन्याचे शेजारी । वसती ज्ञानाचां एका हारीं ।
म्हणोनि प्रवर्तले महामारी । सांवरती ना

3.257

हें जळेंवीण बुडविती । आगीविण जाळिती ।
न बोलता कवळिती । प्राणियांते

3.258

हे शस्त्रेविण साधिती । दोरेविण बांधिती ।
ज्ञानियासी तरी वधिती । पैज घेऊनि

3.259

चिखलेंवीण रोविती । पाशिकेंवीण गोंविती ।
हे कवणाजोगे न होती । आंतौटेपणें

3.260

जैसी चंदनाची मुळी । गिंवसोनी घेपे व्याळीं ।
ना तरी उल्बाची खोळी । गर्भस्थासी

3.261

कां प्रभावीण भानु । धूमेंवीण हुताशनु ।
जैसा दर्पण मळहीनु । कहींच नसे

3.262

तैसें इहीविण एकलें । आम्हीं ज्ञान नाही देखिलें ।
जैसें कोंडेनि पां गुंतलें । बीज निपजे

3.263

तैसें ज्ञान तरी शुद्ध । परी इहीं असे प्ररुद्ध ।
म्हणोनि तें अगाध । होऊनि ठेलें

3.264

आधी यांते जिणावें । मग तें ज्ञान पावावें ।
तंव पराभवो न संभवे । रागद्वेषां

3.265

यांते साधावयालागी । जें बळ जाणिजे अंगी ।
तें इंधन जैसें आगी । सावावो होय

3.266

तैसे उपाय कीजती जे जे । ते यांसीचि होती विरजे ।
म्हणोनि हटियांते जिणिजे । इहींचि जगीं

3.267

ऐसियांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला ।
तो करितां जरी आंगवला । तरी सांगेन तुज

3.268

यांचा पहिला कुरुठा इंद्रियें । एथूनि प्रवृत्ति कर्मातें वियें ।
आधी निर्दळूनि घालीं तियें । सर्वथैव

3.269

मग मनाची धांव पारुषेल । आणि बुद्धीची सोडवण होईल ।
इतुकेनि थारा मोडेल । या पापियांचा

3.270

हें अंतरीहूनि जरी फिटले । तरी निभ्रांत जाण निवटले ।
जैसें रश्मीवीण उरले । मृगजळ नाही

3.271

तैसे रागद्वेष जरी निमाले । तरी ब्रह्मीचें स्वराज्य आलें ।
मग तो भोगी सुख आपुलें । आपणचि

3.272

जे गुरुशिष्यांची गोठी । पदपिंडाची गांठी ।
तेथ स्थिर राहोनि नुठीं । कवणे काळीं

3.273

ऐसें सकळ सिद्धांचा रावो । देवी लक्ष्मीयेचा नाहो ।
राया ऐक देवदेवो । बोलता जाहला

3.274

आतां पुनरपि तो अनंतु । आद्य एकी मातु ।
सांगेल तेथ पंडुसुतु । प्रश्नु करील

3.275

तया बोलाचा हन पाडु । का रसवृत्तीचा निवाडु ।
येणें श्रोतयां होईल सुरवाडु । श्रवणसुखाचा

3.276

ज्ञानदेवो म्हणे निवृत्तिचा । चांग उठावा करूनि उन्मेषाचा ।
मग संवादु श्रीहरिपार्थाचा । भोग बापा

मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0

Esc