ज्ञानेश्वरी · अध्याय 18
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अश्टादशोऽध्यायः - अध्याय अठरावा । ।
। मोक्षसंज्ञासयोगः ।
जयजय देव निर्मळ । निजजनाखिलमंगळ ।
जन्मजराजलदजाळ । प्रभंजन
जयजय देव प्रबळ । विदळितामंगळकुळ ।
निगमागमद्रुमफळ । फलप्रद
जयजय देव सकल । विगतविषयवत्सल ।
कलितकाळकौतूहल । कलातीत
जयजय देव निश्चळ । चलितचित्तपानतुंदिल ।
जगदुन्मीलनाविरल । केलिप्रिय
जयजय देव निष्कळ । स्फुरदमंदानंदबहळ ।
नित्यनिरस्ताखिलमळ । मूळभूत
जयजय देव स्वप्रभ । जगदंबुदगर्भनभ ।
भुवनोद्भवारंभस्तंभ । भवध्वंस
जयजय देव विशुद्ध । विदुदयोद्यानद्विरद ।
शमदम\-मदनमदभेद । दयार्णव
जयजय देवैकरूप । अतिकृतकंदर्पसर्पदर्प ।
भक्तभावभुवनदीप । तापापह
जयजय देव अद्वितीय । परीणतोपरमैकप्रिय ।
निजजनजित भजनीय । मायागम्य
जयजय देव श्रीगुरो । अकल्पनाख्यकल्पतरो ।
स्वसंविद्रुमबीजप्ररो । हणावनी
हे काय एकैक ऐसैसें । नानापरीभाषावशें ।
स्तोत्र करूं तुजोद्देशें । निर्विशेषा
जिहींं विशेषणीं विशेषिजे । तें दृश्य नव्हे रूप तुझें ।
हें जाणें मी म्हणौनि लाजें । वानणा इहीं
परी मर्यादेचा सागरु । हा तंवचि तया डगरु ।
जंव न देखे सुधाकरु । उदया आला
सोमकांतु निजनिर्झरींं । चंद्रा अर्घ्यादिक न करी ।
तें तोचि अवधारीं । करवी कीं जी
नेणों कैसी वसंतसंगें । अवचितिया वृक्षाचीं अंगें ।
फुटती तैं हे तयांहि जोगें । धरणें नोहे ?
पद्मिनी रविकिरण । लाहे मग लाजें कवण ? ।
कां जळें शिवतलें लवण । आंग भुले
तैसा तूतें जेथ मी स्मरें । तेथ मीपण मी विसरें ।
मग जाकळिला ढेंकरें । तृप्तु जैसा
मज तुवां जी केलें तैसें । माझें मीपण दवडूनि देशें ।
स्तुतिमिषेंच पां पिसें । बांधलें वाचे
ना येऱहवींं तरी आठवीं । राहोनि स्तुति जैं करावी ।
तैं गुणागुणिया धरावी । सरोभरी कींंं
तरी तूं जी एकरसाचें लिंग । केवीं करूं गुणागुणीं विभाग ।
मोतीं फोडोनि सांधितां चांग । कीं तैसेंचि भलें
आणि बाप तूं माय । इहीं बोलीं ना स्तुति होय ।
डिंभोपाधिक आहे । विटाळु तेथें
जी जालेनि पाइकें आलें । तें गोसावीपण केवीं बोलें ? ।
ऐसें उपाधी उशिटलें । काय वर्णूं
जरी आत्मा तूं एकसरा । हेंही म्हणतां दातारा ।
तरी आंतुल तूं बाहेरा । घापतासी
म्हणौनि सत्यचि तुजलागींं । स्तुति न देखों जी जगीं ।
मौनावांचूनि लेणें आंगीं । सुसीना मा
स्तुति कांहीं न बोलणें । पूजा कांहींं न करणें ।
सन्निधी कांहींंं न होणें । तुझ्या ठायीं
तरी जिंतलें जैसें भुली । पिसें आलापु घाली ।
तैसें वानूं तें माऊली । उपसाहावें तुवां
आतां गीतार्थाची मुक्तमुदी । लावीं माझिये वाग्वृद्धी ।
जे माने हे सभासदीं । सज्जनांच्या
तेथ म्हणितलें श्रीनिवृत्ती । नको हें पुढतपुढती ।
परीसीं लोहा घृष्टी किती । वेळवेळां कीजे गा ।
तंव विनवी ज्ञानदेवो । म्हणे हो कां जी पसावो ।
तरी अवधान देतु देवो । ग्रंथा आतां
जी गीतारत्नप्रासादाचा । कळसु अर्थचिंतामणीचा ।
सर्व गीतादर्शनाचा । पाढाऊं जो
लोकीं तरी आथी ऐसें । जे दुरूनि कळसु दिसे ।
आणी भेटीचि हातवसे । देवतेची तिये
तैसेंचि एथही आहे । जे एकेचि येणें अध्यायें ।
आघवाचि दृष्ट होये । गीतागमु हा
मी कळसु याचि कारणें । अठरावा अध्यायो म्हणें ।
उवाइला बादरायणें । गीताप्रासादा
नोहे कळसापरतें कांहीं । प्रासादीं काम नाहीं ।
तें सांगतसे गीता ही । संपलेपणें
व्यासु सहजें सूत्री बळी । तेणें निगमरत्नाचळीं ।
उपनिषदार्थाची माळी\- । माजीं खांडिली
तेथ त्रिवर्गाचा अणुआरु । आडऊ निघाला जो अपारु ।
तो महाभारतप्राकारु । भोंवता केला
माजीं आत्मज्ञानाचें एकवट । दळवाडें झाडूनि चोखट ।
घडिलें पार्थवैकुंठ\- । संवाद कुसरी
निवृत्तिसूत्र सोडवणिया । सर्व शास्त्रार्थ पुरवणिया ।
आवो साधिला मांडणिया । मोक्षरेखेचा
ऐसेनि करितां उभारा । पंधरा अध्यायांत पंधरा ।
भूमि निर्वाळलिया पुरा । प्रासादु जाहला
उपरी सोळावा अध्यायो । तो ग्रीवघंटेचा आवो ।
सप्तदशु तोचि ठावो । पडघाणिये
तयाहीवरी अष्टादशु । तो अपैसा मांडला कळसु ।
उपरि गीतादिकीं व्यासु । ध्वजें लागला
म्हणौनि मागील जे अध्याये । ते चढते भूमीचे आये ।
तयांचें पुरें दाविताहे । आपुल्या आंगीं
जालया कामा नाहीं चोरी । ते कळसें होय उजरी ।
तेवींं अष्टादशु विवरी । साद्यंत गीता
ऐसा व्यासें विंदाणियें । गीताप्रासादु सोडवणिये ।
आणूनि राखिले प्राणिये । नानापरी
एक प्रदक्षिणा जपाचिया । बाहेरोनि करिती यया ।
एक ते श्रवणमिषें छाया । सेविती ययाची
एक ते अवधानाचा पुरा । विडापाऊड भीतरां ।
घेऊनि रिघती गाभारां । अर्थज्ञानाच्या
ते निजबोधें उराउरी । भेटती आत्मया श्रीहरी ।
परी मोक्षप्रासादीं सरी । सर्वांही आथी
समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरील्या एकचि पक्वान्नें ।
तेवीं श्रवणें अर्थें पठणें । मोक्षुचि लाभे
ऐसा गीता वैष्णवप्रासादु । अठरावा अध्याय कळसु विशदु ।
म्यां म्हणितला हा भेदु । जाणोनियां
आतां सप्तदशापाठीं । अध्याय कैसेनि उठी ।
तो संबंधु सांगो दिठी । दिसे तैसा
का गंगायमुना उदक । वोघबगें वेगळिक ।
दावी होऊनि एक । पाणीपणें
न मोडितां दोन्ही आकार । घडिलें एक शरीर ।
हें अर्धनारी नटेश्वर\- । रूपीं दिसें
नाना वाढिली दिवसें । कळा बिंबीं पैसे ।
परी सिनानें लेवे जैसें । चंद्रीं नाहीं
तैसींं सिनानीं चारीं पदें । श्लोक तो श्लोकावच्छेदें ।
अध्यावो अध्यायभेदें । गमे कीर
परी प्रमेयाची उजरी । आनान रूप न धरी ।
नाना रत्नमणीं दोरी । एकचि जैसी
मोतियें मिळोनि बहुवें । एकावळीचा पाडु आहे ।
परी शोभे रूप होये । एकचि तेथ
फुलांफुलसरां लेख चढे । द्रुतीं दुजी अंगुळी न पडे ।
श्लोक अध्याय तेणें पाडें । जाणावे हे
सात शतें श्लोक । अध्यायां अठरांचे लेख ।
परी देवो बोलिले एक । जें दुजें नाहीं
आणि म्यांही न सांडूनि ते सोये । ग्रंथ व्यक्ति केली आहे ।
प्रस्तुत तेणें निर्वाहे । निरूपण आइका
तरी सतरावा अध्यावो । पावतां पुरता ठावो ।
जें संपतां श्लोकीं देवो । बोलिले ऐसें
अर्जुना ब्रह्मनामाच्याविखीं। बुद्धि सांडूनि आस्तिकीं ।
कर्मे कीजती तितुकींंंं । असंतें होतीं
हा ऐकोनि देवाचा बोलु । अर्जुना आला डोलु ।
म्हणे कर्मनिष्ठां मळु । ठेविला देखों
तो अज्ञानांधु तंव बापुडा । ईश्वरुचि न देखे एवढा ।
तेथ नामचि एक पुढां । कां सुझे तया
आणि रजतमें दोन्हीं । गेलियावीण श्रद्धा सानी ।
ते कां लागे अभिधानीं । ब्रह्माचिये ? ।
मग कोता खेंव देणें । वार्तेवरील धावणें ।
सांडी पडे खेळणें । नागिणीचें तें
तैसीं कर्में दुवाडें । तयां जन्मांतराची कडे ।
दुर्मेळावे येवढे । कर्मामाजीं
ना विपायें हें उजू होये । तरी ज्ञानाची योग्यता लाहे ।
येऱहवीं येणेंचि जाये । निरयालया
कर्मीं हा ठायवरी । आहाती बहुवा अवसरी ।
आतां कर्मठां कैं वारी । मोक्षाची हे
तरी फिटो कर्माचा पांगु । कीजो अवघाचि त्यागु ।
आदरिजो अव्यंगु । संन्यासु हा
कर्मबाधेची कहीं । जेथ भयाची गोठी नाहीं ।
तें आत्मज्ञान जिहीं । स्वाधीन होय
ज्ञानाचें आवाहनमंत्र । जें ज्ञान पिकतें सुक्षेत्र ।
ज्ञान आकर्षितें सूत्र । तंतु जे का
ते दोनी संन्यास त्याग । अनुष्ठूनि सुटे जग ।
तरी हेंचि आतां चांग । व्यक्त पुसों
ऐसें म्हणौनि पार्थें । त्यागसंन्यासव्यवस्थे ।
रूप होआवया जेथें । प्रश्नु केला
तेथ प्रत्युत्तरें बोली । श्रीकृष्णें जे चावळिली ।
तया व्यक्ति जाली । अष्टादशा
एवं जन्यजनकभावें । अध्यावो अध्यायातें प्रसवे ।
आतां ऐका बरवें । पुसिलें जें
तरी पंडुकुमरें तेणें । देवाचें सरतें बोलणें ।
जाणोनि अंतःकरणें । काणी घेतली
येऱहवीं तत्वविषयीं भला । तो निश्चितु असे कीर जाहला ।
परी देवो राहे उगला । तें साहावेना
वत्स धालयाही वरी । धेनू न वचावी दुरी ।
अनन्य प्रीतीची परी । ऐसी आहे
तेणें काजेवीणही बोलावें । तें देखीलें तरी पाहावें ।
भोगितां चाड दुणावे । पढियंतयाठायीं
ऐसी प्रेमाची हे जाती । आणि पार्थ तंव तेचि मूर्ती ।
म्हणौनि करूं लाहे खंती । उगेपणाची
आणि संवादाचेनि मिषें । जे अव्यवहारी वस्तु असे ।
ते भोगिजे कीं जैसें । आरिसां रूप
मग संवादु तोही पारुखे । तरी भोगितां भोगणें थोके ।
हें कां साहवेल सुखें । लांचावलेया ?
यालागीं त्याग संन्यास । पुसावयाचें घेऊनि मिस ।
मग उपलविलें दुस । गीतेंचें तें
अठरावा अध्यावो नोहे । हे एकाध्यायी गीताचि आहे ।
जैं वांसरुचि गाय दुहे । तैं वेळु कायसा
तैसी संपतां अवसरीं । गीता आदरविली माघारीं ।
स्वामी भृत्याचा न करी । संवादु काई ?
परी हें असो ऐसें । अर्जुनें पुसिजत असे ।
म्हणे विनंती विश्वेशें । अवधारिजो
हां जी संन्यासु आणि त्यागु । इयां दोहीं एक अर्थीं लागु ।
जैसा सांघातु आणि संघु । संघातेंचि बोलिजे
तैसेंचि त्यागें आणि संन्यासें । त्यागुचि बोलिजतु असे ।
आमचेनि तंव मानसें । जाणिजे हेंचि
ना कांहीं आथी अर्थभेदु । तो देवो करोतु विशदु ।
तेथ म्हणती श्रीमुकुंदु । भिन्नचि पैं
तरी अर्जुना तुझ्या मनीं । त्याग संन्यास दोनी ।
एकार्थ गमलें हें मानीं । मीही साच
इहीं दोहीं कीर शब्दीं । त्यागुचि बोलिजे त्रिशुद्धी ।
परी कारण एथ भेदीं । येतुलेंचि
जें निपटूनि कर्म सांडिजे । तें सांडणें संन्यासु म्हणिजे ।
आणि फलमात्र का त्यजिजे । तो त्यागु गा
तरी कोणा कर्माचें फळ । सांडिजे कोण कर्म केवळ ।
हेंही सांगों विवळ । चित्त दे पां
तरी आपैसीं दांगें डोंगर । झाडें डाळती अपार ।
तैसें लांबे राजागर । नुठिती ते
न पेरितां सैंघ तृणें । उठती तैसें साळीचें होणें ।
नाहीं गा राबाउणें । जियापरी
कां अंग जाहलें सहजें । परी लेणें उद्यमें कीजे ।
नदी आपैसी आपादिजे । विहिरी जेवीं
तैसें नित्य नैमित्तिक । कर्म होय स्वाभाविक ।
परी न कामितां कामिक । न निफजे जें
कां कामनेचेनि दळवाडें । जें उभारावया घडे ।
अश्वमेधादिक फुडे । याग जेथ
वापी कूप आराम । अग्रहारें हन महाग्राम ।
आणीकही नाना संभ्रम । व्रतांचे ते
ऐसें इष्टापूर्त सकळ । जया कामना एक मूळ ।
जें केलें भोगवी फळ । बांधोनियां
देहाचिया गांवा अलिया । जन्ममृत्यूचिया सोहळिया ।
ना म्हणों नये धनंजया । जियापरी
का ललाटींचें लिहिलें । न मोडे गा कांहीं केलें ।
काळेगोरेपण धुतलें । फिटों नेणे
केलें काम्य कर्म तैसें । फळ भोगावया धरणें बैसे ।
न फेडितां ऋण जैसें । वोसंडीना
कां कामनाही न करितां । अवसांत घडे पंडुसुता ।
तरी वायकांडें न झुंजतां । लागे जैसें
गूळ नेणतां तोंडीं । घातला देचि गोडी ।
आगी मानूनि राखोंडी । चेपिला पोळी
काम्यकर्मी हें एक । सामर्थ्य आथी स्वाभाविक ।
म्हणौनि नको कौतुक । मुमुक्षु एथ
किंबहुना पार्था ऐसें । जें काम्य कर्म गा असे ।
तें त्यजिजे विष जैसें । वोकूनियां
मग तया त्यागातें जगीं । संन्यासु ऐसया भंगीं ।
बोलिजे अंतरंगीं । सर्वद्रष्टा
हें काम्य कर्म सांडणें । तें कामनेतेंचि उपडणें ।
द्रव्यत्यागें दवडणें । भय जैसें
आणि सोमसूर्यग्रहणें । येऊनि करविती पार्वणें ।
का मातापितरमरणें । अंकित जे दिवस
अथवा अतिथी हन पावे । हें ऐसैसें पडे जैं करावें ।
तैं तें कर्म जाणावें । नौमित्तिक गा
वार्षिया क्षोमे गगन । वसंतें दुणावे वन ।
देहा श्रृंगारी यौवन\- । दशा जैसी
का सोमकांतु सोमें पघळें । सूर्यें फांकती कमळें ।
एथ असे तेंचि पाल्हाळे । आन नये
तैसें नित्य जें का कर्म । तेंचि निमित्ताचे लाहे नियम ।
एथ उंचावे तेणें नाम । नैमित्तिक होय
आणि सायंप्रातर्मध्यान्हीं । जें कां करणीय प्रतिदिनीं ।
परी दृष्टि जैसी लोचनीं । अधिक नोहे
कां नापादितां गती । चरणीं जैसी आथी ।
नातरी ते दीप्ती । दीपबिंबीं
वासु नेदितां जैसे । चंदनीं सौरभ्य असे ।
अधिकाराचे तैसें । रूपचि जें
नित्य कर्म ऐसें जनीं । पार्था बोलिजे तें मानीं ।
एवं नित्य नैमित्तिक दोन्हीं । दाविलीं तुज
हेंचि नित्य नैमित्तिक । अनुष्ठेय आवश्यक ।
म्हणौनि म्हणोंं पाहती एक । वांझ ययातें
परी भोजनीं जैसें होये । तृप्ति लाहे भूक जाये ।
तैसे नित्यनैमित्तिकीं आहे । सर्वांगीं फळ
कीड आगिठां पडे । तरी मळु तुटे वानी चढे ।
यया कर्मा तया सांगडें । फळ जाणावें
जे प्रत्यवाय तंव गळे । स्वाधिकार बहुवें उजळे ।
तेथ हातोफळिया मिळे । सद्गतीसी
येवढेवरी ढिसाळ । नित्यनैमित्तिकीं आहे फळ ।
परी तें त्यजिजे मूळ । नक्षत्रीं जैसें
लता पिके आघवी । तंव च्यूत बांधे पालवीं ।
मग हात न लावित माधवीं । सोडूनि घाली
तैसी नोलांडितां कर्मरेखा । चित्त दीजे नित्यनैमित्तिका ।
पाठीं फळा कीजे अशेखा । वांताचे वानी
यया कर्म फळत्यागातें । त्यागु म्हणती पैं जाणते ।
एवं त्याग संन्यास तूतें । परीसविले
हा संन्यासु जैं संभवे । तैं काम्य बाधूं न पावे ।
निषिद्ध तंव स्वभावें । निषेधें गेलें
आणि नित्यादिक जें असे । तें येणें फलत्यागें नसे ।
शिर लोटलिया जैसें । येर आंग
मग सस्य फळपाकांत । तैसें निमालिया कर्मजात ।
आत्मज्ञान गिंवसीत । अपैसें ये
ऐसिया निगुती दोनी । त्याग संन्यास अनुष्ठानीं ।
पडले गा आत्मज्ञानीं । बांधती पाटु
नातरी हे निगुती चुके । मग त्यागु कीजे हाततुकें ।
तैं कांहीं न त्यजे अधिकें । गोंवींचि पडे
जें औषध व्याधी अनोळख । तें घेतलिया परतें विख ।
कां अन्न न मानितां भूक । मारी ना काय ?
म्हणौनि त्याज्य जें नोहे । तेथ त्यागातें न सुवावें ।
त्याज्यालागीं नोहावें । लोभापर
चुकलिया त्यागाचें वेझें । केला सर्वत्यागुही होय वोझें ।
न देखती सर्वत्र दुजें । वीतराग ते
एकां फळाभिलाष न ठके । ते कर्मांते म्हणती बंधकें ।
जैसें आपण नग्न भांडकें । जगातें म्हणे
कां जिव्हालंपट रोगिया । अन्नें दूषी धनंजया ।
आंगा न रुसे कोढिया । मासियां कोपे
तैसे फळकाम दुर्बळ । म्हणती कर्मचि किडाळ ।
मग निर्णयो देती केवळ । त्यजावें ऐसा
एक म्हणती यागादिक । करावेंचि आवश्यक ।
जे यावांचूनि शोधक । आन नसे
मनशुद्धीच्या मार्गीं । जैं विजयी व्हावें वेगीं ।
तैं कर्म सबळालागीं । आळसु न कीजे
भांगार आथी शोधावें । तरी आगी जेवी नुबगावें ।
कां दर्पणालागीं सांचावें । अधिक रज
नाना वस्त्रें चोख होआवीं । ऐसें आथी जरी जीवीं ।
तरी संवदणी न मनावी । मलिन जैसी
तैसीं कर्में क्लेशकारें । म्हणौनि न न्यावीं अव्हेरें ।
कां अन्नलाभें अरुवारें । रांधितिये उणें
इहीं इहीं गा शब्दीं । एक कर्मीं बांधिती बुद्धी ।
ऐसा त्यागु विसंवादीं । पडोनि ठेला
तरी विसंवादु तो फिटे । त्यागाचा निश्चयो भेटे ।
तैसें बोलों गोमटें । अवधान देईं
तरी त्यागु एथें पांडवा । त्रिविधु पैं जाणावा ।
तया त्रिविधाही बरवा । विभाग करूं
त्यागाचे तीन्ही प्रकार । कीजती जरी गोचर ।
तरी तूं इत्यर्थाचें सार । इतुलें जाण
मज सर्वज्ञाचिये बुद्धी । जें अलोट माने त्रिशुद्धी ।
निश्चयतत्व तें आधीं । अवधारीं पां
तरी आपुलिये सोडवणें । जो मुमुक्षु जागों म्हणे ।
तया सर्वस्वें करणें । हेंचि एक
जियें यज्ञदानतपादिकें । इयें कर्में आवश्यकें ।
तियें न सांडावीं पांथिकें । पाउलें जैसीं
हारपलें न देखिजे । तंव तयाचा मागु न सांडिजे ।
कां तृप्त न होतां न लोटिजे । भाणें जेवीं
नाव थडी न पवतां । न खांडिजे केळी न फळतां ।
कां ठेविलें न दिसतां । दीपु जैसा
तैसी आत्मज्ञानविखीं । जंव निश्चिती नाहीं निकी ।
तंव नोहावें यागादिकीं । उदासीन
तरी स्वाधिकारानुरुपें । तियें यज्ञदानें तपें ।
अनुष्ठावींचि साक्षेपें । अधिकेंवर
जें चालणें वेगावत जाये । तो वेगु बैसावयाचि होये ।
तैसा कर्मातिशयो आहे । नैष्कर्म्यालागीं
अधिकें जंव जंव औषधी । सेवनेची मांडी बांधी ।
तंव तंव मुकिजे व्याधी । तयाचिये
तैसीं कर्में हातोपातीं । जैं कीजती यथानिगुती ।
तैं रजतमें झडती । झाडा देऊनी
कां पाठोवाटीं पुटें । भांगारा खारु देणें घटे ।
तैं कीड झडकरी तुटे । निर्व्याजु होय
तैसें निष्ठा केलें कर्म । तें झाडी करूनि रजतम ।
सत्वशुद्धीचें धाम । डोळां दावी
म्हणौनियां धनंजया । सत्वशुद्धी गिंवसितया ।
तीर्थांचिया सावाया । आलीं कर्में
तीर्थें बाह्यमळु क्षाळे । कर्में अभ्यंतर उजळे ।
एवं तीर्थें जाण निर्मळें । सत्कर्मे.चि
तृषार्ता मरुदेशीं । झळे अमृतें वोळलीं जैसींं ।
कीं अंधालागीं डोळ्यांसी । सूर्यु आला
बुडतया नदीच धाविन्नली । पडतया पृथ्वीच कळवळिली ।
निमतया मृत्यूनें दिधली । आयुष्यवृद्धी
तैसें कर्में कर्मबद्धता । मुमुक्षु सोडविले पंडुसुता ।
जैसा रसरीति मरतां । राखिला विषें
तैसीं एके हातवटिया । कर्में कीजती धनंजया ।
बंधकेंचि सोडवावया । मुख्यें होती
आतां तेचि हातवटी । तुज सांगों गोमटी ।
जया कर्मातें किरीटी । कर्मचि रुसे
तरी महायागप्रमुखें । कर्मे निफजतांही अचुकें ।
कर्तेपणाचें न ठाके । फुंजणें आंगीं
जो मोलें तीर्था जाये । तया मी यात्रा करितु आहे ।
ऐसिये श्लाघ्यतेचा नोहे । तोषु जेवीं
कां मुद्रा समर्थाचिया । जो एकवटु झोंबे राया ।
तो मी जिणता ऐसिया । न येचि गर्वा
जो कासें लागोनि तरे । तया पोहती ऊर्मी नुरे ।
पुरोहितु नाविष्करे । दातेपणें
तैसें कर्तृत्व अहंकारें । नेघोनि यथा अवसरें ।
कृत्यजातांचें मोहरें । सारीजती
केल्या कर्मा पांडवा । जो आथी फळाचा यावा ।
तया मोहरा हों नेदावा । मनोरथु
आधींचि फळीं आस तुटिया । कर्मे आरंभावीं धनंजया ।
परावें बाळ धाया । पाहिजे जैसें
पिंपरुवांचिया आशा । न शिंपिजे पिंपळु जैसा ।
तैसिया फळनिराशा । कीजती कर्में
सांडूनि दुधाची टकळी । गोंवारी गांवधेनु वेंटाळी ।
किंबहुना कर्मफळीं । तैसें कीजे
ऐसी हे हातवटी । घेऊनि जे क्रिया उठी ।
आपणा आपुलिया गांठी । लाहेची तो
म्हणौनि फळीं लागु । सांडोनि देहसंगु ।
कर्में करावीं हा चांगु । निरोपु माझा
जो जीवबंधीं शिणला । सुटके जाचे आपला ।
तेणें पुढतपुढतीं या बोला । आन न कीजे
नातरी आंधाराचेनि रोखें । जैसीं डोळां रोंविजती नखें ।
तैसा कर्मद्वेषें अशेखें । कर्मेंचि सांडी
तयाचें जें कर्म सांडणें । तें तामस पैं मी म्हणें ।
शिसाराचे रागें लोटणें । शिरचि जैसें
हां गा मार्गु दुवाडु होये । तरी निस्तरितील पाये ।
कीं तेचि खांडणें आहे । मार्गापराधें
भुकेलियापुढें अन्न । हो कां भलतैसें उन्ह ।
तरी बुद्धी न घेतां लंघन । भाणें पापरां हल्या
तैसा कर्माचा बाधु कर्में । निस्तरीजे करितेनि वर्में ।
हे तामसु नेणें भ्रमें । माजविला
कीं स्वभावें आलें विभागा । तें कर्मचि वोसंडी पैं गा ।
तरी झणें आतळा त्यागा । तामसा तया
अथवा स्वाधिकारु बुझे । आपले विहितही सुजे ।
परी करितया उमजे । निबरपणा
जे कर्माची ऐलीकड । नावेक दिसे दुवाड ।
जे वाहतिये वेळे जड । शिदोरी जैसी
जैसा निंब जिभे कडवटु । हिरडा पहिलें तुरटु ।
तैसा कर्मा ऐल शेवटु । खणुवाळा होय
कां धेनु दुवाड शिंग । शेवंतीये अडव आंग ।
भोजनसुख महाग । पाकु करितां
तैसें पुढतपुढती कर्म । आरंभींच अति विषम ।
म्हणौनि तो तें श्रम । करितां मानी
येऱहवीं विहितत्वें मांडी । परी घालितां असुरवाडीं ।
तेथ पोळला ऐसा सांडी । आदरिलेंही
म्हणे वस्तु देहासारिखी । आली बहुतीं भाग्यविशेखीं ।
मा जाचूं कां कर्मादिकीं । पापिया जैसा ?
केलें कर्मीं जे द्यावें । तें झणें मज होआवें ।
आजि भोगूं ना कां बरवे । हातींचे भोग ?
ऐसा शरीराचिया क्लेशा । भेणें कर्में वीरेशा ।
सांडी तो परीयेसा । राजसु त्यागु
येऱहवीं तेथही कर्म सांडे । परी तया त्यागफळ न जोडे ।
जैसें उतलें आगीं पडे । तें नलगेचि होमा
कां बुडोनि प्राण गेले । ते अर्धोदकीं निमाले ।
हें म्हणों नये जाहलें । दुर्मरणचि
तैसें देहाचेनि लोभें । जेणें कर्मा पाणी सुभे ।
तेणें साच न लभे । त्यागाचें फळ
किंबहुना आपुलें । जैं ज्ञान होय उदया आलें ।
तैं नक्षत्रातें पाहलें । गिळी जैसें
तैशा सकारण क्रिया । हारपती धनंजया ।
तो कर्मत्यागु ये जया । मोक्षफळासी
तें मोक्षफळ अज्ञाना । त्यागिया नाहीं अर्जुना ।
म्हणौनि तो त्यागु न माना । राजसु जो
तरी कोणे पां एथ त्यागें । तें मोक्षफळ घर रिघे ।
हेंही आइक प्रसंगे । बोलिजेल
तरी स्वाधिकाराचेनि नांवें । जें वांटिया आलें स्वभावें ।
तें आचरे विधिगौरवें । शृंगारोनि
परी हें मी करितु असें । ऐसा आठवु त्यजी मानसें ।
तैसेचि पाणी दे आशे । फळाचिये
पैं अवज्ञा आणि कामना । मातेच्या ठायीं अर्जुना ।
केलिया दोनी पतना । कारण होती
तरी दोनीं यें त्यजावीं । मग माताची ते भजावी ।
वांचूनि मुखालागीं वाळावी । गायचि सगळी ?
आवडतियेही फळीं । असारें साली आंठोळीं ।
त्यासाठीं अवगळी । फळातें कोण्ही ?
तैसा कर्तृत्वाचा मदु । आणि कर्मफळाचा आस्वादु ।
या दोहींचें नांव बंधु । कर्माचा कीं
तरी या दोहींच्या विखीं । जैसा बापु नातळे लेंकीं ।
तैसा हों न शके दुःखी । विहिता क्रिया
हा तो त्याग तरुवरु । जो गा मोक्षफळें ये थोरु ।
सात्विक ऐसा डगरु । यासींच जगीं
आतां जाळूनि बीज जैसें । झाडा कीजे निर्वंशें ।
फळ त्यागूनि कर्म तैसें । त्यजिलें जेणें
लोह लागतखेंवो परीसीं । धातूची गंधिकाळिमा जैसी ।
जाती रजतमें तैसीं । तुटलीं दोन्ही
मग सत्वें चोखाळें । उघडती आत्मबोधाचे डोळे ।
तेथ मृगांबु सांजवेळे । होय जैसें
तैसा बुद्ध्यादिकांपुढां । असतु विश्वाभासु हा येवढा ।
तो न देखे कवणीकडां । आकाश जैसें
म्हणौनि प्राचिनाचेनि बळें । अलंकृतें कुशलाकुशलें ।
तियें व्योमाआंगीं आभाळें । जिरालीं जैसीं
तैसीं तयाचिये दिठी । कर्में चोखाळलीं किरीटी ।
म्हणौनि सुखदुःखीं उठी । पडेना तो
तेणें शुभकर्म जाणावें । मग तें हर्षें करावें ।
कां अशुभालागीं होआवें । द्वेषिया ना
तरी इयाविषयींचा कांहीं । तया एकुही संदेहो नाहीं ।
जैसा स्वप्नाच्या ठायीं । जागिन्नलिया
म्हणौनि कर्म आणि कर्ता । या द्वैतभावाची वार्ता ।
नेणें तो पंडुसुता । सात्विक त्यागु
ऐसेनि कर्में पार्था । त्यजिलीं त्यजिती सर्वथा ।
अधिकें बांधिती अन्यथा । सांडिलीं तरी
आणि हां गा सव्यसाची । मूर्ति लाहोनि देहाची ।
खंती करिती कर्माची । ते गांवढे गा
मृत्तिकेचा वीटु । घेऊनि काय करील घटु ? ।
केउता ताथु पटु । सांडील तो ?
तेवींचि वन्हित्व आंगीं । आणि उबे उबगणें आगी ।
कीं तो दीपु प्रभेलागीं । द्वेषु करील काई ?
हिंगु त्रासिला घाणी । तरी कैचें सुगंधत्व आणी ? ।
द्रवपण सांडूनि पाणी । कें राहे तें ?
तैसा शरीराचेनि आभासें । नांदतु जंव असे ।
तंव कर्मत्यागाचें पिसें । काइसें तरी ?
आपण लाविजे टिळा । म्हणौनि पुसों ये वेळोवेळा ।
मा घाली फेडी निडळा । कां करूं ये गा ?
तैसें विहित स्वयें आदरिलें । म्हणौनि त्यजूं ये त्यजिलें ।
परी कर्मचि देह आतलें । तें कां सांडील गा ?
जें श्वासोच्छ्वासवरी । होत निजेलियाहीवरी ।
कांहीं न करणेंयाचि परी । होती जयाची
या शरीराचेनि मिसकें । कर्मची लागलें असिकें ।
जितां मेलया न ठाके । इया रीती
यया कर्मातें सांडिती परी । एकीचि ते अवधारीं ।
जे करितां न जाइजे हारीं । फळशेचिये
कर्मफळ ईश्वरीं अर्पे । तत्प्रसादें बोधु उद्दीपें ।
तेथ रज्जुज्ञानें लोपे । व्याळशंका
तेणें आत्मबोधें तैसें । अविद्येसीं कर्म नाशे ।
पार्था त्यजिजे जैं ऐसें । तैं त्यजिलें होय
म्हणौनि इयापरी जगीं । कर्में करितां मानूं त्यागी ।
येर मुर्छने नांव रोगी । विसांवा जैसा
तैसा कर्मीं शिणे एकीं । तो विसांवो पाहे आणिकीं ।
दांडेयाचे घाय बुकी । धाडणें जैसें
परी हें असो पुढती । तोचि त्यागी त्रिजगतीं ।
जेणें फळत्यागें निष्कृती । नेलें कर्म
येऱहवीं तरी धनंजया । त्रिविधा कर्मफळा गा यया ।
समर्थ ते कीं भोगावया । जे न सांडितीचि आशा
आपणचि विऊनि दुहिता । कीं न मम म्हणे पिता ।
तो सुटे कीं प्रतिग्रहीता । जांवई शिरके
विषाचे आगरही वाहती । तें विकितां सुखें लाभे जिती ।
येर निमालें जे घेती । वेंचोनि मोलें
तैसें कर्ता कर्म करू । अकर्ता फळाशा न धरू ।
एथ न शके आवरूं । दोहींतें कर्म
वाटे पिकलिया रुखाचें । फळ अपेक्षी तयाचें ।
तेवीं साधारण कर्माचें । फळ घे तया
परी करूनि फळ नेघे । तो जगाच्या कामीं न रिघे ।
जे त्रिविध जग अवघें । कर्मफळ हें
देव मनुष्य स्थावर । यया नांव जगडंबर ।
आणि हे तंव तिन्ही प्रकार । कर्मफळांचे
तेंचि एक गा अनिष्ट । एक तें केवळ इष्ट ।
आणि एक इष्टानिष्ट । त्रिविध ऐसें
परी विषयमंतीं बुद्धी । आंगीं सूनि अविधी ।
प्रवर्तती जे निषिद्धीं । कुव्यापारीं
तेथ कृमि कीट लोष्ट । हे देह लाहती निकृष्ट ।
तया नाम तें अनिष्ट । कर्मफळ
कां स्वधर्मा मानु देतां । स्वाधिकारु पुढां सूतां ।
सुकृत कीजे पुसतां । आम्नायातें
तैं इंद्रादिक देवांचीं । देहें लाहिजती सव्यसाची ।
तया कर्मफळा इष्टाची । प्रसिद्धि गा
आणि गोड आंबट मिळे । तेथ रसांतर फरसाळें ।
उठी दोंही वेगळें । दोहीं जिणतें
रेचकुचि योगवशें । होय स्तंभावयादोषें ।
तेवीं सत्यासत्य समरसें । सत्यासत्यचि जिणिजे
म्हणौनि समभागें शुभाशुभें । मिळोनि अनुष्ठानाचें उभें ।
तेणें मनुष्यत्व लाभे । तें मिश्र फळ
ऐसें त्रिविध यया भागीं । कर्मफळ मांडलेसें जगीं ।
हें न सांडी तयां भोगीं । जें सूदले आशा
जेथें जिव्हेचा हातु फांटे । तंव जेवितां वाटे गोमटें ।
मग परीणामीं शेवटें । अवश्य मरण
संवचोरमैत्री चांग । जंव न पविजे तें दांग ।
सामान्या भली आंग । न शिवे तंव
तैसीं कर्में करितां शरीरीं । लाहती महत्त्वाची फरारी ।
पाठीं निधनीं एकसरी । पावती फळें
तैसा समर्थु आणि ऋणिया । मागों आला बाइणिया ।
न लोटे तैसा प्राणिया । पडे तो भोगु
मग कणिसौनि कणु झडे । तो विरूढला कणिसा चढे ।
पुढती भूमी पडे । पुढती उठी
तैसें भोगीं जें फळ होय । तें फळांतरें वीत जाय ।
चालतां पावो पाय । जिणिजे जैसा
उताराचिये सांगडी । ठाके ते ऐलीच थडी ।
तेवीं न मुकीजती वोढी । भोग्याचिये
पैं साध्यसाधनप्रकारें । फळभोगु तो पसरे ।
एवं गोंविले संसारें । अत्यागी ते
येऱहवीं जाईचियां फुलां फांकणें । त्याचि नाम जैसें सुकणें ।
तैसें कर्ममिषें न करणें । केलें जिहीं
बीजचि वरोसि वेंचे । तेथ वाढती कुळवाडी खांचे ।
तेवीं फळत्यागें कर्माचें । सारिलें काम
ते सत्वशुद्धि साहाकारें । गुरुकृपामृततुषारें ।
सासिन्नलेनि बोधें वोसरे । द्वैतदैन्य
तेव्हां जगदाभासमिषें । स्फुरे तें त्रिविध फळ नाशे ।
एथ भोक्ता भोग्य आपैसें । निमालें हें
घडे ज्ञानप्रधानु हा ऐसा । संन्यासु जयां वीरेशा ।
तेचि फलभोग सोसा । मुकले गा
आणि येणें कीर संन्यासें । जैं आत्मरूपीं दिठी पैसे ।
तैं कर्म एक ऐसें । देखणें आहे ?
पडोनि गेलिया भिंती । चित्रांची केवळ होय माती ।
कां पाहालेया राती । आंधारें उरे ?
जैं रूपचि नाहीं उभें । तैं साउली काह्याची शोभे ? ।
दर्पणेवीण बिंबें । वदन कें पां ?
फिटलिया निद्रेचा ठावो । कैचा स्वप्नासि प्रस्तावो ? ।
मग साच का वावो । कोण म्हणे ?
तैसें गा संन्यासें येणें । मूळ अविद्येसीचि नाहीं जिणें ।
मा तियेचें कार्य कोणें । घेपे दीजे ?
म्हणौनि संन्यासी ये पाहीं । कर्माची गोठी कीजेल खई ।
परी अविद्या आपुलाम् देहीं । आहे जै कां
जैं कर्तेपणाचेनि थांवें । आत्मा शुभाशुभीं धांवें ।
दृष्टि भेदाचिये राणिवे । रचलीसे जैं
तैं तरी गा सुवर्मा । बिजावळी आत्मया कर्मा ।
अपाडें जैसी पश्चिमा । पूर्वेसि कां
नातरी आकाशा का आभाळा । सूर्या आणि मृगजळा ।
बिजावळी भूतळा । वायूसि जैसी
पांघरौनि नईचें उदक । असे नईचिमाजीं खडक ।
परी जाणिजे का वेगळिक । कोडीची ते
हो कां उदकाजवळी । परी सिनानीचि ते बाबुळी ।
काय संगास्तव काजळी । दीपु म्हणों ये ?
जरी चंद्रीं जाला कलंकु । तरी चंद्रेसीं नव्हे एकु ।
आहे दृष्टी डोळ्यां विवेकु । अपाडु जेतुला
नाना वाटा वाटे जातया । वोघा वोघीं वाहातया ।
आरसा आरसां पाहातया । अपाडु जेतुला
पार्था गा तेतुलेनि मानें । आत्मेंनिसीं कर्म सिनें ।
परी घेवविजे अज्ञानें । तें कीर ऐसें
विकाशें रवीतें उपजवी । द्रुती अलीकरवी भोगवी ।
ते सरोवरीं कां बरवी । अब्जिनी जैसी
पुढतपुढती आत्मक्रिया । अन्यकारणकाचि तैशिया ।
करूं पांचांही तयां । कारणां रूप
आणि पांचही कारणें तियें । तूंही जाणसील विपायें ।
जें शास्त्रें उभऊनी बाहे । बोलती तयांते
वेदरायाचिया राजधानीं । सांख्यवेदांताच्या भुवनीं ।
निरूपणाच्या निशाणध्वनीं । गर्जती जियें
जें सर्वकर्मसिद्धीलागीं । इयेंचि मुद्दलें हो जगीं ।
तेथ न सुवावा अभंगीं । आत्मराजु
ह्या बोलाचि डांगुरटी । तियें प्रसिद्धीचि आली किरीटी ।
म्हणौनि तुझ्या हन कर्णपुटीं । वसों हें काज
आणि मुखांतरीं आइकिजे । तैसें कायसें हें ओझें ।
मी चिद्रत्न तुझें । असतां हातीं
दर्पणु पुढां मांडलेया । कां लोकांचियां डोळयां ।
मानु द्यावा पहावया । आपुलें निकें
भक्त जैसेनि जेथ पाहे । तेथ तें तेंचि होत जाये ।
तो मी तुझें जाहालों आहें । खेळणें आजी
ऐसें हें प्रीतीचेनि वेगें । देवो बोलतां से नेघे ।
तंव आनंदामाजीं आंगें । विरतसे येरु
चांदिणियाचा पडिभरु । होतां सोमकांताचा डोंगरु ।
विघरोनि सरोवरु । हों पाहे जैसा
तैसें सुख आणि अनुभूती । या भावांची मोडूनि भिंती ।
आतलें अर्जुनाकृति । सुखचि जेथ
तेथ समर्थु म्हणौनि देवा । अवकाशु जाहला आठवा ।
मग बुडतयाचा धांवा । जीवें केला
अर्जुना येसणें धेंडें । प्रज्ञा पसरेंसीं बुडे ।
आलें भरतें एवढें । तें काढूनि पुढती
देवो म्हणे हां गा पार्था । तूं आपणपें देख सर्वथा ।
तंव श्वासूनि येरें माथा । तुकियेला
म्हणे जाणसी दातारा । मी तुजशीं व्यक्तिशेजारा ।
उबगला आजी एकाहारा । येवों पाहें
तयाही हा ऐसा । लोभें देतसां जरी लालसा ।
तरी कां जी घालीतसां । आड आड जीवा ?
तेथ श्रीकृष्ण म्हणती निकें । अद्यापि नाहीं मा ठाऊकें ।
वेडया चंद्रा आणि चंद्रिके । न मिळणें आहे ?
आणि हाही बोलोनि भावो । तुज दाऊं आम्ही भिवों ।
जे रुसतां बांधे थांवो । तें प्रेम गा हें
एथ एकमेकांचिये खुणें । विसंवादु तंवचि जिणें ।
म्हणौनि असो हें बोलणें । इयेविषयींचें
मग कैशी कैशी ते आतां । बोलत होतों पंडुसुता ।
सर्व कर्मा भिन्नता । आत्मेनिसीं
तंव अर्जुन म्हणे देवें । माझिये मनींचेंचि स्वभावें ।
प्रस्ताविलें बरवें । प्रमेय तें जी
जें सकळ कर्माचें बीज । कारणपंचक तुज ।
सांगेन ऐसी पैज । घेतली कां
आणि आत्मया एथ कांहीं । सर्वथा लागु नाहीं ।
हें पुढारलासि ते देईं । लाहाणें माझें
यया बोला विश्वेशें । म्हणितलें तोषें बहुवसे ।
इयेविषयीं धरणें बैसे। ऐसें कें जोडे ?
तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल ।
परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज
तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो ? ।
इये गोंठीस कीं राखत आहों । मीतूंपण जी ?
एथ श्रीकृष्ण म्हणती हो कां । आतां अवधानाचा पसरु निका ।
करूनियां आइका । पुढारलों तें
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा ।
होतसे बहिरबाहिरा । करणीं पांचें
आणि पांच कारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे ।
ते हेतुस्तव घडे । पांच आथी
येर आत्मतत्त्व उदासीन । तें ना हेतु ना उपादान ।
ना ते अंगें करी संवाहन । कर्मसिद्धीचें
तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं ।
राती दिवो आकाशीं । जियापरी
तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु ।
जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणें
नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे ।
चालविजे अनिळें । उदक तें साक्षी
कां कवणे एकें पिंडे । वेंचितां अवतरे भांडें ।
मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र
आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें ।
आधारावांचूनि वेंचे । विचारीं पां ।
हेंहि असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया ।
कोण काम सवितया । आंगा आलें ?
तैसें पांचहेतुमिळणीं । पांचेंचि इहीं कारणीं ।
कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना
आतां तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं ।
तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं
तैसीं यथा लक्षणें । आइकें कर्म\-कारणें ।
तरी देह हें मी म्हणें । पहिलें एथ
ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें ।
जे स्वभोग्येंसीं वसे । भोक्ता येथ
इंद्रियांच्या दाहें हातीं । जाचोनियां दिवोराती ।
सुखदुःखें प्रकृती । जोडीजती जियें
तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा ।
म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह
हें चोविसांही तत्वांचें । कुटुंबघर वस्तीचें ।
तुटे बंधमोक्षाचें । गुंथाडे एथ
किंबहुना अवस्थात्रया । हें अधिष्ठान धनंजया ।
म्हणौनि देहा यया । हेंचि नाम
आणि कर्ता हें दुजें । कर्माचें कारण जाणिजे ।
प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें
आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर ।
मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं
कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे ।
मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें ।
आभासोनि आविष्करें । देहपणें जें
जया विसराच्या देशीं । प्रसिद्धि गा जीवु ऐसी ।
जेणें भाष केली देहेंसी । आघवाविषयीं
प्रकृति करी कर्में । तीं म्यां केलीं म्हणे भ्रमें ।
येथ कर्ता येणें नामें । बोलिजे जीवु
मग पातेयांच्या केशीं । एकीच उठी दिठी जैसी ।
मोकळी चवरी ऐसी । चिरीव गमे
कां घराआंतुल एकु । दीपाचा तो अवलोकु ।
गवाक्षभेदें अनेकु । आवडे जेवीं
कां एकुचि पुरुषु जैसा । अनुसरत नवां रसां ।
नवविधु ऐसा । आवडों लागे
तेवीं बुद्धीचें एक जाणणें । श्रोत्रादिभेदें येणें ।
बाहेरी इंद्रियपणें । फांके जें कां
तें पृथग्विध करण । कर्माचें इया कारण ।
तिसरें गा जाण । नृपनंदना
आणि पूर्वपश्चिमवाहणीं । निघालिया वोघाचिया मिळणी ।
होय नदी नद पाणी । एकचि जेवीं
तैसी क्रियाशक्ति पवनीं । असे जे अनपायिनी ।
ते पडिली नानास्थानीं । नाना होय
जैं वाचे करी येणें । तैं तेंचि होय बोलणें ।
हाता आली तरी घेणें । देणें होय
अगा चरणाच्या ठायीं । तरी गति तेचि पाहीं ।
अधोद्वारीं दोहीं । क्षरणें तेचि
कंदौनि हृदयवरी । प्रणवाची उजरी ।
करितां तेचि शरीरीं । प्राणु म्हणिजे
मग उर्ध्वींचिया रिगानिगा । पुढती तेचि शक्ति पैं गा ।
उदानु ऐसिया लिंगा । पात्र जाहली
अधोरंध्राचेनि वाहें । अपानु हें नाम लाहे ।
व्यापकपणें होये । व्यानु तेचि
आरोगिलेनि रसें । शरीर भरी सरिसें ।
आणि न सांडितां असे । सर्वसंधीं
ऐसिया इया राहटीं । मग तेचि क्रिया पाठीं ।
समान ऐसी किरीटी । बोलिजे गा
आणि जांभई शिंक ढेंकर । ऐसैसा होतसे व्यापार ।
नाग कूर्म कृकर । इत्यादि होय
एवं वायूची हे चेष्टा । एकीचि परी सुभटा ।
वर्तनास्तव पालटा । येतसे जे
तें भेदली वृत्तिपंथें । वायुशक्ति गा एथें ।
कर्मकारण चौथें । ऐसें जाण
आणि ऋतु बरवा शारदु । शारदीं पुढती चांदु ।
चंद्री जैसा संबंधु । पूर्णिमेचा
कां वसंतीं बरवा आरामु । आरामींही प्रियसंगमु ।
संगमीं आगमु । उपचारांचा
नाना कमळीं पांडवा । विकासु जैसा बरवा ।
विकासींही यावा । परागाचा
वाचे बरवें कवित्व । कवित्वीं बरवें रसिकत्व ।
रसिकत्वीं परतत्व । स्पर्शु जैसा
तैसी सर्ववृत्तिवैभवीं । बुद्धिचि एकली बरवी ।
बुद्धिही बरव नवी । इंद्रियप्रौढी
इंद्रियप्रौढीमंडळा । शृंगारु एकुचि निर्मळा ।
जैं अधिष्ठात्रियां कां मेळा । देवतांचा जो
म्हणौनि चक्षुरादिकीं दाहें । इंद्रियां पाठीं स्वानुग्रहें ।
सूर्यादिकां कां आहे । सुरांचें वृंद
तें देववृंद बरवें । कर्मकारण पांचवें ।
अर्जुना एथ जाणावें । देवो म्हणे
एवं माने तुझिये आयणी । तैसी कर्मजातांची हे खाणी ।
पंचविध आकर्णीं । निरूपिली
आतां हेचि खाणी वाढे । मग कर्माची सृष्टि घडे ।
जिहीं ते हेतुही उघडे । दाऊं पांचै
तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवीं ।
पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळातें
कां वार्षिये आणिजे मेघु । मेघें वृष्टिप्रसंगु ।
वृष्टीस्तव भोगु । सस्यसुखाचा
नातरी प्राची अरुणातें विये । अरुणें सूर्योदयो होये ।
सूर्यें सगळा पाहे । दिवो जैसा
तैसें मन हेतु पांडवा । होय कर्मसंकल्पभावा ।
तो संकल्पु लावी दिवा । वाचेचा गा
मग वाचेचा तो दिवटा । दावी कृत्यजातांचिया वाटा ।
तेव्हां कर्ता रिगे कामठां । कर्तृत्वाच्या
तेथ शरीरादिक दळवाडें । शरीरादिकां हेतुचि घडे ।
लोहकाम लोखंडें । निर्वाळिजे जैसें
कां तांथुवाचा ताणा । तांथु घालितां वैरणा ।
तो तंतुचि विचक्षणा । होय पटु
तैसें मनवाचादेहाचें । कर्म मनादि हेतुचि रचे ।
रत्नीं घडे रत्नाचें । दळवाडें जेवीं
एथ शरीरादिकें कारणें । तेंचि हेतु केवीं हें कोणें ।
अपेक्षिजे तरी तेणें । अवधारिजो
आइका सूर्याचिया प्रकाशा । हेतु कारण सूर्युचि जैसा ।
कां ऊंसाचें कांडें ऊंसा । वाढी हेतु
नाना वाग्देवता वानावी । तैं वाचाचि लागे कामवावी ।
कां वेदां वेदेंचि बोलावी । प्रतिष्ठा जेवीं
तैसें कर्मा शरीरादिकें । कारण हें कीर ठाउकें ।
परी हेंचि हेतु न चुके । हेंही एथ
आणि देहादिकीं कारणीं । देहादि हेतु मिळणीं ।
होय जया उभारणी । कर्मजातां
तें शास्त्रार्थेंं मानिलेया । मार्गा अनुसरे धनंजया ।
तरी न्याय तो न्याया । हेतु होय
जैसा पर्जन्योदकाचा लोटु । विपायें धरी साळीचा पाटु ।
तो जिरे परी अचाटु । उपयोगु आथी
कां रोषें निघालें अवचटें । पडिलें द्वारकेचिया वाटे ।
तें शिणे परी सुनाटें । न वचिती पदें
तैसें हेतुकारण मेळें । उठी कर्म जें आंधळें ।
तें शास्त्राचें लाहे डोळे । तैं न्याय म्हणिपे
ना दूध वाढिता ठावो पावे । तंव उतोनि जाय स्वभावें ।
तोही वेंचु परी नव्हे । वेंचिलें तें
तैसें शास्त्रसाह्येंवीण । केलें नोहे जरी अकारण ।
तरी लागो कां नागवण । दानलेखीं
अगा बावन्ना वर्णांपरता । कोण मंत्रु आहे पंडुसुता ।
कां बावन्नही नुच्चारितां । जीवु आथी ?
परी मंत्राची कडसणी । जंव नेणिजे कोदंडपाणी ।
तंव उच्चारफळ वाणी । न पवे जेवीं
तेवीं कारणहेतुयोगें । जें बिसाट कर्म निगे ।
तें शास्त्राचिये न लगे । कांसे जंव
कर्म होतचि असे तेव्हांही । परी तें होणें नव्हे पाहीं ।
तो अन्यायो गा अन्यायीं । हेतु होय
एवं पंचकारणा कर्मा । पांचही हेतु हे सुमहिमा ।
आतां एथें पाहें पां आत्मा । सांपडला असे ?
भानु न होनि रूपें जैसीं । चक्षुरूपातें प्रकाशी ।
आत्मा न होनि कर्में तैसीं । प्रकटित असे गा
पैं प्रतिबिंब आरिसा । दोन्ही न होनि वीरेशा ।
दोहींतें प्रकाशी जैसा । न्याहाळिता तो
कां अहोरात्र सविता । न होनि करी पंडुसुता ।
तैसा आत्मा कर्मकर्ता । न होनि दावी
परी देहाहंमान भुली । जयाची बुद्धि देहींचि आतली ।
तया आत्मविषयीं जाली । मध्यरात्री गा
जेणें चैतन्या ईश्वरा ब्रह्मा । देहचि केलें परमसीमा ।
तया आत्मा कर्ता हे प्रमा । अलोट उपजे
आत्माचि कर्मकर्ता । हाही निश्चयो नाहीं तत्वतां ।
देहोचि मी कर्मकर्ता । मानितो साचे
जे आत्मा मी कर्मातीतु । सर्वकर्मसाक्षिभूतु ।
हे आपुली कहीं मातु । नायकेचि कानीं
म्हणौनि उमपा आत्मयातें । देहचिवरी मविजे एथें ।
विचित्र काई रात्रि दिवसातें । डुडुळ न करी ?
पैं जेणें आकाशींचा कहीं । सत्य सूर्यु देखिला नाहीं ।
तो थिल्लरींचें बिंब काई । मानू न लाहे ?
थिल्लराचेनि जालेपणें । सूर्यासि आणी होणें ।
त्याच्या नाशीं नाशणें । कंपें कंपू
आणि निद्रिस्ता चेवो नये । तंव स्वप्न साच हों लाहे ।
रज्जु नेणतां सापा बिहे । विस्मो कवण ?
जंव कवळ आथि डोळां । तंव चंद्रु देखावा कींं पिंवळा ।
काय मृगींहीं मृगजळा । भाळावें नाहीं ?
तैसा शास्त्रगुरूचेनि नांवे । जो वाराही टेंकों नेदी सिवें ।
केवळ मौढ्याचेनिचि जीवें । जियाला जो
तेणें देहात्मदृष्टीमुळें । आत्मया घापे देहाचें जाळें ।
जैसा अभ्राचा वेगु कोल्हें । चंद्रीं मानीं
मग तया मानणयासाठीं । देहबंदीशाळे किरीटी ।
कर्माच्या वज्रगांठी । कळासे तो
पाहे पां बद्ध भावना दृढा । नळियेवरी तो बापुडा ।
काय मोकळेयाही पायाचा चवडा । न ठकेचि पुंसा ।
म्हणौनि निर्मळा आत्मस्वरूपीं । तो प्रकृतीचें केलें आरोपी ।
तो कल्पकोडीच्या मापीं । मवीचि कर्में
आता कर्मामाजीं असे । परी तयातें कर्म न स्पर्शे ।
वडवानळातें जैसें । समुद्रोदक
तैसेंनि वेगळेपणें । जयाचें कर्मीं असणें ।
तो कीर वोळखावा कवणें । तरी सांगो
जे मुक्तातें निर्धारितां । लाभे आपलीच मुक्तता ।
जैसी दीपें दिसें पाहतां । आपली वस्तु
नातरी दर्पणु जंव उटिजे । तंव आपणपयां आपण भेटिजे ।
कां तोय पावतां तोय होईजे । लवणें जेंवीं
हें असो परतोनि मागुतें । प्रतिबिंब पाहे बिंबातें ।
तंव पाहणें जाउनी आयितें । बिंबचि होय
तैसें हारपलें आपणपें पावे । तैं संतांतें पाहतां गिंवसावें ।
म्हणौनि वानावे ऐकावे । तेचि सदा
परी कर्मीं असोनि कर्में । जो नावरे समेंविषमें ।
चर्मचक्षूंचेनि चामें । दृष्टि जैसी
तैसा सोडवला जो आहे । तयाचें रूप आतां पाहें ।
उपपत्तीची बाहे । उभऊनि सांगों
तरी अविद्येचिया निदा । विश्वस्वप्नाचा हा धांदा ।
भोगीत होता प्रबुद्धा । अनादि जो
तो महावाक्याचेनि नांवें । गुरुकृपेचेनि थांवें ।
माथां हातु ठेविला नव्हे । थापटिला जैसा
तैसा विश्वस्वप्नेंसीं माया । नीद सांडूनि धनंजया ।
सहसा चेइला अद्वया\- । नंदपणें जो
तेव्हां मृगजळाचे पूर । दिसते एक निरंतर ।
हारपती कां चंद्रकर । फांकतां जैसे
कां बाळत्व निघोनि जाय । तैं बागुला नाहीं त्राय ।
पैं जळालिया इंधन न होय । इंधन जेवीं
नाना चेवो आलिया पाठीं । तैं स्वप्न न दिसे दिठी ।
तैसी अहं ममता किरीटी । नुरेचि तया
मग सूर्यु आंधारालागीं । रिघो कां भलते सुरंगीं ।
परी तो तयाच्या भागीं । नाहींचि जैसा
तैसा आत्मत्वें वेष्टिला होये । तो जया जया दृश्यातें पाहें ।
तें दृष्य द्रष्टेपणेंसीं होत जाये । तयाचेंचि रूप
जैसा वन्हि जया लागे । तें वन्हिचि जालिया आंगें ।
दाह्यदाहकविभागें । सांडिजे तें
तैसा कर्माकारा दुजेया । तो कर्तेपणाचा आत्मया ।
आळु आला तो गेलिया । कांहीं बाहीं जें उरे
तिये आत्मस्थितीचा जो रावो । मग तो देहीं इये जाणेल ठावो ? ।
काय प्रलयांबूचा उन्नाहो । वोघु मानी ?
तैसी ते पूर्ण अहंता । काई देहपणें पंडुसुता ।
आवरे काई सविता । बिंबें धरिला ?
पैं मथूनि लोणी घेपे । तें मागुती ताकीं घापे ।
तरी तें अलिप्तपणें सिंपे । तेणेंसी काई ?
नाना काष्ठौनि वीरेशा । वेगळा केलिया हुताशा ।
राहे काष्ठाचिया मांदुसा । कोंडलेपणें ?
कां रात्रीचिया उदराआंतु । निघाला जो हा भास्वतु ।
तो रात्री ऐसी मातु । ऐके कायी ?
तैसें वेद्य वेदकपणेंसी । पडिलें कां जयाचे ग्रासीं ।
तया देह मी ऐसी । अहंता कैंची ?
आणि आकाशें जेथें जेथुनी । जाइजे तेथ असे भरोनी ।
म्हणौनि ठेलें कोंदोनी । आपेंआप
तैसें जें तेणें करावें । तो तेंचि आहे स्वभावें ।
मा कोणें कर्मीं वेष्टावें । कर्तेपणें ?
नुरेचि गगनावीण ठावो । नोहेचि समुद्रा प्रवाहो ।
नुठीचि ध्रुवा जावों । तैसें जाहालें
ऐसेनि अहंकृतिभावो । जयाचा बोधीं जाहला वावो ।
तऱही देहा जंव निर्वाहो । तंव आथी कर्में
वारा जरी वाजोनि वोसरे । तरी तो डोल रुखीं उरे ।
कां सेंदें द्रुति राहे कापुरें । वेंचलेनी
कां सरलेया गीताचा समारंभु । न वचे राहवलेपणाचा क्षोभु ।
भूमी लोळोनि गेलिया अंबु । वोल थारे
अगा मावळलेनि अर्कें । संध्येचिये भूमिके ।
ज्योतिदीप्ति कौतुकें । दिसे जैसी
पैं लक्ष भेदिलियाहीवरी । बाण धांवेचि तंववरी ।
जंव भरली आथी उरी । बळाची ते
नाना चक्रीं भांडें जालें । तें कुलालें परतें नेलें ।
परी भ्रमेंचि तें मागिले । भोवंडिलेपणें
तैसा देहाभिमानु गेलिया । देह जेणें स्वभावें धनंजया ।
जालें तें अपैसया । चेष्टवीच तें
संकल्पेंवीण स्वप्न । न लावितां दांगीचें बन ।
न रचितां गंधर्वभुवन । उठी जैसें
आत्मयाचेनि उद्यमेंवीण । तैसें देहादिपंचकारण ।
होय आपणयां आपण । क्रियाजात
पैं प्राचीनसंस्कारवशें । पांचही कारणें सहेतुकें ।
कामवीजती गा अनेकें । कर्माकारें
तया कर्मामाजीं मग । संहरो आघवें जग ।
अथवा नवें चांग । अनुकरो
परी कुमुद कैसेनि सुके । कैसें तें कमळ फांके ।
हीं दोन्ही रवी न देखे । जयापरी
कां वीजु वर्षोनि आभाळ । ठिकरिया आतो भूतळ ।
अथवा करूं शाड्वळ । प्रसन्नावृष्टी
तरी तया दोहींतें जैसें । नेणिजेचि कां आकाशें ।
तैसा देहींच जो असे । विदेहदृष्टी
तो देहादिकीं चेष्टीं । घडतां मोडतां हे सृष्टी ।
न देखे स्वप्न दृष्टी । चेइला जैसा
येऱहवीं चामाचे डोळेवरी । जे देखती देहचिवरी ।
ते कीर तो व्यापारी । ऐसेंचि मानिती
कां तृणाचा बाहुला । जो आगरामेरें ठेविला ।
तो साचचि राखता कोल्हा । मानिजे ना ?
पिसेंं नेसलें कां नागवें । हें लोकीं येऊनि जाणावें ।
ठाणोरियांचें मवावें । आणिकीं घाय
कां महासतीचे भोग । देखे कीर सकळ जग ।
परी ते आगी ना आंग । ना लोकु देखे
तैसा स्वस्वरूपें उठिला । जो दृश्येंसी द्रष्टा आटला ।
तो नेणें काय राहटला । इंद्रियग्रामु
अगा थोरीं कल्लोळीं कल्लोळ साने । लोपतां तिरींचेनि जनें ।
एकीं एक गिळिलें हें मनें । मानिजे जऱही
तऱही उदकाप्रति पाहीं । कोण ग्रसितसे काई ।
तैसें पूर्णा दुजें नाहीं । जें तो मारी
सुवर्णाचिया चंडिका । सुवर्णशूळेंचि देखा ।
सुवर्णाचिया महिखा । नाशु केला
तो देवलवसिया कडा । व्यवहारु गमला फुडा ।
वांचूनि शूळ महिष चामुंडा । सुवर्णचि तें
पैं चित्रींचें जळ हुतांशु । तो दृष्टीचाचि आभासु ।
पटीं आगी वोलांशु । दोन्ही नाहीं
मुक्ताचें देह तैसें । हालत संस्कारवशें ।
तें देखोनि लोक पिसे । कर्ता म्हणती
आणि तयां करणेया आंतु । घडो तिहीं लोकां घातु ।
परी तेणें केला हे मातु । बोलों नये
अगा अंधारुचि देखावा तेजें । मग तो फेडी हें बोलिजे ।
तैसें ज्ञानिया नाहीं दुजें । जें तो मारी ।
म्हणौनि तयाचि बुद्धी । नेणे पापपुण्याची गंधी ।
गंगा मीनलिया नदी । विटाळु जैसा
आगीसी आगी झगटलिया । काय पोळे धनंजया ।
कीं शस्त्र रुपे आपणया । आपणचि
तैसें आपणपयापरतें । जो नेणें क्रियाजातातें ।
तेथ काय लिंपवी बुद्धीतें । तयाचिये
म्हणौनि कार्य कर्ता क्रिया । हें स्वरूपचि जाहलें जया ।
नाहीं शरीरादिकीं तया । कर्मी बंधु
जे कर्ता जीव विंदाणीं । काढूनि पांचही खाणी ।
घडित आहे करणीं । आउतीं दाहें
तेथ न्यावो आणि अन्यावो । हा द्विविधु साधूनि आवो ।
उभविता न लवी खेंवो । कर्मभुवनें
या थोराडा कीर कामा । विरजा नोहे आत्मा ।
परी म्हणसी हन उपक्रमा । हातु लावी
तो साक्षी चिद्रूपु । कर्मप्रवृत्तीचा संकल्पु ।
उठी तो कां निरोपु । आपणचि दे ?
तरी कर्मप्रवृत्तीहीलागीं । तया आयासु नाहीं आंगीं ।
जे प्रवृत्तीचेही उळिगीं । लोकुचि आथी
म्हणौनि आत्मयाचें केवळ । जो रूपचि जाहला निखिळ ।
तया नाहीं बंदिशाळ । कर्माचि हे
परी अज्ञानाच्या पटीं । अन्यथा ज्ञानाचें चित्र उठी ।
तेथ चितारणी हे त्रिपुटी । प्रसिद्ध जे कां
जें ज्ञान ज्ञाता ज्ञेय । हें जगाचें बीज त्रय ।
ते कर्माची निःसंदेह । प्रवृत्ति जाण
आतां ययाचि गा त्रया । व्यक्ति वेगळालिया ।
आइकें धनंजया । करूं रूप
तरी जीवसूर्यबिंबाचे । रश्मी श्रोत्रादिकें पांचें ।
धांवोनि विषयपद्माचे । फोडिती मढ
कीं जीवनृपाचे वारु उपलाणें । घेऊनि इंद्रियांचीं केकाणें ।
विषयदेशींचें नागवणें । आणीत जे
हें असो इहीं इंद्रियीं राहाटे । जें सुखदुःखेंसीं जीवा भेटे ।
तें सुषुप्तिकालीं वोहटे । जेथ ज्ञान
तया जीवा नांव ज्ञाता । आणि जें हें सांगितलें आतां ।
तेंचि एथ पंडुसुता । ज्ञान जाण
जें अविद्येचिये पोटीं । उपजतखेंवो किरीटी ।
आपणयातें वांटी । तिहीं ठायीं
आपुलिये धांवे पुढां । घालूनि ज्ञेयाचा गुंडा ।
उभारी मागिलीकडां । ज्ञातृत्वातें
मग ज्ञातया ज्ञेया दोघां । तो नांदणुकेचा बगा ।
माजीं जालेनि पैं गा । वाहे जेणें
ठाकूनि ज्ञेयाची शिंव । पुरे जयाची धांव ।
सकळ पदार्थां नांव । सूतसे जें
तें गा सामान्य ज्ञान । या बोअला नाहीं आन ।
ज्ञेयाचेंही चिन्ह । आइक आतां
तरी शब्दु स्पर्शु । रूप गंध रसु ।
हा पंचविध आभासु । ज्ञेयाचा तो
जैसें एकेचि चूतफळें । इंद्रियां वेगवेगळे ।
रसें वर्णें परीमळें । भेटिजे स्पर्शें
तैसें ज्ञेय तरी एकसरें । परी ज्ञान इंद्रियद्वारें ।
घे म्हणौनि प्रकारें । पांचें जालें
आणि समुद्रीं वोघाचें जाणें । सरे लाणीपासीं धावणें ।
कां फळीं सरे वाढणें । सस्याचें जेवीं
तैसें इंद्रियांच्या वाहवटीं । धांवतया ज्ञाना जेथ ठी ।
होय तें गा किरीटी । विषय ज्ञेय
एवं ज्ञातया ज्ञाना ज्ञेया । तिहीं रूप केलें धनंजया ।
हे त्रिविध सर्व क्रिया\- । प्रवृत्ति जाण
जे शब्दादि विषय । हें पंचविध जें ज्ञेय ।
तेंचि प्रिय कां अप्रिय । एकेपरीचें
ज्ञान मोटकें ज्ञातया । दावी ना जंव धनंजया ।
तंव स्वीकारा कीं त्यजावया । प्रवर्तेचि तो
परी मीनातें देखोनि बकु । जैसा निधानातें रंकु ।
कां स्त्री देखोनि कामुकु । प्रवृत्ति धरी
जैसें खालारां धांवे पाणी । भ्रमर पुष्पाचिये घाणीं ।
नाना सुटला सांजवणीं । वत्सुचि पां
अगा स्वर्गींची उर्वशी । ऐकोनि जेंवी माणुसीं ।
वराता लावीजती आकाशीं । यागांचिया
पैं पारिवा जैसा किरीटी । चढला नभाचिये पोटीं ।
पारवी देखोनि लोटी । आंगचि सगळें
हें ना घनगर्जनासरिसा । मयूर वोवांडे आकाशा ।
ज्ञाता ज्ञेय देखोनि तैसा । धांवचि घे
म्हणौनि ज्ञान ज्ञेय ज्ञाता । हे त्रिविध गा पंडुसुता ।
होयचि कर्मा समस्तां । प्रवृत्ति येथ
परी तेंचि ज्ञेय विपायें । जरी ज्ञातयातें प्रिय होये ।
तरी भोगावया न साहे । क्षणही विलंबु
नातरी अवचटें । तेंचि विरुद्ध होऊनि भेटे ।
तरी युगांत वाटे । सांडावया
व्याळा कां हारा । वरपडा जालेया नरा ।
हरिखु आणि दरारा । सरिसाचि उठी
तैसें ज्ञेय प्रियाप्रियें । देखिलेनि ज्ञातया होये ।
मग त्याग स्वीकारीं वाहे । व्यापारातें
तेथ रागी प्रतिमल्लाचा । गोसांवी सर्वदळाचा ।
रथु सांडूनि पायांचा । होय जैसा
तैसें ज्ञातेपणें जें असे । तें ये कर्ता ऐसिये दशे ।
जेवितें बैसलें जैसें । रंधन करूं
कां भंवरेंचि केला मळा । वरकलुचि जाला अंकसाळा ।
नाना देवो रिगाला देऊळा\- । चिया कामा
तैसा ज्ञेयाचिया हांवा । ज्ञाता इंद्रियांचा मेळावा ।
राहाटवी तेथ पांडवा । कर्ता होय
आणि आपण हौनी कर्ता । ज्ञाना आणी करणता ।
तेथें ज्ञेयचि स्वभावतां । कार्य होय
ऐसा ज्ञानाचिये निजगति । पालटु पडे गा सुमति ।
डोळ्याची शोभा रातीं । पालटे जैसी
कां अदृष्ट जालिया उदासु । पालटे श्रीमंताचा विलासु ।
पुनिवेपाठीं शीतांशु । पालटे जैसा
तैसा चाळितां करणें । ज्ञाता वेष्टिजे कर्तेपणें ।
तेथींचीं तियें लक्षणें । ऐक आतां
तरी बुद्धि आणि मन । चित्त अहंकार हन ।
हें चतुर्विध चिन्ह । अंतःकरणाचें
बाह्य त्वचा श्रवण । चक्षु रसना घ्राण ।
हें पंचविध जाण । इंद्रियें गा
तेथ आंतुले तंव करणें । कर्ता कर्तव्या घे उमाणें ।
मग तैं जरी जाणें । सुखा येतें
तरी बाहेरीलें तियेंही । चक्षुरादिकें दाहाही ।
उठौनि लवलाहीं । व्यापारा सूये
मग तो इंद्रियकदंंबु । करविजे तंव राबु ।
जंव कर्तव्याचा लाभु । हातासि ये
ना तें कर्तव्य जरी दुःखें । फळेल ऐसें देखे ।
तो लावी त्यागमुखें । तियें दाहाही
मग फिटे दुःखाचा ठावो । तंव राहाटवी रात्रिदिवो ।
विकणवातें कां रावो । जयापरी
तैसेनि त्याग स्वीकारीं । वाहातां इंद्रियांची धुरी ।
ज्ञातयातें अवधारीं । कर्ता म्हणिपे
आणि कर्तयाच्या सर्व कर्मीं । आउतांचिया परी क्षमी ।
म्हणौनि इंद्रियांतें आम्ही । करणें म्हणों
आणि हेचि करणेंवरी । कर्ता क्रिया ज्या उभारी ।
तिया व्यापे तें अवधारीं । कर्म एथ
सोनाराचिया बुद्धि लेणें । व्यापे चंद्रकरीं चांदणें ।
कां व्यापे वेल्हाळपणें । वेली जैसी
नाना प्रभा व्यापे प्रकाशु । गोडिया इक्षुरसु ।
हें असो अवकाशु । आकाशीं जैसा
तैसें कर्तयाचिया क्रिया । व्यापलें जें धनंजया ।
तें कर्म गा बोलावया । आन नाहीं
एवं कर्म कर्ता करण । या तिहींचेंही लक्षण ।
सांगितलें तुज विचक्षण\- । शिरोमणी
एथ ज्ञाता ज्ञान ज्ञेय । हें कर्माचें प्रवृत्तित्रय ।
तैसेंचि कर्ता करण कार्य । हा कर्मसंचयो
वन्हीं ठेविला असे धूमु । आथी बीजीं जेवीं द्रुमु ।
कां मनीं जोडे कामु । सदा जैसा
तैसा कर्ता क्रिया करणीं । कर्माचें आहे जिंतवणीं ।
सोनें जैसें खाणी । सुवर्णाचिये
म्हणौनि हें कार्य मी कर्ता । ऐसें आथि जेथ पंडुसुता ।
तेथ आत्मा दूरी समस्ता । क्रियांपासीं
यालागीं पुढतपुढती । आत्मा वेगळाचि सुमती ।
आतां असो हे किती । जाणतासि तूं
परी सांगितलें जें ज्ञान । कर्म कर्ता हन ।
ते तिन्ही तिहीं ठायीं भिन्न । गुणीं आहाती
म्हणौनि ज्ञाना कर्मा कर्तया । पातेजों नये धनंजया ।
जे दोनी बांधती सोडावया । एकचि प्रौढ
तें सात्विक ठाऊवें होये । तो गुणभेदु सांगों पाहे ।
जो सांख्यशास्त्रीं आहे । उवाइला
जें विचारक्षीरसमुद्र । स्वबोधकुमुदिनीचंद्र ।
ज्ञानडोळसां नरेंद्र । शास्त्रांचा जें
कीं प्रकृतिपुरुष दोनी । मिसळलीं दिवोरजनीं ।
तियें निवडितां त्रिभुवनीं । मार्तंडु जें
जेथ अपारा मोहराशी । तत्वाच्या मापीं चोविसीं ।
उगाणा घेऊनि परेशीं । सुरवाडिजे
अर्जुना तें सांख्यशास्त्र । पढे जयाचें स्तोत्र ।
तें गुणभेदचरित्र । ऐसें आहे
जे आपुलेनि आंगिकें । त्रिविधपणाचेनि अंकें ।
दृश्यजात तितुकें । अंकित केलें
एवं सत्वरजतमा । तिहींची एवढी असे महिमा ।
जें त्रैविध्य आदी ब्रह्मा । अंतीं कृमी
परी विश्वींची आघवी मांदी । जेणें भेदलेनि गुणभेदीं ।
पडिली तें तंव आदी । ज्ञान सांगो
जे दिठी जरी चोख कीजे । तरी भलतेंही चोख सुजे ।
तैसें ज्ञानें शुद्धें लाहिजे । सर्वही शुद्ध
म्हणौनि तें सात्विक ज्ञान । आतां सांगों दे अवधान ।
कैवल्यगुणनिधान । श्रीकृष्ण म्हणे
तरी अर्जुना गा तें फुडें । सात्विक ज्ञान चोखडें ।
जयाच्या उदयीं ज्ञेय बुडे । ज्ञातेनिसीं
जैसा सूर्य न देखे अंधारें । सरिता नेणिजती सागरें ।
कां कवळिलिया न धरे । आत्मछाया
तयापरी जया ज्ञाना । शिवादि तृणावसाना ।
इया भूतव्यक्ति भिन्ना । नाडळती
जैसें हातें चित्र पाहातां । होय पाणियें मीठ धुतां ।
कां चेवोनि स्वप्ना येतां । जैसें होय
तैसें ज्ञानें जेणें । करितां ज्ञातव्यातें पाहाणें ।
जाणता ना जाणणें । जाणावें उरे
पैं सोनें आटूनि लेणीं । न काढिती आपुलिया आयणी ।
कां तरंग न घेपती पाणी । गाळूनि जैसें
तैसी जया ज्ञानाचिया हाता । न लगेचि दृश्यपथा ।
तें ज्ञान जाण सर्वथा । सात्विक गा
आरिसा पाहों जातां कोडें । जैसें पाहातेंचि कां रिगे पुढें ।
तैसें ज्ञेय लोटोनि पडे । ज्ञाताचि जें
पुढती तेंचि सात्विक ज्ञान । जें मोक्षलक्ष्मीचें भुवन ।
हें असो ऐक चिन्ह । राजसाचें
तरी पार्था परीयेस । तें ज्ञान गा राजस ।
जें भेदाची कांस । धरूनि चाले
विचित्रता भूतांचिया । आपण आंतोनि ठिकरिया ।
बहु चकै ज्ञातया । आणिली जेणें
जैसें साचा रूपाआड । घालूनि विसराचें कवाड ।
मग स्वप्नाचें काबाड । ओपी निद्रा
तैसें स्वज्ञानाचिये पौळी । बाहेरि मिथ्या महीं खळीं ।
तिहीं अवस्थांचिया वह्याळी । दावी जें जीवा
अलंकारपणें झांकलें । बाळा सोनें कां वायां गेलें ।
तैसें नामीं रूपीं दुरावलें । अद्वैत जया
अवतरली गाडग्यां घडां । पृथ्वी अनोळख जाली मूढां ।
वन्हि जाला कानडा । दीपत्वासाठीं
कां वस्त्रपणाचेनि आरोपें । मूर्खाप्रति तंतु हारपे ।
नाना मुग्धा पटु लोपे । दाऊनि चित्र
तैशी जया ज्ञाना । जाणोनि भूतव्यक्ती भिन्ना ।
ऐक्यबोधाची भावना । निमोनि गेली
मग इंधनीं भेदला अनळु । फुलांवरी परीमळु ।
कां जळभेदें शकलु । चंद्रु जैसा
तैसें पदार्थभेद बहुवस । जाणोनि लहानथोर वेष ।
आंतलें तें राजस । ज्ञान येथ
आतां तामसाचेंही लिंग । सांगेन तें वोळख चांग ।
डावलावया मातंग\- । सदन जैसें
तरी किरीटी जें ज्ञान । हिंडे विधीचेनि वस्त्रेंहीन ।
श्रुति पाठमोरी नग्न । म्हणौनि तया
येरींही शास्त्र बटिकरीं । जें निंदेचे विटाळवरी ।
बोळविलेंसे डोंगरीं । म्लेंच्छधर्माच्या
जें गा ज्ञान ऐसें । गुणग्रहें तामसें ।
घेतलें भवें पिसें । होऊनियां
जें सोयरिकें बाधु नेणें । पदार्थीं निषेधु न म्हणे ।
निरोविलें जैसें सुणें । शून्यग्रामीं
तया तोंडीं जें नाडळे । कां खातां जेणें पोळे ।
तेंचि येक वाळे । येर घेणेचि
पैं सोनें चोरितां उंदिरु । न म्हणे थरुविथरु ।
नेणे मांसखाइरु । काळें गोरें
नाना वनामाजीं बोहरी । कडसणी जेवीं न करी ।
कां जीत मेलें न विचारी । बैसतां माशी
अगा वांता कां वाढिलेया । साजुक कां सडलिया ।
विवेकु कावळिया । नाहीं जैसा
तैसें निषिद्ध सांडूनि द्यावें । कां विहित आदरें घ्यावें ।
हें विषयांचेनि नांवें । नेणेंचि जें
जेतुलें आड पडे दिठी । तेतुलें घेचि विषयासाठीं ।
मग तें स्त्री\-द्रव्य वाटी । शिश्नोदरां
तीर्थातीर्थ हे भाख । उदकीं नाहीं सनोळख ।
तृषा वोळे तेंचि सुख । वांचूनियां
तयाचिपरी खाद्याखाद्य । न म्हणे निंद्यानिंद्य ।
तोंडा आवडे तें मेध्य । ऐसाचि बोधु
आणि स्त्रीजात तितुकें । त्वचेंद्रियेंचि वोळखे ।
तियेविषयीं सोयरिकें । एकचि बोधु
पैं स्वार्थीं जें उपकरे । तयाचि नाम सोयिरें ।
देहसंबंधु न सरे । जिये ज्ञानीं
मृत्यूचें आघवेंचि अन्न । आघवेंचि आगी इंधन ।
तैसें जगचि आपलें धन । तामसज्ञाना
ऐसेनि विश्व सकळ । जेणें विषयोचि मानिलें केवळ ।
तया एक जाण फळ । देहभरण
आकाशपतिता नीरा । जैसा सिंधुचि येक थारा ।
तैसें कृत्यजात उदरा\- । लागिंचि बुझे
वांचूनि स्वर्गु नरकु आथी । तया हेतु प्रवृत्ति निवृत्ती ।
इये आघवियेचि राती । जाणिवेची जें
जें देहखंडा नाम आत्मा । ईश्वर पाषाणप्रतिमा ।
ययापरौती प्रमा । ढळों नेणें
म्हणे पडिलेनि शरीरें । केलेनिसीं आत्मा सरे ।
मा भोगावया उरे । कोण वेषें ।
ना ईश्वरु पाहातां आहे । तो भोगवी हें जरी होये ।
तरी देवचि खाये । विकूनियां
गांवींचें देवळेश्वर । नियामकचि होती साचार ।
तरी देशींचे डोंगर । उगे कां असती ?
ऐसा विपायें देवो मानिजे । तरी पाषाणमात्रचि जाणिजे ।
आणि आत्मा तंव म्हणिजे । देहातेंचि
येरें पापपुण्यादिकें । तें आघवेंचि करोनि लटिकें ।
हित मानी अग्निमुखे । चरणें जें कां
जें चामाचे डोळे दाविती । जें इंद्रियें गोडी लाविती ।
तेंचि साच हे प्रतीती । फुडी जया
किंबहुना ऐसी प्रथा । वाढती देखसी पार्था ।
धूमाची वेली वृथा । आकाशीं जैसी
कोरडा ना वोला । उपेगा आथी गेला ।
तो वाढोनि मोडला । भेंडु जैसा
नाना उंसांचीं कणसें । कां नपुंसकें माणुसें ।
वन लागलें जैसें । साबरीचें
नातरी बाळकाचें मन । कां चोराघरींचें धन ।
अथवा गळास्तन । शेळियेचे
तैसें जें वायाणें । वोसाळ दिसे जाणणें ।
तयातें मी म्हणें । तामस ज्ञान
तेंही ज्ञान इया भाषा । बोलिजे तो भावो ऐसा ।
जात्यंधाचा कां जैसा । डोळा वाडु
कां बधिराचे नीट कान । अपेया नाम पान ।
तैसें आडनांव ज्ञान । तामसा तया
हें असो किती बोलावें । तरी ऐसें जें देखावें ।
तें ज्ञान नोहे जाणावें । डोळस तम
एवं तिहीं गुणीं । भेदलें यथालक्षणीं ।
ज्ञान श्रोतेशिरोमणी । दाविलें तुज
आतां याचि त्रिप्रकारा । ज्ञानाचेनि धनुर्धरा ।
प्रकाशें होती गोचरा । कर्तयांच्या क्रिया
म्हणौनि कर्म पैं गा । अनुसरे तिहीं भागां ।
मोहरे जालिया वोघा । तोय जैसे
तेंचि ज्ञानत्रयवशें । त्रिविध कर्म जें असे ।
तेथ सात्विक तंव ऐसें । परीसे आधीं
तरी स्वाधिकाराचेनि मार्गेंं । आलें जें मानिलें आंगें ।
पतिव्रतेचेनि परीष्वंगें । प्रियातें जैसें
सांवळ्या आंगा चंदन । प्रमदालोचनीं अंजन ।
तैसें अधिकारासी मंडण । नित्यपणें जें
तें नित्य कर्म भलें । होय नैमित्तिकीं सावाइलें ।
सोनयासि जोडलें । सौरभ्य जैसें
आणि आंगा जीवाची संपत्ती । वेंचूनि बाळाची करी पाळती ।
परी जीवें उबगणें हें स्थिती । न पाहे माय
तैसें सर्वस्वें कर्म अनुष्ठी । परी फळ न सूये दिठी ।
उखिती क्रिया पैठी । ब्रह्मींचि करी
आणि प्रिय आलिया स्वभावें । शंबळ उरे वेंचे ठाउवें ।
नव्हे तैसें सत्प्रसंगें करावें । पारुषे जरी
तरी अकरणाचेनि खेदें । द्वेषातें जीवीं न बांधे ।
जालियाचेनि आनंदें । फुंजों नेणें
ऐससिया हातवटिया । कर्म निफजे जें धनंजया ।
जाण सात्विक हें तया । गुणनाम गा
ययावरी राजसाचें । लक्षण सांगिजेल साचें ।
न करीं अवधानाचें । वाणेंपण
तरी घरीं मातापितरां । धड बोली नाहीं संसारा ।
येर विश्व भरी आदरा । मूर्खु जैसा
का तुळशीचिया झाडा । दुरूनि न घापें सिंतोडा ।
द्राक्षीचिया तरी बुडा । दूधचि लाविजे
तैसी नित्यनैमित्तिकें । कर्में जियें आवश्यकें ।
तयांचेविषयीं न शके । बैसला उठूं
येरां काम्याचेनि तरी नांवें । देह सर्वस्व आघवें ।
वेचितांही न मनवे । बहु ऐसें
अगा देवढी वाढी लाहिजे । तेथ मोल देतां न धाइजे ।
पेरितां पुरें न म्हणिजे । बीज जेवीं
कां परीसु आलिया हातीं । लोहालागीं सर्वसंपत्ती ।
वेचितां ये उन्नती । साधकु जैसा
तैसीं फळें देखोनि पुढें । काम्यकर्में दुवाडें ।
करी परी तें थोकडें । केलेंही मानी
तेणें फळकामुकें । यथाविधी नेटकें ।
काम्य कीजे तितुकें । क्रियाजात
आणि तयाही केलियाचें । तोंडीं लावी दौंडीचें ।
कर्मी या नांवपाटाचें । वाणें सारी
तैसा भरे कर्माहंकारु । मग पिता अथवा गुरु ।
ते न मनी काळज्वरु । औषध जैसें
तैसेनि साहंकारें । फळाभिलाषियें नरें ।
कीजे गा आदरें । जें जें कांहीं
परी तेंही करणें बहुवसा । वळघोनि करी सायासा ।
जीवनोपावो कां जैसा । कोल्हाटियांचा
एका कणालागीं.ण् उंदिरु । आसका उपसे डोंगरु ।
कां शेवाळोद्देशें दर्दुरु । समुद्रु डहुळी
पैं भिकेपरतें न लाहे । तऱही गारुडी सापु वाहे ।
काय कीजे शीणुचि होये । गोडु येकां
हे असो परमाणूचेनि लाभें । पाताळ लंघिती वोळंबे ।
तैसें स्वर्गसुखलोभें । विचंबणें जें
तें काम्य कर्म सक्लेश । जाणावें येथ राजस ।
आतां चिन्ह परिस । तामसाचें
तरी तें गा तामस कर्म । जें निंदेचें काळें धाम ।
निषेधाचें जन्म । सांच जेणें
जें निपजविल्यापाठींं । कांहींच न दिसे दिठी ।
रेघ काढलिया पोटीं । तोयाचे जेवीं
कां कांजी घुसळलिया । कां राखोंडी फुंकलिया ।
कांहीं न दिसे गाळिलिया । वाळुघाणा
नाना उपणिलिया भूंस । कां विंधिलिया आकाश ।
नाना मांडिलिया पाश । वारयासी
हें आवघेंचि जैसें । वांझें होऊनि नासे ।
जें केलिया पाठीं तैसें । वायांचि जाय
येऱहवीं नरदेहाही येवढें । धन आटणीये पडे ।
जें कर्म निफजवितां मोडे । जगाचें सुख
जैसा कमळवनीं फांसु । काढिलिया कांटसु ।
आपण झिजे नाशु । कमळां करी
कां आपण आंगें जळे । आणि नागवी जगाचे डोळे ।
पतंगु जैसा सळें । दीपाचेनि
तैसें सर्वस्व वायां जावो । वरी देहाही होय घावो ।
परी पुढिलां अपावो । निफजविजे जेणें
माशी आपणयातें गिळवी । परी पुढीला वांती शिणवी ।
तें कश्मळ आठवी । आचरण जें
तेंही करावयो दोषें । मज सामर्थ्य असे कीं नसे ।
हेंहीं पुढील तैसें । न पाहतां करी
केवढा माझा उपावो । करितां कोण प्रस्तावो ।
केलियाही आवो । काय येथ
इये जाणिवेची सोये । अविवेकाचेनि पायें ।
पुसोनियां होये । साटोप कर्मीं
आपला वसौटा जाळुनी । बिसाटे जैसा वन्ही ।
कां स्वमर्यादा गिळोनि । सिंधु उठी
मग नेणें बहु थोडें । न पाहे मागें पुढें ।
मार्गामार्ग येकवढें । करीत चाले
तैसें कृत्याकृत्य सरकटित । आपपर नुरवित ।
कर्म होय तें निश्चित । तामस जाण
ऐसी गुणत्रयभिन्ना । कर्माची गा अर्जुना ।
हे केली विवंचना । उपपत्तींसीं
आतां ययाचि कर्मा भजतां । कर्माभिमानिया कर्ता ।
तो जीवुही त्रिविधता । पातला असे
चतुराश्रमवशें । एकु पुरुषु चतुर्धा दिसे ।
कर्तया त्रैविध्य तैसें । कर्मभेदें
तरी तयां तिहीं आंतु । सात्विक तंव प्रस्तुतु ।
सांगेन दत्तचित्तु । आकर्णीं तूं
तरी फळोद्देशें सांडिलिया । वाढती जेवीं सरळिया ।
शाखा कां चंदनाचिया । बावन्नया
कां न फळतांही सार्थका । जैसिया नागलतिका ।
तैसिया करी नित्यादिकां । क्रिया जो कां
परी फळशून्यता । नाहीं तया विफळता ।
पैं फळासीचि पंडुसुता । फळें कायिसी ।
आणि आदरें करी बहुवसें । परी कर्ता मी हें नुमसे ।
वर्षाकाळींचें जैसें । मेघवृंद
तेवींचि परमात्मलिंगा । समर्पावयाजोगा ।
कर्मकलापु पैं गा । निपजावया
तया काळातें नुलंघणें । देशशुद्धिही साधणें ।
कां शास्त्रांच्या वातीं पाहणें । क्रियानिर्णयो
वृत्ति करणें येकवळा । चित्त जावों न देणें फळा ।
नियमांचिया सांखळा । वाहणें सदा
हा निरोधु साहावयालागीं । धैर्याचिया चांगचांगीं ।
चिंतवणी जिती आंगीं । वाहे जो कां
आणि आत्मयाचिये आवडी । कर्में करितां वरपडीं ।
देहसुखाचिये परवडीं । येवों न लाहे
आळसा निद्रा दुऱहावे । क्षुधा न बाणवे ।
सुरवाडु न पावे । आंगाचा ठावो
तंव अधिकाधिक । उत्साहो धरी आगळीक ।
सोनें जैसें पुटीं तुक । तुटलिया कसीं
जरी आवडी आथी साच । तरी जीवितही सलंच ।
आगीं घालितां रोमांच । देखिजती सतिये ।
मा आत्मया येवढीया प्रिया । वालभेला जो धनंजया ।
देहही सिदतां तया । काय खेदु होईल ?
म्हणौनि विषयसुरवाडु तुटे । जंव जंव देहबुद्धि आटे ।
तंव तंव आनंदु दुणवटे । कर्मीं जया
ऐसेनि जो कर्म करी । आणि कोणे एके अवसरीं ।
तें ठाके ऐसी परी । वाहे जरी
तरी कडाडीं लोटला गाडा । तो आपणपें न मनी अवघडा ।
तैसा ठाकलेनिही थोडा । नोहे जो कां
नातरी आदरिलें । अव्यंग सिद्धी गेलें ।
तरी तेंही जिंतिलें । मिरवूं नेणें
इया खुणा कर्म करितां । देखिजे जो पंडुसुता ।
तयातें म्हणिपे तत्त्वतां । सात्विकु कर्ता
आतां राजसा कर्तेया । वोळखणें हें धनंजया ।
जे अभिलाषा जगाचिया । वसौटा तो
जैसा गावींचिया कश्मळा । उकरडा होय येकवळा ।
कां स्मशानीं अमंगळा । आघवयांची
तया परी जो अशेषा । विश्वाचिया अभिलाषा ।
पायपाखाळणिया दोषां । घरटा जाला
म्हणौनि फळाचा लागु । देखे जिये असलगु ।
तिये कर्मीं चांगु । रोहो मांडी
आणि आपण जालिये जोडी । उपखों नेदी कवडी ।
क्षणक्षणा कुरोंडी । जीवाची करी
कृपणु चित्तीं ठेवा आपुला । तैसा दक्षु पराविया माला ।
बकु जैसा खुतला । मासेयासी
आणि गोंवी गेलिया जवळी । झगटलिया अंग फाळी ।
फळें तरी आंतु पोळी । बोरांटी जैसी
तैसें मनें वाचा कायें । भलतया दुःख देतु जाये ।
स्वार्थु साधितां न पाहे । पराचें हित
तेवींचि आंगें कर्मीं । आचरणें नोहे क्षमी ।
न निघे मनोधर्मीं । अरोचकु
कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा ।
तैसा सबाह्य दुबळा । शुचित्वें जो
आणि कर्मजात केलिया । फळ लाहे जरी धनंजया ।
तरी हरिखें जगा यया । वांकुलिया वाये
अथवा जें आदरिलें । हीनफळ होय केलें ।
तरीं शोकें तेणें जिंतिलें । धिक्कारों लागे
कर्मीं राहाटी ऐसी । जयातें होती देखसी ।
तोचि जाण त्रिशुद्धीसी । राजस कर्ता
आतां यया पाठीं येरु । जो कुकर्माचा आगरु ।
तोही करूं गोचरु । तामस कर्ता
तरी मियां लागलिया कैसें । पुढील जळत असे ।
हें नेणिजे हुताशें । जियापरी
पैं शस्त्रें मियां तिखटें । नेणिजे कैसेनि निवटे ।
कां नेणिजे काळकूटें । आपुलें केलें
तैसा पुढीलया आपुलया । घातु करीत धनंजया ।
आदरी वोखटिया । क्रिया जो कां
तिया करितांही वेळीं । काय जालें हें न सांभाळी ।
चळला वायु वाहटुळी । चेष्टे तैसा
पैं करणिया आणि जया । मेळु नाहीं धनंजया ।
तो पाहुनी पिसेया । कैंचीं त्राय ?
आणि इंद्रियांचें वोगरिलें । चरोनि राखे जो जियालें ।
बैलातळीं लागलें । गोचिड जैसें
हांसया रुदना वेळु । नेणतां आदरी बाळु ।
राहाटे उच्छृंखळु । तयापरी
जो प्रकृती आंतलेपणें । कृत्याकृत्यस्वादु नेणे ।
फुगे केरें धालेपणें । उकरडा जैसा
म्हणौनि मान्याचेनि नांवें । ईश्वराही परी न खालवे ।
स्तब्धपणें न मनवे । डोंगरासी
आणि मन जयाचें विषकल्लोळीं । राहाटी फुडी चोरिली ।
दिठी कीर ते वोली । पण्यांगनेची
किंबहुना कपटाचें । देहचि वळिलें तयाचें ।
तें जिणें कीं जुंवाराचें । टिटेघर
नोहे तयाचा प्रादुर्भावो । तो साभिलाष भिल्लांचा गांवो ।
म्हणौनि नये येवों जावों । तया वाटा
आणि आणिकांचें निकें केलें । विरु होय जया आलें ।
जैसें अपेय पया मिनलें । लवण करी
कां हींव ऐसा पदार्थु । घातलिया आगीआंतु ।
तेचि क्षणीं धडाडितु । अग्नि होय
नाना सुद्रव्यें गोमटीं । जालिया शरीरीं पैठीं ।
होऊनि ठाती किरीटी । मळुचि जेवीं
तैसें पुढिलाचें बरवें । जयाच्या भीतरीं पावे ।
आणि विरुद्धचि आघवें । होऊनि निगे
जो गुण घे दे दोख । अमृताचें करी विख ।
दूध पाजलिया देख । व्याळु जैसा
आणि ऐहिकीं जियावें । जेणें परत्रा साच यावें ।
तें उचित कृत्य पावे । अवसरीं जिये
तेव्हां जया आपैसी । निद्रा ये ठेविली ऐसी ।
दुर्व्यवहारीं जैसी । विटाळें लोटे
पैं द्राक्षरसा आम्ररसा । वेळे तोंड सडे वायसा ।
कां डोळे फुटती दिवसा । डुडुळाचे
तैसा कल्याणकाळु पाहे । तैं तयातें आळसु खाये ।
ना प्रमादीं तरी होये । तो म्हणे तैसें
जेवींचि सागराच्या पोटीं । जळे अखंड आगिठी ।
तैसा विषादु वाहे गांठीं । जिवाचिये जो
लेंडोराआगीं धूमावधि । कां अपाना आंगीं दुर्गंधि ।
तैसा जो जीवितावधि । विषादें केला
आणि कल्पांताचिया पारा । वेगळेंही जो वीरा ।
सूत्र धरी व्यापारा । साभिलाषा
अगा जगाही परौती । शुचा वाहे पैं चित्तीं ।
करितां विषीं हातीं । तृणही न लगे
ऐसा जो लोकाआंतु । पापपुंजु मूर्तु ।
देखसी तो अव्याहतु । तामसु कर्ता
एवं कर्म कर्ता ज्ञान । या तिहींचें त्रिधा चिन्ह ।
दाविलें तुज सुजन । चक्रवर्ती
आतां अविद्येचिया गांवीं । मोहाची वेढूनि मदवी ।
संदेहाचीं आघवीं । लेऊनि लेणीं
आत्मनिश्चयाची बरव । जया आरिसां पाहे सावयव ।
तिये बुद्धीचीही धांव । त्रिधा असे
अगा सत्वादि गुणीं इहीं । कायी एक तिहीं ठायीं ।
न कीजेचि येथ पाहीं । जगामाजीं
आगी न वसतां पोटीं । कवण काष्ठ असे सृष्टीं ।
तैसें तें कैंचें दृश्यकोटीं । त्रिविध जें नोहे
म्हणौनि तिहीं गुणीं । बुद्धी केली त्रिगुणी ।
धृतीसिही वांटणी । तैसीचि असे
तेंचि येक वेगळालें । यथा चिन्हीं अळंकारलें ।
सांगिजैल उपाइलें । भेदलेपणें
परी बुद्धि धृति इयां । दोहीं भागामाजीं धनंंजया ।
आधीं रूप बुद्धीचिया । भेदासि करूं
तरी उत्तमा मध्यमा निकृष्टा । संसारासि गा सुभटा ।
प्राणियां येतिया वाटा । तिनी आथी
जे अकरणीय काम्य निषिद्ध । ते हे मार्ग तिन्ही प्रसिद्ध ।
संसारभयें सबाध । जीवां ययां
म्हणौनि अधिकारें मानिलें । जें विधीचेनि वोघें आलें ।
तें एकचि येथ भलें । नित्य कर्म
तेंचि आत्मप्राप्ति फळ । दिठी सूनि केवळ ।
कीजे जैसें कां जळ । सेविजे ताहनें
येतुलेनि तें कर्म । सांडी जन्मभय विषम ।
करूनि दे उगम । मोक्षसिद्धि
ऐसें करी तो भला । संसारभयें सांडिला ।
करणीयत्वें आला । मुमुक्षुभागा
तेथ जे बुद्धि ऐसा । बळिया बांधे भरंवसा ।
मोक्षु ठेविला ऐसा । जोडेल येथ
म्हणौनि निवृत्तीची मांडिली । सूनि प्रवृत्तितळीं ।
इये कर्मीं बुडकुळी । द्यावीं कीं ना ?
तृषार्ता उदकें जिणें । कां पुरीं पडलिया पोहणें ।
अंधकूपीं गति किरणें । सूर्याचेनि
नाना पथ्येंसीं औषध लाहे । तरी रोगें दाटलाही जिये ।
का मीना जिव्हाळा होये । जळाचा जरी
तरी तयाच्या जीविता । नाहीं जेवीं अन्यथा ।
तैसें कर्मीं इये वर्ततां । जोडेचि मोक्षु
हें करणीयाचिया कडे । जें ज्ञान आथी चोखडें ।
आणि अकरणीय हें फुडें । ऐसें जाण
जीं तिथें काम्यादिकें । संसारभयदायकें ।
अकृत्यपणाचें आंबुखें । पडिलें जयां
तिये कर्मीं अकार्यीं । जन्ममरणसमयीं ।
प्रवृत्ति पळवी पायीं । मागिलींचि
पैं आगीमाजीं न रिघवे । अथावीं न घालवे ।
धगधगीत नागवे । शूळ जेवीं
कां काळियानाग धुंधुवातु । देखोनि न घालवे हातु ।
न वचवे खोपेआंतु । वाघाचिये
तैसें कर्म अकरणीय । देखोनि महाभय ।
उपजे निःसंदेह । बुद्धी जिये
वाढिलें रांधूनि विखें । तेथें जाणिजे मृत्यु न चुके ।
तेवीं निषेधीं कां देखे । बंधातें जे
मग बंधभयभरितीं । तियें निषिद्धीं प्राप्ती ।
विनियोगु जाणे निवृत्ती । कर्माचिये
ऐसेनि कार्याकार्यविवेकी । जे प्रवृत्ति निवृत्ति मापकी ।
खरा कुडा पारखी । जियापरी
तैसी कृत्याकृत्यशुद्धी । बुझे जे निरवधी ।
सात्विक म्हणिपे बुद्धी । तेचि तूं जाण
आणि बकाच्या गांवीं । घेपे क्षीरनीर सकलवी ।
कां अहोरात्रींची गोंवी । आंधळें नेणे
जया फुलाचा मकरंदु फावे । तो काष्ठें कोरूं धांवे ।
परी भ्रमरपणा नव्हे । अव्हांटा जेवीं
तैसीं इयें कार्याकार्यें । धर्माधर्मरूपें जियें ।
तियें न चोजवितां जाये । जाणती जे कां
अगा डोळांवीण मोतियें । घेतां पाडु मिळे विपायें ।
न मिळणें तें आहे । ठेविलें तेथें
तैसें अकरणीय अवचटें । नोडवे तरीच लोटे ।
येऱहवीं जाणें एकवटें । दोन्ही जे कां
ते गा बुद्धि चोखविषीं । जाण येथ राजसी ।
अक्षत टाकिली जैसी । मांदियेवरी
आणि राजा जिया वाटा जाये । ते चोरांसि आडव होये ।
कां राक्षसां दिवो पाहे । राती होऊनि
नाना निधानचि निदैवा । होये कोळसयाचा उडवा ।
पैं असतें आपणपें जीवा । नाहीं जालें
तैसें धर्मजात तितुकें । जिये बुद्धीसी पातकें ।
साच तें लटिकें । ऐसेंचि बुझे
ते आघवेचि अर्थ । करूनि घाली अनर्थ ।
गुण ते ते व्यवस्थित । दोषचि मानी
किंबहुना श्रुतिजातें । अधिष्ठूनि केलें सरतें ।
तेतुलेंही उपरतें । जाणे जे बुद्धी
ते कोणातेंही न पुसतां । तामसी जाणावी पंडुसुता ।
रात्री काय धर्मार्था । साच करावी ।
एवं बुद्धीचे भेद । तिन्ही तुज विशद ।
सांगितले स्वबोध\- । कुमुदचंद्रा
आतां ययाचि बुद्धिवृत्ती । निष्टंकिला कर्मजातीं ।
खांदु मांडिजे धृती । त्रिविधा तया
तिये धृतीचेही विभाग । तिन्ही यथालिंग ।
सांगिजती चांग । अवधान देईं
तरी उदेलिया दिनकरु । चोरीसिं थोके अंधारु ।
कां राजाज्ञा अव्यवहारु । कुंठवी जेवीं
नाना पवनाचा साटु । वाजीनलिया नीटु ।
आंगेंसीं बोभाटु । सांडिती मेघ
कां अगस्तीचेनि दर्शनें । सिंधु घेऊनि ठाती मौनें ।
चंद्रोदयीं कमळवनें । मिठी देती
हें असो पावो उचलिला । मदमुख न ठेविती खालां ।
गर्जोनि पुढां जाला । सिंहु जरी
तैसा जो धीरु । उठलिया अंतरु ।
मनादिकें व्यापारु । सांडिती उभीं
इंद्रियां विषयांचिया गांठी । अपैसया सुटती किरीटी ।
मन मायेच्या पोटीं । रिगती दाही
अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी ।
बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं
संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें ।
बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे
ऐसी धैर्यराजें जेणें । मन प्राण करणें ।
स्वचेष्टांचीं संभाषणें । सांडविजती
मग आघवींचि सडीं । ध्यानाच्या आंतुल्या मढीं ।
कोंडिजती निरवडी । योगाचिये
परी परमात्मया चक्रवर्ती । उगाणिती जंव हातीं ।
तंव लांचु न घेतां धृती । धरिजती जिया
ते गा धृती येथें । सात्विक हें निरुतें ।
आईक अर्जुनातें । श्रीकांतु म्हणे
आणि होऊनियां शरीरी । स्वर्गसंसाराच्या दोहीं घरीं ।
नांदे जो पोटभरी । त्रिवर्गोपायें
तो मनोरथांच्या सागरीं । धर्मार्थकामांच्या तारुवावरी ।
जेणें धैर्यबळें करी । क्रिया\-वणिज
जें कर्म भांडवला सूये । तयाची चौगुणी येती पाहे ।
येवढें सायास साहे । जया धृती
ते गा धृती राजस । पार्था येथ परीयेस ।
आतां आइक तामस । तिसरी जे कां
तरी सर्वाधमें गुणें । जयाचें कां रूपा येणें ।
कोळसा काळेपणें । घडला जैसा
अहो प्राकृत आणि हीनु । तयाही कीं गुणत्वाचा मानु ।
तरी न म्हणिजे पुण्यजनु । राक्षसु काई ?
पैं ग्रहांमाजीं इंगळु । तयातें म्हणिजे मंगळु ।
तैसा तमीं धसाळु । गुणशब्दु हा
जे सर्वदोषांचा वसौटा । तमचि कामऊनि सुभटा ।
उभारिला आंगवठा । जया नराचा
तो आळसु सूनि असे कांखे । म्हणौनि निद्रे कहीं न मुके ।
पापें पोषितां दुःखें । न सांडिजे जेवीं
आणि देहधनाचिया आवडी । सदा भय तयातें न सांडी ।
विसंबूं न सके धोंडीं । काठिण्य जैसें
आणि पदार्थजातीं स्नेहो । बांधे म्हणौनि तो शोकें ठावो ।
केला न शके पाप जावों । कृतघ्नौनि जैसें
आणि असंतोष जीवेंसीं । धरूनि ठेला अहर्निशीं ।
म्हणौनि मैत्री तेणेंसीं । विषादें केली
लसणातें न सांडी गंधी । कां अपथ्यशीळातें व्याधी ।
तैसी केली मरणावधी । विषादें तया
आणि वयसा वित्तकामु । ययांचा वाढवी संभ्रमु ।
म्हणौनि मदें आश्रमु । तोचि केला
आगीतें न सांडी तापु । सळातें जातीचा सापु ।
कां जगाचा वैरी वासिपु । अखंडु जैसा
नातरी शरीरातें काळु । न विसंबे कवणे वेळु ।
तैसा आथी अढळु । तामसीं मदु
एवं पांचही हे निद्रादिक । तामसाच्या ठाईं दोख ।
जिया धृती देख । धरिलें आहाती
तिये गा धृती नांवें । तामसी येथ हें जाणावें ।
म्हणितलें तेणें देवें । जगाचेनी
एवं त्रिविध जे बुद्धि । कीजे कर्मनिश्चयो आधि ।
तो धृती या सिद्धि । नेइजो येथ
सूर्यें मार्गु गोचरु होये । आणि तो चालती कीर पाये ।
परी चालणें तें आहे । धैर्यें जेवीं
तैसी बुद्धि कर्मातें दावी । ते करणसामग्री निफजवी ।
परी निफजावया होआवी । धीरता जे
ते हे गा तुजप्रती । सांगीतली त्रिविध धृती ।
यया कर्मत्रया निष्पत्ती । जालिया मग
येथ फळ जें एक निफजे । सुख जयातें म्हणिजे ।
तेंही त्रिविध जाणिजे । कर्मवशें
तरी फळरूप तें सुख । त्रिगुणीं भेदलें देख ।
विवंचूं आतां चोख । चोखीं बोलीं
परी चोखी ते कैसी सांगे । पैं घेवों जातां बोलबगें ।
कानींचियेही लागे । हातींचा मळु
म्हणौनि जयाचेनि अव्हेरें । अवधानही होय बाहिरें ।
तेणें आइक हो आंतरें । जीवाचेनि जीवें
ऐसें म्हणौनि देवो । त्रिविधा सुखाचा प्रस्तावो ।
मांडला तो निर्वाहो । निरूपित असें
म्हणे सुखत्रयसंज्ञा । सांगों म्हणौनि प्रतिज्ञा ।
बोलिलों तें प्राज्ञा । ऐक आतां
तरी सुख तें गा किरीटी । दाविजेल तुज दिठी ।
जें आत्मयाचिये भेटी । जीवासि होय
परी मात्रेचेनि मापें । दिव्यौषध जैसें घेपें ।
कां कथिलाचें कीजे रुपें । रसभावनीं
नाना लवणाचें जळु । होआवया दोनि चार वेळु ।
देऊनि सांडिजती ढाळु । तोयाचें जेवीं
तेवीं जालेनि सुखलेशें । जीवु भाविलिया अभ्यासें ।
जीवपणाचें नासे । दुःख जेथें
तें येथ आत्मसुख । जालें असे त्रिगुणात्मक ।
तेंही सांगों एकैक । रूप आतां
आतां चंदनाचें बूड । सर्पी जैसें दुवाड ।
कां निधानाचें तोंड । विवसिया जेवीं
अगा स्वर्गींचें गोमटें । आडव यागसंकटें ।
कां बाळपण दासटें । त्रासकाळें
हें असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधीं ।
नातरी तो औषधीं । जिभेचा ठावो
तयापरी पांडवा । जया सुखाचा रिगावा ।
विषम तेथ मेळावा । यमदमांचा
देत सर्वस्नेहा मिठी । आगीं ऐसें वैराग्य उठी ।
स्वर्ग संसारा कांटी । काढितचि
विवेकश्रवणें खरपुसें । जेथ व्रताचरणें कर्कशें ।
करितां जाती भोकसे । बुद्ध्यादिकांचे
सुषुम्नेचेनि तोंडें । गिळिजे प्राणापानाचे लोंढे ।
बोहणियेसीचि येवढें । भारी जेथ
जें सारसांही विघडतां । होय वोहाहूनि वस्त काढितां ।
ना भणंगु दवडितां । भाणयावरुनी
पैं मायेपुढौनि बाळक । काळें नेतां एकुलतें एक ।
होय कां उदक । तुटतां मीना
तैसें विषयांचें घर । इंद्रियां सांडितां थोर ।
युगांतु होय तें वीर । विराग साहाती
ऐसा जया सुखाचा आरंभु । दावी काठिण्याचा क्षोभु ।
मग क्षीराब्धी लाभु । अमृताचा जैसा
पहिलया वैराग्यगरळा । धैर्यशंभु वोडवी गळा ।
तरी ज्ञानामृतें सोहळा । पाहे जेथें
पैं कोलिताही कोपे ऐसें । द्राक्षांचें हिरवेपण असे ।
तें परीपाकीं कां जैसें । माधुर्य आते
तें वैराग्यादिक तैसें । पिकलिया आत्मप्रकाशें ।
मग वैराग्येंसींही नाशे । अविद्याजात
तेव्हां सागरीं गंगा जैसी । आत्मीं मीनल्या बुद्धि तैसी ।
अद्वयानंदाची आपैसी । खाणी उघडे
ऐसें स्वानुभवविश्रामें । वैराग्यमूळ जें परिणमे ।
तें सात्विक येणें नामें । बोलिजे सुख
आणि विषयेंद्रियां । मेळु होतां धनंजया ।
जें सुख जाय थडिया । सांडूनि दोन्ही
अधिकारिया रिगतां गांवो । होय जैसा उत्साहो ।
कां रिणावरी विवाहो । विस्तारिला
नाना रोगिया जिभेपासीं । केळें गोड साखरेसीं ।
कां बचनागाची जैसी । मधुरता पहिली
पहिलें संवचोराचें मैत्र । हाटभेटीचें कलत्र ।
कां लाघवियाचे विचित्र । विनोद ते
तैसें विषयेंद्रियदोखीं । जें सुख जीवातें पोखी ।
मग उपडिला खडकीं । हंसु जैसा
तैसी जोडी आघवी आटे । जीविताचा ठाय फिटे ।
सुकृताचियाही सुटे । धनाची गांठी
आणिक भोगिलें जें कांहीं । तें स्वप्न तैसें होय नाहीं ।
मग हानीच्याचि घाईं । लोळावें उरे
ऐसें आपत्ती जें सुख । ऐहिकीं परिणमे देख ।
परत्रीं कीर विख । होऊनि परते
जे इंद्रियजाता लळा । दिधलिया धर्माचा मळा ।
जाळूनि भोगिजे सोहळा । विषयांचा जेथ
तेथ पातकें बांधिती थावो । तियें नरकीं देती ठावो ।
जेणें सुखें हा अपावो । परत्रीं ऐसा
पैं नामें विष महुरें । परी मारूनि अंतीं खरें ।
तैसें आदि जें गोडिरें । अंतीं कडू
पार्था तें सुख साचें । वळिलें आहे रजाचें ।
म्हणौनि न शिवें तयाचें । आंग कहीं
आणि अपेयाचेनि पानें । अखाद्याचेनि भोजनें ।
स्वैरस्त्रीसंनिधानें । होय जें सुख
का पुढिलांचेनि मारें । नातरी परस्वापहारें ।
जें सुख अवतरे । भाटाच्या बोलीं
जें आलस्यावरी पोखिजे । निद्रेमाजीं जें देखिजे ।
जयाच्या आद्यंतीं भुलिजे । आपुली वाट
तें गा सुख पार्था । तामस जाण सर्वथा ।
हें बहु न सांगोंचि जें कथा । असंभाव्य हे
ऐसें कर्मभेदें मुदलें । फळसुखही त्रिधा जालें ।
तें हें यथागमें केलें । गोचर तुज
ते कर्ता कर्म कर्मफळ । ये त्रिपुटी येकी केवळ ।
वांचूनि कांहींचि नसे स्थूल । सूक्ष्मीं इये
आणि हे तंव त्रिपुटी । तिहीं गुणीं इहीं किरीटी ।
गुंफिली असे पटीं । तांतुवीं जैसी
म्हणौनि प्रकृतीच्या आवलोकीं । न बंधिजे इहीं सत्वादिकीं ।
तैसी स्वर्गीं ना मृत्युलोकीं । आथी वस्तु
कैंचा लोंवेवीण कांबळा । मातियेवीण मोदळा ।
का जळेंवीण कल्लोळा । होणें आहे ?
तैसें न होनि गुणाचें । सृष्टीची रचना रचे ।
ऐसें नाहींचि गा साचें । प्राणिजात
यालागीं हें सकळ । तिहीं गुणांचेंचि केवळ ।
घडलें आहे निखिळ । ऐसें जाण
गुणीं देवां त्रयी लाविली । गुणीं लोकीं त्रिपुटी पाडिली ।
चतुर्वर्णा घातली । सिनानीं उळिगें
तेचि चारी वर्ण । पुससी जरी कोण कोण ।
तरी जयां मुख्य ब्राह्मण । धुरेचे कां
येर क्षत्रिय वैश्य दोन्ही । तेही ब्राह्मणाच्याचि मानिजे मानी ।
जे ते वैदिकविधानीं । योग्य म्हणौनि
चौथा शूद्रु जो धनंजया । वेदीं लागु नाहीं तया ।
तऱहीं वृत्ति वर्णत्रया । आधीन तयाची
तिये वृत्तिचिया जवळिका । वर्णा ब्राह्मणादिकां ।
शूद्रही कीं देखा । चौथा जाला
जैसा फुलाचेनि सांगातें । तांतुं तुरंबिजे श्रीमंतें ।
तैसें द्विजसंगें शूद्रातें । स्वीकारी श्रुती
ऐसैसी गा पार्था । हे चतुर्वर्णव्यवस्था ।
करूं आतां कर्मपथा । यांचिया रूपा
जिहीं गुणीं ते वर्ण चारी । जन्ममृत्यूंचिये कातरी ।
चुकोनियां ईश्वरीं । पैठे होती
जिये आत्मप्रकृतीचे इहीं । गुणीं सत्त्वादिकीं तिहीं ।
कर्में चौघां चहूं ठाईं । वांटिलीं वर्णा
जैसें बापें जोडिलें लेंका । वांटिलें सूर्यें मार्ग पांथिका ।
नाना व्यापार सेवकां । स्वामी जैसें
तैसी प्रकृतीच्या गुणीं । जया कर्माची वेल्हावणी ।
केली आहे वर्णीं । चहूं इहीं
तेथ सत्त्वें आपल्या आंगीं । समीन\-निमीन भागीं ।
दोघे केले नियोगी । ब्राह्मण क्षत्रिय
आणि रज परी सात्त्विक । तेथ ठेविलें वैश्य लोक ।
रजचि तमभेसक । तेथ शूद्र ते गा
ऐसा येकाचि प्राणिवृंदा । भेदु चतुर्वर्णधा ।
गुणींचि प्रबुद्धा । केला जाण
मग आपुलें ठेविलें जैसें । आइतेंचि दीपें दिसे ।
गुणभिन्न कर्म तैसें । शास्त्र दावी
तेंचि आतां कोण कोण । वर्णविहिताचें लक्षण ।
हें सांगों ऐक श्रवण\- । सौभाग्यनिधी
तरी सर्वेंद्रियांचिया वृत्ती । घेऊनि आपुल्या हातीं ।
बुद्धि आत्मया मिळे येकांतीं । प्रिया जैसी
ऐसा बुद्धीचा उपरमु । तया नाम म्हणिपे शमु ।
तो गुण गा उपक्रमु । जया कर्माचा
आणि बाह्येंद्रियांचें धेंडें । पिटूनि विधीचेनि दंडें ।
नेदिजे अधर्माकडे । कहींचि जावों
तो पैं गा शमा विरजा । दमु गुण जेथ दुजा ।
आणि स्वधर्माचिया वोजा । जिणें जें कां
सटवीचिये रातीं । न विसंबिजे जेवीं वाती ।
तैसा ईश्वरनिर्णयो चित्तीं । वाहणें सदा
तया नाम तप । ते तिजया गुणाचें रूप ।
आणि शौचही निष्पाप । द्विविध जेथ
मन भावशुद्धी भरलें । आंग क्रिया अळंकारिलें ।
ऐसें सबाह्य जियालें । साजिरें जें कां
तया नाम शौच पार्था । तो कर्मीं गुण जये चौथा ।
आणि पृथ्वीचिया परी सर्वथा । सर्व जें साहाणें
ते गा क्षमा पांडवा । गुण जेथ पांचवा ।
स्वरांमाजीं सुहावा । पंचमु जैसा
आणि वांकडेनी वोघेंसीं । गंगा वाहे उजूचि जैसी ।
कां पुटीं वळला ऊसीं । गोडी जैसी
तैसा विषमांही जीवां- । लागीं उजुकारु बरवा ।
तें आर्जव गा साहावा । जेथींचा गुण
आणि पाणियें प्रयत्नें माळी । अखंड जचे झाडामुळीं ।
परी तें आघवेंचि फळीं । जाणे जेवीं
तैसें शास्त्राचारें तेणें । ईश्वरुचि येकु पावणें ।
हें फुडें जें कां जाणणें । तें येथ ज्ञान
तें गा कर्मीं जिये । सातवा गुण होये ।
आणि विज्ञान हें पाहें । एवंरूप
तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्रें कां ध्यानबळें ।
ईश्वरतत्त्वींचि मिळे । निष्टंकबुद्धी
हें विज्ञान बरवें । गुणरत्न जेथ आठवें ।
आणि आस्तिक्य जाणावें । नववा गुण
पैं राजमुद्रा आथिलिया । प्रजा भजे भलतया ।
तेवीं शास्त्रें स्वीकारिलिया । मार्गमात्रातें
आदरें जें कां मानणें । तें आस्तिक्य मी म्हणें ।
तो नववा गुण जेणें । कर्म तें साच
एवं नवही शमादिक । गुण जेथ निर्दोख ।
तें कर्म जाण स्वाभाविक । ब्राह्मणाचें
तो नवगुणरत्नाकरु । यया नवरत्नांचा हारु ।
न फेडीत ले दिनकरु । प्रकाशु जैसा
नाना चांपा चांपौळी पूजिला । चंद्रु चंद्रिका धवळला ।
कां चंदनु निजें चर्चिला । सौरभ्यें जेवीं
तेवीं नवगुणटिकलग । लेणें ब्राह्मणाचें अव्यंग ।
कहींचि न संडी आंग । ब्राह्मणाचें
आतां उचित जें क्षत्रिया । तेंहीं कर्म धनंजया ।
सांगों ऐक प्रज्ञेचिया । भरोवरी
तरी भानु हा तेजें । नापेक्षी जेवीं विरजे ।
कां सिंहें न पाहिजे । जावळिया
ऐसा स्वयंभ जो जीवें लाठु । सावायेंवीण उद्भटु ।
ते शौर्य गा जेथ श्रेष्ठु । पहिला गुण
आणि सूर्याचेनि प्रतापें । कोडिही नक्षत्र हारपे ।
ना तो तरी न लोपे । सचंद्रीं तिहीं
तैसेनि आपुले प्रौढीगुणें । जगा या विस्मयो देणें ।
आपण तरी न क्षोभणें । कायसेनही
तें प्रागल्भ्यरूप तेजा । जिये कर्मीं गुण दुजा ।
आणि धीरु तो तिजा । जेथींचा गुण
वरिपडलिया आकाश । बुद्धीचे डोळे मानस ।
झांकी ना ते परीयेस । धैर्य जेथें
आणि पाणी हो कां भलतेतुकें । परी तें जिणौनि पद्म फांके ।
कां आकाश उंचिया जिंके । आवडे तयातें
तेवीं विविध अवस्था । पातलिया जिणौनि पार्था ।
प्रज्ञाफळ तया अर्था । वेझ देणें जें
तें दक्षत्व गा चोख । जेथ चौथा गुण देख ।
आणि झुंज अलौकिक । तो पांचवा गुण
आदित्याचीं झाडें । सदा सन्मुख सूर्याकडे ।
तेवीं समोर शत्रूपुढें । होणें जें कां
माहेवणी प्रयत्नेंसी । चुकविजे सेजे जैसी ।
रिपू पाठी नेदिजे तैसी । समरांगणीं
हा क्षत्रियाचेया आचारीं । पांचवा गुणेंद्रु अवधारीं ।
चहूं पुरुषार्थां शिरीं । भक्ति जैसी
आणि जालेनि फुलें फळें । शाखिया जैसीं मोकळे ।
कां उदार परीमळें । पद्माकरु
नाना आवडीचेनि मापें । चांदिणें भलतेणें घेपे ।
पुढिलांचेनि संकल्पें । तैसें जें देणें
तें उमप गा दान । जेथ सहावें गुणरत्न ।
आणि आज्ञे एकायतन । होणें जें कां
पोषूनि अवयव आपुले । करविजतीं मानविले ।
तेवीं पालणें लोभविलें । जग जें भोगणें
तया नाम ईश्वरभावो । जो सर्वसामर्थ्याचा ठावो ।
तो गुणांमाजीं रावो । सातवा जेथ
ऐसें जें शौर्यादिकीं । इहीं सात गुणविशेखीं ।
अळंकृत सप्तऋखीं । आकाश जैसें
तैसें सप्तगुणीं विचित्र । कर्म जें जगीं पवित्र ।
तें सहज जाण क्षात्र । क्षत्रियाचें
नाना क्षत्रिय नव्हे नरु । तो सत्त्वसोनयाचा मेरु ।
म्हणौनि गुणस्वर्गां आधारु । सातां इयां
नातरी सप्तगुणार्णवीं । परीवारली बरवी ।
हे क्रिया नव्हे पृथ्वी । भोगीतसे तो
कां गुणांचे सातांही ओघीं । हे क्रिया ते गंगा जगीं ।
तया महोदधीचिया आंगीं । विलसे जैसी
परी हें बहु असो देख । शौर्यादि गुणात्मक ।
कर्म गा नैसर्गिक । क्षात्रजातीसी
आतां वैश्याचिये जाती । उचित जे महामती ।
ते ऐकें गा निरुती । क्रिया सांगों
तरी भूमि बीज नांगरु । यया भांडवलाचा आधारु ।
घेऊनि लाभु अपारु । मेळवणें जें
किंबहुना कृषी जिणें । गोधनें राखोनि वर्तणें ।
कां समर्घीची विकणें । महर्घीवस्तु
येतुलाचि पांडवा । वैश्यातें कर्माचा मेळावा ।
हा वैश्यजातीस्वभावा । आंतुला जाण
आणि वैश्य क्षत्रिय ब्राह्मण । हे द्विजन्में तिन्ही वर्ण ।
ययांचें जें शुश्रूषण । तें शूद्रकर्म
पैं द्विजसेवेपरौतें । धांवणें नाहीं शूद्रातें ।
एवं चतुर्वर्णोचितें । दाविलीं कर्में
आतां इयेचि विचक्षणा । वेगळालिया वर्णा ।
उचित जैसें करणां । शब्दादिक
नातरी जळदच्युता । पाणिया उचित सरिता ।
सरितेसी पंडुसुता । सिंधु उचितु
तैसें वर्णाश्रमवशें । जें करणीय आलें असे ।
गोरेया आंगा जैसें । गोरेपण
तया स्वभावविहिता कर्मा । शास्त्राचेनि मुखें वीरोत्तमा ।
प्रवर्तावयालागीं प्रमा । अढळ कीजे
पैं आपुलेंचि रत्न थितें । घेपे पारखियाचेनि हातें ।
तैसें स्वकर्म आपैतें । शास्त्रें करावीं
जैसी दिठी असे आपुलिया ठायीं । परी दीपेंवीण भोग नाहीं ।
मार्गु न लाहतां काई । पाय असतां होय ?
म्हणौनि ज्ञातिवशें साचारु । सहज असे जो अधिकारु ।
तो आपुलिया शास्त्रें गोचरु । आपण कीजे
मग घरींचाचि ठेवा । जेवीं डोळ्यां दावी दिवा ।
तरी घेतां काय पांडवा । आडळु असे ?
तैसें स्वभावें भागा आलें । वरी शास्त्रें खरें केलें ।
तें विहित जो आपुलें । आचरे गा
परी आळसु सांडुनी । फळकाम दवडुनी ।
आंगें जीवें मांडुनी । तेथेंचि भरु
वोघीं पडिलें पाणी । नेणें आनानी वाहणी ।
तैसा जाय आचरणीं । व्यवस्थौनी
अर्जुना जो यापरी । तें विहित कर्म स्वयें करी ।
तो मोक्षाच्या ऐलद्वारीं । पैठा होय
जे अकरणा आणि निषिद्धा । न वचेचि कांहीं संबंधा ।
म्हणौनि भवा विरुद्धा । मुकला तो
आणि काम्यकर्मांकडे । न परतेचि जेथ कोडें ।
तेथ चंदनाचेही खोडे । न लेचि तो
येर नित्य कर्म तंव । फळत्यागें वेंचिलें सर्व ।
म्हणौनि मोक्षाची शींव । ठाकूं लाहे
ऐसेनि शुभाशुभीं संसारीं । सांडिला तो अवधारीं ।
वौराग्यमोक्षद्वारीं । उभा ठाके
जें सकळ भाग्याची सीमा । मोक्षलाभाची जें प्रमा ।
नाना कर्ममार्गश्रमा । शेवटु जेथ
मोक्षफळें दिधली वोल । जें सुकृततरूचें फूल ।
तयें वैराग्यीं ठेवी पाऊल । भंवरु जैसा
पाहीं आत्मज्ञानसुदिनाचा । वाधावा सांगतया अरुणाचा ।
उदयो त्या वैराग्याचा । ठावो पावे
किंबहुना आत्मज्ञान । जेणें हाता ये निधान ।
तें वैराग्य दिव्यांजन । जीवें ले तो
ऐसी मोक्षाची योग्यता । सिद्धी जाय तया पंडुसुता ।
अनुसरोनि विहिता । कर्मा यया
हें विहित कर्म पांडवा । आपुला अनन्य वोलावा ।
आणि हेचि परम सेवा । मज सर्वात्मकाची
पैं आघवाचि भोगेंसीं । पतिव्रता क्रीडे प्रियेंसीं ।
कीं तयाचीं नामें जैसीं । तपें तियां केलीं
कां बाळका एकी माये । वांचोनि जिणें काय आहे ।
म्हणौनि सेविजे कीं तो होये । पाटाचा धर्मु
नाना पाणी म्हणौनि मासा । गंगा न सांडितां जैसा ।
सर्व तीर्थ सहवासा । वरपडा जाला
तैसें आपुलिया विहिता । उपावो असे न विसंबितां ।
ऐसा कीजे कीं जगन्नाथा । आभारु पडे
अगा जया जें विहित । तें ईश्वराचें मनोगत ।
म्हणौनि केलिया निभ्रांत । सांपडेचि तो
पैं जीवाचे कसीं उतरली । ते दासी कीं गोसावीण जाली ।
सिसे वेंचि तया मविली । वही जेवीं
तैसें स्वामीचिया मनोभावा । न चुकिजे हेचि परमसेवा ।
येर तें गा पांडवा । वाणिज्य करणें
म्हणौनि विहित क्रिया केली । नव्हे तयाची खूण पाळिली ।
जयापसूनि कां आलीं । आकारा भूतें
जो अविद्येचिया चिंधिया । गुंडूनि जीव बाहुलिया ।
खेळवीतसे तिगुणिया । अहंकाररज्जू
जेणें जग हें समस्त । आंत बाहेरी पूर्ण भरित ।
जालें आहे दीपजात । तेजें जैसें
तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्मकुसुमांची वीरा ।
पूजा केली होय अपारा । तोषालागीं
म्हणौनि तिये पूजे । रिझलेनि आत्मराजें ।
वैराग्यसिद्धि देईजे । पसाय तया
जिये वैराग्यदशें । ईश्वराचेनि वेधवशें ।
हें सर्वही नावडे जैसें । वांत होय
प्राणनाथाचिया आधी । विरहिणीतें जिणेंही बाधी ।
तैसें सुखजात त्रिशुद्धी । दुःखचि लागे
सम्यक्ज्ञान नुदैजतां । वेधेंचि तन्मयता ।
उपजे ऐसी योग्यता । बोधाची लाहे
म्हणौनि मोक्षलाभालागीं । जो व्रतें वाहातसें आंगीं ।
तेणें स्वधर्मु आस्था चांगी । अनुष्ठावा
अगा आपुला हा स्वधर्मु । आचरणीं जरी विषमु ।
तरी पाहावा तो परिणामु । फळेल जेणें
जैं सुखालागीं आपणपयां । निंबचि आथी धनंजया ।
तैं कडुवटपणा तयाचिया । उबगिजेना
फळणया ऐलीकडे । केळीतें पाहातां आस मोडे ।
ऐसी त्यजिली तरी जोडे । तैसें कें गोमटें
तेवीं स्वधर्मु सांकडु । देखोनि केला जरी कडु ।
तरी मोक्षसुरवाडु । अंतरला कीं
आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे ।
तरी जीये तें नोहे । स्नेह कुऱहें कीं
येरी जिया पराविया । रंभेहुनि बरविया ।
तिया काय कराविया । बाळकें तेणें ?
अगा पाणियाहूनि बहुवें । तुपीं गुण कीर आहे ।
परी मीना काय होये । असणें तेथ
पैं आघविया जगा जें विख । तें विख किडियाचें पीयूख ।
आणि जगा गूळ तें देख । मरण तया
म्हणौनि जे विहित जया जेणें । फिटे संसाराचें धरणें ।
क्रिया कठोर तऱही तेणें । तेचि करावी
येरा पराचारा बरविया । ऐसें होईल टेंकलया ।
पायांचें चालणें डोइया । केलें जैसें
यालागीं कर्म आपुले । जें जातिस्वभावें असे आलें ।
तें करी तेणें जिंतिलें । कर्मबंधातें
आणि स्वधर्मुचि पाळावा । परधर्मु तो गाळावा ।
हा नेमुही पांडवा । न कीजेचि पै गा ?
तरी आत्मा दृष्ट नोहे । तंव कर्म करणें कां ठाये ? ।
आणि करणें तेथ आहे । आयासु आधीं
म्हणौनि भलतिये कर्मीं । आयासु जऱही उपक्रमीं ।
तरी काय स्वधर्मीं । दोषु । सांगें ?
आगा उजू वाटा चालावें । तऱही पायचि शिणवावे ।
ना आडरानें धांवावें । तऱही तेंचि
पैं शिळा कां सिदोरिया । दाटणें एक धनंजया ।
परी जें वाहतां विसांवया । मिळिजे तें घेपे
येऱहवीं कणा आणि भूसा । कांडितांही सोसु सरिसा ।
जेंचि रंधन श्वान मांसा । तेंचि हवी
दधी जळाचिया घुसळणा । व्यापार सारिखेचि विचक्षणा ।
वाळुवे तिळा घाणा । गाळणें एक
पैं नित्य होम देयावया । कां सैरा आगी सुवावया ।
फुंकितां धू धनंजया । साहणें तेंचि
परी धर्मपत्नी धांगडी । पोसितां जरी एकी वोढी ।
तरी कां अपरवडी । आणावी आंगा ?
हां गा पाठीं लागला घाई । मरण न चुकेचि पाहीं ।
तरी समोरला काई । आगळें न कीजे ?
कुलस्त्री दांड्याचे घाये । परघर रिगालीहि जरी साहे ।
तरी स्वपतीतें वायें । सांडिलें कीं ।
तैसें आवडतेंही करणें । न निपजे शिणल्याविणें ।
तरी विहित बा रे कोणें । बोलें भारी ?
वरी थोडेंचि अमृत घेतां । सर्वस्व वेंचो कां पंडुसुता ।
जेणें जोडे जीविता । अक्षयत्व
येर काह्यां मोलें वेंचूनि । विष पियावे घेऊनि ।
आत्महत्येसि निमोनि । जाइजे जेणें
तैसें जाचूनियां इंद्रियें । वेंचूनि आयुष्याचेनि दिये ।
सांचलें पापीं आन आहे । दुःखावाचूनि ?
म्हणौनि करावा स्वधर्मु । जो करितां हिरोनि घे श्रमु ।
उचित देईल परमु । पुरुषार्थराजु
याकारणें किरीटी । स्वधर्माचिये राहाटी ।
न विसंबिजे संकटीं । सिद्धमंत्र जैसा
कां नाव जैसी उदधीं । महारोगी दिव्यौषधी ।
न विसंबिजे तया बुद्धी । स्वकर्म येथ
मग ययाचि गा कपिध्वजा । स्वकर्माचिया महापूजा ।
तोषला ईशु तमरजा । झाडा करुनी
शुद्धसत्त्वाचिया वाटा । आणी आपुली उत्कंठा ।
भवस्वर्ग काळकूटा । ऐसें दावी
जियें वैराग्य येणें बोलें । मागां संसिद्धी रूप केलें ।
किंबहुना तें आपुलें । मेळवी खागें
मग जिंतिलिया हे भोये । पुरुष सर्वत्र जैसा होये ।
कां जालाही जें लाहे । तें आतां सांगों
तरी देहादिक हें संसारें । सर्वही मांडलेंसे जें गुंफिरें ।
तेथ नातुडे तो वागुरें । वारा जैसा
पैं परिपाकाचिये वेळे । फळ देठें ना देठु फळें ।
न धरे तैसें स्नेह खुळें । सर्वत्र होय
पुत्र वित्त कलत्र । हे जालियाही स्वतंत्र ।
माझें न म्हणे पात्र । विषाचें जैसें
हें असो विषयजाती । बुद्धि पोळली ऐसी माघौती ।
पाउलें घेऊनि एकांतीं । हृदयाच्या रिगे
ऐसया अंतःकरण । बाह्य येतां तयाची आण ।
न मोडी समर्था भेण । दासी जैसी
तैसें ऐक्याचिये मुठी । माजिवडें चित्त किरीटी ।
करूनि वेधी नेहटीं । आत्मयाच्या
तेव्हां दृष्टादृष्ट स्पृहे । निमणें जालेंचि आहे ।
आगीं दडपलिया धुयें । राहिजे जैसें
म्हणौनि नियमिलिया मानसीं । स्पृहा नासौनि जाय आपैसीं ।
किंबहुना तो ऐसी । भूमिका पावे
पैं अन्यथा बोधु आघवा । मावळोनि तया पांडवा ।
बोधमात्रींचि जीवा । ठावो होय
धरवणी वेंचें सरे । तैसें भोगें प्राचीन पुरे ।
नवें तंव नुपकरे । कांहीचि करूं
ऐसीं कर्में साम्यदशा । होय तेथ वीरेशा ।
मग श्रीगुरु आपैसा । भेटेचि गा
रात्रीची चौपाहरी । वेंचलिया अवधारीं ।
डोळ्यां तमारी । मिळे जैसा
का येऊनि फळाचा घडु । पारुषवी केळीची वाढु ।
श्रीगुरु भेटोनि करी पाडु । बुभुत्सु तैसा
मग आलिंगिला पूर्णिमा । जैसा उणीव सांडी चंद्रमा ।
तैसें होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया
तेव्हां अबोधुमात्र असे । तो तंव तया कृपा नासे ।
तेथ निशीसवें जैसें । आंधारें जाय
तैसी अबोधाचिये कुशी । कर्म कर्ता कार्य ऐशी ।
त्रिपुटी असे ते जैसी । गाभिणी मारिली
तैसेंचि अबोधनाशासवें । नाशे क्रियाजात आघवें ।
ऐसा समूळ संभवे । संन्यासु हा
येणें मुळाज्ञानसंन्यासें । दृश्याचा जेथ ठावो पुसे ।
तेथ बुझावें तें आपैसें । तोचि आहे
चेइलियावरी पाहीं । स्वप्नींचिया तिये डोहीं ।
आपणयातें काई । काढूं जाइजे ?
तैं मी नेणें आतां जाणेन । हें सरलें तया दुःस्वप्न ।
जाला ज्ञातृज्ञेयाविहीन । चिदाकाश
मुखाभासेंसी आरिसा । परौता नेलिया वीरेशा ।
पाहातेपणेंवीण जैसा । पाहाता ठाके
तैसें नेणणें जें गेलें । तेणें जाणणेंही नेलें ।
मग निष्क्रिय उरलें । चिन्मात्रचि
तेथ स्वभावें धनंजया । नाहीं कोणीचि क्रिया ।
म्हणौनि प्रवादु तया । नैष्कर्म्यु ऐसा
तें आपुलें आपणपें । असे तेंचि होऊनि हारपे ।
तरंगु कां वायुलोपें । समुद्रु जैसा
तैसें न होणें निफजे । ते नैष्कर्म्यसिद्धि जाणिजे ।
सर्वसिद्धींत सहजें । परम हेचि
देउळाचिया कामा कळसु । उपरम गंगेसी सिंधु प्रवेशु ।
कां सुवर्णशुद्धी कसु । सोळावा जैसा
तैसें आपुलें नेणणें । फेडिजे का जाणणें ।
तेंहि गिळूनि असणें । ऐसी जे दशा
तियेपरतें कांहीं । निपजणें आन नाहीं ।
म्हणौनि म्हणिपे पाहीं । परमसिद्धि ते
परी हेचि आत्मसिद्धि । जो कोणी भाग्यनिधि ।
श्रीगुरुकृपालब्धि\- । काळीं पावे
उदयतांचि दिनकरु । प्रकाशुचि आते आंधारु ।
कां दीपसंगें कापुरु । दीपुचि होय
तया लवणाची कणिका । मिळतखेंवो उदका ।
उदकचि होऊनि देखा । ठाके जेवीं
कां निद्रितु चेवविलिया । स्वप्नेंसि नीद वायां ।
जाऊनि आपणपयां । मिळे जैसा
तैसें जया कोण्हासि दैवें । गुरुवाक्यश्रवणाचि सवें ।
द्वैत गिळोनि विसंवे । आपणया वृत्ती
तयासी मग कर्म करणें । हें बोलिजैलचि कवणें ।
आकाशा येणें जाणें । आहे काई ? ।
म्हणौनि तयासि कांहीं । त्रिशुद्धि करणें नाहीं ।
परी ऐसें जरी हें कांहीं । नव्हे जया
कानावचनाचिये भेटी- । सरिसाचि पैं किरीटी ।
वस्तु होऊनि उठी । कवणि एकु जो
येऱहवीं स्वकर्माचेनि वन्ही । काम्यनिषिद्धाचिया इंधनीं ।
रजतमें कीर दोन्ही । जाळिलीं आधीं
पुत्र वित्त परलोकु । यया तिहींचा अभिलाखु ।
घरीं होय पाइकु । हेंही जालें
इंद्रियें सैरा पदार्थीं । रिगतां विटाळलीं होतीं ।
तिये प्रत्याहार तीर्थीं । न्हाणिलीं कीर
आणि स्वधर्माचें फळ । ईश्वरीं अर्पूनि सकळ ।
घेऊनि केलें अढळ । वैराग्यपद
ऐसी आत्मसाक्षात्कारीं । लाभे ज्ञानाची उजरी ।
ते सामुग्री कीर पुरी । मेळविली
आणि तेचि समयीं । सद्गुरु भेटले पाहीं ।
तेवींचि तिहीं कांहीं । वंचिजेना
परी वोखद घेतखेंवो । काय लाभे आपला ठावो ? ।
कां उदयजतांचि दिवो । मध्यान्ह होय ?
सुक्षेत्रीं आणि वोलटें । बीजही पेरिलें गोमटें ।
तरी आलोट फळ भेटे । परी वेळे कीं गा
जोडला मार्गु प्रांजळु । मिनला सुसंगाचाही मेळु ।
तरी पाविजे वांचूनि वेळु । लागेचि कीं
तैसा वैराग्यलाभु जाला । वरी सद्गुरुही भेटला ।
जीवीं अंकुरु फुटला । विवेकाचा
तेणें ब्रह्म एक आथी । येर आघवीचि भ्रांती ।
हेही कीर प्रतीती । गाढ केली
परी तेंचि जें परब्रह्म । सर्वात्मक सर्वोत्तम ।
मोक्षाचेंही काम । सरे जेथ
यया तिन्ही अवस्था पोटीं । जिरवी जें गा किरीटी ।
तया ज्ञानासिही मिठी । दे जे वस्तु
ऐक्याचें एकपण सरे । जेथ आनंदकणुही विरे ।
कांहींचि नुरोनि उरे । जें कांहीं गा
तियें ब्रह्मीं ऐक्यपणें । ब्रह्मचि होऊनि असणें ।
तें क्रमेंचि करूनि तेणें । पाविजे पैं
भुकेलियापासीं । वोगरिलें षड्रसीं ।
तो तृप्ति प्रतिग्रासीं । लाहे जेवीं
तैसा वैराग्याचा वोलावा । विवेकाचा तो दिवा ।
आंबुथितां आत्मठेवा । काढीचि तो
तरी भोगिजे आत्मऋद्धी । येवढी योग्यतेची सिद्धी ।
जयाच्या आंगीं निरवधी । लेणें जाली
तो जेणें क्रमें ब्रह्म । होणें करी गा सुगम ।
तया क्रमाचें आतां वर्म । आईक सांगों
तरी गुरु दाविलिया वाटा । येऊन विवेकतीर्थतटा ।
धुऊनियां मळकटा । बुद्धीचा तेणें
मग राहूनें उगळिली । प्रभा चंद्रें आलिंगिली ।
तैसी शुद्धत्वें जडली । आपणयां बुद्धि
सांडूनि कुळें दोन्ही । प्रियासी अनुसरे कामिनी ।
द्वंद्वत्यागें स्वचिंतनीं । पडली तैसी
आणि ज्ञान ऐसें जिव्हार । नेवों नेवों निरंतर ।
इंद्रियीं केले थोर । शब्दादिक जे
ते रश्मिजाळ काढलेया । मृगजळ जाय लया ।
तैसें वृत्तिरोधें तयां । पांचांही केलें
नेणतां अधमाचिया अन्ना । खादलिया कीजे वमना ।
तैसीं वोकविली सवासना । इंद्रियें विषयीं
मग प्रत्यगावृत्ती चोखटें । लाविलीं गंगेचेनि तटें ।
ऐसीं प्रायश्चित्तें धुवटें । केलीं येणें
पाठीं सात्विकें धीरें तेणें । शोधारलीं तियें करणें ।
मग मनेंसीं योगधारणें । मेळविलीं
तेवींचि प्राचीनें इष्टानिष्टें । भोगेंसीं येउनी भेटे ।
तेथ देखिलियाही वोखटें । द्वेषु न करी
ना गोमटेंचि विपायें । तें आणूनि पुढां सूये ।
तयालागीं न होये । साभिलाषु
यापरी इष्टानिष्टींंं । रागद्वेष किरीटी ।
त्यजूनि गिरिकपाटीं । निकुंजीं वसे
गजबजा सांडिलिया । वसवी वनस्थळिया ।
अंगाचियाचि मांदिया । एकलेया
शमदमादिकीं खेळे । न बोलणेंचि चावळे ।
गुरुवाक्याचेनि मेळें । नेणे वेळु
आणि आंगा बळ यावें । नातरी क्षुधा जावें ।
कां जिभीचे पुरवावे । मनोरथ
भोजन करितांविखीं । ययां तिहींतें न लेखी ।
आहारीं मिती संतोषीं । माप न सूये
अशनाचेनि पावकें । हारपतां प्राणु पोखे ।
इतुकियाचि भागु मोटकें । अशन करी
आणि परपुरुषें कामिली । कुळवधू आंग न घाली ।
निद्रालस्या न मोकली । आसन तैसें
दंडवताचेनि प्रसंगें । भुयीं हन अंग लागे ।
वांचूनि येर नेघे । राभस्य तेथ
देहनिर्वाहापुरतें । राहाटवी हातांपायांतें ।
किंबहुना आपैतें । सबाह्य केलें
आणि मनाचा उंबरा । वृत्तीसी देखों नेदी वीरा ।
तेथ कें वाग्व्यापारा । अवकाशु असे ?
ऐसेनि देह वाचा मानस । हें जिणौनि बाह्यप्रदेश ।
आकळिलें आकाश । ध्यानाचें तेणें
गुरुवाक्यें उठविला । बोधीं निश्चयो आपुला ।
न्याहाळीं हातीं घेतला । आरिसा जैसा
पैं ध्याता आपणचि परी । ध्यानरूप वृत्तिमाझारीं ।
ध्येयत्वें घे हे अवधारीं । ध्यानरूढी गा
तेथ ध्येय ध्यान ध्याता । ययां तिहीं एकरूपता ।
होय तंव पंडुसुता । कीजे तें गा
म्हणौनि तो मुमुक्षु । आत्मज्ञानीं जाला दक्षु ।
परी पुढां सूनि पक्षु । योगाभ्यासाचा
अपानरंध्रद्वया । माझारीं धनंजया ।
पार्ष्णीं पिडूनियां । कांवरुमूळ
आकुंचूनि अध । देऊनि तिन्ही बंध ।
करूनि एकवद । वायुभेदी
कुंडलिनी जागवूनि । मध्यमा विकाशूनि ।
आधारादि भेदूनि । आज्ञावरी
सहस्त्रदळाचा मेघु । पीयुषें वर्षोनि चांगु ।
तो मूळवरी वोघु । आणूनियां
नाचतया पुण्यगिरी । चिद्भैरवाच्या खापरीं ।
मनपवनाची खीच पुरी । वाढूनियां
जालिया योगाचा गाढा । मेळावा सूनि हा पुढां ।
ध्यान मागिलीकडां । स्वयंभ केलें
आणि ध्यान योग दोन्ही । इयें आत्मतत्वज्ञानीं ।
पैठा होआवया निर्विघ्नीं । आधींचि तेणें
वीतरागतेसारिखा । जोडूनि ठेविला सखा ।
तो आघवियाचि भूमिका- । सवें चाले
पहावें दिसे तंववरी । दिठीतें न संडी दीप जरी ।
तरी कें आहे अवसरी । देखावया
तैसें मोक्षीं प्रवर्तलया । वृत्ती ब्रह्मीं जाय लया ।
तंव वैराग्य आथी तया । भंगु कैचा ।
म्हणौनि सवैराग्यु । ज्ञानाभ्यासु तो सभाग्यु ।
करूनि जाला योग्यु । आत्मलाभा
ऐसी वैराग्याची आंगीं । बाणूनियां वज्रांगीं ।
राजयोगतुरंगीं । आरूढला
वरी आड पडिलें दिठी । सानें थोर निवटी ।
तें बळीं विवेकमुष्टीं । ध्यानाचें खांडें
ऐसेनि संसाररणाआंतु । आंधारीं सूर्य तैसा असे जातु ।
मोक्षविजयश्रीये वरैतु । होआवयालागीं
तेथ आडवावया आले । दोषवैरी जे धोपटिले ।
तयांमाजीं पहिलें । देहाहंकारु
जो न मोकली मारुनी । जीवों नेदी उपजवोनि ।
विचंबवी खोडां घालुनी । हाडांचिया
तयाचा देहदुर्ग हा थारा । मोडूनि घेतला तो वीरा ।
आणि बळ हा दुसरा । मारिला वैरी
जो विषयाचेनि नांवें । चौगुणेंही वरी थांवे ।
जेणें मृतावस्था धांवे । सर्वत्र जगा
तो विषय विषाचा अथावो । आघविया दोषांचा रावो ।
परी ध्यानखड्गाचा घावो । साहेल कैंचा ?
आणि प्रिय विषयप्राप्ती । करी जया सुखाची व्यक्ती ।
तेचि घालूनि बुंथी । आंगीं जो वाजे
जो सन्मार्गा भुलवी । मग अधर्माच्या आडवीं ।
सूनि वाघां सांपडवी । नरकादिकां
तो विश्वासें मारितां रिपु । निवटूनि घातला दर्पु ।
आणि जयाचा अहा कंपु । तापसांसी
क्रोधा ऐसा महादोखु । जयाचा देखा परिपाकु ।
भरिजे तंव अधिकु । रिता होय जो
तो कामु कोणेच ठायीं । नसे ऐसें केलें पाहीं ।
कीं तेंचि क्रोधाही । सहजें आलें
मुळाचें तोडणें जैसें । होय कां शाखोद्देशें ।
कामु नाशलेनि नाशे । तैसा क्रोधु
म्हणौनि काम वैरी । जाला जेथ ठाणोरी ।
तेथ सरली वारी । क्रोधाचीही
आणि समर्थु आपुला खोडा । शिसें वाहवी जैसा होडा ।
तैसा भुंजौनि जो गाढा । परीग्रहो
जो माथांचि पालाणवी । अंगा अवगुण घालवी ।
जीवें दांडी घेववी । ममत्वाची
शिष्यशास्त्रादिविलासें । मठादिमुद्रेचेनि मिसें ।
घातले आहाती फांसे । निःसंगा जेणें
घरीं कुटुंबपणें सरे । तरी वनीं वन्य होऊनि अवतरे ।
नागवीयाही शरीरें । लागला आहे
ऐसा दुर्जयो जो परीग्रहो । तयाचा फेडूनि ठावो ।
भवविजयाचा उत्साहो । भोगीतसे जो
तेथ अमानित्वादि आघवे । ज्ञानगुणाचे जे मेळावे ।
ते कैवल्यदेशींचे आघवे । रावो जैसे आले
तेव्हां सम्यक्ज्ञानाचिया । राणिवा उगाणूनि तया ।
परिवारु होऊनियां । राहत आंगें
प्रवृत्तीचिये राजबिदीं । अवस्थाभेदप्रमदीं ।
कीजत आहे प्रतिपदीं । सुखाचें लोण
पुढां बोधाचिये कांबीवरी । विवेकु दृश्याची मांदी सारी ।
योगभूमिका आरती करी । येती जैसिया
तेथ ऋद्धिसिद्धींचीं अनेगें । वृंदें मिळती प्रसंगें ।
तिये पुष्पवर्षीं आंगें । नाहातसे तो
ऐसेनि ब्रह्मैक्यासारिखें । स्वराज्य येतां जवळिकें ।
झळंबित आहे हरिखें । तिन्ही लोक
तेव्हां वैरियां कां मैत्रियां । तयासि माझें म्हणावया ।
समानता धनंजया । उरेचिही ना
हें ना भलतेणें व्याजें । तो जयातें म्हणे माझें ।
तें नोडवेचि कां दुजें । अद्वितीय जाला
पैं आपुलिया एकी सत्ता । सर्वही कवळूनिया पंडुसुता ।
कहीं न लगती ममता । धाडिली तेणें
ऐसा जिंतिलिया रिपुवर्गु । अपमानिलिया हें जगु ।
अपैसा योगतुरंगु । स्थिर जाला
वैराग्याचें गाढलें । अंगी त्राण होतें भलें ।
तेंही नावेक ढिलें । तेव्हां करी
आणि निवटी ध्यानाचें खांडें । तें दुजें नाहींचि पुढें ।
म्हणौनि हातु आसुडें । वृत्तीचाही
जैसें रसौषध खरें । आपुलें काज करोनि पुरें ।
आपणही नुरे । तैसें होतसे
देखोनि ठाकिता ठावो । धांवता थिरावे पावो ।
तैसा ब्रह्मसामीप्यें थावो । अभ्यासु सांडी
घडतां महोदधीसी । गंगा वेगु सांडी जैसी ।
कां कामिनी कांतापासीं । स्थिर होय
नाना फळतिये वेळे । केळीची वाढी मांटुळे ।
कां गांवापुढें वळे । मार्गु जैसा
तैसा आत्मसाक्षात्कारु । होईल देखोनि गोचरु ।
ऐसा साधनहतियेरु । हळुचि ठेवी
म्हणौनि ब्रह्मेंसी तया । ऐक्याचा समो धनंजया ।
होतसे तैं उपाया । वोहटु पडे
मग वैराग्याची गोंधळुक । जे ज्ञानाभ्यासाचें वार्धक्य ।
योगफळाचाही परिपाक । दशा जे कां
ते शांति पैं गा सुभगा । संपूर्ण ये तयाचिया आंगा ।
तैं ब्रह्म होआवया जोगा । होय तो पुरुषु
पुनवेहुनी चतुर्दशी । जेतुलें उणेपण शशी ।
कां सोळे पाऊनि जैसी । पंधरावी वानी
सागरींही पाणी वेगें । संचरे तें रूप गंगे ।
येर निश्चळ जें उगें । तें समुद्रु जैसा
ब्रह्मा आणि ब्रह्महोतिये । योग्यते तैसा पाडु आहे ।
तेंचि शांतीचेनि लवलाहें । होय तो गा
पैं तेंचि होणेंनवीण । प्रतीती आलें जें ब्रह्मपण ।
ते ब्रह्म होती जाण । योग्यता येथ
ते ब्रह्मभावयोग्यता । पुरुषु तो मग पंडुसुता ।
आत्मबोधप्रसन्नता\- । पदीं बैसे
जेणें निपजे रससोय । तो तापुही जैं जाय ।
तैं ते कां होय । प्रसन्न जैसी
नाना भरतिया लगबगा । शरत्काळीं सांडिजे गंगा ।
कां गीत रहातां उपांगा । वोहटु पडे
तैसा आत्मबोधीं उद्यमु । करितां होय जो श्रमु ।
तोही जेथें समु । होऊनि जाय
आत्मबोधप्रशस्ती । हे तिये दशेची ख्याती ।
ते भोगितसे महामती । योग्यु तो गा
तेव्हां आत्मत्वें शोचावें । कांहीं पावावया कामावें ।
हें सरलें समभावें । भरितें तया
उदया येतां गभस्ती । नाना नक्षत्रव्यक्ती ।
हारवीजती दीप्ती । आंगिका जेवीं
तेवीं उठतिया आत्मप्रथा । हे भूतभेदव्यवस्था ।
मोडीत मोडीत पार्था । वास पाहे तो
पाटियेवरील अक्षरें । जैसीं पुसतां येती करें ।
तैसीं हारपती भेदांतरें । तयाचिये दृष्टी
तैसेनि अन्यथा ज्ञानें । जियें घेपती जागरस्वप्नें ।
तियें दोन्ही केलीं लीनें । अव्यक्तामाजीं
मग तेंही अव्यक्त । बोध वाढतां झिजत ।
पुरलां बोधीं समस्त । बुडोनि जाय
जैसी भोजनाच्या व्यापारीं । क्षुधा जिरत जाय अवधारीं ।
मग तृप्तीच्या अवसरीं । नाहींच होय
नाना चालीचिया वाढी । वाट होत जाय थोडी ।
मग पातला ठायीं बुडी । देऊनि निमे
कां जागृति जंव जंव उद्दीपे । तंव तंव निद्रा हारपे ।
मग जागीनलिया स्वरूपें । नाहींच होय
हें ना आपुलें पूर्णत्व भेटें । जेथ चंद्रासीं वाढी खुंटे ।
तेथ शुक्लपक्षु आटे । निःशेषु जैसा
तैसा बोध्यजात गिळितु । बोधु बोधें ये मज आंतु ।
मिसळला तेथ साद्यंतु । अबोधु गेला
तेव्हां कल्पांताचिये वेळे । नदी सिंधूचें पेंडवळें ।
मोडूनि भरलें जळें । आब्रह्म जैसें
नाना गेलिया घट मठ । आकाश ठाके एकवट ।
कां जळोनि काष्ठें काष्ठ । वन्हीचि होय
नातरी लेणियांचे ठसे । आटोनि गेलिया मुसे ।
नामरूप भेदें जैसें । सांडिजे सोनें
हेंही असो चेइलया । तें स्वप्न नाहीं जालया ।
मग आपणचि आपणयां । उरिजे जैसें
तैसी मी एकवांचूनि कांहीं । तया तयाहीसकट नाहीं ।
हे चौथी भक्ति पाहीं । माझी तो लाहे
येर आर्तु जिज्ञासु अर्थार्थी । हे भजती जिये पंथीं ।
ते तिन्ही पावोनी चौथी । म्हणिपत आहे
येऱहवीं तिजी ना चौथी । हे पहिली ना सरती ।
पैं माझिये सहजस्थिती । भक्ति नाम
जें नेणणें माझें प्रकाशूनि । अन्यथात्वें मातें दाऊनि ।
सर्वही सर्वीं भजौनि । बुझावीतसे जे
जो जेथ जैसें पाहों बैसे । तया तेथ तैसेंचि असे ।
हें उजियेडें कां दिसे । अखंडें जेणें
स्वप्नाचें दिसणें न दिसणें । जैसें आपलेनि असलेपणें ।
विश्वाचें आहे नाहीं जेणें । प्रकाशें तैसें
ऐसा हा सहज माझा । प्रकाशु जो कपिध्वजा ।
तो भक्ति या वोजा । बोलिजे गा
म्हणौनि आर्ताच्या ठायीं । हे आर्ति होऊनि पाहीं ।
अपेक्षणीय जें कांहीं । तें मीचि केला
जिज्ञासुपुढां वीरेशा । हेचि होऊनि जिज्ञासा ।
मी कां जिज्ञास्यु ऐसा । दाखविला
हेंचि होऊनि अर्थना । मीचि माझ्या अर्थीं अर्जुना ।
करूनि अर्थाभिधाना । आणी मातें
एवं घेऊनि अज्ञानातें । माझी भक्ति जे हे वर्ते ।
ते दावी मज द्रष्टयातें । दृश्य करूनि
येथें मुखचि दिसे मुखें । या बोला कांहीं न चुके ।
तरी दुजेपण हें लटिकें । आरिसा करी
दिठी चंद्रचि घे साचें । परी येतुलें हें तिमिराचें ।
जे एकचि असे तयाचे । दोनी दावी
तैसा सर्वत्र मीचि मियां । घेपतसें भक्ति इया ।
परी दृश्यत्व हें वायां । अज्ञानवशें
तें अज्ञान आतां फिटलें । माझें दृष्टृत्व मज भेटलें ।
निजबिंबीं एकवटलें । प्रतिबिंब जैसें
पैं जेव्हांही असे किडाळ । तेव्हांही सोनेंचि अढळ ।
परी तें कीड गेलिया केवळ । उरे जैसें
हां गा पूर्णिमे आधीं कायी । चंद्रु सावयवु नाहीं ? ।
परी तिये दिवशीं भेटे पाहीं । पूर्णता तया
तैसा मीचि ज्ञानद्वारें । दिसें परी हस्तांतरें ।
मग दृष्टृत्व तें सरे । मियांचि मी लाभें
म्हणौनि दृश्यपथा- । अतीतु माझा पार्था ।
भक्तियोगु चवथा । म्हणितला गा
या ज्ञान भक्ति सहज । भक्तु एकवटला मज ।
मीचि केवळ हें तुज । श्रुतही आहे
जे उभऊनियां भुजा । ज्ञानिया आत्मा माझा ।
हे बोलिलों कपिध्वजा । सप्तमाध्यायीं
ते कल्पादीं भक्ति मियां । श्रीभागवतमिषें ब्रह्मया ।
उत्तम म्हणौनि धनंजया । उपदेशिली
ज्ञानी इयेतें स्वसंवित्ती । शैव म्हणती शक्ती ।
आम्ही परम भक्ती । आपुली म्हणो
हे मज मिळतिये वेळे । तया क्रमयोगियां फळे ।
मग समस्तही निखिळें । मियांचि भरे
तेथ वैराग्य विवेकेंसी । आटे बंध मोक्षेंसीं ।
वृत्ती तिये आवृत्तीसीं । बुडोनि जाय
घेऊनि ऐलपणातें । परत्व हारपें जेथें ।
गिळूनि चाऱही भूतें । आकाश जैसें
तया परी थडथाद । साध्यसाधनातीत शुद्ध ।
तें मी होऊनि एकवद । भोगितो मातें
घडोनि सिंधूचिया आंगा । सिंधूवरी तळपे गंगा ।
तैसा पाडु तया भोगा । अवधारी जो
कां आरिसयासि आरिसा । उटूनि दाविलिया जैसा ।
देखणा अतिशयो तैसा । भोगणा तिये
हे असो दर्पणु नेलिया । तो मुख बोधुही गेलिया ।
देखलेंपण एकलेया । आस्वादिजे जेवीं
चेइलिया स्वप्न नाशे । आपलें ऐक्यचि दिसे ।
ते दुजेनवीण जैसें । भोगिजे का
तोचि जालिया भोगु तयाचा । न घडे हा भावो जयांचा ।
तिहीं बोलें केवीं बोलाचा । उच्चारु कीजे
तयांच्या नेणों गांवीं । रवी प्रकाशी हन दिवी ।
कीं व्योमालागीं मांडवी । उभिली तिहीं
हां गा राजन्यत्व नव्हतां आंगीं । रावो रायपण काय भोगी ? ।
कां आंधारु हन आलिंगी । दिनकरातें ?
आणि आकाश जें नव्हे । तया आकाश काय जाणवे ? ।
रत्नाच्या रूपीं मिरवे । गुंजांचें लेणें ?
म्हणौनि मी होणें नाहीं । तया मीचि आहें केहीं ।
मग भजेल हें कायी । बोलों कीर
यालागीं तो क्रमयोगी । मी जालाचि मातें भोगी ।
तारुण्य कां तरुणांगीं । जियापरी
तरंग सर्वांगीं तोय चुंबी । प्रभा सर्वत्र विलसे बिंबीं ।
नाना अवकाश नभीं । लुंठतु जैसा
तैसा रूप होऊनि माझें । मातें क्रियावीण तो भजे ।
अलंकारु का सहजें । सोनयातें जेवीं
का चंदनाची द्रुती जैसी । चंदनीं भजे अपैसी ।
का अकृत्रिम शशीं । चंद्रिका ते
तैसी क्रिया कीर न साहे । तऱही अद्वैतीं भक्ति आहे ।
हें अनुभवाचिजोगें नव्हे । बोलासें
तेव्हां पूर्वसंस्कार छंदें । जें कांहीं तो अनुवादे ।
तेणें आळविलेनि वो दें । बोलतां मीचि
बोलतया बोलताचि भेटे । तेथें बोलिलें हें न घटे ।
तें मौन तंव गोमटें । स्तवन माझें
म्हणौनि तया बोलतां । बोली बोलतां मी भेटतां ।
मौन होय तेणें तत्वतां । स्तवितो मातें
तैसेंचि बुद्धी का दिठी । जें तो देखों जाय किरीटी ।
तें देखणें दृश्य लोटी । देखतेंचि दावी
आरिसया आधीं जैसें । देखतेंचि मुख दिसेअ ।
तयाचें देखणें तैसें । मेळवी द्रष्टें
दृश्य जाउनियां द्रष्टें । द्रष्टयासीचि जैं भेटे ।
तैं एकलेपणें न घटे । द्रष्टेपणही
तेथ स्वप्नींचिया प्रिया । चेवोनि झोंबो गेलिया ।
ठायिजे दोन्ही न होनियां । आपणचि जैसें
का दोहीं काष्ठाचिये घृष्टी\- । माजीं वन्हि एक उठी ।
तो दोन्ही हे भाष आटी । आपणचि होय
नाना प्रतिबिंब हातीं । घेऊं गेलिया गभस्ती ।
बिंबताही असती । जाय जैसी
तैसा मी होऊनि देखतें । तो घेऊं जाय दृश्यातें ।
तेथ दृश्य ने थितें । द्रष्टृत्वेंसीं
रवि आंधारु प्रकाशिता । नुरेचि जेवीं प्रकाश्यता ।
तेंवीं दृश्यीं नाही द्रष्टृता । मी जालिया
मग देखिजे ना न देखिजे । ऐसी जे दशा निपजे ।
ते तें दर्शन माझें । साचोकारें
तें भलतयाही किरीटी । पदार्थाचिया भेटी ।
द्रष्टृदृश्यातीता दृष्टी । भोगितो सदा
आणि आकाश हें आकाशें । दाटलें न ढळें जैसें ।
मियां आत्मेन आपणपें तैसें । जालें तया
कल्पांतीं उदक उदकें । रुंधिलिया वाहों ठाके ।
तैसा आत्मेनि मियां येकें । कोंदला तो
पावो आपणपयां वोळघे ? । केवीं वन्हि आपणपयां लागे ? ।
आपणपां पाणी रिघे । स्नाना कैसें ?
म्हणौनि सर्व मी जालेपणें । ठेलें तया येणें जाणें ।
तेंचि गा यात्रा करणें । अद्वया मज
पैं जळावरील तरंगु । जरी धाविन्नला सवेगु ।
तरी नाहीं भूमिभागु । क्रमिला तेणें
जें सांडावें कां मांडावें । जें चालणें जेणें चालावें ।
तें तोयचि एक आघवें । म्हणौनियां
गेलियाही भलतेउता । उदकपणेंं पंडुसुता ।
तरंगाची एकात्मता । न मोडेचि जेवीं
तैसा मीपणें हा लोटला । तो आघवेंयाचि मजआंतु आला ।
या यात्रा होय भला । कापडी माझा
आणि शरीर स्वभाववशें । कांहीं येक करूं जरी बैसे ।
तरी मीचि तो तेणें मिषें । भेटे तया
तेथ कर्म आणि कर्ता । हें जाऊनि पंडुसुता ।
मियां आत्मेनि मज पाहतां । मीचि होय
पैं दर्पणातेंं दर्पणें । पाहिलिया होय न पाहणें ।
सोनें झांकिलिया सुवर्णें । ना झांकें जेवीं
दीपातें दीपें प्रकाशिजे । तें न प्रकाशणेंचि निपजे ।
तैसें कर्म मियां कीजे । तें करणें कैंचें ?
कर्मही करितचि आहे । जैं करावें हें भाष जाये ।
तैं न करणेंचि होये । तयाचें केलें
क्रियाजात मी जालेपणें । घडे कांहींचि न करणें ।
तयाचि नांव पूजणें । खुणेचें माझें
म्हणौनि करीतयाही वोजा । तें न करणें हेंचि कपिध्वजा ।
निफजे तिया महापूजा । पूजी तो मातें
एवं तो बोले तें स्तवन । तो देखे तें दर्शन ।
अद्वया मज गमन । तो चाले तेंचि
तो करी तेतुली पूजा । तो कल्पी तो जपु माझा ।
तो असे तेचि कपिध्वजा । समाधी माझी
जैसें कनकेंसी कांकणें । असिजे अनन्यपणें ।
तो भक्तियोगें येणें । मजसीं तैसा
उदकीं कल्लोळु । कापुरीं परीमळु ।
रत्नीं उजाळु । अनन्यु जैसा
किंबहुना तंतूंसीं पटु । कां मृत्तिकेसीं घटु ।
तैसा तो एकवटु । मजसीं माझा
इया अनन्यसिद्धा भक्ती । या आघवाचि दृश्यजातीं ।
मज आपणपेंया सुमती । द्रष्टयातें जाण
तिन्ही अवस्थांचेनि द्वारें । उपाध्युपहिताकारें ।
भावाभावरूप स्फुरे । दृश्य जें हें
तें हें आघवेंचि मी द्रष्टा । ऐसिया बोधाचा माजिवटा ।
अनुभवाचा सुभटा । धेंडा तो नाचे
रज्जु जालिया गोचरु । आभासतां तो व्याळाकारु ।
रज्जुचि ऐसा निर्धारु । होय जेवीं
भांगारापरतें कांहीं । लेणें गुंजहीभरी नाहीं ।
हें आटुनियां ठायीं । कीजे जैसे
उदका येकापरतें । तरंग नाहींचि हें निरुतें ।
जाणोनि तया आकारातें । न घेपे जेवीं
नातरी स्वप्नविकारां समस्तां । चेऊनियां उमाणें घेतां ।
तो आपणयापरौता । न दिसे जैसा
तैसें जें कांहीं आथी नाथी । येणें होय ज्ञेयस्फुर्ती ।
तें ज्ञाताचि मी हें प्रतीती । होऊनि भोगी
जाणे अजु मी अजरु । अक्षयो मी अक्षरु ।
अपूर्वु मी अपारु । आनंदु मी
अचळु मी अच्युतु । अनंतु मी अद्वैतु ।
आद्यु मी अव्यक्तु । व्यक्तुही मी
ईश्य मी ईश्वरु । अनादि मी अमरु ।
अभय मी आधारु । आधेय मी
स्वामी मी सदोदितु । सहजु मी सततु ।
सर्व मी सर्वगतु । सर्वातीतु मी
नवा मी पुराणु । शून्यु मी संपूर्णु ।
स्थुलु मी अणु । जें कांहीं तें मी
अक्रियु मी येकु । असंगु मी अशोकु ।
व्यापु मी व्यापकु । पुरुषोत्तमु मी
अशब्दु मी अश्रोत्रु । अरूपु मी अगोत्रु ।
समु मी स्वतंत्रु । ब्रह्म मी परु
ऐसें आत्मत्वें मज एकातें । इया अद्वयभक्ती जाणोनि निरुतें ।
आणि याही बोधा जाणतें । तेंही मीचि जाणें
पैं चेइलेयानंतरें । आपुलें एकपण उरे ।
तेंही तोंवरी स्फुरे । तयाशींचि जैसें
कां प्रकाशतां अर्कु । तोचि होय प्रकाशकु ।
तयाही अभेदा द्योतकु । तोचि जैसा
तैसा वेद्यांच्या विलयीं । केवळ वीदकु उरे पाहीं ।
तेणें जाणवें तया तेंही । हेंही जो जाणे
तया अद्वयपणा आपुलिया । जाणती ज्ञप्ती जे धनंजया ।
ते ईश्वरचि मी हे तया । बोधासि ये
मग द्वैताद्वैतातीत । मीचि आत्मा एकु निभ्रांत ।
हें जाणोनि जाणणें जेथ । अनुभवीं रिघे
तेथ चेइलियां येकपण । दिसे जे आपुलया आपण ।
तेंही जातां नेणों कोण । होईजे जेवीं
कां डोळां देखतिये क्षणीं । सुवर्णपण सुवर्णीं ।
नाटितां होय आटणी । अळंकाराचीही
नाना लवण तोय होये । मग क्षारता तोयत्वें राहे ।
तेही जिरतां जेवीं जाये । जालेपण तें
तैसा मी तो हें जें असे । तें स्वानंदानुभवसमरसें ।
कालवूनिया प्रवेशे । मजचिमाजीं
आणि तो हे भाष जेथ जाये । तेथे मी हें कोण्हासी आहे ।
ऐसा मी ना तो तिये सामाये । माझ्याचि रूपीं
जेव्हां कापुर जळों सरे । तयाचि नाम अग्नि पुरी ।
मग उभयतातीत उरे । आकाश जेवीं
का धाडलिया एका एकु । वाढे तो शून्य विशेखु ।
तैसा आहे नाहींचा शेखु । मीचि मग आथी
तेथ ब्रह्मा आत्मा ईशु । यया बोला मोडे सौरसु ।
न बोलणें याही पैसु । नाहीं तेथ
न बोलणेंही न बोलोनी । तें बोलिजे तोंड भरुनी ।
जाणिव नेणिव नेणोनी । जाणिजे तें
तेथ बुझिजे बोधु बोधें । आनंंदु घेपे आनंदें ।
सुखावरी नुसधें । सुखचि भोगिजे
तेथ लाभु जोडला लाभा । प्रभा आलिंगिली प्रभा ।
विस्मयो बुडाला उभा । विस्मयामाजीं
शमु तेथ सामावला । विश्रामु विश्रांति आला ।
अनुभवु वेडावला । अनुभूतिपणें
किंबहुना ऐसें निखळ । मीपण जोडे तया फळ ।
सेवूनि वेली वेल्हाळ । क्रमयोगाची ते
पैं क्रमयोगिया किरीटी । चक्रवर्तीच्या मुकुटीं ।
मी चिद्रत्न तें साटोवाटीं । होय तो माझा
कीं क्रमयोगप्रासादाचा । कळसु जो हा मोक्षाचा ।
तयावरील अवकाशाचा । उवावो जाला तो
नाना संसार आडवीं । क्रमयोग वाट बरवी ।
जोडिली ते मदैक्यगांवीं । पैठी जालीसे
हें असो क्रमयोगबोधें । तेणें भक्तिचिद्गांगें ।
मी स्वानंदोदधी वेगें । ठाकिला कीं गा
हा ठायवरी सुवर्मा । क्रमयोगीं आहे महिमा ।
म्हणौनि वेळोवेळां तुम्हां । सांगतों आम्ही
पैं देशें काळें पदार्थें । साधूनि घेइजे मातें ।
तैसा नव्हे मी आयतें । सर्वांचें सर्वही
म्हणौनि माझ्या ठायीं । जाचावें न लगे कांहीं ।
मी लाभें इयें उपायीं । साचचि गा
एक शिष्य एक गुरु । हा रूढला साच व्यवहारु ।
तो मत्प्राप्तिप्रकारु । जाणावया
अगा वसुधेच्या पोटीं । निधान सिद्ध किरीटी ।
वन्हि सिद्ध काष्ठीं । वोहां दूध
परी लाभे तें असतें । तया कीजे उपायातें ।
येर सिद्धचि तैसा तेथें । उपायीं मी
हा फळहीवरी उपावो । कां पां प्रस्तावीतसे देवो ।
हे पुसतां परी अभिप्रावो । येथिंचा ऐसा
जे गीतार्थाचें चांगावें । मोक्षोपायपर आघवें ।
आन शास्त्रोपाय कीं नव्हे । प्रमाणसिद्ध
वारा आभाळचि फेडी । वांचूनि सूर्यातें न घडी ।
कां हातु बाबुळी धाडी । तोय न करी
तैसा आत्मदर्शनीं आडळु । असे अविद्येचा जो मळु ।
तो शास्त्र नाशी येरु निर्मळु । मी प्रकाशें स्वयें
म्हणौनि आघवींचि शास्त्रें । अविद्याविनाशाचीं पात्रें ।
वांचोनि न होतीं स्वतंत्रें । आत्मबोधीं
तया अध्यात्मशास्त्रांसीं । जैं साचपणाची ये पुसी ।
तैं येइजे जया ठायासी । ते हे गीता
भानुभूषिता प्राचिया । सतेजा दिशा आघविया ।
तैसी शास्त्रेश्वरा गीता या । सनाथें शास्त्रें
हें असो येणें शास्त्रेश्वरें । मागां उपाय बहुवे विस्तारें ।
सांगितला जैसा करें । घेवों ये आत्मा
परी प्रथमश्रवणासवें । अर्जुना विपायें हें फावे ।
हा भावो सकणवे । धरूनि श्रीहरी
तेंचि प्रमेय एक वेळ । शिष्यीं होआवया अढळ ।
सांगतसे मुकुल । मुद्रा आतां
आणि प्रसंगें गीता । ठावोही हा संपता ।
म्हणौनि दावी आद्यंता । एकार्थत्व
जे ग्रंथाच्या मध्यभागीं । नाना अधिकारप्रसंगीं ।
निरूपण अनेगीं । सिद्धांतीं केलें
तरी तेतुलेही सिद्धांत । इयें शास्त्रीं प्रस्तुत ।
हे पूर्वापर नेणत । कोण्ही जैं मानी
तैं महासिद्धांताचा आवांका । सिद्धांतकक्षा अनेका ।
भिडऊनि आरंभु देखा । संपवीतु असे
एथ अविद्यानाशु हें स्थळ । तेणें मोक्षोपादान फळ ।
या दोहीं केवळ । साधन ज्ञान
हें इतुलेंचि नानापरी । निरूपिलें ग्रंथविस्तारीं ।
तें आतां दोहीं अक्षरीं । अनुवादावें
म्हणौनि उपेयही हातीं । जालया उपायस्थिती ।
देव प्रवर्तले तें पुढती । येणेंचि भावें
मग म्हणे गा सुभटा । तो क्रमयोगिया निष्ठा ।
मी हौनी होय पैठा । माझ्या रूपीं
स्वकर्माच्या चोखौळीं । मज पूजा करूनि भलीं ।
तेणें प्रसादें आकळी । ज्ञाननिष्ठेतें
ते ज्ञाननिष्ठा जेथ हातवसे । तेथ भक्ति माझी उल्लासे ।
तिया भजन समरसें । सुखिया होय
आणि विश्वप्रकाशितया । आत्मया मज आपुलिया ।
अनुसरे जो करूनियां । सर्वत्रता हे
सांडूनि आपुला आडळ । लवण आश्रयी जळ ।
कां हिंडोनि राहे निश्चळ । वायु व्योमीं
तैसा बुद्धी वाचा कायें । जो मातें आश्रऊनि ठाये ।
तो निषिद्धेंही विपायें । कर्में करूं
परी गंगेच्या संबंधीं । बिदी आणि महानदी ।
येक तेवीं माझ्या बोधीं । शुभाशुभांसी
कां बावनें आणि धुरें । हा निवाडु तंवचि सरे ।
जंव न घेपती वैश्वानरें । कवळूनि दोन्ही
ना पांचिकें आणि सोळें । हें सोनया तंवचि आलें ।
जंव परिसु आंगमेळें । एकवटीना
तैसें शुभाशुभ ऐसें । हें तंवचिवरी आभासे ।
जंव येकु न प्रकाशे । सर्वत्र मी
अगा रात्री आणि दिवो । हा तंवचि द्वैतभावो ।
जंव न रिगिजे गांवो । गभस्तीचा
म्हणौनि माझिया भेटी । तयाचीं सर्व कर्में किरीटी ।
जाऊनि बैसे तो पाटीं । सायुज्याच्या
देशें काळें स्वभावें । वेंचु जया न संभवे ।
तें पद माझें पावे । अविनाश तो
किंबहुना पंडुसुता । मज आत्मयाची प्रसन्नता ।
लाहे तेणें न पविजतां । लाभु कवणु असे
याकारणें गा तुवां इया । सर्व कर्मा आपुलिया ।
माझ्या स्वरूपीं धनंजया । संन्यासु कीजे
परी तोचि संन्यासु वीरा । करणीयेचा झणें करा ।
आत्मविवेकीं धरा । चित्तवृत्ति हे
मग तेणें विवेकबळें । आपणपें कर्मावेगळें ।
माझ्या स्वरूपीं निर्मळें । देखिजेल
आणि कर्माचि जन्मभोये । प्रकृति जे का आहे ।
ते आपणयाहूनि बहुवे । देखसी दूरी
तेथ प्रकृति आपणयां । वेगळी नुरे धनंजया ।
रूपेंवीण का छाया । जियापरी
ऐसेनि प्रकृतिनाशु । जालया कर्मसंन्यासु ।
निफजेल अनायासु । सकारणु
मग कर्मजात गेलया । मी आत्मा उरें आपणपयां ।
तेथ बुद्धि घापे करूनियां । पतिव्रता
बुद्धि अनन्य येणें योगें । मजमाजीं जैं रिगे ।
तैं चित्त चैत्यत्यागें । मातेंचि भजे
ऐसें चैत्यजातें सांडिलें । चित्त माझ्या ठायीं जडलें ।
ठाके तैसें वहिलें । सर्वदा करी
मग अभिन्ना इया सेवा । चित्त मियांचि भरेल जेधवां ।
माझा प्रसादु जाण तेधवां । संपूर्ण जाहला
तेथ सकळ दुःखधामें । भुंजीजती जियें मृत्युजन्में ।
तियें दुर्गमेंचि सुगमें । होती तुज
सूर्याचेनि सावायें । डोळा सावाइला होये ।
तैं अंधाराचा आहे । पाडु तया ?
तैसा माझेनि प्रसादें । जीवकणु जयाचा उपमर्दे ।
तो संसराचेनी बाधे । बागुलें केवीं ?
म्हणौनि धनंजया । तूं संसारदुर्गती यया ।
तरसील माझिया । प्रसादास्तव
अथवा हन अहंभावें । माझें बोलणें हें आघवें ।
कानामनाचिये शिंवे । नेदिसी टेंकों
तरी नित्य मुक्त अव्ययो । तूं आहासि तें होऊनि वावो ।
देहसंबंधाचा घावो । वाजेल आंगीं
जया देहसंबंधा आंतु । प्रतिपदीं आत्मघातु ।
भुंजतां उसंतु । कहींचि नाहीं
येवढेनि दारुणें । निमणेनवीण निमणें ।
पडेल जरी बोलणें । नेघसी माझें
पथ्यद्वेषिया पोषी ज्वरु । कां दीपद्वेषिया अंधकारु ।
विवेकद्वेषें अहंकारु । पोषूनि तैसा
स्वदेहा नाम अर्जुनु । परदेहा नाम स्वजनु ।
संग्रामा नाम मलिनु । पापाचारु
इया मती आपुलिया । तिघां तीन नामें ययां ।
ठेऊनियां धनंजया । न झुंजें ऐसा
जीवामाजीं निष्टंकु । करिसी जो आत्यंतिकु ।
तो वायां धाडील नैसर्गिकु । स्वभावोचि तुझा
आणि मी अर्जुन हे आत्मिक । ययां वधु करणें हें पातक ।
हे मायावांचूनि तात्त्विक । कांहीं आहे ?
आधीं जुंझार तुवां होआवें । मग झुंजावया शस्त्र घेयावें ।
कां न जुंझावया करावें । देवांगण
म्हणौनि न झुंजणें । म्हणसी तें वायाणें ।
ना मानूं लोकपणें । लोकदृष्टीही
तऱही न झुंजें ऐसें । निष्टंकीसी जें मानसें ।
तें प्रकृति अनारिसें । करवीलचि
पैं पूर्वे वाहतां पाणी । पव्हिजे पश्चिमेचे वाहणीं ।
तरी आग्रहोचि उरे तें आणी । आपुलिया लेखा
कां साळीचा कणु म्हणे । मी नुगवें साळीपणें ।
तरी आहे आन करणें । स्वभावासी ?
तैसा क्षात्रंस्कारसिद्धा । प्रकृती घडिलासी प्रबुद्धा ।
आता नुठी म्हणसी हा धांदा । परी उठवीजसीचि तूं
पैं शौर्य तेज दक्षता । एवमादिक पंडुसुता ।
गुण दिधले जन्मतां । प्रकृती तुज
तरी तयाचिया समवाया\- । अनुरूप धनंजया ।
न करितां उगलियां । नयेल असों
म्हणौनियां तिहीं गुणीं । बांधिलासि तूं कोदंडपाणी ।
त्रिशुद्धी निघसी वाहणीं । क्षात्राचिया
ना हें आपुलें जन्ममूळ । न विचारीतचि केवळ ।
न झुंजें ऐसें अढळ । व्रत जरी घेसी
तरी बांधोनि हात पाये । जो रथीं घातला होये ।
तो न चाले तरी जाये । दिगंता जेवीं
तैसा तूं आपुलियाकडुनी । मीं कांहींच न करीं म्हणौनि ।
ठासी परी भरंवसेनि । तूंचि करिसी
उत्तरु वैराटींचा राजा । पळतां तूं कां निघालासी झुंजा ? ।
हा क्षात्रस्वभावो तुझा । झुंजवील तुज
महावीर अकरा अक्षौहिणी । तुवां येकें नागविले रणांगणीं ।
तो स्वभावो कोदंडपाणी । झुंजवील तूंतें
हां गा रोगु कायी रोगिया । आवडे दरिद्र दरिद्रिया ? ।
परी भोगविजे बळिया । अदृष्टें जेणें
तें अदृष्ट अनारिसें । न करील ईश्वरवशें ।
तो ईश्वरुही असे । हृदयीं तुझ्या
सर्व भूतांच्या अंतरीं । हृदय महाअंबरीं ।
चिद्वृत्तीच्या सहस्त्रकरीं । उदयला असे जो
अवस्थात्रय तिन्हीं लोक । प्रकाशूनि अशेख ।
अन्यथादृष्टि पांथिक । चेवविले
वेद्योदकाच्या सरोवरीं । फांकतां विषयकल्हारीं ।
इंद्रियषट्पदा चारी । जीवभ्रमरातें
असो रूपक हें तो ईश्वरु । सकल भूतांचा अहंकारु ।
पांघरोनि निरंतरु । उल्हासत असे
स्वमायेचें आडवस्त्र । लावूनि एकला खेळवी सूत्र ।
बाहेरी नटी छायाचित्र । चौर्याशीं लक्ष
तया ब्रह्मादिकीटांता । अशेषांही भूतजातां ।
देहाकार योग्यता । पाहोनि दावी
तेथ जें देह जयापुढें । अनुरूपपणें मांडे ।
तें भूत तया आरूढे । हें मी म्हणौनि
सूत सूतें गुंतलें । तृण तृणचि बांधलें ।
कां आत्मबिंबा घेतलें । बाळकें जळीं
तयापरी देहाकारें । आपणपेंचि दुसरें ।
देखोनि जीव आविष्करें । आत्मबुद्धि
ऐसेनि शरीराकारीं । यंत्रीं भूतें अवधारीं ।
वाहूनि हालवी दोरी । प्राचीनाची
तेथ जया जें कर्मसूत्र । मांडूनि ठेविलें स्वतंत्र ।
तें तिये गती पात्र । होंचि लागे
किंबहुना धनुर्धरा । भूतांतें स्वर्गसंसारा ।
\-माजीं भोवंडी तृणें वारा । आकाशीं जैसा
भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें
जैसे चेष्टा आपुलिया । समुद्रादिक धनंजया ।
चेष्टती चंद्राचिया । सन्निधी येकीं
तया सिंधू भरितें दाटें । सोमकांता पाझरु फुटे ।
कुमुदांचकोरांचा फिटे । संकोचु तो
तैसीं बीजप्रकृतिवशें । अनेकें भूतें येकें ईशें ।
चेष्टवीजती तो असे । तुझ्या हृदयीं
अर्जुनपण न घेतां । मी ऐसें जें पंडुसुता ।
उठतसे तें तत्वता । तयाचें रूप
यालागीं तो प्रकृतीतें । प्रवर्तवील हें निरुतें ।
आणि तें झुंजवील तूंतें । न झुंजशी जऱही
म्हणौनि ईश्वर गोसावी । तेणें प्रकृती हे नेमावी ।
तिया सुखें राबवावीं । इंद्रियें आपुलीं
तूं करणें न करणें दोन्हीं । लाऊनि प्रकृतीच्या मानीं ।
प्रकृतीही कां अधीनी । हृदयस्था जया
तया अहं वाचा चित्त आंग । देऊनिया शरण रिग ।
महोदधी कां गांग । रिगालें जैसें
मग तयाचेनि प्रसादें । सर्वोपशांतिप्रमदे ।
कांतु होऊनिया स्वानंदें । स्वरूपींचि रमसी
संभूति जेणें संभवे । विश्रांति जेथें विसंवे ।
अनुभूतिही अनुभवे । अनुभवा जया
तिये निजात्मपदींचा रावो । होऊनि ठाकसी अव्यवो ।
म्हणे लक्ष्मीनाहो । पार्था तूं गा
हें गीता नाम विख्यात । सर्ववाङ्गमयाचें मथित ।
आत्मा जेणें हस्तगत । रत्न होय
ज्ञान ऐसिया रूढी । वेदांतीं जयाची प्रौढी ।
वानितां कीर्ति चोखडी । पातली जगीं
बुद्ध्यादिकें डोळसें । हें जयाचें कां कडवसें ।
मी सर्वद्रष्टाही दिसें । पाहला जया
तें हें गा आत्मज्ञान । मज गोप्याचेंही गुप्त धन ।
परी तूं म्हणौनि आन । केवीं करूं ?
याकारणें गा पांडवा । आम्हीं आपुला हा गुह्य ठेवा ।
तुज दिधला कणवा । जाकळिलेपणें
जैसी भुलली वोरसें । माय बोले बाळा दोषें ।
प्रीति ही परी तैसें । न करूंचि हो
येथ आकाश आणि गाळिजे । अमृताही साली फेडिजे ।
कां दिव्याकरवीं करविजे । दिव्य जैसे
जयाचेनि अंगप्रकाशें । पाताळींचा परमाणु दिसे ।
तया सूर्याहि का जैसे । अंजन सूदलें
तैसें सर्वज्ञेंही मियां । सर्वही निर्धारूनियां ।
निकें होय तें धनंजया । सांगितलें तुज
आतां तूं ययावरी । निकें हें निर्धारीं ।
निर्धारूनि करीं । आवडे तैसें
यया देवाचिया बोला । अर्जुनु उगाचि ठेला ।
तेथ देवो म्हणती भला । अवंचकु होसी
वाढतयापुढें भुकेला । उपरोधें म्हणे मी धाला ।
तैं तोचि पीडे आपुला । आणि दोषुही तया
तैसा सर्वज्ञु श्रीगुरु । भेटलिया आत्मनिर्धारु ।
न पुसिजे जैं आभारु । धरूनियां
तैं आपणपेंचि वंचे । आणि पापही वंचनाचें ।
आपणयाचि साचें । चुकविलें तेणें
पैं उगेपणा तुझिया । हा अभिप्रावो कीं धनंजया ।
जें एकवेळ आवांकुनियां । सांगावें ज्ञान
तेथ पार्थु म्हणे दातारा । भलें जाणसी माझिया अंतरा ।
हें म्हणों तरी दुसरा । जाणता असे काई ?
येर ज्ञेय हें जी आघवें । तूं ज्ञाता एकचि स्वभावें ।
मा सूर्यु म्हणौनि वानावें । सूर्यातें काई ?
या बोला श्रीकृष्णें । म्हणितलें काय येणें ।
हेंचि थोडें गा वानणें । जें बुझतासि तूं
तरी अवधान पघळ । करूनियाम् आणिक येक वेळ ।
वाक्य माझें निर्मळ । अवधारीं पां
हें वाच्य म्हणौनि बोलिजे । कां श्राव्य मग आयिकिजे ।
तैसें नव्हें परी तुझें । भाग्य बरवें
कूर्मीचिया पिलियां । दिठी पान्हा ये धनंजया ।
कां आकाश वाहे बापिया । घरींचें पाणी
जो व्यवहारु जेथ न घडे । तयाचें फळचि तेथ जोडे ।
काय दैवें न सांपडे । सानुकूळें ?
येऱहवीं द्वैताची वारी । सारूनि ऐक्याच्या परीवरीं ।
भोगिजे तें अवधारीं । रहस्य हें
आणि निरुपचारा प्रेमा । विषय होय जें प्रियोत्तमा ।
तें दुजें नव्हे कीं आत्मा । ऐसेंचि जाणावें
आरिसाचिया देखिलया । गोमटें कीजे धनंजया ।
तें तया नोहे आपणयां । लागीं जैसें
तैसें पार्था तुझेनि मिषें । मी बोलें आपणयाचि उद्देशें ।
माझ्या तुझ्या ठाईं असे । मीतूंपण गा
म्हणौनि जिव्हारींचें गुज । सांगतसे जीवासी तुज ।
हें अनन्यगतीचें मज । आथी व्यसन
पैम् जळा आपणपें देतां । लवण भुललें पंडुसुता ।
कीं आघवें तयाचें होतां । न लजेचि तें
तैसा तूं माझ्या ठाईं । राखों नेणसीचि कांहीं ।
तरी आतां तुज काई । गोप्य मी करूं ?
म्हणौनि आघवींचि गूढें । जें पाऊनि अति उघडें ।
तें गोप्य माझें चोखडें । वाक्य आइक
तरी बाह्य आणि अंतरा । आपुलिया सर्व व्यापारा ।
मज व्यापकातें वीरा । विषयो करीं
आघवा आंगीं जैसा । वायु मिळोनि आहे आकाशा ।
तूं सर्व कर्मीं तैसा । मजसींचि आस
किंबहुना आपुलें मन । करीं माझें एकायतन ।
माझेनि श्रवणें कान । भरूनि घालीं
आत्मज्ञानें चोखडीं । संत जे माझीं रूपडीं ।
तेथ दृष्टि पडो आवडी । कामिनी जैसी
मीं सर्व वस्तीचें वसौटें । माझीं नामें जियें चोखटें ।
तियें जियावया वाटे । वाचेचिये लावीं
हातांचें करणें । कां पायांचें चालणें ।
तें होय मजकारणें । तैसें करीं
आपुला अथवा परावा । ठायीं उपकरसी पांडवा ।
तेणें यज्ञें होईं बरवा । याज्ञिकु माझा
हें एकैक शिकऊं काई । पैं सेवकें आपुल्या ठाईं ।
उरूनि येर सर्वही । मी सेव्यचि करीं
तेथ जाऊनिया भूतद्वेषु । सर्वत्र नमवैन मीचि एकु ।
ऐसेनि आश्रयो आत्यंतिकु । लाहसी तूं माझा
मग भरलेया जगाआंतु । जाऊनि तिजयाची मातु ।
होऊनि ठायील एकांतु । आम्हां तुम्हां
तेव्हां भलतिये आवस्थे । मी तूतें तूं मातें ।
भोगिसी ऐसें आइतें । वाढेल सुख
आणि तिजें आडळ करितें । निमालें अर्जुना जेथें ।
तें मीचि म्हणौनि तूं मातें । पावसी शेखीं
जैसी जळींची प्रतिभा । जळनाशीं बिंबा ।
येतां गाभागोभा । कांहीं आहे ?
पैं पवनु अंबरा । कां कल्लोळु सागरा ।
मिळतां आडवारा । कोणाचा गा ?
म्हणौनि तूं आणि आम्हीं । हें दिसताहे देहधर्मीं ।
मग ययाच्या विरामीं । मीचि होसी
यया बोलामाझारीं । होय नव्हे झणें करीं ।
येथ आन आथी तरी । तुझीचि आण
पैं तुझी आण वाहणें । हें आत्मलिंगातें शिवणें ।
प्रीतीची जाति लाजणें । आठवों नेदी
येऱहवीं वेद्यु निष्प्रपंचु । जेणें विश्वाभासु हा साचु ।
आज्ञेचा नटनाचु । काळातें जिणें
तो देवो मी सत्यसंकल्पु । आणि जगाच्या हितीं बापु ।
मा आणेचा आक्षेपु । कां करावा ?
परी अर्जुना तुझेनि वेधें । मियां देवपणाचीं बिरुदें ।
सांडिलीं गा मी हे आधें । सगळेनि तुवां
पैं काजा आपुलिया । रावो आपुली आपणया ।
आण वाहे धनंजया । तैसें हें कीं
तेथ अर्जुनु म्हणे देवें । अचाट हें न बोलावें ।
जे आमचें काज नांवें । तुझेनि एके
यावरी सांगों बैससी । कां सांगतां भाषही देसी ।
या तुझिया विनोदासी । पारु आहे जी ?
कमळवना विकाशु । करी रवीचा एक अंशु ।
तेथ आघवाचि प्रकाशु । नित्य दे तो
पृथ्वी निवऊनि सागर । भरीजती येवढें थोर ।
वर्षे तेथ मिषांतर । चातकु कीं
म्हणौनि औदार्या तुझेया । मज निमित्त ना म्हणावया ।
प्राप्ति असे दानीराया । कृपानिधी
तंव देवो म्हणती राहें । या बोलाचा प्रस्तावो नोहे ।
पैं मातें पावसी उपायें । साचचि येणें
सैंधव सिंधू पडलिया । जो क्षणु धनंजया ।
तेणें विरेचि कीं उरावया । कारण कायी ?
तैसें सर्वत्र मातें भजतां । सर्व मी होतां अहंता ।
निःशेष जाऊनि तत्वता । मीचि होसी
एवं माझिये प्राप्तीवरी । कर्मालागोनि अवधारीं ।
दाविली तुज उजरी । उपायांची
जे आधीं तंव पंडुसुता । सर्व कर्में मज अर्पितां ।
सर्वत्र प्रसन्नता । लाहिजे माझी
पाठीं माझ्या इये प्रसादीं । माझें ज्ञान जाय सिद्धी ।
तेणें मिसळिजे त्रिशुद्धी । स्वरूपीं माझ्या
मग पार्था तिये ठायीं । साध्य साधन होय नाहीं ।
किंबहुना तुज कांहीं । उरेचि ना
तरी सर्व कर्में आपलीं । तुवां सर्वदा मज अर्पिलीं ।
तेणें प्रसन्नता लाधली । आजि हे माझी
म्हणौनि येणें प्रसादबळें । नव्हे झुंजाचेनि आडळें ।
न ठाकेचि येकवेळे । भाळलों तुज
जेणें सप्रपंच अज्ञान जाये । एकु मी गोचरु होये ।
तें उपपत्तीचेनि उपायें । गीतारूप हें
मियां ज्ञान तुज आपुलें । नानापरी उपदेशिलें ।
येणें अज्ञानजात सांडी वियालें । धर्माधर्म जें
आशा जैसी दुःखातें । व्यालीं निंदा दुरितें ।
हे असो जैसें दैन्यातें । दुर्भगत्व
तैसें स्वर्गनरकसूचक । अज्ञान व्यालें धर्मादिक ।
तें सांडूनि घालीं अशेख । ज्ञानें येणें
हातीं घेऊन तो दोरु । सांडिजे जैसा सर्पाकारु ।
कां निद्रात्यागें घराचारु । स्वप्नींचा जैसा
नाना सांडिलेनि कवळें । चंद्रींचें धुये पिंवळें ।
व्याधित्यागें कडुवाळें\- । पण मुखाचें
अगा दिवसा पाठीं देउनी । मृगजळ घापे त्यजुनी ।
कां काष्ठत्यागें वन्ही । त्यजिजे जैसा
तैसें धर्माधर्माचें टवाळ । दावी अज्ञान जें कां मूळ ।
तें त्यजूनि त्यजीं सकळ । धर्मजात
मग अज्ञान निमालिया । मीचि येकु असे अपैसया ।
सनिद्र स्वप्न गेलया । आपणपें जैसें
तैसा मी एकवांचूनि कांहीं । मग भिन्नाभिन्न आन नाहीं ।
सोऽहंबोधें तयाच्या ठायीं । अनन्यु होय
पैंं आपुलेनि भेदेंविण । माझें जाणिजे जें एकपण ।
तयाचि नांव शरण । मज यीणें गा
जैसें घटाचेनि नाशें । गगनीं गगन प्रवेशे ।
मज शरण येणें तैसें । ऐक्य करी
सुवर्णमणि सोनया । ये कल्लोळु जैसा पाणिया ।
तैसा मज धनंजया । शरण ये तूं
वांचूनि सागराच्या पोटीं । वडवानळु शरण आला किरीटी ।
जाळूनि ठाके तया गोठी । वाळूनि दे पां
मजही शरण रिघिजे । आणि जीवत्वेंचि असिजे ।
धिग् बोली यिया न लजे । प्रज्ञा केवीं
अगा प्राकृताही राया । आंगीं पडे जें धनंजया ।
तें दासिरूंहि कीं तया । समान होय
मा मी विश्वेश्वरु भेटे । आणि जीवग्रंथी न सुटे ।
हे बोल नको वोखटें । कानीं लाऊं
म्हणौनि मी होऊनि मातें । सेवणें आहे आयितें ।
तें करीं हातां येतें । ज्ञानें येणें
मग ताकौनियां काढिलें । लोणी मागौतें ताकीं घातलें ।
परी न घेपेचि कांहींं केलें । तेणें जेवीं
तैसें अद्वयत्वें मज । शरण रिघालिया तुज ।
धर्माधर्म हे सहज । लागतील ना
लोह उभें खाय माती । तें परीसाचिये संगतीं ।
सोनें जालया पुढती । न शिविजे मळें
हें असो काष्ठापासोनि । मथूनि घेतलिया वन्ही ।
मग काष्ठेंही कोंडोनी । न ठके जैसा
अर्जुना काय दिनकरु । देखत आहे अंधारु ।
कीं प्रबोधीं होय गोचरु । स्वप्नभ्रमु ।
तैसें मजसी येकवटलेया । मी सर्वरूप वांचूनियां ।
आन कांहीं उरावया । कारण असे ?
म्हणौनि तयाचें कांहीं । चिंतीं न आपुल्या ठायीं ।
तुझें पापपुण्य पाहीं । मीचि होईन
तेथ सर्वबंधलक्षणें । पापें उरावें दुजेपणें ।
तें माझ्या बोधीं वायाणें । होऊनि जाईल
जळीं पडिलिया लवणा । सर्वही जळ होईल विचक्षणा ।
तुज मी अनन्यशरणा । होईन तैसा
येतुलेनि आपैसया । सुटलाचि आहसी धनंजया ।
घेईं मज प्रकाशोनियां । सोडवीन तूंतें
याकारणें पुढती । हे आधी न वाहे चित्तीं ।
मज एकासि ये सुमती । जाणोनि शरण
ऐसें सर्वरूपरूपसें । सर्वदृष्टिडोळसें ।
सर्वदेशनिवासें । बोलिलें श्रीकृष्णें
मग सांवळा सकंकणु । बाहु पसरोनि दक्षिणु ।
आलिंगिला स्वशरणु । भक्तराजु तो
न पवतां जयातें । काखे सूनि बुद्धीतें ।
बोंलणें मागौतें । वोसरलें
ऐसें जें कांहीं येक । बोला बुद्धीसिही अटक ।
तें द्यावया मिष । खेवाचें केलें
हृदया हृदय येक जाले । ये हृदयींचें ते हृदयीं घातलें ।
द्वैत न मोडितां केलें । आपणासें अर्जुना
दीपें दीप लाविला । तैसा परीष्वंगु तो जाला ।
द्वैत न मोडितां केला । आपणपें पार्थुं
तेव्हां सुखाचा मग तया । पूरु आला जो धनंजया ।
तेथ वाडु तऱहीं बुडोनियां ॥ ठेला देवो
सिंधु सिंधूतें पावों जाये । तें पावणें ठाके दुणा होये ।
वरी रिगे पुरवणिये । आकाशही
तैसें तयां दोघांचें मिळणें । दोघां नावरे जाणावें कवणें ।
किंबहुना श्रीनारायणें । विश्व कोंदलें
एवं वेदाचें मूळसूत्र । सर्वाधिकारैकपवित्र ।
श्रीकृष्णें गीताशास्त्र । प्रकट केलें
येथ गीता मूळ वेदां । ऐसें केवीं पां आलें बोधा ।
हें म्हणाल तरी प्रसिद्धा । उपपत्ति सांगों
तरी जयाच्या निःश्वासीं । जन्म झाले वेदराशी ।
तो सत्यप्रतिज्ञ पैजेसीं । बोलला स्वमुखें
म्हणौनि वेदां मूळभूत । गीता म्हणों हें होय उचित ।
आणिकही येकी येथ । उपपत्ति असे
जें न नशतु स्वरूपें । जयाचा विस्तारु जेथ लपे ।
तें तयांचें म्हणिपे । बीज जगीं
तरी कांडत्रयात्मकु । शब्दराशी अशेखु ।
गीतेमाजीं असे रुखु । बीजीं जैसा
म्हणौनि वेदांचें बीज । श्रीगीता होय हें मज ।
गमे आणि सहज । दिसतही आहे
जे वेदांचे तिन्ही भाग । गीते उमटले असती चांग ।
भूषणरत्नीं सर्वांग । शोभलें जैसें
तियेचि कर्मादिकें तिन्ही । कांडें कोणकोणे स्थानीं ।
गीते आहाति तें नयनीं । दाखऊं आईक
तरी पहिला जो अध्यावो । तो शास्त्रप्रवृत्तिप्रस्तावो ।
द्वितीयीं साङ्ख्यसद्भावो । प्रकाशिला
मोक्षदानीं स्वतंत्र । ज्ञानप्रधान हें शास्त्र ।
येतुलालें दुजीं सूत्र । उभारिलें
मग अज्ञानें बांधलेयां । मोक्षपदीं बैसावया ।
साधनारंभु तो तृतीया\- । ध्यायीं बोलिला
जे देहाभिमान बंधें । सांडूनि काम्यनिषिद्धें ।
विहित परी अप्रमादें । अनुष्ठावें
ऐसेनि सद्भावें कर्म करावें । हा तिजा अध्यावो जो देवें ।
निर्णय केला तें जाणावें । कर्मकांड येथ
आणि तेंचि नित्यादिक । अज्ञानाचें आवश्यक ।
आचरतां मोंचक । केवीं होय पां
ऐसी अपेक्षा जालिया । बद्ध मुमुक्षुते आलिया ।
देवें ब्रह्मार्पणत्वें क्रिया । सांगितली
जे देहवाचामानसें । विहित निपजे जें जैसें ।
तें एक ईश्वरोद्देशें । कीजे म्हणितलें
हेंचि ईश्वरीं कर्मयोगें । भजनकथनाचें खागें ।
आदरिलें शेषभागें । चतुर्थाचेनी
तें विश्वरूप अकरावा । अध्यावो संपे जंव आघवा ।
तंव कर्में ईशु भजावा । हें जें बोलिलें
तें अष्टाध्यायीं उघड । जाण येथें देवताकांड ।
शास्त्र सांगतसे आड । मोडूनि बोलें
आणि तेणेंचि ईशप्रसादें । श्रीगुरुसंप्रदायलब्धें ।
साच ज्ञान उद्बोधे । कोंवळें जें
तें अद्वेष्टादिप्रभृतिकीं । अथवा अमानित्वादिकीं ।
वाढविजे म्हणौनि लेखी । बारावा गणूं
तो बारावा अध्याय आदी । आणि पंधरावा अवधी ।
ज्ञानफळपाकसिद्धी । निरूपणासीं
म्हणौनि चहूंही इहीं । ऊर्ध्वमूळांतीं अध्यायीं ।
ज्ञानकांड ये ठायीं । निरूपिजे
एवं कांडत्रयनिरूपणी । श्रुतीचि हे कोडिसवाणी ।
गीतापद्यरत्नांचीं लेणीं । लेयिली आहे
हें असो कांडत्रयात्मक । श्रुति मोक्षरूप फळ येक ।
बोभावे जें आवश्यक । ठाकावें म्हणौनि
तयाचेनि साधन ज्ञानेंसीं । वैर करी जो प्रतिदिवशीं ।
तो अज्ञानवर्ग षोडशीं । प्रतिपादिजे
तोचि शास्त्राचा बोळावा । घेवोनि वैरी जिणावा ।
हा निरोपु तो सतरावा । अध्याय येथ
ऐसा प्रथमालागोनि । सतरावा लाणी करूनी ।
आत्मनिश्वास विवरूनी । दाविला देवें
तया अर्थजातां अशेषां । केला तात्पर्याचा आवांका ।
तो हा अठरावा देखा । कलशाध्यायो
एवं सकळसंख्यासिद्धु । श्रीभागवद्गीता प्रबंधु ।
हा औदार्यें आगळा वेदु । मूर्तु जाण
वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं ।
जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि
येरां भवव्याथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां ।
अनवसरू मांडूनियां । राहिला आहे
तरी मज पाहतां तें मागील उणें । फेडावया गीतापणें ।
वेदु वेठला भलतेणें । सेव्य होआवया
ना हे अर्थु रिगोनि मनीं । श्रवणें लागोनि कानीं ।
जपमिषें वदनीं । वसोनियां
ये गीतेचा पाठु जो जाणे । तयाचेनि सांगातीपणें ।
गीता लिहोनि वाहाणें । पुस्तकमिषें
ऐसैसा मिसकटां । संसाराचा चोहटा ।
गवादी घालीत चोखटा । मोक्षसुखाची
परी आकाशीं वसावया । पृथ्वीवरी बैसावया ।
रविदीप्ति राहाटावया । आवारु नभ
तेवीं उत्तम अधम ऐसें । सेवितां कवणातेंही न पुसे ।
कैवल्यदानें सरिसें । निववीत जगा
यालागीं मागिली कुटी । भ्याला वेदु गीतेच्या पोटीं ।
रिगाला आतां गोमटी । कीर्ति पातला
म्हणौनि वेदाची सुसेव्यता । ते हे मूर्त जाण श्रीगीता ।
श्रीकृष्णें पंडुसुता । उपदेशिली
परी वत्साचेनि वोरसें । दुभतें होय घरोद्देशें ।
जालें पांडवाचेनि मिषें । जगदुद्धरण
चातकाचियें कणवें । मेघु पाणियेसिं धांवे ।
तेथ चराचर आघवें । निवालें जेवीं
कां अनन्यगतिकमळा\- । लागीं सूर्य ये वेळोवेळां ।
कीं सुखिया होईजे डोळां । त्रिभुवनींचा
तैसें अर्जुनाचेनि व्याजें । गीता प्रकाशूनि श्रीराजें ।
संसारायेवढें थोर ओझें । फेडिलें जगाचें
सर्वशास्त्ररत्नदीप्ती । उजळिता हा त्रिजगतीं ।
सूर्यु नव्हें लक्ष्मीपती । वक्त्राकाशींचा
बाप कुळ तें पवित्र । जेथिंचा पार्थु या ज्ञाना पात्र ।
जेणें गीता केलें शास्त्र । आवारु जगा
हें असो मग तेणें । सद्गुरु श्रीकृष्णें ।
पार्थाचें मिसळणें । आणिलें द्वैता
पाठीं म्हणतसे पांडवा । शास्त्र हें मानलें कीं जीवा ।
तेथ येरु म्हणे देवा । आपुलिया कृपा
तरी निधान जोडावया । भाग्य घडे गा धनंजया ।
परी जोडिलें भोगावया । विपायें होय
पैं क्षीरसागरायेवढें । अविरजी दुधाचें भांडें ।
सुरां असुरां केवढें । मथितां जालें
तें सायासही फळा आलें । जें अमृतही डोळां देखिलें ।
परी वरिचिली चुकलें । जतनेतें
तेथ अमरत्वा वोगरिलें । तें मरणाचिलागीं जालें ।
भोगों नेणतां जोडलें । ऐसें आहे
नहुषु स्वर्गाधिपति जाहला । परी राहाटीं भांबावला ।
तो भुजंगत्व पावला । नेणसी कायी ?
म्हणौनि बहुत पुण्य तुवां । केलें तेणें धनंजया ।
आजि शास्त्रराजा इया । जालासि विषयो
तरी ययाचि शास्त्राचेनि । संप्रदायें पांघुरौनि ।
शास्त्रार्थ हा निकेनि । अनुष्ठीं हो
येऱहवीं अमृतमंथना\- । सारिखें होईल अर्जुना ।
जरी रिघसी अनुष्ठाना । संप्रदायेंवीण
गाय धड जोडे गोमटी । ते तैंचि पिवों ये किरीटी ।
जैं जाणिजे हातवटी । सांजवणीची
तैसा श्रीगुरु प्रसन्न होये । शिष्य विद्याही कीर लाहे ।
परी ते फळे संप्रदायें । उपासिलिया
म्हणौनि शास्त्रीं जो इये । उचितु संप्रदायो आहे ।
तो ऐक आतां बहुवें । आदरेंसीं
तरी तुवां हें जें पार्था । गीताशास्त्र लाधलें आस्था ।
तें तपोहीना सर्वथा । सांगावें ना हो
अथवा तापसुही जाला । परी गुरूभक्तीं जो ढिला ।
तो वेदीं अंत्यजु वाळिळा । तैसा वाळीं
नातरी पुरोडाशु जैसा । न घापे वृद्ध तरी वायसा ।
गीता नेदी तैसी तापसा । गुरुभक्तिहीना
कां तपही जोडे देहीं । भजे गुरुदेवांच्या ठायीं ।
परी आकर्णनीं नाहीं । चाड जरी
तरी मागील दोन्हीं आंगीं । उत्तम होय कीर जगीं ।
परी या श्रवणालागीं । योग्यु नोहे
मुक्ताफळ भलतैसें । हो परी मुख नसे ।
तंव गुण प्रवेशे । तेथ कायी ?
सागरु गंभीरु होये । हें कोण ना म्हणत आहे ।
परी वृष्टि वायां जाये । जाली तेथ
धालिया दिव्यान्न सुवावें । मग जें वायां धाडावें ।
तें आर्तीं कां न करावें । उदारपण
म्हणौनि योग्य भलतैसें । होतु परी चाड नसे ।
तरी झणें वानिवसें । देसी हें तयां
रूपाचा सुजाणु डोळा । वोढवूं ये कायि परिमळा ? ।
जेथ जें माने ते फळा । तेथचि ते गा
म्हणौनि तपी भक्ति । पाहावे ते सुभद्रापती ।
परी शास्त्रश्रवणीं अनासक्ती । वाळावेचि ते
नातरी तपभक्ति । होऊनि श्रवणीं आर्ति ।
आथी ऐसीही आयती । देखसी जरी
तरी गीताशास्त्रनिर्मिता । जो मी सकळलोकशास्ता ।
तया मातें सामान्यता । बोलेल जो
माझ्या सज्जनेंसिं मातें । पैशुन्याचेनि हातें ।
येक आहाती तयांतें । योग्य न म्हण
तयांची येर आघवी । सामग्री ऐसी जाणावी ।
दीपेंवीण ठाणदिवी । रात्रीची जैसी
अंग गोरें आणि तरुणें । वरी लेईलें आहे लेणें ।
परी येकलेनि प्राणें । सांडिलें जेवीं
सोनयाचें सुंदर । निर्वाळिलें होय घर ।
परी सर्पांगना द्वार । रुंधलें आहे
निपजे दिव्यान्न चोखट । परी माजीं काळकूट ।
असो मैत्री कपट\- । गर्भिणी जैसी
तैसी तपभक्तिमेधा । तयाची जाण प्रबुद्धा ।
जो माझयांची कां निंदा । माझीचि करी
याकारणें धनंजया । तो भक्तु मेधावीं तपिया ।
तरी नको बापा इया । शास्त्रा आतळों देवों
काय बहु बोलों निंदका । योग्य स्रष्टयाहीसारिखा ।
गीता हे कवतिका\- । लागींही नेदीं
म्हणौनि तपाचा धनुर्धरा । तळीं दाटोनि गाडोरा ।
वरी गुरुभक्तीचा पुरा । प्रासादु जो जाला
आणि श्रवणेच्छेचा पुढां । दारवंटा सदा उघडा ।
वरी कलशु चोखडा । अनिंदारत्नांचा
ऐशा भक्तालयीं चोखटीं । गीतारत्नेश्वरु हा प्रतिष्ठीं ।
मग माझिया संवसाटी । तुकसी जगीं
कां जे एकाक्षरपणेंसीं । त्रिमात्रकेचिये कुशीं ।
प्रणवु होतां गर्भवासीं । सांकडला
तो गीतेचिया बाहाळींं । वेदबीज गेलें पाहाळी.ण् ।
कीं गायत्री फुलींफळीं । श्लोकांच्या आली
ते हे मंत्ररहय गीता । मेळवी जो माझिया भक्ता ।
अनन्यजीवना माता । बाळका जैसी
तैसी भक्तां गीतेसीं । भेटी करी जो आदरेंसीं ।
तो देहापाठीं मजसीं । येकचि होय
आणि देहाचेंही लेणें । लेऊनि वेगळेपणें ।
असे तंव जीवेंप्राणें । तोचि पढिये
ज्ञानियां कर्मठां तापसां । यया खुणेचिया माणुसां\- ।
माजीं तो येकु गा जैसा । पढिये मज
तैसा भूतळीं आघवा । आन न देखे पांडवा ।
जो गीता सांगें मेळावा । भक्तजनांचा
मज ईश्वराचेनि लोभें । हे गीता पढतां अक्षोभें ।
जो मंडन होय सभे । संतांचिये
नेत्रपल्लवीं रोमांचितु । मंदानिळें कांपवितु ।
आमोदजळें वोलवितु । फुलांचे डोळें
कोकिळा कलरवाचेनि मिषें । सद्गद बोलवीत जैसें ।
वसंत का प्रवेशे । मद्भक्त आरामीं
कां जन्माचें फळ चकोरां । होत जैं चंद्र ये अंबरा ।
नाना नवघन मयूरां । वो देत पावे
तैसा सज्जनांच्या मेळापीं । गीतापद्यरत्नीं उमपीं ।
वर्षे जो माझ्या रूपीं । हेतु ठेऊनि
मग तयाचेनि पाडें । पढियंतें मज फुडें ।
नाहींचि गा मागेंपुढें । न्याहाळितां
अर्जुना हा ठायवरी । मी तयातें सूयें जिव्हारीं ।
जो गीतार्थाचें करी । परगुणें संतां
पैं माझिया तुझिया मिळणीं । वाढिनली जे हे कहाणी ।
मोक्षधर्म का जिणीं । आलासे जेथें
तो हा सकळार्थप्रबोधु । आम्हां दोघांचा संवादु ।
न करितां पदभेदु । पाठेंचि जो पढे
तेणें ज्ञानानळीं प्रदीप्तीं । मूळ अविद्येचिया आहुती ।
तोषविला होय सुमती । परमात्मा मी
घेऊनि गीतार्थ उगाणा । ज्ञानिये जें विचक्षणा ।
ठाकती तें गाणावाणा । गीतेचा तो लाहे
गीता पाठकासि असे । फळ अर्थज्ञाचि सरिसें ।
गीता माउलियेसि नसे । जाणें तान्हें
आणि सर्वमार्गीं निंदा । सांडूनि आस्था पैं शुद्धा ।
गीताश्रवणीं श्रद्धा । उभारी जो
तयाच्या श्रवणपुटीं । गीतेचीं अक्षरें जंव पैठीं ।
होतीना तंव उठाउठीं । पळेचि पाप
अटवियेमाजीं जैसा । वन्हि रिघतां सहसा ।
लंघिती का दिशा । वनौकें तियें
कां उदयाचळकुळीं । झळकतां अंशुमाळी ।
तिमिरें अंतराळीं । हारपती
तैसा कानाच्या महाद्वारीं । गीता गजर जेथ करी ।
तेथ सृष्टीचिये आदिवरी । जायचि पाप
ऐसी जन्मवेली धुवट । होय पुण्यरूप चोखट ।
याहीवरी अचाट । लाहे फळ
जें इये गीतेचीं अक्षरें । जेतुलीं कां कर्णद्वारें ।
रिघती तेतुले होती पुरे । अश्वमेध कीं
म्हणौनि श्रवणें पापें जाती । आणि धर्म धरी उन्नती ।
तेणें स्वर्गराज संपत्ती । लाहेचि शेखीं
तो पैं मज यावयालागीं । पहिलें पेणें करी स्वर्गीं ।
मग आवडे तंव भोगी । पाठीं मजचि मिळे
ऐसी गीता धनंजया । ऐकतया आणि पढतया ।
फळे महानंदें मियां । बहु काय बोलों
याकारणें हें असो । परी जयालागीं शास्त्रातिसो ।
केला तें तंव तुज पुसों । काज तुझें
तरी सांग पां पांडवा । हा शास्त्रसिद्धांतु आघवा ।
तुज एकचित्तें फावा । गेला आहे ?
आम्हीं जैसें जया रीतीं । उगाणिलें कानांच्या हातीं ।
येरीं तैसेंचि तुझ्या चित्तीं । पेठें केलें कीं ?
अथवा माझारीं । गेलें सांडीविखुरी ।
किंवा उपेक्षेवरी । वाळूनि सांडिलें ।
जैसें आम्हीं सांगितलें । तैसेंचि हृदयीं फावलें ।
तरी सांग पां वहिलें । पुसेन तें मी
तरी स्वाज्ञानजनितें । मागिलें मोहें तूतें ।
भुलविलें तो येथें । असे कीं नाहीं ?
हें बहु पुसों काई । सांगें तूं आपल्या ठायीं ।
कर्माकर्म कांहीं । देखतासी ?
पार्थु स्वानंदैकरसें । विरेल ऐसा भेददशे ।
आणिला येणें मिषें । प्रश्नाचेनि
पूर्णब्रह्म जाला पार्थु । तरी पुढील साधावया कार्यार्थु ।
मर्यादा श्रीकृष्णनाथु । उल्लंघों नेदी
येऱहवीं आपुलें करणें । सर्वज्ञ काय तो नेणें ? ।
परी केलें पुसणें । याचि लागीं
एवं करोनियां प्रश्न । नसतेंचि अर्जुनपण ।
आणूनियां जालें पूर्णपण । तें बोलवी स्वयें
मग क्षीराब्धीतें सांडितु । गगनीं पुंजु मंडितु ।
निवडे जैसा न निवडितु । पूर्णचंद्रु
तैसा ब्रह्म मी हें विसरे । तेथ जगचि ब्रह्मत्वें भरे ।
हेंही सांडी तरी विरे । ब्रह्मपणही
ऐसा मोडतु मांडतु ब्रह्में । तो दुःखें देहाचिये सीमे ।
मी अर्जुन येणें नामें । उभा ठेला
मग कांपतां करतळीं । दडपूनि रोमावळी ।
पुलिका स्वेदजळीं । जिरऊनियां
प्राणक्षोभें डोलतया । आंगा आंगचि टेंकया ।
सूनि स्तंभु चाळया । भुलौनियां
नेत्रयुगुळाचेनि वोतें । आनंदामृताचें भरितें ।
वोसंडत तें मागुतें । काढूनियां
विविधा औत्सुक्यांची दाटी । चीप दाटत होती कंठीं ।
ते करूनियां पैठी । हृदयामाजीं
वाचेचें वितुळणें । सांवरूनि प्राणें ।
अक्रमाचें श्वसणें । ठेऊनि ठायीं
मग अर्जुन म्हणे काय देवो । पुसताति आवडे मोहो ।
तरी तो सकुटुंब गेला जी ठावो । घेऊनि आपला
पासीं येऊनि दिनकरें । डोळ्यातें अंधारें ।
पुसिजे हें कायि सरे । कोणे गांवीं ?
तैसा तूं श्रीकृष्णराया । आमुचिया डोळयां ।
गोचर हेंचि कायिसया । न पुरे तंव
वरी लोभें मायेपासूनी । तें सांगसी तोंड भरूनी ।
जें कायिसेनिही करूनी । जाणूं नये
आतां मोह असे कीं नाहीं । हें ऐसें जी पुससी काई ।
कृतकृत्य जाहलों पाहीं । तुझेपणें
गुंतलों होतों अर्जुनगुणें । तो मुक्त जालों तुझेपणें ।
आतां पुसणें सांगणें । दोन्ही नाहीं
मी तुझेनि प्रसादें । लाधलेनि आत्मबोधें ।
मोहाचे तया कांदे । नेदीच उरों
आतां करणें कां न करणें । हें जेणें उठी दुजेपणें ।
तें तूं वांचूनि नेणें । सर्वत्र गा
ये विषयीं माझ्या ठायीं । संदेहाचे नुरेचि कांहीं ।
त्रिशुद्धि कर्म जेथ नाहीं । तें मी जालों
तुझेनि मज मी पावोनी । कर्तव्य गेलें निपटूनी ।
परी आज्ञा तुझी वांचोनि । आन नाहीं प्रभो
कां जें दृश्य दृश्यातें नाशी । जें दुजें द्वैतातें ग्रासी ।
जें एक परी सर्वदेशीं । वसवी सदा
जयाचेनि संबंधें बंधु फिटे । जयाचिया आशा आस तुटे ।
जें भेटलया सर्व भेटे । आपणपांचि
तें तूं गुरुलिंग जी माझें । जें येकलेपणींचें विरजें ।
जयालागीं वोलांडिजे । अद्वैतबोधु
आपणचि होऊनि ब्रह्म । सारिजे कृत्याकृत्यांचें काम ।
मग कीजे का निःसीम । सेवा जयाची
गंगा सिंधू सेवूं गेली । पावतांचि समुद्र जाली ।
तेवीं भक्तां सेल दिधली । निजपदाची
तो तूं माझा जी निरुपचारु । श्रीकृष्णा सेव्य सद्गुरु ।
मा ब्रह्मतेचा उपकारु । हाचि मानीं
जें मज तुम्हां आड । होतें भेदाचें कवाड ।
तें फेडोनि केलें गोड । सेवासुख
तरी आतां तुझी आज्ञा । सकळ देवाधिदेवराज्ञा ।
करीन देईं अनुज्ञा । भलतियेविषयीं
यया अर्जुनाचिया बोला । देवो नाचे सुखें भुलला ।
म्हणे विश्वफळा जाला । फळ हा मज
उणेनि उमचला सुधाकरु । देखुनी आपला कुमरु ।
मर्यादा क्षीरसागरु । विसरेचिना ?
ऐसे संवादाचिया बहुलां । लग्न दोघांचियां आंतुला ।
लागलें देखोनि जाला । निर्भरु संजयो
तेणें म्हणतसे संजयो । बाप कृपानिधी रावो ।
तो आपुला मनोभावो । अर्जुनेंसी केला
तेणें उचंबळलेपणें । संजय धृतराष्ट्रातें म्हणे ।
जी कैसे बादरायणें । रक्षिलों दोघे ?
आजि तुमतें अवधारा । नाहीं चर्मचक्षूही संसारा ।
कीं ज्ञानदृष्टिव्यवहारा आणिलेती
आणि रथींचिये राहाटी । घेई जो घोडेयासाठीं ।
तया आम्हां या गोष्टी । गोचरा होती
वरी जुंझाचें निर्वाण । मांडलें असे दारुण ।
दोहीं हारीं आपण । हारपिजे जैसें
येवढा जिये सांकडां । कैसा अनुग्रहो पैं गाढा ।
जे ब्रह्मानंदु उघडा । भोगवीतसे
ऐसें संजय बोलिला । परी न द्रवे येरु उगला ।
चंद्रकिरणीं शिवतला । पाषाणु जैसा
हे देखोनि तयाची दशा । मग करीचिना सरिसा ।
परी सुखें जाला पिसा । बोलतसे
भुलविला हर्षवेगें । म्हणौनि धृतराष्ट्रा सांगे ।
येऱहवीं नव्हे तयाजोगें । हें कीर जाणें
मग म्हणे पैं कुरुराजा । ऐसा बंधुपुत्र तो तुझा ।
बोलिला तें अधोक्षजा । गोड जालें
अगा पूर्वापर सागर । ययां नामसीचि सिनार ।
येर आघवें तें नीर । एक जैसें
तैसा श्रीकृष्ण पार्थ ऐसें । हें आंगाचिपासीं दिसे ।
मग संवादीं जी नसे । कांहींचि भेदु
पैं दर्पणाहूनि चोखें । दोन्ही होती सन्मुखें ।
तेथ येरी येर देखे । आपणपें जैसें
तैसा देवेसीं पंडुसुतु । आपणपें देवीं देखतु ।
पांडवेंसीं देखे अनंतु । आपणपें पार्थीं
देव देवो भक्तालागीं । जिये विवरूनि देखे आंगीं ।
येरु तियेचेही भागीं । दोन्ही देखे
आणिक कांहींच नाहीं । म्हणौनि करिती काई ।
दोघे येकपणें पाहीं । नांदताती
आतां भेदु जरी मोडे । तरी प्रश्नोत्तर कां घडे ? ।
ना भेदुचि तरी जोडे । संवादसुख कां ?
ऐसें बोलतां दुजेपणें । संवादीं द्वैत गिळणें ।
तें ऐकिलें बोलणें । दोघांचें मियां
उटूनि दोन्ही आरिसे । वोडविलीया सरिसे ।
कोण कोणा पाहातसे । कल्पावें पां ?
कां दीपासन्मुखु । ठेविलया दीपकु ।
कोण कोणा अर्थिकु । कोण जाणें
नाना अर्कापुढें अर्कु । उदयलिया आणिकु ।
कोण म्हणे प्रकाशकु । प्रकाश्य कवण ?
हें निर्धारूं जातां फुडें । निर्धारासि ठक पडे ।
ते दोघे जाले एवढे । संवादें सरिसे
जी मिळतां दोन्ही उदकें । माजी लवण वारूं ठाके ।
कीं तयासींही निमिखें । तेंचि होय
तैसे श्रीकृष्ण अर्जुन दोन्ही । संवादले तें मनीं ।
धरितां मजही वानी । तेंचि होतसे
ऐसें म्हणे ना मोटकें । तंव हिरोनि सात्विकें ।
आठव नेला नेणों कें । संजयपणाचा
रोमांच जंव फरके । तंव तंव आंग सुरके ।
स्तंभ स्वेदांतें जिंके । एकला कंपु
अद्वयानंदस्पर्शें । दिठी रसमय जाली असे ।
ते अश्रु नव्हती जैसें । द्रवत्वचि
नेणों काय न माय पोटीं । नेणों काय गुंफे कंठीं ।
वागर्था पडत मिठी । उससांचिया
किंबहुना सात्विकां आठां । चाचरु मांडतां उमेठा ।
संजयो जालासे चोहटां । संवादसुखाचा
तया सुखाची ऐसी जाती । जे आपणचि धरी शांती ।
मग पुढती देहस्मृती । लाधली तेणें
तेव्हां बैसतेनि आनंदें । म्हणे जी जें उपनिषदें ।
नेणती तें व्यासप्रसादें । ऐकिलें मियां
ऐकतांचि ते गोठी । ब्रह्मत्वाची पडिली मिठी ।
मीतूंपणेंसीं दृष्टी । विरोनि गेली
हे आघवेचि का योग । जया ठाया येती मार्ग ।
तयाचें वाक्य सवंग । केलें मज व्यासें
अहो अर्जुनाचेनि मिषें । आपणपेंचि दुजें ऐसें ।
नटोनि आपणया उद्देशें । बोलिलें जें देव
तेथ कीं माझें श्रोत्र । पाटाचें जालें जी पात्र ।
काय वानूं स्वतंत्र । सामर्थ्य श्रीगुरुचें
राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये ।
रत्नीं कीं रत्नकिळा ये । झांकोळित जैसी
हिमवंतींचीं सरोवरें । चंद्रोदयीं होती काश्मीरें ।
मग सूर्यागमीं माघारें । द्रवत्व ये
तैसा शरीराचिया स्मृती । तो संवादु संजय चित्तीं ।
धरी आणि पुढती । तेंचि होय
मग उठोनि म्हणे नृपा । श्रीहरीचिया विश्वरूपा ।
देखिलया उगा कां पां । असों लाहसी ?
न देखणेनि जें दिसे । नाहींपणेंचि जें असे ।
विसरें आठवे तें कैसें । चुकऊं आतां ।
देखोनि चमत्कारु । कीजे तो नाहीं पैसारु ।
मजहीसकट महापूरु । नेत आहे
ऐसा श्रीकृष्णार्जुन- । संवाद संगमीं स्नान ।
करूनि देतसे तिळदान । अहंतेचें
तेथ असंवरें आनंदें । अलौकिकही कांहीं स्फुंदे ।
श्रीकृष्ण म्हणे सद्गदें । वेळोवेळां
या अवस्थांची कांहीं । कौरवांतें परी नाहीं ।
म्हणौनि रायें तें कांहीं । कल्पावें जंव
तंव जाला सुखलाभु । आपणया करूनि स्वयंभु ।
बुझाविला अवष्टंभु । संजयें तेणें
तेथ कोणी येकी अवसरी । होआवी ते करूनि दुरी ।
रावो म्हणे संजया परी । कैसी तुझी गा ?
तेणें तूंतें येथें व्यासें । बैसविलें कासया उद्देशें ।
अप्रसंगामाजीं ऐसें । बोलसी काई ?
रानींचें राउळा नेलिया । दाही दिशा मानी सुनिया ।
कां रात्री होय पाहलया । निशाचरां
जो जेथिंचें गौरव नेणें । तयासि तें भिंगुळवाणें ।
म्हणौनि अप्रसंगु तेणें । म्हणावा कीं तो
मग म्हणे सांगें प्रस्तुत । उदयलेंसे जें उत्कळित ।
तें कोणासि बा रे जैत । देईल शेखीं ?
येऱहवीं विशेषें बहुतेक । आमुचें ऐसें मानसिक ।
जे दुर्योधनाचे अधिक । प्रताप सदा
आणि येरांचेनि पाडें । दळही याचें देव्हडें ।
म्हणौनि जैत फुडें । आणील ना तें ?
आम्हां तंव गमे ऐसें । मा तुझें ज्योतिष कैसें ।
तें नेणों संजया असे । तैसें सांग पां
यया बोला संजयो म्हणे । जी येरयेरांचें मी नेणें ।
परी आयुष्य तेथें जिणें । हें फुडें कीं गा
चंद्रु तेथें चंद्रिका । शंभु तेथें अंबिका ।
संत तेथें विवेका । असणें कीं जी
रावो तेथें कटक । सौजन्य तेथें सोयरीक ।
वन्हि तेथें दाहक । सामर्थ्य कीं
दया तेथें धर्मु । धर्मु तेथें सुखागमु ।
सुखीं पुरुषोत्तमु । असे जैसा
वसंत तेथें वनें । वन तेथें सुमनें ।
सुमनीं पालिंगनें । सारंगांचीं
गुरु तेथ ज्ञान । ज्ञानीं आत्मदर्शन ।
दर्शनीं समाधान । आथी जैसें
भाग्य तेथ विलासु । सुख तेथ उल्लासु ।
हें असो तेथ प्रकाशु । सूर्य जेथें
तैसे सकल पुरुषार्थ । जेणें स्वामी कां सनाथ ।
तो श्रीकृष्ण रावो जेथ । तेथ लक्ष्मी
आणि आपुलेनि कांतेंसीं । ते जगदंबा जयापासीं ।
अणिमादिकीं काय दासी । नव्हती तयातें ?
कृष्ण विजयस्वरूप निजांगें । तो राहिला असे जेणें भागें ।
तैं जयो लागवेगें । तेथेंचि आहे
विजयो नामें अर्जुन विख्यातु । विजयस्वरूप श्रीकृष्णनाथु ।
श्रियेसीं विजय निश्चितु । तेथेंचि असे
तयाचिये देशींच्या झाडीं । कल्पतरूतें होडी ।
न जिणावें कां येवढीं । मायबापें असतां ?
ते पाषाणही आघवें । चिंतारत्नें कां नोहावे ? ।
तिये भूमिके कां न यावें । सुवर्णत्व ?
तयाचिया गांवींचिया । नदी अमृतें वाहाविया ।
नवल कायि राया । विचारीं पां
तयाचे बिसाट शब्द । सुखें म्हणों येती वेद ।
सदेह सच्चिदानंद । कां न व्हावे ते ?
पैं स्वर्गापवर्ग दोन्ही । इयें पदें जया अधीनीं ।
तो श्रीकृष्ण बाप जननी । कमळा जया
म्हणौनि जिया बाहीं उभा । तो लक्ष्मीयेचा वल्लभा ।
तेथें सर्वसिद्धी स्वयंभा । येर मी नेणें
आणि समुद्राचा मेघु । उपयोगें तयाहूनि चांगु ।
तैसा पार्थीं आजि लागु । आहे तये
कनकत्वदीक्षागुरू । लोहा परिसु होय कीरू ।
परी जगा पोसिता व्यवहारु । तेंचि जाणें
येथ गुरुत्वा येतसे उणें । ऐसें झणें कोण्ही म्हणे ।
वन्हि प्रकाश दीपपणें । प्रकाशी आपुला
तैसा देवाचिया शक्ती । पार्थु देवासीचि बहुती ।
परी माने इये स्तुती । गौरव असे
आणि पुत्रें मी सर्व गुणीं । जिणावा हे बापा शिराणी ।
तरी ते शारङ्गपाणी । फळा आली
किंबहुना ऐसा नृपा । पार्थु जालासे कृष्णकृपा ।
तो जयाकडे साक्षेपा । रीति आहे
तोचि गा विजयासि ठावो । येथ तुज कोण संदेहो ? ।
तेथ न ये तरी वावो । विजयोचि होय
म्हणौनि जेथ श्री तेथें श्रीमंतु । जेथ तो पंडूचा सुतु ।
तेथ विजय समस्तु । अभ्युदयो तेथ
जरी व्यासाचेनि साचें । धिरे मन तुमचें ।
तरी या बोलाचें । ध्रुवचि माना
जेथ तो श्रीवल्लभु । जेथ भक्तकदंबु ।
तेथ सुख आणि लाभु । मंगळाचा
या बोला आन होये । तरी व्यासाचा अंकु न वाहे ।
ऐसें गाजोनि बाहें । उभिली तेणें
एवं भारताचा आवांका । आणूनि श्लोका येका ।
संजयें कुरुनायका । दिधला हातीं
जैसा नेणों केवढा वन्ही । परी गुणाग्रीं ठेऊनी ।
आणिजे सूर्याची हानी । निस्तरावया
तैसें शब्दब्रह्म अनंत । जालें सवालक्ष भारत ।
भारताचें शतें सात । सर्वस्व गीता
तयांही सातां शतांचा । इत्यर्थु हा श्लोक शेषींचा ।
व्यासशिष्य संजयाचा । पूर्णोद्गारु जो
येणें येकेंचि श्लोकें । राहे तेणें असकें ।
अविद्याजाताचें निकें । जिंतलें होय
ऐसें श्लोक शतें सात । गीतेचीं पदें आंगें वाहत ।
पदें म्हणों कीं परमामृत । गीताकाशींचें
कीं आत्मराजाचिये सभे । गीते वोडवले हे खांबे ।
मज श्लोक प्रतिभे । ऐसे येत
कीं गीता हे सप्तशती । मंत्रप्रतिपाद्य भगवती ।
मोहमहिषा मुक्ति । आनंदली असे
म्हणौनि मनें कायें वाचा । जो सेवकु होईल इयेचा ।
तो स्वानंदासाम्राज्याचा । चक्रवर्ती करी
कीं अविद्यातिमिररोंखें । श्लोक सूर्यातें पैजा जिंकें ।
ऐसे प्रकाशिले गीतामिषें । रायें श्रीकृष्णें
कीं श्लोकाक्षरद्राक्षलता । मांडव जाली आहे गीता ।
संसारपथश्रांता । विसंवावया
कीं सभाग्यसंतीं भ्रमरीं । केले ते श्लोककल्हारीं ।
श्रीकृष्णाख्यसरोवरीं । सासिन्नली हे
कीं श्लोक नव्हती आन । गमे गीतेचें महिमान ।
वाखाणिते बंदीजन । उदंड जैसे
कीं श्लोकांचिया आवारा । सात शतें करूनि सुंदरा ।
सर्वागम गीतापुरा । वसों आले
कीं निजकांता आत्मया । आवडी गीता मिळावया ।
श्लोक नव्हती बाह्या । पसरु का जो
कीं गीताकमळींचे भृंग । कीं हे गीतासागरतरंग ।
कीं हरीचे हे तुरंग । गीतारथींचे
कीं श्लोक सर्वतीर्थ संघातु । आला श्रीगीतेगंगे आंतु ।
जे अर्जुन नर सिंहस्थु । जाला म्हणौनि
कीं नोहे हे श्लोकश्रेणी । अचिंत्यचित्तचिंतामणी ।
कीं निर्विकल्पां लावणी । कल्पतरूंची
ऐसिया शतें सात श्लोकां । परी आगळा येकयेका ।
आतां कोण वेगळिका । वानावां पां ।
तान्ही आणि पारठी । इया कामधेनूतें दिठी ।
सूनि जैसिया गोठी । कीजती ना
दीपा आगिलु मागिलु । सूर्यु धाकुटा वडीलु ।
अमृतसिंधु खोलु । उथळु कायसा ।
तैसे पहिले सरते । श्लोक न म्हणावे गीते ।
जुनीं नवीं पारिजातें । आहाती काई ?
आणि श्लोका पाडु नाहीं । हें कीर समर्थु काई ।
येथ वाच्य वाचकही । भागु न धरी
जे इये शास्त्रीं येकु । श्रीकृष्णचि वाच्य वाचकु ।
हें प्रसिद्ध जाणे लोकु । भलताही
येथें अर्थें तेंचि पाठें । जोडे येवढेनि धटें ।
वाच्यवाचक येकवटें । साधितें शास्त्र
म्हणौनि मज कांहीं । समर्थनीं आतां विषय नाहीं ।
गीता जाणा हे वाङ्ग्मयी । श्रीमूर्ति प्रभूचि
शास्त्र वाच्यें अर्थें फळे । मग आपण मावळे ।
तैसें नव्हें हें सगळें । परब्रह्मचि
कैसा विश्वाचिया कृपा । करूनि महानंद सोपा ।
अर्जुनव्याजें रूपा । आणिला देवें
चकोराचेनि निमित्तें । तिन्ही भुवनें संतप्तें ।
निवविलीं कळांवतें । चंद्रें जेवीं
कां गौतमाचेनि मिषें । कळिकाळज्वरीतोद्देशें ।
पाणिढाळु गिरीशें । गंगेंचा केला
तैसें गीतेचें हें दुभतें । वत्स करूनि पार्थातें ।
दुभिन्नली जगापुरतें । श्रीकृष्ण गाय
येथे जीवें जरी नाहाल । तरी हेंचि कीर होआल ।
नातरी पाठमिषें तिंबाल । जीभचि जरी
तरी लोह एकें अंशें । झगटलिया परीसें ।
येरीकडे अपैसें । सुवर्ण होय
तैसी पाठाची ते वाटी । श्लोकपाद लावा ना जंव वोठीं ।
तंव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा
ना येणेसीं मुख वांकडें । करूनि ठाकाल कानवडें ।
तरी कानींही घेतां पडे । तेचि लेख
जे हे श्रवणें पाठें अर्थें । गीता नेदी मोक्षाआरौतें ।
जैसा समर्थु दाता कोण्हातें । नास्ति न म्हणे
म्हणौनि जाणतया सवा । गीताचि येकी सेवा ।
काय कराल आघवां । शास्त्रीं येरीं
आणि कृष्णार्जुनीं मोकळी । गोठी चावळिली जे निराळी ।
ते श्रीव्यासें केली करतळीं । घेवों ये ऐसी
बाळकातें वोरसें । माय जैं जेवऊं बैसे ।
तैं तया ठाकती तैसे । घांस करी
कां अफाटा समीरणा । आपैतेंपण शाहाणा ।
केलें जैसें विंजणा । निर्मूनियां
तैसें शब्दें जें न लभे । तें घडूनिया अनुष्टुभें ।
स्त्रीशूद्रादि प्रतिभे । सामाविलें
स्वातीचेनि पाणियें । न होती जरी मोतियें ।
तरी अंगीं सुंदरांचिये । कां शोभिती तियें ?
नादु वाद्या न येतां । तरी कां गोचरु होता ।
फुलें न होतां घेपता । आमोदु केवीं ?
गोडीं न होती पक्वान्नें । तरी कां फावती रसनें ? ।
दर्पणावीण नयनें । नयनु कां दिसे ?
द्रष्टा श्रीगुरुमूर्ती । न रिगता दृश्यपंथीं ।
तरी कां ह्या उपास्ती । आकळता तो ?
तैसें वस्तु जें असंख्यात । तया संख्या शतें सात ।
न होती तरी कोणा येथ । फावों शकतें ?
मेघ सिंधूचें पाणी वाहे । तरी जग तयातेंचि पाहे ।
कां जे उमप ते नोहें । ठाकतें कोण्हा
आणि वाचा जें न पवे । तें हे श्लोक न होते बरवे ।
तरी कानें मुखें फावे । ऐसें कां होतें ?
म्हणौनि श्रीव्यासाचा हा थोरु । विश्वा जाला उपकारु ।
जे श्रीकृष्ण उक्ती आकारु । ग्रंथाचा केला
आणि तोचि हा मी आतां । श्रीव्यासाचीं पदें पाहतां पाहतां ।
आणिला श्रवणपथा । मऱहाठिया
व्यासादिकांचे उन्मेख । राहाटती जेथ साशंक ।
तेथ मीही रंक येक । चावळी करीं
परी गीता ईश्वरु भोळा । ले व्यासोक्तिकुसुममाळा ।
तरी माझिया दुर्वादळा । ना न म्हणे कीं
आणि क्षीरसिंधूचिया तटा । पाणिया येती गजघटा ।
तेथ काय मुरकुटा । वारिजत असे ?
पांख फुटे पांखिरूं । नुडे तरी नभींच स्थिरू ।
गगन आक्रमी सत्वरू । तो गरुडही तेथ
राजहंसाचें चालणें । भूतळीं जालिया शाहाणें ।
आणिकें काय कोणें । चालावेचिना ?
जी आपुलेनि अवकाशें । अगाध जळ घेपे कलशें ।
चुळीं चूळपण ऐसें । भरूनि न निघे ?
दिवटीच्या आंगीं थोरी । तरी ते बहु तेज धरी ।
वाती आपुलिया परी । आणीच कीं ना ?
जी समुद्राचेनि पैसें । समुद्रीं आकाश आभासे ।
थिल्लरीं थिल्लरासें । बिंबेचि पैं
तेवीं व्यासादिक महामती । वावरों येती इये ग्रंथीं ।
मा आम्ही ठाकों हे युक्ति । न मिळे कीर ?
जिये सागरीं जळचरें । संचरती मंदराकारें ।
तेथ देखोनि शफरें येरें । पोहों न लाहती ?
अरुण आंगाजवळिके । म्हणौनि सूर्यातें देखें ।
मा भूतळींची न देखे । मुंगी काई ?
यालागीं आम्हां प्राकृतां । देशिकारें बंधें गीता ।
म्हणणें हें अनुचिता । कारण नोहे
आणि बापु पुढां जाये । ते घेत पाउलाची सोये ।
बाळ ये तरी न लाहे । पावों कायी ?
तैसा व्यासाचा मागोवा घेतु । भाष्यकारातें वाट पुसतु ।
अयोग्यही मी न पवतु । कें जाईन ?
आणि पृथ्वी जयाचिया क्षमा । नुबगे स्थावर जंगमा ।
जयाचेनि अमृतें चंद्रमा । निववी जग
जयाचें आंगिक असिकें । तेज लाहोनि अर्कें ।
आंधाराचें सावाइकें । लोटिजत आहे
समुद्रा जयाचें तोय । तोया जयाचें माधुर्य ।
माधुर्या सौंदर्य । जयाचेनि
पवना जयाचें बळ । आकाश जेणें पघळ ।
ज्ञान जेणें उज्वळ । चक्रवर्ती
वेद जेणें सुभाष । सुख जेणें सोल्लास ।
हें असो रूपस । विश्व जेणें
तो सर्वोपकारी समर्थु । सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथु ।
राहाटत असे मजही आंतु । रिघोनियां
आतां आयती गीता जगीं । मी सांगें मऱहाठिया भंगीं ।
येथ कें विस्मयालागीं । ठावो आहे
श्रीगुरुचेनि नांवें माती । डोंगरीं जयापासीं होती ।
तेणें कोळियें त्रिजगतीं । येकवद केली
चंदनें वेधलीं झाडें । जालीं चंदनाचेनि पाडें ।
वसिष्ठें मांनिली कीं भांडे । भानूसीं शाटी
मा मी तव चित्ताथिला । आणि श्रीगुरु ऐसा दादुला ।
जो दिठीवेनि आपुला । बैसवी पदीं
आधींचि देखणी दिठी । वरी सूर्य पुरवी पाठी ।
तैं न दिसे ऐसी गोठी । केंही आहे ?
म्हणौनि माझें नित्य नवे । श्वासोश्वासही प्रबंध होआवे ।
श्रीगुरुकृपा काय नोहे । ज्ञानदेवो म्हणे
याकारणें मियां । श्रीगीतार्थु मऱहाठिया ।
केला लोकां यया । दिठीचा विषो
परी मऱहाठे बोलरंगें । कवळितां पैं गीतांगें ।
तैं गातयाचेनि पांगें । येकाढतां नोहे
म्हणौनि गीता गावों म्हणे । तें गाणिवें होती लेणें ।
ना मोकळे तरी उणें । गीताही आणित
सुंदर आंगीं लेणें न सूये । तैं तो मोकळा शृंगारु होये ।
ना लेइलें तरी आहे । तैसें कें उचित ?
कां मोतियांची जैसी जाती । सोनयाही मान देती ।
नातरी मानविती । अंगेंचि सडीं
नाना गुंफिलीं कां मोकळीं । उणीं न होती परीमळीं ।
वसंतागमींचीं वाटोळीं । मोगरीं जैसीं
तैसा गाणिवेतें मिरवी । गीतेवीणही रंगु दावीं ।
तो लाभाचा प्रबंधु ओंवी । केला मियां
तेणें आबालसुबोधें । ओवीयेचेनि प्रबंधें ।
ब्रह्मरससुस्वादें । अक्षरें गुंथिलीं
आतां चंदनाच्या तरुवरीं । परीमळालागीं फुलवरीं ।
पारुखणें जियापरी । लागेना कीं
तैसा प्रबंधु हा श्रवणीं । लागतखेंवो समाधि आणी ।
ऐकिलियाही वाखाणी । काय व्यसन न लवी ?
पाठ करितां व्याजें । पांडित्यें येती वेषजे ।
तैं अमृतातें नेणिजे । फावलिया
तैसेंनि आइतेपणें । कवित्व जालें हें उपेणें ।
मनन निदिध्यास श्रवणें । जिंतिलें आतां
हे स्वानंदभोगाची सेल । भलतयसीचि देईल ।
सर्वेंद्रियां पोषवील । श्रवणाकरवीं
चंद्रातें आंगवणें । भोगूनि चकोर शाहाणे ।
परी फावे जैसें चांदिणें । भलतयाही
तैसें अध्यात्मशास्त्रीं यिये । अंतरंगचि अधिकारिये ।
परी लोकु वाक्चातुर्यें । होईल सुखिया
ऐसें श्रीनिवृत्तिनाथाचें । गौरव आहे जी साचें ।
ग्रंथु नोहे हें कृपेचें । वैभव तिये
क्षीरसिंधु परिसरीं । शक्तीच्या कर्णकुहरीं ।
नेणों कैं श्रीत्रिपुरारीं । सांगितलें जें
तें क्षीरकल्लोळाआंतु । मकरोदरीं गुप्तु ।
होता तयाचा हातु । पैठें जालें
तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावयवा चौरंगी ।
भेटला कीं तो सर्वांगीं । संपूर्ण जाला
मग समाधि अव्युत्थया । भोगावी वासना यया ।
ते मुद्रा श्रीगोरक्षराया । दिधली मीनीं
तेणें योगाब्जिनीसरोवरु । विषयविध्वंसैकवीरु ।
तिये पदीं कां सर्वेश्वरु । अभिषेकिला
मग तिहीं तें शांभव । अद्वयानंदवैभव ।
संपादिलें सप्रभव । श्रीगहिनीनाथा
तेणें कळिकळितु भूतां । आला देखोनि निरुता ।
ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी
ना आदिगुरु शंकरा\- । लागोनि शिष्यपरंपरा ।
बोधाचा हा संसरा । जाला जो आमुतें
तो हा तूं घेऊनि आघवा । कळीं गिळितयां जीवां ।
सर्व प्रकारीं धांवा । करीं पां वेगीं
आधींच तंव तो कृपाळु । वरी गुरुआज्ञेचा बोलू ।
जाला जैसा वर्षाकाळू । खवळणें मेघां
मग आर्ताचेनि वोरसें । गीतार्थग्रंथनमिसें ।
वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथु
तेथ पुढां मी बापिया । मांडला आर्ती आपुलिया ।
कीं यासाठीं येवढिया । आणिलों यशा
एवं गुरुक्रमें लाधलें । समाधिधन जें आपुलें ।
तें ग्रंथें बोधौनि दिधलें । गोसावी मज
वांचूनि पढे ना वाची । ना सेवाही जाणें स्वामीची ।
ऐशिया मज ग्रंथाची । योग्यता कें असे ?
परी साचचि गुरुनाथें । निमित्त करूनि मातें ।
प्रबंधव्याजें जगातें । रक्षिलें जाणा
तऱही पुरोहितगुणें । मी बोलिलों पुरें उणें ।
तें तुम्हीं माउलीपणें । उपसाहिजो जी
शब्द कैसा घडिजे । प्रमेयीं कैसें पां चढिजें ।
अळंकारु म्हणिजे । काय तें नेणें
सायिखडेयाचें बाहुलें । चालवित्या सूत्राचेनि चाले ।
तैसा मातें दावीत बोले । स्वामी तो माझा
यालागीं मी गुणदोष\- । विषीं क्षमाविना विशेष ।
जे मी संजात ग्रंथलों देख । आचार्यें कीं
आणि तुम्हां संतांचिये सभे । जें उणीवेंसी ठाके उभें ।
तें पूर्ण नोहे तरी तैं लोभें । तुम्हांसीचि कोपें
सिवतलियाही परीसें । लोहत्वाचिये अवदसे ।
न मुकिजे आयसें । तैं कवणा बोलु ।
वोहळें हेंचि करावें । जे गंगेचें आंग ठाकावें ।
मगही गंगा जरी नोहावें । तैं तो काय करी ?
म्हणौनि भाग्ययोगें बहुवें । तुम्हां संतांचें मी पाये ।
पातलों आतां कें लाहे । उणें जगीं ।
अहो जी माझेनि स्वामी । मज संत जोडुनि तुम्हीं ।
दिधलेति तेणें सर्वकामीं । परीपूर्ण जालों
पाहा पां मातें तुम्हां सांगडें । माहेर तेणें सुरवाडें ।
ग्रंथाचें आळियाडें । सिद्धी गेलें
जी कनकाचें निखळ । वोतूं येईल भूमंडळ ।
चिंतारत्नीं कुळाचळ । निर्मूं येती
सातांही हो सागरांतें । सोपें भरितां अमृतें ।
दुवाड नोहे तारांतें । चंद्र करितां
कल्पतरूचे आराम । लावितां नाहीं विषम ।
परी गीतार्थाचें वर्म । निवडूं न ये
तो मी येकु सर्व मुका । बोलोनि मऱहाठिया भाखा ।
करी डोळेवरी लोकां । घेवों ये ऐसें जें
हा ग्रंथसागरु येव्हढा । उतरोनि पैलीकडा ।
कीर्तिविजयाचा धेंडा । नाचे जो कां
गीतार्थाचा आवारु । कलशेंसीं महामेरु ।
रचूनि माजीं श्रीगुरु\- । लिंग जें पूजीं
गीता निष्कपट माय । चुकोनि तान्हें हिंडे जें वाय ।
तें मायपूता भेटी होय । हा धर्म तुमचा
तुम्हां सज्जनांचें केलें । आकळुनी जी मी बोलें ।
ज्ञानदेव म्हणे थेंकुलें । तैसें नोहें
काय बहु बोलों सकळां । मेळविलों जन्मफळा ।
ग्रंथसिद्धीचा सोहळा । दाविला जो हा
मियां जैसजैसिया आशा । केला तुमचा भरंवसा ।
ते पुरवूनि जी बहुवसा । आणिलों सुखा
मजलागीं ग्रंथाची स्वामी । दुजीं सृष्टी जे हे केली तुम्ही ।
तें पाहोनि हांसों आम्हीं । विश्वामित्रातेंही
जे असोनि त्रिशंकुदोषें । धातयाही आणावें वोसें ।
तें नासतें कीजे कीं ऐसें । निर्मावें नाहीं
शंभू उपमन्युचेनि मोहें । क्षीरसागरूही केला आहे ।
येथ तोही उपमे सरी नोहे । जे विषगर्भ कीं
अंधकारु निशाचरां । गिळितां सूर्यें चराचरां ।
धांवा केला तरी खरा । ताउनी कीं तो
तातलियाही जगाकारणें । चंद्रें वेंचिलें चांदणें ।
तया सदोषा केवीं म्हणे । सारिखें हें
म्हणौनि तुम्हीं मज संतीं । ग्रंथरूप जो हा त्रिजगतीं ।
उपयोग केला तो पुढती । निरुपम जी
किंबहुना तुमचें केलें । धर्मकीर्तन हें सिद्धी नेलें ।
येथ माझें जी उरलें । पाईकपण
आतां विश्वात्मकें देवें । येणें वाग्यज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें
जे खळांची व्यंकटी सांडो । तयां सत्कर्मीं रती वाढो ।
भूतां परस्परें पडो । मैत्र जीवाचें
दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्यें पाहो ।
जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात
वर्षत सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां
चलां कल्पतरूंचे अरव । चेतना चिंतामणीचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे
चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखंडित
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकींयें ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी
तेथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो ।
येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया झाला
ऐसें युगीं परी कळीं । आणि महाराष्ट्रमंडळीं ।
श्रीगोदावरीच्या कूलीं । दक्षिणलिंगीं
त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र ।
जेथ जगाचें जीवनसूत्र । श्रीमहालया असे
तेथ यदुवंशविलासु । जो सकळकळानिवासु ।
न्यायातें पोषी क्षितीशु । श्रीरामचंद्रु
तेथ महेशान्वयसंभूतें । श्रीनिवृत्तिनाथसुतें ।
केलें ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणें
एवं भारताच्या गांवीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वीं ।
श्रीकृष्णार्जुनीं बरवी । गोठी जे केली
जें उपनिषदांचें सार । सर्व शास्त्रांचें माहेर ।
परमहंसीं सरोवर । सेविजे जें
तियें गीतेचा कलशु । संपूर्ण हा अष्टादशु ।
म्हणे निवृत्तिदासु । ज्ञानदेवो
पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती ।
सर्वसुखीं सर्वभूतीं । संपूर्ण होईजे
शके बाराशतें बारोत्तरें । तैं टीका केली ज्ञानेश्वरें ।
सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0