ज्ञानेश्वरी · अध्याय 15
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ पञ्चदशोऽध्यायः - अध्याय पंधरावा । ।
। पुरुषोत्तमयोगः ।
आतां हृदय हें आपुलें । चौफाळुनियां भलें ।
वरी बैसऊं पाउलें । श्रीगुरूंचीं
ऐक्यभावाची अंजुळी । सर्वेंद्रिय कुड्मुळी ।
भरूनियां पुष्पांजुळी । अर्घ्यु देवों
अनन्योदकें धुवट । वासना जे तन्निष्ठ ।
ते लागलेसे अबोट । चंदनाचें
प्रेमाचेनि भांगारें । निर्वाळूनि नूपरें ।
लेवऊं सुकुमारें । पदें तियें
घणावली आवडी । अव्यभिचारें चोखडी ।
तिये घालूं जोडी । आंगोळिया
आनंदामोदबहळ । सात्त्विकाचें मुकुळ ।
तें उमललें अष्टदळ । ठेऊं वरी
तेथे अहं हा धूप जाळूं । नाहं तेजें वोवाळूं ।
सामरस्यें पोटाळूं । निरंतर
माझी तनु आणि प्राण । इया दोनी पाउवा लेऊं श्रीगुरुचरण ।
करूं भोगमोक्ष निंबलोण । पायां तयां
इया श्रीगुरुचरणसेवा । हों पात्र तया दैवा ।
जे सकळार्थमेळावा । पाटु बांधे
ब्रह्मींचें विसवणेंवरी । उन्मेख लाहे उजरी ।
जें वाचेतें इयें करी । सुधासिंधु
पूर्णचंद्राचिया कोडी । वक्तृत्वा घापें कुरोंडी ।
तैसी आणी गोडी । अक्षरांतें
सूर्यें अधिष्ठिली प्राची । जगा राणीव दे प्रकाशाची ।
तैशी वाचा श्रोतयां ज्ञानाची । दिवाळी करी
नादब्रह्म खुजें । कैवल्यही तैसें न सजे ।
ऐसा बोलु देखिजे । जेणें दैवें
श्रवणसुखाच्या मांडवीं । विश्व भोगी माधवीं ।
तैसी सासिन्नली बरवी । वाचावल्ली
ठावो न पवता जयाचा । मनेंसी मुरडली वाचा ।
तो देवो होय शब्दाचा । चमत्कारु
जें ज्ञानासि न चोजवे । ध्यानासिही जें नागवे ।
तें अगोचर फावे । गोठीमाजीं
येवढें एक सौभग । वळघे वाचेचें आंग ।
श्रीगुरुपादपद्मपराग । लाहे जैं कां
तरी बहु बोलूं काई । आजि तें आनीं ठाईं ।
मातेंवाचूनि नाहीं । ज्ञानदेवो म्हणे
जे तान्हेनि मियां अपत्यें । आणि माझे गुरु एकलौतें ।
म्हणौनि कृपेंसि एकहातें । जालें तिये
पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकांसी रिचवी ।
मजलागीं गोसावी । तैसें केलें
म्हणौनि रिकामें तोंड । करूं गेलें बडबड ।
कीं गीता ऐसें गोड । आतुडलें
होय अदृष्ट आपैतें । तैं वाळूचि रत्नें परते ।
उजू आयुष्य तैं मारितें । लोभु करी
आधणीं घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ ।
जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथु
तयापरी श्रीगुरु । करिती जैं अंगीकारु ।
तैं होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा
पाहा पां श्रीनारायणें । तया पांडवांचें उणें ।
कीजेचि ना पुराणें । विश्ववंद्यें ?
तैसें श्रीनिवृत्तिराजें । अज्ञानपण हें माझें ।
आणिलें वोजें । ज्ञानाचिया
परी हें असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां ।
कें गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ?
आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संताचे मी पायें ।
वोळगेन अभिप्रायें । गीतेचेनि
तरी तोचि प्रस्तुतीं । चौदाविया अध्यायाच्या अंतीं ।
निर्णयो कैवल्यपती । ऐसा केला
जें ज्ञान जयाच्या हातीं । तोचि समर्थु मुक्ति ।
जैसा शतमख संपत्ती । स्वर्गींचिये
कां शत एक जन्मां । जो जन्मोनि ब्रह्मकर्मा ।
करी तोचि ब्रह्मा । आनु नोहे
नाना सूर्याचा प्रकाशु । लाहे जेवीं डोळसु ।
तेवीं ज्ञानेंचि सौरसु । मोक्षाचा तो
तरी तया ज्ञानालागीं । कवणा पां योग्यता आंगीं ।
हें पाहतां जगीं । देखिला एकु
जें पाताळींचेंही निधान । दावील कीर अंजन ।
परी होआवे लोचन । पायाळाचे
तैसें मोक्ष देईल ज्ञान । येथें कीर नाहीं आन ।
परी तेंचि थारे ऐसें मन । शुद्ध होआवें
तरी विरक्तीवांचूनि कहीं । ज्ञानासि तगणेंचि नाहीं ।
हें विचारूनि ठाईं । ठेविलें देवें
आतां विरक्तीची कवण परी । जे येऊनि मनातें वरी ।
हेंही सर्वज्ञें श्रीहरी । देखिलें असे
जे विषें रांधिली रससोये । जैं जेवणारा ठाउवी होये ।
तैं तो ताटचि सांडूनि जाये । जयापरी
तैसी संसारा या समस्ता । जाणिजे जैं अनित्यता ।
तैं वैराग्य दवडितां । पाठी लागे
आतां अनित्यत्व या कैसें । तेंचि वृक्षाकारमिषें ।
सांगिजत असे विश्वेशें । पंचदशीं
उपडिलें कवतिकें । झाड येरिमोहरा ठाके ।
तें वेगें जैसें सुके । तैसें हें नोहे
यातें एकेपरी । रूपकाचिया कुसरी ।
सारीतसे वारी । संसाराची
करूनि संसार वावो । स्वरूपीं अहंते ठावो ।
होआवया अध्यावो । पंधरावा हा
आतां हेंचि आघवें । ग्रंथगर्भींचें चांगावें ।
उपलविजेल जीवें । आकर्णिजे
तरी महानंद समुद्र । झॊ पूर्ण पूर्णीमा चंद्र ।
तो द्वारकेचा नरेंद्र । ऐसें म्हणे
अगा पैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरा ।
करीतसे आडवारा । विश्वाभासु जो
तो हा जगडंबरु । नोहे येथ संसारु ।
हा जाणिजे महातरु । थांवला असे
परी येरां रुखांसारिखा । हा तळीं मूळें वरी शाखा ।
तैसा नोहे म्हणौनि लेखा । नयेचि कवणा
आगी कां कुऱहाडी । होय रिगावा जरी बुडीं ।
तरी हो कां भलतेवढी । वरिचील वाढी
जे तुटलिया मूळापाशीं । उलंडेल कां शाखांशीं ।
परी तैशी गोठी कायशी । हा सोपा नव्हे
अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक ।
जे वाढी अधोमुख । रुखा यया
जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके ।
संसार हें कावरुखें । झाड तैसें
आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें ।
कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें
कां रवीच्या अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी ।
तैसा हाचि गगनीं । मांडला असे
यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां ।
जें कांहीं पंडुसुता । तें रुखुचि हा
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे ।
येणेंचि हा होये । शाड्वळु गा
आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे ।
परी अधींही असोसें । मूळें यया
प्रबळला चौमेरी । पिंपळा कां वडाचिया परी ।
जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती
तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया ।
अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे ।
दिसताति अपाडें । सासिन्नलें
जालें गगनचि पां वेलिये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें ।
नाना अवस्थात्रयें । उदयला असे
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु ।
उदयला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु
आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण ।
कां अधोमुखपण । शाखा कैसिया
अथवा द्रुमा यया । अधीं जिया मूळिया ।
तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी ।
आत्मविदविलासीं । निर्णयो केला
हें आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फावे ।
तैसेनि सांगों सोलिंवें । विन्यासें गा
परी ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुजचि जोगा ।
कानचि करीं हो सर्वांगा । हियें आथिलिया
ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववीरें ।
तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें
देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें ।
जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा ।
म्हनौनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली ।
तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया ।
येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे
एऱहवीं मध्योर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद ।
अद्वयासीं एकवद । जया ठायीं
जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु ।
जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण
जया जें आऱहां परौतें । जया जें पुढें मागौतें ।
दिसतेविण दिसतें । अदृश्य जें
उपाधीचा दुसरा । घालितां वोपसरा ।
नामरूपाचा संसारा । होय जयातें
ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान ।
सुखा भरलें गगन । गाळींव जें
जें कार्य ना कारण । जया दुजें ना एकपण ।
आपणयां जें जाण । आपणचि
ऐसें वस्तु जें साचें । तें ऊर्ध्व गा यया तरूचें ।
तेथ आर घेणें मूळाचें । तें ऐसें असे
तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी ।
कां वांझेची संतती । वानणें जैशी
तैशी सत् ना असत् होये । जे विचाराचें नाम न साहे ।
ऐसेया परीची आहे । अनादि म्हणती
जे नानातत्त्वांंची मांदुस । जे जगदभ्राचें आकाश ।
जे आकारजाताचें दुस । घडी केलें
जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्र भूमिका ।
विपरीत ज्ञानदीपिका । सांचली जे
ते माया वस्तूच्या ठायीं । असे जैसेनि नाहीं ।
मग वस्तुप्रभाचि पाही । प्रगट होये
जेव्हां आपणया आली निद । करी आपणपें जेवीं मुग्ध ।
कां काजळी आणी मंद । प्रभा दीपीं
स्वप्नीं प्रियापुढें तरुणांगी । निदेली चेववूनि वेगीं ।
आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकामु करी
तैसी स्वरूपीं जाली माया । आणी स्वरूप नेणे धनंजया ।
तेंचि रुखा यया । मूळ पहिलें
वस्तूसी आपुला जो अबोधु । तो ऊर्ध्वीं आठुळैजे कंदु ।
वेदांतीं हाचि प्रसिद्धु । बीजभावो
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजांकुरभावो म्हणती ।
येर स्वप्न हन जागृती । हा फळभावो तियेचा
ऐसी यया वेदांतीं । निरूपणभाषाप्रतीती ।
परी तें असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ
तें ऊर्ध्व आत्मा निर्मळें । अधोर्ध्व सूचिती मूळें ।
बळिया बांधोनि आळें । मायायोगाचें
मग आधिलीं सदेहांतरें । उठती जियें अपारें ।
ते चौपासि घेऊनि आगारें । खोलावती
ऐसें भवद्रुमाचें मूळ । हें ऊर्ध्वीं करी बळ ।
मग आणियांचें बेंचळ । अधीं दावी
तेथ् चिद्वृत्ति पहिलें । महत्तत्त्व उमललें ।
तें पान वाल्हेंदुल्हें । एक निघे
मग सत्त्वरजतमात्मकु । त्रिविध अहंकारु जो एकु ।
तो तिवणा अधोमुखु । डिरु फुटे
तो बुद्धीची घेऊनि आगारी । भेदाची वृद्धि करी ।
तेथे मनाचे डाळ धरी । साजेपणें
ऐसा मूळाचिया गाढिका । विकल्परस कोंवळिका ।
चित्तचतुष्टय डाहाळिका । कोंभैजे तो
मग आकाश वायु द्योतक । आप पृथ्वी हें पांच फोंक ।
महाभूतांचें सरोख । सरळे होती
तैसीं श्रोत्रादि तन्मात्रें । तियें अंगवसां गर्भपत्रें ।
लुळलुळितें विचित्रें । उमळती गा
तेथ शब्दांकुर वरिपडी । श्रोत्रा वाढी देव्हडी ।
होता करित कांडीं । आकांक्षेचीं
अंगत्वचेचे वेलपल्लव । स्पर्शांकुरीं घेती धांव ।
तेथ बांबळ पडे अभिनव । विकारांचें
पाठीं रूपपत्र पालोवेलीं । चक्षु लांब तें कांडें घाली ।
ते वेळीं व्यामोहता भली । पाहाळीं जाय
आणि रसाचें आंगवसें । वाढतां वेगें बहुवसें ।
जिव्हे आर्तीची असोसें । निघती बेंचें
तैसेंचि कोंभैलेनि गंधें । घ्राणाची डिरी थांबुं बांधे ।
तेथ तळु घे स्वानंदें । प्रलोभाचा
एवं महदहंबुद्धि । मनें महाभूतसमृद्धी ।
इया संसाराचिया अवधी । सासनिजे
किंबहुना इहीं आठें । आंगीं हा अधिक फांटे ।
परी शिंपीचियेवढें उमटे । रुपें जेवीं
कां समुद्राचेनि पैसारें । वरी तरंगता आसारे ।
तैसें ब्रह्मचि होय वृक्षाकारें । अज्ञानमूळ
आतां याचा हाचि विस्तारु । हाचि यया पैसारु ।
जैसा आपणपें स्वप्नीं परिवारु । येकाकिया
परी तें असो हें ऐसें । कावरें झाड उससे ।
यया महदादि आरवसें । अधोशाखा
आणि अश्वत्थु ऐसें ययातें । म्हणती जे जाणते ।
तेंही परिस हो येथें । सांगिजैल
तरी श्वः म्हणिजे उखा । तोंवरी एकसारिखा ।
नाहीं निर्वाहो यया रुखा । प्रपंचरूपा
जैसा न लोटतां क्षणु । मेघु होय नानावर्णु ।
कां विजु नसे संपूर्णु । निमेषभरी
ना कांपतया पद्मदळा । वरीलिया बैसका नाहीं जळा ।
कां चित्त जैसें व्याकुळा । माणुसाचें
तैसीचि ययाची स्थिती । नासत जाय क्षणक्षणाप्रती ।
म्हणौनि ययातें म्हणती । अश्वत्थु हा
आणि अश्वत्थु येणें नांवें । पिंपळु म्हणती स्वभावें ।
परी तो अभिप्राय नव्हे । श्रीहरीचा
एऱहवीं पिंपळु म्हणतां विखीं । मियां गति देखिली असे निकी ।
परी तें असो काय लौकिकीं । हेतु काज
म्हणौनि हा प्रस्तुतु । अलौकिकु परियेसा ग्रंथु ।
तरी क्षणिकत्वेंचि अश्वत्थु । बोलिजे हा
आणीकुही येकु थोरु । यया अव्ययत्वाचा डगरु ।
आथी परी तो भीतरु । ऐसा आहे
जैसा मेघांचेनि तोंडें । सिंधु एके आंगें काढे ।
आणि नदी येरीकडे । भरितीच असती
तेथ वोहटे ना चढे । ऐसा परिपूर्णुचि आवडे ।
परी ते फुली जंव नुघडे । मेघानदींची
ऐसें या रुखाचें होणें जाणें । न तर्के होतेनि वहिलेपणें ।
म्हणौनि ययातें लोकु म्हणे । अव्ययु हा
एऱहवीं दानशीळु पुरुषु । वेंचकपणेंचि संचकु ।
तैसा व्ययेंचि हा रुखु । अव्ययो गमे
जातां वेगें बहुवसें । न वचे कां भूमीं रुतलें असे ।
रथाचें चक्र दिसे। जियापरी
तैसें काळातिक्रमें जे वाळे । ते भूतशाखा जेथ गळे।
तेथ कोडीवरी उमाळे । उठती आणिक
परी येकी केधवां गेली। शाखाकोडी केधवां जाली ।
हें नेणवे जेवीं उमललीं । आषाढाभ्रें
महाकल्पाच्या शेवटीं । उदेलिया उमळती सृष्टी ।
तैसेंचि आणिखीचें दांग उठी । सासिन्नलें
संहारवातें प्रचंडें । पडती प्रळयांतींचीं सालडें ।
तंव कल्पादीचीं जुंबाडें । पाल्हेजती
रिगे मन्वंतर मनूपुढें । वंशावरी वंशांचे मांडे ।
जैसी इक्षुवृद्धी कांडेंनकांडें । जिंके जेवीं
कलियुगांतीं कोरडीं । चहुं युगांची सालें सांडी ।
तंव कृतयुगाची पेली देव्हडी । पडे पुढती
वर्ततें वर्ष जाये । तें पुढिला मुळहारी होये ।
जैसा दिवसु जात कीं येत आहे । हें चोजवेना
जैशा वारियाच्या झुळकां । सांदा ठाउवा नव्हे देखा ।
तैसिया उठती पडती शाखा । नेणों किती
एकी देहाची डिरी तुटे । तंव देहांकुरीं बहुवी फुटे ।
ऐसेनि भवतरु हा वाटे । अव्ययो ऐसा
जैसें वाहतें पाणी जाय वेगें । तैसेंचि आणिक मिळे मागें ।
येथ असंतचि असिजे जगें । मानिजे संत
कां लागोनि डोळां उघडे । तंव कोडीवरी घडे मोडे ।
नेणतया तरंगु आवडे । नित्यु ऐसा
वायसा एकें बुबुळें दोहींकडे । डोळा चाळीतां अपाडें ।
दोन्ही आथी ऐसा पडे । भ्रमु जेवीं जगा
पैं भिंगोरी निधिये पडली । ते गमे भूमीसी जैसी जडली ।
ऐसा वेगातिशयो भुली । हेतु होय
हें बहु असो झडती । आंधारें भोवंडितां कोलती ।
ते दिसे जैसी आयती । चक्राकार
हा संसारवृक्षु तैसा । मोडतु मांडतु सहसा ।
न देखोनि लोकु पिसा । अव्ययो मानी
परि ययाचा वेगु देखे । जो हा क्षणिक ऐसा वोळखे ।
जाणे कोडिवेळां निमिखें । होत जात
नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचें असिलेंपण टवाळ ।
ऐसें झाड सिनसाळ । देखिलें जेणें
तयातें गा पंडुसुता । मी सर्वज्ञुही म्हणें जाणता ।
पैं वाग्ब्रह्म सिद्धांता । वंद्यु तोची
योगजाताचें जोडलें । तया एकासीचि उपेगा गेलें ।
किंबहुना जियालें । ज्ञानही त्याचेनी
हें असो बहु बोलणें । वानिजैल तो कवणें ।
जो भवरुखु जाणें । उखि ऐसा
मग ययाचि प्रपंचरूपा । अधोशाखिया पादपा ।
डाहाळिया जाती उमपा । ऊर्ध्वाही उजू
आणि अधीं फांकली डाळें । तिये होती मूळें ।
तयाही तळीं पघळे । वेल पालवु
ऐसें जें आम्हीं । म्हणितलें उपक्रमीं ।
तेंही परिसें सुगमीं । बोलीं सांगों
तरी बद्धमूळ अज्ञानें । महदादिकीं सासिनें ।
वेदांचीं थोरवनें । घेऊनियां
परी आधीं तंव स्वेदज । जारज उद्भिज अंडज ।
हे बुडौनि महाभुज । उठती चारी
यया एकैकाचेनि आंगवटें । चौर्यांशीं लक्षधा फुटे ।
ते वेळीं जीवशाखीं फांटे । सैंधचि होती
प्रसवती शाखा सरळिया । नानासृष्टि डाहाळिया ।
आड फुटती माळिया । जातिचिया
स्त्री पुरुष नपुंसकें । हे व्यक्तिभेदांचे टके ।
आंदोळती आंगिकें । विकारभारें
जैसा वर्षाकाळु गगनीं । पाल्हेजे नवघनीं ।
तैसें आकारजात अज्ञानीं । वेलीं जाय
मग शाखांचेनि आंगभारें । लवोनि गुंफिती परस्परें ।
गुणक्षोभाचे वारे । उदयजती
तेथ तेणें अचाटें । गुणांचेनि झडझडाटें ।
तिहीं ठायीं हा फांटे । ऊर्ध्वमूळ
ऐसा रजाचिया झुळुका । झडाडितां आगळिका ।
मनुष्यजाती शाखा । थोरावती
तिया ऊर्ध्वीं ना अधीं । माझारींचि कोंदाकोंदी ।
आड फुटती खांदी । चतुर्वर्णांच्या
तेथ विधिनिषेध सपल्लव । वेदवाक्यांचें अभिनव ।
पालव डोलती बरव । नीच नवे
अर्थु कामु पसरे । अग्रवनें घेती थारे ।
तेथ क्षणिकें पदांतरें । इहभोगाचीं
तेथ प्रवृत्तीचेनि वृद्धिलोभें । खांकरेजती शुभाशुभें ।
नानाकर्मांचे खांबे । नेणों किती
तेवींचि भोगक्षीणें मागिलें । पडती देहांतींचीं बुडसळें ।
तंव पुढां वाढी पेले । नवेया देहांची
आणि शब्दादिक सुहावे । सहज रंगें हवावे ।
विषयपल्लव नवे । नीत्य होती
ऐसे रजोवातें प्रचंडें । मनुष्यशाखांचे मांदोडे ।
वाढती तो एथ रुढे । मनुष्यलोकु
तैसाचि तो रजाचा वारा । नावेक धरी वोसरा ।
मग वाजों लागे घोरा । तमाचा तो
तेधवां याचिया मनुष्यशाखा । नीच वासना अधीं देखा ।
पल्हेजती डाहाळिका । कुकर्माचिया
अप्रवृत्तींचे खणुवाळे । कोंभ निघती सरळे ।
घेत पान पालव डाळे । प्रमादाचीं
बोलती निषेधनियमें । जिया ऋचा यजुःसामें ।
तो पाला तया घुमें । टकेयावरी
प्रतिपादिती अभिचार । आगम जे परमार ।
तिहीं पानीं घेती प्रसर । वासना वेली
तंव तंव होतीं थोराडें । अकर्मांचीं तळबुडें ।
आणि जन्मशाखा पुढें पुढें । घेती धांव
तेथ चांडाळादि निकृष्टा । दोषजातीचा थोर फांटा ।
जाळ पडे कर्मभ्रष्टां । भुलोनियां
पशु पक्षी सूकर । व्याघ्र वृश्चिक विखार ।
हे आडशाखा प्रकार । पैसु घेती
परी ऐशा शाखा पांडवा । सर्वांगींहि नित्य नवा ।
निरयभोग यावा । फळाचा तो
आणि हिंसाविषयपुढारी । कुकर्मसंगें धुर धुरी ।
जन्मवरी आगारी । वाढतीचि असे
ऐसे होती तरु तृण । लोह लोष्ट पाषाण ।
इया खांदिया तेवीं जाण । फळेंही हेंची
अर्जुना गा अवधारीं । मनुष्यालागोनि इया परी ।
वृद्धि स्थावरांतवरी । अधोशाखांची
म्हणौनि जीं मनुष्यडाळें । तियें जाणावीं अधींचि मूळें ।
जे एथूनि हा पघळे । संसारतरु
एऱहवीं ऊर्ध्वींचें पार्था । मुद्दल मूळ पाहतां ।
अधींचिया मध्यस्था । शाखा इया
परी तामसी सात्त्विकी । सुकृतदुष्कृतात्मकी ।
विरुढती या शाखीं । अधोर्ध्वींचिया
आणि वेदत्रयाचिया पाना । नये अन्यत्र लागों अर्जुना ।
जे मनुष्यावांचूनि विधाना । विषय नाहीं
म्हणौनि तनु मानुषा । इया ऊर्ध्वमूळौनि जरी शाखा ।
तरी कर्मवृद्धीसि देखा । इयेंचि मूळें
आणि आनीं तरी झाडीं । शाखा वाढतां मुळें गाढीं ।
मूळ गाढें तंव वाढी । पैस आथी
तैसेंचि इया शरीरा । कर्म तंव देहा संसारा ।
आणि देह तंव व्यापारा । ना म्हणोंचि नये
म्हणौनि देहें मानुषें । इयें मुळें होती न चुके ।
ऐसें जगज्जनकें । बोलिलें तेणें
मग तमाचें तें दारुण । स्थिरावलेया वाउधाण ।
सत्त्वाची सुटे सत्राण । वाहुटळी
तैं याचि मनुष्याकारा । मुळीं सुवासना निघती आरा ।
घेऊनि फुटती कोंबारा । सुकृतांकुरीं
उकलतेनि उन्मेखें । प्रज्ञाकुशलतेंची तिखें ।
डिरिया निघती निमिखें । बाबळैजुनी
मतीचे सोट वांवे । घालिती स्फूर्तींचेनि थांवें ।
बुद्धि प्रकाश घे धांवे । विवेकावरी
तेथ मेधारसें सगर्भ । अस्थापत्रीं सबोंब ।
सरळ निघती कोंभ । सद्वृत्तीचे
सदाचाराचिया सहसा । टका उठती बहुवसा ।
घुमघुमिति घोषा । वेदपद्याच्या
शिष्टागमविधानें । विविधयागवितानें ।
इये पानावरी पानें । पालेजती
ऐशा यमदमीं घोंसाळिया । उठती तपाचिया डाहाळिया ।
देती वैराग्यशाखा कोंवळिया । वेल्हाळपणें
विशिष्टां व्रतांचे फोक । धीराच्या अणगटी तिख ।
जन्मवेगें ऊर्ध्वमुख । उंचावती
माजीं वेदांचा पाला दाट । तो करी सुविद्येचा झडझडाट ।
जंव वाजे अचाट । सत्त्वानिळु तो
तेथ धर्मडाळ बाहाळी । दिसती जन्मशाखा सरळी ।
तिया आड फुटती फळीं । स्वर्गादिकीं
पुढां उपरति रागें लोहिवी । धर्ममोक्षाची शाखा पालवी ।
पाल्हाजत नित्य नवी । वाढतीचि असे
पैं रविचंद्रादि ग्रहवर । पितृ ऋषी विद्याधर ।
हे आडशाखा प्रकार । पैसु घेती
याहीपासून उंचवडें । गुढले फळाचेनि बुडें ।
इंद्रादिक ते मांदोडे । थोर शाखांचे
मग तयांही उपरी डाहाळिया । तपोज्ञानीं उंचावलिया ।
मरीचि कश्यपादि इया । उपरी शाखा
एवं माळोवाळी उत्तरोत्तरु । ऊर्ध्वशाखांचा पैसारु ।
बुडीं साना अग्रीं थोरु । फळाढ्यपणें
वरी उपरिशाखाही पाठीं । येती फळभार जे किरीटी ।
ते ब्रह्मेशांत अणगटीं । कोंभ निघती
फळाचेनि वोझेपणें । ऊर्ध्वीं वोवांडें दुणें ।
जंव माघौतें बैसणें । मूळींचि होय
प्राकृताही तरी रुखा । जें फळें दाटलीं होय शाखा ।
ते वोवांडली देखा । बुडासि ये
तैसें जेथूनि हा आघवा । संसारतरूचा उठावा ।
तियें मूळीं टेंकती पांडवा । वाढतेनि ज्ञानें
म्हणौनि ब्रह्मेशानापरौतें । वाढणें नाहीं जीवातें ।
तेथूनि मग वरौतें । ब्रह्मचि कीं
परी हें असो ऐसें । ब्रह्मादिक ते आंगवसें ।
ऊर्ध्वमुळासरिसें । न तुकती गा
आणीकही शाखा उपरता । जिया सनकादिक नामें विख्याता ।
तिया फळीं मूळीं नाडळता । भरलिया ब्रह्मीं
ऐसी मनुष्यापासूनि जाणावी । ऊर्ध्वीं ब्रह्मादिशेष पालवी ।
शाखांची वाढी बरवी । उंचावे पैं
पार्था ऊर्ध्वींचिया ब्रह्मादि । मनुष्यत्वचि होय आदि ।
म्हणौनि इयें अधीं । म्हणितलीं मूळें
एवं तुज अलौकिकु । हा अधोर्ध्वशाखु ।
सांगितला भवरुखु । ऊर्ध्वमूळु
आणि अधींचीं हीं मूळें । उपपत्ती परिसविली सविवळें ।
आतां परिस उन्मूळें । कैसेनि हा
परी तुझ्या हन पोटीं । ऐसें गमेल किरीटी ।
जे एवढें झाड उत्पाटी । ऐसें कायि असे ?
कें ब्रह्मयाच्या शेवटवरी । ऊर्ध्व शाखांची थोरी ।
आणि मूळ तंव निराकारीं । ऊर्ध्वीं असे
हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं ।
माजीं धांवतसे दुजा मूळीं । मनुष्यरूपीं
ऐसा गाढा आणि अफाटु । आतां कोण करी यया शेवटु ।
तरी झणीं हा हळुवटु । धरिसी भावो
परी हा उन्मूळावया दोषें । येथ सायासचि कायिसे ।
काय बाळा बागुल देशें । दवडावा आहे ?
गंधर्वदुर्ग कायी पाडावे । काय शशविषाण मोडावें ।
होआवें मग तोडावें । खपुष्प कीं ?
तैसा संसारु हा वीरा । रुख नाहीं साचोकारा ।
मा उन्मूळणीं दरारा । कायिसा तरी ?
आम्हीं सांगितली जे परी । मूळडाळांची उजरी ।
ते वांझेचीं घरभरी । लेकुरें जैशीं
कय कीजती चेइलेपणीं । स्वप्नींचीं तिये बोलणीं ।
तैशी जाण ते काहाणी । दुगळींचि ते
वांचूनि आम्हीं निरूपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसें ।
आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा
तरी कोणाचेनि संतानें । निपजती तया उन्मूळणें ।
काय फुंकिलिया गगनें । जाइजेल गा
म्हणौनि पैं धनंजया । आम्हीं वानिलें रूप तें माया ।
कासवीचेनि तुपें राया । वोगरिलें जैसें
मृगजळाचीं गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं ।
वांचूनि तेणें पाणियें साळी केळी । लाविसी काई ?
मूळ अज्ञानचि तंव लटिकें । मा तयाचें कार्य हें केतुकें ।
म्हणौनि संसाररुख सतुकें । वावोचि गा
आणि अंतु यया नाहीं । ऐसें बोलिजे जें कांहीं ।
तेंही साचचि पाहीं । येकें परी
तरी प्रबोधु जंव नोहे । तंव निद्रे काय अंतु आहे ? ।
कीं रात्री न सरे तंव न पाहे । तया आरौतें ?
तैसा जंव पार्था । विवेकु नुधवी माथा ।
तंव अंतु नाहीं अश्वत्था । भवरूपा या
वाजतें वारें निवांत । जंव न राहे जेथिंचें तेथ ।
तंव तरंगतां अनंत । म्हणावीचि कीं
म्हणौनि सूर्यु जैं हारपे । तैं मृगजळाभासु लोपे ।
कां प्रभा जाय दीपें । मालवलेनि
तैसें मूळ अविद्या खाये । तें ज्ञान जैं उभें होये ।
तैंचि यया अंतु आहे । एऱहवीं नाहीं
तेवींचि हा अनादी । ऐसी ही आथी शाब्दी ।
तो आळु नोहे अनुरोधी । बोलातें या
जें संसारवृक्षाच्या ठायीं । साचोकार तंव नाहीं ।
मा नाहीं तया आदि काई । कोण होईल ?
जो साच जेथूनि उपजे । तयातें आदि हें साजे ।
आतां नाहींचि तो म्हणिजे । कोठूनियां ?
म्हणौनि जन्मे ना आहे । ऐसिया सांगों कवण माये ।
यालागीं नाहींपणेंचि होये । अनादि हा
वांझेचिया लेंका । कैंची जन्मपत्रिका ।
नभीं निळी भूमिका । कें कल्पूं पां
व्योमकुसुमांचा पांडवा । कवणें देंठु तोडावा ।
म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैंची ?
जैसें घटाचें नाहींपण । असतचि असे केलेनिवीण ।
तैसा समूळ वृक्षु जाण । अनादि हा
अर्जुना ऐसेनि पाहीं । आद्यंतु ययासि नाहीं ।
माजीं स्थिती आभासे कांहीं । परी टवाळ ते
ब्रह्मगिरीहूनि न निगे । आणि समुद्रींही कीर न रिगे ।
माजीं दिसे वाउगें । मृगांबु जैसें
तेसा आद्यंती कीर नाहीं । आणि साचही नोहे कहीं ।
परी लटिकेपणाची नवाई । पडिभासे गा
नाना रंगीं गजबजे । जैसें इंद्रधनुष्य देखिजे ।
तैसा नेणतया आपजे । आहे ऐसा
ऐसेनि स्थितीचिये वेळे । भुलवी अज्ञानाचे डोळे ।
लाघवी हरी मेखळे । लोकु जैसा
आणि नसतीचि श्यामिका । व्योमीं दिसे तैसी दिसो कां ।
तरी दिसणेंही क्षणा एका । होय जाय
स्वप्नींही मानिलें लटिकें । तरी निर्वाहो कां एकसारिखें ।
तेवीं आभासु हा क्षणिकें । रिताचि गा
देखतां आहे आवडें । घेऊं जाइजे तरी नातुडे ।
जैसा टिकु कीजे माकडें । जळामाजीं
तरंगभंगु सांडीं पडे । विजूही न पुरे होडे ।
आभासासि तेणें पाडें । होणें जाणें गा
जैसा ग्रीष्मशेषींचा वारा । नेणिजे समोर कीं पाठीमोरा ।
तैसी स्थिती नाहीं तरुवरा । भवरूपा यया
एवं आदि ना अंतु स्थिती । ना रूप ययासि आथी ।
आतां कायसी कुंथाकुंथी । उन्मूळणी गा
आपुलिया अज्ञानासाठीं । नव्हता थांवला किरीटी ।
तरी आतां आत्माज्ञानाच्या लोटीं । खांडेनि गा
वांचूणि ज्ञानेवीण ऐकें । उपाय करिसी जितुके ।
तिहीं गुंफसि अधिकें । रुखीं इये
मग किती खांदोखांदीं । यया हिंडावें ऊर्ध्वीं अधीं ।
म्हणौनि मूळचि अज्ञान छेदीं । सम्यक् ज्ञानें
एऱहवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा ।
तो शिणुचि वाउगा । केला होय
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- ।
माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं
तेवीं नाथिलिया संसारा । उपाईं जाचतया वीरा ।
आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय
म्हणौनि स्वप्नींचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया ।
तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग
परी तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नवें ।
अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा
उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें ।
जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें
हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा ।
विटवी तो होआवा । वैराग्य लाठु
मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे ।
प्रत्यक्बुद्धी करतळें । हातवसावें
निसळें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें ।
मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेचि
परी निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ ।
मग तुळावें अति चोखाळ । मननवरी
पाठीं हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया ।
पुढें दुजें नुरेल घाया- । पुरतें गा
तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाडें ।
नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी
शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा ।
का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी
नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो ।
स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें
तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ ।
तें कांहींचि न दिसे मृगजळ । चादिणां जेवीं
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता ।
छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें ।
तें रूप पाहिजे आपलें । आपणचि
परी दर्पणाचेनि आधारें । एकचि करून दुसरें ।
मुख पाहाती गव्हारें । तैसें नको हो
हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा ।
मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके
नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब ।
निहटे कां नभीं नभ । घटाभावीं
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवीं आपणपयां ।
तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा
जिव्हे आपली चवी चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें ।
आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं
कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे ।
नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये
आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें ।
तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे
जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे ।
आद्यपुरुष कां म्हणिजे । जया ठायातें
तेथही उपाधीचा वोथंबा । घेऊनि श्रुति उभविती जिभा ।
मग नामरूपाचा वडंबा । करिती वायां
पैं भवस्वर्गा उबगले । मुमुक्षु योगज्ञाना वळघले ।
पुढती न यों इया निगाले । पैजा जेथ
संसाराचिया पायां पुढां । पळती वीतराग होडा ।
ओलांडोनि ब्रह्मपदाचा कर्मकडा । घालिती मागां
अहंतादिभावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेया ।
पत्र घेती ज्ञानिये जया । मूळघरासी
पैं जेथुनी हे एवढी । विश्वपरंपरेची वेलांडी ।
वाढती आशा जैशी कोरडी । निदैवाची
जिये कां वस्तूचें नेणणें । आणिलें थोर जगा जाणणें ।
नाहीं तें नांदविलें जेणें । मी तूं जगीं
पार्था तें वस्तु पहिलें । आपणपें आपुलें ।
पाहिजे जैसें हिंवलें । हिंव हिंवें
आणीकही एक तया । वोळखण असे धनंजया ।
तरी जया कां भेटलिया । येणेंचि नाहीं
परी तया भेटती ऐसें । जे ज्ञानें सर्वत्र सरिसे ।
महाप्रळयांबूचे जैसें । भरलेपण
जया पुरुषांचें कां मन । सांडोनि गेलें मोह मान ।
वर्षांतीं जैसें घन । आकाशातें
निकवड्या निष्ठुरा । उबगिजे जेवीं सोयरा ।
तैसें नागवती विकारां । वेटाळूं जे
फळली केळी उन्मूळे । तैसी आत्मलाभें प्रबळे ।
तयाची क्रिया ढाळेंढाळें । गळती आहे
आगी लगलिया रुखीं । देखोनि सैरा पळती पक्षी ।
तैसें सांडिलें अशेखीं । विकल्पीं जे
आइकें सकळ दोषतृणीं । अंकुरिजती जिये मेदिनी ।
तिये भेदबुद्धीची काहाणी । नाहीं जयातें
सूर्योदयासरिसी । रात्री पळोनि जाय अपैसी ।
गेली देहाहंता तैसी । अविद्येसवें
पैं आयुष्यहीना जीवातें । शरीर सांडी जेवीं अवचितें ।
तेवीं निदसुरें द्वैतें । सांडिले जे
लोहाचें साम्कडें परिसा । न जोडे अंधारु रवि जैसा ।
द्वैतबुद्धीचा तैसा । सदा दुकाळ जया
अगा सुखदुःखाकारें । द्वंद्वें देहीं जियें गोचरें ।
तियें जयां कां समोरें । होतीचिना
स्वप्नींचें राज्य कां मरण । नोहे हर्षशोकांसि कारण ।
उपवढलिया जाण । जियापरी
तैसेम् सुखदुःखरूपीं । द्वंद्वीं जे पुण्यपापीं ।
न घेपिजती सर्पीं । गरुड जैसें
आणि अनात्मवर्गनीर । सांडूनि आत्मरसाचें क्षीर ।
चरताति जे सविचार । राजहंसु
जैसा वर्षोनि भूतळीं । आपला रसु अंशुमाळी ।
मागौता आणी रश्मिजाळीं । बिंबासीचि
तैसें आत्मभ्रांतीसाठीं । वस्तु विखुरली बारावाटीं ।
ते एकवटिती ज्ञानदृष्टी । अखंड जे
किंबहुना आत्मयाचा । निर्धारीं विवेकु जयांचा ।
बुडाला वोघु गंगेचा । सिंधूमाजीं जैसा
पैं आघवेंचि आपुलेंपणें । नुरेचि जया अभिलाषणें ।
जैसें येथूनि पऱहां जाणें । आकाशा नाहीं
जैसा अग्नीचा डोंगरु । नेघे कोणी बीज अंकुरु ।
तैसा मनीं जयां विकारु । उदैजेना
जैसा काढिलिया मंदराचळु । राहे क्षीराब्धि निश्चळु ।
तैसा नुठी जयां सळु । कामोर्मीचा
चंद्रमा कळीं धाला । न दिसे कोणें आंगी वोसावला ।
तेवीं अपेक्षेचा अवखळा । न पडे जयां
हें किती बोलूं असांगडें । जेवीं परमाणु नुरे वायूपुढें ।
तैसें विषयांचें नावडे । नांवचि जयां
एवं जे जे कोणी ऐसे । केले ज्ञानाग्नि हुताशें ।
ते तेथ मिळती जैसें । हेमीं हेम
तेथ म्हणिजे कवणें ठाईं । ऐसेंही पुससी कांहीं ।
तरी तें पद गा नाहीं । वेंचु जया
दृश्यपणें देखिजे । कां ज्ञेयत्वें जाणिजे ।
अमुकें ऐसें म्हणिजे । तें जें नव्हे
पैं दीपाचिया बंबाळीं । कां चंद्र हन जें उजळी ।
हें काय बोलों अंशुमाळी । प्रकाशी जें
तें आघवेंचि दिसणें । जयाचें कां न देखणें ।
विश्व भासतसे जेणें । लपालेनी
जैसें शिंपीपण हारपे । तंव तंव खरें होय रुपें ।
कां दोरी लोपतां सापें । फार होइजे
तैसीं चंद्रसूर्यादि थोरें । इयें तेजें जियें फारें ।
तियें जयाचेनि आधारें । प्रकाशती
ते वस्तु कीं तेजोराशी । सर्वभूतात्मक सरिसी ।
चंद्रसूर्याच्या मानसीं । प्रकाशे जे
म्हणौनि चंद्रसूर्य कडवसां । पडती वस्तूच्या प्रकाशा ।
यालागीं तेज जें तेजसा । तें वस्तूचें आंग
आणि जयाच्या प्रकाशीं । जग हारपे चंद्रार्केंसीं ।
सचंद्र नक्षत्रें जैसीं । दिनोदयीं
नातरी प्रबोधलिये वेळे । ते स्वप्नींची डिंडीमा मावळे ।
कां नुरेचि सांजवेळे । मृगतृष्णिका
तैसा जिये वस्तूच्या ठायीं । कोण्हीच कां आभासु नाहीं ।
तें माझें निजधाम पाहीं । पाटाचें गा
पुढती जे तेथ गेले । ते न घेती माघौतीं पाउलें ।
महोदधीं कां मिनले । स्रोत जैसे
कां लवणाची कुंजरी । सूदलिया लवणसागरीं ।
होयचि ना माघारी । परती जैसी
नाना गेलिया अंतराळा । न येतीचि वन्हिज्वाळा ।
नाहीं तप्तलोहौनि जळा । निघणें जेवीं
तेवीं मजसीं एकवट । जे जाले ज्ञानें चोखट ।
तयां पुनरावृत्तीची वाट । मोडली गा
तेथ प्रज्ञापृथ्वीचा रावो । पार्थु म्हणे जी जी पसावो ।
परी विनंती एकी देवो । चित्त देतु
तरी देवेंसि स्वयें एक होती । मग माघौते जे न येती ।
ते देवेंसि भिन्न आथी । कीं अभिन्न जी
जरी भिन्नचि अनादिसिद्ध । तरी न येती हें असंबद्ध ।
जे फुलां गेलें षट्पद । ते फुलेंचि होती पां
पैं लक्ष्याहूनि अनारिसे । बाण लक्ष्यीं शिवोनि जैसें ।
मागुते पडती तैसे । येतीचि ते
नातरी तूंचि ते स्वभावें । तरी कोणें कोणासि मिळावें ।
आपणयासी आपण रुपावें । शस्त्रें केवीं ?
म्हणौनि तुजसी अभिन्नां जीवां । तुझा संयोगवियोगु देवा ।
नये बोलों अवयवां । शरीरेंसीं
आणि जे सदां वेगळें तुजसीं । तयां मिळणीं नाहीं कोणे दिवशीं ।
मा येती न येती हे कायसी । वायबुद्धि ?
तरी कोण गा ते तूंतें । पावोनि न येती माघौते ।
हें विश्वतोमुखा मातें । बुझावीं जी
इये आक्षेपीं अर्जुनाच्या । तो शिरोमणि सर्वज्ञांचा ।
तोषला बोध शिष्याचा । देखोनियां
मग म्हणे गा महामती । मातें पावोनि न येती पुढती ।
ते भिन्नाभिन्न रिती । आहाती दोनी
जैं विवेकें खोलें पाहिजे । तरी मी तेचि ते सहजें ।
ना आहाचवाहाच तरी दुजे । ऐसेही गमती
जैसे पाणियावरी वेगळ । तळपतां दिसती कल्लोळ ।
एऱहवीं तरी निखिळ । पाणीचि तें
कां सुवर्णाहुनि आनें । लेणीं गमती भिन्नें ।
मग पाहिजे तंव सोनें । आघवेंचि तें
तैसें ज्ञानाचिये दिठी । मजसीं अभिन्नचि ते किरीटी ।
येर भिन्नपण तें उठी । अज्ञानास्तव
आणि साचोकारेनि वस्तुविचारें । कैचें मज एकासि दुसरें ।
भिन्नाभिन्नव्यवहारें । उमसिजेल
आघवेंचि आकाश सूनि पोटीं । बिंबचि जैं आते खोटी ।
तैं प्रतिबिंब कें उठी । कें रश्मि शिरे ?
कां कल्पांतींचिया पाणिया । काय वोत भरिती धनंजया ? ।
म्हणौनि कैंचें अंश अविक्रिया । एका मज
परी ओघाचेनि मेळें । पाणी उजू परी वांकुडें जालें ।
रवी दुजेपण आलें । तोयबगें
.व्योम चौफळें कीं वाटोळें । हें ऐसें कायिसयाही मिळे ।
परी घटमठीं वेंटाळें । तैसेंही आथी
हां गा निद्रेचेनि आधारें । काय एकलेनि जग न भरे ? ।
स्वप्नींचेनि जैं अवतरे । रायपणें
कां मिनलेनि किडाळें । वानिभेदासि ये सोळें ।
तैसा स्वमाये वेंटाळें । शुद्ध जैं मी
तैं अज्ञान एक रूढे । तेणें कोऽहंविकल्पाचें मांडे ।
मग विवरूनि कीजे फुडें । देहो मी ऐसें
ऐसें शरीराचि येवढें । जै आत्मज्ञान वेगळें पडे ।
तैं माझा अंशु आवडे । थोडेपणें
समुद्र कां वायुवशें । तरंगाकार उल्लसें ।
तो समुद्रांशु ऐसा दिसे । सानिवा जेवीं
तेवीं जडातें जीवविता । देहाहंता उपजविता ।
मी जीव गमें पंडुसुता । जीवलोकीं
पैं जीवाचिया बोधा । गोचरु जो हा धांदा ।
तो जीवलोकशब्दा । अभिप्रावो
अगा उपजणें निमणें । हें साचचि जे कां मानणें ।
तो जीवलोकु मी म्हणे । संसारु हन
एवंविध जीवलोकीं । तूं मातें ऐसा अवलोकीं ।
जैसा चंद्रु कां उदकीं । उदकातीत
पैं काश्मीराचा रवा । कुंकुमावरी पांडवा ।
आणिका गमे लोहिवा । तो तरी नव्हे
तैसें अनादिपण न मोडे । माझें अक्रियत्व न खंडे ।
परी कर्ता भोक्ता ऐसें आवडे । ते जाण गा भ्रांती
किंबहुना आत्मा चोखटु । होऊनि प्रकृतीसी एकवटु ।
बांधे प्रकृतिधर्माचा पाटु । आपणपयां
पैं मनादि साही इंद्रियें । श्रोत्रादि प्रकृतिकार्यें ।
तियें माझीं म्हणौनि होये । व्यापारारूढ
जैसें स्वप्नीं परिव्राजें । आपणपयां आपण कुटुंब होईजे ।
मग तयाचेनि धांविजे । मोहें सैरा
तैसा आपलिया विस्मृती । आत्मा आपणचि प्रकृती- ।
सारिखा गमोनि पुढती । तियेसीचि भजे
मनाच्या रथीं वळघे । श्रवणाचिया द्वारें निघे ।
मग शब्दाचिया रिघे । रानामाजीं
तोचि प्रकृतीचा वागोरा । त्वचेचिया मोहरा ।
आणि स्पर्शाचिया घोरा । वना जाय
कोणे एके अवसरीं । रिघोनि नेत्राच्या द्वारीं ।
मग रूपाच्या डोंगरीं । सैरा हिंडे
कां रसनेचिया वाटा । निघोनि गा सुभटा ।
रसाचा दरकुटा । भरोंचि लागे
नातरी येणेंचि घ्राणें । जैं देहांशु करी निघणें ।
मग गंधाची दारुणें । आडवें लंघी
ऐसेनि देहेंद्रियनायकें । धरूनि मन जवळिकें ।
भोगिजती शब्दादिकें । विषयभरणें
परी कर्ता भोक्ता ऐसें । हें जीवाचे तैंचि दिसे ।
जैं शरीरीं कां पैसे । एकाधिये
जैसा आथिला आणि विलासिया । तैंचि वोळखों ये धनंजया ।
जैं राजसेव्या ठाया । वस्तीसि ये
तैसा अहंकर्तृत्वाचा वाढु । कां विषयेंद्रियांचा धुमाडु ।
हा जाणिजे तैं निवाडु । जैं देह पाविजे
अथवा शरीरातें सांडी । तऱही इंद्रियांची तांडी ।
हे आपणयांसवें काढी । घेऊनि जाय
जैसा अपमानिला अतिथी । ने सुकृताची संपत्ति ।
कां साइखडेयाची गती । सूत्रतंतू
नाना मावळतेनि तपनें । नेइजेती लोकांचीं दर्शनें ।
हें असो द्रुती पवनें । नेईजे जैसी
तेवीं मनःषष्ठां ययां । इंद्रियांतें धनंजया ।
देहराजु ने देहा- । पासूनि गेला
मग येथ अथवा स्वर्गीं । जेथ जें देह आपंगी ।
तेथ तैसेंचि पुढती पांगी । मनादिक
जैसा मालवलिया दिवा । प्रभेसी जाय पांडवा ।
मग उजळिजे तेथ तेधवां । तैसाचि फांके
तरी ऐसैसिया राहाटी । अविवेकियांचे दिठी ।
येतुलें हें किरीटी । गमेचि गा
जे आत्मा देहासि आला । आणि विषयो येणेंचि भोगिला ।
अथवा देहोनि गेला । हें साचचि मानिती
एऱहवीं येणें आणि जाणें । कां करणें हा भोगणें ।
हें प्रकृतीचें तेणें । मानियेलें
परी देहाचे मोटकें उभें । आणि चेतना तेथ उपलभे ।
तिये चळवळेचेनि लोभें । आला म्हणती
तैसेंचि तयां संगती । इंद्रियें आपुलाल्या अर्थीं वर्तती ।
तया नांव सुभद्रापती । भोगणें जया
पाठीं भोगक्षीण आपैसे । देह गेलिया ते न दिसे ।
तेथें गेला गेला ऐसें । बोभाती गा
पैं रुखु डोलतु देखावा । तरी वारा वाजतु मानावा ।
रुखु नसे तेथें पांडवा । नाहीं तो गा ?
कां आरिसा समोर ठेविजे । आणि आपणपें तेथ देखिजे ।
तरी तेधवांचि जालें मानिजे । काय आधीं नाहीं ?
कां परता केलिया आरिसा । लोपु जाला तया आभासा ।
तरी आपणपें नाहीं ऐसा । निश्चयो करावा ?
शब्द तरी आकाशाचा । परी कपाळीं पिटे मेघाचा ।
कां चंद्रीं वेगु अभ्राचा । अरोपिजे
तैसें होइजे जाइजे देहें । तें आत्मसत्ते अविक्रिये ।
निष्टंकिती गा मोहें । आंधळे ते
येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं । देखिजे देहींचा धर्मु देहीं ।
ऐसें देखणें तें पाहीं । आन आहाती
ज्ञानें कां जयाचे डोळे । देखोनि न राहती देहींचे खोळे ।
सूर्यरश्मी आणियाळे । ग्रीष्मीं जैसें
तैसे विवेकाचेनि पैसें । जयांची स्फूर्ती स्वरूपीं बैसे ।
ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयातें
जैसें तारांगणीं भरलें । गगन समुद्रीं बिंबलें ।
परी तें तुटोनि नाहीं पडिलें । ऐसें निवडे
गगन गगनींचि आहे । हें आभासे तें वाये ।
तैसा आत्मा देखती देहें । गंवसिलाही
खळाळाच्या लगबगीं । फेडूनि खळाळाच्या भागीं ।
देखिजे चंद्रिका कां उगी । चंद्रीं जेवीं
कां नाडरचि भरे शोषें । सूर्यु तो जैसा तैसाचि असे ।
देह होतां जातां तैसें । देखती मातें
घटु मठु घडले । तेचि पाठीं मोडले ।
परी आकाश तें संचलें । असतचि असे
तैसें अखंडे आत्मसत्ते । अज्ञानदृष्टि कल्पितें ।
हें देहचि होतें जातें । जाणती फुडें
चैतन्य चढे ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे ।
ऐसें आत्मज्ञानें चोखटें । जाणती ते
आणि ज्ञानही आपैतें होईल । प्रज्ञा परमाणुही उगाणा घेईल ।
सकळ शास्त्रांचें येईल । सर्वस्व हातां
परी ते व्युत्पत्ति ऐसी । जरी विरक्ति न रिगे मानसीं ।
तरी सर्वात्मका मजसीं । नव्हेचि भेटी
पैं तोंड भरो कां विचारा । आणि अंतःकरणीं विषयांसि थारा ।
तरी नातुडें धनुर्धरा । त्रिशुद्धी मी
हां गा वोसणतयाच्या ग्रंथीं । काई तुटती संसारगुंती ? ।
कीं परिवसिलिया पोथी । वाचिली होय ?
नाना बांधोनियां डोळे । घ्राणीं लाविजती मुक्ताफळें ।
तरी तयांचें काय कळे । मोल मान ?
तैसा चित्तीं अहंते ठावो । आणि जिभे सकळशास्त्रांचा सरावो ।
ऐसेनि कोडी एक जन्म जावो । परी न पविजे मातें
जो एक मी कां समस्तीं । व्यापकु असें भूतजातीं ।
ऐक तिये व्याप्ती । रूप करूं
तरी सूर्यासकट आघवी । हे विश्वरचना जे दावी ।
ते दीप्ति माझी जाणावी । आद्यंतीं आहे
जल शोषूनि गेलिया सविता । ओलांश पुरवीतसे जे माघौता ।
ते चंद्रीं पंडुसुता । ज्योस्ना माझी
आणि दहन-पाचनसिद्धी । करीतसे जें निरवधी ।
ते हुताशीं तेजोवृद्धी । माझीचि गा
मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं ।
हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना
आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें ।
तियें मीचि धरी धरे । रिगोनियां
गगनीं मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता ।
भरला जालों चालता । सरोवरु
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार ।
सर्वौषधींचे आगर । भरित असें मी
ऐसेनि सस्यादिकां सकळां । करी धान्यजाती सुकाळा ।
दें अन्नद्वारां जिव्हाळा । भूतजातां
आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैचें दीपन ।
जेणें जिरूनि समाधान । भोगिती जीव
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठी ।
दीप्ति जठरींही किरीटी । मीचि जालों
प्राणापानाच्या जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती ।
आटीतसें नेणों किती । उदरामाजीं
शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें कां विदग्धें ।
परी मीचि गा चतुर्विधें । अन्नें पचीं
एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन ।
जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि
आतां ऐसियाहीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई ।
येथ दुजें नाहींचि घेईं । सर्वत्र मी गा
तरी कैसेनि पां वेखें । सदा सुखियें एकें ।
एकें तियें बहुदुःखें । क्रांत भूतें
जैसी सगळिये पाटणीं । एकेंचि दीपें दिवेलावणी ।
जालिया कां न देखणी । उरलीं एकें
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसीं कीं ।
तरी परिस तेही निकी । शंका फेडुं
पैं आघवा मीचि असें । येथ नाहीं कीर अनारिसें ।
परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा
जैसें एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषीं आनानीं ।
वाजावें पडे भिन्नीं । नादांतरीं
कां लोकचेष्टीं वेगळालां । जो हा एकचि भानु उदैला ।
तो आनानी परी गेला । उपयोगासी
नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजविलें आप ।
तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवां
अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा ।
नेणा सर्पत्वें जाला येरा । सुखालागीं
हें असो स्वातीचें उदक । शुक्तीं मोतीं व्याळीं विख ।
तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तों अज्ञानांसी
एऱहवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी ।
जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी
परी संतासवें वसतां । योगज्ञानीं पैसतां ।
गुरुचरण उपासितां । वैराग्येंसीं
येणेंचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे ।
जयांचें अहं विश्रामे । आत्मरूपीं
ते आपेआप देखोनि देखीं । मियां आत्मेनि सदा सुखी ।
येथें मीवांचून अवलोकीं । आन हेतु असे ?
अगा सूर्योदयो जालिया । सूर्यें सूर्यचि पहावा धनंजया ।
तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु
ना शरीरपरातें सेवितां । संसारगौरवचि ऐकतां ।
देहीं जयांची अहंता । बुडोनि ठेली
ते स्वर्गसंसारालागीं । धांवतां कर्ममार्गीं ।
दुःखाच्या सेलभागीं । विभागी होती
परी हेंही होणें अर्जुना । मजचिस्तव तया अज्ञाना ।
जैसा जागताचि हेतु स्वप्ना । निद्रेतें होय
पैं अभ्रें दिवसु हरपला । तोहि दिवसेंचि जाणों आला ।
तेवीं मी नेणोनि विषयो देखिला । मजचिस्तव भूतीं
एवं निद्रा कां जागणिया । प्रबोधुचि हेतु धनंजया ।
तेवीं ज्ञाना अज्ञाना जीवां यां । मीचि मूळ
जैसें सर्पत्वा कां दोरा । दोरुचि मूळ धनुर्धरा ।
तैसा ज्ञाना अज्ञानाचिया संसारा । मियांचि सिद्धु
म्हणौनि जैसा असें तैसया । मातें नेणोनि धनंजया ।
वेदु जाणों गेला तंव तया । जालिया शाखा
तरी तिहीं शाखाभेदीं । मीचि जाणिजे त्रिशुद्धी ।
जैसा पूर्वापरा नदी । समुद्रचि ठी
आणि महासिद्धांतापासीं । श्रुति हारपतीं शब्देंसीं ।
जैसिया सगंधा आकाशीं । वातलहरी
तैसें समस्तही श्रुतिजात । ठाके लाजिले ऐसें निवांत ।
तें मीचि करीं यथावत । प्रकटोनियां
पाठीं श्रुतिसकट अशेष । जग हारपे जेथ निःशेष ।
तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि
जैसें निदेलिया जागिजे । तेव्हां स्वप्नींचे कीर नाहीं दुजें ।
परी एकत्वही देखों पाविजे । आपलेंचि
तैसें आपलें अद्वयपण । मी जाणतसें दुजेनवीण ।
तयाही बोधाकारण । जाणता मीचि
मग आगी लागलिया कापुरा । ना काजळी ना वैश्वानरा ।
उरणें नाहीं वीरा । जयापरी
तेवीं समूळ अविद्या खाये । तें ज्ञानही जैं बुडोनि जाये ।
तऱही नाहीं कीर नोहे । आणि न साहे असणेंही
पैं विश्व घेऊनि गेला मागेंसीं । तया चोरातें कवण कें गिंवसी ? ।
जे कोणी एकी दशा ऐसी । शुद्ध ते मी
ऐसी जडाजडव्याप्ती । रूप करितां कैवल्यपती ।
ठी केली निरुपहितीं । आपुल्या रूपीं
तो आघवाचि बोधु सहसा । अर्जुनीं उमटला कैसा ।
व्योमींचा चंद्रोदयो जैसा । क्षीरार्णवीं
कां प्रतिभिंती चोखटे । समोरील चित्र उमटे ।
तैसा अर्जुनें आणि वैकुंठें । नांदतसे बोधु
तरी बाप वस्तुस्वभावो । फावे तंव तंव गोडिये थांवो ।
म्हणौनि अनुभवियांचा रावो । अर्जुन म्हणे
जी व्यापकपण बोलतां । निरुपाधिक जें आतां ।
स्वरूप प्रसंगता । बोलिले देवो
ते एक वेळ अव्यंगवाणें । कीजो कां मजकारणें ।
तेथ द्वारकेचा नाथु म्हणे । भलें केलें
पैं अर्जुना आम्हांहि वाडेंकोडें । अखंडा बोलों आवडे ।
परी काय कीजे न जोडे । पुसतें ऐसें
आजि मनोरथांसि फळ । जोडलासि तूं केवळ ।
जे तोंड भरूनि निखळ । आलासि पुसों
जें अद्वैताहीवरी भोगिजे । तें अनुभवींच तूं विरजे ।
पुसोनि मज माझें । देतासि सुख
जैसा आरिसा आलिया जवळां । दिसे आपणपें आपला डोळा ।
तैसा संवादिया तूं निर्मळा । शिरोमणी
तुवां नेणोनि पुसावें । मग आम्ही परिसऊं बैसावें ।
तो गा हा पाडु नव्हे । सोयरेया
ऐसें म्हणौनि आलिंगिलें । कृपादृष्टी अवलोकिलें ।
मग देवो काय बोलिले । अर्जुनेंसीं
पैं दोहीं वोठीं एक बोलणें । दोहीं चरणीं एक चालणें ।
तैसें पुसणें सांगणें । तुझें माझें
एवं आम्ही तुम्ही येथें । देखावें एका अर्थातें ।
सांगतें पुसतें येथें । दोन्ही एक
ऐसा बोलत देवो भुलला मोहें । अर्जुनातें आलिंगूनि ठाये ।
मग बिहाला म्हणे नोहें । आवडी हे
जाले इक्षुरसाचें ढाळ । तरी लवण देणें किडाळ ।
जे संवादसुखाचें रसाळ । नासेल थितें
आधींच आम्हां यया कांहीं । नरनारायणासी भिन्न नाहीं ।
परी आतां जिरो माझ्या ठाईं । वेगु हा माझा
इया बुद्धी सहसा । श्रीकृष्ण म्हणे वीरेशा ।
पैं गा तो तुवां कैसा । प्रश्नु केला ?
जो अर्जुन श्रीकृष्णीं विरत होता । तो परतोनि मागुता ।
प्रश्नावळीची कथा । ऐकों आला
तेथ सद्गदें बोलें । अर्जुनें जी जी म्हणितलें ।
निरुपाधिक आपुलें । रूप सांगा
यया बोला तो शारङ्गी । तेंचि सांगावयालागीं ।
उपाधी दोहीं भागीं । निरूपीत असे
पुसिलिया निरुपहित । उपाधि कां सांगे येथ ।
हें कोण्हाही प्रस्तुत । गमे जरी
तरी ताकाचें अंश फेडणें । याचि नांव लोणी काढणें ।
चोखाचिये शुद्धी तोडणें । कीडचि जेवीं
बाबुळीचि सारावी हातें । परी पाणी तंव असे आइतें ।
अभ्रचि जावें गगन तें । सिद्धचि कीं
वरील कोंडियाचा गुंडाळा । झाडूनि केलिया वेगळा ।
कणु घेतां विरंगोळा । असे काई ?
तैसा उपाधि उपहितां । शेवटु जेथ विचारितां ।
तें कोणातेंही न पुसतां । निरुपाधिक
जैसें न सांगणेंवरी । बाळा पतीसी रूप करी ।
बोल निमालेपणें विवरी । अचर्चातें
पैं सांगणेया जोगें नव्हे । तेथींचें सांगणें ऐसें आहे ।
म्हणौनि उपाधि लक्ष्मीनाहे । बोलिजे आदीं
पाडिव्याची चंद्ररेखा । निरुती दावावया शाखा ।
दाविजे तेवीं औपाधिका । बोली इया
मग तो म्हणे गा सव्यसाची । पैं इये संसारपाटणींची ।
वस्ती साविया टांची । दुपुरुषीं
जैसी आघवांचि गगनीं । नांदत दिवोरात्री दोन्ही ।
तैसे संसार राजधानीं । दोन्हीचि हे
आणिकही तिजा पुरुष आहे । परी तो या दोहींचें नांव न साहे ।
जो उदेला गांवेंसीं खाये । दोहींतें ययां
परी ते तंव गोठी असो । आधीं दोन्हींची हे परियेसों ।
जें संसारग्रामा वसों । आले असती
एक आंधळा वेडा पंगु । येर सर्वांगें पुरता चांगु ।
परी ग्रामगुणें संगु । घडला दोघां
तया एका नाम क्षरु । येरातें म्हणती अक्षरु ।
इहीं दोहींचि परी संसारु । कोंदला असे
आतां क्षरु तो कवणु । अक्षरु तो किं लक्षणु ।
हा अभिप्रायो संपूर्णु । विवंचूं गा
तरी महदहंकारा- । लागुनियां धनुर्धरा ।
तृणांतींचा पांगोरा- । वरी पैं गा
जें कांहीं सानें थोर । चालतें अथवा स्थिर ।
किंबहुना गोचर । मनबुद्धींसि जें
जेतुलें पांचभौतिक घडतें । जें नामरूपा सांपडतें ।
गुणत्रयाच्या पडतें । कामठां जें
भूताकृतीचें नाणें । घडत भांगारें जेणें ।
काळासि जूं खेळणें । जिहीं कवडां
जाणणेंचि विपरीतें । जें जें कांहीं जाणिजेतें ।
जें प्रतिक्षणीं निमतें । होऊनियां
अगा काढूनि भ्रांतीचे दांग । उभवी सृष्टीचें आंग ।
हें असो बहु जग । जया नाम
पैं अष्टधा भिन्न ऐसें । जें दाविलें प्रकृतिमिसें ।
जें क्षेत्रद्वारां छत्तिसें । भागी केलें
हें मागील सांगों किती । अगा आतांचि जें प्रस्तुतीं ।
वृक्षाकार रूपाकृती । निरूपिलें
तें आघवेंचि साकारें । कल्पुनी आपणपयां पुरे ।
जालें असें तदनुसारें । चैतन्यचि
जैसा कुहां आपणचि बिंबें । सिंह प्रतिबिंब पाहतां क्षोभे ।
मग क्षोभला समारंभें । घाली तेथ
कां सलिलीं असतचि असे । व्योमावरी व्योम बिंबे जैसें ।
अद्वैत होऊनि तैसें । द्वैत घेपे
अर्जुना गा यापरी । साकार कल्पूनि पुरीं ।
आत्मा विस्मृतीचि करी । निद्रा तेथ
पैं स्वप्नीं सेजार देखिजे । मग पहुडणें जैसें तेथ कीजे ।
तैसें पुरीं शयन देखिजे । आत्मयासी
पाठीं तिये निद्रेचेनि भरें । मी सुखी दुःखी म्हणत घोरें ।
अहंममतेचेनि थोरें । वोसणायें सादें
हा जनकु हे माता । हा मी गौर हीन पुरता ।
पुत्र वित्त कांता । माझें हें ना
ऐसिया वेंघोनि स्वप्ना । धांवत भवस्वर्गाचिया राना ।
तया चैतन्या नाम अर्जुना । क्षर पुरुषु गा
आतां ऐक क्षेत्रज्ञु येणें । नामें जयातें बोलणें ।
जग जीवु कां म्हणे । जिये दशेतें
जो आपुलेनि विसरें । सर्व भूतत्वें अनुकरें ।
तो आत्मा बोलिजे क्षरें । पुरुष नामें
जे तो वस्तुस्थिती पुरता । म्हणौनि आली पुरुषता ।
वरी देहपुरीं निदैजतां । पुरुषनामें
आणि क्षरपणाचा नाथिला । आळु यया ऐसेनि आला ।
जे उपाधींचि आतला । म्हणौनियां
जैसी खळाळीचिया उदका- । सरसीं आंदोळे चंद्रिका ।
तैसा विकारां औपाधिका । ऐसाचि गमे
कां खळाळु मोटका शोषे । आणि चंद्रिका तैं सरिसींच भ्रंशे ।
तैसा उपाधिनाशीं न दिसे । उपाधिकु
ऐसें उपाधीचेनि पाडें । क्षणिकत्व यातें जोडे ।
तेणें खोंकरपणें घडे । क्षर हें नाम
एवं जीवचैतन्य आघवें । हें क्षर पुरुष जाणावें ।
आतां रूप करूं बरवें । अक्षरासी
तरी अक्षरु जो दुसरा । पुरुष पैं धनुर्धरा ।
तो मध्यस्थु गा गिरिवरां । मेरु जैसा
जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गीं । इहीं न भेदे तिहीं भागीं ।
तैसा दोहीं ज्ञानाज्ञानांगीं । पडेना जो
ना यथार्थज्ञानें एक होणें । ना अन्यथात्वें दुजें घेणें ।
ऐसें निखिळ जें नेणणें । तेंचि तें रूप
पांसुता निःशेष जाये । ना घटभांडादि होये ।
तया मृत्पिंडा ऐसें आहे । मध्यस्थ जें
पैं आटोनि गेलिया सागरु । मग तरंगु ना नीरु ।
तया ऐशी अनाकारु । जे दशा गा
पार्था जागणें तरी बुडे । परी स्वप्नाचें कांहीं न मांडे ।
तैसिये निद्रे सांगडें । न्याहाळणें जें
विश्व आघवेंचि मावळे । आणि आत्मबोधु तरी नुजळे ।
तिये अज्ञानदशे केवळे । अक्षरु नाम
सर्वां कळीं सांडिलें जैसें । चंद्रपण उरे अंवसे।
रूप जाणावें तैसें । अक्षराचें
पैं सर्वोपाधिविनाशें। हे जीवदशा जेथ पैसे ।
फळपाकांत जैसें । झाड बीजीं
तैसें उपाधी उपहित । थोकोनि ठाके जेथ ।
तयातें अव्यक्त । बोलती गा
घन अज्ञान सुषुप्ती । तो बीजभावो म्हणती ।
येर स्वप्न हन जागृती । फळभावो तयाचा
जयासी कां बीजभावो । वेदांतीं केला ऐसा आवो ।
तो तया पुरुषा ठावो । अक्षराचा
जेथूनि अन्यथाज्ञान । फांकोनि जागृति स्वप्न ।
नानाबुद्धीचें रान । रिगालें असे
जीवत्व जेथुनी किरीटी । विश्व उठतचि उठी ।
ते उभय भेदांची मिठी । अक्षरु पुरुषु
येरु क्षर पुरुषु कां जनीं । जिहीं खेळे जागृतीं स्वप्नीं ।
तिया अवस्था जो दोन्ही । वियाला गा
पैं अज्ञानघनसुषुप्ती । ऐसैसी जे कां ख्याती ।
या उणी एकी प्राप्ती । ब्रह्माची जे
साचचि पुढती वीरा । जरी न येतां स्वप्न जागरा ।
तरी ब्रह्मभावो साचोकारा । म्हणों येता
परी प्रकृतिपुरुषें दोनी । अभ्रें जालीं जियें गगनीं ।
क्षेत्रक्षेत्रज्ञु स्वप्नीं । देखिला जियें
हें असो अधोशाखा । या संसाररूपा रुखा ।
मूळ तें रूप पुरुषा । अक्षराचें
हा पुरुषु कां म्हणिजे । जे पूर्णपणेंचि निजें ।
पैं मायापुरीं पहुडिजे । तेणेंही बोलें
आणि विकारांची जे वारी । ते विपरीत ज्ञानाची परी ।
नेणिजे जिये माझारीं । ते सुषुप्ती गा हा
म्हणौनि यया आपैसें । क्षरणें या नसे ।
आणिकेंही हा न नाशे । ज्ञानाउणें
यालागीं हा अक्षरु । ऐसा वेदांतीं डगरु ।
केला देशी थोरु । सिद्धांताच्या
ऐसें जीवकार्य कारण । जया मायासंगुचि लक्षण ।
अक्षर पुरुषु जाण । चैतन्य तें
आतां अन्यथाज्ञानीं । या दोनी अवस्था जया जनीं ।
तया हरपती घनीं । अज्ञानतत्त्वीं
तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया ।
जैसा वन्हि काष्ठ जाळूनियां । स्वयें जळे
तैसें अज्ञान ज्ञानें नेलें । आपण वस्तु देऊनि गेलें ।
ऐसें जाणणेंनिवीण उरलें । जाणतें जें
तें तो गा उत्तम पुरुषु । जो तृतीय कां निष्कर्षु ।
दोहींहून आणिकु । मागिला जो
सुषुप्तीं आणि स्वप्ना- । पासूनि बहुवें अर्जुना ।
जागणें जैसें आना । बोधाचेंचि
कां रश्मी हन मृगजळा- । पासूनि अर्कमंडळा ।
अफाटु तेवीं वेगळा । उत्तमु गा
हें ना काष्ठींचा काष्ठाहुनी । अनारिसा जैसा वन्ही ।
तैसा क्षराक्षरापासुनी । आनचि तो
पैं ग्रासूनि आपली मर्यादा । एक करीत नदीनदां ।
उठी कल्पांतीं उदावादा । एकार्णवाचा
तैसें स्वप्न ना सुषुप्ती । ना जागराची गोठी आथी ।
जैसी गिळिली दिवोराती । प्रळयतेजें
मग एकपण ना दुजें । असें नाहीं हें नेणिजे ।
अनुभव निर्बुजे । बुडाला जेथें
ऐसें आथि जें कांहीं । तें तो उत्तम पुरुषु पाहीं ।
जें परमात्मा इहीं । बोलिजे नामीं
तेंही एथ न मिसळतां । बोलणें जीवत्वें पंडुसुता ।
जैसी बुडणेयाची वार्ता । थडियेचा कीजे
तैसें विवेकाचिये कांठीं । उभें ठाकलिया किरीटी ।
परावराचिया गोठी । करणें वेदां
म्हणौनि पुरुषु क्षराक्षरु । दोन्ही देखोनि अवरु ।
यातें म्हणती परु । आत्मरूप
अर्जुना ऐसिया परी । परमात्मा शब्दवरी ।
सूचिजे गा अवधारीं । पुरुषोत्तमु
एऱहवीं न बोलणेंचि बोलणें । जेथिंचें सर्व नेणिवा जाणणें ।
कांहींच न होनि होणें । जे वस्तु गा
सोऽहं तेंही अस्तवलें । जेथ सांगतेंचि सांगणें जालें ।
द्रष्टत्वेंसी गेलें । दृश्य जेथ
आतां बिंबा आणि प्रतिबिंबा- । माजीं कैंची हें म्हणों नये प्रभा ? ।
जऱही कैसेनि हे लाभा । जायेचि ना
कां घ्राणा फुला दोहीं । द्रुती असे जे माझारिलां ठायीं ।
ते न दिसे तरी नाहीं । ऐसें बोलों नये
तैसें द्रष्टा दृश्य हें जाये । मग कोण म्हणे काय आहे ।
हेंचि अनुभवें तेंचि पाहें । रूप तया
जो प्रकाश्येंवीण प्रकाशु । ईशितव्येंवीण ईशु ।
आपणेंनीचि अवकाशु । वसवीत असे जो
जो नादें ऐकिजता नादु । स्वादें चाखिजता स्वादु ।
जो भोगिजतसे आनंदु । आनंदेंचि
जो पूर्णतेचा परिणामु । पुरुषु गा पुरुषोत्तमु ।
विश्रांतीचाही विश्रामु । विराला जेथें
सुखासि सुख जोडिलें । जें तेज तेजासि सांपडलें ।
शून्यही बुडालें । महाशून्यीं जिये
जो विकासाहीवरी उरता । ग्रासातेंही ग्रासूनि पुरता ।
जो बहुतें पाडें बहुतां- । पासूनि बहु
पैं नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती ।
रुपें न होनि शुक्ती । दावी जेवीं
कां नाना अलंकारदशे । सोनें न लपत लपालें असे ।
विश्व न होनियां तैसें । विश्व जो धरी
हें असो जलतरंगा । नाहीं सिनानेपण जेवीं गा ।
तेवीं दिसता प्रकाशु जगा । आपणचि जो
आपुलिया संकोचविकाशा । आपणचि रूप वीरेशा ।
हा जळीं चंद्र हन जैसा । समग्र गा
तैसा विश्वपणें कांहीं होये । विश्वलोपीं कहीं न जाये ।
जैसा रात्रीं दिवसें नोहे । द्विधा रवि
तैसा कांहींचि कोणीकडे । कायिसेनिहि वेंचीं न पडे ।
जयाचें सांगडें । जयासीचि
जो आपणपेंचि आपणया । प्रकाशीतसे धनंजया ।
काय बहु बोलों जया । नाहीं दुजें
तो गा मी निरुपाधिकु । क्षराक्षरोत्तमु एकु ।
म्हणौनि म्हणे वेद लोकु । पुरुषोत्तमु
परी हें असो ऐसिया । मज पुरुषोत्तमातें धनंजया ।
जाणे जो पाहलेया । ज्ञानमित्रें
चेइलिया आपुलें ज्ञान । जैसें नाहींचि होय स्वप्न ।
तैसें स्फुरतें त्रिभुवन । वावों जालें
कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कांटाळा ।
तैसा माझेनि बोधें टवाळा । नागवे तो
लेणें सोनेंचि जो जाणें । तो लेणेंपण तें वावो म्हणे ।
तेवीं मी जाणोनि जेणें । वाळिला भेदु
मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदु । मीचि एकु स्वतःसिद्धु ।
जो आपणेनसीं भेदु । नेणोनियां जाणे
तेणेंचि सर्व जाणितलें । हेंही म्हणणें थेंकुलें ।
जे तया सर्व उरलें । द्वैत नाहीं
म्हणौनि माझिया भजना । उचितु तोचि अर्जुना ।
गगन जैसें आलिंगना । गगनाचिया
क्षीरसागरा परगुणें । कीजे क्षीरसागरचिपणें ।
अमृतचि होऊनि मिळणें । अमृतीं जेवीं
साडेपंधरा मिसळावें । तैं साडेपंधरेंचि होआवें ।
तेवीं मी जालिया संभवे । भक्ति माझी
हां गा सिंधूसि आनी होती । तरी गंगा कैसेनि मिळती ? ।
म्हणौनि मी न होतां भक्ती । अन्वयो आहे ?
ऐसियालागीं सर्व प्रकारीं । जैसा कल्लोळु अनन्यु सागरीं ।
तैसा मातें अवधारीं । भजिन्नला जो
सूर्या आणि प्रभे । एकवंकी जेणें लोभें ।
तो पाडु मानूं लाभे । भजना तया
एवं कथिलयादारभ्य । हें जें सर्व शास्त्रैकलभ्य ।
उपनिषदां सौरभ्य । कमळदळां जेवीं
हें शब्दब्रह्माचें मथितें । श्रीव्यासप्रज्ञेचेंनि हातें ।
मथुनि काढिलें आयितें । सार आम्हीं
जे ज्ञानामृताची जाह्नवी । जे आनंदचंद्रींची सतरावी ।
विचारक्षीरार्णवींची नवी । लक्ष्मी जे हे
म्हणौनि आपुलेनि पदें वर्णें । अर्थाचेनि जीवेंप्राणें ।
मीवांचोनि हों नेणें । आन कांहीं
क्षराक्षरत्वें समोर जालें । तयांचें पुरुषत्व वाळिलें ।
मग सर्वस्व मज दिधलें । पुरुषोत्तमीं
म्हणौनि जगीं गीता । मियां आत्मेनि पतिव्रता ।
जे हे प्रस्तुत तुवां आतां । आकर्णिली
साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र । पैं संसारु जिणतें हें शस्त्र ।
आत्मा अवतरविते मंत्र । अक्षरें इयें
परी तुजपुढां सांगितलें । तें अर्जुना ऐसें जालें ।
जें गौप्यधन काढिलें । माझें आजि
मज चैतन्यशंभूचा माथां । जो निक्षेपु होता पार्था ।
तया गौतमु जालासि आस्था- । निधी तूं गा
चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया ।
तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां
कां भरलें चंद्रतारांगणीं । नभ सिंधू आपणयामाजीं आणी ।
तैसा गीतेसीं मी अंतःकरणीं । सूदला तुवां
जे त्रिविधमळिकटा । तूं सांडिलासि सुभटा ।
म्हणौनि गीतेसीं मज वसौटा । जालासि गा
परी हें बोलों काय गीता । जे हे माझी उन्मेषलता ।
जाणे तो समस्ता । मोहा मुके
सेविली अमृतसरिता । रोगु दवडूनि पंडुसुता ।
अमरपण उचितां । देऊनि घाली
तैसी गीता हे जाणितलिया । काय विस्मयो मोह जावया ।
परी आत्मज्ञानें आपणापयां । मिळिजे येथ
जया आत्मज्ञानाच्या ठायीं । कर्म आपुलेया जीविता पाहीं ।
होऊनियां उतराई । लया जाय
हरपलें दाऊनि जैसा । मागु सरे वीरविलासा ।
ज्ञानचि कळस वळघे तैसा । कर्मप्रासादाचा
म्हणौनि ज्ञानिया पुरुषा । कृत्य करूं सरलें देखा ।
ऐसा अनाथांचा सखा । बोलिला तो
तें श्रीकृष्णवचनामृत । पार्थीं भरोनि असे वोसंडत ।
मग व्यासकृपा प्राप्त । संजयासी
तो धृतराष्ट्र राया । सूतसे पान करावया ।
म्हणौनि जीवितांतु तया । नोहेचि भारी
एऱहवीं गीताश्रवण अवसरीं । आवडों लागतां अनधिकारी ।
परि सेखीं तेचि उजरी । पातला भली
जेव्हां द्राक्षीं दूध घातलें । तेव्हां वायां गेलें गमलें ।
परी फळपाकीं दुणावलें । देखिजे जेवीं
तैसी श्रीहरीवक्त्रींचीं अक्षरें । संजयें सांगितलीं आदरें ।
तिहीं अंधु तोही अवसरें । सुखिया जाला
तेंचि मऱहाटेनि विन्यासें । मियां उन्मेषें ठसेंठोंबसें ।
जी जाणें नेणें तैसें । निरोपिलें
सेवंतीये अरिसि कांहीं । आंग पाहतां विशेषु नाहीं ।
परी सौरभ्य नेलें तिहीं । भ्रमरीं जाणिजे
तैसें घडतें प्रमेय घेइजे । उणें तें मज देइजे ।
जें नेणणें हेंचि सहजें । रूप कीं बाळा
तरी नेणतें जऱही होये । तऱही देखोनि बाप कीं माये ।
हर्ष केंहि न समाये । चोज करिती
तैसें संत माहेर माझें । तुम्ही मिनलिया मी लाडैजें ।
तेंचि ग्रंथाचेनि व्याजें । जाणिजो जी
आतां विश्वात्मकु हा माझा । स्वामी श्रीनिवृत्तिराजा ।
तो अवधारू वा पूजा । ज्ञानदेवो म्हणे
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0