ज्ञानेश्वरी · अध्याय 14
॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ चतुर्दशोऽध्यायः - अध्याय चौदावा । ।
। गुणत्रयविभागयोगः ।
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या ।
प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया
जय जय सर्व विसांवया । सोहंभावसुहावया ।
नाना लोक हेलावया । समुद्रा तूं
आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू ।
विशदविद्यावधू- । वल्लभा जी
तू जयांप्रति लपसी । तया विश्व हें दाविसी ।
प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं
कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे ।
परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरें
जी तूंचि तूं सर्वां यया । मा कोणा बोधु कोणा माया ।
ऐसिया आपेंआप लाघविया । नमो तुज
जाणों जगीं आप वोलें । तें तुझिया बोला सुरस जालें ।
तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वियेसी
रविचंद्रादि शुक्ती । उदो करिती त्रिजगतीं ।
तें तुझिया दीप्ती । तेज तेजां
चळवळिजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें ।
नभ तुजमाजीं खेळे । लपीथपी
किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस ।
असो वानणें सायास । श्रुतीसि हे
वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझें आंग ।
मग आम्हां तया मूग । एके पांती
जी एकार्णवाचे ठाईं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं ।
मा महानदी काई । जाणिजती
कां उअदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु ।
आम्हां श्रुति तुज आंतु । तो पाडु असे
आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशीं वैखरी बुडे ।
तो तूं मा कोणें तोंडें । वानावासी
यालागीं आतां । स्तुति सांडूनि निवांता ।
चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें
तरी तू जैसा आहासि तैसिया । नमो जी श्रीगुरुराया ।
मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होईं
आतां कृपाभांडवल सोडीं । भरीं मति माझी पोतडी ।
करीं ज्ञानपद्य जोडी । थोरा मातें
मग मी संसरेन तेणें । करीन संतांसी कर्णभूषणें ।
लेववीन सुलक्षणें । विवेकाचीं
जी गीतार्थनिधान । काढू माझें मन ।
सुयीं स्नेहांजन । आपलें तूं
हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे ।
तैसा उदैजो जो निर्मळें । कारुण्यबिंबें
माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सफळ ।
तो वसंतु होय स्नेहाळ- । शिरोमणी
प्रमेय महापूरें । हे मतिगंगा ये थोरें ।
तैसा वरिष उदारें । दिठीवेनी
अगा विश्वैकधामा । तुझा प्रसाद चंद्रमा ।
करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी
जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें ।
वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचें
तंव संतोषोनि श्रीगुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें ।
मांडिलें देखोनि दुजें । स्तवनमिषें
हें असो आतां वांजटा । तो ज्ञानार्थ करूनि गोमटा ।
ग्रंथु दावीं उत्कंठा । भंगो नेदीं
हो कां जी स्वामी । हेंचि पाहत होतों मी ।
जे श्रीमुखें म्हणा तुम्ही । ग्रंथु सांग
सहजें दुर्वेचा डिरु । आंगेंचि तंव अमरु ।
वरी आला पूरु । पीयूषाचा
तरी आतां येणें प्रसादें । विन्यासें विदग्धें ।
मूळशास्त्रपदें । वाखाणीन
परी जीवा आंतुलीकडे । जैसी संदेहाची डोणी बुडे ।
ना श्रवणीं तरी चाडे । वाढी दिसे
तैसी बोली साचारी । अवतरो माझी माधुरी ।
माले मागूनि घरीं । गुरुकृपेच्या
तरी मागां त्रयोदशीं । अध्यायीं गोठी ऐसी ।
श्रीकृष्ण अर्जुनेंसी । चावळले
जे क्षेत्रक्षेत्रज्ञयोगें । होईजे येणें जगें ।
आत्मा गुणसंगें । संसारिया
आणि हाचि प्रकृतिगतु । सुखदुःख भोगीं हेतु ।
अथवा गुणातीतु । केवळु हा
तरी कैसा पां असंगा संगु । कोण तो क्षेत्रक्षेत्रज्ञायोगु ।
सुखदुःखादि भोगु । केवीं तया ?
गुण ते कैसे किती । बांधती कवणे रीती ।
नातरी गुणातीतीं । चिन्हें काई ?
एवं इया आघवेया । अर्था रूप करावया ।
विषो एथ चौदाविया । अध्यायासी
तरी तो आतां ऐसा । प्रस्तुत परियेसा ।
अभिप्रायो विश्वेशा । वैकुंठाचा
तो म्हणे गा अर्जुना । अवधानाची सर्व सेना ।
मेळऊनि इया ज्ञाना । झोंबावें हो \!
आम्हीं मागां तुज बहुतीं । दाविलें हें उपपत्ती ।
तरी आझुनी प्रतीती- । कुशीं न निघे
म्हणौनि गा पुढती । सांगिजैल तुजप्रती ।
पर म्हण म्हणौनि श्रुतीं । डाहारिलें जें
एऱहवीं ज्ञान हें आपुलें । परी पर ऐसेनि जालें ।
जे आवडोनि घेतलें । भवस्वर्गादिक
अगा याचि कारणें । हें उत्तम सर्वांपरी मी म्हणें ।
जे वन्हि हें तृणें । येरें ज्ञानें
जियें भवस्वर्गातें जाणती । यागचि चांग म्हणती ।
पारखी फुडी आथी । भेदीं जया
तियें आघवींचि ज्ञानें । केलीं येणें स्वप्नें ।
जैशा वातोर्मी गगनें । गिळिजती अंतीं
कां उदितें रश्मिराजें । लोपिलीं चंद्रादि तेजें ।
नाना प्रळयांबुमाजें । नदी नद
तैसें येणें पाहलेया । ज्ञानजात जाय लया ।
म्हणौनियां धनंजया । उत्तम हें
अनादि जे मुक्तता । आपुली असे पंडुसुता ।
तो मोक्षु हातां येता । होय जेणें
जयाचिया प्रतीती । विचारवीरीं समस्तीं ।
नेदिजेचि संसृती । माथां उधऊं
मनें मन घालूनि मागें । विश्रांति जालिया आंगें ।
ते देहीं देहाजोगे । होतीचि ना
मग तें देहाचें बेळें । वोलांडूनि एकेचि वेळे ।
संवतुकी कांटाळें । माझें जालें
जे माझिया नित्यता । तेणें नित्य ते पंडुसुता ।
परिपूर्ण पूर्णता । माझियाची
मी जैसा अनंतानंदु । जैसाचि सत्यसिंधु ।
तैसेचि ते भेदु । उरेचि ना
जें मी जेवढें जैसें । तेंचि ते जाले तैसें ।
घटभंगीं घटाकाशें । आकाश जेवीं
नातरीं दीपमूळकीं । दीपशिखा अनेकीं ।
मीनलिया अवलोकीं । होय जैसें
अर्जुना तयापरी । सरली द्वैताची वारी ।
नांदे नामार्थ एकाहारीं । मीतूंविण
येणेंचि पैं कारणें । जैं पहिलें सृष्टीचें जुंपणें ।
तेंही तया होणें । पडेचिना
सृष्टीचिये सर्वादी । जयां देहाची नाहीं बांधी ।
ते कैचें प्रळयावधी । निमतील पां ?
म्हणौनि जन्मक्षयां- । अतीत ते धनंजया ।
मी जालें ज्ञाना इया । अनुसरोनी
ऐसी ज्ञानाची वाढी । वानिली देवें आवडी ।
तेवींचि पार्थाही गोडी । लावावया
तंव तया जालें आन । सर्वांगीं निघाले कान ।
सणई अवधान । आतला पां
आतां देवाचिया ऐसें । जाकळीजत असे वोरसें ।
जें निरूपण आकाशें । वेंटाळेना
मग म्हणे गा प्रज्ञाकांता । उजवली आजि वक्तृत्वता ।
जे बोलायेवढा श्रोता । जोडलासी
तरि एकु मी अनेकीं । गोंविजे देहपाशकीं ।
त्रिगुणीं लुब्धकीं । कवणेपरी
कैसा क्षेत्रयोगें । वियें इयें जगें ।
तें परिस सांगें । कवणेपरी
पैं क्षेत्र येणें व्याजें । यालागीं हें बोलिजे ।
जे मत्संगबीजें । भूतीं पिके
एऱहवीं तरी महद्ब्रह्म । यालागीं हें ऐसें नाम ।
जे महदादिविश्राम । शालिका हें
विकारां बहुवस थोरी । अर्जुना हेंचि करी ।
म्हणौनि अवधारीं । महद्ब्रह्म
अव्यक्तवादमतीं । अव्यक्त ऐसी वदंती ।
सांख्याचिया प्रतीती । प्रकृति हेचि
वेदांतीं इयेतें माया । ऐसें म्हणिजे प्राज्ञराया ।
असो किती बोलों वायां । अज्ञान हें
आपला आपणपेयां । विसरु जो धनंजया ।
तेंचि रूप यया । अज्ञानासी
आणिकही एक असे । जें विचारावेळे न दिसे ।
वातीं पाहतां जैसें । अंधारें कां
हालविलिया जाय । निश्चळीं तरी होय ।
दुधीं जैसी साय । दुधाची ते
पैं जागरु ना स्वप्न । ना स्वरूप अवस्थान ।
ते सुषुप्ति कां घन । जैसी होय
कां न वियतां वायूतें । वांझें आकाश रितें ।
तया ऐसें निरुतें । अज्ञान गा
पैल खांबु कां पुरुखु । ऐसा निश्चयो नाहीं एकु ।
परी काय नेणों आलोकु । दिसत असे
तेवीं वस्तु जैसी असे । तैसी कीर न दिसे ।
परी कांहीं अनारिसें । देखिजेना
ना राती ना तेज । ते संधि जेवीं सांज ।
तेवीं विरुद्ध ना निज । ज्ञान आथी
ऐसी कोण्ही एकी दिशा । तिये वादु अज्ञान ऐसा ।
तया गुंडलिया प्रकाशा । क्षेत्रज्ञु नाम
अज्ञान थोरिये आणिजे । आपणपें तरी नेणिजे ।
तें रूप जाणिजे । क्षेत्रज्ञाचें
हाचि उभय योगु । बुझें बापा चांगु ।
सत्तेचा नैसर्गु । स्वभावो हा
.आतां अज्ञानासारिखें । वस्तु आपणपांचि देखे ।
परी रूपें अनेकें । नेणों कोणें
जैसा रंकु भ्रमला । म्हणे जा रे मी रावो आला ।
कां मूर्च्छितु गेला । स्वर्गलोकां
तेवीं लचकलिया दिठी । मग देखणें जें जें उठी ।
तया नाम सृष्टी । मीचि वियें पैं गा
जैसें कां स्वप्नमोहा । तो एकाकी देखे बहुवा ।
तोचि पाडु आत्मया । स्मरणेंवीण असे
हेंचि आनीभ्रांती । प्रमेय उपलवूं पुढती ।
परी तूं प्रतीती । याचि घे पां
तरी माझी हे गृहिणी । अनादि तरुणी ।
अनिर्वाच्यगुणी । अविद्या हे
इये नाहीं हेंचि रूप । ठाणें हें अति उमप ।
हें निद्रितां समीप । चेतां दुरी
पैं माझेनिचि आंगें । पहुढल्या हे जागे ।
आणि सत्तासंभोगें । गुर्विणी होय
महद्ब्रह्मौदरीं । प्रकृतीं आठै विकारीं ।
गर्भाची करी । पेलोवेली
उभयसंगु पहिलें । बुद्धितत्त्वें प्रसवलें ।
बुद्धितत्त्व भारैलें । होय मन
तरुणी ममता मनाची । ते अहंकार तत्त्व रची ।
तेणें महाभूतांची । अभिव्यक्ति होय
आणि विषयेंद्रियां गौसी । स्वभावें तंव भूतांसी ।
म्हणौनि येती सरिसीं । तियेंही रूपा
जालेनि विकारक्षोभें । पाठीं त्रिगुणाचें उभें ।
तेव्हां ये वासनागर्भें । ठायेंठावों
रुखाचा आवांका । जैसी बीजकणिका ।
जीवीं बांधें उदका । भेटतखेंवो
तैसी माझेनि संगें । अविद्या नाना जगें ।
आर घेवों लागे । आणियाची
मग गर्भगोळा तया । कैसें रूप तैं ये आया ।
तें परियेसें राया । सुजनांचिया
पैं मणिज स्वेदज । उद्भिज जारज ।
उमटती सहज । अवयव हें
व्योमवायुवशें । वाढलेनि गर्भरसें ।
मणिजु उससे । अवयव तो
पोटीं सूनि तमरजें । आगळिकां तोय तेजें ।
उठितां निफजे । स्वेदजु गा
आपपृथ्वी उत्कटें । आणि तमोमात्रें निकृष्टें ।
स्थावरु उमटे । उद्भिजु हा
पांचां पांचही विरजीं । होती मनबुद्ध्यादि साजीं ।
हीं हेतु जारजीं । ऐसें जाण
ऐसे चारी हे सरळ । करचरणतळ ।
महाप्रकृति स्थूळ । तेंचि शिर
प्रवृत्ति पेललें पोट । निवृत्ति ते पाठी नीट ।
सुर योनी आंगें आठ । ऊर्ध्वाचीं
कंठु उल्हासता स्वर्गु । मृत्युलोकु मध्यभागु ।
अधोदेशु चांगु । नितंबु तो
ऐसें लेकरूं एक । प्रसवली हें देख ।
जयाचें तिन्ही लोक । बाळसें गा
चौर्यांयशीं लक्ष योनी । तियें कांडां पेरां सांदणी ।
वाढे प्रतिदिनीं । बाळक हें
नाना देह अवयवीं । नामाचीं लेणीं लेववी ।
मोहस्तन्यें वाढवी । नित्य नवें
सृष्टी वेगवेगळीया । तिया करांघ्रीं आंगोळियां ।
भिन्नाभिमान सूदलिया । मुदिया तेथें
हें एकलौतें चराचर । अविचारित सुंदर ।
प्रसवोनि थोर । थोरावली
पै ब्रह्मा प्रातःकाळु । विष्णु तो माध्यान्ह वेळु ।
सदाशिव सायंकाळु । बाळा यया
महाप्रळयसेजे । खिळोनि निवांत निजे ।
विषमज्ञानें उमजें । कल्पोदयीं
अर्जुना इयापरी । मिथ्यादृष्टीच्या घरीं ।
युगानुवृत्तीचीं करी । चोज पाउलें
संकल्पु जयाचा इष्टु । अहंकारु तो विनटु ।
ऐसिया होय शेवटु । ज्ञानें यया
आतां असो हे बहु बोली । ऐसें विश्व माया व्याली ।
तेथ साह्य जाली । माझी सत्ता
याकारणें मी पिता । महद्ब्रह्म हे माता ।
अपत्य पंडुसुता । जगडंबरु
आतां शरीरें बहुतें । देखोनि न भेदें हो चित्तें ।
जे मनबुद्ध्यादि भूतें । एकेंचि येथें
हां गा एकाचि देहीं । काय अनारिसें अवयव नाहीं ? ।
तेवीं विचित्र विश्व पाहीं । एकचि हें
पैं उंचा नीचा डाहाळिया । विषमा वेगळालिया ।
येकाचि जेवीं जालिया । बीजाचिया
आणि संबंधु तोही ऐसा । मृत्तिके घटु लेंकु जैसा ।
कां पटत्व कापुसा । नातू होय
नाना कल्लोळपरंपरा । संतती जैसी सागरा ।
आम्हां आणि चराचरा । संबंधु तैसा
म्हणौनि वन्हि आणि ज्वाळ । दोन्ही वन्हीचि केवळ ।
तेवीं मी गा सकळ । संबंधु वावो
जालेनि जगें मी झांकें । तरी जगत्वें कोण फांके ? ।
किळेवरी माणिकें । लोपिजे काई ?
अळंकारातें आलें । तरी सोनेपण काइ गेलें ? ।
कीं कमळ फांकलें । कमळत्वा मुके ?
सांग पां धनंजया । अवयवीं अवयविया ।
आच्छादिजे कीं तया । तेंचि रूप ?
कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा ।
वेंचला कीं आगळा । दिसतसे
म्हणौनि जग परौतें । सारूनि पाहिजे मातें ।
तैसा नोव्हें उखितें । आघवें मीचि
हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा ।
गांठीं बांध वीरा । जीवाचिये
आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळाला ।
गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें
जैसें स्वप्नीं आपण । उठूनियां आत्ममरण ।
भोगिजे गा जाण । कपिध्वजा
कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिवळें ।
देखती तेंही कळे । तयांसीचि
नाना सूर्यप्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे ।
तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं
पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया ।
बिहोनि बिहालिया । आन आहे ?
तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें ।
तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें
बंधु कां न बंधिजे । हें जाणणें मज माझें ।
नेणणेनि उपजे । आपलेनि
तरी कोणें गुणें कैसा । मजचि मी बंधु ऐसा ।
आवडे तें परियेसा । अर्जुनदेवा
गुण ते किती किंधर्म । कायि ययां रूपनाम ।
कें जालें हें वर्म । अवधारीं पां
तरी सत्त्वरजतम । तिघांसि हें नाम ।
आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां
येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम ।
तिहींमाजीं तम । सावियाधारें
हें एकेचि वृत्तीच्या ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं ।
वयसात्रय देहीं । येकीं जेवीं
कां मीनलेनि कीडें । जंव जंव तूक वाढे ।
तंव तंव सोनें हीन पडे । पांचिका कसीं
पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें ।
सुषुप्ति बैसे । घणावोनि
तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे ।
ते सत्त्वरजद्वारें । तमही होय
अर्जुना गा जाण । ययां नाम गुण ।
आतां दाखऊं खूण । बांधिती ते
तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे ।
हें देह मी ऐसें । मुहूर्त करी
आजन्ममरणांतीं । देहधर्मीं समस्तीं ।
ममत्वाची सूती । घे ना जंव
जैसी मीनाच्या तोंडीं । पडेना जंव उंडी ।
तंव गळ आसुडी । जळपारधी
तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशकें ।
वोढिजती मग खुडके । मृगु जैसा
मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी ।
स्वयं सुख हें धाडी । हातींचें गा
तेव्हां विद्यामानें तोखे । लाभमात्रें हरिखे ।
मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे
म्हणे भाग्य ना माझें ? । आजि सुखियें नाहीं दुजें ।
विकाराष्टकें फुंजे । सात्त्विकाचेनि
आणि येणेंही न सरे । लांकण लागे दुसरें ।
जें विद्वत्तेचें भरे । भूत आंगीं
आपणचि ज्ञानस्वरूप आहे । तें गेलें हें दुःख न वाहे ।
कीं विषयज्ञानें होये । गगनायेवढा
रावो जैसा स्वप्नीं । रंकपणें रिघे धानीं ।
तो दों दाणां मानी । इंद्रु ना मी
तैसें गा देहातीता । जालेया देहवंता ।
हों लागे पंडुसुता । बाह्यज्ञानें
प्रवृत्तिशास्त्र बुझे । यज्ञविद्या उमजे ।
किंबहुना सुझे । स्वर्गवरी
आणि म्हणे आजि आन । मीवांचूनि नाहीं सज्ञान ।
चातुर्यचंद्रा गगन । चित्त माझें
ऐसें सत्त्व सुखज्ञानीं । जीवासि लावूनि कानी ।
बैलाची करी वानी । पांगुळाचिया
आतां हाचि शरीरीं । रजें जियापरी ।
बांधिजे तें अवधारीं । सांगिजैल
हें रज याचि कारणें । जीवातें रंजऊं जाणे ।
हें अभिलाखाचें तरुणें । सदाचि गा
हें जीवीं मोटकें रिगे । आणि कामाच्या मदीं लागे ।
मग वारया वळघे । तृष्णेचिया
घृतें आंबुखूनि आगियाळें । वज्राग्नीचें सादुकलें ।
आतां बहु थेंकुलें । आहे तेथ ?
तैसी खवळें चाड । होय दुःखासकट गोड ।
इंद्रश्रीहि सांकड । गमों लागे
तैसी तृष्णा वाढिनलिया । मेरुही हाता आलिया ।
तऱही म्हणे एखादिया । दारुणा वळघो
जीविताचि कुरोंडी । वोवाळूं लागे कवडी ।
मानी तृणाचिये जोडी । कृतकृत्यता
आजि असतें वेंचिजेल । परी पाहे काय कीजेल ।
ऐसा पांगीं वडील । व्यवसाय मांडी
म्हणे स्वर्गा हन जावें । तरी काय तेथें खावें ।
इयालागीं धांवें । याग करूं
व्रतापाठीं व्रतें । आचरें इष्टापूर्तें ।
काम्यावांचूनि हातें । शिवणें नाहीं
पैं ग्रीष्मांतींचा वारा । विसांवो नेणें वीरा ।
तैसा न म्हणे व्यापारा । रात्रदिवस
काय चंचळु मासा ? । कामिनीकटाक्षु जैसा ।
लवलाहो तैसा । विजूही नाहीं
तेतुलेनि गा वेगें । स्वर्गसंसारपांगें ।
आगीमाजीं रिगे । क्रियांचिये
ऐसा देहीं देहावेगळा । ले तृष्णेचिया सांखळा ।
खटाटोपु वाहे गळां । व्यापाराचा
हें रजोगुणाचें दारुण । देहीं देहियासी बंधन ।
परिस आतां विंदाण । तमाचें तें
व्यवहाराचेहि डोळे । मंद जेणें पडळें ।
मोहरात्रीचें काळें । मेहुडें जें
अज्ञानाचें जियालें । जया एका लागलें ।
जेणें विश्व भुललें । नाचत असे
अविवेकमहामंत्र । जें मौढ्यमद्याचें पात्र ।
हें असो मोहनास्त्र । जीवांसि जें
पार्था तें गा तम । रचूनि ऐसें वर्म ।
चौखुरी देहात्म- । मानियातें
हें एकचि कीर शरीरीं । माजों लागे चराचरीं ।
आणि तेथ दुसरी । गोठी नाहीं
सर्वेंद्रिया जाड्य । मनामाजीं मौढ्य ।
माल्हाती जे दाढ्र्य । आलस्याचेंं
आंगें आंग मोडामोडी । कार्यजाती अनावडी ।
नुसती परवडी । जांभयांची
उघडियाची दिठी । देखणें नाहीं किरीटी ।
नाळवितांचि उठी । वो म्हणौनि
पडलिये धोंडी । नेणे कानी मुरडी ।
तयाचि परी मुरकुंडी । उकलूं नेणें
पृथ्वी पाताळीं जांवो । कां आकाशही वरी येवो ।
परी उठणें हा भावो । उपजों नेणें
उचितानुचित आघवें । झांसुरता नाठवे जीवें ।
जेथींचा तेथ लोळावें । ऐसी मेधा
उभऊनि करतळें । पडिघाये कपोळें ।
पायाचें शिरियाळें । मांडूं लागे
आणि निद्रेविषयीं चांगु । जीवीं आथि लागु ।
झोंपीं जातां स्वर्गु । वावो म्हणे
ब्रह्मायु होईजे । मा निजलेयाचि असिजे ।
हें वांचूनि दुजें । व्यसन नाहीं
कां वाटें जातां वोघें । कल्हातांही डोळा लागे ।
अमृतही परी नेघे । जरी नीद आली
तेवींचि आक्रोशबळें । व्यापारे कोणे एके वेळे ।
निगालें तरी आंधळें । रोषें जैसें
केधवां कैसे राहाटावें । कोणेसीं काय बोलावें ।
हें ठाकतें कीं नागवें । हेंही नेणें
वणवा मियां आघवा । पांखें पुसोनि घेयावा ।
पतंगु पां हांवा । घाली जेवीं
तैसा वळघे साहसा । अकरणींच धिंवसा ।
किंबहुना ऐसा । प्रमादु रुचे
एवं निद्रालस्यप्रमादीं । तम इया त्रिबंधीं ।
बांधे निरुपाधी । चोखटातें
जैसा वन्ही काष्ठीं भरे । तैं दिसे काष्ठाकारें ।
व्योम घटें आवरे । तें घटाकाश
नाना सरोवर भरलें । तैं चंद्रत्व तेथें बिंबलें ।
तैसें गुणाभासीं बांधलें । आत्मत्व गमे
पैं हरूनि कफवात । जैं देही आटोपे पित्त ।
तैं करी संतप्त । देह जेवीं
कां वरिष आतप जैसें । जिणौनि शीतचि दिसे ।
तेव्हां होय हिंव ऐसें । आकाश हें
नाना स्वप्न जागृती । लोपूनि ये सुषुप्ती ।
तैं क्षणु एक चित्तवृत्ती । तेचि होय
तैसीं रजतमें हारवी । जैं सत्त्व माजु मिरवी ।
तैं जीवाकरवीं म्हणवी । सुखिया ना मी ?
तैसेंचि सत्त्व रज । लोपूनि तमाचें भोज ।
वळघें तैं सहज । प्रमादीं होय
तयाचि गा परिपाठीं । सत्त्व तमातें पोटीं ।
घालूनि जेव्हां उठी । रजोगुण
तेव्हां कर्मावांचूनि कांहीं । आन गोमटें नाहीं ।
ऐसें मानी देहीं । देहराजु
त्रिगुण वृद्धि निरूपण । तीं श्लोकीं सांगितलें जाण ।
आतां सत्त्वादि वृद्धिलक्षण । सादर परियेसीं
पैं रजतमविजयें । सत्त्व गा देहीं इयें ।
वाढतां चिन्हें तियें । ऐसीं होती
जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती बाहेरी वोसंडें ।
वसंतीं पद्मखंडें । दृती जैसी
सर्वेंद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी ।
साचचि करचरणीं । होती डोळे
राजहंसापुढें । चांचूचें आगरडें ।
तोडी जेवीं झगडे । क्षीरनीराचे
तेवीं दोषादोषविवेकीं । इंद्रियेंचि होती पारखीं ।
नियमु बा रे पायिकी । वोळगे तैं
नाइकणें तें कानचि वाळी । न पहाणें तें दिठीचि गाळी ।
अवाच्य तें टाळी । जीभचि गा
वाती पुढां जैसें । पळों लागे काळवसें ।
निषिद्ध इंद्रियां तैसें । समोर नोहे
धाराधरकाळें । महानदी उचंबळे ।
तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजातीं
अगा पुनवेच्या दिवशीं । चंद्रप्रभा धांवें आकाशीं ।
ज्ञानीं वृत्ति तैसी । फांके सैंघ
वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे ।
मानस विटे । विषयांवरी
एवं सत्त्व वाढे । तैं हें चिन्ह फुडें ।
आणि निधनही घडे । तेव्हांचि जरी
कां पाहालेनि सुयाणें । जालया परगुणें ।
पडियंतें पाहुणें । स्वर्गौनियां
तरी जैसीचि घरींची संपत्ती । आणि तैसीचि औदार्यधैर्यवृत्ती ।
मा परत्रा आणि कीर्ती । कां नोहावें ?
मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया ।
तेवीं सत्त्वीं जाणे देहा । कें आथि गा ?
जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट ।
निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें
अवचटें ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये ।
किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजीं
सांग पां धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा ।
गेलिया अपुरा । होय काई ?
नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा ।
तो तेथें तरी पांडवा । दीपचि कीं
तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी ।
तरंगावों लागें बुद्धी । विवेकावरी
पैं महदादि परिपाठीं । विचारूनि शेवटीं ।
विचारासकट पोटीं । जिरोनि जाय
छत्तिसां सदतिसावें । चोविसां पंचविसावें ।
तिन्ही नुरोनि स्वभावें । चतुर्थ जें
ऐसें सर्व जें सर्वोत्तम । जालें असे जया सुगम ।
तयासवें निरुपम । लाहे देह
इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख ।
बैसोनि जैं आगळीक । धरी रज
आपलिया कार्याचा । धुमाड गांवीं देहाचा ।
माजवी तैं चिन्हांचा । उदयो ऐसा
पांजरली वाहुटळी । करी वेगळ वेंटाळी ।
तैसी विषयीं सरळी । इंद्रियां होय
परदारादि पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे ।
मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी
हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु ।
वेंटाळितां अलाभु । तें तें उरे
आणि आड पडलिया । उद्यमजाती भलतिया ।
प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी
तेवींचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु ।
ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी
नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं ।
महावनें लावावीं । नानाविधें
ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं ।
आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरे न म्हणे
सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे ।
ऐसें अभिलषीं जोडे । दुर्भरत्व
स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा ।
विश्व घापे चाडा । पायांतळीं
इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होतीं साजीं ।
आणि ऐशा समाजीं । वेंचे जरी देह
तरी आघवाचि इहीं । परिवारला आनी देहीं ।
रिगे परी योनिही । मानुषीचि
सुरवाडेंसिं भिकारी । वसो पां राजमंदिरीं ।
तरी काय अवधारीं । रावो होईल ?
बैल तेथें करबाडें । हें न चुके गा फुडें ।
नेईजो कां वऱहाडें । समर्थाचेनी
म्हणौनि व्यापारा हातीं । उसंतु दिहा ना राती ।
तैसयाचिये पांती । जुंपिजे तो
कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं ।
जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे
मग तैसाचि पुढती । रजसत्त्ववृत्ती ।
गिळूनि ये उन्नती । तमोगुण
तैंचि जियें लिंगें । देहींचीं सबाह्य सांगें ।
तियें परिस चांगें । श्रोत्रबळें
तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन ।
रात्रींचें कां गगन । अंवसेचिये
तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस ।
विचाराची भाष । हारपे तैं
बुद्धि मेचवेना धोंडीं । हा ठायवरी मवाळें सांडी ।
आठवो देशधडी । जाला दिसे
अविवेकाचेनि माजें । सबाह्य शरीर गाजे ।
एकलेनि घेपे दीजे । मौढ्य तेथ
आचारभंगाचीं हाडें । रुपतीं इंद्रियांपुढें ।
मरे जरी तेणेंकडे । क्रिया जाय
पैं आणिकही एक दिसे । जे दुष्कृतीं चित्त उल्हासे ।
आंधारी देखणें जैसें । डुडुळाचें
तैसें निषिद्धाचेनि नांवें । भलतेंही भरे हावे ।
तियेविषयीं धांवे । घेती करणें
मदिरा न घेतां डुले । सन्निपातेंवीण बरळे ।
निष्प्रेमेंचि भुले । पिसें जैसें
चित्त तरी गेलें आहे । परी उन्मनी ते नोहे ।
ऐसें माल्हातिजे मोहें । माजिरेनि
किंबहुना ऐसैसीं । इयें चिन्हें तम पोषीं ।
जैं वाढे आयितीसी । आपुलिया
आणि हेंचि होय प्रसंगें । मरणाचें जरी पडे खागें ।
तरी तेतुलेनि निगे । तमेंसीं तो
राई राईपण बीजीं । सांठवूनियां अंग त्यजी ।
मग विरूढे तैं दुजी । गोठी आहे ?
पैं होऊनि दीपकलिका । येरु आगी विझो कां ।
कां जेथ लागे तेथ असका । तोचि आहे
म्हणौनि तमाचिये लोथें । बांधोनियां संकल्पातें ।
देह जाय तैं मागौतें । तमाचेचि होय
आतां काय येणें बहुवे । जो तमोवृद्धि मृत्यु लाहे ।
तो पशु कां पक्षी होये । झाड कां कृमी
येणेंचि पैं कारणें । जें निपजे सत्त्वगुणें ।
तें सुकृत ऐसें म्हणे । श्रौत समो
म्हणौनि तया निर्मळा । सुखज्ञानी सरळा ।
अपूर्व ये फळा । सात्त्विक तें
मग राजसा जिया क्रिया । तया इंद्रावणी फळलिया ।
जें सुखें चितारूनियां । फळती दुःखें
कां निंबोळियेचें पिक । वरि गोड आंत विख ।
तैसें तें राजस देख । क्रियाफळ
तामस कर्म जितुकें । अज्ञानफळेंचि पिके ।
विषांकुर विखें । जियापरी
म्हणौनि बा रे अर्जुना । येथ सत्त्वचि हेतु ज्ञाना ।
जैसा कां दिनमाना । सूर्य हा पैं
आणि तैसेंचि हें जाण । लोभासि रज कारण ।
आपुलें विस्मरण । अद्वैता जेवीं
मोह अज्ञान प्रमादा । ययां मैळेया दोषवृंदा ।
पुढती पुढती प्रबुद्धा । तमचि मूळ
ऐसें विचाराच्या डोळां । तिन्ही गुण हे वेगळवेगळां ।
दाविले जैसा आंवळा । तळहातींचा
तंव रजतमें दोन्हीं । देखिलीं प्रौढ पतनीं ।
सत्त्वावांचूनि नाणीं । ज्ञानाकडे
म्हणौनि सात्त्विक वृत्ती । एक जाले गा जन्मव्रती ।
सर्वत्यागें चतुर्थी । भक्ति जैसी
तैसें सत्त्वाचेनि नटनाचें । असणें जाणें जयांचें ।
ते तनुत्यागीं स्वर्गींचे । राय होती
इयाचि परी रजें । जिहीं कां जीजे मरिजे ।
तिहीं मनुष्य होईजे । मृत्युलोकीं
तेथ सुखदुःखाचें खिचटें । जेविजें एकेचि ताटें ।
जेथ इये मरणवाटे । पडिलें नुठी
आणि तयाचि स्थिति तमीं । जे वाढोनि निमती भोगक्षमीं ।
ते घेती नरकभूमी । मूळपत्र
एवं वस्तूचिया सत्ता । त्रिगुणासी पंडुसुता ।
दाविली सकारणता । आघवीचि
पैं वस्तु वस्तुत्वें असिकें । तें आपणपें गुणासारिखें ।
देखोनि कार्यविशेखें । अनुकरे गा
जैसें कां स्वप्नींचेनि राजें । जैं परचक्र देखिजे ।
तैं हारी जैत होईजे । आपणपांचि
तैसे मध्योर्ध्व अध । हे जे गुणवृत्तिभेद ।
ते दृष्टीवांचूनि शुद्ध । वस्तुचि असे
परी हे वाहणी असो । तरी तुज आन न दिसो ।
परिसें तें सांगतसों । मागील गोठी
तरी ऐसें जाणिजे । सामर्थ्यें तिन्ही सहजें ।
होती देहव्याजें । गुणचि हे
इंधनाचेनि आकारें । अग्नि जैसा अवतरे ।
कां आंगवे तरुवरें । भूमिरसु
नाना दहिंयाचेनि मिसें । परिणमे दूधचि जैसें ।
कां मूर्त होय ऊंसें । गोडी जेवीं
तैसें हे स्वांतःकरण । देहचि होती त्रिगुण ।
म्हणौनि बंधासि कारण । घडे कीर
परी चोज हें धनुर्धरा । जे एवढा हा गुंफिरा ।
मोक्षाचा संसारा । उणा नोहे
त्रिगुण आपुलालेनि धर्में । देहींचे माघुत साउमें ।
चाळितांही न खोमें । गुणातीतता
ऐसी मुक्ति असे सहज । ते आतां परिसऊं तुज ।
जे तूं ज्ञानांबुज- । द्विरेफु कीं
आणि गुणीं गुणाजोगें । चैतन्य नोहे मागें ।
बोलिलों तें खागें । तेवींचि हें
तरी पार्था जैं ऐसें । बोधलेनि जीवें दिसे ।
स्वप्न कां जैसें । चेइलेनी
नातरी आपण जळीं । बिंबलों तीरोनी न्याहळी ।
चळण होतां कल्लोळीं । अनेकधा
कां नटलेनि लाघवें । नटु जैसा न झकवे ।
तैसें गुणजात देखावें । न होनियां
पैं ऋतुत्रय आकाशें । धरूनियांही जैसें ।
नेदिजेचि येवों वोसें । वेगळेपणा
तैसें गुणीं गुणापरौतें । जें आपणपें असे आयितें ।
तिये अहं बैसे अहंतें । मूळकेचिये
तैं तेथूनि मग पाहतां । म्हणे साक्षी मी अकर्ता ।
हे गुणचि क्रियाजातां । नियोजित
सत्त्वरजतमांचा । भेदीं पसरु कर्माचा ।
होत असे तो गुणांचा । विकारु हा
ययामाजीं मी ऐसा । वनीं कां वसंतु जैसा ।
वनलक्ष्मीविलासा । हेतुभूत
कां तारांगणीं लोपावें । सूर्यकांतीं उद्दीपावें ।
कमळीं विकासावें । जावें तमें
ये कोणाचीं काजें कहीं । सवितिया जैसी नाहीं ।
तैसा अकर्ता मी देहीं । सत्तारूप
मी दाऊनि गुण देखे । गुणता हे मियां पोखे ।
ययाचेनि निःशेखें । उरे तें मी
ऐसेनि विवेकें जया । उदो होय धनंजया ।
ये गुणातीतत्व तया । अर्थपंथें
आतां निर्गुण असे आणिक । तें तो जाणें अचुक ।
जे ज्ञानें केलें टीक । तयाचिवरी
किंबहुना पंडुसुता । ऐसी तो माझी सत्ता ।
पावे जैसी सरिता । सिंधुत्व गा
नळिकेवरूनि उठिला । जैसा शुक शाखे बैसला ।
तैसा मूळ अहंतें वेढिला । तो मी म्हणौनि
अगा अज्ञानाचिया निदा । जो घोरत होता बदबदा ।
तो स्वस्वरूपीं प्रबुद्धा । चेइला कीं
पैं बुद्धिभेदाचा आरिसा । तया हातोनि पडिला वीरेशा ।
म्हणौनि प्रतिमुखाभासा । मुकला तो
देहाभिमानाचा वारा । आतां वाजो ठेला वीरा ।
तैं ऐक्य वीचिसागरां । जीवेशां हें
म्हणौनि मद्भावेंसी । प्राप्ति पाविजे तेणेंसरिसी ।
वर्षांतीं आकाशीं । घनजात जेवीं
तेवीं मी होऊनि निरुता । मग देहींचि ये असतां ।
नागवे देहसंभूतां । गुणांसि तो
जैसा भिंगाचेनि घरें । दीपप्रकाशु नावरे ।
कां न विझेचि सागरें । वडवानळु
तैसा आला गेला गुणांचा । बोधु न मैळे तयाचा ।
तो देहीं जैसा व्योमींचा । चंद्र जळीं
तिन्ही गुण आपुलालिये प्रौढी । देहीं नाचविती बागडीं ।
तो पाहोंही न धाडी । अहंतेतें
हा ठायवरी । नेहटोनि ठेला अंतरीं ।
आतां काय वर्ते शरीरीं । हेंहीं नेणे
सांडुनि आंगींची खोळी । सर्प रिगालिया पाताळीं ।
ते त्वचा कोण सांभाळी । तैसें जालें
कां सौरभ्य जीर्णु जैसा । आमोदु मिळोनि जाय आकाशा ।
माघारा कमळकोशा । नयेचि तो
पैं स्वरूपसमरसें । ऐक्य गा जालें तैसें ।
तेथ किं धर्म हें कैसें । नेणें देह
म्हणौनि जन्मजरामरण । इत्यादि जे साही गुण ।
ते देहींचि ठेले कारण । नाहीं तया
घटाचिया खापरिया । घटभंगीं फेडिलिया ।
महदाकाश अपैसया । जालेंचि असे
तैसी देहबुद्धी जाये । जैं आपणपां आठौ होय ।
तैं आन कांहीं आहे । तेंवांचुनी ?
येणें थोर बोधलेपणें । तयासि गा देहीं असणें ।
म्हणूनि तो मी म्हणें । गुणातीत
यया देवाचिया बोला । पार्थु अति सुखावला ।
मेघें संबोखिला । मोरु जैसा
तेणें तोषें वीर पुसे । जी कोण्ही चिन्हीं तो दिसे ।
जयामाजीं वसे । ऐसा बोधु
तो निर्गुण काय आचरे । कैसेनि गुण निस्तरे ।
हें सांगिजो माहेरें । कृपेचेनि
यया अर्जुनाचिया प्रश्ना । तो षड्गुणांचा राणा ।
परिहारु आकर्णा । बोलतु असे
म्हणे पार्था तुझी नवाई । हें येतुलेंचि पुससी काई ।
तें नामचि तया पाहीं । सत्य लटिकें
गुणातीत जया नांवें । तो गुणाधीन तरी नव्हे ।
ना होय तरी नांगवे । गुणां यया
परी अधीन कां नांगवें । हेंचि कैसेनि जाणावें ।
गुणांचिये रवरवे- । माजीं असतां
हा संदेह जरी वाहसी । तरी सुखें पुसों लाहसी ।
परिस आतां तयासी । रूप करूं
तरी रजाचेनि माजें । देहीं कर्माचें आणोजें ।
प्रवृत्ति जैं घेईजे । वेंटाळुनि
तैं मीचि कां कर्मठ । ऐसा न ये श्रीमाठ ।
दरिद्रलिये बुद्धी वीट । तोही नाहीं
अथवा सत्त्वेंचि अधिकें । जैं सर्वेंद्रियीं ज्ञान फांके ।
तैं सुविद्यता तोखें । उभजेही ना
कां वाढिन्नलेनि तमें । न गिळिजेचि मोहभ्रमें ।
तैं अज्ञानत्वें न श्रमे । घेणेंही नाहीं
पैं मोहाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी ।
ज्ञानें कर्में नादरी । होतां न दुःखी
सायंप्रतर्मध्यान्हा । या तिन्ही काळांची गणना ।
नाहीं जेवीं तपना । तैसा असे
तया वेगळाचि काय प्रकाशें । ज्ञानित्व यावें असें ।
कायि जळार्णव पाउसें । साजा होय ?
ना प्रवर्तलेनि कर्में । कर्मठत्व तयां कां गमे ।
सांगें हिमवंतु हिमें । कांपे कायी ?
नातरी मोह आलिया । काई पां ज्ञाना मुकिजैल तया ।
हो मा आगीतें उन्हाळेया । जाळवत असे ?
तैसे गुणागुणकार्य हें । आघवेंचि आपण आहे ।
म्हणौनि एकेका नोहे । तडातोडी
येवढे गा प्रतीती । तो देहा आलासे वस्ती ।
वाटे जातां गुंती- । माजीं जैसा
तो जिणता ना हरवी । तैसा गुण नव्हे ना करवी ।
जैसी कां श्रोणवी । संग्रामींची
कां शरीरातील प्राणु । घरीं आतिथ्याचा ब्राह्मणु ।
नाना चोहटांचा स्थाणु । उदासु जैसा
आणि गुणाचा यावाजावा । ढळे चळे ना पांडवा ।
मृगजळाचा हेलावा । मेरु जैसा
हें बहुत कायि बोलिजे । व्योम वारेनि न वचिजे ।
कां सूर्य ना गिळिजे । अंधकारें ?
स्वप्न कां गा जियापरी । जगतयातें न सिंतरी ।
गुणीं तैसा अवधारीं । न बंधिजे तो
गुणांसि कीर नातुडे । परी दुरूनि जैं पाहे कोडें ।
तैं गुणदोष सायिखडें । सभ्यु जैसा
सत्कर्में सात्त्विकीं । रज तें रजोविषयकीं ।
तम मोहादिकीं । वर्तत असे
परिस तयाचिया गा सत्ता । होती गुणक्रिया समस्ता ।
हें फुडें जाणे सविता । लौकिका जेवीं
समुद्रचि भरती । सोमकांतचि द्रवती ।
कुमुदें विकासती । चंद्रु तो उगा
कां वाराचि वाजे विझे । गगनें निश्चळ असिजे ।
तैसा गुणाचिये गजबजे । डोलेना जो
अर्जुना येणें लक्षणें । तो गुणातीतु जाणणें ।
परिस आतां आचरणें । तयाचीं जीं
तरी वस्त्रासि पाठीं पोटीं । नाहीं सुतावांचूनि किरीटी ।
ऐसें सुये दिठी । चराचर मद्रूपें
म्हणौनि सुखदुःखासरिसें । कांटाळें आचरे ऐसें ।
रिपुभक्तां जैसें । हरीचें देणें
एऱहवीं तरी सहजें । सुखदुःख तैंचि सेविजे ।
देहजळीं होईजे । मासोळी जैं
आतां तें तंव तेणें सांडिलें । आहे स्वस्वरूपेंसीचि मांडिलें ।
सस्यांतीं निवडिलें । बीज जैसें
कां वोघ सांडूनि गांग । रिघोनि समुद्राचें आंग ।
निस्तरली लगबग । खळाळाची
तेवीं आपणपांचि जया । वस्ती जाली गा धनंजया ।
तया देहीं अपैसया । सुख तैसें दुःख
रात्रि तैसें पाहलें । हें धारणा जेवीं एक जालें ।
आत्माराम देहीं आतलें । द्वंद्व तैसें
पैं निद्रिताचेनि आंगेंशीं । सापु तैशी उर्वशी ।
तेवीं स्वरूपस्था सरिशीं । देहीं द्वंद्वें
म्हणौनि तयाच्या ठायीं । शेणा सोनया विशेष नाहीं ।
रत्ना गुंडेया कांहीं । नेणिजे भेदु
घरा येवों पां स्वर्ग । कां वरिपडो वाघ ।
परी आत्मबुद्धीसि भंग । कदा नव्हे
निवटलें न उपवडे । जळीनलें न विरूढे ।
साम्यबुद्धी न मोडे । तयापरी
हा ब्रह्मा ऐसेनि स्तविजो । कां नीच म्हणौनि निंदिजो ।
परी नेणें जळों विझों । राखोंडी जैसी
तैसी निंदा आणि स्तुती । नये कोण्हेचि व्यक्ती ।
नाहीं अंधारें कां वाती । सूर्या घरीं
ईश्वर म्हणौनि पूजिला । कां चोरु म्हणौनि गांजिला ।
वृषगजीं वेढिला । केला रावो
कां सुहृद पासीं आले । अथवा वैरी वरपडे जाले ।
परी नेणें राती पाहालें । तेज जेवीं
साहीं ऋतु येतां आकाशें । लिंपिजेचि ना जैसें ।
तेवीं वैशम्य मानसें । जाणिजेना
आणीकही एकु पाहीं । आचारु तयाच्या ठायीं ।
तरी व्यापारासि नाहीं । जालें दिसे
सर्वांरंभा उटकलें । प्रवृत्तीचें तेथ मावळले ।
जळती गा कर्मफळें । ते तो आगी
दृष्टादृष्टाचेनि नांवें । भावोचि जीवीं नुगवें ।
सेवी जें कां स्वभावें । पैठें होये
सुखे ना शिणे । पाषाणु कां जेणें मानें ।
तैसी सांडीमांडी मनें । वर्जिली असे
आतां किती हा विस्तारु । जाणें ऐसा आचारु ।
जयातें तोचि साचारु । गुणातीतु
गुणांतें अतिक्रमणें । घडे उपायें जेणें ।
तो आतां आईक म्हणे । श्रीकृष्णनाथु
तरी व्यभिचाररहित चित्तें । भक्तियोगें मातें ।
सेवी तो गुणातें । जाकळूं शके
तरी कोण मी कैसी भक्ती । अव्यभिचारा काय व्यक्ती ।
हे आघवीचि निरुती । होआवी लागे
तरी पार्था परियेसा । मी तंव येथ ऐसा ।
रत्नीं किळावो जैसा । रत्नचि कीं तो
कां द्रवपणचि नीर । अवकाशचि अंबर ।
गोडी तेचि साखर । आन नाहीं
वन्हि तेचि ज्वाळ । दळाचि नांव कमळ ।
रूख तेंचि डाळ- । फळादिक
अगा हिम जें आकर्षलें । तेंचि हिमवंत जेवीं जालें ।
नाना दूध मुरालें । तेंचि दहीं
तैसें विश्व येणें नांवें । हें मीचि पैं आघवें ।
घेईं चंद्रबिंब सोलावें । न लगे जेवीं
घृताचें थिजलेंपण । न मोडितां घृतचि जाण ।
कां नाटितां कांकण । सोनेंचि तें
न उकलितां पटु । तंतुचि असे स्पष्टु ।
न विरवितां घटु । मृत्तिका जेवीं
म्हणौनि विश्वपण जावें । मग तैं मातें घेयावें ।
तैसा नव्हे आघवें । सकटचि मी
ऐसेनि मातें जाणिजे । ते अव्यभिचारी भक्ति म्हणिजे ।
येथ भेदु कांहीं देखिजे । तरी व्यभिचारु तो
याकारणें भेदातें । सांडूनि अभेदें चित्तें ।
आपण सकट मातें । जाणावें गा
पार्था सोनयाची टिका । सोनयासी लागली देखा ।
तैसें आपणपें आणिका । मानावें ना
तेजाचा तेजौनि निघाला । परी तेजींचि असे लागला ।
तया रश्मी ऐसा भला । बोधु होआवा
पैं परमाणु भूतळीं । हिमकणु हिमाचळीं ।
मजमाजीं न्याहाळीं । अहं तैसें
हो कां तरंगु लहानु । परी सिंधूसी नाहीं भिन्नु ।
तैसा ईश्वरीं मी आनु । नोहेचि गा
ऐसेनि बा समरसें । दृष्टि जे उल्हासे ।
ते भक्ति पैं ऐसे । आम्ही म्हणों
आणि ज्ञानाचें चांगावें । इयेचि दृष्टि नांवें ।
योगाचेंही आघवें । सर्वस्व हें
सिंधू आणि जळधरा- । माजीं लागली अखंड धारा ।
तैसी वृत्ति वीरा । प्रवर्ते ते
कां कुहेसीं आकाशा । तोंडीं सांदा नाहीं तैसा ।
तो परमपुरुषीं तैसा । एकवटे गा
प्रतिबिंबौनि बिंबवरी । प्रभेची जैसी उजरी ।
ते सोऽहंवृत्ती अवधारीं । तैसी होय
ऐसेनि मग परस्परें । ते सोऽहंवृत्ति जैं अवतरे ।
तैं तियेहि सकट सरे । अपैसया
जैसा सैंधवाचा रवा । सिंधूमाजीं पांडवा ।
विरालेया विरवावा । हेंही ठाके
नातरी जाळूनि तृण । वन्हिही विझे आपण ।
तैसें भेदु नाशूनि जाण । ज्ञानही नुरे
माझें पैलपण जाये । भक्त हें ऐलपण ठाये ।
अनादि ऐक्य जें आहे । तेंचि निवडे
आतां गुणातें तो किरीटी । जिणे या नव्हती गोष्टी ।
जे एकपणाही मिठी । पडों सरली
किंबहुना ऐसी दशा । तें ब्रह्मत्व गा सुदंशा ।
हें तो पावें जो ऐसा । मातें भजे
पुढतीं इहीं लिंगीं । भक्तु जो माझा जगीं ।
हे ब्रह्मता तयालागीं । पतिव्रता
जैसें गंगेचेनि वोघें । डळमळित जळ जें निघे ।
सिंधुपद तयाजोगें । आन नाहीं
तैसा ज्ञानाचिया दिठी । जो मातें सेवी किरीटी ।
तो होय ब्रह्मतेच्या मुकुटीं । चूडारत्न
यया ब्रह्मत्वासीचि पार्था । सायुज्य ऐसी व्यवस्था ।
याचि नांवें चौथा । पुरुषार्थ गा
परी माझें आराधन । ब्रह्मत्वीं होय सोपान ।
एथ मी हन साधन । गमेन हो
तरी झणीं ऐसें । तुझ्या चित्तीं पैसें ।
पैं ब्रह्म आन नसे । मीवांचूनि
अगा ब्रह्म या नांवा । अभिप्रायो मी पांडवा ।
मीचि बोलिजे आघवा । शब्दीं इहीं
पैं मंडळ आणि चंद्रमा । दोन्ही नव्हती सुवर्मा ।
तैसा मज आणि ब्रह्मा । भेदु नाहीं
अगा नित्य जें निष्कंप । अनावृत धर्मरूप ।
सुख जें उमप । अद्वितीय
विवेकु आपलें काम । सारूनि ठाकी जें धाम ।
निष्कर्षाचें निःसीम । किंबहुना मी
ऐसेसें हो अवधारा । तो अनन्याचा सोयरा ।
सांगतसे वीरा । पार्थासी
येथ धृतराष्ट्र म्हणे । संजया हें तूतें कोणें ।
पुसलेनिविण वायाणें । कां बोलसी ?
माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया
संजयो विस्मयो मानसीं । आहा करूनि रसरसी ।
म्हणे कैसें पां देवेंसी । द्वंद्व यया ?
तरी तो कृपाळु तुष्टो । यया विवेकु हा घोंटो ।
मोहाचा फिटो । महारोगु
संजयो ऐसें चिंतितां । संवादु तो सांभाळितां ।
हरिखाचा येतु चित्ता । महापूरु
म्हणौनि आतां येणें । उत्साहाचेनि अवतरणें ।
श्रीकृष्णाचें बोलणें । सांगिजैल
तया अक्षराआंतील भावो । पाववीन मी तुमचा ठावो ।
आइका म्हणे ज्ञानदेवो । निवृत्तीचा
मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0