ज्ञानेश्वरी · अध्याय 17
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ सप्तदशोऽध्यायः - अध्याय सतरावा । ।
। श्रद्धात्रयविभागयोगः ।
विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा ।
तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया
त्रिगुणत्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला ।
तो आत्मशंभूनें सोडविला । तुझिया स्मृती
म्हणौनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा ।
तऱही हळु मायाजळा- । माजीं तारूनि
जे तुझ्याविखीं मूढ । तयांलागीं तूं वक्रतुंड ।
ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी
दैविकी दिठी पाहतां सानी । तऱही मीलनोन्मीलनीं ।
उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी
प्रवृत्तिकर्णाच्या चाळीं । उठली मदगंधानिळीं ।
पूजीजसी नीलोत्पलीं । जीवभृंगांच्या
पाठीं निवृत्तिकर्णताळें । आहाळली ते पूजा विधुळे ।
तेव्हां मिरविसी मोकळें । आंगाचें लेणें
वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु ।
तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं
हें असो विस्मो दातारा । तूं होसी जयाचा सोयरा ।
सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो
फेडितां बंधनाचा ठावो । तूं जगद्बंधु ऐसा भावो ।
धरूं वोळगे उवावो । तुझाचि आंगीं
तंव दुजयाचेनि नांवें तया । देहही नुरेचि पैं देवराया ।
जेणें तूं आपणपयां । केलासि दुजा
तूंतें करूनि पुढें । जे उपायें घेती दवडे ।
तयां ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं
जो ध्यानें सूये मानसीं । तयालागीं नाहीं तूं त्याचे देशीं ।
ध्यानही विसरे तेणेंसीं । वालभ तुज
तूतें सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणें ।
वेदांही येवढें बोलणें । नेघसी कानीं
मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तोत्रीं कें बांधों हाव ।
दिसती तेतुली माव । भजों काई
दैविकें सेवकु हों पाहों । तरी भेदितां द्रोहोचि लाहों ।
म्हणौनि आतां कांहीं नोहों । तुजलागीं जी
जैं सर्वथा सर्वही नोहिजे । तैं अद्वया तूतें लाहिजे ।
हें जाणें मी वर्म तुझें । आराध्य लिंगा
तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण ।
तैसें नमन माझें जाण । बहु काय बोलों
आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे ।
कां दशीं दीपसंगें । दीपुचि होय
तैसा तुझिया प्रणितीं । मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ती ।
आतां आणीन व्यक्तीं । गीतार्थु तो
तरी षोडशाध्यायशेखीं । तिये समाप्तीच्या श्लोकीं ।
जो ऐसा निर्णयो निष्टंकीं । ठेविला देवें
जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था ।
शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज
तेथ अर्जुन मानसें । म्हणे हें ऐसें कैसें ।
जे शास्त्रेंवीण नसे । सुटिका कर्मा
तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे ।
कैं नाकींचा केशु जोडे । सिंहाचिये ?
मग तेणें तो वोंविजे । तरीच लेणें पाविजे ।
एऱहवीं काय असिजे । रिक्तकंठीं ?
तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण पां वेंटाळी ।
एकवाक्यतेच्या फळीं । पैसिजे कैं ?
जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां ।
कैंचा पैसारु जीविता । येतुलालिया
आणि शास्त्रें अर्थें देशें काळें । या चहूंही जें एकफळे ।
तो उपावो कें मिळे । आघवयांसी ?
म्हणौनि शास्त्राचें घडतें । नोहें प्रकारें बहुतें ।
तरी मुर्खा मुमुक्षां येथें । काय गति पां ?
हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो ।
तो सतराविया ठावो । अध्याया येथ
तरी सर्वविषयीं वितृष्णु । जो सकळकळीं प्रवीणु ।
कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वें जो
शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु ।
सुखादि उपकारु । जयाची लीला
जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु ।
सहचरु मनोधर्मु । देवाचा जो
तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रियां फांवलिया ब्रह्मा ।
तुझां बोलु आम्हा । साकांक्षु पैं जी
जें शास्त्रेंवांचूनि आणिकें । प्राणिया स्वमोक्षु न देखे ।
ऐसें कां कैंपखें । बोलिलासी
तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु ।
जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी
आणि अभ्यासीं विरजिया । होती जिया सामुग्रिया ।
त्याही नाहीं आपैतिया । तिये वेळीं
उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन ।
ऐसें ठेलें आपादन । शास्त्राचें जया
किंबहुना शास्त्रविखीं । एकही न लाहातीचि नखी ।
म्हणौनि उखिविखी । सांडिली जिहीं
परी निर्धारूनि शास्त्रें । अर्थानुष्ठानें पवित्रें ।
नांदताति परत्रें । साचारें जे
तयांसें आम्हीं होआवें । ऐसी चाड बांधोनि जीवें ।
घेती तयांचें मागावे । आचरावया
धड्याचिया आखरां । तळीं बाळ लिहे दातारा ।
कां पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले
तैसें सर्वशास्त्रनिपुण । तयाचें जें आचरण ।
तेंचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे
मग शिवादिकें पूजनें । भूम्यादिकें महादानें ।
आग्निहोत्रादि यजनें । करिती जे श्रद्धा
तयां सत्त्वरजतमां-। । माजीं कोण पुरुषोत्तमा ।
गति होय ते आम्हां । सांगिजो जी
तंव वैकुंठपीठींचें लिंग । जो निगमपद्माचा पराग ।
जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया
काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु ।
आद्वितीय गूढु । आनंदघनु
इयें श्लाघिजती जेणें बिकें । तें जयाचें आंगीं असिकें ।
तो श्रीकृष्ण स्वमुखें । बोलत असे
म्हणे पार्था तुझा अतिसो । हेंही आम्ही जाणतसों ।
जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि कीं
नुसधियाची श्रद्धा । झोंबों पाहसी परमपदा ।
तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे
श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी ।
काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे ?
गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें ।
तें घेऊं नये कांहीं केलें । विचारीं पां
चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु ।
तैं हातीं धरितां जाळूं । न शके काई ?
कां किडाचिये आटतिये पुटीं । पडिलें सोळें किरीटी ।
घेतलें चोखासाठीं । नागवीना ?
तैसें श्रद्धेचें दळवाडें । अंगें कीर चोखडें ।
परी प्राणियांच्या पडे । विभागीं जैं
ते प्राणिये तंव स्वभावें । आनादिमायाप्रभावें ।
त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती
तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती ।
तैं तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया
वृत्तीसें मन धरिती । मनासी क्रिया करिती ।
केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें
बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये ।
ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे
तियापरीं यियें अपारें । होत जात जन्मांतरें ।
परी त्रिगुणत्व न व्यभिचरें । प्राणियांचें
म्हणूनि प्राणियांच्या पैकीं । पडिली श्रद्धा अवलोकीं ।
ते होय गुणासारिखी । तिहीं ययां
विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद ।
परी एका दोघे वोखद । येर आहाती
सत्त्वाचेनि आंगलगें । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे ।
तंव रज तम उगे । कां पां राहाती ?
मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशें जाये ।
तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी
मग तमाची उठी आगी । तेव्हां तेचि श्रद्धा भंगी ।
हों लागे भोगालागीं । भलतेया
एवं सत्त्वरजतमा-। । वेगळी श्रद्धा सुवर्मा ।
नाहीं गा जीवग्रामा-। । माजीं यया
म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पैं त्रिगुणात्मक ।
रजतमसात्त्विक । भेदीं इहीं
जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक ।
कां मिरयामाजीं तीख । उंसीं गोड
तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे ।
तेथ श्रद्धा परीणमे । तेंचि होऊनि
मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी ।
तेवीं श्रद्धा तामसी । सिनी नाहीं
तैसीच राजसीं जीवीं । रजोमय जाणावी ।
सात्त्विकीं आघवीं । सत्त्वाचीच
ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु ।
श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे
परी गुणत्रयवशें । त्रिविधपणाचें लासें ।
श्रद्धे जें उठिलें असे । तें वोळख तूं
तरी जाणिजे झाड फुलें । कां मानस जाणिजे बोलें ।
भोगें जाणिजे केलें । पूर्वजन्मींचें
तैसीं जिहीं चिन्हीं । श्रद्धेचीं रूपें तीन्हीं ।
देखिजती ते वानी । अवधारीं पां
तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा ।
तयां बहुतकरूनि मेधा । स्वर्गीं आथी
ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती ।
किंबहुना पडती । देवलोकीं
आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा ।
ते भजती राक्षसां । खेचरां हन
श्रद्धां जे कां तामसी । ते मी सांगेन तुजपाशीं ।
जे कां केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वें
जीववधें साधूनि बळी । भूतप्रेतकुळें मैळीं ।
स्मशानीं संध्याकाळीं । पूजिती जे
ते तमोगुणाचें सार । काढूनि निर्मिले नर ।
जाण तामसियेचें घर । श्रद्धेचें तें
ऐसी इहीं तिहीं लिंगीं । त्रिविध श्रद्धा जगीं ।
पैं हें ययालागीं । सांगतु असें
जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा ।
येरी दोनी विरुद्धा । सांडाविया
हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया ।
बागुल नोहे तया । कैवल्य तें
तो न पढो कां ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र ।
सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हातीं
परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त ।
अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे
तयांचीं आचरती पाउलें । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले ।
तो तेंचि फळ ठेविलें । ऐसें लाहे
पैं एक दीपु लावी सायासें । आणिक तेथें लाऊं बैसें ।
तरी तो काय प्रकाशें । वंचिजे गा ?
कां येकें मोल अपार । वेंचोनि केलें धवळार ।
तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ?
हें असो जो तळें करी । तें तयाचीच तृषा हरी ।
कीं सुआरासीचि अन्न घरीं । येरां नोहे ?
बहुत काय बोलों पैं गा । येका गौतमासीचि गंगा ।
येरां समस्तां काय जगां । वोहोळ जाली ?
म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी ।
जाणे तयांते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे
ना शास्त्राचेनि कीर नांवें । खाकरोंही नेणती जीवें ।
परी शास्त्रज्ञांही शिवें । टेंकों नेदिती
वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया ।
पंडितां डाकुलिया । वाजविती
आपलेनीचि आटोपें । धनित्वाचेनि दर्पें ।
साचचि पाखंडाचीं तपें । आदरिती
आपुलिया पुढिलांचिया । आंगीं घालूनि कातिया ।
रक्तमांसा प्रणीतया । भर भरु
रिचविती जळतकुंडीं । लाविती चेड्याच्या तोंडीं ।
नवसियां देती उंडी । बाळकांची
आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवतां वरीया ।
अन्नत्यागें सातरीया । ठाकती एक
अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्रीं सुहाडा ।
पेरिती मग पुढां । तेंचि पिके
बाहु नाहीं आपुलिया । आणि नावेतेंही धनंजया ।
न धरी होय तया । समुद्रीं जैसें
कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पाय खोळां ।
तो रोगिया जेवीं जिव्हाळा । सवता होय
नाना पडिकराचेनि सळें । काढी आपुलेचि डोळे ।
तें वानवसां आंधळें । जैसें ठाके
तैसें तयां आसुरां होये । निंदूनि शास्त्रांची सोये ।
सैंघ धांवताती मोहें । आडवीं जे कां
कामु करवी तें करिती । क्रोधु मारवी ते मारिती ।
किंबहुना मातें पुरिती । दुःखाचा गुंडां
आपुलां परावां देहीं । दुःख देती जें जें कांहीं ।
मज आत्मया तेतुलाही । होय शीणु
पैं वाचेचेनिही पालवें । पापियां तयां नातळावें ।
परी पडिलें सांगावें । त्यजावया
प्रेत बाहिरें घालिजे । कां अंत्यजु संभाषणीं त्यजिजे ।
हें असो हातें क्षाळिजे । कश्मलातें ?
तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा ।
तयांतें सांडावया तैसा । अनुवादु हा
परी अर्जुना तूं तयांतें । देखसी तैं स्मर हो मातें ।
जे आन प्रायश्चित्त येथें । मानेल ना
म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पैं येकी ।
जतन करावी निकी । सर्वांपरी
तरी धरावा तैसा संगु । जेणें पोखे सात्त्विक लागु ।
सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपें
एऱहवीं तरी पाहीं । स्वभाववृद्धीच्या ठाईं ।
आहारावांचूनि नाहीं । बळी हेतु
प्रत्यक्ष पाहें पां वीरा । जो सावध घे मदिरा ।
तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणीं
कां जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावीं ।
काय ज्वरु जालिया निववी । पयादिक ?
नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी ।
कां आपुलियासें करी । जैसें विष
तेवीं जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु ।
आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे
जैसें भांडियाचेनि तापें । आंतुलें उदकही तापे ।
तैसी धातुवशें आटोपे । चित्तवृत्ती
म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तैं सत्त्वाची वाढी पाविजे ।
राजसा तामसा होईजे । येरी रसीं
तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु ।
हें सांगों करीं आदरु । आकर्णनीं
आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनी मोहरा ।
जालिया तेही वीरा । रोकडें दाऊं
तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति कीं बोनियांची ।
आणि जेवितां तंव गुणांची । दासी येथ
जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता ।
पावोनियां त्रिविधता । चेष्टे त्रिधा
म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु ।
तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते
पैं आहार लक्षण पहिले? । सांगों जें म्हणितलें ।
तें आईक गा भलें । रूप करूं
तरी सत्त्वगुणाकडे । जें दैवें भोक्ता पडे ।
तैं मधुरीं रसीं वाढे । मेचु तया
आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे ।
आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें
आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें ।
जिभेलागीं स्नेहाळें । स्वादें जियें
रसें गाढीं वरी ढिलीं । द्रवभावीं आथिलीं ।
ठायें ठावो सांडिलीं । अग्नितापें
आंगें सानें परीणामें थोरु । जैसें गुरुमुखींचें अक्षरु ।
तैशी अल्पीं जिहीं अपारु । तृप्ति राहे
आणि मुखीं जैसीं गोडें । तैसीचिहि ते आंतुलेकडे ।
तिये अन्नीं प्रीति वाढे । सात्त्विकांसी
एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण ।
आयुष्याचें त्राण । नीच नवें हें
येणें सात्त्विक रसें । जंव देहीं मेहो वरीषे ।
तंव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा
सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती ।
दिवसाचिये उन्नती । भानु जैसा
आणि शरीरा हन मानसा । बळाचा पैं कुवासा ।
हा आहारु तरी दशा । कैंची रोगां
हा सात्त्विकु होय भोग्यु । तैं भोगावया आरोग्यु ।
शरीरासी भाग्यु । उदयलें जाणो
आणि सुखाचें घेणें देणें । निकें उवाया ये येणें ।
हें असो वाढे साजणें । आनंदेंसीं
ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु ।
करी हा उपकारु । सबाह्यासी
आतां राजसासि प्रीती । जिहीं रसीं आथी ।
करूं तयाही व्यक्ती । प्रसंगें गा
तरी मारें उणें काळकुट । तेणें मानें जें कडुवट ।
कां चुनियाहूनि दासट । आम्ल हन
कणिकीतें जैसें पाणी । तैसेंचि मीठ बांधया आणी ।
तेतुलीच मेळवणी । रसांतरांची
ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे ।
ऊन्हाचेनि मिषें तोंडें । आगीचि गिळी
वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे ।
तैसें तीख तो खाये । जें घायेविण रुपे
आणि राखेहूनि कोरडें । आंत बाहेरी येके पाडें ।
तो जिव्हादंशु आवडे । बहु तया
परस्परें दांतां । आदळु होय खातां ।
तो गा तोंडीं घेतां । तोषों लागे
आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरी परवडिजती मोहरी ।
जियें घेतां होती धुवारी । नाकेंतोंडें
हें असो उगें आगीतें । म्हणे तैसें राइतें ।
पढियें प्राणापरौतें । राजसासि गा
ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा ।
अन्नमिषें अग्नि भडभडां । पोटीं भरी
तैसाचि लवंगा सुंठे । मग भुईं गा सेजे खाटे ।
पाणियाचें न सुटे । तोंडोनि पात्र
ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले ।
ते चेववावया घातलें । माजवण पोटीं
तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे ।
ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें
एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा ।
परीणामाचाहि विसुरा । सांगितला
आतां तया तामसा । आवडे आहारु जैसा ।
तेंही सांगों चिळसा । झणें तुम्ही
तरी कुहिलें उष्टें खातां । न मनिजे तेणें अनहिता ।
जैसें कां उपहिता । म्हैसी खाय
निपजलें अन्न तैसें । दुपाहरीं कां येरें दिवसें ।
अतिकरें तैं तामसें । घेईजे तें
नातरी अर्ध उकडिलें । कां निपट करपोनि गेलें ।
तैसेंही खाय चुकलें । रसा जें येवों
जया कां आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती ।
तें अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाहीं
ऐसेनि कहीं विपायें । सदन्ना वरपडा होये ।
तरी घाणी सुटे तंव राहे । व्याघ्रु जैसा
कां बहुवें दिवशीं वोलांडिलें । स्वादपणें सांडिलें ।
शुष्क अथवा सडलें । गाभिणेंही हो
तेंही बाळाचे हातवरी । चिवडिलें जैसी राडी करी ।
का सवें बैसोनि नारी । गोतांबील करी
ऐसेनि कश्मळें जैं खाय । तैं तया सुखभोजन ऐसें होय ।
परी येणेंही न धाय । पापिया तो
मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा ।
जया का सदोखा । कुद्रव्यासी
तया अपेयांच्या पानीं । अखाद्यांच्या भोजनीं ।
वाढविजे उतान्ही । तामसें तेणें
एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा ।
तयाचें फल दुसरां । क्षणीं नाहीं
जे जेव्हांचि हें अपवित्र । शिवे तयाचें वक्त्र ।
तेव्हांचि पापा पात्र । जाला तो कीं
यावरतें जें जेवीं । ते जेविती वोज न म्हणावी ।
पोटभरती जाणावी । यातना ते
शिरच्छेदें काय होये । का आगीं रिघतां कैसें आहे ।
हें जाणावें काई पाहें । परी साहातुचि असे
म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना ।
न सांगोंचि गा अर्जुना । देवो म्हणे
आतां ययावरी । आहाराचिया परी ।
यज्ञुही अवधारीं । त्रिधा असे
परी तिहींमाजीं प्रथम । सात्त्विक यज्ञाचें वर्म ।
आईक पां सुमहिम -। शिरोमणी
तरी एकु प्रियोत्तमु-। । वांचोनि वाढों नेदी कामु ।
जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा
नाना सिंधूतें ठाकोनि गंगा । पुढारां न करीचि रिगा ।
का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला
तैसें जे आपुल्या स्वहितीं । वेंचूनियां चित्तवृत्ती ।
नुरवितीचि अहंकृती । फळालागीं
पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेंचि जळ ।
जिरालें गां केवळ । तयाच्याचि आंगीं
तैसें मनें देहीं । यजननिश्चयाच्या ठायीं ।
हारपोनि जें कांहीं । वांछितीना
तिहीं फळवांच्छात्यागीं । स्वधर्मावांचूनि विरागीं ।
कीजे तो यज्ञु सर्वांगीं । अळंकृतु
परी आरिसा आपणपें । डोळां जैसें घेपें ।
कां तळहातींचें दीपें । रत्न पाहिजे
नाना उदितें दिवाकरें । गमावा मार्गु दिठी भरे ।
तैसा वेदु निर्धारें । देखोनियां
तियें कुंडें मंडप वेदी । आणीकही संभारसमृद्धी ।
ते मेळवणी जैसी विधी । आपणपां केली
सकळावयव उचितें । लेणीं पातलीं जैसीं आंगातें ।
तैसे पदार्थ जेथिंचे तेथें । विनियोगुनी
काय वानूं बहुतीं बोलीं । जैसी सर्वाभरणीं भरली ।
ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषें
तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु ।
नुठऊनियां लागु । महत्त्वाचा
प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडीं कीजे तुळसीचा ।
परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं
किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण ।
होय तो यागु जाण । सात्त्विकु गा
आतां यज्ञु कीर वीरेशा । करी पैं याचिसा ।
परी श्राद्धालागीं जैसा । अवंतिला रावो
जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये ।
आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके
तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका ।
दीक्षितु होईन मान्यु लोकां । घडेल यागु
ऐसी केवळ फळालागीं । महत्त्व फोकारावया जगीं ।
पार्था निष्पत्ति जे यागीं । राजस पैं ते
आणि पशुपक्षिविवाहीं । जोशी कामापरौता नाहीं ।
तैसा तामसा यज्ञा पाहीं । आग्रहोचि मूळ
वारया वाट न वाहे । कीं मरण मुहूर्त पाहे ।
निषिद्धांसीं बिहे । आगी जरी
तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा ।
म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु
नाहीं विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड ।
अन्नजातां न सुये तोंड । मासिये जेवीं
वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ कें रिगेल दक्षिणा ।
अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा
तैसें वायांचि सर्वस्व वेंचे । मुख न देखती श्रद्धेचें ।
नागविलें निपुत्रिकाचें । जैसें घर
ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु ।
आइकें म्हणे निवासु । श्रियेचा तो
आता गंगेचें एक पाणी । परी नेलें आनानीं वाहणीं ।
एक मळीं एक आणी । शुद्धत्व जैसें
तैसें तिहीं गुणीं तप । येथ जाहलें आहे त्रिरूप ।
तें एक केलें दे पाप । उद्धरी एक
तरी तेंचि तिहीं भेदीं । कैसेनि पां म्हणौनि सुबुद्धी ।
जाणों पाहासी तरी आधीं । तपचि जाण
येथ तप म्हणजे काई । तें स्वरूप दाऊं पाहीं ।
मग भेदिलें गुणीं तिहीं । तें पाठीं बोलों
तरी तप जें कां सम्यक् । तेंही त्रिविध आइक ।
शारीर मानसिक । शाब्द गा
आतां गा तिहीं माझारीं । शारीर तंव अवधारीं ।
तरी शंभु कां श्रीहरी । पढियंता होय
तया प्रिया देवतालया । यात्रादिकें करावया ।
आठही पाहार जैसें पायां । उळिग घापे
देवांगणमिरवणियां । अंगोपचार पुरवणियां ।
करावया म्हणियां । शोभती हात
लिंग कां प्रतिमा दिठी । देखतखेंवों अंगेष्टी ।
लोटिजे कां काठी । पडली जैसी
आणि विधिविनयादिकीं । गुणीं वडील जे लोकीं ।
तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे
अथवा प्रवासें कां पीडा । का शिणले जे सांकडां ।
ते जीव सुरवाडा । आणिजती
सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें ।
तयां सेवेसी कीर शरीरें । लोण कीजे
आणि संसारासा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु ।
तो ज्ञानदानीं सकरुणु । भजिजे गुरु
आणि स्वधर्माचा आगिठां । देह जाड्याचिया किटा ।
आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे
वस्तु भूतमात्रीं नमिजे । परोपकारीं भजिजे ।
स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें
जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणें आंगें ।
तेथूनि जन्म आघवें । सोंवळें कीजे
भुतमात्राचेनि नांवें । तृणही नासुडावें ।
किंबहुना सांडावे । छेद भेद
ऐसैसी जैं शरीरीं । रहाटीची पडे उजरी ।
तैं शारीर तप घुमरी । आलें जाण
पार्था समस्तही हें करणें । देहाचेनि प्रधानपणें ।
म्हणौनि ययातें मी म्हणें । शारीर तप
एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें रूप ।
आतां आइक निष्पाप । वाङ्मय तें
तरी लोहाचें आंग तुक । न तोडितांचि कनक ।
केलें जैसें देख । परीसें तेणें
तैसें न दुखवितां सेजे । जावळिया सुख निपजे ।
ऐसें साधुत्व कां देखिजे । बोलणां जिये
पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेंचि जियें ।
तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित
जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी ।
स्नानें पाप ताप वारी । गोडीही दे
तैसा अविवेकुही फिटे । आपुलें अनादित्व भेटे ।
आइकतां रुचि न विटे । पीयुषीं जैसी
जरी कोणी करी पुसणें । तरी होआवें ऐसें बोलणें ।
नातरी अवर्तणें । निगमु का नाम
ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनीं ।
केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा
नातरी एकाधें नांव । तेंचि शैव का वैष्णव ।
वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें
आतां तप जें मानसिक । तेंही सांगों आइक ।
म्हणे लोकनाथनायक । नायकु तो
तरी सरोवर तरंगीं । सांडिलें आकाश मेघीं ।
का चंदनाचें उरगीं । उद्यान जैसें
नाना कळावैषम्यें चंद्रु । कां सांडिला आधीं नरेंद्रु ।
नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळें
तैसीं नाना विकल्पजाळें । सांडुनि गेलिया सकळें ।
मन राहे का केवळें । स्वरूपें जें
तपनेंवीण प्रकाशु । जाड्येंवीण रसीं रसु ।
पोकळीवीण अवकाशु । होय जैसा
तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके ।
हिंवली जैसी आंगिकें । हिवों नेदी निजांग
तैसें न चलतें कळंकेंवीण । शशिबिंब जैसें परीपूर्ण ।
तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें
बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप ।
तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची
म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावें जें वक्त्र ।
तें वाचेचेंही सूत्र । हातीं न धरी
तें स्वलाभ लाभलेपणें । मन मनपणाही धरूं नेणें ।
शिवतलें जैसें लवणें । आपुलें निज
तेथ कें उठिती ते भाव । जिहीं इंद्रियमार्गीं धांव ।
घेऊनि ठाकावे गांव । विषयांचे ते
म्हणौनि तिये मानसीं । भावशुद्धिचि असे अपैसी ।
रोमशुचि जैसी । तळहातासी
काय बहु बोलों अर्जुना । जैं हे दशा ये मना ।
तैं मनोतपाभिधाना । पात्र होय ती
परी ते असो हें जाण । मानस तपाचें लक्षण ।
देवो म्हणे संपूर्ण । सांगितलें
एवं देहवाचाचित्तें । जें पातलें त्रिविधत्वातें ।
तें सामान्य तप तूतें । परीसविलें गा
आतां गुणत्रयसंगें । हेंचि विशेषीं त्रिविधीं रिगे ।
तेंही आइक चांगें । प्रज्ञाबळें
तरी हेंचि तप त्रिविधा । जें दाविलें तुज प्रबुद्धा ।
तेंचि करीं पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ
जैं पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी ।
तैं तयातेंचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे
नातरी तपस्थापनेलागीं । दुजेपण मांडूनि जगीं ।
महत्त्वाच्या शृंगीं । बैसावया
त्रिभुवनींचिया सन्माना । न वचावें ठाया आना ।
धुरेचिया आसना । भोजनालागीं
विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा ।
विश्वें आपलिया यात्रा । कराविया यावें
लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा ।
भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया
अंग बोल माखूनि तपें । विकावया आपणपें ।
अंगहीन पडपे । जियापरी
हें असो धनमानीं आस । वाढौनी तप कीजे सायास ।
तैं तेंचि तप राजस । बोलिजे गा
परी पहुरणी जें दुहिलें । तैं तें गुरूं न दुभेचि व्यालें ।
का उभें शेत चारिलें । पिकावया नुरे
तैसें फोकारितां तप । कीजे जें साक्षेप ।
तें फळीं तंव सोप । निःशेष जाय
ऐसें निर्फळ देखोनि करितां । माझारीं सांडी पंडुसुता ।
म्हणौनि नाहीं स्थिरता । तपा तया
एऱहवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी ।
तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ?
तैसें राजस तप जें होये । तें फळीं कीर वांझ जाये ।
परी आचरणींही नोहे । निर्वाहतें गा
आतां तेंचि तप पुढती । तामसाचिये रीती ।
पैं परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे
केवळ मूर्खपणाचा वारा । जीवीं घेऊनि धनुर्धरा ।
नाम ठेविजे शरीरा । वैरियाचें
पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागीं ।
का इंधन कीजे हें आगी । आंतु लावी
माथां जाळिजती गुगुळु । पाठीं घालिजती गळु ।
आंग जाळिती इंगळु । जळतभीतां
दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायांचि उपवास ।
कां घेपती धूमाचें घांस । अधोमुखें
हिमोदकें आकंठें । खडकें सेविजती तटें ।
जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ
ऐसी नानापरी हे काया । घाय सूतां पैं धनंजया ।
तप कीजे नाशावया । पुढिलातें
आंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा ।
कां आड जालियातें रगडा । करी जैसा
तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया ।
जिणावया शिराणिया । कीजती गा
किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी ।
तप निफजे तें किरीटी । तामस होय
एवं सत्त्वादिकांच्या आंगीं । पाडिलें तप तिहीं भागीं ।
जालें तेंही तुज चांगी । दाविलें व्यक्ती
आतां बोलतां प्रसंगा । आलें म्हणौनि पैं गा ।
करूं रूप दानलिंगा । त्रिविधा तया
येथ गुणाचेनि बोलें । दानही त्रिविध असे जालें ।
तेंचि आइक पहिलें । सात्त्विक ऐसें
तरी स्वधर्मा आंतौतें । जें जें मिळे आपणयातें ।
तें तें दीजे बहुतें । सन्मानयोगें
जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु ।
तैसाचि दानाचा हा लागु । देखतसें
अनर्घ्य रत्न हातां चढे । तैं भांगाराची वोढी पडे ।
दोनी जालीं तरी न जोडे । लेतें आंग
परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकीं मिळती ।
जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयीं
तैसें निफजावया दान । जैं सत्त्वासि ये संवाहन ।
तैं देश काळ भाजन । द्रव्यही मिळे
तरी आधीं तंव प्रयत्नेंसीं । होआवें कुरुक्षेत्र का काशी ।
नातरी तुके जो इहींसीं । तो देशुही हो
तेथ रविचंद्रराहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु ।
का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला
तैशा काळीं तिये देशीं । होआवी पात्र संपत्ती ऐसी ।
मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेंचि कां
आचाराचें मूळपीळ । वेदांची उतारपेठ ।
तैसें द्विजरत्न चोखट । पावोनियां
मग तयाच्या ठाईं वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता ।
परी प्रियापुढें कांता । रिगे जैसी
का जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया ।
नाना हडपें विडा राया । दिधला जैसा
तैसेनि निष्कामें जीवें । भूम्यादिक अर्पावें ।
किंबहुना हांवे । नेदावें उठों
आणि दान जया द्यावें । तयातें ऐसेया पाहावें ।
जया घेतलें नुमचवे । कायसेंनही
साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा ।
का पाहिला आरसा । येरीकडे
नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुकें ।
उधळौनि कवतिकें । न येईजे हाता
नाना वसो घातला चारू । माथां तुरंबिला बुरू ।
न करी प्रत्युपकारू । जियापरी
तैसें दिधलें दातयाचें । जो कोणेही आंगें नुमचे ।
अर्पिलया साम्य तयाचें । कीजे पैं गा
ऐसिया जें सामग्रिया । दान निफजे वीरराया ।
तें सात्त्विक दानवर्या । सर्वांही जाण
आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु ।
दानभागुही निर्मळु । न्यायगतु
परी मनीं धरूनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें ।
का पेंव करूनि आइतें । पेरूं जाइजे
नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतुं जाइजे सोयिरा ।
का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे
पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचें काज कीजे ।
पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी
तैसें जया जें दान देणें । तो तेणेंचि गा जीवनें ।
पुढती भुंजावा भावें येणें । दीजे जें का
अथवा कोणी वाटे जातां । घेतलें उमचों न शकता ।
मिळे जैं पंडुसुता । द्विजोत्तमु
तरी कवड्या एकासाठीं । अशेषां गोत्रांचींच किरीटी ।
सर्व प्रायश्चित्तें सुयें मुठीं । तयाचिये
तेवींचि पारलौकिकें । फळें वांछिजती अनेकें ।
आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे
तेंही ब्राह्मणु नेवो सरे । कीं हाणिचेनि शिणें झांसुरें ।
सर्वस्व जैसें चोरें । नागऊनि नेलें
बहु काय सांगों सुमती । जें दीजे या मनोवृत्ती ।
तें दान गा त्रिजगतीं । राजस पैं
मग म्लेंच्छांचे वसौटें । दांगाणे हन कैकटे ।
का शिबिरें चोहटे । नगरींचे ते
तेही ठाईं मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी ।
तेव्हां उदार होणें धनीं । चोरियेच्या
पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी ।
जिये मूर्तिमंते भुररीं । भुले तया
रूपानृत्याची पुरवणी । ते पुढां डोळेभारणी ।
गीत भाटीव तो श्रवणीं । कर्णजपु
तयाहीवरी अळुमाळु । जैं घे फुलागंधाचा गुगुळु ।
तंव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा
तेथ विभांडूनियां जग । आणिले पदार्थ अनेग ।
तेणें घालूं लागे मातंग । गवादी जैसी
एवं ऐसेनि जें देणें । तें तामस दान मी म्हणें ।
आणि घडे दैवगुणें । आणिकही ऐक
विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे ।
तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं
तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोंही आला ।
तोही दर्पा चढला । भांबावें जरी
तरी श्रद्धा न धरी जिवीं । तया माथाही न खालवी ।
स्वयें न करी ना करवी । अर्घ्यादिक
आलिया न घली बैसों । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो ।
हा अप्रसंगु कीर असो । तामसीं नरीं
पैं बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु ।
तूं करणें याचा बहुतु । प्रयोगु तेथ
आणि जया जें दे किरीटी । तयातें उमाणी तयासाठीं ।
मग कुबोलें कां लोटी । अवज्ञेच्या
हें बहु असो यापरी । मोल वेंचणें जें अवधारीं ।
तया नांव चराचरीं । तामस दान
ऐशीं आपुलाला चिन्हीं । अळंकृतें तिन्हीं ।
दानें दाविलीं अभिधानीं । रजतमाचिया
तेथ मी जाणत असें । विपायें तूं गा ऐसें ।
कल्पिसील मानसें । विचक्षणा
जें भवबंधमोचक । येकलें कर्म सात्त्विक ।
तरी कां वेखासी सदोख । येर बोलावीं ?
परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी ।
का धूं न साहतां जैसी । वाती न लगे
तैसें शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचें कवाड ।
तें भेदणे यातें कीड । म्हणावें कां ?
आम्ही श्रद्धादि दानांत । जें समस्तही क्रियाजात ।
सांगितलें कां व्याप्त । तिहीं गुणीं
तेथ भरंवसेनि तिन्ही । न सांगोंचि ऐसें मानीं ।
परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलों येरें
जें दोहींमाजीं तिजें असे । तें दोन्ही सांडितांचि दिसे ।
अहोरात्रत्यागें जैसें । संध्यारूप
तैसें रजतमविनाशें । तिजें जें उत्तम दिसे ।
तें सत्त्व हें आपैसें । फावासि ये
एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिलें तम रज ।
तें सांडूनि सत्त्वें काज । साधीं आपुलें
सत्त्वेंचि येणें चोखाळें । करीं यज्ञादिकें सकळें ।
पावसी तैं करतळें । आपुलें निज
सूर्यें दाविलें सांतें । काय एक न दिसे तेथें ।
तेवीं सत्त्वें केलें फळातें । काय नेदी ?
हे कीर आवडतांविखीं । शक्ति सत्त्वीं आथी निकी ।
परी मोक्षेंसी एकीं । मिसळणें जें
तें एक आनचि आहे । तयाचा सावावो जैं लाहे ।
तैं मोक्षाचाही होये । गांवीं सरतें
पैं भांगार जऱहीं पंधरें । तऱही राजावळींचीं अक्षरें ।
लाहें तैंचि सरे । जियापरी
स्वच्छें शीतळें सुगंधें । जळें होती सुखप्रदें ।
परी पवित्रत्व संबंधें । तीर्थाचेनि
नयी हो कां भलतैसी थोरी । परी गंगा जैं अंगीकारी ।
तैंचि तिये सागरीं । प्रवेशु गा
तैसें सात्त्विका कर्मां किरीटी । येतां मोक्षाचिये भेटी ।
न पडे आडकाठी । तें वेगळें आहे
हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं ।
म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें
तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती ।
जेणें सात्त्विक तें मुक्ती- । रत्न देखे
तरी अनादि परब्रह्म । जें जगदादि विश्रामधाम ।
तयाचें एक नाम । त्रिधा पैं असे
तें कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती-। ।
माजी वोळखावया श्रुती । खूण केली
उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं ।
ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी
कष्टले संसारशीणें । जे देवों येती गाऱहाणें ।
तयां ओ दे नांवें जेणें । तो संकेतु हा
ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वें तो भेटावा ।
ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदें बापें
मग दाविलेनि जेणें एकें । ब्रह्म आळविलें कवतिकें ।
मागां असत ठाके । पुढां उभें
परी निगमाचळशिखरीं । उपनिषदार्थनगरीं ।
आहाति जे ब्रह्माच्या येकाहारीं । तयांसीच कळे
हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती ।
ते जया एका आवृत्ती । नामाचिये
पैं सृष्टीचिया उपक्रमा-। पूर्वीं गा वीरोत्तमा ।
वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता
मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टिही करूं न शके ।
तो थोरु केला एकें । नामें जेणें
जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां ।
विश्वसृजनयोग्यता । आली तया
तेधवां रचिलें ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन ।
यज्ञा ऐसें वर्तन । जीविकें केलें
पाठीं नेणों किती येर । स्रजिले लोक अपार ।
जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्हीं भुवनें
ऐसें नाममंत्रें जेणें । धातया अढंच करणें ।
तयाचें स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो
तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा ।
आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु
एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु ।
हें फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचें
येणेंसीं गा होऊनि एक । जैं कर्म चाले सात्त्विक ।
तैं कैवल्यातें पाइक । घरींचें करी
परी कापुराचें थळींव । आणून देईल दैव ।
लेवों जाणणेंचि आडव । तेथ असे बापा
तैसें आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम ।
परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचें
तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी ।
मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे
कां ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट ।
घालूनि बांधिली मोट । गळा जेवीं
तैसें तोंडीं ब्रह्मनाम । हातीं तें सात्त्विक कर्म ।
विनियोगेंवीण काम । विफळ होय
अगा अन्न आणि भूक । पासीं असे परी देख ।
जेऊं नेणतां बालक । लंघनचि कीं
का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा ।
हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे
तैसे वेळे कृत्य पावे । तेथिंचा मंत्रुही आठवे ।
परी व्यर्थ तें आघवें । विनियोगेंवीण
म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हें परब्रह्मनाम एक ।
विनियोगु तूं आइक । आतां याचा
तरी या नामींचीं अक्षरें तिन्हीं । कर्मा आदिमध्यनिदानीं ।
प्रयोजावीं पैं स्थानीं । इहीं तिन्हीं
हेंचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी ।
आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये
ब्रह्मेंसीं होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकीं ।
जे चावळलें वोळखीं । शास्त्रांचिया
तो आदि तंव ओंकारु । ध्यानें करिती गोचरु ।
पाठीं आणिती उच्चारु । वाचेही तो
तेणें ध्यानें प्रकटें । प्रणवोच्चारें स्पष्टें ।
लागती मग वाटे । क्रियांचिये
आंधारीं अभंगु दिवा । आडवीं समर्थु बोळावा ।
तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभीं
उचितदेवोद्देशे । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें ।
द्विजद्वारां हन हुताशें । यजिती पैं ते
आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपीं हवनीं ।
यजिती पैं विधानीं । फुडे हौनी
किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग ।
करिती नावडतेया त्याग । उपाधीचा
कां न्यायें जोडला पवित्रीं । भूम्यादिकीं स्वतंत्रीं ।
देशकाळशुद्ध पात्रीं । देती दानें
अथवा एकांतरां कृच्छ्रीं । चांद्रायणें मासोपवासीं ।
शोषोनि गा धातुराशी । करिती तपें
एवं यज्ञदानतपें । जियें गाजती बंधरूपें ।
तिहींच होय सोपें । मोक्षाचें तयां
स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तियांचि जेवीं तरीजे ।
तेवीं बंधकीं कर्मीं सुटिजे । नामें येणें
परी हें असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया ।
ओंकारें सावायिलिया । प्रवर्तती
तिया मोटकिया जेथ फळीं । रिगों पाहाती निहाळीं ।
प्रयोजिती तिये काळीं । तच्छब्दु तो
जें सर्वांही जगापरौतें । जें एक सर्वही देखतें ।
तें तच्छब्दें बोलिजे तें । पैल वस्तु
तें सर्वादिकत्वें चित्तीं । तद्रूप ध्यावूनियां सुमती ।
उच्चारेंही व्यक्ती । आणिती पुढती
म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेंसीं क्रिया इयां ।
तेंचि होतु आम्हां भोगावया । कांहींचि नुरो
ऐसेनि तदात्मकें ब्रह्में । तेथ उगाणूनि कर्में ।
आंग झाडिती न ममें । येणें बोलें
आतां ओंकारें आदरिलें । तत्कारें समर्पिलें ।
इया रिती जया आलें । ब्रह्मत्व कर्मा
तें कर्म कीर ब्रह्माकारें । जालें तेणेंही न सरे ।
जे करी तेणेंसी दुसरें । आहे म्हणौनि
मीठ आंगें जळीं विरे । परी क्षारता वेगळी उरे ।
तैसें कर्म ब्रह्माकारें । गमे तें द्वैत
आणि दुजे जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे ।
हें देवो आपुलेनि तोंडें । बोलती वेद
म्हणौनि परत्वें ब्रह्म असे । तें आत्मत्वें परीयवसे ।
सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें
तरी ओंकार तत्कारीं । कर्म केलें जें ब्रह्मशरीरीं ।
जें प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिलें
प्रशस्तकर्मीं तिये । सच्छब्दा विनियोगु आहे ।
तोचि आइका होये । तैसा सांगों
तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें ।
दाविजे अव्यंगवाणें । सत्तेचें रूप
जें सत् तेंचि काळें देशें । होऊं नेणेचि अनारिसे ।
आपणपां आपण असे । अखंडित
हें दिसतें जेतुलें आहे । तें असतपणें जें नोहे ।
देखतां रूपीं सोये । लाभे जयाची
तेणेंसीं प्रशस्त तें कर्म । जें जालें सर्वात्मक ब्रह्म ।
देखिजे करूनि सम । ऐक्यबोधें
तरी ओंकार तत्कारें । जें कर्म दाविलें ब्रह्माकारें ।
तें गिळूनि होईजे एकसरें । सन्मात्रचि
ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु ।
जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणें हो
ना मीचि जरी हो म्हणें । तरी श्रीरंगीं दुजें हेंचि उणें ।
म्हणौनि हें बोलणें । देवाचेंचि
आतां आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारीं ।
सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो
तरी सत्कर्में चांगें । चालिलीं अधिकारबगें ।
परी एकाधें कां आंगें । हिणावती जैं
तैं उणें एकें अवयवें । शरीर ठाके आघवें ।
कां अंगहीन भांडावें । रथाची गती
तैसें एकेंचि गुणेंवीण । सतचि परी असतपण ।
कर्म धरी गा जाण । जिये वेळे
तेव्हां ओंकार तत्कारीं । सावायिला हा चांगी परी ।
सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु
तें असतपण फेडी । आणी सद्भावाचिये रूढी ।
निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा
दिव्यौषध जैसें रोगिया । कां सावावो ये भंगलिया ।
सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण
अथवा कांहीं प्रमादें । कर्म आपुलिये मर्यादे ।
चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन
चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरें पडे ।
राहाटीमाजीं न घडे । काइ काइ ?
म्हणौनि तैसी कर्मा । राभस्यें सांडे सीमा ।
असाधुत्वाचिया दुर्नामा । येवों पाहे जें
तेथ गा हा सच्छब्दु । येरां दोहींपरीस प्रबुद्धु ।
प्रयोजिला करी साधु । कर्मातें यया
लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी ।
कां मृता जैसी वृष्टी । पीयूषाची
पैं असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा ।
हें असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया
घेऊनि येथिंचें वर्म । जैं विचारिसी हें नाम ।
तैं केवळ हेंचि ब्रह्म । जाणसी तूं
पाहें पां ॐतत्सत् ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे ।
जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात
तें तंव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट ।
तयाचें हें आंतुवट । व्यंजक नाम
परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा ।
या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे
उदयिला आकाशीं । रवीचि रवीतें प्रकाशी ।
हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी
म्हणौनि त्र्यक्षर हें नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म ।
ययालागीं कर्म । जें जें कीजे
तें याग अथवा दानें । तपादिकेंही गहनें ।
तियें निफजतु कां न्यूनें । होऊनि ठातु
परी परीसाचा वरकली । नाहीं चोखाकिडाची बोली ।
तैसी ब्रह्मीं अर्पितां केलीं । ब्रह्मचि होती
उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारीं ।
निवडूं न येती सागरीं । जैसिया नदी
एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती ।
सांगितली उपपत्ती । डोळसा गा
आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा ।
विनियोगु नागरा । बोलिलों रीती
एवं ऐसें सुमहिम । म्हणौनि हें ब्रह्मनाम ।
आतां जाणितलें कीं सुवर्म । राया तुवां ?
तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा ।
जयाचें जालें बंधा । उरों नेदी
जिये कर्मीं हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु ।
तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो
ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे ।
दुराग्रहाची त्राये । वाढऊनियां
मग अश्वमेध कोडी कीजे । रत्नें भरोनि पृथ्वी दीजे ।
एकांगुष्ठींही तपिजे । तपसाहस्रीं
जळाशयाचेनि नांवें । समुद्रही कीजती नवे ।
परी किंबहुना आघवें । वृथाचि तें
खडकावरी वर्षले । जैसें भस्मीं हवन केलें ।
कां खेंव दिधलें । साउलिये
नातरी जैसें चडकणा । गगना हाणितलें अर्जुना ।
तैसा समारंभु सुना । गेलाचि तो
घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे ।
तैसें दरिद्र तेवढें । ठेलेंचि आंगीं
गांठीं बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरीं ।
न सरोनि जैसी मारी । उपवासीं गा
तैसें कर्मजातें तेणें । नाहीं ऐहिकीचें भोगणें ।
तेथ परत्र तें कवणें । अपेक्षावें
म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा ।
हें असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टीं तो
ऐसें कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी ।
श्रीवर वीर नरहरी । बोलिलें तेणें
तेथ निजानंदा बहुवसा-॥ माजीं अर्जुन तो सहसा ।
हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि
अहो संग्रामु हा वाणिया । मापें नाराचांचिया आणिया ।
सूनि माप घे मवणिया । जीवितेंसी
ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें ।
आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाईं
संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझों ये रिपूचिया ।
आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ
हा न पुसता हे गोठी । तरी देवो कां सोडिते गांठी ।
तरी कैसेंनि आम्हां भेटी । परमार्थेंसीं
होतों अज्ञानाच्या आंधारां । वोसंतीत जन्मवाहरा ।
तों आत्मप्रकाशमंदिरा-॥ आंतु आणिलें
एवढा आम्हां तुम्हां थोरु । केला येणें उपकारु ।
म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वें होय
तेवींचि संजयो म्हणे चित्तीं । हा अतिशयो या नृपती ।
खुपेल म्हणौनि किती । बोलत असों
ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली ।
जे पार्थें कां पुसिली । श्रीकृष्णातें
याचें जैसें कां करणें । तैसें मीही करीन बोलणें ।
ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा
वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे ।
तैसें उन्ह मागे । राजसु तो
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0