ज्ञानेश्वरी · अध्याय 2
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः
तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।
तेणें द्रवले असे चित्त । कवणेपरी
जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।
तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें
म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस
तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरु ।
देखोनि । शार्गङधरु । काय बोले
म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी
तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें । खेदु कायिसा
तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी ।
तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे
तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं
तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वासी
हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे
तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी
विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु ।
सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी
ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।
पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें
की लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे ।
सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी
सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ
म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं
सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे
हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता ।
सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी
हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें
म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं ।
हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा
तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडले बहुत ।
तूं अझुनिवरी हित । विचारी पां
येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे ।
हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज
तूं आधींचि काय नेणसी । कीं गोत्र नोळखसी ।
वायांचि काय करिसी । अतिशो आतां
आजिंचे हें काय झुंज । काय जन्मा नवल तुज ।
हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथि
तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनले ।
हें नेणिजे परि कुडे केले । अर्जुना तुवा
मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।
आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी
हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रीयांसी
ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु ।
हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले
देवा हें येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारीं ।
आधीं तूंचि चित्ती विचारीं । संग्रामु हा
हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।
हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा
देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती ।
तियें पाठीं केवीं वधिजती । आपुला हातीं
देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।
हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा
तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमांचे ।
मज बहुत भीष्मद्रोणांचे । वर्ततसे
जयालागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शको धरूं ।
तया प्रत्यक्ष केवीं । घातु देवा
वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले ।
जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं
मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें
जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मने व्यभिचारु ।
तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे
देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे ।
परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये
हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।
परि अगाध भलें गहन । हृदय यांचे
वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे ।
परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा
स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये ।
परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये
हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि ।
विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे
हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु ।
आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल
ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।
तें मना न ये आघवें । जीवितेंसीं
हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर ।
ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली
ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे ।
परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी
देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं ।
भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे
ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती ।
मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं
ऐसे अर्जुन तिये अवससरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।
परि ते मना न येचि मुरारी । आइकोनियां
हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।
म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना
येर्हवीं माझां चित्तीं जें होते । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।
परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा
पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्राणु सांडिजे ।
ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती
आतां ऐसेयांतें वधावे । कीं अव्हेरुनिया निघावें ।
या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही
आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।
जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझे
तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचे तेज भ्रंशे ।
मग पांसीच असतां न दिसे । वस्तुजात
देवा मज तैसे जाहले । जें मन भ्रांती ग्रासिलें ।
आतां काय हित आपुलें । तेंही नेणे
तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।
जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसी तूं
तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें
जैसा शिष्यांते गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु ।
कीं सरितांते सागरु । त्यजी केवीं
नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये ।
तरी ते कैसेनिं जिये । ऐकें कृष्णा
तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी ।
आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें
तरी उचित काय आम्हां । जे व्यभिचरेना धर्मा ।
तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां
हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं ।
तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें
एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।
परि मोह हा न फिटेल । मानसींचा
जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तरी सुक्षेत्री जर्ही पेरिलीं ।
तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं
ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें काही नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये । परमामृत
तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि ।
एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें
ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।
मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें
कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।
तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें
सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं ।
लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना
हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी ।
तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं
तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।
तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां
म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।
म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां
मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।
जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे
तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां
म्हणोनि सहजे सुनिळु । कृपामृते सजळु ।
तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु
तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।
गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची
आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणे अर्जुनाचळु निवेल ।
मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची
ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।
ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु
ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।
पुनरपि शोकाकुलितु । काय बोले
आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।
मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि
ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरोनि ठेला ।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयाते
मग आपुला चित्तीं म्हणे । एथ हें काय आदरिलें येणें ।
अर्जुन सर्वथा कांही नेणे । काय कीजे
हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी ।
जैसा ग्रहाते पंचाक्षरी । अनुमानी कां
ना तरी असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधी ।
वैद्य सूचि निरवधि । निदानींची
तैसा विवरितु असे श्रीअनंतु । तया दोन्हीं सैन्याआंतु ।
जयापरी पार्थु । भ्रांति सांडी
तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिले ।
जैसें मातेच्या कोपीं थोकलें । स्नेह आथी
कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी ।
ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय
तैसे वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।
तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं
मग अर्जुनाते म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें ।
जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि
तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणीवेतें न संडिसी ।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति
जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।
तुझे शहाणपण तैसें । दिसतसे
तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती
तरी सांग पां मज अर्जुना । तुजपासोनि स्थिती या त्रिभुवना ।
हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी
एथ समर्थु एक आथीं । तयापासूनि भूतें होती ।
तरी हें वायाचि काय बोलती । जगामाजीं
हो कां सांप्रत ऐसें जहालें । जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले ।
आणि नाशु पाविले । तुझेनि कायी
तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसी घातु न करिसी चितीं ।
तरी सांगे कायि हे होती । चिरंतन
कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।
ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवो देसी
अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।
तरी तुवा का शोचावे । सांग मज
परी मूर्खपणे नेणसी । न चिंतावें तें चिंतसी ।
आणि तूंचि नीति सांगसी । आम्हाप्रति
देखें जे विवेकी जे होती । ते दोहींतेही न शोचती ।
जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां
अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।
आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी
नित्यता ऐसेचि असोनि । ना तरी निश्चित क्षया जाऊनि ।
हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्हीं नाहीं
हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे ।
येर्हवीं तत्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि
जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।
तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ
तेंचि वायूचे स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें ।
तरी आता काय निमालें । विचारीं पां
आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक ।
हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं
एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि न नाशे । एकेकासवें
तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरे होति जाति पाहीं ।
ऐसें जाणे जया नाहीं । व्यामोहदुःख
एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियांआधीनपण ।
तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे
इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।
ते अंतर आप्लविती । संगें येणें
जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे
देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें
मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां
भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख ।
जें उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें
सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।
जो घ्राणसंगे विषादु - । तोषु देता
तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।
म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु
देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।
आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें
या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा
हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।
कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति
देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।
हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा
हे विषय जयाते नाकळिती । तयाते सुखदुःखें दोन्ही न पवती ।
आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया
तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा ।
जो या इंद्रियार्था । नागवेचि
आतां अर्जुना आणिक कांही एक । सांगेन मी आइक ।
जें विचारें परलोक । वोळखिती
या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती
सलिलीं पय जैसें । एक होऊन मीनलें असे ।
परीं निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे
कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।
निवडिती केवळ । बुद्धिमंत
ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी ।
मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें
कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट । जाणों आले
तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।
मग तत्वता तत्व उरलें । ज्ञानियांसी
म्हणोनि अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।
निष्कर्ष दोहींही । देखिला असे
देखें सारासार विचारितां । भ्रांति जे पाहीं असारता ।
तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें
हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।
तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाही
जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु ।
तया केलियाहि घातु । कदाचि नोहे
आणि शरीरजात हे आघवें । हें नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा
तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें ।
मी मारिता हे मरते । म्हणत आहासी
तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्वता विचारिसी ।
तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती
जैसें स्वप्नामाजिं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे ।
मग चेऊनियां पाहिजे । तंव कांही नाहीं
तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां ।
शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे
कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।
परी भानु नाहीं नासला । तयासवें
ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरले असे ।
तो भंगलिया आपैसे । स्वरूपचि
तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं ।
म्हणऊनि तूं हें नारोपीं । भ्रांति बापा
जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।
तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्यनाथें
हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु ।
म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया
हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे ।
एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा
अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु ।
सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा
हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी ।
ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे
हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना।
निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु
हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु ।
अनादि अविकृतु । सर्वरूप
अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा ।
मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा
अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी ।
तर्ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा
जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु ।
जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा
तें आदि नाहीं खंडले । समुद्रीं तरी असे मिनलें ।
आणि जातचि मध्यें उरले । दिसे जैसें
इये तिन्हीं तयापरी । सरसींच सदा अवधारीं ।
भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना
म्हणोनि हे आघवें । एथ तुज न लगे शोचावें ।
जे स्थितीची हे स्वभावें । अनादि ऐसी
ना तरी हे अर्जुना । न येचि तुझिया मना ।
जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया
तरी येथ कांही । तुज शोकासि कारण नाहीं ।
जे जन्ममृत्यु हे पाहीं । अपरिहर
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं
महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे ।
म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु
तूं जरी हे ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी ।
काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा
एथ आणिकही एक पार्था । तुज बहुतीं परी पाहतां ।
दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं
जें समस्तें इयें भूते । जन्मा आदि अमूर्ते ।
मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया
तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती ।
देखें पूर्व स्थितीच येती । आपुलिये
येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें ।
तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं
ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।
का परापेक्षा अळकांर- । व्यक्ति कनकीं
तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित ।
जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल
तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रुदसि कायी ।
तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक
जयाचि आर्तीचि भोगित । विषयी त्यजिले संत ।
जयालागीं विरक्त । वनवासिये
दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।
मुनीश्वर तयातें आचरताती
एक अंतरी निश्चळ । जें निहाळितां केवळ ।
विसरले सकळ । संसारजात
एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता ।
निरवधि तल्लीनता । निरंतर
एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले ।
एक अनुभवें पातले । तद्रुपता
जैसा सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत ।
परी माघौते न समात । परतले नाहीं
तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती ।
परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना
जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।
तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक
याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें ।
तरी सांग काय शोचावें । एथ तुवां
एर्हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता ।
परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं
तूं अझुनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी ।
स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें
या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांही पातलें ।
कीं युगचि हें बुडालें । जर्हीं एथ
तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।
मग तरिजेल काय पाहे । कृपाळुपणें
अर्जुना तुझें चित्त । जर्ही जाहलें द्रवीभूत ।
तर्ही हें अनुचित । संग्रामसमयीं
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाही म्हणितलें ।
ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां
तैसे आनीं आन करितां । नाशु होईल हिता ।
म्हणऊनि तूं आतां । सावध होई
वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं ।
जो आचरिता बाधु नाहीं । कवणे काळीं
जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे
म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांही ।
संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें
निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें ।
हें असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी
अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचे ।
कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटले असे
हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें ।
मूर्त कां प्रतापे । उदो केला
ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तिंचेनि पडिभरें ।
हें कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज
क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे ।
जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी
ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे
आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचूं बैसिजे ।
तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां
पूर्वजांचे जोडलें । आपणचि होय धाडिलें ।
जरी आजि शस्त्र सांडिले । रणीं इये
असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल ।
आणि गिंवसित पावतील । महादोष
जैसी भ्रतारेहीन वनिता । उपहृती पावे सर्वथा ।
तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण
ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे ।
तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषी
म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील ।
आणि अपेश तें न वचेल । कल्पांतावरी
जाणतेनि तंवचि जियावे । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।
आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां
तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता ।
परी ते गति समस्तां । न मनेल ययां
हें चहूंकडून वेढितील । बाणवरी घेतील ।
तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणे
ऐसेनिही प्राण्संकटे । जरी विपायें पां निघणें घटे ।
तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी
तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमे झुंजो आलासी ।
आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी
हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगें बोलु उरला । निका कायी
लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुली जीवितें ।
परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा
ते तुज अनायसें । अनकळित जोडिली असे ।
हें अद्वितीय जैसें । गगन आहे
तैसी कीर्ती निःसीम । तुझां ठायीं निरुपम ।
तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं
दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती ।
जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक
ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट ।
जयां देखी जगीं सुभट । वांठ जाहली
ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।
जाहले आथि विरक्त । जीवितेंसी
जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा ।
तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा
जैसे पर्वत वज्रांते । ना तरी सर्प गरुडातें ।
तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा
ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल ।
जरी मागुता निघसील । न झुंजतचि
आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती ।
न गणित कुटी बोलती । आइकतां तुज
मग ते वेळी हियें फुटावें । आंता लाठेपणे कां न झुंजावे ।
हें जिंतले तरी भोगावें । पृथ्वीतल
ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील
म्हणोनि ये गोठी । विचारु न करीं किरिटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजें वेगीं
देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नासे असता ।
तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची
सांगे प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।
परी विपायें चालो नेणिजे । तरी तेंही घडे
अमृतें तरीचि मरीजे । जरी विखेंसी सेवीजे ।
तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणे
म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा ।
क्षात्रवृत्ती झुंजतां । पाप नाही
सुखीं संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं
एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना
आपणयां उचिता । स्वधर्मातेंचि रहाटतां ।
जे पावें तें निवांता । साहोनि जावें
ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां
हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ ।
आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां
जया बुद्धियुक्ता । आहालिया पार्था ।
कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे
जैसे वज्रकवच लेईजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता
तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत
कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा
तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि ।
हां असतांचि उपाधि । आंकळू न सके
जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप । न लगती जेथ
अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेषही नाशे । संसारभय
जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी ।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये
पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरी ।
जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना
आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु । दैवगुणें
तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर
तैसी ईश्वरावांचूनि कांही । जिये आणिक लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं
येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती ।
तेथ निरंतर रमती । अविवेकिये
म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं
वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां
म्हणती संसारी जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर
एथ हें वांचूनि कांही । आणिक सर्वथा सुखचि नाही ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते
देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां
क्रियाविशेषें बहुतें । न लोपितीं विधीतें ।
निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती
परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो
जैसा कर्पुराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे ।
कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट
दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।
तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें
सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे ।
परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें
जैसे रांधवणी रससोय निकी । करुनियां मोले विकी ।
तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु
म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।
तयां वेदवादरतां । मनीं वसे
तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणे निभ्रांत ।
म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्विक ते
येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक ।
जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा
म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण ।
एथ झणे अंतःकरण । रिगों देसी
तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।
एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं
जरी वेदें बहुत बोललें । विविध भेद सूचिले ।
तर्ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे
जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।
तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज
का उदकमय सकळ । जर्ही जाहलें असे महीतळ ।
तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें
तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती ।
मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें
म्हणौनि आइकें पार्था । याचिवरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें
आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें ।
जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म
परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी ।
हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण
तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी ।
मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में
परी आदरिले कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको
कां निमित्तें कोणे एकें । तें सिद्धी न वचतां ठाकें ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना
आचरता सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें ।
परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं
देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे ।
तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणे
देखें संतासंती कर्मीं । हें जे सरिसेपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे
अर्जुना समत्व चित्ताचें । तेचिं सार जाण योगाचें ।
जेथ मना आणि बुद्धीचें । ऐक्य आथी
तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडे पार्था ।
दिसे हा अरुता । कर्मभागु
परि तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।
जें कर्मशेष सहजे । योगस्थिति
म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु ।
मनिं करी अव्हेरु । फळहेतूचा
जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।
इहीं उभय संबंधी सांडिले । पापपुण्यीं
ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।
आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां
मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।
ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा
तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी ।
आणि वैराग्य मानसीं । संचरेल
मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान ।
तेणे निचाडें होईल मन । अपैसें तुझे
तेथ आणिक कांही जाणावे । कां मागिलातें स्मरावें ।
हें अर्जुनां आघवें । पारुषेल
इंद्रियांचिया संगती । जिये पसरु असे मती ।
ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं
समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ ।
तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति
तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।
मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि
मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।
तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि
या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।
काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं
आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसां चिन्हीं जाणिजे ।
जो समाधिसुख भुंजिजे । अखंडित
तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे ।
देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती
तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु ।
तो काय तेथ नारायणु । बोलतु असे
म्हणे अर्जुना परियेसीं । हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।
तो अंतराय स्वसुखेसीं । करीत असे
जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु ।
परि विषयामाजि पतितु । जेणें संगे कीजे
तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहें ।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे
नाना दुःखी प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।
आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना
अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो
ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।
जो निरसूनि उपाधि । भेदरहितु
जो सर्वत्रा सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु कां जैसा ।
अधमोत्तम प्रकाशा - । माजीं न म्हणे
ऐसी अनवच्छिन्न समता । भूतामत्रीं सदयता ।
आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे
गोमटें कांही पावे । तेणे संतोषें तेणें नाभिभवे ।
जो ओखटेनि नागवे । विषादासी
ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।
तो पां जाण प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा
कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।
ना इच्छावशें आवरी । आपुले आपण
तैसीं इंद्रिये आपैतीं होतीं । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे
आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।
या विषयांते साधक । त्यजिती नियमें
श्रोत्रादि इंद्रिये आवरती । परि रसने नियमु न करिती ।
ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं
जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा
तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवोनि आंगे फांके ।
तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें
येरां इंद्रिया विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।
जे जीवन हें न घटे । येणेंविण
मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमातें पावे ।
जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाईजे
तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।
सोहंभावप्रतीति । प्रकट होय
येर्हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना ।
जे रहाटताती जतना । निरंतर
जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।
जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती
तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।
जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां
देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें ।
मग आकळती स्पर्शें । इंद्रियांचेनि
तिये संधी मन जाये । मग अभ्यासां ठोठावलें ठाये ।
ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचे
म्हणोनि आइकें पार्था । यांते निर्दळी जो सर्वथा ।
सर्व विषयीं आस्था । सांडूनिया
तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।
जयाचे विषयसुखे । अंतःकरण झकवेना
जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।
जो मातें हृदयाआंतु । विसंबेना
एर्हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांही ।
तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे
जैसा कां विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी
तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा ।
घातु करी अशेखा । विवेकजाता
जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।
संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची
जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।
क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणे
संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।
चंडवातें ज्योति । आहत जैसी
कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी ।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी
नग अज्ञानांध केवळ । तेणे आप्लविजे सकळ ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं
जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।
तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा
ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।
तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात
चैतन्याचां भ्रंशी । शरीरा दशा जैशी ।
पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें
म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना ।
मग प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके
तैसें विषयांचे ध्यान । जरी विपायें वाहे मन ।
तरी येसणे हें पतन । गिंवसीत पावे
म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।
मग रागद्वेष स्वभावें । नाशतील
पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष ।
तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाही
जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु ।
तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि
तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।
जो कामक्रोधविहीन । होऊनि असे
तरी विषयांतुही कांही । आपणपेवाचुनि नाहीं ।
मग विषय कवण कायी । बाधीतील कवणा
जरी उदकें उदकीं बुडीजे । कां अग्नि आगी पोळिजे ।
तरीं विषयसंगे आप्लविजे । परिपूर्ण तो
ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ ।
तयाचि प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं
देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।
तेथे रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां
जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृष्णेचा अडदरु । कहींचि नाहीं
तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ।
तेथ बुद्धि आपैसी राहे । परमात्मरूपीं
जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु
ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंतःकरणीं ।
तो आकळिलां जाण गुणीं । विषयादिकीं
तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।
आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे
निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना ।
तरी शांति केवी अर्जुना । आपु होय
आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।
जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे
देखें अग्निमाजी धापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तरी अशांत सुखप्राप्ती । घडों शके
म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।
या कारणें इंद्रियांचें । दमन निकें
ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।
ते तरलेचि न तरिती । विषयसिंधु
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।
तरी चुकलाही मागौता । अपावो पावे
तैसी प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।
तरी आक्रमिला देख दुःखे । सांसारिकें
म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया ।
तरी अधिक कांही धनंजया । सार्थक असे
देखे कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि
तैसीं इंद्रिये आपैती होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे
आता आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगेन । परिस पां
देखे भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रित तो
तैसा तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।
तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर
पार्था आणिकही परी । तो जाणो येईल अवधारीं ।
जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित
जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।
तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी
ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाति समस्ता ।
परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा
तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।
आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें
सांगे सूर्याचां घरी । प्रकाशु काय वातीवेरी ।
की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो
देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।
तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं
जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।
तो केवि रंजे पालविणें । भिल्लांचेनि
जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि
पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही ।
तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती
ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।
तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं
तो अहंकाराते दंडुनी । सकळ काम सांडोनि ।
विचरे विश्व होऊनि । विश्वाचिमाजीं
हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।
पातलें परब्रह्म । अनायासें
जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता ।
आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया
तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।
सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे
ऐसे कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुने मनीं म्हणितलें ।
आतां आमुचियाचि काजा आलें । उपपत्ति इया
जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।
तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणूनियां
ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला ।
आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां
तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु ।
कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु
जो आपणपे सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु ।
ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तीदासु
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0