ज्ञानेश्वरी · अध्याय 5
अर्जुन उवाचः संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि ।
यत् श्रेयं एतयोरेकें तत् मे ब्रूहि सुनिश्चितम्
मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु ।
तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती
ऐसें द्व्यर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता ।
आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे
एकें एकसारातें बोधिजे । तरी एकनिष्ठचि बोलिजे ।
हें आणिकीं काय सांगिजे । तुम्हांप्रति
तरी याचिलागीं तुमतें । म्यां राऊळासी विनविले होते ।
जे हा परमार्थु ध्वनितें । न बोलावा
परी मागील असो देवा । आतां प्रस्तुतीं उकलु देखावा ।
सांगे दोहींमाजि बरवा । मार्गु कवण
जो परिणामींचा निर्वाळा । अचुंबितु ये फळा ।
आणि अनुष्ठिता प्रांजळा । सावियाचि
जैसें निद्रेचे सुख न मोडे । आणि मार्गु तरी बहुसाल सांडे ।
तैसें सोकासनां सांगडे । सोहपें होय
येणें अर्जुनाचेनि बोले । देवो मनीं रिझले ।
मग होईल ऐकें म्हणितले । संतोषोनियां
देखा कामधेनु ऐसी माये । सदैवा जया होये ।
तो चंद्रुहि परी लाहे खेळावया
पाहें पां शंभूची प्रसन्नता । तया उपमन्यूचिया आर्ता ।
काय क्षीराब्धि दूधभाता । देईजेचिना
तैसा औदार्याचा कुरुठा । कृष्ण आपु जाहलिया सुभटा ।
कां सर्व सुखांचा वसौटा । तोचि नोहावा
एथ चमत्कारु कायसा । गोसावी लक्ष्मीकांताऐसा ।
आतां आपुलिया सवेसा । मागावा कीं
म्हणोनि अर्जुने म्हणितले । तें हांसोनि येरें दिधले ।
तेंचि सांगेन बोलिले । काय कृष्णें
तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोगु विचारितां ।
मोक्षकर तत्वता । दोनीहि होती
तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा ।
जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं
तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे ।
येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें
आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचे चिन्ह ।
मग सहजें हे अभिन्न । जाणसी तूं
तरी गेलियाचि से न करी । न पवतां चाड न धरी ।
जो सुनिश्चळु अंतरीं । मेरु जैसा
आणि मी माझें ऐसी आठवण । विसरले जयाचे अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर
जो मनें ऐसा जाहला । संगी तोचि सांडिला ।
म्हणोनि सुखें सुख पावला । अखंडित
आतां गृहादिक आघवें । तें कांहीं नलगे त्यजावें ।
जें घेतें जाहलें स्वभावें । निःसंगु म्हणऊनि
देखें अग्नि विझोनि जाये । मग जे रांखोंडी केवळु होये ।
तैं ते कापुसें गिंवसूं ये । जियापरी
तैसा असतेनि उपाधी । नाकळिजे जो कर्मबंधीं ।
जयाचीचे बुद्धी । संकल्पु नाहीं
म्हणोनि कल्पना जैं सांडे । तैंचि गा संन्यासु घडे ।
या कारणे दोनी सांगडे । संन्यासयोगु
एऱहवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा ।
ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं
सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न ।
एऱहवी दीपाप्रती काई अनान । प्रकाशु आहाती
पैं सम्यक् एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्व आघवें ।
ते दोन्हीतेंही ऐक्यभावें । मानिती गा
आणि सांख्यीं जें पाविजे । तेंचि योगीं गमिजे ।
म्हणोनि ऐक्यता दोहींते सहजें । इयापरी
देखें आकाशा आणि अवकाशा । भेदु नाहीं जैसा ।
तैसे ऐक्य योगसंन्यासा । वोळखे जो
तयासीचि जगीं पाहलें । आपणपें तेणेंचि देखिलें ।
जया सांख्ययोग जाणवले । भेदेंविण
जो युक्तिपंथें पार्था । चढे मोक्षपर्वता ।
तो महासुखाचा निमथा । वहिला पावे
येरा योगस्थिति जया सांडे । तो वायांचि गा हव्यासीं पडे ।
परि प्राप्ति कहीं न घडे । संन्यासाची
जेणें भ्रांतीपासूनि हिरतलें । गुरुवाक्यें मन धुतलें ।
मग आत्मस्वरुपीं घातलें । हारौनियां
जैसें समुद्रीं लवण न पडे । तवं वेगळे अल्प आवडे ।
मग होय सिंधूचि एवढें । मिळे तेव्हां
तैसें संकल्पोनि काढिलें । जयाचें मनचि चैतन्य जाहलें ।
तेणें एकदेशियें परि व्यापिलें । लोकत्रय
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।
आणि करी जऱही आघवें । तऱही अकर्ता तो
जे पार्था तया देहीं । मी ऐसा आठऊ नाहीं ।
तरी कर्तृत्व कैचें काई । उरे सांगे
ऐसें तनुत्यागेंवीण । अमूर्ताचे गुण ।
दिसती संपूर्ण । योगयुक्तां
एऱहवीं आणिकांचिये परी । तोही एक शरीरी ।
अशेषाही व्यापारीं । वर्ततु दिसे
तोही नेत्रीं पाहे । श्रवणीं ऐकतु आहे ।
परि तेथींचा सर्वथा नोहे । नवल देखें
स्पर्शासि तरी जाणे । परिमळु सेवी घ्राणें ।
अवसरोचित बोलणें । तयाहि आथी
आहारातें स्वीकारी । त्यजावें तें परिहरि ।
निद्रेचिया अवसरीं । निदिजे सुखें
आपुलेनि इच्छावशें । तोही गा चालतु दिसे ।
पैं सकळ कर्म ऐसें । रहाटे कीर
हें सांगों काई एकैक । देखें श्वासोच्छासादिक ।
आणि निमिषोन्निमिष । आदिकरुनि
पार्था तयाचे ठायीं । हें आघवेंचि आथि पाहीं ।
परि तो कर्ता नव्हे कांही । प्रतीतिबळें
जैं भ्रांती सेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।
मग तो ज्ञानोदयी चेइला । म्हणोनियां
आतां अधिष्ठानसंगती । अशेषाही इंद्रियवृत्ती ।
आपुलालिया अर्थीं । वर्तत आहाती
दीपाचेनि प्रकाशें । गृहींचे व्यापार जैसे ।
देहीं कर्मजात तैसे । योगयुक्ता
तो कर्में करी सकळें । परी कर्मबंधा नाकळे ।
जैसें न सिपें जळीं जळें । पद्मपत्र
देखे बुध्दीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे ।
ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा
हेंच मराठे परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी ।
योगिये कर्मे करिती तैशीं । केवळा तनू
मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें ।
तेथ मनचि राहाटें एकलें । स्वप्नीं जेवीं
नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा ।
देहा होऊं नेदी उजगरा । परि सुखदुःखें भोगी
इंद्रियांचां गांवीं नेणिजे । ऐसा व्यापारु जो निपजे ।
तो केवळु गा म्हणिजे । मानसाचा
योगिये तोही करिती । परि कर्में तेणें न बंधिजती ।
जे सांडिली आहे संगती । अंहभावाची
आतां जाहालिया भ्रमहत । जैसें पिशाचाचें चित्त ।
मग इंद्रियांचे चेष्टित । विकळु दिसे
स्वरूप तरी देखे । आळविलें आइके ।
शब्दु बोले मुखें । परि ज्ञान नाही
हें असो काजेंविण । जें जें काही कारण ।
तें केवळ कर्म जाण । इंद्रियांचे
मग सर्वत्र जें जाणतें । ते बुद्धीचें कर्म निरूतें ।
वोळख अर्जुनातें । म्हणे हरि
ते बुद्धी धुरे करुनी । कर्म करिती चित्त देऊनी ।
परि ते नैष्कम्यापासुनी । मुक्त दिसती
जें बुद्धीचिये ठावूनि देही । तयां अंहकाराची सेचि नाहीं ।
म्हणोनि कर्म करितां पाही । चोखाळले
अगा करितेनवीण कर्म । तेंचि तें नैष्कर्म्य ।
हें जाणती सुवर्म । गुरुगम्य जें
आतां शांतरसाचें भरितें । सांडीत आहे पात्रातें ।
जें बोलणें बोलापरौतें । बोलवलें
एथ इंद्रियांचा पांगु । जया फिटला आहे चांगु ।
तयासीचि आथी लागु । परिसावया
हा असो अतिप्रसंगु । न संडी पां कथालागु ।
होईल श्लोकसंगति भंगु । म्हणोनियां
जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे ।
तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज
जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे ।
तरी आणिकें काय करावें । सांगे कथा
हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा ।
म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा
मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें ।
सांगेन तुज निरुतें । चित्त देई
तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।
तो घर रिघोनि वरिला । शांति जगीं
येरु कर्मबधें किरीटी । अभिलाषाचिया गांठीं ।
कळासला खुंटी । फळभोगाचां
जैसा फळाचिया हांवे । तैसें कर्म करि आघवें ।
मग न कीजेचि येणें भावें । उपेक्षी जो
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टी होये ।
तो म्हणे तेथ राहे । महाबोधु
नवद्वारें देहीं । तो असतुचि परि नाहीं ।
करितुचि न करी कांही । फलत्यागी
जैसा कां सर्वेश्वरु । पाहिजे तंव निर्व्यापारु ।
परि तोचि रची विस्तारु । त्रिभुवनाचा
आणि कर्ता ऐसें म्हणिपे । तरी कवणें कर्मीं न शिंपें ।
जे हातोपावो न लिंपे । उदासवृतीचा
योगनिद्रा तरी न मोडे । अकर्तेपणा सळु न पडे ।
परि महाभूतांचे दळवाडें । उभारी भले
जगाचा जीवीं आहे । परि कवणाचा कहीं नोहे ।
जगचि हें होय जाये । तो शुद्धीहि नेंणे
पापपुण्यें अशेषें । पासींचि असतु न देखें ।
आणि साक्षीही होऊं न ठके । येरी गोठी कायसी
पै मूर्तीचेनि मेळें । तो मूर्तचि होऊनि खेळे ।
परि अमूर्तपण न मैळे । दादुलयाचें
तो सृजी पाळी संहारी । ऐसे बोलती जे चराचरीं ।
ते अज्ञान गा अवधारीं । पंडुकुमरा
तें अज्ञान जैं समूळ तुटे । तैं भ्रांतीचें मसैरें फिटे ।
मग अकर्तृत्व प्रगटे । ईश्वराचें
एथ ईश्वरु एकु अकर्ता । ऐसे मानले जरी चित्ता ।
तरी तोचि मी हें स्वभावता । आदीचि आहे
ऐसेनि विवेकें उदो चित्तीं । तयासी भेदु कैंचा त्रिजगतीं ।
देखें आपुलिया प्रतीति । जगचि मुक्त
जैशी पूर्वदिशेच्या राउळीं । उदयाचि सूर्ये दिवाळी ।
की येरीही दिशां तियेचि काळी । काळिमा नाही
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।
ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं
ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयाते गिंवसित आलें ।
तयांची समता दृष्टि बोलें । विशेषूं काई
एक आपणपेंचि पां जैसें । ते देखतीं विश्व तैसे ।
हें बोलणें कायसें । नवलु एथ
परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे ।
कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं
नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न देखे स्वप्नीं ।
अमृत नायके कानी । मृत्युकथा
हें असो संतापु कैसा । चंद्रु न स्मरे जैसा ।
भूतीं भेदु नेणती तैसा । ज्ञानिये ते
मग हा मशकु हा गजु । कीं हा श्वपचु हा द्विपु ।
पैल इतरु हा आत्मजु । हें उरेल कें
ना तरी हे धेनु हें श्वान । एक गुरु एक हीन ।
हें असो कैचें स्वप्न । जागतया
एथ भेदु तरी कीं देखा । जरि अंहभावा उरला होआवा ।
तो आधींचि नाहीं आघवा । आतां विषमु काई
म्हणोनि सर्वत्र सदा सम । तें आपणचि अद्वय ब्रह्म ।
हें संपूर्ण जाणें वर्म । समदृष्टीचें
जिहीं विषयसंगु न सांडिता । इंद्रियांतें न दंडितां ।
परि भोगिली निसंगता । कामेंविण
जिहीं लोकांचेनि आधारें । लौकिकेंचि व्यापारें ।
परि सांडिले निदसुरें । लौकिकु हें
जैसा जनामाजी खेचरु । असतुचि जना नोहे गोचरु ।
तैसा शरीरीं परि संसारु । नोळखें तयांतें
हें असो पवनाचेनि मेळें । जैसें जळींचि जळ लोळे ।
तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हे
तैसें नाम रुप तयाचें । एऱहवीं ब्रह्मचि तो साचें ।
मन साम्या आलें जयाचें । सर्वत्र गा
ऐसेनि समदृष्टी जो होये । तया पुरुषा लक्षणही आहे ।
अर्जुना संक्षेपे सांगेन पाहें । अच्युत म्हणे
तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें ।
तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो
तोचि तो निरुता । समदृष्टी तत्वता ।
हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म
जो आपणपे सांडुनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणेंचि नाहीं ।
तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ
सहजें स्वसुखाचेनि अपारें । सुरवाडे अंतरें ।
रचिला म्हणऊनि बाहिरें । पाउल न घली
सांगे कुमुददळाचेनि ताटें । जो जेविला चंद्रकिरणें चोखटे ।
तो चकोरु काई वाळुवंटे । चुंबितु आहे
तैसें आत्मसुख उपाइलें । जयासि आपणपेचिं फावलें ।
तया विषयो सहजे सांडवले । म्हणो काई
एऱहवीं तरी कौतुकें । विचारुनि पाहें पां निकें ।
या विषयांचेनि सुखे । झकविती कवण
जिहीं आपणपें नाहीं देखिलें । तेचि इहीं इंद्रियार्थीं रंजले ।
जैसें रंकु का आळुकैलें । तुषातें सेवी
नातरी मृगें तृषापीडितें । संभ्रमें विसरोनि जळांते ।
मग तोयबुद्धी बरडीतें । ठाकूनि येती
तैसें आपणपें नाहीं दिठे । जयातें स्वसुखाचे सदा खरांटे ।
तयासीचि विषय हे गोमटे । आवडती
एऱहवीं विषयीं काइ सुख आहे । हे बोलणेंचि सारिखें नोहे ।
तरी विद्युत्स्फुरणें कां न पाहे । जगामाजीं
सांगें वातवर्षआतपु धरे । ऐसे अभ्रछायाचि जरी सरे ।
तरी त्रिमाळिकें धवळारें । करावीं कां
म्हणोनि विषयसुख जें बोलिजे । तें नेणतां गा वायां जल्पिजे ।
जैसें महूर कां म्हणिजे । विषकंदातें
नातरी भौमा नाम मंगळु । रोहिणीतें म्हणती जळु ।
तैसा सुखप्रवादु बरळु । विषयिकु हा
हे असो आघवी बोली । सांग पा सर्पफणीची साउली ।
ते शीतल होईल केतुली । मूषकासी
जैसा आमिषकवळु पांडवा । मीनु न सेवी तंवचि बरवा ।
तैसा विषयसंगु आघवा । निभ्रांत जाणें
हे विरक्तांचिये दिठी । जैं न्याहाळिजे किरीटी ।
तैं पांडुरोगाचिये पुष्टि- ।सारिखें दिसे
म्हणोनि विषयभोगी जें सुख । तें साद्यंतचि जाण दुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे
तें अंतर नेणती बापुडे । म्हणोनि अगत्य सेवणें घडे ।
सांगे पूयपंकीचे किडे । काय चिळसी घेती
तयां दुःखियां दुःखचि जिव्हार । ते विषयकर्दमींचे दर्दुर ।
ते भोगजळींचे जलचर । सांडिती केवी
आणि दुःखयोनि जिया आहाती । तिया निरर्थका तरी नव्हती ।
जरी विषयांवरी विरक्ती । धरिती जीव
नातरी गर्भवासादि संकट । कां जन्ममरणींचे कष्ट ।
हे विसांवेवीण वाट । वाहावी कवणें
जरी विषयीं विषयो सांडिजेल । तरी महादोषी कें वसिजेल ।
आणि संसारु हा शब्दु नव्हेल । लटिका जगीं
म्हणोनि अविद्याजात नाथिलें । तें तिहींचि साच दाविलें ।
जिहीं सुखबुद्धी घेतलें । विषयदुःख
या कारणें गा सुभटा । हा विचारितां विषय वोखटा ।
तूं झणें कहीं या वाटा । विसरोनि जाशी
पै यातें विरक्त पुरुष । त्यजिती कां जैसें विष ।
निराशा तयां दुःख । दाविलें नावडे
ज्ञानियांच्या हन ठायीं । याची मातुही कीर नाहीं ।
देहीं देहभावो जिहीं । स्ववश केले
जयांतें बाह्याची भाष । नेणिजेचि निःशेष ।
अंतरीं सुख । एक आथी
परि तें वेगळेपणें भोगिजे । जैसे पक्षिये फळ चुंबिजे ।
तैसें नव्हे तेथ विसरिजे । भोगितेपणही
भोगीं अवस्था एक उठी । ते अंहकाराचा अचळु लोटी ।
मग सुखेंसि आंठी । गाढेपणें
तिये आलिंगनमेळीं । होय आपेंआप कवळी ।
तेथ जळ जैसें जळी । वेगळें न दिसे
कां आकाशीं वायु हारपे । तेथ दोन्ही हे भाष लोपे ।
तैसे सुखचि उरे स्वरुपें । सुरतीं तिये
ऐसी द्वैताची भाष जाय । मग म्हणों जरी एकचि होय ।
तरी तेथ साक्षी कवणु आहे । जाणतें जे
म्हणोनि असो हें आघवें । एथ न बोलणें काय बोलावें ।
ते खुणाचि पावेल स्वभावें । आत्माराम
जे ऐसेनि सुखें मातले । आपणपांचि आपण गुंतले ।
ते मी जाणे निखळ वोतले । साम्यरसाचे
ते आनंदाचे अनुकार । सुखाचे अंकुर ।
कीं महाबोधें विहार । केले जैसे
ते विवेकाचें गांव । की परब्रह्मीचे स्वभाव ।
नातरी अळंकारले अवयव । ब्रह्मविद्येचे
ते सत्त्वाचे सात्त्विक । की चैतन्याचे आंगिक ।
हें बहु असो एकैक । वानिसी काई
तूं संतस्तवनी रतसी । तरी कथेची से न करिसी ।
कीं निराळी बोल देखसी । सनागर
परि तो रसातिशयो मुकुळीं । मग ग्रंथार्थदीपु उजळीं ।
करी साधुहृदयराउळीं । मंगळ उखा
ऐसा श्रीगुरुचा उवायिला । निवृत्तिदासासी पातला ।
मग तो म्हणे कृष्ण बोलिला । तेंचि आइका
अर्जुना अंनत सुखाच्या डोहीं । एकसरा तळुचि घेतला जिहीं ।
मग स्थिराऊनी तेही । तेंचि जाहले
अथवा आत्मप्रकाशें चोखें । जो आपणपेंचि विश्व देखे ।
तो देहेंचि परब्रह्म सुखें । मानूं येईल
जें साचोकारें परम । ना तें अक्षर निःसीम ।
जिये गांवींचे निष्काम । अधिकारिये
जे महर्षीं वाढले । विरक्तां भागा फिटलें ।
जे निःसंशया पिकलें । निरंतर
जिहीं विषयांपासोनि हिरतलें । चित्त आपुलें आपण जिंतिले ।
ते निश्चित जेथ सुतले । चेतीचिना
तें परब्रह्म निर्वाण । जें आत्मविदांचें कारण ।
तेचि ते पुरुष जाण । पंडुकुमरा
ते ऐसे कैसेनि जाहले । जे देहींचि ब्रह्मत्वा आले ।
हें ही पुससी तरी भलें । संक्षेपे सांगो
तरी वैराग्यचेनि आधारें । जिहीं विषय दवडुनि बाहिरें ।
शरीरीं एकंदरें । केलें मन
सहजें तिहीं संधी भेटी । जेथ भ्रुपल्लवां पडे गांठी ।
तेथ पाठमोरी दिठी । पारुखोनियां
सांडूनि दक्षिण वाम । प्राणापानसम ।
चित्तेंसीं व्योम- । गामिये करिती
तेथ जैसीं रथ्योदकें सकळें । घेऊनि गंगा समुद्री मिळे ।
मग एकैक वेगळें । निवडु नये
तैसी वासनांतराची विवंचना । मग आपैसी पारुखे अर्जुना ।
जे वेळी गगनीं लयो मना । पवनें कीजे
जेथ हें संसारचित्र उमटे । तो मनोरुपु पटु फाटे ।
जैसें सरोवर आटे । मग प्रतिमा नाहीं
तैसें मनपण मुदल जाये । मग अंहभावादिक कें आहे ।
म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो
आम्ही मागां हन सांगितलें । जे देहींचि ब्रह्मत्व पावले ।
ते येणें मार्गे आले । म्हणऊनिया
आणि यमनियमांचे डोंगर । अभ्यासाचे सागर ।
क्रमोनि हे पार । पातले ते
तिहीं आपणपें करुनि निर्लेप । प्रंपचाचें घेतलें माप ।
मग साचाचेंचि रुप । होऊनि ठेले
ऐसा योगयुक्तीचा उद्देशु । जेथ बोलिला हृषीकेशु ।
तेथ अर्जुनु सुदंशु । म्हणोनि चमत्कारला
तें देखिलिया कृष्णें जाणितलें । मग हांसोनि पार्थातें म्हणितलें ।
तें काई पां चित्त उवाइलें । इये बोलीं तुझे
तंव अर्जुन म्हणे देवो । परचित्तलक्षणांचा रावो ।
भला जाणितला जी भावो । मानसु माझा
म्यां जें काहीं विवरुनि पुसावें । ते आधींचि कळले देवें ।
तरी बोलिलें तेंचि सांगावें । विवळ करुनि
एऱहवीं तरी अवधारा । जो दाविला तुम्हीं अनुसारा ।
तो पव्हण्याहूनि पायौतारा । सोहपा जैसा
तैसा सांख्याहूनि प्रांजळा । तरी आम्हांसारिखियां अभोळां ।
एथ आहाति कांही परि काळा । तो साहों ये वर
म्हणोनि एक वेळ देवा । तोचि पडताळा घेयावा ।
विस्तरेल तरी सांगावा । साद्यंतुचि
तंव कृष्ण म्हणती हो कां । तुज हा मार्ग गमला निका ।
तरी काय जाहलें ऐंकिजो कां । सुखें बोलों
अर्जुना तु परिससी । परिसोनि अनुष्ठिसी ।
तरी आम्हांसीचि वानी कायसी । सांगावयाची
आधींच चित्त मायेचें । वरी मिष जाहलें पढियंताचे ।
आतां तें अद्भुतपण स्नेहाचें । कवण जाणे
ते म्हणों कारुण्यरसाची वृष्टि । कीं नवया स्नेहाची सृष्टि ।
हें असे नेणिजे दृष्टी । हरीची वानूं
जे अमृताची वोतली । कीं प्रेमचि पिऊन मातली ।
म्हणोनि अर्जुनमोहें गुंतली । निघों नेणे
हें बहु जें जें जल्पिजेल । तेथें कथेसि फांकु होईल ।
परि स्नेह रुपा नयेल । बोलवरी
म्हणोनि विसुरा काय येणें । तो ईश्वरु आकळावा कवणें ।
जो आपुलें मान नेणे । आपणचि
तरी मागीला ध्वनीआंतु । मज गमला सावियाचि मोहितु ।
जे बलात्कारें असे म्हणतु । परिस बापा
अर्जुना जेणें भेदें । तुझें कां चित्त बोधे ।
तैसें तैसें विनोदें । निरुपिजेल
तो काइसया नाम योगु । तयाचा कवण उपेगु ।
अथवा अधिकारप्रसंगु । कवणा येथ
ऐसें जें जें कांही । उक्त असे इये ठाई ।
तें आघवेंचि पाहीं । सांगेन आतां
तूं चित्त देऊनि अवधारीं । ऐसें म्हणोनि श्रीहरी ।
बोलिजेल ते पुढारी । कथा आहे
श्रीकृष्ण अर्जुनासी संगु । न सांडोनि सांगेल योगु ।
तो व्यक्त करु प्रसंगु । म्हणे निवृत्तिदासु
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0