भाषा

ENहिગુ
ग्रंथ पाठ

ज्ञानेश्वरी · अध्याय 13

13.1

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ त्रयोदशोऽध्यायः - अध्याय तेरावा । ।
। क्षेत्रक्षेत्रज्ञयोगः ।
आत्मरूप गणेशु केलिया स्मरण । सकळ विद्यांचें अधिकरण ।
तेचि वंदूं श्रीचरण । श्रीगुरूंचे

13.2

जयांचेनि आठवें । शब्दसृष्टि आंगवे ।
सारस्वत आघवें । जिव्हेसि ये

13.3

वक्तृत्वा गोडपणें । अमृतातें पारुखें म्हणे ।
रस होती वोळंगणें । अक्शरांसी

13.4

भावाचें अवतरण । अवतरविती खूण ।
हाता चढे संपूर्ण । तत्त्वभेद

13.5

श्रीगुरूंचे पाय । जैं हृदय गिंवसूनि ठाय ।
तैं येवढें भाग्य होय । उन्मेखासी

13.6

ते नमस्कारूनि आतां । जो पितामहाचा पिता ।
लक्ष्मीयेचा भर्ता । ऐसें म्हणे

13.7

तरी पार्था परिसिजे । देह हें क्षेत्र म्हणिजे ।
जो हें जाणे तो बोलिजे । क्षेत्रज्ञु एथें

13.8

तरि क्षेत्रज्ञु जो एथें । तो मीचि जाण निरुतें ।
जो सर्व क्षेत्रांतें । संगोपोनि असे

13.9

क्षेत्र आणि क्षेत्रज्ञातें । जाणणें जें निरुतें ।
ज्ञान ऐसें तयातें । मानूं आम्ही

13.10

मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी ।
विविक्तदेशसेवित्वमरतिर्जनसंसदि

13.11

अध्यात्मज्ञाननित्यत्वं तत्त्वज्ञानार्थदर्शनम् ।
एतद्ज्ञानमिति प्रोक्तमज्ञानं यदतोन्यथा

13.12

ज्ञेयं यत्तत्प्रवक्ष्यामि यज्ञात्वा~मृतमश्नुते ॥
अनादिमत्परं ब्रह्म न सत्तन्नासदुच्यते

13.13

सर्वतः पाणिपादं तत्सर्वतो~क्षिशिरोमुखम् ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति

13.14

सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् ।
असक्तं सर्वभृच्चैव निर्गुणं गुणभोक्तृ च

13.15

बहिरन्तश्च भूतानामचरं चरमेव च ।
सूक्षमत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चान्तिके च तत्

13.16

अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थितं ।
भूतभर्तृ च तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च

13.17

ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ।
ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विस्ठितम्

13.18

इति क्षेत्रं तथा ज्ञानं ज्ञेयं चोक्तं समासतः ।
मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते

13.19

प्रकृतिं पुरुषं चैव विद्ध्यनादी उभावपि ।
विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान्

13.20

कार्यकारणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते ।
पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते

13.21

पुरुषः प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृतिजान्गुणान् ।
कारणं गुण संगोऽस्य सदसद्योनिजन्मसु

13.22

उपद्रष्टाऽनुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः ।
परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः

13.23

य एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह ।
सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते

13.24

ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना ।
अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे

13.25

अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वाऽन्येभ्य उपासते ।
तेऽपि चातितरंत्येव मृत्युं श्रुतिपरायणः

13.26

यावत्संजायते किंचित्सत्त्वं स्थावरजंगमम् ।
क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात्तद्विद्धि भरतर्षभ

13.27

एक म्हणती हें स्थळ । जीवाचेंचि समूळ ।
मग प्राण हें कूळ । तयाचें एथ

13.28

जे प्राणाचे घरीं । अंगें राबती भाऊ चारी ।
आणि मना ऐसा आवरी । कुळवाडीकरु

13.29

तयातें इंद्रियबैलांची पेटी । न म्हणे अंवसीं पाहाटीं ।
विषयक्षेत्रीं आटी । काढी भली

13.30

मग विधीची वाफ चुकवी । आणि अन्यायाचें बीज वाफवी ।
कुकर्माचा करवी । राबु जरी

13.31

तरी तयाचिसारिखें । असंभड पाप पिके ।
मग जन्मकोटी दुःखें । भोगी जीवु

13.32

नातरी विधीचिये वाफे । सत्क्रिया बीज आरोपे ।
तरी जन्मशताचीं मापें । सुखचि मवीजे

13.33

तंव आणिक म्हणती हें नव्हे । हें जिवाचेंचि न म्हणावें ।
आमुतें पुसा आघवें । क्शेत्राचें या

13.34

अहो जीवु एथ उखिता । वस्तीकरु वाटे जातां ।
आणि प्राणु हा बलौता । म्हणौनि जागे

13.35

अनादि जे प्रकृती । सांख्य जियेतें गाती ।
क्षेत्र हे वृत्ती । तियेची जाणा

13.36

आणि इयेतेंचि आघवा । आथी घरमेळावा ।
म्हणौनि ते वाहिवा । घरीं वाहे

13.37

वाह्याचिये रहाटी । जे कां मुद्दल तिघे इये सृष्टीं ।
ते इयेच्याचि पोटीं । जहाले गुण

13.38

रजोगुण पेरी । तेतुलें सत्त्व सोंकरी ।
मग एकलें तम करी । संवगणी

13.39

रचूनि महत्तत्त्वाचें खळें । मळी एके काळुगेनि पोळें ।
तेथ अव्यक्ताची मिळे । सांज भली

13.40

तंव एकीं मतिवंतीं । या बोलाचिया खंतीं ।
म्हणितलें या ज्ञप्ती । अर्वाचीना

13.41

हां हो परतत्त्वाआंतु । कें प्रकृतीची मातु ।
हा क्षेत्र वृत्तांतु । उगेंचि आइका

13.42

शून्यसेजेशालिये । सुलीनतेचिये तुळिये ।
निद्रा केली होती बळियें । संकल्पें येणें

13.43

तो अवसांत चेइला । उद्यमीं सदैव भला ।
म्हणौनि ठेवा जोडला । इच्छावशें

13.44

निरालंबींची वाडी । होती त्रिभुवनायेवढी ।
हे तयाचिये जोडी । रूपा आली

13.45

मग महाभूतांचें एकवाट । सैरा वेंटाळूनि भाट ।
भूतग्रामांचे आघाट । चिरिले चारी

13.46

यावरी आदी । पांचभूतिकांची मांदी ।
बांधली प्रभेदीं । पंचभूतिकीं

13.47

कर्माकर्माचे गुंडे । बांध घातले दोहींकडे ।
नपुंसकें बरडें । रानें केलीं

13.48

तेथ येरझारेलागीं । जन्ममृत्यूची सुरंगी ।
सुहाविली निलागी । संकल्पें येणें

13.49

मग अहंकारासि एकलाधी । करूनि जीवितावधी ।
वहाविलें बुद्धि । चराचर

13.50

यापरी निराळीं । वाढे संकल्पाची डाहाळी ।
म्हणौनि तो मुळीं । प्रपंचा यया

13.51

यापरी मत्तमुगुतकीं । तेथ पडिघायिलें आणिकीं ।
म्हणती हां हो विवेकीं । कैसें तुम्ही

13.52

परतत्त्वाचिया गांवीं । संकल्पसेज देखावी ।
तरी कां पां न मनावी । प्रकृति तयाची ?

13.53

परि असो हें नव्हे । तुम्ही या न लगावें ।
आतांचि हें आघवें । सांगिजैल

13.54

तरी आकाशीं कवणें । केलीं मेघाचीं भरणें ।
अंतरिक्ष तारांगणें । धरी कवण ?

13.55

गगनाचा तडावा । कोणें वेढिला केधवां ।
पवनु हिंडतु असावा । हें कवणाचें मत ?

13.56

रोमां कवण पेरी । सिंधू कवण भरी ।
पर्जन्याचिया करी । धारा कवण ?

13.57

तैसें क्षेत्र हें स्वभावें । हे वृत्ती कवणाची नव्हे ।
हें वाहे तया फावे । येरां तुटे

13.58

तंव आणिकें एकें । क्षोभें म्हणितलें निकें ।
तरी भोगिजे एकें । काळें केवीं हें ?

13.59

तरी ययाचा मारु । देखताति अनिवारु ।
परी स्वमतीं भरु । अभिमानियां

13.60

हें जाणों मृत्यु रागिटा । सिंहाडयाचा दरकुटा ।
परी काय वांजटा । पूरिजत असे ?

13.61

महाकल्पापरौतीं । कव घालूनि अवचितीं ।
सत्यलोकभद्रजाती । आंगीं वाजे

13.62

लोकपाळ नित्य नवे । दिग्गजांचे मेळावे ।
स्वर्गींचिये आडवे । रिगोनि मोडी

13.63

येर ययाचेनि अंगवातें । जन्ममृत्यूचिये गर्तें ।
निर्जिवें होऊनि भ्रमतें । जीवमृगें

13.64

न्याहाळीं पां केव्हडा । पसरलासे चवडा ।
जो करूनियां माजिवडा । आकारगजु

13.65

म्हणौनि काळाची सत्ता । हाचि बोलु निरुता ।
ऐसे वाद पंडुसुता । क्षेत्रालागीं

13.66

हे बहु उखिविखी । ऋषीं केली नैमिषीं ।
पुराणें इयेविषीं । मतपत्रिका

13.67

अनुष्टुभादि छंदें । प्रबंधीं जें विविधें ।
ते पत्रावलंबन मदें । करिती अझुनी

13.68

वेदींचें बृहत्सामसूत्र । जें देखणेपणें पवित्र ।
परी तयाही हें क्षेत्र । नेणवेचि

13.69

आणीक आणीकींही बहुतीं । महाकवीं हेतुमंतीं ।
ययालागीं मती । वेंचिलिया

13.70

परी ऐसें हें एवढें । कीं अमुकेयाचेंचि फुडें ।
हें कोणाही वरपडें । होयचिना

13.71

आतां यावरी जैसें । क्षेत्र हें असे ।
तुज सांगों तैसें । साद्यंतु गा

13.72

तरि महाभूतपंचकु । आणि अहंकारु एकु ।
बुद्धि अव्यक्त दशकु । इंद्रियांचा

13.73

मन आणीकही एकु । विषयांचा दशकु ।
सुख दुःख द्वेषु । संघात इच्छा

13.74

आणि चेतना धृती । एवं क्षेत्रव्यक्ती ।
सांगितली तुजप्रती । आघवीची

13.75

आतां महाभूतें कवणें । कवण विषयो कैसीं करणे ।
हें वेगळालेपणें । एकैक सांगों

13.76

तरी पृथ्वी आप तेज । वायु व्योम इयें तुज ।
सांगितलीं बुझ । महाभूतें पांचें

13.77

आणि जागतिये दशे । स्वप्न लपालें असे ।
नातरी अंवसे । चंद्र गूढु

13.78

नाना अप्रौढबाळकीं । तारुण्य राहे थोकीं ।
कां न फुलतां कळिकीं । आमोदु जैसा

13.79

किंबहुना काष्ठीं । वन्हि जेवीं किरीटी ।
तेवीं प्रकृतिचिया पोटीं । गोप्यु जो असे

13.80

जैसा ज्वरु धातुगतु । अपथ्याचें मिष पहातु ।
मग जालिया आंतु । बाहेरी व्यापी

13.81

तैसी पांचांही गांठीं पडे । जैं देहाकारु उघडे ।
तैं नाचवी चहूंकडे । तो अहंकारु गा

13.82

नवल अहंकाराची गोठी । विशेषें न लगे अज्ञानापाठीं ।
सज्ञानाचे झोंबे कंठीं । नाना संकटीं नाचवी

13.83

आतां बुद्धि जे म्हणिजे । ते ऐशियां चिन्हीं जाणिजे ।
बोलिलें यदुराजें । तें आइकें सांगों

13.84

तरी कंदर्पाचेनि बळें । इंद्रियवृत्तीचेनि मेळें ।
विभांडूनि येती पाळे । विषयांचे

13.85

तो सुखदुःखांचा नागोवा । जेथ उगाणों लागे जीवा ।
तेथ दोहींसी बरवा । पाडु जे धरी

13.86

हें सुख हें दुःख । हें पुण्य हें दोष ।
कां हें मैळ हें चोख । ऐसें जे निवडी

13.87

जिथे अधमोत्तम सुझे । जिये सानें थोर बुझे ।
जिया दिठी पारखिजे । विषो जीवें

13.88

जे तेजतत्त्वांची आदी । जे सत्त्वगुणाची वृद्धी ।
जे आत्मया जीवाची संधी । वसवीत असे जे

13.89

अर्जुना ते गा जाण । बुद्धि तूं संपूर्ण ।
आतां आइकें वोळखण । अव्यक्ताची

13.90

पैं सांख्यांचिया सिद्धांतीं । प्रकृती जे महामती ।
तेचि एथें प्रस्तुतीं । अव्यक्त गा

13.91

आणि सांख्ययोगमतें । प्रकृती परिसविली तूंतें ।
ऐसी दोहीं परीं जेथें । विवंचिली

13.92

तेथ दुजी जे जीवदशा । तिये नांव वीरेशा ।
येथ अव्यक्त ऐसा । पर्यावो हा

13.93

तऱही पाहालया रजनी । तारा लोपती गगनीं ।
कां हारपें अस्तमानीं । भूतक्रिया

13.94

नातरी देहो गेलिया पाठीं । देहादिक किरीटी ।
उपाधि लपे पोटीं । कृतकर्माच्या

13.95

कां बीजमुद्रेआंतु । थोके तरु समस्तु ।
कां वस्त्रपणे तंतु- । दशे राहे

13.96

तैसे सांडोनियां स्थूळधर्म । महाभूतें भूतग्राम ।
लया जाती सूक्ष्म । होऊनि जेथे

13.97

अर्जुना तया नांवें । अव्यक्त हें जाणावें ।
आतां आइकें आघवें । इंद्रियभेद

13.98

तरी श्रवण नयन । त्वचा घ्राण रसन ।
इयें जाणें ज्ञान- । करणें पांचें

13.99

इये तत्त्वमेळापंकीं । सुखदुःखांची उखिविखी ।
बुद्धि करिते मुखीं । पांचें इहीं

13.100

मग वाचा आणि कर । चरण आणि अधोद्वार ।
पायु हे प्रकार । पांच आणिक

13.101

कर्मेंद्रियें म्हणिपती । तीं इयें जाणिजती ।
आइकें कैवल्यपती । सांगतसे

13.102

पैं प्राणाची अंतौरी । क्रियाशक्ति जे शरीरीं ।
तियेचि रिगिनिगी द्वारीं । पांचे इहीं

13.103

एवं दाहाही करणें । सांगितलीं देवो म्हणे ।
परिस आतां फुडेपणें । मन तें ऐसें

13.104

जें इंद्रियां आणि बुद्धि । माझारिलिये संधीं ।
रजोगुणाच्या खांदीं । तरळत असे

13.105

नीळिमा अंबरीं । कां मृगतृष्णालहरी ।
तैसें वायांचि फरारी । वावो जाहलें

13.106

आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा ।
वायुतत्त्व दशधा । एकचि जाहलें

13.107

मग तिहीं दाहे भागीं । देहधर्माच्या खैवंगीं ।
अधिष्ठिलें आंगीं । आपुलाल्या

13.108

तेथ चांचल्य निखळ । एकलें ठेलें निढाळ ।
म्हणौनि रजाचें बळ । धरिलें तेणें

13.109

तें बुद्धीसि बाहेरी । अहंकाराच्या उरावरी ।
ऐसां ठायीं माझारीं । बळियावलें

13.110

वायां मन हें नांव । एऱहवीं कल्पनाचि सावेव ।
जयाचेनि संगें जीव- । दशा वस्तु

13.111

जें प्रवृत्तीसि मूळ । कामा जयाचे बळ ।
जें अखंड सूये छळ । अहंकारासी

13.112

जें इच्छेतें वाढवी । आशेतें चढवी ।
जें पाठी पुरवी । भयासि गा

13.113

द्वैत जेथें उठी । अविद्या जेणें लाठी ।
जें इंद्रियांतें लोटी । विषयांमजी

13.114

संकल्पें सृष्टी घडी । सवेंचि विकल्पूनि मोडी ।
मनोरथांच्या उतरंडी । उतरी रची

13.115

जें भुलीचें कुहर । वायुतत्त्वाचें अंतर ।
बुद्धीचें द्वार । झाकविलें जेणें

13.116

तें गा किरीटी मन । या बोला नाहीं आन ।
आतां विषयाभिधान । भेदू आइकें

13.117

तरी स्पर्शु आणि शब्दु । रूप रसु गंधु ।
हा विषयो पंचविधु । ज्ञानेंद्रियांचा

13.118

इहीं पांचैं द्वारीं । ज्ञानासि धांव बाहेरी ।
जैसा कां हिरवे चारीं । भांबावे पशु

13.119

मग स्वर वर्ण विसर्गु । अथवा स्वीकार त्यागु ।
संक्रमण उत्सर्गु । विण्मूत्राचा

13.120

हे कर्मेंद्रियांचे पांच । विषय गा साच ।
जे बांधोनियां माच । क्रिया धांवे

13.121

ऐसे हे दाही । विषय गा इये देहीं ।
आतां इच्छा तेही । सांगिजैल

13.122

तरि भूतलें आठवे । कां बोलें कान झांकवे ।
ऐसियावरि चेतवे । जे गा वृत्ती

13.123

इंद्रियाविषयांचिये भेटी- । सरसीच जे गा उठी ।
कामाची बाहुटी । धरूनियां

13.124

जियेचेनि उठिलेपणें । मना सैंघ धावणें ।
न रिगावें तेथ करणें । तोंडें सुती

13.125

जिये वृत्तीचिया आवडी । बुद्धी होय वेडी ।
विषयां जिया गोडी । ते गा इच्छा

13.126

आणी इच्छिलिया सांगडें । इंद्रियां आमिष न जोडे ।
तेथ जोडे ऐसा जो डावो पडे । तोचि द्वेषु

13.127

आतां यावरी सुख । तें एवंविध देख ।
जेणें एकेंचि अशेख । विसरे जीवु

13.128

मना वाचे काये । जें आपुली आण वाये ।
देहस्मृतीची त्राये । मोडित जें ये

13.129

जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें ।
सात्त्विकासी दुणें । वरीही लाभु

13.130

कां आघवियाचि इंद्रियवृत्ती । हृदयाचिया एकांतीं ।
थापटूनि सुषुप्ती । आणी जें गा

13.131

किंबहुना सोये । जीव आत्मयाची लाहे ।
तेथ जें होये । तया नाम सुख

13.132

आणि ऐसी हे अवस्था । न जोडतां पार्था ।
जें जीजे तेंचि सर्वथा । दुःख जाणे

13.133

तें मनोरथसंगें नव्हे । एऱहवीं सिद्धी गेलेंचि आहे ।
हे दोनीचि उपाये । सुखदुःखासी

13.134

आतां असंगा साक्षिभूता । देहीं चैतन्याची जे सत्ता ।
तिये नाम पंडुसुता । चेतना येथें

13.135

जे नखौनि केशवरी । उभी जागे शरीरीं ।
जे तिहीं अवस्थांतरी । पालटेना

13.136

मनबुद्ध्यादि आघवीं । जियेचेनि टवटवीं ।
प्रकृतिवनमाधवीं । सदांचि जे

13.137

जडाजडीं अंशीं । राहाटे जे सरिसी ।
ते चेतना गा तुजसी । लटिकें नाहीं

13.138

पैं रावो परिवारु नेणे । आज्ञाचि परचक्र जिणे ।
कां चंद्राचेनि पूर्णपणें । सिंधू भरती

13.139

नाना भ्रामकाचें सन्निधान । लोहो करी सचेतन ।
कां सूर्यसंगु जन । चेष्टवी गा

13.140

अगा मुख मेळेंविइण । पिलियाचें पोषण ।
करी निरीक्षण । कूर्मी जेवीं

13.142

मग तियेतें चेतना । म्हणिपे पैं अर्जुना ।
आतां धृतिविवंचना । भेदु आइक

13.143

तरी भूतां परस्परें । उघड जाति स्वभाववैरें ।
नव्हे पृथ्वीतें नीरें । न नाशिजे ?

13.144

नीरातें आटी तेज । तेजा वायूसि झुंज ।
आणि गगन तंव सहज । वायू भक्षी

13.145

तेवींचि कोणेही वेळे । आपण कायिसयाही न मिळे ।
आंतु रिगोनि वेगळें । आकाश हें

13.146

ऐसीं पांचही भूतें । न साहती एकमेकांतें ।
कीं तियेंही ऐक्यातें । देहासी येती

13.147

द्वंद्वाची उखिविखी । सोडूनि वसती एकीं ।
एकेकातें पोखी । निजगुणें गा

13.148

ऐसें न मिळे तयां साजणें । चळे धैर्यें जेणें ।
तयां नांव म्हणें । धृती मी गा

13.149

आणि जीवेंसी पांडवा । या छत्तिसांचा मेळावा ।
तो हा एथ जाणावा । संघातु पैं गा

13.150

एवं छत्तीसही भेद । सांगितले तुज विशद ।
यया येतुलियातें प्रसिद्ध । क्षेत्र म्हणिजे

13.151

रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा ।
कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो

13.152

करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे ।
कां वाक्यें म्हणिपती पुंजे । अक्षरांचे

13.153

कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा ।
नाना लोकां सकळां । नाम जग

13.154

कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानीं ।
धरिजे तो जनीं । दीपु होय

13.155

तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें ।
तेणें समूह परत्वें । क्षेत्र म्हणिपे

13.156

आणि वाहतेनि भौतिकें । पाप पुण्य येथें पिके ।
म्हणौनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों

13.157

आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें ।
परी असो हें अनंतें । नामें यया

13.158

पैं परतत्त्वाआरौतें । स्थावराआंतौतें ।
जें कांहीं होतें जातें । क्षेत्रचि हें

13.159

परि सुर नर उरगीं । घडत आहे योनिविभागीं ।
तें गुणकर्मसंगीं । पडिलें सातें

13.160

हेचि गुणविवंचना । पुढां म्हणिपैल अर्जुना ।
प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं

13.161

क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार ।
म्हणौनि आतां उदार । ज्ञान आइकें

13.162

जया ज्ञानालागीं । गगन गिळिताती योगी ।
स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि

13.163

न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड ।
योगासें दुवाड । हेळसिती

13.164

तपोदुर्गें वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित ।
उलथूनि सांडित । कर्मवल्ली

13.165

नाना भजनमार्गी । धांवत उघडिया आंगीं ।
एक रिगताति सुरंगीं । सुषुम्नेचिये

13.166

ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतान्ही ।
वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती

13.167

देईल गुरुसेवा । इया बुद्धि पांडवा ।
जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे

13.168

जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणें आणी ।
जीवा आत्मया बुझावणी । मांडूनि दे

13.169

जें इंद्रियांचीं द्वारें आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी ।
जें दैन्यचि फेडी । मानसाचें

13.170

द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचें सुयाणें होये ।
जया ज्ञानाची सोये । ऐसें करी

13.171

मदाचा ठावोचि पुसी । जें महामोहातें ग्रासी ।
नेदी आपपरु ऐसी । भाष उरों

13.172

जें संसारातें उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी ।
अनावरातें वेंटाळी । ज्ञेयातें जें

13.173

जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें ।
जयाचेनि विंदाणें । जग हें चेष्टें

13.174

जयाचेनि उजाळें । उघडती बुद्धीचे डोळे ।
जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया

13.175

ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान ।
जेथ विटाळलें मन । चोख कीजे

13.176

आत्मया जीवबुद्धी । जे लागली होती क्षयव्याधी ।
ते जयाचिये सन्निधी । निरुजा कीजे

13.177

तें अनिरूप्य कीं निरूपिजे । ऐकतां बुद्धी आणिजे ।
वांचूनि डोळां देखिजे । ऐसें नाहीं

13.178

मग तेचि इये शरीरीं । जैं आपुला प्रभावो करी ।
तैं इंद्रियांचिया व्यापारीं । डोळांहि दिसे

13.179

पैं वसंताचें रिगवणें । झाडांचेनि साजेपणें ।
जाणिजे तेवीं करणें । सांगती ज्ञान

13.180

अगा वृक्षासि पाताळीं । जळ सांपडे मुळीं ।
तें शाखांचिये बाहाळीं । बाहेर दिसे

13.181

कां भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव ।
नाना आचारगौरव । सुकुलीनाचें

13.182

अथवा संभ्रमाचिया आयती । स्नेहो जैसा ये व्यक्तिइ ।
कां दर्शनाचिये प्रशस्तीं । पुण्यपुरुष

13.183

नातरी केळीं कापूर जाहला । जेवीं परिमळें जाणों आला ।
कां भिंगारीं दीपु ठेविला । बाहेरी फांके

13.184

तैसें हृदयींचेनि ज्ञानें । जियें देहीं उमटती चिन्हें ।
तियें सांगों आतां अवधानें । चागें आइक

13.185

तरी कवणेही विषयींचें । साम्य होणें न रुचे ।
संभावितपणाचें । वोझे जया

13.186

आथिलेचि गुण वानितां । मान्यपणें मानितां ।
योग्यतेचें येतां । रूप आंगा

13.187

तैं गजबजों लागे कैसा । व्याधें रुंधला मृगु जैसा ।
कां बाहीं तरतां वळसा । दाटला जेवीं

13.188

पार्था तेणें पाडें । सन्मानें जो सांकडे ।
गरिमेतें आंगाकडे । येवोंचि नेदी

13.189

पूज्यता डोळां न देखावी । स्वकीर्ती कानीं नायकावी ।
हा अमुका ऐसी नोहावी । सेचि लोकां

13.190

तेथ सत्काराची कें गोठी । कें आदरा देईल भेटी ।
मरणेंसीं साटी । नमस्कारितां

13.191

वाचस्पतीचेनि पाडें । सर्वज्ञता तरी जोडे ।
परी वेडिवेमाजीं दडे । महमेभेणें

13.192

चातुर्य लपवी । महत्त्व हारवी ।
पिसेपण मिरवी । आवडोनि

13.193

लौकिकाचा उद्वेगु । शास्त्रांवरी उबगु ।
उगेपणीं चांगु । आथी भरु

13.194

जगें अवज्ञाचि करावी । संबंधीं सोयचि न धरावी ।
ऐसी ऐसी जीवीं । चाड बहु

13.195

तळौटेपण बाणे । आंगीं हिणावो खेवणें ।
तें तेंचि करणें । बहुतकरुनी

13.196

हा जीतु ना नोहे । लोक कल्पी येणें भावें ।
तैसें जिणें होआवें । ऐसी आशा

13.197

पै चालतु कां नोहे । कीं वारेनि जातु आहे ।
जना ऐसा भ्रमु जाये । तैसें होईजे

13.198

माझें असतेपण लोपो । नामरूप हारपो ।
मज झणें वासिपो । भूतजात

13.199

ऐसीं जयाचीं नवसियें । जो नित्य एकांता जातु जाये ।
नामेंचि जो जिये । विजनाचेनि

13.200

वायू आणि तया पडे । गगनेंसीं बोलों आवडे ।
जीवें प्राणें झाडें । पढियंतीं जया

13.201

किंबहुना ऐसीं । चिन्हें जया देखसी ।
जाण तया ज्ञानेंसीं । शेज जाहली

13.202

पैं अमानित्व पुरुषीं । तें जाणावें इहीं मिषीं ।
आतां अदंभाचिया वोळखीसी । सौरसु देवों

13.203

तरी अदंभित्व ऐसें । लोभियाचें मन जैसें ।
जीवु जावो परी नुमसे । ठेविला ठावो

13.204

तयापरी किरीटी । पडिलाही प्राणसंकटीं ।
तरी सुकृत न प्रकटी । आंगें बोलें

13.205

खडाणें आला पान्हा । पळवी जेवीं अर्जुना ।
कां लपवी पण्यांगना । वडिलपण

13.206

आढ्यु आतुडे आडवीं । मग आढ्यता जेवीं हारवी ।
नातरी कुळवधू लपवी । अवेवांतें

13.207

नाना कृषीवळु आपुलें । पांघुरवी पेरिलें ।
तैसें झांकी निपजलें । दानपुण्य

13.208

वरिवरी देहो न पूजी । लोकांतें न रंजी ।
स्वधर्मु वाग्ध्वजीं । बांधों नेणे

13.209

परोपकारु न बोले । न मिरवी अभ्यासिलें ।
न शके विकूं जोडलें । स्फीतीसाठीं

13.210

शरीर भोगाकडे । पाहतां कृपणु आवडे ।
एऱहवीं धर्मविषयीं थोडें । बहु न म्हणे

13.211

घरीं दिसे सांकड । देहींची आयती रोड ।
परी दानीं जया होड । सुरतरूसीं

13.212

किंबहुना स्वधर्मीं थोरु । अवसरीं उदारु ।
आत्मचर्चे चतुरु । एऱहवी वेडा

13.213

केळीचें दळवाडें । हळू पोकळ आवडे ।
परी फळोनियां गाढें । रसाळ जैसें

13.214

कां मेघांचें आंग झील । दिसे वारेनि जैसें जाईल ।
परी वर्षती नवल । घनवट तें

13.215

तैसा जो पूर्णपणीं । पाहतां धाती आयणी ।
एऱहवीं तरी वाणी । तोचि ठावो

13.216

हें असो या चिन्हांचा । नटनाचु ठायीं जयाच्या ।
जाण ज्ञान तयाच्या । हातां चढें

13.217

पैं गा अदंभपण । म्हणितलें तें हें जाण ।
आतां आईक खूण । अहिंसेची

13.218

तरी अहिंसा बहुतीं परीं । बोलिली असे अवधारीं ।
आपुलालिया मतांतरीं । निरूपिली

13.219

परी ते ऐसी देखा । जैशा खांडूनियां शाखा ।
मग तयाचिया बुडुखा । कूंप कीजे

13.220

कां बाहु तोडोनि पचविजे । मग भूकेची पीडा राखिजे ।
नाना देऊळ मोडोनि कीजे । पौळी देवा

13.221

तैसी हिंसाचि करूनि अहिंसा । निफजविजे हा ऐसा ।
पैं पूर्वमीमांसा । निर्णो केला

13.222

जे अवृष्टीचेनि उपद्रवें । गादलें विश्व आघवें ।
म्हणौनि पर्जन्येष्टी करावे । नाना याग

13.223

तंव तिये इष्टीचिया बुडीं । पशुहिंसा रोकडी ।
मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ?

13.224

पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा ? ।
परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा

13.225

आणि आयुर्वेदु आघवा । तो याच मोहोरा पांडवा ।
जे जीवाकारणें करावा । जीवघातु

13.226

नाना रोगें आहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं ।
ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां

13.227

तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले ।
एका उपडविलें । समूळीं सपत्रीं

13.228

एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली ।
एकें गर्भिणी उकडविली । पुटामाजीं

13.229

अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविल्या शिरा ।
ऐसे जीव घेऊनि धनुर्धरा । कोरडे केले

13.230

आणि जंगमाही हात । लाऊनि काढिलें पित्त ।
मग राखिले शिणत । आणिक जीव

13.231

अहो वसतीं धवळारें । मोडूनि केलीं देव्हारें ।
नागवूनि वेव्हारें । गवांदी घातली

13.232

मस्तक पांघुरविलें । तंव तळवटीं उघडें पडलें ।
घर मोडोनि केले । मांडव पुढें

13.233

नाना पांघुरणें । जाळूनि जैसें तापणें ।
जालें आंगधुणें । कुंजराचें

13.234

नातरी बैल विकूनि गोठा । पुंसा लावोनि बांधिजे गांठा ।
इया करणी कीं चेष्टा ? । काइ हसों

13.235

एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी ।
तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले

13.236

एक न पचवितीचि कण । इये हिंसेचे भेण ।
तेथ कदर्थले प्राण । तेचि हिंसा

13.237

एवं हिंसाचि अहिंसा । कर्मकांडीं हा ऐसा ।
सिद्धांतु सुमनसा । वोळखें तूं

13.238

पहिलें अहिंसेचें नांव । आम्हीं केलें जंव ।
तंव स्फूर्ति बांधली हांव । इये मती

13.239

तरि कैसेनि इयेतें गाळावें । म्हणौनि पडिलें बोलावें ।
तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा भावो

13.240

बहुतकरूनि किरीटी । हाचि विषो इये गोठी ।
एऱहवी कां आडवाटीं । धाविजैल गा ?

13.241

आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनियां धनुर्धरा ।
प्राप्तां मतांतरां । निर्वेचु कीजे

13.242

ऐसी हे अवधारीं । निरूपिती परी ।
आतां ययावरी । मुख्य जें गा

13.243

तें स्वमत बोलिजैल । अहिंसे रूप किजैल ।
जेणें उठलिया आंतुल । ज्ञान दिसे

13.244

परिइ तें अधिष्ठिलेनि आंगें । जाणिजे आचरतेनि बगें ।
जैसी कसवटी सांगे । वानियातें

13.246

तरी तरंगु नोलांडितु । लहरी पायें न फोडितु ।
सांचलु न मोडितु । पाणियाचा

13.247

वेगें आणि लेसा । दिठी घालूनि आंविसा ।
जळीं बकु जैसा । पाउल सुये

13.248

कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार ।
कुचुंबैल केसर । इया शंका

13.249

तैसे परमाणु पां गुंतले । जाणूनि जीव सानुले ।
कारुण्यामाजीं पाउलें । लपवूनि चाले

13.250

ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु ।
जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु

13.251

ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना ।
हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना

13.252

पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें ।
तेथ दांतांचे आगरडे । लागती जैसे

13.253

कां स्नेहाळु माये । तान्हयाची वास पाहे ।
तिये दिठी आहे । हळुवार जें

13.254

नाना कमळदळें । डोलविजती ढाळें ।
तो जेणें पाडें बुबुळें । वारा घेपे

13.255

तैसेनि मार्दवें पाय । भूमीवरी न्यसीतु जाय ।
लागती तेथ होय । जीवां सुख

13.256

ऐसिया लघिमा चालतां । कृमि कीटक पंडुसुता ।
देखे तरी माघौता । हळूचि निघे

13.257

म्हणे पावो धडफडील । तरी स्वामीची निद्रा मोडैल ।
रचलेपणा पडैल । झोती हन

13.258

इया काकुळती । वाहणी घे माघौती ।
कोणेही व्यक्ती । न वचे वरी

13.259

जीवाचेनि नांवें । तृणातेंही नोलांडवे ।
मग न लेखितां जावें । हे कें गोठी ?

13.260

मुंगिये मेरु नोलांडवे । मशका सिंधु न तरवे ।
तैसा भेटलियां न करवे । अतिक्रमु

13.261

ऐसी जयाची चाली । कृपाफळी फळा आली ।
देखसी जियाली । दया वाचे

13.262

स्वयें श्वसणेंचि सुकुमार । मुख मोहाचें माहेर ।
माधुर्या जाहले अंकुर । दशन तैसे

13.263

पुढां स्नेह पाझरे । माघां चालती अक्षरें ।
शब्द पाठीं अवतरे । कृपा आधीं

13.264

तंव बोलणेंचि नाहीं । बोलों म्हणे जरी कांहीं ।
तरी बोल कोणाही । खुपेल कां

13.265

बोलतां अधिकुही निघे । तरी कोण्हाही वर्मीं न लगे ।
आणि कोण्हासि न रिघे । शंका मनीं

13.266

मांडिली गोठी हन मोडैल । वासिपैल कोणी उडैल ।
आइकोनिचि वोवांडिल । कोण्ही जरी

13.267

तरी दुवाळी कोणा नोहावी । भुंवई कवणाची नुचलावी ।
ऐसा भावो जीवीं । म्हणौनि उगा

13.268

मग प्रार्थिला विपायें । जरी लोभें बोलों जाये ।
तरी परिसतया होये । मायबापु

13.269

कां नादब्रह्मचि मुसे आलें । कीं गंगापय असललें ।
पतिव्रते आलें । वार्धक्य जैसे

13.270

तैसें साच आणि मवाळ । मितले आणि रसाळ ।
शब्द जैसे कल्लोळ । अमृताचे

13.271

विरोधुवादुबळु । प्राणितापढाळु ।
उपहासु छळु । वर्मस्पर्शु

13.272

आटु वेगु विंदाणु । आशा शंका प्रतारणु ।
हे संन्यासिले अवगुणु । जया वाचा

13.273

आणि तयाचि परी किरीटी । थाउ जयाचिये दिठी ।
सांडिलिया भ्रुकुटी । मोकळिया

13.274

कां जे भूतीं वस्तु आहे । तियें रुपों शके विपायें ।
म्हणौनि वासु न पाहे । बहुतकरूनी

13.275

ऐसाही कोणे एके वेळे । भीतरले कृपेचेनि बळें ।
उघडोनियां डोळे । दृष्टी घाली

13.276

तरी चंद्रबिंबौनि धारा । निघतां नव्हती गोचरा ।
परि एकसरें चकोरां । निघती दोंदें

13.277

तैसें प्राणियांसि होये । जरी तो कहींवासु पाहे ।
तया अवलोकनाची सोये । कूर्मींही नेणे

13.278

किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी ।
करही देखसी । तैसेचि ते

13.279

तरी होऊनियां कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ ।
तैसे जयाचे हात । निर्व्यापार

13.280

अक्षमें आणि संन्यासिलें । कीं निरिंधन आणि विझालें ।
मुकेनि घेतलें । मौन जैसें

13.281

तयापरी कांहीं । जयां करां करणें नाहीं ।
जे अकर्तयाच्या ठायीं । बैसों येती

13.282

आसुडैल वारा । नख लागेल अंबरा ।
इया बुद्धी करां । चळों नेदी

13.283

तेथ आंगावरिलीं उडवावीं । कां डोळां रिगतें झाडावीं ।
पशुपक्ष्यां दावावीं । त्रासमुद्रा

13.284

इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी ।
मग शस्त्राचें किरीटी । बोलणें कें ?

13.285

लीलाकमळें खेळणें । कांपुष्पमाळा झेलणें ।
न करी म्हणे गोफणें । ऐसें होईल

13.286

हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी ।
नखांची गुंडाळी । बोटांवरी

13.287

तंव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे प्रस्तावो ।
तरी हातां हाचि सरावो । जे जोडिजती

13.288

कां नाभिकारा उचलिजे । हातु पडिलियां देइजे ।
नातरी आर्तातें स्पर्शिजे । अळुमाळु

13.289

हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें ।
नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो

13.290

पावोनि तो स्पर्शु । मलयानिळु खरपुसु ।
तेणें मानें पशु । कुरवाळणें

13.291

जे सदा रिते मोकळे । जैशी चंदनांगें निसळें ।
न फळतांही निर्फळें । होतीचिना

13.292

आतां असो हें वाग्जाळ । जाणें तें करतळ ।
सज्जनांचे शीळ । स्वभाव जैसे

13.293

आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें ।
तरी सांगितले कोणाचे । विलास हे ?

13.294

काइ शाखा नव्हे तरु ? । जळेंवीण असे सागरु ? ।
तेज आणि तेजाकारु । आन काई ?

13.295

अवयव आणि शरीर । हे वेगळाले कीर ? ।
कीं रसु आणि नीर । सिनानीं आथी ?

13.296

म्हणौनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव ।
ते मनचि गा सावयव । ऐसें जाणें

13.297

जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रुख जाहलें ।
तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें । अंतरचि कीं

13.298

पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी ।
तरी कैंची बाहेरी । वोसंडेल ?

13.299

आवडे ते वृत्ती किरीटी । आधीं मनौनीचि उठी ।
मग ते वाचे दिठी । करांसि ये

13.300

वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई ? ।
बींवीण भुईं । अंकुर असे ?

13.301

म्हणौनि मनपण जैं मोडे । तैं इंद्रिय आधींचि उबडें ।
सूत्रधारेंवीण साइखडें । वावो जैसें

13.302

उगमींचि वाळूनि जाये । तें वोघीं कैचें वाहे ।
जीवु गेलिया आहे । चेष्टा देहीं ?

13.303

तैसें मन हें पांडवा । मूळ या इंद्रियभावा ।
हेंचि राहटे आघवां । द्वारीं इहीं

13.304

परी जिये वेळीं जैसें । जें होऊनि आंतु असे ।
बाहेरी ये तैसें । व्यापाररूपें

13.305

यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थांवे थोरें ।
पिकली द्रुती आदरें । बोभात निघे

13.306

म्हणौनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितां हीं उदावादा ।
अहिंसेचा धंदा । करितें आहाती

13.307

समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांते ।
तैसें स्वसंपत्ती चित्तें । इंद्रियां केलें

13.308

हें बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु ।
वोळी लिही व्यक्तु । आपणचि

13.309

तैसें दयाळुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें ।
मग तेथ उपजविलें । अहिंसेतें

13.310

याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी ।
मनाचिये राहाटी । रूप केलें

13.311

ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा ।
जाहला ठायीं जयाचा । देखशील

13.312

तो जाण वेल्हाळ । ज्ञानाचें वेळाउळ ।
हें असो निखळ । ज्ञानचि तो

13.313

जे अहिंसा कानें ऐकिजे । ग्रंथाधारें निरूपिजे ।
ते पाहावी हें उपजे । तैं तोचि पाहावा

13.314

ऐसें म्हणितलें देवें । तें बोलें एकें सांगावें ।
परी फांकला हें उपसाहावें । तुम्हीं मज

13.315

म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं ।
कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे

13.316

तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्तीं ।
वाहविला मती । आकळेना

13.317

तरि तैसें नोहे अवधारा । कारण असें विस्तारा ।
एऱहवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि

13.318

अहिंसा म्हणतां थोडी । परिइ ते तैंचि होय उघडी ।
जैं लोटिजती कोडी । मतांचिया

13.319

एऱहवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें ।
बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं

13.320

रत्नपारखियांच्या गांवीं । जाईल गंडकी तरी सोडावी ।
काश्मीरीं न करावी । मिडगण जेवीं

13.321

काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा ।
पिठाचा विकरा । तिये सातें ?

13.322

म्हणौनि इये सभे । बोलकेपणाचेनि क्षोभें ।
लाग सरुउं न लभे । बोला प्रभु

13.323

सामान्या आणि विशेषा । सकळै कीजेल देखा ।
तरी कानाचेया मुखा- । कडे न्याल ना तुम्ही

13.324

शंकेचेनि गदळें । जैं शुद्ध प्रमेय मैळे ।
तैं मागुतिया पाउलीं पळे । अवधान येतें

13.325

कां करूनि बाबुळियेची बुंथी । जळें जियें ठाती ।
तयांची वास पाहाती । हंसु काई ?

13.326

कां अभ्रापैलीकडे । जैं येत चांदिणें कोडें ।
तैं चकोरें चांचुवडें । उचलितीना

13.327

तैसें तुम्ही वास न पाहाल । ग्रंथु नेघा वरी कोपाल ।
जरी निर्विवाद नव्हैल । निरूपण

13.328

न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें ।
तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी

13.329

आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें ।
जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां

13.330

एऱहवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे ।
जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां

13.331

जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवूनि न्याल ।
म्हणौनि ग्रंथु नव्हे वोल । साचचि हे

13.332

कां सर्स्वाचा लोभु धरा । वोलीचा अव्हेरु करा ।
तरी गीते मज अवधारा । एकचि गती

13.333

किंबहुना मज । तुमचिया कृपा काज ।
तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें

13.334

तरिइ तुम्हां रसिकांजोगें । व्याख्यान शोधावें लागे ।
म्हणौनि जी मतांगें । बोलों गेलों

13.335

तंव कथेसि पसरु जाहला । श्लोकार्थु दूरी गेला ।
कीजो क्षमा यया बोला । अपत्या मज

13.336

आणि घांसाआंतिल हरळु । फेडितां लागे वेळु ।
ते दूषण नव्हें खडळु । सांडावा कीं

13.337

कां संवचोरा चुकवितां । दिवस लागलिया माता ।
कोपावें कीं जीविता । जिताणें कीजे ?

13.338

परी यावरील हें नव्हे । तुम्हीं उपसाहिलें तेंचि बरवें ।
आतां अवधारिजो देवें । बोलिलें ऐसें

13.339

म्हणे उन्मेखसुलोचना । सावध होईं अर्जुना ।
करूं तुज ज्ञाना । वोळखी आतां

13.340

तरी ज्ञान गा तें एथें । वोळख तूं निरुतें ।
आक्रोशेंवीण जेथें । क्षमा असे

13.341

अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी ।
कां सदैवाचिया घरीं । संपत्ति जैसी

13.342

पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे ।
तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों

13.343

तरी पढियंते लेणें । आंगीं भावें जेणें ।
धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया

13.344

त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे ।
वरी पडिलिया नव्हे । वांकुडा जो

13.345

अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें ।
अनपेक्षिताही करवे । तोचि मानु

13.346

जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये ।
निंदास्तुती नोहे । दुखंडु जो

13.347

उन्हाळेनि जो न तपे । हिमवंती न कांपे ।
कयसेनिही न वासिपे । पातलेया

13.348

स्वशिखरांचा भारु । नेणें जैसा मेरु ।
कीं धरा यज्ञसूकरु । वोझें न म्हणे

13.349

नाना चराचरीं भूतीं । दाटणी नव्हे क्षिती ।
तैसा नाना द्वंद्वीं प्राप्तीं । घामेजेना

13.350

घेऊनी जळाचे लोट । आलिया नदीनदांचे संघाट ।
करी वाड पोट । समुद्र जेवीं

13.351

तैसें जयाचिया ठायीं । न साहणें काहींचि नाहीं ।
आणि साहतु असे ऐसेंही । स्मरण नुरे

13.352

आंगा जें पातलें । तें करूनि घाली आपुलें ।
येथ साहतेनि नवलें । घेपिजेना

13.353

हे अनाक्रोश क्शमा । जयापाशीं प्रियोत्तमा ।
जाण तेणें महिमा । ज्ञानासि गा

13.354

तो पुरुषु पांडवा । ज्ञानाचा वोलावा ।
आतां परिस आर्जवा । रूप करूं

13.355

तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें ।
आवडे तयाही दोषें । एकचि गा

13.356

कां तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवीं चंडांशु ।
जगा एकचि अवकाशु । आकाश जैसें

13.357

तैसें जयाचें मन । माणुसाप्रति आन आन ।
नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें

13.358

जे जगेंचि सनोळख । जगेंसीं जुनाट सोयरिक ।
आपपर हें भाख । जाणणें नाहीं

13.359

भलतेणेंसीं मेळु । पाणिया ऐसा ढाळु ।
कवणेविखीं आडळु । नेघे चित्त

13.360

वारियाची धांव । तैसे सरळ भाव ।
शंका आणि हांव । नाहीं जया

13.361

मायेपुढें बाळका । रिगतां न पडे शंका ।
तैसें मन देतां लोकां । नालोची जो

13.362

फांकलिया इंदीवरा । परिवारु नाहीं धनुर्धरा ।
तैसा कोनकोंपरा । नेणेचि जो

13.363

चोखाळपण रत्नाचें । रत्नावरी किरणाचें ।
तैसें पुढां मन जयाचें । करणें पाठीं

13.364

आलोचूं जो नेणे । अनुभवचि जोगावणें ।
धरी मोकळी अंतःकरणें । नव्हेचि जया

13.365

दिठी नोहे मिणधी । बोलणें नाहीं संदिग्धी ।
कवणेंसीं हीनबुद्धी । राहाटीजे ना

13.366

दाही इंद्रियें प्रांजळें । निष्प्रपंचें निर्मळें ।
पांचही पालव मोकळे । आठही पाहर

13.367

अमृताची धार । तैसें उजूं अंतर ।
किंबहुना जो माहेर । या चिन्हांचें

13.368

तो पुरुष सुभटा । आर्जवाचा आंगवटा ।
जाण तेथेंचि घरटा । ज्ञानें केला

13.369

आतां ययावरी । गुरुभक्तीची परी ।
सांगों गा अवधारीं । चतुरनाथा

13.370

आघवियाचि दैवां । जन्मभूमि हे सेवा ।
जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातेंहि

13.371

हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती ।
बैसों दे एकपांती । अवधानाची

13.372

तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा निघाली उदधी ।
कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली

13.373

नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें ।
प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया

13.374

तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें ।
आपणपें केलें । भक्तीचें घर

13.375

गुरुगृह जये देशीं । तो देशुचि वसे मानसीं ।
विरहिणी कां जैसी । वल्लभातें

13.376

तियेकडोनि येतसे वारा । देखोनि धांवे सामोरा ।
आड पडे म्हणे घरा । बीजें कीजो

13.377

साचा प्रेमाचिया भुली । तया दिशेसीचि आवडे बोली ।
जीवु थानपती करूनि घाली । गुरुगृहीं जो

13.378

परी गुरुआज्ञा धरिलें । देह गांवीं असे एकलें ।
वांसरुवा लाविलें । दावें जैसें

13.379

म्हणे कैं हें बिरडें फिटेल । कैं तो स्वामी भेटेल ।
युगाहूनि वडील । निमिष मानी

13.380

ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींचि धाडिलें ।
तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें

13.381

कां सुकतया अंकुरा- । वरी पडलिया पीयूषधारा ।
नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा

13.382

नातरी रंकें निधान देखिलें । कां आंधळिया डोळे उघडले ।
भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद

13.383

तैसें गुरुकुळाचेनि नांवें । महासुखें अति थोरावे ।
जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां

13.384

पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी ।
जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी

13.385

आणि अभ्यंतरीलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे ।
श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं

13.386

हृदयशुद्धीचिया आवारीं । आराध्यु तो निश्चल ध्रुव करी ।
मग सर्व भावेंसी परिवारीं । आपण होय

13.387

कां चैतन्यांचिये पोवळी- । माजीं आनंदाचिया राउळीं ।
श्रिइगुरुलिंगा ढाळी । ध्यानामृत

13.388

उदयिजतां बोधार्का । बुद्धीची डाळ सात्त्विका ।
भरोनियां त्र्यंबका । लाखोली वाहे

13.389

काळशुद्धी त्रिकाळीं । जीवदशा धूप जाळीं।
न्यानदीपें वोंवाळी । निरंतर

13.390

सामरस्याची रससोय । अखंड अर्पितु जाय ।
आपण भराडा होय । गुरु तो लिंग

13.391

नातरी जीवाचिये सेजे । गुरु कांतु करूनि भुंजे ।
ऐसीं प्रेमाचेनि भोजें । बुद्धी वाहे

13.392

कोणेके अवसरीं । अनुरागु भरे अंतरीं ।
कीं तया नाम करी । क्षीराब्धी

13.393

तेथ ध्येयध्यान बहु सुख । तेंचि शेषतुका निर्दोख ।
वरी जलशयन देख । भावी गुरु

13.394

मग वोळगती पाय । ते लक्ष्मी आपण होय ।
गरुड होऊनि उभा राहे । आपणचि

13.395

नाभीं आपणचि जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें ।
अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख

13.396

एकाधिये वेळें । गुरु माय करी भावबळें ।
मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी

13.397

नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं ।
गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय

13.398

गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी ।
कोणे एके वेळीं । हेंचि भावीं

13.399

गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचें होय रोप ।
ऐसेसे संकल्प । विये मन

13.400

चक्षुपक्षेवीण । पिलूं होय आपण ।
कैसें पैं अपारपण । आवडीचें

13.401

गुरूतें पक्षिणी करी । चारा घे चांचूवरी ।
गुरु तारू धरी । आपण कांस

13.402

ऐसें प्रेमाचेनि थावें । ध्यानचि ध्यानातें प्रसवे ।
पूर्णसिंधु हेलावे । फुटती जैसे

13.403

किंबहुना यापरी । श्रीगुरुमूर्ती अंतरीं ।
भोगी आतां अवधारीं । बाह्यसेवा

13.404

तरी जिवीं ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें ।
जैसें गुरु कौतुकें । माग म्हणती

13.405

तैसिया साचा उपास्ती । गोसावी प्रसन्न होती ।
तेथ मी विनंती । ऐसी करीन

13.406

म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा ।
तेतुलें रूपें होआवा । मीचि एकु

13.407

आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आथि जेतुलीं ।
माझीं रूपें तेतुलीं । होआवीं स्वामी

13.408

ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती श्रीगुरु ।
मग तो परिवारु । मीचि होईन

13.409

उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक ।
तेव्हां उपास्तीचें कवतिक । देखिजैल

13.410

गुरु बहुतांची माये । परी एकलौती होऊनि ठाये ।
तैसें करूनि आण वायें । कृपे तिये

13.411

तया अनुरागा वेधु लावीं । एकपत्नीव्रत घेववीं ।
क्षेत्रसंन्यासु करवीं । लोभाकरवीं

13.412

चतुर्दिक्षु वारा । न लाहे निघों बाहिरा ।
तैसा गुरुकृपें पांजिरा । मीचि होईन

13.413

आपुलिया गुणांचीं लेणीं । करीन गुरुसेवे स्वामिणी ।
हें असो होईन गंवसणी । मीचि भक्तीसी

13.414

गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं ।
ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची

13.415

म्हणे श्रीगुरूंचें भुवन । आपण मी होईन ।
आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें

13.416

निर्गमागमीं दातारें । जे वोलांडिजती उंबरे ।
ते मी होईन आणि द्वारें । द्वारपाळु

13.417

पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन ।
छत्र मी आणि करीन । बारीपण

13.418

मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता ।
स्वामीपुढें खोलता । होईन मी

13.419

मीचि होईन सागळा । करूं सुईन गुरुळां ।
सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि

13.420

हडप मी वोळगेन । मीचि उगाळु घेईन ।
उळिग मी करीन । आंघोळीचें

13.421

होईन गुरूंचें आसन । अलंकार परिधान ।
चंदनादि होईन । उपचार ते

13.422

मीचि होईन सुआरु । वोगरीन उपहारु ।
आपणपें श्रीगुरु । वोंवाळीन

13.423

जे वेळीं देवो आरोगिती । तेव्हां पांतीकरु मीचि पांतीं ।
मीचि होईन पुढती । देईन विडा

13.424

ताट मी काढीन । सेज मी झाडीन ।
चरणसंवाहन । मीचि करीन

13.425

सिंहासन होईन आपण । वरी श्रीगुरु करिती आरोहण ।
होईन पुरेपण । वोळगेचें

13.426

श्रीगुरूंचें मन । जया देईल अवधान ।
तें मी पुढां होईन । चमत्कारु

13.427

तया श्रवणाचे आंगणीं । होईन शब्दांचिया आक्षौहिणी ।
स्पर्श होईन घसणी । आंगाचिया

13.428

श्रीगुरूंचे डोळे । अवलोकनें स्नेहाळें ।
पाहाती तियें सकळें । होईन रूपें

13.429

तिये रसने जो जो रुचेल । तो तो रसु म्यां होईजैल ।
गंधरूपें कीजेल । घ्राणसेवा

13.430

एवं बाह्यमनोगत । श्रीगुरुसेवा समस्त ।
वेंटाळीन वस्तुजात । होऊनियां

13.431

जंव देह हें असेल । तंव वोळगी ऐसी कीजेल ।
मग देहांतीं नवल । बुद्धि आहे

13.432

इये शरीरींची माती । मेळवीन तिये क्षिती ।
जेथ श्रीचरण उभे ठाती । श्रीगुरूंचे

13.433

माझा स्वामी कवतिकें । स्पर्शीजति जियें उदकें ।
तेथ लया नेईन निकें । आपीं आप

13.434

श्रीगुरु वोंवाळिजती । कां भुवनीं जे उजळिजती ।
तयां दीपांचिया दीप्तीं । ठेवीन तेज

13.435

चवरी हन विंजणा । तेथ लयो करीन प्राणा ।
मग आंगाचा वोळंगणा । होईन मी

13.436

जिये जिये अवकाशीं । श्रीगुरु असती परिवारेंसीं ।
आकाश लया आकाशीं । नेईन तिये

13.437

परी जीतु मेला न संडीं । निमेषु लोकां न धाडीं ।
ऐसेनि गणावया कोडी । कल्पांचिया

13.438

येतुलेंवरी धिंवसा । जयाचिया मानसा ।
आणि करूनियांहि तैसा । अपारु जो

13.439

रात्र दिवस नेणे । थोडें बहु न म्हणें ।
म्हणियाचेनि दाटपणें । साजा होय

13.440

तो व्यापारु येणें नांवें । गगनाहूनि थोरावे ।
एकला करी आघवें । एकेचि काळीं

13.441

हृदयवृत्ती पुढां । आंगचि घे दवडा ।
काज करी होडा । मानसेंशीं

13.442

एकादियां वेळा । श्रीगुरुचिया खेळा ।
लोण करी सकळा । जीविताचें

13.443

जो गुरुदास्यें कृशु । जो गुरुप्रेमें सपोषु ।
गुरुआज्ञे निवासु । आपणचि जो

13.444

जो गुरु कुळें सुकुलीनु । जो गुरुबंधुसौजन्यें सुजनु ।
जो गुरुसेवाव्यसनें सव्यसनु । निरंतर

13.445

गुरुसंप्रदायधर्म । तेचि जयाचे वर्णाश्रम ।
गुरुपरिचर्या नित्यकर्म । जयाचें गा

13.446

गुरु क्षेत्र गुरु देवता । गुरु माय गुरु पिता ।
जो गुरुसेवेपरौता । मार्ग नेणें

13.447

श्रीगुरूचे द्वार । तें जयाचें सर्वस्व सार ।
गुरुसेवकां सहोदर । प्रेमें भजे

13.448

जयाचें वक्त्र । वाहे गुरुनामाचे मंत्र ।
गुरुवाक्यावांचूनि शास्त्र । हातीं न शिवे

13.449

शिवतलें गुरुचरणीं । भलतैसें हो पाणी ।
तया सकळ तीर्थें आणी । त्रैलोक्यींचीं

13.450

श्रीगुरूचें उशिटें । लाहे जैं अवचटें ।
तैं तेणें लाभें विटे । समाधीसी

13.451

कैवल्यसुखासाठीं । परमाणु घे किरीटी ।
उधळती पायांपाठीं । चालतां जे

13.452

हें असो सांगावें किती । नाहीं पारु गुरुभक्ती ।
परी गा उत्क्रांतमती । कारण हें

13.453

जया इये भक्तीची चाड । जया इये विषयींचें कोड ।
जो हे सेवेवांचून गोड । न मनी कांहीं

13.454

तो तत्त्वज्ञाचा ठावो । ज्ञाना तेणेंचि आवो ।
हें असो तो देवो । ज्ञान भक्तु

13.455

हें जाण पां साचोकारें । तेथ ज्ञान उघडेनि द्वारें ।
नांदत असे जगा पुरे । इया रीती

13.456

जिये गुरुसेवेविखीं । माझा जीव अभिलाखी ।
म्हणौनि सोयचुकी । बोली केली

13.457

एऱहवीं असतां हातीं खुळा । भजनावधानीं आंधळा ।
परिचर्येलागीं पांगुळा- । पासूनि मंदु

13.458

गुरुवर्णनीं मुका । आळशी पोशिजे फुका ।
परी मनीं आथि निका । सानुरागु

13.459

तेणेंचि पैं कारणें । हें स्थूळ पोसणें ।
पडलें मज म्हणे । ज्ञानदेवो

13.460

परि तो बोलु उपसाहावा । आणि वोळगे अवसरु देयावा ।
आतां म्हणेन जी बरवा । ग्रंथार्थुचि

13.461

परिसा परिसा श्रीकृष्णु । जो भूतभारसहिष्णु ।
तो बोलतसे विष्णु । पार्थु ऐके

13.462

म्हणे शुचित्व गा ऐसें । जयापाशीं दिसे ।
आंग मन जैसें । कापुराचें

13.463

कां रत्नाचें दळवाडें । तैसें सबाह्य चोखडें ।
आंत बाहेरि एकें पाडें । सूर्यु जैसा

13.464

बाहेरीं कर्में क्षाळला । भितरीं ज्ञानें उजळला ।
इहीं दोहीं परीं आला । पाखाळा एका

13.465

मृत्तिका आणि जळें । बाह्य येणें मेळें ।
निर्मळु होय बोलें । वेदाचेनी

13.466

भलतेथ बुद्धीबळी । रजआरिसा उजळी ।
सौंदणी फेडी थिगळी । वस्त्रांचिया

13.467

किंबहुना इयापरी । बाह्य चोख अवधारीं ।
आणि ज्ञानदीपु अंतरीं । म्हणौनि शुद्ध

13.468

एऱहवीं तरी पंडुसुता । आंत शुद्ध नसतां ।
बाहेरि कर्म तो तत्त्वतां । विटंबु गा

13.469

मृत जैसा शृंगारिला । गाढव तीर्थीं न्हाणिला ।
कडुदुधिया माखिला । गुळें जैसा

13.470

वोस गृहीं तोरण बांधिलें । कां उपवासी अन्नें लिंपिलें ।
कुंकुमसेंदुर केलें । कांतहीनेनें

13.471

कळस ढिमाचे पोकळ । जळो वरील तें झळाळ ।
काय करूं चित्रींव फळ । आंतु शेण

13.472

तैसें कर्मवरिचिलेंकडां । न सरे थोर मोलें कुडा ।
नव्हे मदिरेचा घडा । पवित्र गंगे

13.473

म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें । मग बाह्य लाभेल स्वभावें ।
वरी ज्ञान कर्में संभवे । ऐसें कें जोडे ?

13.474

यालागी बाह्य विभागु । कर्में धुतला चांगु ।
आणि ज्ञानें फिटला वंगु । अंतरींचा

13.475

तेथ अंतर बाह्य गेले । निर्मळत्व एक जाहलें ।
किंबहुना उरलें । शुचित्वचि

13.476

म्हणौनि सद्भाव जीवगत । बाहेरी दिसती फांकत ।
जे स्फटिकगृहींचे डोलत । दीप जैसे

13.477

विकल्प जेणें उपजे । नाथिली विकृति निपजे ।
अप्रवृत्तीचीं बीजें । अंकुर घेती

13.478

तें आइके देखे अथवा भेटे । परी मनीं कांहींचि नुमटे ।
मेघरंगें न कांटे । व्योम जैसें

13.479

एऱहवीं इंद्रियांचेनि मेळें । विषयांवरी तरी लोळे ।
परी विकाराचेनि विटाळें । लिंपिजेना

13.480

भेटलिया वाटेवरी । चोखी आणि माहारी ।
तेथ नातळें तियापरी । राहाटों जाणें

13.481

कां पतिपुत्रांतें आलिंगी । एकचि ते तरुणांगी ।
तेथ पुत्रभावाच्या आंगीं । न रिगे कामु

13.482

तैसें हृदय चोख । संकल्पविकल्पीं सनोळख ।
कृत्याकृत्य विशेख । फुडें जाणें

13.483

पाणियें हिरा न भिजे । आधणीं हरळु न शिजे ।
तैसी विकल्पजातें न लिंपिजे । मनोवृत्ती

13.484

तया नांव शुचिपण । पार्था गा संपूर्ण ।
हें देखसी तेथ जाण । ज्ञान असे

13.485

आणि स्थिरता साचें । घर रिगाली जयाचें ।
तो पुरुष ज्ञानाचें । आयुष्य गा

13.486

देह तरी वरिचिलीकडे । आपुलिया परी हिंडे ।
परी बैसका न मोडे । मानसींची

13.487

वत्सावरूनि धेनूचें । स्नेह राना न वचे ।
नव्हती भोग सतियेचे । प्रेमभोग

13.488

कां लोभिया दूर जाये । परी जीव ठेविलाचि ठाये ।
तैसा देहो चाळितां नव्हे । चळु चित्ता

13.489

जातया अभ्रासवें । जैसें आकाश न धांवे ।
भ्रमणचक्रीं न भंवे । ध्रुव जैसा

13.490

पांथिकाचिया येरझारा । सवें पंथु न वचे धनुर्धरा ।
कां नाहीं जेवीं तरुवरा । येणें जाणें

13.491

तैसा चळणवळणात्मकीं । असोनि ये पांचभौतिकीं ।
भूतोर्मी एकी । चळिजेना

13.492

वाहुटळीचेनि बळें । पृथ्वी जैसी न ढळे ।
तैसा उपद्रव उमाळें । न लोटे जो

13.493

दैन्यदुःखीं न तपे । भवशोकीं न कंपे ।
देहमृत्यु न वासिपे । पातलेनी

13.494

आर्ति आशा पडिभरें । वय व्याधी गजरें ।
उजू असतां पाठिमोरें । नव्हे चित्त

13.495

निंदा निस्तेज दंडी । कामलोभा वरपडी ।
परी रोमा नव्हे वांकुडी । मानसाची

13.496

आकाश हें वोसरो । पृथ्वी वरि विरो ।
परि नेणे मोहरों । चित्तवृत्ती

13.497

हाती हाला फुलीं । पासवणा जेवीं न घाली ।
तैसा न लोटे दुर्वाक्यशेलीं । शेलिला सांता

13.498

क्षीरार्णवाचिया कल्लोळीं । कंपु नाहीं मंदराचळीं ।
कां आकाश न जळे जाळीं । वणवियाच्या

13.499

तैशा आल्या गेल्या ऊर्मी । नव्हे गजबज मनोधर्मीं ।
किंबहुना धैर्य क्षमी । कल्पांतींही

13.500

परी स्थैर्य ऐसी भाष । बोलिजे जे सविशेष ।
ते हे दशा गा देख । देखणया

13.501

हें स्थैर्य निधडें । जेथ आंगें जीवें जोडे ।
तें ज्ञानाचें उघडें । निधान साचें

13.502

आणि इसाळु जैसा घरा । कां दंदिया हतियेरा ।
न विसंबे भांडारा । बद्धकु जैसा

13.503

कां एकलौतिया बाळका- । वरि पडौनि ठाके अंबिका ।
मधुविषीं मधुमक्षिका । लोभिणी जैसी

13.504

अर्जुना जो यापरी । अंतःकरण जतन करी ।
नेदी उभें ठाकों द्वारीं । इंद्रियांच्या

13.505

म्हणे काम बागुल ऐकेल । हे आशा सियारी देखैल ।
तरि जीवा टेंकैल । म्हणौनि बिहे

13.506

बाहेरी धीट जैसी । दाटुगा पति कळासी ।
करी टेहणी तैसी । प्रवृत्तीसीं

13.507

सचेतनीं वाणेपणें । देहासकट आटणें ।
संयमावरीं करणें । बुझूनि घाली

13.508

मनाच्या महाद्वारीं । प्रत्याहाराचिया ठाणांतरीं ।
जो यम दम शरीरीं । जागवी उभे

13.509

आधारीं नाभीं कंठीं । बंधत्रयाचीं घरटीं ।
चंद्रसूर्य संपुटीं । सुये चित्त

13.510

समाधीचे शेजेपासीं । बांधोनि घाली ध्यानासी ।
चित्त चैतन्य समरसीं । आंतु रते

13.511

अगा अंतःकरणनिग्रहो जो । तो हा हें जाणिजो ।
हा आथी तेथ विजयो । ज्ञानाचा पैं

13.512

जयाची आज्ञा आपण । शिरीं वाहे अंतःकरण ।
मनुष्याकारें जाण । ज्ञानचि तो

13.513

आणि विषयांविखीं । वैराग्याची निकी ।
पुरवणी मानसीं कीं । जिती आथी

13.514

वमिलेया अन्ना । लाळ न घोंटी जेवीं रसना ।
कांआंग न सूये आलिंगना । प्रेताचिया

13.515

विष खाणें नागवे । जळत घरीं न रिगवे ।
व्याघ्रविवरां न वचवे । वस्ती जेवीं

13.516

धडाडीत लोहरसीं । उडी न घालवे जैसी ।
न करवे उशी । अजगराची

13.517

अर्जुना तेणें पाडें । जयासी विषयवार्ता नावडे ।
नेदी इंद्रियांचेनि तोंडें । कांहींच जावों

13.518

जयाचे मनीं आलस्य । देही अतिकार्श्य ।
शमदमीं सौरस्य । जयासि गा

13.519

तपोव्रतांचा मेळावा । जयाच्या ठायीं पांडवा ।
युगांत जया गांवा- । आंतु येतां

13.520

बहु योगाभ्यासीं हांव । विजनाकडे धांव ।
न साहे जो नांव । संघाताचें

13.521

नाराचांचीं आंथुरणें । पूयपंकीं लोळणें ।
तैसें लेखी भोगणें । ऐहिकींचें

13.522

आणि स्वर्गातें मानसें । ऐकोनि मानी ऐसें ।
कुहिलें पिशित जैसें । श्वानाचें कां

13.523

तें हें विषयवैराग्य । जें आत्मलाभाचें सभाग्य ।
येणें ब्रह्मानंदा योग्य । जीव होती

13.524

ऐसा उभयभोगीं त्रासु । देखसी जेथ बहुवसु ।
तेथ जाण रहिवासु । ज्ञानाचा तूं

13.525

आणि सचाडाचिये परी । इष्टापूर्तें करी ।
परी केलेंपण शरीरीं । वसों नेदी

13.526

वर्णाश्रमपोषकें । कर्में नित्यनैमित्तिकें ।
तयामाजीं कांहीं न ठके । आचरतां

13.527

परि हें मियां केलें । कीं हें माझेनि सिद्धी गेलें ।
ऐसें नाहीं ठेविलें । वासनेमाजीं

13.528

जैसें अवचितपणें । वायूसि सर्वत्र विचरणें ।
कां निरभिमान उदैजणें । सूर्याचें जैसें

13.529

कां श्रुति स्वभावता बोले । गंगा काजेंविण चाले ।
तैसें अवष्टंभहीन भलें । वर्तणें जयाचें

13.530

ऋतुकाळीं तरी फळती । परी फळलों हें नेणती ।
तयां वृक्षांचिये ऐसी वृत्ती । कर्मीं सदा

13.531

एवं मनीं कर्मीं बोलीं । जेथ अहंकारा उखी जाहली ।
एकावळीची काढिली । दोरी जैसी

13.532

संबंधेंवीण जैसीं । अभ्रें असती आकाशीं ।
देहीं कर्में तैसीं । जयासि गा

13.533

मद्यपाआंगींचें वस्त्र । लेपाहातींचें शस्त्र ।
बैलावरी शास्त्र । बांधलें आहे

13.534

तया पाडें देहीं । जया मी आहे हे सेचि नाहीं ।
निरहंकारता पाहीं । तया नांव

13.535

हें संपूर्ण जेथें दिसे । तेथेंचि ज्ञान असे ।
इयेविषीं अनारिसें । बोलों नये

13.536

आणि जन्ममृत्युजरादुःखें । व्याधिवार्धक्यकलुषें ।
तियें आंगा न येतां देखे । दुरूनि जो

13.537

साधकु विवसिया । कां उपसर्गु योगिया ।
पावे उणेयापुरेया । वोथंबा जेवीं

13.538

वैर जन्मांतरींचें । सर्पा मनौनि न वचे ।
तेवीं अतीता जन्माचें । उणें जो वाहे

13.539

डोळां हरळ न विरे । घाईं कोत न जिरे ।
तैसें काळींचें न विसरे । जन्मदुःख

13.540

म्हणे पूयगर्ते रिगाला । अहा मूत्ररंध्रें निघाला ।
कटा रे मियां चाटिला । कुचस्वेदु

13.541

ऐससिया परी । जन्माचा कांटाळा धरी ।
म्हणे आतां तें मी न करीं । जेणें ऐसें होय

13.542

हारी उमचावया । जुंवारी जैसा ये डाया ।
कीं वैरा बापाचेया । पुत्र जचे

13.543

मारिलियाचेनि रागें । पाठीचा जेवीं सूड मागें ।
तेणें आक्षेपें लागे । जन्मापाठीं

13.544

परी जन्मती ते लाज । न सांडी जयाचें निज ।
संभाविता निस्तेज । न जिरे जेवीं

13.545

आणि मृत्यु पुढां आहे । तोचि कल्पांतीं कां पाहे ।
परी आजीचि होये । सावधु जो

13.546

माजीं अथांव म्हणता । थडियेचि पंडुसुता ।
पोहणारा आइता । कासे जेवीं

13.547

कां न पवतां रणाचा ठावो । सांभाळिजे जैसा आवो ।
वोडण सुइजे घावो । न लागतांचि

13.548

पाहेचा पेणा वाटवधा । तंव आजीचि होईजे सावधा ।
जीवु न वचतां औषधा । धांविजे जेवीं

13.549

येऱहवीं ऐसें घडे । जो जळतां घरीं सांपडे ।
तो मग न पवाडे । कुहा खणों

13.550

चोंढिये पाथरु गेला । तैसेनि जो बुडाला ।
तो बोंबेहिसकट निमाला । कोण सांगे

13.551

म्हणौनि समर्थेंसीं वैर । जया पडिलें हाडखाइर ।
तो जैसा आठही पाहर । परजून असे

13.552

नातरी केळवली नोवरी । का संन्यासी जियापरी ।
तैसा न मरतां जो करी । मृत्युसूचना

13.553

पैं गा जो ययापरी । जन्मेंचि जन्म निवारी ।
मरणें मृत्यु मारी । आपण उरे

13.554

तया घरीं ज्ञानाचें । सांकडें नाहीं साचें ।
जया जन्ममृत्युचें । निमालें शल्य

13.555

आणि तयाचिपरी जरा । न टेंकतां शरीरा ।
तारुण्याचिया भरा- । माजीं देखे

13.556

म्हणे आजिच्या अवसरीं । पुष्टि जे शरीरीं ।
ते पाहे होईल काचरी । वाळली जैसी

13.557

निदैव्याचे व्यवसाय । तैसे ठाकती हातपाय ।
अमंत्र्या राजाची परी आहे । बळा यया

13.558

फुलांचिया भोगा- । लागीं प्रेम टांगा ।
तें करेयाचा गुडघा । तैसें होईल

13.559

वोढाळाच्या खुरीं । आखरुआतें बुरी ।
ते दशा माझ्या शिरीं । पावेल गा

13.560

पद्मदळेंसी इसाळे । भांडताति हे डोळे ।
ते होती पडवळें । पिकलीं जैसीं

13.561

भंवईचीं पडळें । वोमथती सिनसाळे ।
उरु कुहिजैल जळें । आंसुवाचेनि

13.562

जैसें बाभुळीचें खोड । गिरबडूनि जाती सरड ।
तैसें पिचडीं तोंड । सरकटिजैल

13.563

रांधवणी चुलीपुढें । पऱहे उन्मादती खातवडे ।
तैसींचि यें नाकाडें । बिडबिडती

13.564

तांबुलें वोंठ राऊं । हांसतां दांत दाऊं ।
सनागर मिरऊं । बोल जेणें

13.565

तयाचि पाहे या तोंडा । येईल जळंबटाचा लोंढा ।
इया उमळती दाढा । दातांसहित

13.566

कुळवाडी रिणें दाटली । कां वांकडिया ढोरें बैसलीं ।
तैसी नुठी कांहीं केली । जीभचि हे

13.567

कुसळें कोरडीं । वारेनि जाती बरडीं ।
तैसा आपदा तोंडीं । दाढियेसी

13.568

आषाढींचेनि जळें । जैसीं झिरपती शैलाचीं मौळें ।
तैसें खांडीहूनि लाळे । पडती पूर

13.569

वाचेसि अपवाडु । कानीं अनुघडु ।
पिंड गरुवा माकडु । होईल हा

13.570

तृणाचें बुझवणें । आंदोळे वारेनगुणें ।
तैसें येईल कांपणें । सर्वांगासी

13.571

पायां पडती वेंगडी । हात वळती मुरकुंडी ।
बरवपणा बागडी । नाचविजैल

13.572

मळमूत्रद्वारें । होऊनि ठाती खोंकरें ।
नवसियें होती इतरें । माझियां निधनीं

13.573

देखोनि थुंकील जगु । मरणाचा पडैल पांगु ।
सोइरियां उबगु । येईल माझा

13.574

स्त्रियां म्हणती विवसी । बाळें जाती मूर्छी ।
किंबहुना चिळसी । पात्र होईन

13.575

उभळीचा उजगरा । सेजारियां साइलिया घरा ।
शिणवील म्हणती म्हातारा । बहुतांतें हा

13.576

ऐसी वार्धक्याची सूचणी । आपणिया तरुणपणीं ।
देखे मग मनीं । विटे जो गा

13.577

म्हणे पाहे हें येईल । आणि आतांचें भोगितां जाईल ।
मग काय उरेल । हितालागीं ?

13.578

म्हणौनि नाइकणें पावे । तंव आईकोनि घाली आघवें ।
पंगु न होता जावें । तेथ जाय

13.579

दृष्टी जंव आहे । तंव पाहावें तेतुलें पाहे ।
मूकत्वा आधीं वाचा वाहे । सुभाषितें

13.580

हात होती खुळे । हें पुढील मोटकें कळे ।
आणि करूनि घाली सकळें । दानादिकें

13.581

ऐसी दशा येईल पुढें । तैं मन होईल वेडें ।
तंव चिंतूनि ठेवी चोखडें । आत्मज्ञान

13.582

जैं चोर पाहे झोंबती । तंव आजीचि रुसिजे संपत्ती ।
का झांकाझांकी वाती । न वचतां कीजे

13.583

तैसें वार्धक्य यावें । मग जें वायां जावें ।
तें आतांचि आघवें । सवतें करीं

13.584

आतां मोडूनि ठेलीं दुर्गें । कां वळित धरिलें खगें ।
तेथ उपेक्षूनि जो निघे । तो नागवला कीं ?

13.585

तैसें वृद्धाप्य होये । आलेपण तें वायां जाये ।
जे तो शतवृद्ध आहे । नेणों कैंचा

13.586

झाडिलींचि कोळें झाडी । तया न फळे जेवीं बोंडीं ।
जाहला अग्नि तरी राखोंडी । जाळील काई ?

13.587

म्हणौनि वार्धक्याचेनि आठवें । वार्धक्या जो नागवे ।
तयाच्या ठायीं जाणावें । ज्ञान आहे

13.588

तैसेंचि नाना रोग । पडिघाती ना जंव पुढां आंग ।
तंव आरोग्याचे उपेग । करूनि घाली

13.589

सापाच्या तोंडी । पडली जे उंडी ।
ते लाऊनि सांडी । प्रबुद्धु जैसा

13.590

तैसा वियोगें जेणें दुःखे । विपत्ति शोक पोखे ।
तें स्नेह सांडूनि सुखें । उदासु होय

13.591

आणि जेणें जेणें कडे । दोष सूतील तोंडें ।
तयां कर्मरंध्री गुंडे । नियमाचे दाटी

13.592

ऐससिया आइती । जयाची परी असती ।
तोचि ज्ञानसंपत्ती- । गोसावी गा

13.593

आतां आणीकही एक । लक्षण अलौकिक ।
सांगेन आइक । धनंजया

13.594

तरि जो या देहावरी । उदासु ऐसिया परी ।
उखिता जैसा बिढारीं । बैसला आहे

13.595

कां झाडाची साउली । वाटे जातां मीनली ।
घरावरी तेतुली । आस्था नाहीं

13.596

साउली सरिसीच असे । परी असे हें नेणिजे जैसें ।
स्त्रियेचें तैसें । लोलुप्य नाहीं

13.597

आणि प्रजा जे जाली । तियें वस्ती कीर आलीं ।
कां गोरुवें बैसलीं । रुखातळीं

13.598

जो संपत्तीमाजी असतां । ऐसा गमे पंडुसुता ।
जैसा कां वाटे जातां । साक्षी ठेविला

13.599

किंबहुना पुंसा । पांजरियामाजीं जैसा ।
वेदाज्ञेसी तैसा । बिहूनि असे

13.600

एऱहवीं दारागृहपुत्रीं । नाहीं जया मैत्री ।
तो जाण पां धात्री । ज्ञानासि गा

13.601

महासिंधू जैसे । ग्रीष्मवर्षीं सरिसे ।
इष्टानिष्ट तैसें । जयाच्या ठायीं

13.602

कां तिन्ही काळ होतां । त्रिधा नव्हे सविता ।
तैसा सुखदुःखीं चित्ता । भेदु नाहीं

13.603

जेथ नभाचेनि पाडें । समत्वा उणें न पडे ।
तेथ ज्ञान रोकडें । वोळख तूं

13.604

आणि मीवांचूनि कांहीं । आणिक गोमटें नाहीं ।
ऐसा निश्चयोचि तिहीं । जयाचा केला

13.605

शरीर वाचा मानस । पियालीं कृतनिश्चयाचा कोश ।
एक मीवांचूनि वास । न पाहती आन

13.606

किंबहुना निकट निज । जयाचें जाहलें मज ।
तेणें आपणयां आम्हां सेज । एकी केली

13.607

रिगतां वल्लभापुढें । नाहीं आंगीं जीवीं सांकडें ।
तिये कांतेचेनि पाडें । एकसरला जो

13.608

मिळोनि मिळतचि असे । समुद्रीं गंगाजळ जैसें ।
मी होऊनि मज तैसें । सर्वस्वें भजती

13.609

सूर्याच्या होण्यां होईजे । कां सूर्यासवेंचि जाइजे ।
हें विकलेपण साजे । प्रभेसि जेवीं

13.610

पैं पाणियाचिये भूमिके । पाणी तळपे कौतुकें ।
ते लहरी म्हणती लौकिकें । एऱहवीं तें पाणी

13.611

जो अनन्यु यापरी । मी जाहलाहि मातें वरी ।
तोचि तो मूर्तधारी । ज्ञान पैं गा

13.612

आणि तीर्थें धौतें तटें । तपोवनें चोखटें ।
आवडती कपाटें । वसवूं जया

13.613

शैलकक्षांचीं कुहरें । जळाशय परिसरें ।
अधिष्ठी जो आदरें । नगरा न ये

13.614

बहु एकांतावरी प्रीति । जया जनपदाची खंती ।
जाण मनुष्याकारें मूर्ती । ज्ञानाची तो

13.615

आणिकहि पुढती । चिन्हें गा सुमती ।
ज्ञानाचिये निरुती- । लागीं सांगों

13.616

तरी परमात्मा ऐसें । जें एक वस्तु असे ।
तें जया दिसें । ज्ञानास्तव

13.617

तें एकवांचूनि आनें । जियें भवस्वर्गादि ज्ञानें ।
तें अज्ञान ऐसा मनें । निश्चयो केला

13.618

स्वर्गा जाणें हें सांडी । भवविषयीं कान झाडी ।
दे अध्यात्मज्ञानीं बुडी । सद्भावाची

13.619

भंगलिये वाटे । शोधूनिया अव्हांटे ।
निघिजे जेवीं नीटें । राजपंथें

13.620

तैसें ज्ञानजातां करी । आघवेंचि एकीकडे सारी ।
मग मन बुद्धि मोहरी । अध्यात्मज्ञानीं

13.621

म्हणे एक हेंचि आथी । येर जाणणें ते भ्रांती ।
ऐसी निकुरेंसी मती । मेरु होय

13.622

एवं निश्चयो जयाचा । द्वारीं आध्यात्मज्ञानाचा ।
ध्रुव देवो गगनींचा । तैसा राहिला

13.623

तयाच्या ठायीं ज्ञान । या बोला नाहीं आन ।
जे ज्ञानीं बैसलें मन । तेव्हांचि तें तो मी

13.624

तरी बैसलेपणें जें होये । बैसतांचि बोलें न होये ।
तरी ज्ञाना तया आहे । सरिसा पाडु

13.625

आणि तत्त्वज्ञान निर्मळ । फळे जें एक फळ ।
तें ज्ञेयही वरी सरळ । दिठी जया

13.626

एऱहवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें ।
तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता

13.627

आंधळेनि हातीं दिवा । घेऊनि काय करावा ? ।
तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायांचि जाय

13.628

जरि ज्ञानाचेनि प्रकाशें । परतत्त्वीं दिठी न पैसे ।
ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनी

13.629

म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं । तेतुली वस्तुचि आघवी ।
तें देखे ऐशी व्हावी । बुद्धि चोख

13.630

यालागीं ज्ञानें निर्दोखें । दाविलें ज्ञेय देखे ।
तैसेनि उन्मेखें । आथिला जो

13.631

जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी ।
तो ज्ञान हे शब्दीं । करणें न लगे

13.632

पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मती ज्ञेयीं पावे ।
तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें

13.633

तोचि ज्ञान हें बोलतां । विस्मो कवण पंडुसुता ? ।
काय सवितयातें सविता । म्हणावें असें ?

13.634

तंव श्रोतें म्हणती असो । न सांगें तयाचा अतिसो ।
ग्रंथोक्ती तेथ आडसो । घालितोसी कां ?

13.635

तुझा हाचि आम्हां थोरु । वक्तृत्वाचा पाहुणेरु ।
जे ज्ञानविषो फारु । निरोपिला

13.636

रसु होआवा अतिमात्रु । हा घेतासि कविमंत्रु ।
तरी अवंतूनि शत्रु । करितोसि कां गा ?

13.637

ठायीं बैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे ।
तियेचा येरु वोडव मिळे । कोणा अर्था ?

13.638

आघवाचि विषयीं भादी । परी सांजवणीं टेंकों नेदी ।
ते खुरतोडी नुसधी । पोषी कवण ?

13.639

तैसी ज्ञानीं मती न फांके । येर जल्पती नेणों केतुकें ।
परि तें असो निकें । केलें तुवां

13.640

जया ज्ञानलेशोद्देशें । कीजती योगादि सायासें ।
तें धणीचें आथी तुझिया ऐसें । निरूपण

13.641

अमृताची सातवांकुडी । लागो कां अनुघडी ।
सुखाच्या दिवसकोडी । गणिजतु कां

13.642

पूर्णचंद्रेंसीं राती । युग एक असोनि पहाती ।
तरी काय पाहात आहाती । चकोर ते ?

13.643

तैसें ज्ञानाचें बोलणें । आणि येणें रसाळपणें ।
आतां पुरे कोण म्हणे ? । आकर्णितां

13.644

आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये ।
तैं सरों नेणें रससोये । ऐसें आथी

13.645

तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानीं आम्हांसि लागु ।
आणि तुजही अनुरागु । आथि तेथ

13.646

म्हणौनि यया वाखाणा- । पासीं से आली चौगुणा ।
ना म्हणों नयेसि देखणा ? । होसी ज्ञानी

13.647

तरी आतां ययावरी । प्रज्ञेच्या माजघरीं ।
पदें साच करीं । निरूपणीं

13.648

या संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें ।
माझेंही जी ऐसें । मनोगत

13.649

यावरी आतां तुम्हीं । आज्ञापिला स्वामी ।
तरी वायां वागू मी । वाढों नेदी

13.650

एवं इयें अवधारा । ज्ञानलक्षणें अठरा ।
श्रीकृष्णें धनुर्धरा । निरूपिली

13.651

मग म्हणें या नांवें । ज्ञान एथ जाणावें ।
हे स्वमत आणि आघवें । ज्ञानियेही म्हणती

13.652

करतळावरी वाटोळा । डोलतु देखिजे आंवळा ।
तैसें ज्ञान आम्हीं डोळां । दाविलें तुज

13.653

आतां धनंजया महामती । अज्ञान ऐसी वदंती ।
तेंही सांगों व्यक्ती । लक्षणेंसीं

13.654

एऱहवीं ज्ञान फुडें जालिया । अज्ञान जाणवे धनंजया ।
जें ज्ञान नव्हे तें अपैसया । अज्ञानचि

13.655

पाहें पां दिवसु आघवा सरे । मग रात्रीची वारी उरे ।
वांचूनि कांहीं तिसरें । नाहीं जेवीं

13.656

तैसें ज्ञान जेथ नाहीं । तेंचि अज्ञान पाहीं ।
तरी सांगों कांहीं कांहीं । चिन्हें तियें

13.657

तरी संभावने जिये । जो मानाची वाट पाहे ।
सत्कारें होये । तोषु जया

13.658

गर्वें पर्वताचीं शिखरें । तैसा महत्त्वावरूनि नुतरे ।
तयाचिया ठायीं पुरे । अज्ञान आहे

13.659

आणि स्वधर्माची मांगळी । बांधे वाचेच्या पिंपळीं ।
उभिला जैसा देउळीं । जाणोनि कुंचा

13.660

घाली विद्येचा पसारा । सूये सुकृताचा डांगोरा ।
करी तेतुलें मोहरा । स्फीतीचिया

13.661

आंग वरिवरी चर्ची । जनातें अभ्यर्चितां वंची ।
तो जाण पां अज्ञानाची । खाणी एथ

13.662

आणि वन्ही वनीं विचरे । तेथ जळती जैसीं जंगमें स्थावरें ।
तैसें जयाचेनि आचारें । जगा दुःख

13.663

कौतुकें जें जें जल्पे । तें साबळाहूनि तीख रुपे ।
विषाहूनि संकल्पें । मारकु जो

13.664

तयातें बहु अज्ञान । तोचि अज्ञानाचें निधान ।
हिंसेसि आयतन । जयाचें जिणें

13.665

आणि फुंकें भाता फुगे । रेचिलिया सवेंचि उफगे ।
तैसा संयोगवियोगें । चढे वोहटे

13.666

पडली वारयाचिया वळसा । धुळी चढे आकाशा ।
हरिखा वळघे तैसा । स्तुतीवेळे

13.667

निंदा मोटकी आइके । आणि कपाळ धरूनि ठाके ।
थेंबें विरे वारोनि शोखे । चिखलु जैसा

13.668

तैसा मानापमानीं होये । जो कोण्हीचि उर्मी न साहे ।
तयाच्या ठायीं आहे । अज्ञान पुरें

13.669

आणि जयाचिया मनीं गांठी । वरिवरी मोकळी वाचा दिठी ।
आंगें मिळे जीवें पाठीं । भलतया दे

13.670

व्याधाचे चारा घालणें । तैसें प्रांजळ जोगावणें ।
चांगाचीं अंतःकरणें । विरु करी

13.671

गार शेवाळें गुंडाळली । कां निंबोळी जैसी पिकली ।
तैसी जयाची भली । बाह्य क्रिया

13.672

अज्ञान तयाचिया ठायीं । ठेविलें असे पाहीं ।
याबोला आन नाहीं । सत्य मानीं

13.673

आणि गुरुकुळीं लाजे । जो गुरुभक्ती उभजे ।
विद्या घेऊनि माजे । गुरूसींचि जो

13.674

तयाचें नाम घेणें । तें वाचे शूद्रान्न होणें ।
परी घडलें लक्षणें । बोलतां इयें

13.675

आता गुरुभक्तांचें नांव घेवों । तेणें वाचेसि प्रायश्चित देवों ।
गुरुसेवका नांव पावों । सूर्यु जैसा

13.676

येतुलेनि पांगु पापाचा । निस्तरेल हे वाचा ।
जो गुरुतल्पगाचा । नामीं आला

13.677

हा ठायवरी । तया नामाचें भय हरी ।
मग म्हणे अवधारीं । आणिकें चिन्हें

13.678

तरि आंगें कर्में ढिला । जो मनें विकल्पें भरला ।
अडवींचा अवगळला । कुहा जैसा

13.679

तया तोंडीं कांटिवडे । आंतु नुसधीं हाडें ।
अशुचि तेणें पाडें । सबाह्य जो

13.680

जैसें पोटालागीं सुणें । उघडें झांकलें न म्हणे ।
तैसें आपलें परावें नेणे । द्रव्यालागीं

13.681

इया ग्रामसिंहाचिया ठायीं । जैसा मिळणी ठावो अठावो नाहीं ।
तैसा स्त्रीविषयीं कांहीं । विचारीना

13.682

कर्माचा वेळु चुके । कां नित्य नैमित्तिक ठाके ।
तें जया न दुखे । जीवामाजीं

13.683

पापी जो निसुगु । पुण्याविषयीं अतिनिलागु ।
जयाचिया मनीं वेगु । विकल्पाचा

13.684

तो जाण निखिळा । अज्ञानाचा पुतळा ।
जो बांधोनि असे डोळां । वित्ताशेतें

13.685

आणि स्वार्थें अळुमाळें । जो धैर्यापासोनि चळे ।
जैसें तृणबीज ढळे । मुंगियेचेनी

13.686

पावो सूदलिया सवें । जैसें थिल्लर कालवे ।
तैसा भयाचेनि नांवें । गजबजे जो

13.687

मनोरथांचिया धारसा । वाहणें जयाचिया मानसा ।
पूरीं पडिला जैसा । दुधिया पाहीं

13.688

वायूचेनि सावायें । धू दिगंतरा जाये ।
दुःखवार्ता होये । तसें जया

13.689

वाउधणाचिया परी । जो आश्रो कहींचि न धरी ।
क्षेत्रीं तीर्थीं पुरीं । थारों नेणे

13.690

कां मातलिया सरडा । पुढती बुडुख पुढती शेंडा ।
हिंडणवारा कोरडा । तैसा जया

13.691

जैसा रोविल्याविणें । रांजणु थारों नेणे ।
तैसा पडे तैं राहणें । एऱहवीं हिंडे

13.692

तयाच्या ठायीं उदंड । अज्ञान असे वितंड ।
जो चांचल्यें भावंड । मर्कटाचें

13.693

आणि पैं गा धनुर्धरा । जयाचिया अंतरा ।
नाहीं वोढावारा । संयमाचा

13.694

लेंडिये आला लोंढा । न मनी वाळुवेचा वरवंडा ।
तैसा निषेधाचिया तोंडा । बिहेना जो

13.695

व्रतातें आड मोडी । स्वधर्मु पायें वोलांडी ।
नियमाची आस तोडी । जयाची क्रिया

13.696

नाहीं पापाचा कंटाळा । नेणें पुण्याचा जिव्हाळा ।
लाजेचा पेंडवळा । खाणोनि घाली

13.697

कुळेंसीं जो पाठमोरा । वेदाज्ञेसीं दुऱहा ।
कृत्याकृत्यव्यापारा । निवाडु नेणे

13.698

वसू जैसा मोकाटु । वारा जैसा अफाटु ।
फुटला जैसा पाटु । निर्जनीं

13.699

आंधळें हातिरूं मातलें । कां डोंगरीं जैसें पेटलें ।
तैसें विषयीं सुटलें । चित्त जयाचें

13.700

पैं उबधडां काय न पडे । मोकाटु कोणां नातुडे ।
ग्रामद्वारींचे आडें । नोलांडी कोण

13.701

जैसें सत्रीं अन्न जालें । कीं सामान्या बीक आलें ।
वाणसियेचें उभलें । कोण न रिगे ?

13.702

तैसें जयाचें अंतःकरण । तयाच्या ठायीं संपूर्ण ।
अज्ञानाची जाण । ऋद्धि आहे

13.703

आणि विषयांची गोडी । जो जीतु मेला न संडी ।
स्वर्गींही खावया जोडी । येथूनिची

13.704

जो अखंड भोगा जचे । जया व्यसन काम्यक्रियेचें ।
मुख देखोनि विरक्ताचें । सचैल करी

13.705

विषो शिणोनि जाये । परि न शिणे सावधु नोहे ।
कुहीला हातीं खाये । कोढी जैसा

13.706

खरी टेंकों नेदी उडे । लातौनि फोडी नाकाडें ।
तऱही जेवीं न काढे । माघौता खरु

13.707

तैसा जो विषयांलागीं । उडी घाली जळतिये आगीं ।
व्यसनाची आंगीं । लेणीं मिरवी

13.708

फुटोनि पडे तंव । मृग वाढवी हांव ।
परी न म्हणे ते माव । रोहिणीची

13.709

तैसा जन्मोनि मृत्यूवरी । विषयीं त्रासितां बहुतीं परीं ।
तऱही त्रासु नेघे धरी । अधिक प्रेम

13.710

पहिलिये बाळदशे । आई बा हेंचि पिसें ।
तें सरे मग स्त्रीमांसें । भुलोनि ठाके

13.711

मग स्त्री भोगितां थावों । वृद्धाप्य लागे येवों ।
तेव्हां तोचि प्रेमभावो । बाळकांसि आणी

13.712

आंधळें व्यालें जैसें । तैसा बाळें परिवसे ।
परि जीवें मरे तों न त्रासे । विषयांसि जो

13.713

जाण तयाच्या ठायीं । अज्ञानासि पारु नाहीं ।
आतां आणीक कांहीं । चिन्हें सांगों

13.714

तरि देह हाचि आत्मा । ऐसेया जो मनोधर्मा ।
वळघोनियां कर्मा । आरंभु करी

13.715

आणि उणें कां पुरें । जें जें कांहीं आचरे ।
तयाचेनि आविष्करें । कुंथों लागे

13.716

डोईये ठेविलेनि भोजें । देवलविसें जेवीं फुंजे ।
तैसा विद्यावयसा माजे । उताणा चाले

13.717

म्हणे मीचि एकु आथी । माझ्यांचि घरीं संपत्ती ।
माझी आचरती रीती । कोणा आहे

13.718

नाहीं माझेनि पाडें वाडु । मी सर्वज्ञ एकचि रूढु ।
ऐसा गर्वतुष्टीगंडु । घेऊनि ठाके

13.719

व्याधि लागलिया माणुसा । नयेचि भोग दाऊं जैसा ।
निकें न साहे जो तैसा । पुढिलांचें

13.720

पैं गुण तेतुला खाय । स्नेह कीं जाळितु जाय ।
जेथ ठेविजे तेथ होय । मसीसें

13.721

जीवनें शिंपिला तिडपिडी । विजिला प्राण सांडीं ।
लागला तरी काडी । उरों नेदी

13.722

आळुमाळ प्रकाशु करी । तेतुलेनीच उबारा धरी ।
तैसिया दीपाचि परी । सुविद्यु जो

13.723

औषधाचेनि नांवें अमृतें । जैसा नवज्वरु आंबुथे ।
कां विषचि होऊनि परतें । सर्पा दूध

13.724

तैसा सद्गुणीं मत्सरु । व्युत्पत्ती अहंकारु ।
तपोज्ञानें अपारु । ताठा चढे

13.725

अंत्यु राणिवे बैसविला । आरें धारणु गिळिला ।
तैसा गर्वें फुगला । देखसी जो

13.726

जो लाटणें ऐसा न लवे । पाथरु तेवीं न द्रवे ।
गुणियासि नागवे । फोडसें जैसें

13.727

किंबहुना तयापाशी । अज्ञान आहे वाढीसीं ।
हें निकरें गा तुजसीं । बोलत असों

13.728

आणीकही धनंजया । जो गृहदेह सामग्रिया ।
न देखे कालचेया । जन्मातें गा

13.729

कृतघ्ना उपकारु केला । कां चोरा व्यवहारु दिधला ।
निसुगु स्तविला । विसरे जैसा

13.730

वोढाळितां लाविलें । तें तैसेंच कान पूंस वोलें ।
कीं पुढती वोढाळुं आलें । सुणें जैसें

13.731

बेडूक सापाचिया तोंडीं । जातसे सबुडबुडीं ।
तो मक्षिकांचिया कोडीं । स्मरेना कांहीं ?

13.732

तैसीं नवही द्वारें स्रवती । आंगीं देहाची लुती जिती ।
जेणें जाली तें चित्तीं । सलेना जया

13.733

मातेच्या उदरकुहरीं । पचूनि विष्ठेच्या दाथरीं ।
जठरीं नवमासवरी । उकडला जो

13.734

तें गर्भींची जे व्यथा । कां जें जालें उपजतां ।
तें कांहींचि सर्वथा । नाठवी जो

13.735

मलमूत्रपंकीं । जे लोळतें बाळ अंकीं ।
तें देखोनि जो न थुंकीं । त्रासु नेघे

13.736

कालचि ना जन्म गेलें । पाहेचि पुढती आलें ।
ऐसें हें कांहीं वाटलें । नाहीं जया

13.737

आणि पैं तयाची परी । जीविताची फरारी ।
देखोनि जो न करी । मृत्युचिंता

13.738

जिणेयाचेनि विश्वासें । मृत्यु एक एथ असे ।
हें जयाचेनि मानसें । मानिजेना

13.739

अल्पोदकींचा मासा । हें नाटे ऐसिया आशा ।
न वचेचि कां जैसा । अगाध डोहां

13.740

कां गोरीचिया भुली । मृग व्याधा दृष्टी न घाली ।
गळु न पाहतां गिळिली । उंडी मीनें

13.741

दीपाचिया झगमगा । जाळील हें पतंगा ।
नेणवेचि पैं गा । जयापरी

13.742

गव्हारु निद्रासुखें । घर जळत असे तें न देखे ।
नेणतां जेंवी विखें । रांधिलें अन्न

13.743

तैसा जीविताचेनि मिषें । हा मृत्युचि आला असे ।
हें नेणेचि राजसें । सुखें जो गा

13.744

शरीरींचीं वाढी । अहोरात्रांची जोडी ।
विषयसुखप्रौढी । साचचि मानी

13.745

परी बापुडा ऐसें नेणे । जें वेश्येचें सर्वस्व देणें ।
तेंचि तें नागवणें । रूप एथ

13.746

संवचोराचें साजणें । तेंचि तें प्राण घेणें ।
लेपा स्नपन करणें । तोचि नाशु

13.747

पांडुरोगें आंग सुटलें । तें तयाचि नांवे खुंटलें ।
तैसें नेणें भुललें । आहारनिद्रा

13.748

सन्मुख शूला । धांवतया पायें चपळा ।
प्रतिपदीं ये जवळा । मृत्यु जेवीं

13.749

तेवीं देहा जंव जंव वाढु । जंव जंव दिवसांचा पवाडु ।
जंव जंव सुरवाडु । भोगांचा या

13.750

तंव तंव अधिकाधिकें । मरण आयुष्यातें जिंके ।
मीठ जेवीं उदकें । घांसिजत असे

13.751

तैसें जीवित्व जाये । तयास्तव काळु पाहे ।
हें हातोहातींचें नव्हे । ठाउकें जया

13.752

किंबहुना पांडवा । हा आंगींचा मृत्यु नीच नवा ।
न देखे जो मावा। विषयांचिया

13.753

तो अज्ञानदेशींचा रावो । या बोला महाबाहो।
न पडे गा ठावो । आणिकांचा

13.754

पैं जीविताचेनि तोखें । जैसा कां मृत्यु न देखे ।
तैसाचि तारुण्ये पोखें । जरा न गणी

13.755

कडाडीं लोटला गाडा । कां शिखरौनि सुटला धोंडा ।
तैसा न देखे जो पुढां । वार्धक्य आहे

13.756

कां आडवोहळा पाणी आलें । कां जैसे म्हैसयाचें झुंज मातलें ।
तैसें तारुण्याचे चढलें । भुररें जया

13.757

पुष्टि लागे विघरों । कांति पाहे निसरों ।
मस्तक आदरीं शिरों- । भागीं कंप

13.758

दाढी साउळ धरी । मान हालौनि वारी ।
तरी जो करी । मायेचा पैसु

13.759

पुढील उरीं आदळे । तंव न देखे जेवीं आंधळें ।
कां डोळ्यावरलें निगळे । आळशी तोषें

13.760

तैसें तारुण्य आजिचें । भोगितां वृद्धाप्य पाहेचें ।
न देखे तोचि साचें । अज्ञानु गा

13.761

देखे अक्षमें कुब्जें । कीं विटावूं लागे फुंजें ।
परी न म्हणे पाहे माझें । ऐसेंचि भवे

13.762

आणि आंगीं वृद्धाप्यतेची । संज्ञा ये मरणाची ।
परी जया तारुण्याची । भुली न फिटे

13.763

तो अज्ञानाचें घर । हें साचचि घे उत्तर ।
तेवींचि परियेसीं थोर । चिन्हें आणिक

13.764

तरि वाघाचिये अडवे । एक वेळ आला चरोनि दैवें ।
तेणें विश्वासें पुढती धांवे । वसू जैसा

13.765

कां सर्पघराआंतु । अवचटें ठेवा आणिला स्वस्थु ।
येतुलियासाठीं निश्चितु । नास्तिकु होय

13.766

तैसेनि अवचटें हें । एकदोनी वेळां लाहे ।
एथ रोग एक आहे । हें मानीना जो

13.767

वैरिया नीद आली । आतां द्वंद्वें माझीं सरलीं ।
हें मानी तो सपिली । मुकला जेवीं

13.768

तैसी आहारनिद्रेची उजरी । रोग निवांतु जोंवरी ।
तंव जो न करी । व्याधी चिंता

13.769

आणि स्त्रीपुत्रादिमेळें । संपत्ति जंव जंव फळे ।
तेणें रजें डोळे । जाती जयाचे

13.770

सवेंचि वियोगु पडैल । विळौनी विपत्ति येईल ।
हें दुःख पुढील । देखेना जो

13.771

तो अज्ञान गा पांडवा । आणि तोही तोचि जाणावा ।
जो इंद्रियें अव्हासवा । चारी एथ

13.772

वयसेचेनि उवायें । संपत्तीचेनि सावायें ।
सेव्यासेव्य जाये । सरकटितु

13.773

न करावें तें करी । असंभाव्य मनीं धरी ।
चिंतू नये तें विचारी । जयाची मती

13.774

रिघे जेथ न रिघावें । मागे जें न घ्यावें ।
स्पर्शे जेथ न लागावें । आंग मन

13.775

न जावें तेथ जाये । न पाहावें तें जो पाहे ।
न खावें तें खाये । तेवींचि तोषे

13.776

न धरावा तो संगु । न लागावें तेथ लागु ।
नाचरावा तो मार्गु । आचरे जो

13.777

नायकावें तें आइके । न बोलावें तें बके ।
परी दोष होतील हें न देखे । प्रवर्ततां

13.778

आंगा मनासि रुचावें । येतुलेनि कृत्याकृत्य नाठवें ।
जो करणेयाचेनि नांवें । भलतेंचि करी

13.779

परि पाप मज होईल । कां नरकयातना येईल ।
हें कांहींचि पुढील । देखेना जो

13.780

तयाचेनि आंगलगें । अज्ञान जगीं दाटुगें ।
जें सज्ञानाही संगें । झोंबों सके

13.781

परी असो हें आइक । अज्ञान चिन्हें आणिक ।
जेणें तुज सम्यक् । जाणवे तें

13.782

तरी जयाची प्रीति पुरी । गुंतली देखसी घरीं ।
नवगंधकेसरीं । भ्रमरी जैशी

13.783

साकरेचिया राशी । बैसली नुठे माशी ।
तैसेनि स्त्रीचित्त आवेशीं । जयाचें मन

13.784

ठेला बेडूक कुंडीं । मशक गुंतला शेंबुडीं ।
जैसा ढोरु सबुडबुडीं । रुतला पंकीं

13.785

तैसें घरींहूनि निघणें । नाहीं जीवें मनें प्राणें ।
जया साप होऊनि असणें । भाटीं तियें

13.786

प्रियोत्तमाचिया कंठीं । प्रमदा घे आटी ।
तैशी जीवेंसी कोंपटी । धरूनि ठाके

13.787

मधुरसोद्देशें । मधुकर जचे जैसें ।
गृहसंगोपन तैसें । करी जो गा

13.788

म्हातारपणीं जालें । मा आणिक एक विपाईलें ।
तयाचें कां जेतुलें । मातापितरां

13.789

तेतुलेनि पाडें पार्था । घरीं जया प्रेम आस्था ।
आणि स्त्रीवांचूनि सर्वथा । जाणेना जो

13.790

तैसा स्त्रीदेहीं जो जीवें । पडोनिया सर्वभावें ।
कोण मी काय करावें । कांहीं नेणे

13.791

महापुरुषाचें चित्त । जालिया वस्तुगत ।
ठाके व्यवहारजात । जयापरी

13.792

हानि लाज न देखे । परापवादु नाइके ।
जयाचीं इंद्रियें एकमुखें । स्त्रिया केलीं

13.793

चित्त आराधी स्त्रीयेचें । आणि तियेचेनि छंदें नाचे ।
माकड गारुडियाचें । जैसें होय

13.794

आपणपेंही शिणवी । इष्टमित्र दुखवी ।
मग कवडाचि वाढवी । लोभी जैसा

13.795

तैसा दानपुण्यें खांची । गोत्रकुटुंबा वंची ।
परी गारी भरी स्त्रियेची । उणी हों नेदी

13.796

पूजिती दैवतें जोगावी । गुरूतें बोलें झकवी ।
मायबापां दावी । निदारपण

13.797

स्त्रियेच्या तरी विखीं । भोगुसंपत्ती अनेकीं ।
आणी वस्तु निकी । जे जे देखे

13.798

प्रेमाथिलेनि भक्तें । जैसेनि भजिजे कुळदैवतें ।
तैसा एकाग्रचित्तें । स्त्री जो उपासी

13.799

साच आणि चोख । तें स्त्रियेसीचि अशेख ।
येरांविषयीं जोगावणूक । तेही नाहीं

13.800

इयेतें हन कोणी देखैल । इयेसी वेखासें जाईल ।
तरी युगचि बुडैल । ऐसें जया

13.801

नायट्यांभेण । न मोडिजे नागांची आण ।
तैसी पाळी उणखुण । स्त्रीयेची जो

13.802

किंबहुना धनंजया । स्त्रीचि सर्वस्व जया ।
आणि तियेचिया जालिया- । लागीं प्रेम

13.803

आणिकही जें समस्त । तियेचें संपत्तिजात ।
तें जीवाहूनि आप्त । मानी जो कां

13.804

तो अज्ञानासी मूळ । अज्ञाना त्याचेनि बळ ।
हें असो केवळ । तेंचि रूप

13.805

आणि मातलिया सागरीं । मोकललिया तरी ।
लाटांच्या येरझारीं । आंदोळे जेवीं

13.806

तेवीं प्रिय वस्तु पावे । आणि सुखें जो उंचावे ।
तैसाचि अप्रियासवें । तळवटु घे

13.807

ऐसेनि जयाचे चित्तीं । वैषम्यसाम्याची वोखती ।
वाहे तो महामती । अज्ञान गा

13.808

आणि माझ्या ठायीं भक्ती । फळालागीं जया आर्ती ।
धनोद्देशें विरक्ती । नटणें जेवीं

13.809

नातरी कांताच्या मानसी । रिगोनि स्वैरिणी जैसी ।
राहाटे जारेंसीं । जावयालागीं

13.810

तैसा मातें किरीटी । भजती गा पाउटी ।
करूनि जो दिठी । विषो सूये

13.811

आणि भजिन्नलियासवें । तो विषो जरी न पावे ।
तरी सांडी म्हणे आघवें । टवाळ हें

13.812

कुणबट कुळवाडी । तैसा आन आन देव मांडी ।
आदिलाची परवडी । करी तया

13.813

तया गुरुमार्गा टेंकें । जयाचा सुगरवा देखे ।
तरी तयाचा मंत्र शिके । येरु नेघे

13.814

प्राणिजातेंसीं निष्ठुरु । स्थावरीं बहु भरु ।
तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया

13.815

माझी मूर्ति निफजवी । ते घराचे कोनीं बैसवी ।
आपण देवो देवी । यात्रे जाय

13.816

नित्य आराधन माझें । काजीं कुळदैवता भजे ।
पर्वविशेषें कीजे । पूजा आना

13.817

माझें अधिष्ठान घरीं । आणि वोवसे आनाचे करी ।
पितृकार्यावसरीं । पितरांचा होय

13.818

एकादशीच्या दिवशीं । जेतुला पाडु आम्हांसी ।
तेतुलाचि नागांसी । पंचमीच्या दिवशीं

13.819

चौथ मोटकी पाहे । आणि गणेशाचाचि होये ।
चावदसी म्हणे माये । तुझाचि वो दुर्गे

13.820

नित्य नैमित्तिकें कर्में सांडी । मग बैसे नवचंडी ।
आदित्यवारीं वाढी । बहिरवां पात्रीं

13.821

पाठीं सोमवार पावे । आणि बेलेंसी लिंगा धांवे ।
ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो

13.822

ऐसा अखंड भजन करी । उगा नोहे क्षणभरी ।
अवघेन गांवद्वारीं । अहेव जैसी

13.823

ऐसेनि जो भक्तु । देखसी सैरा धांवतु ।
जाण अज्ञानाचा मूर्तु । अवतार तो

13.824

आणि एकांतें चोखटें । तपोवनें तीर्थे तटें ।
देखोनि जो गा विटे । तोहि तोचि

13.825

जया जनपदीं सुख । गजबजेचें कवतिक ।
वानूं आवडे लौकिक । तोहि तोची

13.826

आणि आत्मा गोचरु होये । ऐसी जे विद्या आहे ।
ते आइकोनि डौर वाहे । विद्वांसु जो

13.827

उपनिषदांकडे न वचे । योगशास्त्र न रुचे ।
अध्यात्मज्ञानीं जयाचें । मनचि नाहीं

13.828

आत्मचर्चा एकी आथी । ऐसिये बुद्धीची भिंती ।
पाडूनि जयाची मती । वोढाळ जाहली

13.829

कर्मकांड तरी जाणे । मुखोद्गत पुराणें ।
ज्योतिषीं तो म्हणे । तैसेंचि होय

13.830

शिल्पीं अति निपुण । सूपकर्मींही प्रवीण ।
विधि आथर्वण । हातीं आथी

13.831

कोकीं नाहीं ठेलें । भारत करी म्हणितलें ।
आगम आफाविले । मूर्त होतीं

13.832

नीतिजात सुझे । वैद्यकही बुझे ।
काव्यनाटकीं दुजें । चतुर नाहीं

13.833

स्मृतींची चर्चा । दंशु जाणे गारुडियाचा ।
निघंटु प्रज्ञेचा । पाइकी करी

13.834

पैं व्याकरणीं चोखडा । तर्कीं अतिगाढा ।
परी एक आत्मज्ञानीं फुडा । जात्यंधु जो

13.835

तें एकवांचूनि आघवां शास्त्रीं । सिद्धांत निर्माणधात्री ।
परी जळों तें मूळनक्षत्रीं । न पाहें गा

13.836

मोराआंगीं अशेषें । पिसें असतीं डोळसें ।
परी एकली दृष्टि नसे । तैसें तें गा

13.837

जरी परमाणूवढें । संजीवनीमूळ जोडे ।
तरी बहु काय गाडे । भरणें येरें ?

13.838

आयुष्येंवीण लक्षणें । सिसेंवीण अळंकरणें ।
वोहरेंवीण वाधावणें । तो विटंबु गा

13.839

तैसें शास्त्रजात जाण । आघवेंचि अप्रमाण ।
अध्यात्मज्ञानेंविण । एकलेनी

13.840

यालागीं अर्जुना पाहीं । अध्यात्मज्ञानाच्या ठायीं ।
जया नित्यबोधु नाहीं । शास्त्रमूढा

13.841

तया शरीर जें जालें । तें अज्ञानाचें बीं विरुढलें ।
तयाचें व्युत्पन्नत्व गेलें । अज्ञानवेलीं

13.842

तो जें जें बोले । तें अज्ञानचि फुललें ।
तयाचें पुण्य जें फळलें । तें अज्ञान गा

13.843

आणि अध्यात्मज्ञान कांहीं । जेणें मानिलेंचि नाहीं ।
तो ज्ञानार्थु न देखे काई । हें बोलावें असें ?

13.844

ऐलीचि थडी न पवतां । पळे जो माघौता ।
तया पैलद्वीपींची वार्ता । काय होय ?

13.845

कां दारवंठाचि जयाचें । शीर रोंविलें खांचे ।
तो केवीं परिवरींचें । ठेविलें देखे ?

13.846

तेवीं अध्यात्मज्ञानीं जया । अनोळख धनंजया ।
तया ज्ञानार्थु देखावया । विषो काई ?

13.847

म्हणौनि आतां विशेषें । तो ज्ञानाचें तत्त्व न देखे ।
हें सांगावें आंखेंलेखें । न लगे तुज

13.848

जेव्हां सगर्भे वाढिलें । तेव्हांचि पोटींचें धालें ।
तैसें मागिलें पदें बोलिलें । तेंचि होय

13.849

वांचूनियां वेगळें । रूप करणें हें न मिळे ।
जेवीं अवंतिलें आंधळें । तें दुजेनसीं ये

13.850

एवं इये उपरतीं । अज्ञानचिन्हें मागुतीं ।
अमानित्वादि प्रभृती । वाखाणिलीं

13.851

जे ज्ञानपदें अठरा । केलियां येरी मोहरां ।
अज्ञान या आकारा । सहजें येती

13.852

मागां श्लोकाचेनि अर्धार्धें । ऐसें सांगितलें श्रीमुकुंदें ।
ना उफराटीं इयें ज्ञानपदें । तेंचि अज्ञान

13.853

म्हणौनि इया वाहणीं । केली म्यां उपलवणी ।
वांचूनि दुधा मेळऊनि पाणी । फार कीजे ?

13.854

तैसें जी न बडबडीं । पदाची कोर न सांडी ।
परी मूळध्वनींचिये वाढी । निमित्त जाहलों

13.855

तंव श्रोते म्हणती राहें । कें परिहारा ठावो आहे ? ।
बिहिसी कां वायें । कविपोषका ?

13.856

तूतें श्रीमुरारी । म्हणितलें आम्ही प्रकट करीं ।
जें अभिप्राय गव्हरीं । झांकिले आम्हीं

13.857

तें देवाचें मनोगत । दावित आहासी तूं मूर्त ।
हेंही म्हणतां चित्त । दाटैल तुझें

13.858

म्हणौनि असो हें न बोलों । परि साविया गा तोषलों ।
जे ज्ञानतरिये मेळविलों । श्रवण सुखाचिये

13.859

आतां इयावरी । जे तो श्रीहरी ।
बोलिला तें करीं । कथन वेगां

13.860

इया संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें ।
जी अवधारा तरी ऐसें । बोलिलें देवें

13.861

म्हणती तुवां पांडवा । हा चिन्हसमुच्चयो आघवा ।
आयकिला तो जाणावा । अज्ञानभागु

13.862

इया अज्ञानविभागा । पाठी देऊनि पैं गा ।
ज्ञानविखीं चांगा । दृढा होईजे

13.863

मग निर्वाळिलेनि ज्ञानें । ज्ञेय भेटेल मनें ।
तें जाणावया अर्जुनें । आस केली

13.864

तंव सर्वज्ञांचा रावो । म्हणे जाणौनि तयाचा भावो ।
परिसें ज्ञेयाचा अभिप्रावो । सांगों आतां

13.865

तरि ज्ञेय ऐसें म्हणणें । वस्तूतें येणेंचि कारणें ।
जें ज्ञानेंवांचूनि कवणें । उपायें नये

13.866

आणि जाणितलेयावरौतें । कांहींच करणें नाहीं जेथें ।
जाणणेंचि तन्मयातें । आणी जयाचें

13.867

जें जाणितलेयासाठीं । संसार काढूनियां कांठीं ।
जिरोनि जाइजे पोटीं । नित्यानंदाच्या

13.868

तें ज्ञेय गा ऐसें । आदि जया नसे ।
परब्रह्म आपैसें । नाम जया

13.869

जें नाहीं म्हणों जाइजे । तंव विश्वाकारें देखिजे ।
आणि विश्वचि ऐसें म्हणिजे । तरि हे माया

13.870

रूप वर्ण व्यक्ती । नाहीं दृश्य दृष्टा स्थिती ।
तरी कोणें कैसें आथी । म्हणावें पां

13.871

आणि साचचि जरी नाहीं । तरी महदादि कोणें ठाईं ।
स्फुरत कैचें काई । तेणेंवीण असे ?

13.872

म्हणौनि आथी नाथी हे बोली । जें देखोनि मुकी जाहली ।
विचारेंसीं मोडली । वाट जेथें

13.873

जैसी भांडघटशरावीं । तदाकारें असे पृथ्वी ।
तैसें सर्व होऊनियां सर्वीं । असे जे वस्तु

13.874

आघवांचि देशीं काळीं । नव्हतां देशकाळांवेगळी ।
जे क्रिया स्थूळास्थूळीं । तेचि हात जयाचे

13.875

तयातें याकारणें । विश्वबाहू ऐसें म्हणणें ।
जें सर्वचि सर्वपणें । सर्वदा करी

13.876

आणि समस्तांही ठाया । एके काळीं धनंजया ।
आलें असे म्हणौनि जया । विश्वांघ्रीनाम

13.877

पैं सवितया आंग डोळे । नाहींत वेगळे वेगळे ।
तैसें सर्वद्रष्टे सकळें । स्वरूपें जें

13.878

म्हणौनि विश्वतश्चक्षु । हा अचक्षूच्या ठायीं पक्षु ।
बोलावया दक्षु । जाहला वेदु

13.879

जें सर्वांचे शिरावरी । नित्य नांदे सर्वांपरी ।
ऐसिये स्थितीवरी । विश्वमूर्धा म्हणिपे

13.880

पैं गा मूर्ति तेंचि मुख । हुताशना जैसें देख ।
तैसें सर्वपणें अशेख । भोक्ते जे

13.881

यालागीं तया पार्था । विश्वतोमुख हे व्यवस्था ।
आली वाक्पथा । श्रुतीचिया

13.882

आणि वस्तुमात्रीं गगन । जैसें असे संलग्न ।
तैसें शब्दजातीं कान । सर्वत्र जया

13.883

म्हणौनि आम्हीं तयातें । म्हणों सर्वत्र आइकतें ।
एवं जें सर्वांतें । आवरूनि असे

13.884

एऱहवीं तरी महामती । विश्वतश्चक्षु इया श्रुती ।
तयाचिया व्याप्ती । रूप केलें

13.885

वांचूनि हस्त नेत्र पाये । हें भाष तेथ कें आहे ? ।
सर्व शून्याचा न साहे । निष्कर्षु जें

13.886

पैं कल्लोळातें कल्लोळें । ग्रसिजत असे ऐसें कळे ।
परी ग्रसितें ग्रासावेगळें । असे काई ?

13.887

तैसें साचचि जें एक । तेथ कें व्याप्यव्यापक ? ।
परी बोलावया नावेक । करावें लागे

13.888

पैं शून्य जैं दावावें जाहलें । तैं बिंदुलें एक पाहिजे केलें ।
तैसें अद्वैत सांगावें बोलें । तैं द्वैत कीजे

13.889

एऱहवीं तरी पार्था । गुरुशिष्यसत्पथा ।
आडळु पडे सर्वथा । बोल खुंटे

13.890

म्हणौनि गा श्रुती । द्वैतभावें अद्वैतीं ।
निरूपणाची वाहती । वाट केली

13.891

तेंचि आतां अवधारीं । इये नेत्रगोचरें आकारीं ।
तें ज्ञेय जयापरी । व्यापक असे

13.892

तरी तें गा किरीटी ऐसें । अवकाशीं आकाश जैसें ।
पटीं पटु होऊनि असे । तंतु जेवीं

13.893

उदक होऊनि उदकीं । रसु जैसा अवलोकीं ।
दीपपणें दीपकीं । तेज जैसें

13.894

कर्पूरत्वें कापुरीं । सौरभ्य असे जयापरी ।
शरीर होऊनि शरीरीं । कर्म जेवीं

13.895

किंबहुना पांडवा । सोनेंचि सोनयाचा रवा ।
तैसें जें या सर्वां । सर्वांगीं असे

13.896

परी रवेपणामाजिवडे । तंव रवा ऐसें आवडे ।
वांचूनि सोनें सांगडें । सोनया जेवीं

13.897

पैं गा वोघुचि वांकुडा । परि पाणी उजू सुहाडा ।
वन्हि आला लोखंडा । लोह नव्हे कीं

13.898

घटाकारें वेंटाळें । तेथ नभ गमे वाटोळें ।
मठीं तरी चौफळें । आये दिसे

13.899

तरि ते अवकाश जैसें । नोहिजतीचि कां आकाशें ।
जें विकार होऊनि तैसें । विकारी नोहे

13.900

मन मुख्य इंद्रियां । सत्त्वादि गुणां ययां- ।
सारिखें ऐसें धनंजया । आवडे कीर

13.901

पैं गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी ।
तैसीं गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ

13.902

अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारें असे ।
परी क्षीरचि नोहे जैसें । कपिध्वजा

13.903

तैसें जें इये विकारीं । विकार नोहे अवधारीं ।
पैं आकारा नाम भोंवरी । येर सोने तें सोनें

13.904

इया उघड मऱहाटिया । तें वेगळेपण धनंजया ।
जाण गुण इंद्रियां- । पासोनियां

13.905

नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु ।
हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाहीं

13.906

तें गुण नव्हे कहीं । गुणा तया संबंधु नाहीं ।
परी तयाच्याचि ठायीं । आभासती

13.907

येतुलेयासाठीं । संभ्रांताच्या पोटीं ।
ऐसें जाय किरीटी । जे हेंचि धरी

13.908

तरी तें गा धरणें ऐसें । अभ्रातें जेवीं आकाशें ।
कां प्रतिवदन जैसें । आरसेनी

13.909

नातरी सूर्य प्रतिमंडल । जैसेनि धरी सलिल ।
कां रश्मिकरीं मृगजळ । धरिजे जेवीं

13.910

तैसें गा संबंधेंवीण । यया सर्वांतें धरी निर्गुण ।
परी तें वायां जाण । मिथ्यादृष्टी

13.911

आणि यापरी निर्गुणें । गुणातें भोगणें ।
रंका राज्य करणें । स्वप्नीं जैसें

13.912

म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु ।
हा निर्गुणीं लागु । बोलों नये

13.913

जें चराचर भूतां- । माजीं असे पंडुसुता ।
नाना वन्हीं उष्णता । अभेदें जैसी

13.914

तैसेनि अविनाशभावें । जें सूक्ष्मदशे आघवें ।
व्यापूनि असे तें जाणावें । ज्ञेय एथ

13.915

जें एक आंतुबाहेरी । जें एक जवळ दुरी ।
जें एकवांचूनि परी । दुजीं नाहीं

13.916

क्षीरसागरींची गोडी । माजीं बहु थडिये थोडी ।
हें नाहीं तया परवडी । पूर्ण जें गा

13.917

स्वेदजादिप्रभृती । वेगळाल्यां भूतीं ।
जयाचिये अनुस्यूतीं । खोमणें नाहीं

13.918

पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- ।
माजीं बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवीं

13.919

नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी ।
कां कोडी एकीं ऊसीं । एकचि गोडी

13.920

तैसें अनेकीं भूतजातीं । जें आहे एकी व्याप्ती ।
विश्वकार्या सुमती । कारण जें गा

13.921

म्हणौनि हा भूताकारु । जेथोनि तेंचि तया आधारु ।
कल्लोळा सागरु । जियापरी

13.922

बाल्यादि तिन्हीं वयसीं । काया एकचि जैसी ।
तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें

13.923

सायंप्रातर्मध्यान । होतां जातां दिनमान ।
जैसें कां गगन । पालटेना

13.924

अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा ।
व्याप्ति जें विष्णुनामा । पात्र जाहलें

13.925

मग आकारु हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे ।
तेंही गुणत्रय जेव्हां लोपे । तैं जें शून्य

13.926

नभाचें शून्यत्व गिळून । गुणत्रयातें नुरऊन ।
तें शून्य तें महाशून्य । श्रुतिवचनसंमत

13.927

जें अग्नीचें दीपन । जें चंद्राचें जीवन ।
सूर्याचे नयन । देखती जेणें

13.928

जयाचेनि उजियेडें । तारांगण उभडें ।
महातेज सुरवाडें । राहाटे जेणें

13.929

जें आदीची आदी । जें वृद्धीची वृद्धी ।
बुद्धीची जे बुद्धी । जीवाचा जीवु

13.930

जें मनाचें मन । जें नेत्राचे नयन ।
कानाचे कान । वाचेची वाचा

13.931

जें प्राणाचा प्राण । जें गतीचे चरण ।
क्रियेचें कर्तेपण । जयाचेनि

13.932

आकारु जेणें आकारे । विस्तारु जेणें विस्तारे ।
संहारु जेणें संहारे । पंडुकुमरा

13.933

जें मेदिनीची मेदिनी । जें पाणी पिऊनि असे पाणी ।
तेजा दिवेलावणी । जेणें तेजें

13.934

जें वायूचा श्वासोश्वासु । जें गगनाचा अवकाशु ।
हें असो आघवाची आभासु । आभासे जेणें

13.935

किंबहुना पांडवा । जें आघवेंचि असे आघवा ।
जेथ नाहीं रिगावा । द्वैतभावासी

13.936

जें देखिलियाचिसवें । दृश्य द्रष्टा हें आघवें ।
एकवाट कालवे । सामरस्यें

13.937

मग तेंचि होय ज्ञान । ज्ञाता ज्ञेय हन ।
ज्ञानें गमिजे स्थान । तेंहि तेंची

13.938

जैसें सरलियां लेख । आंख होती एक ।
तैसें साध्यसाधनादिक । ऐक्यासि ये

13.939

अर्जुना जिये ठायीं । न सरे द्वैताची वही ।
हें असो जें हृदयीं । सर्वांच्या असे

13.940

एवं तुजपुढां । आदीं क्षेत्र सुहाडा ।
दाविलें फाडोवाडां । विवंचुनी

13.941

तैसेंचि क्षेत्रापाठीं । जैसेनि देखसी दिठी ।
तें ज्ञानही किरीटी । सांगितलें

13.942

अज्ञानाही कौतुकें । रूप केलें निकें ।
जंव आयणी तुझी टेंके । पुरे म्हणे

13.943

आणि आतां हें रोकडें । उपपत्तीचेनि पवाडें ।
निरूपिलें उघडें । ज्ञेय पैं गा

13.944

हे आघवीच विवंचना । बुद्धी भरोनि अर्जुना ।
मत्सिद्धिभावना । माझिया येती

13.945

देहादि परिग्रहीं । संन्यासु करूनियां जिहीं ।
जीवु माझ्या ठाईं । वृत्तिकु केला

13.946

ते मातें किरीटी । हेंचि जाणौनियां शेवटीं ।
आपणपयां साटोवाटीं । मीचि होती

13.947

मीचि होती परी । हे मुख्य गा अवधारीं ।
सोहोपी सर्वांपरी । रचिलीं आम्हीं

13.948

कडां पायरी कीजे । निराळीं माचु बांधिजे ।
अथावीं सुइजे । तरी जैसी

13.949

एऱहवीं अवघेंचि आत्मा । हें सांगों जरी वीरोत्तमा ।
परी तुझिया मनोधर्मा । मिळेल ना

13.950

म्हणौनि एकचि संचलें । चतुर्धा आम्हीं केलें ।
जें अदळपण देखिलें । तुझिये प्रज्ञे

13.951

पैं बाळ जैं जेवविजे । तैं घांसु विसा ठायीं कीजे ।
तैसें एकचि हेंचतुर्व्याजें । कथिलें आम्हीं

13.952

एक क्षेत्र एक ज्ञान । एक ज्ञेय एक अज्ञान ।
हे भाग केले अवधान । जाणौनि तुझें

13.953

आणि ऐसेनही पार्था । जरी हा अभिप्रावो तुज हाता ।
नये तरी हे व्यवस्था । एक वेळ सांगों

13.954

आतां चौठायीं न करूं । एकही म्हणौनि न सरूं ।
आत्मानात्मया धरूं । सरिसा पाडु

13.955

परि तुवां येतुलें करावें । मागों तें आम्हां देआवें ।
जे कानचि नांव ठेवावें । आपण पैं गा

13.956

या श्रीकृष्णाचिया बोला । पार्थु रोमांचितु जाहला ।
तेथ देवो म्हणती भला । उचंबळेना

13.957

ऐसेनि तो येतां वेगु । धरूनि म्हणे श्रीरंगु ।
प्रकृतिपुरुषविभागु । परिसें सांगों

13.958

जया मार्गातें जगीं । सांख्य म्हणती योगी ।
जयाचिये भाटिवेलागीं । मी कपिल जाहलों

13.959

तो आइक निर्दोखु । प्रकृतिपुरुषविवेकु ।
म्हणे आदिपुरुखु । अर्जुनातें

13.960

तरी पुरुष अनादि आथी । आणि तैंचि लागोनि प्रकृति ।
संसरिसी दिवोराती । दोनी जैसी

13.961

कां रूप नोहे वायां । परी रूपा लागली छाया ।
निकणु वाढे धनंजया । कणेंसीं कोंडा

13.962

तैसीं जाण जवटें । दोन्हीं इयें एकवटे ।
प्रकृतिपुरुष प्रगटें । अनादिसिद्धें

13.963

पैं क्षेत्र येणें नांवें । जें सांगितलें आघवें ।
तेंचि एथ जाणावें । प्रकृति हे गा

13.964

आणि क्षेत्रज्ञ ऐसें । जयातें म्हणितलें असे ।
तो पुरुष हें अनारिसे । न बोलों घेईं

13.965

इयें आनानें नांवें । परी निरूप्य आन नोहे ।
हें लक्षण न चुकावें । पुढतपुढती

13.966

तरी केवळ जे सत्ता । तो पुरुष गा पंडुसुता ।
प्रकृतीतें समस्तां । क्रिया नाम

13.967

बुद्धि इंद्रियें अंतःकरण । इत्यादि विकारभरण ।
आणि ते तिन्ही गुण । सत्त्वादिक

13.968

हा आघवाचि मेळावा । प्रकृती जाहला जाणावा ।
हेचि हेतु संभवा । कर्माचिया

13.969

तेथ इच्छा आणि बुद्धि । घडवी अहंकारेंसीं आधीं ।
मग तिया लाविती वेधीं । कारणाच्या

13.970

तेंचि कारण ठाकावया । जें सूत्र धरणें उपाया ।
तया नांव धनंजया । कार्य पैं गा

13.971

आणि इच्छा मदाच्या थावीं । लागली मनातें उठवी ।
तें इंद्रियें राहाटवी । हें कर्तृत्व पैं गा

13.972

म्हणौनि तीन्ही या जाणा । कार्यकर्तृत्वकारणा ।
प्रकृति मूळ हे राणा । सिद्धांचा म्हणे

13.973

एवं तिहींचेनि समवायें । प्रकृति कर्मरूप होये ।
परी जया गुणा वाढे त्राये । त्याचि सारिखी

13.974

जें सत्त्वगुणें अधिष्ठिजे । तें सत्कर्म म्हणिजे ।
रजोगुणें निफजे । मध्यम तें

13.975

जें कां केवळ तमें । होती जियें कर्में ।
निषिद्धें अधमें । जाण तियें

13.976

ऐसेनि संतासंतें । कर्में प्रकृतीस्तव होतें ।
तयापासोनि निर्वाळतें । सुखदुःख गा

13.977

असंतीं दुःख उपजे । सत्कर्मीं सुख निफजे ।
तया दोहींचा बोलिजे । भोगु पुरुषा

13.978

सुखदुःखें जंववरी । निफजती साचोकारीं ।
तंव प्रकृति उद्यमु करी । पुरुषु भोगी

13.979

प्रकृतिपुरुषांची कुळवाडी । सांगतां असंगडी ।
जे आंबुली जोडी । आंबुला खाय

13.980

आंबुला आंबुलिये । संगती ना सोये ।
कीं आंबुली जग विये । चोज ऐका

13.981

जे अनंगु तो पेंधा । निकवडा नुसधा ।
जीर्णु अतिवृद्धा- । पासोनि वृद्धु

13.982

तया आडनांव पुरुषु । एऱहवीं स्त्री ना नपुंसकु ।
किंबहुना एकु । निश्चयो नाहीं

13.983

तो अचक्षु अश्रवणु । अहस्तु अचरणु ।
रूप ना वर्णु । नाम आथी

13.984

अर्जुना कांहींचि जेथ नाहीं । तो प्रकृतीचा भर्ता पाहीं ।
कीं भोगणें ऐसयाही । सुखदुःखांचें

13.985

तो तरी अकर्ता । उदासु अभोक्ता ।
परी इया पतिव्रता । भोगविजे

13.986

जियेतें अळुमाळु । रूपागुणाचा चाळढाळु ।
ते भलतैसाही खेळु । लेखा आणी

13.987

मा इये प्रकृती तंव । गुणमयी हेंचि नांव ।
किंबहुना सावेव । गुण तेचि हे

13.988

हे प्रतिक्षणीं नीत्य नवी । रूपा गुणाचीच आघवी ।
जडातेंही माजवी । इयेचा माजु

13.989

नामें इयें प्रसिद्धें । स्नेहो इया स्निग्धें ।
इंद्रियें प्रबुद्धें । इयेचेनि

13.990

कायि मन हें नपुंसक । कीं ते भोगवी तिन्ही लोक ।
ऐसें ऐसें अलौकिक । करणें इयेचें

13.991

हे भ्रमाचे महाद्वीप । व्याप्तीचें रूप ।
विकार उमप । इया केले

13.992

हे कामाची मांडवी । हे मोहवनींची माधवी ।
इये प्रसिद्धचि दैवी । माया हे नाम

13.993

हे वाङ्मयाची वाढी । हे साकारपणाची जोडी ।
प्रपंचाची धाडी । अभंग हे

13.994

कळा एथुनि जालिया । विद्या इयेच्या केलिया ।
इच्छा ज्ञान क्रिया । वियाली हे

13.995

हे नादाची टांकसाळ । हे चमत्काराचें वेळाउळ ।
किंबहुना सकळ । खेळु इयेचा

13.996

जे उत्पत्ति प्रलयो होत । ते इयेचे सायंप्रात ।
हें असो अद्भुत । मोहन हे

13.997

हे अद्वयाचें दुसरें । हे निःसंगाचें सोयरे ।
निराळेंसि घरें । नांदत असे

13.998

इयेतें येतुलावरी । सौभाग्यव्याप्तीची थोरी ।
म्हणौनि तया आवरी । अनावरातें

13.999

तयाच्या तंव ठायीं । निपटूनि कांहींचि नाहीं ।
कीं तया आघवेहीं । आपणचि होय

13.1000

तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्ताची मूर्ती ।
आपण होय स्थिती । ठावो तया

13.1001

तया अनार्ताची आर्ती । तया पूर्णाची तृप्ती ।
तया अकुळाची जाती- । गोत होय

13.1002

तया अचर्चाचें चिन्ह । तया अपाराचें मान ।
तया अमनस्काचें मन । बुद्धीही होय

13.1003

तया निराकाराचा आकारु । तया निर्व्यापाराचा व्यापारु ।
निरहंकाराचा अहंकारु । होऊनि ठाके

13.1004

तया अनामाचें नाम । तया अजाचें जन्म ।
आपण होय कर्म- । क्रिया तया

13.1005

तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण ।
तया अश्रवणाचे श्रवण । अचक्षूचे चक्षु

13.1006

तया भावातीताचे भाव । तया निरवयवाचे अवयव ।
किंबहुना होय सर्व । पुरुषाचें हे

13.1007

ऐसेनि इया प्रकृती । आपुलिया सर्व व्याप्ती ।
तया अविकारातें विकृती- । माजीं कीजे

13.1008

तेथ पुरुषत्व जें असे । तें ये इये प्रकृतिदशे ।
चंद्रमा अंवसे । पडिला जैसा

13.1009

विदळ बहु चोखा । मीनलिया वाला एका ।
कसु होय पांचका । जयापरी

13.1010

कां साधूतें गोंधळी । संचारोनि सुये मैळी ।
नाना सुदिनाचा आभाळीं । दुर्दिनु कीजे

13.1011

जेवीं पय पशूच्या पोटीं । कां वन्हि जैसा काष्ठीं ।
गुंडूनि घेतला पटीं । रत्नदीपु

13.1012

राजा पराधीनु जाहला । कां सिंहु रोगें रुंधला ।
तैसा पुरुष प्रकृती आला । स्वतेजा मुके

13.1013

जागता नरु सहसा । निद्रा पाडूनि जैसा ।
स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे

13.1014

तैसें प्रकृति जालेपणें । पुरुषा गुण भोगणें ।
उदास अंतुरीगुणें । आतुडे जेवीं

13.1015

तैसें अजा नित्या होये । आंगीं जन्ममृत्यूचे घाये ।
वाजती जैं लाहे । गुणसंगातें

13.1016

परि तें ऐसें पंडुसुता । तातलें लोह पिटितां ।
जेवीं वन्हीसीचि घाता । बोलती तया

13.1017

कां आंदोळलिया उदक । प्रतिभा होय अनेक ।
तें नानात्व म्हणती लोक । चंद्रीं जेवीं

13.1018

दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसें ये मुखा ।
कां कुंकुमें स्फटिका । लोहितत्व ये

13.1019

तैसा गुणसंगमें । अजन्मा हा जन्मे ।
पावतु ऐसा गमे । एऱहवीं नाहीं

13.1020

अधमोत्तमा योनी । यासि ऐसिया मानी ।
जैसा संन्यासी होय स्वप्नीं । अंत्यजादि जाती

13.1021

म्हणौनि केवळा पुरुषा । नाहीं होणें भोगणें देखा ।
येथ गुणसंगुचि अशेखा- । लागीं मूळ

13.1022

हा प्रकृतिमाजीं उभा । परी जुई जैसा वोथंबा ।
इया प्रकृति पृथ्वी नभा । तेतुला पाडु

13.1023

प्रकृतिसरितेच्या तटीं । मेरु होय हा किरीटी ।
माजीं बिंबे परी लोटीं । लोटों नेणे

13.1024

प्रकृति होय जाये । हा तो असतुचि आहे ।
म्हणौनि आब्रह्माचें होये । शासन हा

13.1025

प्रकृति येणें जिये । याचिया सत्ता जग विये ।
इयालागीं इये । वरयेतु हा

13.1026

अनंतें काळें किरीटी । जिया मिळती इया सृष्टी ।
तिया रिगती ययाच्या पोटीं । कल्पांतसमयीं

13.1027

हा महद्ब्रह्मगोसावी । ब्रह्मगोळ लाघवी ।
अपारपणें मवी । प्रपंचातें

13.1028

पैं या देहामाझारीं । परमात्मा ऐसी जे परी ।
बोलिजे तें अवधारीं । ययातेंचि

13.1029

अगा प्रकृतिपरौता । एकु आथी पंडुसुता ।
ऐसा प्रवादु तो तत्त्वता । पुरुषु हा पैं

13.1030

जो निखळपणें येणें । पुरुषा यया जाणे ।
आणि गुणांचें करणें । प्रकृतीचें तें

13.1031

हें रूप हे छाया । पैल जळ हे माया ।
ऐसा निवाडु धनंजया । जेवीं कीजे

13.1032

तेणें पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना ।
जयाचिया मना । गोचर जाहली

13.1033

तो शरीराचेनि मेळें । करूं कां कर्में सकळें ।
परी आकाश धुई न मैळे । तैसा असे

13.1034

आथिलेनि देहें । जो न घेपे देहमोहें ।
देह गेलिया नोहे । पुनरपि तो

13.1035

ऐसा तया एकु । प्रकृतिपुरुषविवेकु ।
उपकारु अलौकिकु । करी पैं गा

13.1036

परी हाचि अंतरीं । विवेक भानूचिया परी ।
उदैजे तें अवधारीं । उपाय बहुत

13.1037

कोणी एकु सुभटा । विचाराचा आगिटां ।
आत्मानात्मकिटा । पुटें देउनी

13.1038

छत्तीसही वानी भेद । तोडोनियां निर्विवाद ।
निवडिती शुद्ध । आपणपें

13.1039

तया आपणपयाच्या पोटीं । आत्मध्यानाचिया दिठी ।
देखती गा किरीटी । आपणपेंचि

13.1040

आणिक पैं दैवबगें । चित्त देती सांख्ययोगें ।
एक ते अंगलगें । कर्माचेनी

13.1041

येणें येणें प्रकारें । निस्तरती साचोकारें ।
हें भवा भेउरें । आघवेंचि

13.1042

परी ते करिती ऐसें । अभिमानु दवडूनि देशें ।
एकाचिया विश्वासें । टेंकती बोला

13.1043

जे हिताहित देखती । हानि कणवा घेपती ।
पुसोनि शिणु हरिती । देती सुख

13.1044

तयांचेनि मुखें जें निघे । तेतुलें आदरें चांगें ।
ऐकोनियां आंगें । मनें होती

13.1045

तया ऐकणेयाचि नांवें । ठेविती गा आघवें ।
तया अक्षरांसीं जीवें । लोण करिती

13.1046

तेही अंतीं कपिध्वजा । इया मरणार्णवसमाजा- ।
पासूनि निघती वोजा । गोमटिया

13.1047

ऐसेसे हे उपाये । बहुवस एथें पाहें ।
जाणावया होये । एकी वस्तु

13.1048

आतां पुरे हे बहुत । पैं सर्वार्थाचें मथित ।
सिद्धांतनवनीत । देऊं तुज

13.1049

येतुलेनि पंडुसुता । अनुभव लाहाणा आयिता ।
येर तंव तुज होतां । सायास नाहीं

13.1050

म्हणौनि ते बुद्धि रचूं । मतवाद हे खांचूं ।
सोलीव निर्वचूं । फलितार्थुची

13.1051

तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें ।
आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें

13.1052

तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं ।
अनिलसंगें सलिलीं । कल्लोळ जैसे

13.1053

कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा ।
मृगजळाचिया पूरा । रूप होय

13.1054

नाना धाराधरधारीं । झळंबलिया वसुंधरी ।
उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं

13.1055

तैसें चराचर आघवें । जें कांहीं जीवु नावें ।
तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण

13.1056

इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- ।
पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती

13.1057

पैं पटत्व तंतु नव्हे । तरी तंतूसीचि तें आहे ।
ऐसां खोलीं डोळां पाहें । ऐक्य हें गा

13.1058

भूतें आघवींचि होती । एकाचीं एक आहाती ।
परी तूं प्रतीती । यांची घे पां

13.1059

यांचीं नामेंही आनानें । अनारिसीं वर्तनें ।
वेषही सिनाने । आघवेयांचे

13.1060

ऐसें देखोनि किरीटी । भेद सूसी हन पोटीं ।
तरी जन्माचिया कोटी । न लाहसी निघों

13.1061

पैं नानाप्रयोजनशीळें । दीर्घें वक्रें वर्तुळें ।
होती एकाचींच फळें । तुंबिणीयेचीं

13.1062

होतु कां उजू वांकुडें । परी बोरीचे हें न मोडे ।
तैसी भूतें अवघडें । परी वस्तु उजू

13.1063

अंगारकणीं बहुवसीं । उष्णता समान जैशी ।
तैसा नाना जीवराशीं । परेशु असे

13.1064

गगनभरी धारा । परी पाणी एकचि वीरा ।
तैसा या भूताकारा । सर्वांगीं तो

13.1065

हें भूतग्राम विषम । परी वस्तू ते एथ सम ।
घटमठीं व्योम । जिंयापरी

13.1066

हा नाशतां भूताभासु । एथ आत्मा तो अविनाशु ।
जैसा केयूरादिकीं कसु । सुवर्णाचा

13.1067

एवं जीवधर्महीनु । जो जीवेंसीं अभिन्नु ।
देख तो सुनयनु । ज्ञानियांमाजीं

13.1068

ज्ञानाचा डोळा डोळसां- । माजीं डोळसु तो वीरेशा ।
हे स्तुति नोहे बहुवसा । भाग्याचा तो

13.1069

जे गुणेंद्रिय धोकोटी । देह धातूंची त्रिकुटी ।
पांचमेळावा वोखटी । दारुण हे

13.1070

हें उघड पांचवेउली । पंचधां आगी लागली ।
जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे

13.1071

ऐसा असोनि इये शरीरीं । कोण नित्यबुद्धीची सुरी ।
अनित्यभावाच्या उदरीं । दाटीचिना

13.1072

परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता ।
आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे

13.1073

जेथ योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी ।
न निगों इया भाषा बुडी । देती योगी

13.1074

जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर ।
तुर्येचें माजघर । परब्रह्म जें

13.1075

मोक्षासकट गती । जेथें येती विश्रांती ।
गंगादि आपांपती । सरिता जेवीं

13.1076

तें सुख येणेंचि देहें । पाय पाखाळणिया लाहे ।
जो भूतवैषम्यें नोहे । विषमबुद्धी

13.1077

दीपांचिया कोडी जैसें । एकचि तेज सरिसें ।
तैसा जो असतुचि असे । सर्वत्र ईशु

13.1078

ऐसेनि समत्वें पंडुसुता । जिये जो देखत साता ।
तो मरण आणि जीविता । नागवे फुडा

13.1079

म्हणौनि तो दैवागळा । वानीत असों वेळोवेळां ।
जे साम्यसेजे डोळां । लागला तया

13.1080

आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें ।
करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा

13.1081

घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी ।
अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें

13.1082

तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा ।
येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण

13.1083

ऐसेनि येणें निवाडें । जयाच्या जीवीं उजिवडें ।
अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें

13.1084

एऱहवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना ।
जैं या भूताकृती भिन्ना । दिसती एकी

13.1085

लहरी जैसिया जळीं । परमाणुकणिका स्थळीं ।
रश्मीकरमंडळीं । सूर्याच्या जेवीं ?

13.1086

नातरी देहीं अवेव । मनीं आघवेचि भाव ।
विस्फुलिंग सावेव । वन्हीं एकीं

13.1087

तैसे भूताकार एकाचे । हें दिठी रिगे जैं साचें ।
तैंचि ब्रह्मसंपत्तीचें । तारूं लागे

13.1088

मग जया तयाकडे । ब्रह्मेचि दिठी उघडे ।
किंबहुना जोडे । अपार सुख

13.1089

येतुलेनि तुज पार्था । प्रकृतिपुरुषव्यवस्था ।
ठायें ठावो प्रतीतिपथा- । माजीं जाहली ?

13.1090

अमृत जैसें ये चुळा । कां निधान देखिजे डोळां ।
तेतुला जिव्हाळा । मानावा हा

13.1091

जी जाहलिये प्रतीती । घर बांधणें जें चित्तीं ।
तें आतां ना सुभद्रापती । इयावरी

13.1092

तरी एक दोन्ही ते बोल । बोलिजती सखोल ।
देईं मनातें वोल । मग ते घेईं

13.1093

ऐसें देवें म्हणितलें । मग बोलों आदरिलें ।
तेथें अवधानाचेचि केलें । सर्वांग येरें

13.1094

तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें ।
जळीं जळें न लिंपे । सूर्यु जैसा

13.1095

कां जे जळा आदीं पाठीं । तो असतुचि असे किरीटी ।
माजीं बिंबे तें दृष्टी । आणिकांचिये

13.1096

तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं ।
साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें

13.1097

आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे ।
देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा

13.1098

तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी ।
वारिया वाळुवे गांठी । केंही आहे ?

13.1099

आगी आणि कापुसा । दोरा सुवावा कैसा ।
केउता सांदा आकाशा । पाषाणेंसी ?

13.1100

एक निघे पूर्वेकडे । एक तें पश्चिमेकडे ।
तिये भेटीचेनि पाडें । संबंधु हा

13.1101

उजियेडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभेयां ।
तोचि गा आत्मया । देहा जाण

13.1102

रात्री आणि दिवसा । कनका आणि कापुसा ।
अपाडु कां जैसा । तैसाचि यासी

13.1103

देह तंव पांचांचें जालें । हें कर्माचें गुणीं गुंथले ।
भंवतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या

13.1104

हें काळानळाच्या तोंडीं । घातली लोणियाची उंडी ।
माशी पांखु पाखडी । तंव हें सरे

13.1105

हें विपायें आगींत पडे । तरी भस्म होऊनि उडे ।
जाहलें श्वाना वरपडें । तरी ते विष्ठा

13.1106

या चुके दोहीं काजा । तरी होय कृमींचा पुंजा ।
हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा

13.1107

या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा ।
पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें

13.1108

सकळु ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु ।
कृश ना स्थुळु । निर्गुणपणें

13.1109

आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु ।
अल्प ना बहुवसु । अरूपपणें

13.1110

रिता ना भरितु । रहितु ना सहितु ।
मूर्तु ना अमूर्तु । शून्यपणें

13.1111

आनंदु ना निरानंदु । एक ना विविधु ।
मुक्त ना बद्धु । आत्मपणें

13.1112

येतुला ना तेतुला । आइता ना रचिला ।
बोलता ना उगला । अलक्शपणें

13.1113

सृष्टीच्या होणा न रचे । सर्वसंहारें न वेंचे ।
आथी नाथी या दोहींचें । पंचत्व तो

13.1114

मवे ना चर्चे । वाढे ना खांचे ।
विटे ना वेंचे । अव्ययपणें

13.1115

एवं रूप पैं आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा ।
तें मठाकारें व्योमा । नाम जैसें

13.1116

तैसें तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृती ।
तो घे ना सांडी सुमती । जैसा तैसा

13.1117

अहोरात्रें जैशी । येती जाती आकाशीं ।
आत्मसत्तें तैसीं । देहें जाण

13.1118

म्हणौनि इयें शरीरीं । कांहीं करवीं ना करी ।
आयताही व्यापारीं । सज्ज न होय

13.1119

यालागीं स्वरूपें । उणा पुरा न घेपे ।
हें असो तो न लिंपे । देहीं देहा

13.1120

अगा आकाश कें नाहीं ? । हें न रिघेचि कवणे ठायीं ? ।
परी कायिसेनि कहीं । गादिजेना

13.1121

तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं ।
संगदोषें एकेंही । लिप्त नोहे

13.1122

पुढतपुढती एथें । हेंचि लक्षण निरुतें ।
जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना

13.1123

संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे ।
क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु

13.1124

दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची ।
परी वेगळीक कोडीची । दीपा आणि घरा

13.1125

पैं काष्ठाच्या पोटीं । वन्हि असे किरीटी ।
परी काष्ठ नोहे या दृष्टी । पाहिजे हा

13.1126

अपाडु नभा आभाळा । रवि आणि मृगजळा ।
तैसाचि हाही डोळां । देखसी जरी

13.1127

हें आघवेंचि असो एकु । गगनौनि जैसा अर्कु ।
प्रगटवी लोकु । नांवें नांवें

13.1128

एथ क्षेत्रज्ञु तो ऐसा । प्रकाशकु क्षेत्राभासा ।
यावरुतें हें न पुसा । शंका नेघा

13.1129

शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणें तेचि प्रज्ञा ।
जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे

13.1130

इया दोहींचें अंतर । देखावया चतुर ।
ज्ञानियांचे द्वार । आराधिती

13.1131

याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती ।
शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं

13.1132

योगाचिया आकाशा । वळघिजे येवढाचि धिंवसा ।
याचियाचि आशा । पुरुषासि गा

13.1133

शरीरादि समस्त । मानिताति तृणवत ।
जीवें संतांचे होत । वाहणधरु

13.1134

ऐसैसियापरी । ज्ञानाचिया भरोवरी ।
करूनियां अंतरीं । निरुतें होती

13.1135

मग क्षेत्रक्षेत्रज्ञांचें । जें अंतर देखती साचें ।
ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं आम्ही

13.1136

आणि महाभूतादिकीं । प्रभेदलीं अनेकीं ।
पसरलीसे लटिकी । प्रकृति जे हे

13.1137

जे शुकनळिकान्यायें । न लगती लागली आहे ।
हें जैसें तैसें होये । ठाउवें जयां

13.1138

जैसी माळा ते माळा । ऐसीचि देखिजे डोळां ।
सर्पबुद्धि टवाळा । उखी हौनी

13.1139

कां शुक्ति ते शुक्ती । हे साच होय प्रतीती ।
रुपेयाची भ्रांती । जाऊनियां

13.1140

तैसी वेगळी वेगळेपणें । प्रकृति जे अंतःकरणें ।
देखती ते मी म्हणें । ब्रह्म होती

13.1141

जें आकाशाहूनि वाड । जें अव्यक्ताची पैल कड ।
जें भेटलिया अपाडा पाड । पडों नेदी

13.1142

आकारु जेथ सरे । जीवत्व जेथ विरे ।
द्वैत जेथ नुरे । अद्वय जें

13.1143

तें परम तत्त्व पार्था । होती ते सर्वथा ।
जे आत्मानात्मव्यवस्था- । राजहंसु

13.1144

ऐसा हा जी आघवा । श्रीकृष्णें तया पांडवा ।
उगाणा दिधला जीवा । जीवाचिया

13.1145

येर कलशींचें येरीं । रिचविजे जयापरी ।
आपणपें तया श्रीहरी । दिधलें तैसें

13.1146

आणि कोणा देता कोण । तो नर तैसा नारायण ।
वरी अर्जुनातें श्रीकृष्ण । हा मी म्हणे

13.1147

परी असो तें नाथिलें । न पुसतां कां मी बोलें ।
किंबहुना दिधलें । सर्वस्व देवें

13.1148

कीं तो पार्थु जी मनीं । अझुनी तृप्ती न मनी ।
अधिकाधिक उतान्ही । वाढवीतु असे

13.1149

स्नेहाचिया भरोवरी । आंबुथिला दीपु घे थोरी ।
चाड अर्जुना अंतरीं । परिसतां तैसी

13.1150

तेथ सुगरिणी आणि उदारे । रसज्ञ आणि जेवणारे ।
मिळती मग अवतरे । हातु जैसा

13.1151

तैसें जी होतसे देवा । तया अवधानाचिया लवलवा ।
पाहतां व्याख्यान चढलें थांवा । चौगुणें वरी

13.1152

सुवायें मेघु सांवरे । जैसा चंद्रें सिंधु भरे ।
तैसा मातुला रसु आदरें । श्रोतयांचेनि

13.1153

आतां आनंदमय आघवें । विश्व कीजेल देवें ।
तें रायें परिसावें । संजयो म्हणे

13.1154

एवं जे महाभारतीं । श्रीव्यासें आप्रांतमती ।
भीष्मपर्वसंगतीं । म्हणितली कथा

13.1155

तो कृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोलीं विशदु ।
सांगोनि दाऊं प्रबंधु । वोवियेचा

13.1156

नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा ।
जे शृंगाराच्या माथां । पाय ठेवी

13.1157

दाऊं वेल्हाळे देशी नवी । जे साहित्यातें वोजावी ।
अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें

13.1158

बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे ।
रसरंगीं भुलवणें । नादु लोपी

13.1159

खेचरांचियाही मना । आणीन सात्त्विकाचा पान्हा ।
श्रवणासवें सुमना । समाधि जोडे

13.1160

तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थेंसी विश्व भरूं ।
आनंदाचें आवारूं । मांडूं जगा

13.1161

फिटो विवेकाची वाणी । हो कानामनाची जिणी ।
देखो आवडे तो खाणी । ब्रह्मविद्येची

13.1162

दिसो परतत्त्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा ।
रिघो महाबोध सुकाळा- । माजीं विश्व

13.1163

हें निफजेल आतां आघवें । ऐसें बोलिजेल बरवें ।
जें अधिष्ठिला असें परमदेवें । श्रीनिवृत्तीं मी

13.1164

म्हणौनि अक्षरीं सुभेदीं । उपमा श्लोक कोंदाकोंदी ।
झाडा देईन प्रतिपदीं । ग्रंथार्थासी

13.1165

हा ठावोवरी मातें । पुरतया सारस्वतें ।
केलें असे श्रीमंतें । श्रीगुरुरायें

13.1166

तेणें जी कृपासावायें । मी बोलें तेतुलें सामाये ।
आणि तुमचिये सभे लाहें । गीता म्हणों

13.1167

वरी तुम्हा संतांचे पाये । आजि मी लाधलों आहें ।
म्हणौनि जी नोहे । अटकु काहीं

13.1168

प्रभु काश्मिरीं मुकें । नुपजे हें काय कौतुकें ।
नाहीं उणीं सामुद्रिकें । लक्ष्मीयेसी

13.1169

तैसी तुम्हां संतांपासीं । अज्ञानाची गोठी कायसी ।
यालागीं नवरसीं । वरुषेन मी

13.1170

किंबहुना आतां देवा । अवसरु मज देयावा ।
ज्ञानदेव म्हणे बरवा । सांगेन ग्रंथु

मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0

Esc