भाषा

ENहिગુ
ग्रंथ पाठ

ज्ञानेश्वरी · अध्याय 16

16.1

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ षोडशोशोऽध्यायः - अध्याय सोळावा । ।
। दैवासुरसंपत्तिविभागयोगः ।
मावळवीत विश्वाभासु । नवल उदयला चंडांशु ।
अद्वयाब्जिनीविकाशु । वंदूं आतां

16.2

जो अविद्याराती रुसोनियां । गिळी ज्ञानाज्ञानचांदणिया ।
जो सुदिनु करी ज्ञानियां । स्वबोधाचा

16.3

जेणें विवळतिये सवळे । लाहोनि आत्मज्ञानाचे डोळे ।
सांडिती देहाहंतेचीं अविसाळें । जीवपक्षी

16.4

लिंगदेहकमळाचा । पोटीं वेंचु तया चिद्भ्रमराचा ।
बंदिमोक्षु जयाचा । उदैला होय

16.5

शब्दाचिया आसकडीं । भेद नदीच्या दोहीं थडीं ।
आरडाते विरहवेडीं । बुद्धिबोधु

16.6

तया चक्रवाकांचें मिथुन । सामरस्याचें समाधान ।
भोगवी जो चिद्गगन । भुवनदिवा

16.7

जेणें पाहालिये पाहांटे । भेदाची चोरवेळ फिटे ।
रिघती आत्मानुभववाटे । पांथिक योगी

16.8

जयाचेनि विवेककिरणसंगें । उन्मेखसूर्यकांतु फुणगे ।
दीपले जाळिती दांगें । संसाराचीं

16.9

जयाचा रश्मिपुंजु निबरु । होता स्वरूप उखरीं स्थिरु ।
ये महासिद्धीचा पूरु । मृगजळ तें

16.10

जो प्रत्यग्बोधाचिया माथया । सोऽहंतेचा मध्यान्हीं आलिया ।
लपे आत्मभ्रांतिछाया । आपणपां तळीं

16.11

ते वेळीं विश्वस्वप्नासहितें । कोण अन्यथामती निद्रेतें ।
सांभाळी नुरेचि जेथें । मायाराती

16.12

म्हणौनि अद्वयबोधपाटणीं । तेथ महानंदाची दाटणी ।
मग सुखानुभूतीचीं घेणीं देणीं । मंदावो लागती

16.13

किंबहुना ऐसैसें । मुक्तकैवल्य सुदिवसें ।
सदा लाहिजे कां प्रकाशें । जयाचेनि

16.14

जो निजधामव्योमींचा रावो । उदैलाचि उदैजतखेंवो ।
फेडी पूर्वादि दिशांसि ठावो । उदोअस्तूचा

16.15

न दिसणें दिसणेंनसीं मावळवी । दोहीं झांकिलें ते सैंघ पालवी ।
काय बहु बोलों ते आघवी । उखाचि आनी

16.16

तो अहोरात्रांचा पैलकडु । कोणें देखावा ज्ञानमार्तंडु ।
जो प्रकाश्येंवीण सुरवाडु । प्रकाशाचा

16.17

तया चित्सूर्या श्रीनिवृत्ती । आतां नमों म्हणों पुढतपुढती ।
जे बाधका येइजतसे स्तुती । बोलाचिया

16.18

देवाचें महिमान पाहोनियां । स्तुति तरी येइजे चांगावया ।
जरी स्तव्यबुद्धीसीं लया । जाईजे कां

16.19

जो सर्वनेणिवां जाणिजे । मौनाचिया मिठीया वानिजे ।
कांहींच न होनि आणिजे । आपणपयां जो

16.20

तया तुझिया उद्देशासाठीं । पश्यंती मध्यमा पोटीं ।
सूनि परेसींही पाठीं । वैखरी विरे

16.21

तया तूतें मी सेवकपणें । लेववीं बोलकेया स्तोत्राचें लेणें ।
हें उपसाहावेंही म्हणतां उणें । अद्वयानंदा

16.22

परी रंकें अमृताचा सागरु । देखिलिया पडे उचिताचा विसरु ।
मग करूं धांवे पाहुणेरु । शाकांचा तया

16.23

तेथ शाकुही कीर बहुत म्हणावा । तयाचा हर्षवेगुचि तो घ्यावा ।
उजळोनि दिव्यतेजा हातिवा । ते भक्तीचि पाहावी

16.24

बाळा उचित जाणणें होये । तरी बाळपणचि कें आहे ? ।
परी साचचि येरी माये । म्हणौनि तोषे

16.25

हां गा गांवरसें भरलें । पाणी पाठीं पाय देत आलें ।
तें गंगा काय म्हणितलें । परतें सर ?

16.26

जी भृगूचा कैसा अपकारु । कीं तो मानूनि प्रियोपचारु ।
तोषेचिना शारङ्गधरु । गुरुत्वासीं ?

16.27

कीं आंधारें खतेलें अंबर । झालेया दिवसनाथासमोर ।
तेणें तयातें पऱहा सर । म्हणितलें काई ?

16.28

तेवीं भेदबुद्धीचिये तुळे । घालूनि सूर्यश्लेषाचें कांटाळे ।
तुकिलासि तें येकी वेळे । उपसाहिजो जी

16.29

जिहीं ध्यानाचा डोळां पाहिलासी । वेदादि वाचां वानिलासी ।
जें उपसाहिलें तयासी । तें आम्हांही करीं

16.30

परी मी आजि तुझ्या गुणीं । लांचावलों अपराधु न गणीं ।
भलतें करीं परी अर्धधणीं । नुठी कदा

16.31

मियां गीता येणें नांवें । तुझें पसायामृत सुहावें ।
वानूं लाधलों तें दुणेन थावें । दैवलों दैवें

16.32

माझिया सत्यवादाचें तप । वाचा केलें बहुत कल्प ।
तया फळाचें हें महाद्वीप । पातली प्रभु

16.33

पुण्यें पोशिलीं असाधरणें । तियें तुझें गुण वानणें ।
देऊनि मज उत्तीर्णें । जालीं आजी

16.34

जी जीवित्वाच्या आडवीं । आतुडलों होतों मरणगांवीं ।
ते अवदसाची आघवी । फेडिली आजी

16.35

जे गीता येणें नांवें नावाणिगी । जे अविद्या जिणोनि दाटुगी ।
ते कीर्ती तुझी आम्हांजोगी । वानावया जाली

16.36

पैं निर्धना घरीं वानिवसें । महालक्ष्मी येऊनि बैसे ।
तयातें निर्धन ऐसें । म्हणों ये काई ?

16.37

कां अंधकाराचिया ठाया । दैवें सुर्यु आलिया ।
तो अंधारुचि जगा यया । प्रकाशु नोहे ?

16.38

जया देवाची पाहतां थोरी । विश्व परमाणुही दशा न धरी ।
तो भावाचिये सरोभरी । नव्हेचि काई ?

16.39

तैसा मी गीता वाखाणी । हे खपुष्पाची तुरंबणी ।
परी समर्थें तुवां शिरयाणी । फेडिली ते

16.40

म्हणौनि तुझेनि प्रसादें । मी गीतापद्यें अगाधें ।
निरूपीन जी विशदें । ज्ञानदेवो म्हणे

16.41

तरी अध्यायीं पंधरावा । श्रीकृष्णें तया पांडवा ।
शास्त्रसिद्धांतु आघवा । उगाणिला

16.42

जे वृक्षरूपक परीभाषा । केलें उपाधि रूप अशेषा ।
सद्वैद्यें जैसें दोषा । अंगलीना

16.43

आणि कूटस्थु जो अक्षरु । दाविला पुरुषप्रकारु ।
तेणें उपहिताही आकारु । चैतन्या केला

16.44

पाठीं उत्तम पुरुष । शब्दाचें करूनि मिष ।
दाविलें चोख । आत्मतत्त्व

16.45

आत्मविषयीं आंतुवट । साधन जें आंगदट ।
ज्ञान हेंही स्पष्ट । चावळला

16.46

म्हणौनि इये अध्यायीं । निरूप्य नुरेचि कांहीं ।
आतां गुरुशिष्यां दोहीं । स्नेहो लाहणा

16.47

एवं इयेविषयीं कीर । जाणते बुझावले अपार ।
परी मुमुक्षु इतर । साकांक्ष जाले

16.48

त्या मज पुरुषोत्तमा । ज्ञानें भेटे जो सुवर्मा ।
तो सर्वज्ञु तोचि सीमा । भक्तीचीही

16.49

ऐसें हें त्रैलोक्यनायकें । बोलिलें अध्यायांत श्लोकें ।
तेथें ज्ञानचि बहुतेकें । वानिलें तोषें

16.50

भरूनि प्रपंचाचा घोंटु । कीजे देखतांचि देखतया द्रष्टु ।
आनंदसाम्राज्यीं पाटु । बांधिजे जीवा

16.51

येवढेया लाठेपणाचा उपावो । आनु नाहींचि म्हणे देवो ।
हा सम्यक्‌ज्ञानाचा रावो । उपायांमाजीं

16.52

ऐसे आत्मजिज्ञासु जे होते । तिहीं तोषलेनि चित्तें ।
आदरें तया ज्ञानातें । वोंवाळिलें जीवें

16.53

आतां आवडी जेथ पडे । तयाचि अवसरीं पुढें पुढें ।
रिगों लागें हें घडे । प्रेम ऐसें

16.54

म्हणौनि जिज्ञासूंच्या पैकीं । ज्ञानी प्रतीती होय ना जंव निकी ।
तंव योग क्षेमु ज्ञानविखीं । स्फुरेलचि कीं

16.55

म्हणौनि तेंचि सम्यक् ज्ञान । कैसेनि होय स्वाधीन ।
जालिया वृद्धियत्‌न । घडेल केवीं

16.56

कां उपजोंचि जें न लाहे । जें उपजलेंही अव्हांटा सूये ।
तें ज्ञानीं विरुद्ध काय आहे । हें जाणावें कीं

16.57

मग जाणतयां जें विरू । तयाचीं वाट वाहती करूं ।
ज्ञाना हित तेंचि विचारूं । सर्वभावें

16.58

ऐसा ज्ञानजिज्ञासु तुम्हीं समस्तीं । भावो जो धरिला असे चित्तीं ।
तो पुरवावया लक्ष्मीपती । बोलिजेल

16.59

ज्ञानासि सुजन्म जोडे । आपली विश्रांतिही वरी वाढे ।
ते संपत्तीचे पवाडे । सांगिजेल दैवी

16.60

आणि ज्ञानाचेनि कामाकारें । जे रागद्वेषांसि दे थारे ।
तिये आसुरियेहि घोरे । करील रूप

16.61

सहज इष्टानिष्टकरणी । दोघीचि इया कवतुकिणी ।
हे नवमाध्यायीं उभारणी । केली होती

16.62

तेथ साउमा घेयावया उवावो । तंव वोडवला आन प्रस्तावो ।
तरी तयां प्रसंगें आतां देवो । निरूपीत असे

16.63

तया निरूपणाचेनि नांवें । अध्याय पद सोळावें ।
लावणी पाहतां जाणावें । मागिलावरी

16.64

परी हें असो आतां प्रस्तुतीं । ज्ञानाच्या हिताहितीं ।
समर्था संपत्ती । इयाचि दोन्ही

16.65

जे मुमुक्षुमार्गींची बोळावी । जे मोहरात्रीची धर्मदिवी ।
ते आधीं तंव दैवी । संपत्ती ऐका

16.66

जेथ एक एकातें पोखी । ऐसे बहुत पदार्थ येकीं ।
संपादिजती ते लोकीं । संपत्ति म्हणिजे

16.67

ते दैवी सुखसंभवी । तेथ दैवगुणें येकोपजीवीं ।
जाली म्हणौनि दैवी । संपत्ति हे

16.68

आतां तयाचि दैवगुणां- । माजीं धुरेचा बैसणा ।
बैसे तया आकर्णा । अभय ऐसें

16.69

तरी न घालूनि महापुरीं । न घेपे बुडणयाची शियारी ।
कां रोगु न गणिजे घरीं । पथ्याचिया

16.70

तैसा कर्माकर्माचिया मोहरा । उठूं नेदूनि अहंकारा ।
संसाराचा दरारा । सांडणें येणें

16.71

अथवा ऐक्यभावाचेनि पैसें । दुजे मानूनि आत्मा ऐसें ।
भयवार्ता देशें । दवडणें जें

16.72

पाणी बुड ये मिठातें । तंव मीठचि पाणी आतें ।
तेवीं आपण जालेनि अद्वैतें । नाशे भय

16.73

अगा अभय येणें नांवें । बोलिजे तें हें जाणावें ।
सम्यक्‌ज्ञानाचें आघवें । धांवणें हें

16.74

आतां सत्त्वशुद्धी जे म्हणिजे । ते ऐशा चिन्हीं जाणिजे ।
तरी जळे ना विझे । राखोंडी जैसी

16.75

कां पाडिवा वाढी न मगे । अंवसे तुटी सांडूनि मागे ।
माजीं अतिसूक्ष्म अंगें । चंद्रु जैसा राहे

16.76

नातरी वार्षिया नाहीं मांडिली । ग्रीष्में नाहीं सांडिली ।
माजीं निजरूपें निवडली । गंगा जैसी

16.77

तैसी संकल्पविकल्पाची वोढी । सांडूनि रजतमाची कावडी ।
भोगितां निजधर्माची आवडी । बुद्धि उरे

16.78

इंद्रियवर्गीं दाखविलिया । विरुद्धा अथवा भलीया ।
विस्मयो कांहीं केलिया । नुठी चित्तीं

16.79

गांवा गेलिया वल्लभु । पतिव्रतेचा विरहक्षोभु ।
भलतेसणी हानिलाभु । न मनीं जेवीं

16.80

तेवीं सत्स्वरूप रुचलेपणें । बुद्धी जें ऐसें अनन्य होणें ।
ते सत्त्वशुद्धी म्हणे । केशिहंता

16.81

आतां आत्मलाभाविखीं । ज्ञानयोगामाजीं एकीं ।
जे आपुलिया ठाकी । हांवें भरे

16.82

तेथ सगळिये चित्तवृत्ती । त्यागु करणें या रीती ।
निष्कामें पूर्णाहुती । हुताशीं जैसी

16.83

कां सुकुळीनें आपुली । आत्मजा सत्कुळींचि दिधली ।
हें असो लक्ष्मी स्थिरावली । मुकुंदीं जैसी

16.84

तैसे निर्विकल्पपणें । जें योगज्ञानींच या वृत्तिक होणें ।
तो तिजा गुण म्हणे । श्रीकृष्णनाथु

16.85

आतां देहवाचाचित्तें । यथासंपन्नें वित्तें ।
वैरी जालियाही आर्तातें । न वंचणे जें कां

16.86

पत्र पुष्प छाया । फळें मूळ धनंजया ।
वाटेचा न चुके आलिया । वृक्षु जैसा

16.87

तैसें मनौनि धनधान्यवरी । विद्यमानें आल्या अवसरीं ।
श्रांताचिये मनोहारीं । उपयोगा जाणें

16.88

तयां नांव जाण दान । जें मोक्षनिधानाचें अंजन ।
हें असो आइक चिन्ह । दमाचें तें

16.89

तरी विषयेंद्रियां मिळणी । करूनि घापे वितुटणी ।
जैसें तोडिजे खड्गपाणी । पारकेया

16.90

तैसा विषयजातांचा वारा । वाजों नेदिजे इंद्रियद्वारां ।
इये बांधोनि प्रत्याहारा । हातीं वोपी

16.91

आंतुला चित्ताचें अंगवरीं । प्रवृत्ति पळे पर बाहेरी ।
आगी सुयिजे दाहींहि द्वारीं । वैराग्याची

16.92

श्वासोश्वासाहुनी बहुवसें । व्रतें आचरे खरपुसें ।
वोसंतिता रात्रिदिवसें । नाराणुक जया

16.93

पैं दमु ऐसा म्हणिपे । तो हा जाण स्वरूपें ।
यागार्थुही संक्षेपें । सांगों ऐक

16.94

तरी ब्राह्मण करूनि धुरे । स्त्रियादिक पैल मेरे ।
माझारीं अधिकारें । आपुलालेनि

16.95

जया जे सर्वोत्तम । भजनीय देवताधर्म ।
ते तेणें यथागम । विधी यजिजे

16.96

जैसा द्विज षट्कर्में करी । शूद्र तयातें नमस्कारी ।
कीं दोहींसही सरोभरी । निपजे यागु

16.97

तैसें अधिकारपर्यालोचें । हें यज्ञ करणें सर्वांचें ।
परी विषय विष फळाशेचें । न घापे माजीं

16.98

आणि मी कर्ता ऐसा भावो । नेदिजे देहाचेनि द्वारें जावों ।
ना वेदाज्ञेसि तरी ठावो । होइजे स्वयें

16.99

अर्जुना एवं यज्ञु । सर्वत्र जाण साज्ञु ।
कैवल्यमार्गींचा अभिज्ञु । सांगाती हा

16.100

आतां चेंडुवें भूमी हाणिजे । नव्हे तो हाता आणिजे ।
कीं शेतीं बीं विखुरिजे । परी पिकीं लक्ष

16.101

नातरी ठेविलें देखावया । आदर कीजे दिविया ।
कां शाखा फळें यावया । सिंपिजे मूळ

16.102

हें बहु असो आरिसा । आपणपें देखावया जैसा ।
पुढतपुढती बहुवसा । उटिजे प्रीती

16.103

तैसा वेदप्रतिपाद्यु जो ईश्वरु । तो होआवयालागीं गोचरु ।
श्रुतीचा निरंतरु । अभ्यासु करणें

16.104

तेंचि द्विजांसीच ब्रह्मसूत्र । येरा स्तोत्र कां नाममंत्र ।
आवर्तवणें पवित्र । पावावया तत्त्व

16.105

पार्था गा स्वाध्यावो । बोलिजे तो हा म्हणे देवो ।
आतां तप शब्दाभिप्रावो । आईक सांगों

16.106

तरी दानें सर्वस्व देणें । वेंचणें तें व्यर्थ करणें ।
जैसे फळोनि स्वयें सुकणें । इंद्रावणी जेवीं

16.107

नाना धूपाचा अग्निप्रवेशु । कनकीं तुकाचा नाशु ।
पितृपक्षु पोषिता ऱहासु । चंद्राचा जैसा

16.108

तैसा स्वरूपाचिया प्रसरा -। लागीं प्राणेंद्रियशरीरां ।
आटणी करणें जें वीरा । तेंचि तप

16.109

अथवा अनारिसें । तपाचें रूप जरी असे ।
तरी जाण जेवीं दुधीं हंसें । सूदली चांचू

16.110

तैसें देहजीवाचिये मिळणीं । जो उदयजत सूये पाणी ।
तो विवेक अंतःकरणीं । जागवीजे

16.111

पाहतां आत्मयाकडे । बुद्धीचा पैसु सांकडें ।
सनिद्र स्वप्न बुडे । जागणीं जैसें

16.112

तैसा आत्मपर्यालोचु । प्रवर्ते जो साचु ।
तपाचा हा निर्वेचु । धनुर्धरा

16.113

आतां बाळाच्या हितीं स्तन्य । जैसें नानाभूतीं चैतन्य ।
तैसें प्राणिमात्रीं सौजन्य । आर्जव तें

16.114

आणि जगाचिया सुखोद्देशें । शरीरवाचामानसें ।
राहाटणें तें अहिंसे । रूप जाण

16.115

आतां तीख होऊनि मवाळ । जैसें जातीचें मुकुळ ।
कां तेज परी शीतळ । शशांकाचें

16.116

शके दावितांचि रोग फेडूं । आणि जिभे तरी नव्हे कडु ।
ते वोखदु नाहीं मा घडू । उपमा कैंची

16.117

तरी मऊपणें बुबुळे । झगडतांही परी नाडळे ।
एऱहवीं फोडी कोंराळें । पाणी जैसें

16.118

तैसें तोडावया संदेह । तीख जैसें कां लोह ।
श्राव्यत्वें तरी माधुर्य । पायीं घालीं

16.119

ऐकों ठातां कौतुकें । कानातें निघती मुखें ।
जें साचारिवेचेनि बिकें । ब्रह्मही भेदी

16.120

किंबहुना प्रियपणे । कोणातेंही झक नेणे ।
यथार्थ तरी खुपणें । नाहीं कवणा

16.121

एऱहवीं गोरी कीर काना गोड । परी साचाचा पाखाळीं कीड ।
आगीचें करणें उघड । परी जळों तें साच

16.122

कानीं लागतां महूर । अर्थें विभांडी जिव्हार ।
तें वाचा नव्हे सुंदर । लांवचि पां

16.123

परी अहितीं कोपोनि सोप । लालनीं मऊ जैसें पुष्प ।
तिये मातेचें स्वरूप । जैसें कां होय

16.124

तैसें श्रवणसुख चतुर । परीणमोनि साचार ।
बोलणें जें अविकार । तें सत्य येथें

16.125

आतां घालितांही पाणी । पाषाणीं न निघे आणी ।
कां मथिलिया लोणी । कांजी नेदी

16.126

त्वचा पायें शिरीं । हालेयाही फडे न करी ।
वसंतींही अंबरीं । न होती फुलें

16.127

नाना रंभेचेनिही रूपें । शुकीं नुठिजेचि कंदर्पें ।
कां भस्मीं वन्हि न उद्दीपे । घृतेंही जेवीं

16.128

तेवींचि कुमारु क्रोधें भरे । तैसिया मंत्राचीं बीजाक्षरें ।
तियें निमित्तेंही अपारें । मीनलिया

16.129

परी धातयाही पायां पडतां । नुठी गतायु पंडुसुता ।
तैसी नुपजे उपजवितां । क्रोधोर्मी गा

16.130

अक्रोधत्व ऐसें । नांव तें ये दशे ।
जाण ऐसें श्रीनिवासें । म्हणितलें तया

16.131

आतां मृत्तिकात्यागें घटु । तंतुत्यागें पटु ।
त्यजिजे जेवीं वटु । बीजत्यागें

16.132

कां त्यजुनि भिंतिमात्र । त्यजिजे आघवेंचि चित्र ।
कां निद्रात्यागें विचित्र । स्वप्नजाळ

16.133

नाना जळत्यागें तरंग । वर्षात्यागें मेघ ।
त्यजिजती जैसे भोग । धनत्यागें

16.134

तेवीं बुद्धिमंतीं देहीं । अहंता सांडूनि पाहीं ।
सांडिजे अशेषही । संसारजात

16.135

तया नांव त्यागु । म्हणे तो यज्ञांगु ।
हे मानूनि सुभगु । पार्थु पुसे

16.136

आतां शांतीचें लिंग । तें व्यक्त मज सांग ।
देवो म्हणती चांग । अवधान देईं

16.137

तरी गिळोनि ज्ञेयातें । ज्ञाता ज्ञानही माघौतें ।
हारपें निरुतें । ते शांति पैं गा

16.138

जैसा प्रळयांबूचा उभडु । बुडवूनि विश्वाचा पवाडु ।
होय आपणपें निबिडु । आपणचि

16.139

मग उगम ओघ सिंधु । हा नुरेचि व्यवहारभेदु ।
परी जलैक्याचा बोधु । तोही कवणा ?

16.140

तैसी ज्ञेया देतां मिठी । ज्ञातृत्वही पडे पोटीं ।
मग उरे तेंचि किरीटी । शांतीचें रूप

16.141

आतां कदर्थवीत व्याधी । बळीकरणाचिया आधीं ।
आपपरु न शोधी । सद्वैद्यु जैसा

16.142

का चिखलीं रुतली गाये । धडभाकड न पाहे ।
जो तियेचिया ग्लानी होये । कालाभुला

16.143

नाना बुडतयातें सकरुणु । न पुसे अंत्यजु कां ब्राह्मणु ।
काढूनि राखे प्राणु । हेंचि जाणे

16.144

कीं माय वनीं पापियें । उघडी केली विपायें ।
ते नेसविल्यावीण न पाहे । शिष्टु जैसा

16.145

तैसे अज्ञानप्रमादादिकीं । कां प्राक्तनहीन सदोखीं ।
निंदत्वाच्या सर्वविखीं । खिळिले जे

16.146

तयां आंगीक आपुलें । देऊनियां भलें ।
विसरविजती सलें । सलतीं तियें

16.147

अगा पुढिलाचा दोखु । करूनि आपुलिये दिठी चोखु ।
मग घापे अवलोकु । तयावरी

16.148

जैसा पुजूनि देवो पाहिजे । पेरूनि शेता जाइजे ।
तोषौनि प्रसादु घेइजे । अतिथीचा

16.149

तैसें आपुलेनि गुणें । पुढिलाचें उणें ।
फेडुनियां पाहणें । तयाकडे

16.150

वांचूनि न विंधिजें वर्मीं । नातुडविजे अकर्मीं ।
न बोलविजे नामीं । सदोषीं तिहीं

16.151

वरी कोणे एकें उपायें । पडिलें तें उभें होये ।
तेंच कीजे परी घाये । नेदावे वर्मीं

16.152

पैं उत्तमाचियासाठीं । नीच मानिजे किरीटी ।
हें वांचोनि दिठी । दोषु न घेपे

16.153

अगा अपैशून्याचें लक्षण । अर्जुना हें फुडें जाण ।
मोक्षमार्गींचें सुखासन । मुख्य हें गा

16.154

आतां दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी ।
निववितां न कडसी । सानें थोर

16.155

तैसें दुःखिताचें शिणणें । हिरतां सकणवपणें ।
उत्तमाधम नेणें । विवंचूं गा

16.156

पैं जगीं जीवनासारिखें । वस्तु अंगवरी उपखें ।
परी जातें जीवित राखे । तृणाचेंहि

16.157

तैसें पुढिलाचेनि तापें । कळवळलिये कृपें ।
सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें । थोडेंचि गमे

16.158

निम्न भरलियाविणें । पाणी ढळोंचि नेणे ।
तेवीं श्रांता तोषौनि जाणें । सामोरें पां

16.159

पैं पायीं कांटा नेहटे । तंव व्यथा जीवीं उमटे ।
तैसा पोळे संकटें । पुढिलांचेनि

16.160

कां पावो शीतळता लाहे । कीं ते डोळ्याचिलागीं होये ।
तैसा परसुखें जाये । सुखावतु

16.161

किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं ।
तैसें दुःखितांचे सेलभागीं । जिणें जयाचें

16.162

तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया ।
मी उदयजतांचि तया । ऋणिया लाभें

16.163

आतां सूर्यासि जीवें । अनुसरलिया राजीवें ।
परी तें तो न शिवे । सौरभ्य जैसें

16.164

कां वसंताचिया वाहाणीं । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी ।
ते न करीतुचि घेणी । निगाला तो

16.165

हें असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशीं ।
परी महाविष्णु जैसी । न गणीच ते

16.166

तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे । भोग पाईक जालिया इच्छेचे ।
परी भोगावे हें न रुचे । मनामाजीं

16.167

बहुवें काय कौतुकीं । जीव नोहे विषयाभिलाखी ।
अलोलुप्‌त्वदशा ठाउकी । जाण ते हे

16.168

आतां माशियां जैसें मोहळ । जळचरां जेवीं जळ ।
कां पक्षियां अंतराळ । मोकळें हें

16.169

नातरी बाळकोद्देशें । मातेचें स्नेह जैसें ।
कां वसंतीच्या स्पर्शें । मऊ मलयानिळु

16.170

डोळ्यां प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी ।
तैसीं भूतमात्रीं राहटी । मवाळ ते

16.171

स्पर्शें अतिमृदु । मुखीं घेतां सुस्वादु ।
घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगें

16.172

तो आवडे तेवढा घेतां । विरुद्ध जरी न होतां ।
तरी उपमे येता । कापूर कीं

16.173

परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं सामाये ।
या विश्वानुसार होये । गगन जैसें

16.174

काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें ।
तया नांव म्हणें । मार्दव मी

16.175

आतां पराजयें राजा । जैसा कदर्थिजे लाजा ।
कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव

16.176

नाना चांडाळ मंदिराशीं । अवचटें आलिया संन्याशी ।
मग लाज होय जैसी । उत्तमा तया

16.177

क्षत्रिया रणीं पळोनि जाणें । तें कोण साहे लाजिरवाणें ।
कां वैधव्यें पाचारणें । महासतियेतें

16.178

रूपसा उदयलें कुष्ट । संभावितां कुटीचें बोट ।
तया लाजा प्राणसंकट । होय जैसें

16.179

तैसें औटहातपणें । जें शव होऊनि जिणें ।
उपजों उपजों मरणें । नावानावा

16.180

तियें गर्भमेदमुसें । रक्तमूत्ररसें ।
वोंतीव होऊनि असे । तें लाजिरवाणें

16.181

हें बहु असो देहपणें । नामरूपासि येणें ।
नाहीं गा लाजिरवाणें । तयाहूनी

16.182

ऐसैसिया अवकळा । घेपे शरीराचा कंटाळा ।
ते लाज पैं निर्मळा । निसुगा गोड

16.183

आतां सूत्रतंतु तुटलिया । चेष्टाचि ठाके सायखडिया ।
तैसें प्राणजयें कर्मेंद्रियां । खुंटे गती

16.184

कीं मावळलिया दिनकरु । सरे किरणांचा प्रसरु ।
तैसा मनोजयें प्रकारु । ज्ञानेंद्रियांचा

16.185

एवं मनपवननियमें । होती दाही इंद्रियें अक्षमें ।
तें अचापल्य वर्में । येणें होय

16.186

आतां ईश्वरप्राप्तीलागीं । प्रवर्ततां ज्ञानमार्गीं ।
धिंवसेयाचि आंगी । उणीव नोहे

16.187

वोखटें मरणासें । तेंही आलें अग्निप्रवेशें ।
परी प्राणेश्वरोद्देशें । न गणीचि सती

16.188

तैसें आत्मनाथाचिया आधी । लाऊनि विषयविषाची बाधी ।
धांवों आवडे पाणधी । शून्याचिये

16.189

न ठाके निषेधु आड । न पडे विधीची भीड ।
नुपजेचि जीवीं कोड । महासिद्धीचें

16.190

ऐसें ईश्वराकडे निज । धांवे आपसया सहज ।
तया नांव तेज । आध्यात्मिक तें

16.191

आतां सर्वही साहातिया गरिमा । गर्वा न ये तेचि क्षमा ।
जैसें देह वाहोनि रोमा । वाहणें नेणें

16.192

आणि मातलिया इंद्रियांचे वेग । कां प्राचीनें खवळले रोग ।
अथवा योगवियोग । प्रियाप्रियांचे

16.193

यया आघवियांचाचि थोरु । एके वेळे आलिया पूरु ।
तरी अगस्त्य कां होऊनि धीरु । उभा ठाके

16.194

आकाशीं धूमाची रेखा । उठिली बहुवा आगळिका ।
ते गिळी येकी झुळुका । वारा जेवीं

16.195

तैसें अधिभूताधिदैवां । अध्यात्मादि उपद्रवां ।
पातलेयां पांडवा । गिळुनि घाली

16.196

ऐसें चित्तक्षोभाच्या अवसरीं । उचलूनि धैर्या जें चांगावें करी ।
धृति म्हणिपे अवधारीं । तियेतें गा

16.197

आतां निर्वाळूनि कनकें । भरिला गांगें पीयूखें ।
तया कलशाचियासारिखें । शौच असें

16.198

जे आंगीं निष्काम आचारु । जीवीं विवेकु साचारु ।
तो सबाह्य घडला आकारु । शुचित्वाचाचि

16.199

कां फेडित पाप ताप । पोखीत तीरींचे पादप ।
समुद्रा जाय आप । गंगेचें जैसें

16.200

कां जगाचें आंध्य फेडितु । श्रियेचीं राउळें उघडितु ।
निघे जैसा भास्वतु । प्रदक्षिणे

16.201

तैसीं बांधिलीं सोडिता । बुडालीं काढिता ।
सांकडी फेडिता । आर्तांचिया

16.202

किंबहुना दिवसराती । पुढिलांचें सुख उन्नति ।
आणित आणित स्वार्थीं । प्रवेशिजे

16.203

वांचूनि आपुलिया काजालागीं । प्राणिजाताच्या अहितभागीं ।
संकल्पाचीही आडवंगी । न करणें जें

16.204

पैं अद्रोहत्व ऐशिया गोष्टी । ऐकसी जिया किरीटी ।
तें सांगितलें हें दिठी । पाहों ये तैसें

16.205

आणि गंगा शंभूचा माथां । पावोनि संकोचे जेवीं पार्था ।
तेवीं मान्यपणें सर्वथा । लाजणें जें

16.206

तें हें पुढत पुढती । अमानित्व जाण सुमती ।
मागां सांगितलेंसे किती । तेंचि तें बोलों

16.207

एवं इहीं सव्विसें । ब्रह्मसंपदा हे वसत असे ।
मोक्षचक्रवर्तीचें जैसें । अग्रहार होय

16.208

नाना हे संपत्ति दैवी । या गुणतीर्थांची नीच नवी ।
निर्विण्णसगरांची दैवी । गंगाचि आली

16.209

कीं गणकुसुमांची माळा । हे घेऊनि मुक्तिबाळा ।
वैराग्यनिरपेक्षाचा गळा । गिंवसीत असे

16.210

कीं सव्विसें गुणज्योती । इहीं उजळूनि आरती ।
गीता आत्मया निजपती । नीरांजना आली

16.211

उगळितें निर्मळें । गुण इयेंचि मुक्ताफळें ।
दैवी शुक्तिकळें । गीतार्णवींची

16.212

काय बहु वानूं ऐसी । अभिव्यक्ती ये अपैसी ।
केलें दैवी गुणराशी । संपत्तिरूप

16.213

आतां दुःखाची आंतुवट वेली । दोषकाट्यांची जरी भरली ।
तरी निजाभिधानी घाली । आसुरी ते

16.214

पैं त्याज्य त्यजावयालागीं । जाणावी जरी अनुपयोगी ।
तरी ऐका ते चांगी । श्रोत्रशक्ती

16.215

तरी नरकव्यथा थोरी । आणावया दोषींघोरीं ।
मेळु केला ते आसुरी । संपत्ति हे

16.216

नाना विषवर्गु एकवटु । तया नांव जैसा बासटु ।
आसुरी संपत्ती हा खोटु । दोषांचा तैसा

16.217

तरी तयाचि असुरां । दोषांमाजीं जया वीरा ।
वाडपणाचा डांगोरा । तो दंभु ऐसा

16.218

जैसी आपुली जननी । नग्न दाविलिया जनीं ।
ते तीर्थचि परी पतनीं । कारण होय

16.219

कां विद्या गुरूपदिष्टा । बोभाइलिया चोहटां ।
तरी इष्टदा परी अनिष्टा । हेतु होती

16.220

पैं आंगें बुडतां महापूरीं । जे वेगें काढी पैलतीरीं ।
ते नांवचि बांधिलिया शिरीं । बुडवी जैसी

16.221

कारण जें जीविता । तें वानिलें जरी सेवितां ।
तरी अन्नचि पंडुसुता । होय विष

16.222

तैसा दृष्टादृष्टाचा सखा । धर्मु जाला तो फोकारिजे देखा ।
तरी तारिता तोचि दोखा- । लागीं होय

16.223

म्हणौनि वाचेचा चौबारा । घातलिया धर्माचा पसारा ।
धर्मुचि तो अधर्मु होय वीरा । तो दंभु जाणे

16.224

आतां मूर्खाचिये जिभे । अक्षरांचा आंबुखा सुभे ।
आणि तो ब्रह्मसभे । न रिझे जैसा

16.225

कां मादुरी लोकांचा घोडा । गजपतिही मानी थोडा ।
कां कांटियेवरिल्या सरडा । स्वर्गुही नीच

16.226

तृणाचेनि इंधनें । आगी धांवे गगनें ।
थिल्लरबळें मीनें । न गणिजे सिंधु

16.227

तैसा माजे स्त्रिया धनें । विद्या स्तुती बहुतें मानें ।
एके दिवसींचेनि परान्नें । अल्पकु जैसा

16.228

अभ्रच्छायेचिया जोडी । निदैवु घर मोडी ।
मृगांबु देखोनि फोडी । पणियाडें मूर्ख

16.229

किंबहुना ऐसैसें । उतणें जें संपत्तिमिसें ।
तो दर्पु गा अनारिसें । न बोलें घेईं

16.230

आणि जगा वेदीं विश्वासु । आणि विश्वासीं पूज्य ईशु ।
जगीं एक तेजसु । सूर्युचि हा

16.231

जगस्पृहे आस्पद । एक सार्वभौमपद ।
न मरणें निर्विवाद । जगा पढियें

16.232

म्हणौनि जग उत्साहें । यातें वानूं जाये ।
कीं तें आइकोनि मत्सरु वाहे । फुगों लागे

16.233

म्हणे ईश्वरातें खायें । तया वेदा विष सूयें ।
गौरवामाजीं त्राये । भंगीत असे

16.234

पतंगा नावडे ज्योती । खद्योता भानूची खंती ।
टिटिभेनें आपांपती । वैरी केला

16.235

तैसा अभिमानाचेनि मोहें । ईश्वराचेंही नाम न साहे ।
बापातें म्हणे मज हे । सवती जाली

16.236

ऐसा मान्यतेचा पुष्टगंडु । तो अभिमानी परमलंडु ।
रौरवाचा रूढु । मार्गुचि पै

16.237

आणि पुढिलांचें सुख । देखणियाचें होय मिख ।
चढे क्रोधाग्नीचें विख । मनोवृत्ती

16.238

शीतळाचिये भेटी । तातला तेलीं आगी उठी ।
चंद्रु देखोनि जळे पोटीं । कोल्हा जैसा

16.239

विश्वाचें आयुष्य जेणें उजळे । तो सूर्यु उदैला देखोनि सवळे ।
पापिया फुटती डोळे । डुडुळाचे

16.240

जगाची सुखपहांट । चोरां मरणाहूनि निकृष्ट ।
दुधाचें काळकूट । होय व्याळीं

16.241

अगाधें समुद्रजळें । प्राशितां अधिक जळे ।
वडवाग्नी न मिळे । शांति कहीं

16.242

तैसा विद्याविनोदविभवें । देखे पुढिलांचीं दैवें ।
तंव तंव रोषु दुणावे । क्रोधु तो जाण

16.243

आणि मन सर्पाची कुटी । डोळे नाराचांची सुटी ।
बोलणें ते वृष्टी । इंगळांची

16.244

येर जें क्रियाजात । तें तिखयाचें कर्वत ।
ऐसें सबाह्य खसासित । जयाचें गा

16.245

तो मनुष्यांत अधमु जाण । पारुष्याचें अवतरण ।
आतां आइक खूण । अज्ञानाची

16.246

तरी शीतोष्णस्पर्शा । निवाडु नेणें पाषाणु जैसा ।
कां रात्री आणि दिवसा । जात्यंधु तो

16.247

आगी उठिला आरोगणें । जैसा खाद्याखाद्य न म्हणे ।
कां परिसा पाडु नेणें । सोनया लोहा

16.248

नातरी नानारसीं । रिघोनि दर्वी जैसी ।
परी रसस्वादासी । चाखों नेणें

16.249

कां वारा जैसा पारखी । नव्हेचि गा मार्गामार्गविखीं ।
तैसे कृत्याकृत्यविवेकीं । अंधपण जें

16.250

हें चोख हें मैळ । ऐसें नेणोनियां बाळ ।
देखे तें केवळ । मुखींचि घाली

16.251

तैसें पापपुण्याचें खिचटें । करोनि खातां बुद्धिचेष्टे ।
कडु मधुर न वाटे । ऐसी जे दशा

16.252

तिये नाम अज्ञान । या बोला नाहीं आन ।
एवं साही दोषांचें चिन्ह । सांगितलें

16.253

इहींच साही दोषांगीं । हे आसुरी संपत्ति दाटुगी ।
जैसें थोर विषय सुभगे अंगीं । अंग सानें

16.254

कां तिघा वन्हींच्या पांती । पाहतां थोडे ठाय गमती ।
परी विश्वही प्राणाहुती । करूं न पुरे

16.255

धातयाही गेलिया शरण । त्रिदोषीं न चुके मरण ।
तया तिहींची दुणी जाण । साही दोष हे

16.256

इहीं साही दोषीं संपूर्णीं । जाली इयेचि उभारणी ।
म्हणौनि आसुरी उणी । संपदा नव्हे

16.257

परी क्रूरग्रहांची जैसी । मांदी मिळे एकेचि राशी ।
कां येती निंदकापासीं । अशेष पापें

16.258

मरणाराचें आंग । पडिघाती अवघेचि रोग ।
कां कुमुहूर्तीं दुर्योग । एकवटती

16.259

विश्वासला आतुडवीजे चोरा । शिणला सुइजे महापुरा ।
तैसें दोषीं इहीं नरा । अनिष्ट कीजे

16.260

कां आयुष्य जातिये वेळे । शेळिये सातवेउळी मिळे ।
तैसे साही दोष सगळे । जोडती तया

16.261

मोक्षमार्गाकडे । जैं यांचा आंबुखा पडे ।
तैं न निघे म्हणौनि बुडे । संसारीं तो

16.262

अधमां योनींच्या पाउटीं । उतरत जो किरीटी ।
स्थावरांही तळवटीं । बैसणें घे

16.263

हें असो तयाच्या ठायीं । मिळोनि साही दोषीं इहीं ।
आसुरी संपत्ति पाहीं । वाढविजे

16.264

ऐसिया या दोनी । संपदा प्रसिद्धा जनीं ।
सांगितलिया चिन्हीं । वेगळाल्या

16.265

इया दोन्हींमाजीं पहिली । दैवी जे म्हणितली ।
ते मोक्षसूर्यें पाहली । उखाचि जाण

16.266

येरी जे दुसरी । संपत्ति कां आसुरी ।
ते मोहलोहाची खरी । सांखळी जीवां

16.267

परी हें आइकोनि झणें । भय घेसी हो मनें ।
काय रात्रीचा दिनें । धाकु धरिजे

16.268

हे आसुरी संपत्ति तया । बंधालागीं धनंजया ।
जो साही दोषां ययां । आश्रयो होय

16.269

तूं तंव पांडवा । सांगितलेया दैवा ।
गुणनिधी बरवा । जन्मलासी

16.270

म्हणौनि पार्था तूं या । दैवी संपत्ती स्वामिया ।
होऊनि यावें उवाया । कैवल्याचिया

16.271

आणि दैवां आसुरां । संपत्तिवंतां नरां ।
अनादिसिद्ध उजगरा । राहाटीचा आहे

16.272

जैसें रात्रीच्या अवसरीं । व्यापारिजे निशाचरीं ।
दिवसा सुव्यवहारीं । मनुष्यादिकीं

16.273

तैसिया आपुलालिया राहाटीं । वर्तती दोन्ही सृष्टी ।
दैवी आणि किरीटी । आसुरी येथ

16.274

तेवींचि विस्तारूनि दैवी । ज्ञानकथनादि प्रस्तावीं ।
मागील ग्रंथीं बरवी । सांगितली

16.275

आतां आसुरी जे सृष्टी । तेथिंची उपलऊं गोठी ।
अवधानाची दिठी । दे पां निकी

16.276

तरी वाद्येंवीण नादु । नेदी कवणाही सादु ।
कां अपुष्पीं मकरंदु । न लभे जैसा

16.277

तैसी प्रकृति हे आसुर । एकली नोहे गोचर ।
जंव एकाधें शरीर । माल्हातीना

16.278

मग आविष्कारला लांकुडें । पावकु जैसा जोडे ।
तैसी प्राणिदेहीं सांपडे । आटोपली हे

16.279

ते वेळीं जे वाढी ऊंसा । तेचि आंतुला रसा ।
देहाकारु होय तैसा । प्राणियांचा

16.280

आतां तयाचि प्राणियां । रूप करूं धनंजया ।
घडले जे आसुरीया । दोषवृंदीं

16.281

तरी पुण्यालागीं प्रवृत्ती । कां पापाविषयीं निवृत्ती ।
या जाणणेयाची राती । तयांचें मन

16.282

निगणेया आणि प्रवेशा । चित्त नेदीतु आवेशा ।
कोशकिटु जैसा । जाचिन्नला पैं

16.283

कां दिधलें मागुती येईल । कीं न ये हें पुढील ।
न पाहातां दे भांडवल । मूर्ख चोरां

16.284

तैसिया प्रवृत्ति निवृत्ति दोनी । नेणिजती आसुरीं जनीं ।
आणि शौच ते स्वप्नीं । देखती ना ते

16.285

काळिमा सांडील कोळसा । वरी चोखी होईल वायसा ।
राक्षसही मांसा । विटों शके

16.286

परी आसुरां प्राणियां । शौच नाहीं धनंजया ।
पवित्रत्व जेवीं भांडिया । मद्याचिया

16.287

वाढविती विधीची आस । कां पाहाती वडिलांची वास ।
आचाराची भाष । नेणतीचि ते

16.288

जैसें चरणें शेळियेचें । कां धावणें वारियाचें ।
जाळणें आगीचें । भलतेउतें

16.289

तैसें पुढां सूनि स्वैर । आचरती ते गा आसुर ।
सत्येंसि कीर वैर । सदाचि तयां

16.290

जरी नांगिया आपुलिया । विंचू करी गुदगुलिया ।
तरी साचा बोली बोलिया । बोलती ते

16.291

आपानाचेनि तोंडें । जरी सुगंधा येणें घडे ।
तरी सत्य तयां जोडे । आसुरांतें

16.292

ऐसें ते न करितां कांहीं । आंगेंचि वोखटे पाहीं ।
आतां बोलती ते नवाई । सांगिजैल

16.293

एऱहवीं करेयाच्या ठायीं चांग । तें तयासि कैचें नीट आंग ।
तैसा आसुरांचा प्रसंग । प्रसंगें परीस

16.294

उधवणीचें जेवीं तोंड । उभळी धुंवाचे उभड ।
हें जाणिजे तेवीं उघड । सांगों ते बोल

16.295

तरी विश्व हा अनादि ठावो । येथ नियंता ईश्वररावो ।
चावडिये न्यावो अन्यावो । निवडी वेदु

16.296

वेदीं अन्यायीं पडे । तो निरयभोगें दंडे ।
सन्यायी तो सुरवाडें । स्वर्गीं जिये

16.297

ऐसी हे विश्वव्यवस्था । अनादि जे पार्था ।
इयेतें म्हणती ते वृथा । अवघेंचि हें

16.298

यज्ञमूढ ठकिले यागीं । देवपिसें प्रतिमालिंगीं ।
नागविले भगवे योगी । समाधिभ्रमें

16.299

येथ आपुलेनि बळें । भोगिजे जें जें वेंटाळें ।
हें वांचोनि वेगळें । पुण्य आहे ?

16.300

ना अशक्तपणें आंगिकें । वेगळवेंटाळीं न टकें ।
ऐसा गादिजेवीण विषयसुखें । तेंचि पाप

16.301

प्राण घेपती संपन्नांचे । ते पाप जरी साचें ।
तरी सर्वस्व हाता ये तयांचें । हें पुण्यफळ कीं ?

16.302

बळी अबळातें खाय । हेंचि बाधित जरी होय ।
तरी मासयां कां न होय । निसंतान ?

16.303

आणि कुळें शोधूनि दोन्ही । कुमारेंचि शुभलग्नीं ।
मेळवीजती प्रजासाधनीं । हेतु जरी

16.304

तरी पशुपक्षादि जाती । जया मिती नाहीं संतती ।
तयां कोणें प्रतिपत्तीं । विवाह केले ?

16.305

चोरियेचें धन आलें । तरी तें कोणासि विष जालें ? ।
वालभें परद्वार केलें । कोढी कोणी होय ?

16.306

म्हणौनि देवो गोसांवी । तो धर्माधर्मु भोगवी ।
आणि परत्राच्या गांवीं । करी तो भोगी

16.307

परी परत्र ना देवो । न दिसे म्हणौनि तें वावो ।
आणि कर्ता निमे मा ठावो । भोग्यासि कवणु ?

16.308

येथ उर्वशिया इंद्र सुखी । जैसा कां स्वर्गलोकीं ।
तैसाचि कृमिही नरकीं । लोळतु श्लाघे

16.309

म्हणौनि नरक स्वर्गु । नव्हे पापपुण्यभागु ।
जे दोहीं ठायीं सुखभोगु । कामाचाचि तो

16.310

याकारणें कामें । स्त्रीपुरुषयुग्में ।
मिळती तेथ जन्मे । आघवें जग

16.311

आणि जें जें अभिलाषें । स्वार्थालागीं हें पोषे ।
पाठीं परस्परद्वेषें । कामचि नाशी

16.312

एवं कामावांचूनि कांहीं । जगा मूळचि आन नाहीं ।
ऐसें बोलती पाहीं । आसुर गा ते

16.313

आतां असो हें किडाळ । बोली न करूं पघळ ।
सांगतांचि सफोल । होतसे वाचा

16.314

आणि ईश्वराचिया खंती । नुसधियाचि करिती चांथी ।
हेंही नाहीं चित्तीं । निश्चयो एकु

16.315

किंबहुना उघड । आंगी लाऊनियां पाखांड ।
नास्तिकपणाचें हाड । रोंविलें जीवीं

16.316

ते वेळीं स्वर्गालागीं आदरु । कां नरकाचा अडदरु ।
या वासनांचा अंकुरु । जळोनि गेला

16.317

मग केवळ ये देहखोडां । अमेध्योदकाचा बुडबुडा ।
विषयपंकीं सुहाडा । बुडाले गा

16.318

जैं आटावें होती जळचर । तैं डोहीं मिळतीं ढीवर ।
कां पडावें होय शरीर । तैं रोगा उदयो

16.319

उदैजणें केतूचें जैसें । विश्वा अनिष्टोद्देशें ।
जन्मती ते तैसे । लोकां आटूं

16.320

विरूढलिया अशुभ । फुटती तैं ते कोंभ ।
पापाचे कीर्तिस्तंभ । चालते ते

16.321

आणि मागांपुढां जाळणें । वांचूनि आगी कांहीं नेणें ।
तैसें विरुद्धचि एक करणें । भलतेयां

16.322

परी तेंचि गा करणें । आदरिती संभ्रमें जेणें ।
तो आइक पार्था म्हणे । श्रीनिवासु

16.323

तरी जाळ पाणियें न भरे । आगी इंधन न पुरे ।
तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो

16.324

तया कामाचा वोलावा । जीवीं धरुनिया पांडवा ।
दंभमानाचा मेळावा । मेळविती

16.325

मातलिया कुंजरा । आगळी जाली मदिरा ।
तैसा मदाचा ताठा तंव जरा । चढतां आंगीं

16.326

आणि आग्रहा तोचि ठावो । वरी मौढ्यासा सावावो ।
मग काय वानूं निर्वाहो । निश्चयाचा

16.327

जिहीं परोपतापु घडे । परावा जीवु रगडे ।
तिहीं कर्मीं होऊनि गाढे । जन्मवृत्ती

16.328

मग आपुलें केलें फोकारिती । आणि जगातें धिक्कारिती ।
दाहीं दिशीं पसरिती । स्पृहाजाळ

16.329

ऐसेनि गा आटोपें । थोरियें आणती पापें ।
धर्मधेनु खुरपें । सुटलें जैसें

16.330

याचि एका आयती । तयाचिया कर्मप्रवृत्ती ।
आणि जिणियाही परौती । वाहती चिंता

16.331

पाताळाहूनि निम्न । जियेचिये उंचीये सानें गगन ।
जें पाहातां त्रिभुवन । अणुही नोहे

16.332

ते योगपटाची मवणी । जीवीं अनियम चिंतवणी ।
जे सांडूं नेणें मरणीं । वल्लभा जैसी

16.333

तैसी चिंता अपार । वाढविती निरंतर ।
जीवीं सूनि असार । विषयादिक

16.334

स्त्रिया गाइलें आइकावें । स्त्रीरूप डोळां देखावें ।
सर्वेंद्रियें आलिंगावें । स्त्रियेतेंचि

16.335

कुरवंडी कीजे अमृतें । ऐसें सुख स्त्रियेपरौतें ।
नाहींचि म्हणौनि चित्तें । निश्चयो केला

16.336

मग तयाचि स्त्रीभोगा- । लागीं पाताळ स्वर्गा ।
धांवती दिग्विभागा । परौतेही

16.337

आमिषकवळु थोरी आशा । न विचारितां गिळी मासा ।
तैसें कीजे विषयाशा । तयांसि गा

16.338

वांछित तंव न पवती । मग कोरडियेचि आशेची संतती ।
वाढऊं वाढऊं होती । कोशकिडे

16.339

आणि पसरिला अभिलाषु । अपूर्णु होय तोचि द्वेषु ।
एवं कामक्रोधांहूनि अधिकु । पुरुषार्थु नाहीं

16.340

दिहा खोलणें रात्रीं जागोवा । ठाणांतरीयां जैसा पांडवा ।
अहोरात्रींही विसांवा । भेटेचिना

16.341

तैसें उंचौनि लोटिलें कामें । नेहटती क्रोधाचिये ढेमे ।
तरी रागद्वेष प्रेमें । न माती केंही

16.342

तेवींचि जीवींचिया हांवा । विषयवासनांचा मेळावा ।
केला तरी भोगावा । अर्थें कीं ना ?

16.343

म्हणौनि भोगावयाजोगा । पुरता अर्थु पैं गा ।
आणावया जगा । झोंबती सैरा

16.344

एकातें साधूनि मारिती । एकाचि सर्वस्वें हरिती ।
एकालागीं उभारिती । अपाययंत्रें

16.345

पाशिकें पोतीं वागुरा । सुणीं ससाणें चिकाटी खोंचारा ।
घेऊनि निघती डोंगरा । पारधी जैसें

16.346

ते पोसावया पोट । मारूनि प्राणियांचे संघाट ।
आणिती ऐसें निकृष्ट । तेंही करिती

16.347

परप्राणघातें । मेळविती वित्तें ।
मिळाल्या चित्तें । तोषणें कैसें

16.348

म्हणे आजि मियां । संपत्ति बहुतेकांचिया ।
आपुल्या हातीं केलिया । धन्यु ना मी ?

16.349

ऐसा श्लाघों जंव जाये । तंव मन आणीकही वाहे ।
सवेंचि म्हणे पाहे । आणिकांचेंही आणूं

16.350

हें जेतुलें असे जोडिलें । तयाचेनि भांडवलें ।
लाभा घेईन उरलें । चराचर हें

16.351

ऐसेनि धना विश्वाचिया । मीचि होईन स्वामिया ।
मग दिठी पडे तया । उरों नेदी

16.352

हे मारिले वैरी थोडे । आणीकही साधीन गाढे ।
मग नांदेन पवाडें । येकलाचि मी

16.353

मग माझी होतील कामारीं । तियेंवांचूनि येरें मारीं ।
किंबहुना चराचरीं । ईश्वरु तो मी

16.354

मी भोगभूमीचा रावो । आजि सर्वसुखासी ठावो ।
म्हणौनि इंद्रुही वावो । मातें पाहुनि

16.355

मी मनें वाचा देहें । करीं ते कैसें नोहे ।
कें मजवांचूनि आहे । आज्ञासिद्ध आन ?

16.356

तंवचि बळिया काळु । जंव न दिसें मी अतुर्बळु ।
सुखाचा कीर निखिळु । रासिवा मीचि

16.357

कुबेरु आथिला होये । परी तो नेणें माझी सोये ।
संपत्ती मजसम नव्हे । श्रीनाथाही

16.358

माझिया कुळाचा उजाळू । कां जातिगोतांचा मेळू ।
पाहतां ब्रह्माही हळू । उणाचि दिसे

16.359

म्हणौनि मिरविती नांवें । वायां ईश्वरादि आघवे ।
नाहीं मजसीं सरी पावे । ऐसें कोण्ही

16.360

आतां लोपला अभिचारु । तया करीन मी जीर्णोद्धारु ।
प्रतिष्ठीन परमारु । यागवरी

16.361

मातें गाती वानिती । नटनाचें रिझविती ।
तयां देईन मागती । ते ते वस्तु

16.362

माजिरा अन्नपानीं । प्रमदांच्या आलिंगनीं ।
मी होईन त्रिभुवनीं । आनंदाकारु

16.363

काय बहु सांगों ऐसें । ते आसुरीप्रकृती पिसें ।
तुरंबिती असोसें । गगनौळें तियें

16.364

ज्वराचेनि आटोपें । रोगी भलतैसें जल्पे ।
चावळती संकल्पें । जाण ते तैसें

16.365

अज्ञान आतुले धुळी । म्हणौनि आशा वाहटुळी ।
भोवंडीजती अंतराळीं । मनोरथांच्या

16.366

अनियम आषाढ मेघ । कां समुद्रोर्मी अभंग ।
तैसे कामिती अनेग । अखंड काम

16.367

मग पैं कामनाचि तया । जीवीं जाल्या वेलरिया ।
वोरपिली कांटिया । कमळें जैसीं

16.368

कां पाषाणाचिया माथां । हांडी फुटली पार्था ।
जीवीं तैसें सर्वथा । कुटके जाले

16.369

तेव्हां चढतिये रजनी । तमाची होय पुरवणी ।
तैसा मोहो अंतःकरणीं । वाढोंचि लागे

16.370

आणि वाढे जंव जंव मोहो । तंव तंव विषयीं रोहो ।
विषय तेथ ठावो । पातकासी

16.371

पापें आपलेनि थांवें । जंव करिती मेळावे ।
तंव जितांचि आघवे । येती नरकां

16.372

म्हणौनि गा सुमती । जे कुमनोरथां पाळिती ।
ते आसुर येती वस्ती । तया ठाया

16.373

जेथ असिपत्रतरुवर । खदिरांगाराचे डोंगर ।
तातला तेलीं सागर । उतताती

16.374

जेथ यातनांची श्रेणी । हे नित्य नवी यमजाचणी ।
पडती तिये दारुणीं । नरकलोकीं

16.375

ऐसे नरकाचिये शेले । भागीं जे जे जन्मले ।
तेही देखों भुलले । यजिती यागीं

16.376

एऱहवीं यागादिक क्रिया । आहाण तेचि धनंजया ।
परी विफळती आचरोनियां । नाटकी जैसी

16.377

वल्लभाचिया उजरिया । आपणयाप्रति कुस्त्रिया ।
जोडोनि तोषिती जैसियां । अहेवपणें

16.378

तैसें आपणयां आपण । मानितां महंतपण ।
फुगती असाधारण । गर्वें तेणें

16.379

मग लवों नेणती कैसे । आटिवा लोहाचे खांब जैसे ।
कां उधवले आकाशें । शिळाराशी

16.380

तैसें आपुलिये बरवे । आपणचि रिझतां जीवें ।
तृणाहीहूनि आघवें । मानिती नीच

16.381

वरी धनाचिया मदिरा । माजूनि धनुर्धरा ।
कृत्याकृत्यविचारा । सवतें केलें

16.382

जया आंगीं आयती ऐसी । तेथ यज्ञाची गोठी कायसी ।
तरी काय काय पिसीं । न करिती गा ?

16.383

म्हणौनि कोणे एके वेळे । मौढ्यमद्याचेनि बळें ।
यागाचींही टवाळें । आदरिती

16.384

ना कुंड मंडप वेदी । ना उचित साधनसमृद्धी ।
आणि तयांसी तंव विधी । द्वंद्वचि सदा

16.385

देवां ब्राह्मणांचेनि नांवें । आडवारेनहि नोहावें ।
ऐसें आथी तेथ यावें । लागे कवणा ?

16.386

पैं वासरुवाचा भोकसा । गाईपुढें ठेवूनि जैसा ।
उगाणा घेती क्षीररसा । बुद्धिवंत

16.387

तैसें यागाचेनि नांवें । जग वाऊनि हांवें ।
नागविती आघवें । अहेरावारी

16.388

ऐशा कांहीं आपुलिया । होमिती जे उजरिया ।
तेणें कामिती प्राणिया । सर्वनाशु

16.389

मग पुढां भेरी निशाण । लाउनी ते दीक्षितपण ।
जगीं फोकारिती आण । वावो वावो

16.390

तेव्हां महत्त्वें तेणें अधमा । गर्वा चढे महिमा ।
जैसे लेवे दिधले तमा । काजळाचे

16.391

तैसें मौढ्य घणावे । औद्धत्य उंचावे ।
अहंकारु दुणावे । अविवेकुही

16.392

मग दुजयाची भाष । नुरवावया निःशेष ।
बळीयेपणा अधिक । होय बळ

16.393

ऐसा अहंकार बळा । जालिया एकवळा ।
दर्पसागरु मर्यादवेळा । सांडूनि उते

16.394

मग वोसंडिलेनि दर्पें । कामाही पित्त कुरुपे ।
तया धगीं सैंघ पळिपे । क्रोधाग्नि तो

16.395

तेथ उन्हाळा आगी खरमरा । तेलातुपाचिया कोठारा ।
लागला आणि वारा । सुटला जैसा

16.396

तैसा अहंकारु बळा आला । दर्पु कामक्रोधीं गूढला ।
या दोहींचा मेळु जाला । जयांच्या ठायीं

16.397

ते आपुलिया सवेशा । मग कोणी कोणी हिंसा ।
या प्राणियांते वीरेशा । न साधती गा ?

16.398

पहिलें तंव धनुर्धरा । आपुलिया मांसरुधिरा ।
वेंचु करिती अभिचारा- । लागोनियां

16.399

तेथ जाळिती जियें देहें । यामाजीं जो मी आहें ।
तया आत्मया मज घाये । वाजती ते

16.400

आणि अभिचारकीं तिहीं । उपद्रविजे जेतुलें कांहीं ।
तेथ चैतन्य मी पाहीं । सीणु पावे

16.401

आणि अभिचारावेगळें । विपायें जे अवगळें ।
तया टाकिती इटाळें । पैशून्याचीं

16.402

सती आणि सत्पुरुख । दानशीळ याज्ञिक ।
तपस्वी अलौकिक । संन्यासी जे

16.403

कां भक्त हन महात्मे । इयें माझीं निजाचीं धामें ।
निर्वाळलीं होमधर्में । श्रौतादिकीं

16.404

तयां द्वेषाचेनि काळकूटें । बासटोनि तिखटें ।
कुबोलांचीं सदटें । सूति कांडें

16.405

ऐसे आघवाचि परी । प्रवर्तले माझ्या वैरी ।
तयां पापियां जें मी करीं । तें आइक पां

16.406

तरी मनुष्यदेहाचा तागा । घेऊनि रुसती जे जगा ।
ते पदवी हिरोनि पैं गा । ऐसे ठेवीं

16.407

जे क्लेशगांवींचा उकरडा । भवपुरींचा पानवडा ।
ते तमोयोनि तयां मूढां । वृत्तीचि दें

16.408

मग आहाराचेनि नांवें । तृणही जेथ नुगवे ।
ते व्याघ्र वृश्चिक आडवे । तैसिये करीं

16.409

तेथ क्षुधादुःखें बहुतें । तोडूनि खाती आपणयातें ।
मरमरों मागुतें । होतचि असती

16.410

कां आपुला गरळजाळीं । जळिती आंगाची पेंदळी ।
ते सर्पचि करीं बिळीं । निरुंधला

16.411

परी घेतला श्वासु घापे । येतुलेनही मापें ।
विसांवा तयां नाटोपे । दुर्जनांसी

16.412

ऐसेनि कल्पांचिया कोडी । गणितांही संख्या थोडी ।
तेतुला वेळु न काढी । क्लेशौनि तयां

16.413

तरी तयांसी जेथ जाणें । तेथिंचें हें पहिलें पेणें ।
तें पावोनि येरें दारुणें । न होती दुःखें

16.414

हा ठायवरी । संपत्ति ते आसुरी ।
अधोगती अवधारीं । जोडिली तिहीं

16.415

पाठीं व्याघ्रादि तामसा । योनी तो अळुमाळु ऐसा ।
देहाधाराचा उसासा । आथी जोही

16.416

तोही मी वोल्हावा हिरें । मग तमचि होती एकसरें ।
जेथे गेलें आंधारें । काळवंडैजे

16.417

जयांची पापा चिळसी । नरक घेती विवसी ।
शीण जाय मूर्च्छी । सिणें जेणें

16.418

मळु जेणें मैळे । तापु जेणें पोळे ।
जयाचेनि नांवें सळे । महाभय

16.419

पापा जयाचा कंटाळा । उपजे अमंगळ अमंगळा ।
विटाळुही विटाळा । बिहे जया

16.420

ऐसें विश्वाचेया वोखटेया । अधम जे धनंजया ।
तें ते होती भोगूनियां । तामसा योनी

16.421

अहा सांगतां वाचा रडे । आठवितां मन खिरडे ।
कटारे मूर्खीं केवढे । जोडिले निरय

16.422

कायिसया ते आसुर । संपत्ति पोषिती वाउर ।
जिया दिधलें घोर । पतन ऐसें

16.423

म्हणौनि तुवां धनुर्धरा । नोहावें गा तिया मोहरा ।
जेउता वासु आसुरा । संपत्तिवंता

16.424

आणि दंभादि दोष साही । हे संपूर्ण जयांच्या ठायीं ।
ते त्यजावे हें काई । म्हणों कीर ?

16.425

परी काम क्रोध लोभ । या तिहींचेंही थोंब ।
थांवे तेथें अशुभ । पिकलें जाण

16.426

सर्व दुःखां आपुलिया । दर्शना धनंजया ।
पाढाऊ हे भलतया । दिधलें आहाती

16.427

कां पापियां नरकभोगीं । सुवावयालागीं जगीं ।
पातकांची दाटुगी । सभाचि हे

16.428

ते रौरव गा तंवचिवरी । आइकिजती पटांतरीं ।
जंव हे तिन्ही अंतरीं । उठती ना

16.429

अपाय तिहीं आसलग । यातना इहीं सवंग ।
हाणी हाणी नोहे हे तिघ । हेचि हाणी

16.430

काय बहु बोलों सुभटा । सांगितलिया निकृष्टा ।
नरकाचा दारवंटा । त्रिशंकु हा

16.431

या कामक्रोधलोभां- । माजीं जीवें जो होय उभा ।
तो निरयपुरीची सभा । सन्मानु पावे

16.432

म्हणौनि पुढत पुढतीं किरीटी । हे कामादि दोष त्रिपुटी ।
त्यजावींचि गा वोखटी । आघवा विषयीं

16.433

एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् २२॥
धर्मादिकां चौंही आंतु । पुरुषार्थाची तैंचि मातु ।
करावी जैं संघातु । सांडील हा

16.434

हे तिन्ही जीवीं जंव जागती । तंववरी निकियाची प्राप्ती ।
हे माझे कान नाइकती । देवोही म्हणे

16.435

जया आपणपें पढिये । आत्मनाशा जो बिहे ।
तेणें न धरावी हे सोये । सावधु होईजे

16.436

पोटीं बांधोनि पाषाण । समुद्रीं बाहीं आंगवण ।
कां जियावया जेवण । काळकूटाचें

16.437

इहीं कामक्रोधलोभेंसी । कार्यसिद्धि जाण तैसी ।
म्हणौनि ठावोचि पुसीं । ययांचा गा

16.438

जैं कहीं अवचटें । हे तिकडी सांखळ तुटे ।
तैं सुखें आपुलिये वाटे । चालों लाभे

16.439

त्रिदोषीं सांडिलें शरीर । त्रिकुटीं फिटलिया नगर ।
त्रिदाह निमालिया अंतर । जैसें होय

16.440

तैसा कामादिकीं तिघीं । सांडिला सुख पावोनि जगीं ।
संगु लाहे मोक्षमार्गीं । सज्जनांचा

16.441

मग सत्संगें प्रबळें । सच्छास्त्राचेनि बळें ।
जन्ममृत्यूचीं निमाळें । निस्तरें रानें

16.442

ते वेळीं आत्मानंदें आघवें । जें सदा वसतें बरवें ।
तें तैसेंचि पाटण पावे । गुरुकृपेचें

16.443

तेथ प्रियाची परमसीमा । तो भेटे माउली आत्मा ।
तयें खेवीं आटे डिंडिमा । सांसारिक हे

16.444

ऐसा जो कामक्रोधलोभां । झाडी करूनि ठाके उभा ।
तो येवढिया लाभा । गोसावी होय

16.445

ना हें नावडोनि कांहीं । कामादिकांच्याचि ठायीं ।
दाटिली जेणें डोई । आत्मचोरें

16.446

जो जगीं समान सकृपु । हिताहित दाविता दीपु ।
तो अमान्यु केला बापु । वेदु जेणें

16.447

न धरीचि विधीची भीड । न करीचि आपली चाड ।
वाढवीत गेला कोड । इंद्रियांचें

16.448

कामक्रोधलोभांची कास । न सोडीच पाळिली भाष ।
स्वैराचाराचें असोस । वळघला रान

16.449

तो सुटकेचिया वाहिणीं । मग पिवों न लाहे पाणी ।
स्वप्नींही ते कहाणी । दूरीचि तया

16.450

आणि परत्र तंव जाये । हें कीर तया आहे ।
परी ऐहिकही न लाहे । भोग भोगूं

16.451

तरी माशालागीं भुलला । ब्राह्मण पाणबुडां रिघाला ।
कीं तेथही पावला । नास्तिकवादु

16.452

तैसें विषयांचेनि कोडें । जेणें परत्रा केलें उबडें ।
तंव तोचि आणिकीकडे । मरणें नेला

16.453

एवं परत्र ना स्वर्गु । ना ऐहिकही विषयभोगु ।
तेथ केउता प्रसंगु । मोक्षाचा तो ?

16.454

म्हणौनि कामाचेनि बळें । जो विषय सेवूं पाहे सळें ।
तया विषयो ना स्वर्गु मिळे । ना उद्धरे तो

16.455

याकारणें पैं बापा । जया आथी आपुली कृपा ।
तेणें वेदांचिया निरोपा । आन न कीजे

16.456

पतीचिया मता । अनुसरोनि पतिव्रता ।
अनायासें आत्महिता । भेटेचि ते

16.457

नातरी श्रीगुरुवचना । दिठी देतु जतना ।
शिष्य आत्मभुवना- । माजीं पैसे

16.458

हें असो आपुला ठेवा । हाता आथी जरी यावा ।
तरी आदरें जेवीं दिवा । पुढां कीजे

16.459

तैसा अशेषांही पुरुषार्था । जो गोसावी हो म्हणे पार्था ।
तेणें श्रुतिस्मृति माथां । बैसणें घापे

16.460

शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें ।
जें घेववी तें न म्हणावें । विषही विरु

16.461

ऐसिया वेदैकनिष्ठा । जालिया जरी सुभटा ।
तरी कें आहे अनिष्टा । भेटणें गा ?

16.462

पैं अहितापासूनि काढिती । हित देऊनि वाढविती ।
नाहीं गा श्रुतिपरौती । माउली जगा

16.463

म्हणौनि ब्रह्मेंशीं मेळवी । तंव हे कोणें न सांडावी ।
अगा तुवांही ऐसीचि भजावी । विशेषेंसीं

16.464

जे आजि अर्जुना तूं येथें । करावया सत्य शास्त्रें सार्थें ।
जन्मलासि बळार्थें । धर्माचेनि

16.465

आणि धर्मानुज हें ऐसें । बोधेंचि आलें अपैसें ।
म्हणौनि आनारिसें । करूं नये

16.466

कार्याकार्यविवेकीं । शास्त्रेंचि करावीं पारखीं ।
अकृत्य तें कुडें लोकीं । वाळावें गा

16.467

मग कृत्यपणें खरें निगे । तें तुवां आपुलेनि आंगें ।
आचरोनि आदरें चांगें । सारावें गा

16.468

जे विश्वप्रामाण्याची मुदी । आजि तुझ्या हातीं असें सुबुद्धी ।
लोकसंग्रहासि त्रिशुद्धी । योग्यु होसी

16.469

एवं आसुरवर्गु आघवा । सांगोनि तेथिंचा निगावा ।
तोहि देवें पांडवा । निरूपिला

16.470

इयावरी तो पंडूचा । कुमरु सद्भावो जीवींचा ।
पुसेल तो चैतन्याचा । कानीं ऐका

16.471

संजयें व्यासाचिया निरोपा । तो वेळु फेडिला तया नृपा ।
तैसा मीहि निवृत्तिकृपा । सांगेन तुम्हां

16.472

तुम्ही संत माझिया कडा । दिठीचा कराल बहुडा ।
तरी तुम्हां माने येवढा । होईन मी

16.473

म्हणौनि निज अवधान । मज वोळगे पसायदान ।
दीजो जी सनाथु होईन । ज्ञानदेवो म्हणे

मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0

Esc