भाषा

ENहिગુ
ग्रंथ पाठ

ज्ञानेश्वरी · अध्याय 12

12.1

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ द्वादशोऽध्यायः - अध्याय बारावा । ।
। भक्तियोगः ।
जय जय वो शुद्धे । उदारे प्रसिद्धे ।
अनवरत आनंदे । वर्षतिये

12.2

विषयव्याळें मिठी । दिधलिया नुठी ताठी ।
ते तुझिये गुरुकृपादृष्टी । निर्विष होय

12.3

तरी कवणातें तापु पोळी । कैसेनि वो शोकु जाळी ।
जरी प्रसादरसकल्लोळीं । पुरें येसि तूं

12.4

योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे ।
सोऽहंसिद्धीचे लळे । पाळिसी तूं

12.5

आधारशक्तीचिया अंकीं । वाढविसी कौतुकीं ।
हृदयाकाशपल्लकीं । परीये देसी निजे

12.6

प्रत्यक्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाचीं खेळणीं ।
आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी

12.7

सतरावियेचें स्तन्य देसी । अनुहताचा हल्लरू गासी ।
समाधिबोधें निजविसी । बुझाऊनि

12.8

म्हणौनि साधकां तूं माउली । पिके सारस्वत तुझिया पाउलीं ।
या कारणें मी साउली । न संडीं तुझी

12.9

अहो सद्गुरुचिये कृपादृष्टी । तुझें कारुण्य जयातें अधिष्ठी ।
तो सकलविद्यांचिये सृष्टीं । धात्रा होय

12.10

म्हणौनि अंबे श्रीमंते । निजजनकल्पलते ।
आज्ञापीं मातें । ग्रंथनिरूपणीं

12.11

नवरसीं भरवीं सागरु । करवीं उचित रत्‌नांचे आगरु ।
भावार्थाचे गिरिवरु । निफजवीं माये

12.12

साहित्यसोनियाचिया खाणी । उघडवीं देशियेचिया क्षोणीं ।
विवेकवल्लीची लावणी । हों देई सैंघ

12.13

संवादफळनिधानें । प्रमेयाचीं उद्यानें ।
लावीं म्हणे गहनें । निरंतर

12.14

पाखांडाचे दरकुटे । मोडीं वाग्वाद अव्हांटे ।
कुतर्कांचीं दुष्टें । सावजें फेडीं

12.15

श्रीकृष्णगुणीं मातें । सर्वत्र करीं वो सरतें ।
राणिवे बैसवी श्रोते । श्रवणाचिये

12.16

ये मराठीयेचिया नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणें देणें सुखचिवरी । हो देई या जगा

12.17

तूं आपुलेनि स्नेहपल्लवें । मातें पांघुरविशील सदैवें ।
तरी आतांचि हें आघवें । निर्मीन माये

12.18

इये विनवणीयेसाठीं । अवलोकिलें गुरु कृपादृष्टी ।
म्हणे गीतार्थेंसी उठी । न बोलें बहु

12.19

तेथ जी जी महाप्रसादु । म्हणौनि साविया जाहला आनन्दु ।
आतां निरोपीन प्रबंधु । अवधान दीजे

12.20

तरी सकलवीराधिराजु । जो सोमवंशीं विजयध्वजु ।
तो बोलता जाहला आत्मजु । पंडुनृपाचा

12.21

कृष्णातें म्हणे अवधारिलें । आपण विश्वरूप मज दाविलें ।
तें नवल म्हणौनि बिहालें । चित्त माझें

12.22

आणि इये कृष्णमूर्तीची सवे । यालागीं सोय धरिली जीवें ।
तंव नको म्हणोनि देवें । वारिलें मातें

12.23

तरी व्यक्त आणि अव्यक्त । हें तूंचि एक निभ्रांत ।
भक्ती पाविजे व्यक्त । अव्यक्त योगें

12.24

या दोनी जी वाटा । तूंतें पावावया वैकुंठा ।
व्यक्ताव्यक्त दारवंठां । रिगिजे येथ

12.25

पैं जे वानी श्यातुका । तेचि वेगळिये वाला येका ।
म्हणौनि एकदेशिया व्यापका । सरिसा पाडू

12.26

अमृताचिया सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी ।
तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलेया

12.27

हे कीर माझ्या चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती ।
परि पुसणें योगपती । तें याचिलागीं

12.28

जें देवा तुम्हीं नावेक । अंगिकारिलें व्यापक ।
तें साच कीं कवतिक । हें जाणावया

12.29

तरी तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम ।
भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला

12.30

इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंतें श्रीहरी ।
बांधोनियां जिव्हारीं । उपासिती

12.31

आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जें कानडें ।
कायिसयाहि सांगडें । नव्हेचि जें वस्तु

12.32

तें अक्शर जी अव्यक्त । निर्देश देशरहित ।
सोऽहंभावें उपासित । ज्ञानिये जे

12.33

तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता ।
कवणें योगु तत्त्वतां । जाणितला सांगा

12.34

इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला ।
म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं

12.35

तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं ।
रश्मी जैसे किरीटी । संचरती

12.36

कां वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता ।
तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे

12.37

परी ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु ।
तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा

12.38

तैसें सर्वेंद्रियांसहित । मजमाजीं सूनि चित्त ।
जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती

12.39

इयापरी जे भक्त । आपणपें मज देत ।
तेचि मी योगयुक्त । परम मानीं

12.40

आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोऽहंभावा ।
झोंबती निरवयवा । अक्षरासी

12.41

मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ।
ते इंद्रियां कीर जोगें । कायि होईल ?

12.42

परी ध्यानाही कुवाडें । म्हणौनि एके ठायीं न संपडे ।
व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे

12.43

जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें ।
जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें

12.44

जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे ।
ऐसें म्हणौनि उपाये । उपजतीचि ना

12.45

जें चळे ना ढळे । सरे ना मैळे ।
तें आपुलेनीचि बळें । आंगविलें जिहीं

12.46

पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें ।
अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं

12.47

मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं ।
इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचिया

12.48

अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा ।
मूळबंधाचा हुडा । पन्नासिला

12.49

आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले ।
निद्रेचें शोधिलें । काळवखें

12.50

वज्राग्नीचिया ज्वाळीं । करूनि सप्तधातूंची होळी ।
व्याधींच्या सिसाळीं । पूजिलीं यंत्रें

12.51

मग कुंडलिनियेचा टेंभा । आधारीं केला उभा ।
तया चोजवलें प्रभा । निमथावरी

12.52

नवद्वारांचिया चौचकीं । बाणूनि संयतीची आडवंकी ।
उघडिली खिडकी । ककारांतींची

12.53

प्राणशक्तिचामुंडे । प्रहारूनि संकल्पमेंढे ।
मनोमहिषाचेनि मुंडें । दिधलीं बळी

12.54

चंद्रसूर्यां बुझावणी । करूनि अनुहताची सुडावणी ।
सतरावियेचें पाणी । जिंतिलें वेगीं

12.55

मग मध्यमा मध्य विवरें । तेणें कोरिवें दादरें ।
ठाकिलें चवरें । ब्रह्मरंध्र

12.56

वरी मकारांत सोपान । ते सांडोनिया गहन ।
काखे सूनियां गगन । भरले ब्रह्मीं

12.57

ऐसे जे समबुद्धी । गिळावया सोऽहंसिद्धी ।
आंगविताती निरवधी । योगदुर्गें

12.58

आपुलिया साटोवाटी । शून्य घेती उठाउठीं ।
तेही मातेंचि किरीटी । पावती गा

12.59

वांचूनि योगचेनि बळें । अधिक कांहीं मिळे ।
ऐसें नाहीं आगळें । कष्टचि तया

12.60

जिहीं सकळ भूतांचिया हितीं । निरालंबीं अव्यक्तीं ।
पसरलिया आसक्ती । भक्तीवीण

12.61

तयां महेन्द्रादि पदें । करिताति वाटवधें ।
आणि ऋद्धिसिद्धींचीं द्वंद्वें । पाडोनि ठाती

12.62

कामक्रोधांचे विलग । उठावती अनेग ।
आणि शून्येंसीं आंग । झुंजवावें कीं

12.63

ताहानें ताहानचि पियावी । भुकेलिया भूकचि खावी ।
अहोरात्र वावीं । मवावा वारा

12.64

उनी दिहाचें पहुडणें । निरोधाचें वेल्हावणें ।
झाडासि साजणें । चाळावें गा

12.65

शीत वेढावें । उष्ण पांघुरावें ।
वृष्टीचिया असावें । घरांआंतु

12.66

किंबहुना पांडवा । हा अग्निप्रवेशु नीच नवा ।
भातारेंवीण करावा । तो हा योगु

12.67

एथ स्वामीचें काज । ना वापिकें व्याज ।
परी मरणेंसीं झुंज । नीच नवें

12.68

ऐसें मृत्यूहूनि तीख । कां घोंटे कढत विख ।
डोंगर गिळितां मुख । न फाटे काई ?

12.69

म्हणौनि योगाचियां वाटा । जे निगाले गा सुभटा ।
तयां दुःखाचाचि शेलवांटा । भागा आला

12.70

पाहें पां लोहाचे चणे । जैं बोचरिया पडती खाणें ।
तैं पोट भरणें कीं प्राणें । शुद्धी म्हणों

12.71

म्हणौनि समुद्र बाहीं । तरणे आथि केंही ।
कां गगनामाजीं पाईं । खोलिजतु असें ?

12.72

वळघलिया रणाची थाटी । आंगीं न लागतां कांठी ।
सूर्याची पाउटी । कां होय गा

12.73

यालागीं पांगुळा हेवा । नव्हे वायूसि पांडवा ।
तेवीं देहवंता जीवां । अव्यक्तीं गति

12.74

ऐसाही जरी धिंवसा । बांधोनियां आकाशा ।
झोंबती तरी क्लेशा । पात्र होती

12.75

म्हणौनि येर ते पार्था । नेणतीचि हे व्यथा ।
जे कां भक्तिपंथा । वोटंगले

12.76

कर्मेंद्रियें सुखें । करिती कर्में अशेखें ।
जियें कां वर्णविशेखें । भागा आलीं

12.77

विधीतें पाळित । निषेधातें गाळित ।
मज देऊनि जाळित । कर्मफळें

12.78

ययापरी पाहीं । अर्जुना माझें ठाईं ।
संन्यासूनि नाहीं । करिती कर्में

12.79

आणीकही जे जे सर्व । कायिक वाचिक मानसिक भाव ।
तयां मीवांचूनि धांव । आनौती नाहीं

12.80

ऐसे जे मत्पर । उपासिती निरंतर ।
ध्यानमिषें घर । माझें झालें

12.81

जयांचिये आवडी । केली मजशीं कुळवाडी ।
भोग मोक्ष बापुडीं । त्यजिलीं कुळें

12.82

ऐसे अनन्ययोगें । विकले जीवें मनें आंगें ।
तयांचे कायि एक सांगें । जें सर्व मी करीं

12.83

किंबहुना धनुर्धरा । जो मातेचिया ये उदरा ।
तो मातेचा सोयरा । केतुला पां

12.84

तेवीं मी तयां । जैसे असती तैसियां ।
कळिकाळ नोकोनियां । घेतला पट्टा

12.85

एऱहवीं तरी माझियां भक्तां । आणि संसाराची चिंता ।
काय समर्थाची कांता । कोरान्न मागे

12.86

तैसे ते माझें । कलत्र हें जाणिजे ।
कायिसेनिही न लजें । तयांचेनि मी

12.87

जन्ममृत्यूचिया लाटीं । झळंबती इया सृष्टी ।
तें देखोनियां पोटीं । ऐसें जाहलें

12.88

भवसिंधूचेनि माजें । कवणासि धाकु नुपजे ।
तेथ जरी कीं माझे । बिहिती हन

12.89

म्हणौनि गा पांडवा । मूर्तीचा मेळावा ।
करूनि त्यांचिया गांवा । धांवतु आलों

12.90

नामाचिया सहस्रवरी । नावा इया अवधारीं ।
सजूनियां संसारीं । तारू जाहलों

12.91

सडे जे देखिले । ते ध्यानकासे लाविले ।
परीग्रहीं घातले । तरियावरी

12.92

प्रेमाची पेटी । बांधली एकाचिया पोटीं ।
मग आणिले तटीं । सायुज्याचिया

12.93

परी भक्तांचेनि नांवें । चतुष्पदादि आघवे ।
वैकुंठींचिये राणिवे । योग्य केले

12.94

म्हणौनि गा भक्तां । नाहीं एकही चिंता ।
तयांतें समुद्धर्ता । आथि मी सदा

12.95

आणि जेव्हांचि कां भक्तीं । दीधली आपुली चित्तवृत्ती ।
तेव्हांचि मज सूति । त्यांचिये नाटीं

12.96

याकारणें गा भक्तराया । हा मंत्र तुवां धनंजया ।
शिकिजे जे यया । मार्गा भजिजे

12.97

अगा मानस हें एक । माझ्या स्वरूपीं वृत्तिक ।
करूनि घालीं निष्टंक । बुद्धि निश्चयेंसीं

12.98

इयें दोनीं सरिसीं । मजमाजीं प्रेमेसीं ।
रिगालीं तरी पावसी । मातें तूं गा

12.99

जे मन बुद्धि इहीं । घर केलें माझ्यां ठायीं ।
तरी सांगें मग काइ । मी तू ऐसें उरे ?

12.100

म्हणौनि दीप पालवे । सवेंचि तेज मालवे ।
कां रविबिंबासवें । प्रकाशु जाय

12.101

उचललेया प्राणासरिसीं । इंद्रियेंही निगती जैसीं ।
तैसा मनोबुद्धिपाशीं । अहंकारु ये

12.102

म्हणौनि माझिया स्वरूपीं । मनबुद्धि इयें निक्षेपीं ।
येतुलेनि सर्वव्यापी । मीचि होसी

12.103

यया बोला कांहीं । अनारिसें नाहीं ।
आपली आण पाहीं । वाहतु असें गा

12.104

अथवा हें चित्त । मनबुद्धिसहित ।
माझ्यां हातीं अचुंबित । न शकसी देवों

12.105

तरी गा ऐसें करीं । यया आठां पाहारांमाझारीं ।
मोटकें निमिषभरी । देतु जाय

12.106

मग जें जें कां निमिख । देखेल माझें सुख ।
तेतुलें अरोचक । विषयीं घेईल

12.107

जैसा शरत्कालु रिगे । आणि सरिता वोहटूं लागे ।
तैसें चित्त काढेल वेगें । प्रपंचौनि

12.108

मग पुनवेहूनि जैसें । शशिबिंब दिसेंदिसें ।
हारपत अंवसे । नाहींचि होय

12.109

तैसें भोगाआंतूनि निगतां । चित्त मजमाजीं रिगतां ।
हळूहळू पंडुसुता । मीचि होईल

12.110

अगा अभ्यासयोगु म्हणिजे । तो हा एकु जाणिजे ।
येणें कांहीं न निपजे । ऐसें नाहीं

12.111

पैं अभ्यासाचेनि बळें । एकां गति अंतराळे ।
व्याघ्र सर्प प्रांजळे । केले एकीं

12.112

विष कीं आहारीं पडे । समुद्रीं पायवाट जोडे ।
एकीं वाग्ब्रह्म थोकडें । अभ्यासें केलें

12.113

म्हणौनि अभ्यासासी कांहीं । सर्वथा दुष्कर नाहीं ।
यालागी माझ्या ठायीं । अभ्यासें मीळ

12.114

कां अभ्यासाही लागीं । कसु नाहीं तुझिया अंगीं ।
तरी आहासी जया भागीं । तैसाचि आस

12.115

इंद्रियें न कोंडीं । भोगातें न तोडीं ।
अभिमानु न संडीं । स्वजातीचा

12.116

कुळधर्मु चाळीं । विधिनिषेध पाळीं ।
मग सुखें तुज सरळी । दिधली आहे

12.117

परी मनें वाचा देहें । जैसा जो व्यापारु होये ।
तो मी करीतु आहें । ऐसें न म्हणें

12.118

करणें कां न करणें । हें आघवें तोचि जाणे ।
विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि

12.119

उणयापुरेयाचें कांहीं । उरों नेदी आपुलिया ठायीं ।
स्वजाती करूनि घेईं । जीवित्व हें

12.120

माळियें जेउतें नेलें । तेउतें निवांतचि गेलें ।
तया पाणिया ऐसें केलें । होआवें गा

12.121

म्हणौनि प्रवृत्ति आणि निवृत्ती । इयें वोझीं नेघे मती ।
अखंड चित्तवृत्ती । माझ्या ठायीं

12.122

एऱहवीं तरी सुभटा । उजू कां अव्हाटां ।
रथु काई खटपटा । करितु असे ?

12.123

आणि जें जें कर्म निपजे । तें थोडें बहु न म्हणिजे ।
निवांतचि अर्पिजे । माझ्यां ठायीं

12.124

ऐसिया मद्भावना । तनुत्यागीं अर्जुना ।
तूं सायुज्य सदना । माझिया येसी

12.125

ना तरी हेंही तूज । नेदवे कर्म मज ।
तरी तूं गा बुझ । पंडुकुमरा

12.126

बुद्धीचिये पाठीं पोटीं । कर्माआदि कां शेवटीं ।
मातें बांधणें किरीटी । दुवाड जरी

12.127

तरी हेंही असो । सांडीं माझा अतिसो ।
परि संयतिसीं वसो । बुद्धि तुझी

12.128

आणि जेणें जेणें वेळें । घडती कर्में सकळें ।
तयांचीं तियें फळें । त्यजितु जाय

12.129

वृक्ष कां वेली । लोटती फळें आलीं ।
तैसीं सांडीं निपजलीं । कर्में सिद्धें

12.130

परि मातें मनीं धरावें । कां मजौद्देशें करावें ।
हें कांहीं नको आघवें । जाऊं दे शून्यीं

12.131

खडकीं जैसें वर्षलें । कां आगीमाजीं पेरिलें ।
कर्म मानी देखिलें । स्वप्न जैसें

12.132

अगा आत्मजेच्या विषीं । जीवु जैसा निरभिलाषी ।
तैसा कर्मीं अशेषीं । निष्कामु होईं

12.133

वन्हीची ज्वाळा जैसी । वायां जाय आकाशीं ।
क्रिया जिरों दे तैसी । शून्यामाजी

12.134

अर्जुना हा फलत्यागु । आवडे कीर असलगु ।
परी योगामाजीं योगु । धुरेचा हा

12.135

येणें फलत्यागें सांडे । तें तें कर्म न विरूढे ।
एकचि वेळे वेळुझाडें । वांझें जैसीं

12.136

तैसें येणेंचि शरीरें । शरीरा येणें सरे ।
किंबहुना येरझारे । चिरा पडे

12.137

पैं अभ्यासाचिया पाउटीं । ठाकिजे ज्ञान किरीटी ।
ज्ञानें येइजे भेटी । ध्यानाचिये

12.138

मग ध्यानासि खेंव । देती आघवेचि भाव ।
तेव्हां कर्मजात सर्व । दूरी ठाके

12.139

कर्म जेथ दुरावे । तेथ फलत्यागु संभवे ।
त्यागास्तव आंगवे । शांति सगळी

12.140

म्हणौनि यावया शांति । हाचि अनुक्रमु सुभद्रापती ।
म्हणौनि अभ्यासुचि प्रस्तुतीं । करणें एथ

12.141

अभ्यासाहूनि गहन । पार्था मग ज्ञान ।
ज्ञानापासोनि ध्यान । विशेषिजे

12.142

मग कर्मफलत्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।
त्यागाहूनि भोगु । शांतिसुखाचा

12.143

ऐसिया या वाटा । इहींचि पेणा सुभटा ।
शांतीचा माजिवटा । ठाकिला जेणें

12.144

जो सर्व भूतांच्या ठायीं । द्वेषांतें नेणेंचि कहीं ।
आपपरु नाहीं । चैतन्या जैसा

12.145

उत्तमातें धरिजे । अधमातें अव्हेरिजे ।
हें काहींचि नेणिजे । वसुधा जेवीं

12.146

कां रायाचें देह चाळूं । रंकातें परौतें गाळूं ।
हें न म्ह्णेचि कृपाळू । प्राणु पैं गा

12.147

गाईची तृषा हरूं । कां व्याघ्रा विष होऊनि मारूं ।
ऐसें नेणेंचि गा करूं । तोय जैसें

12.148

तैसी आघवियांचि भूतमात्रीं । एकपणें जया मैत्री ।
कृपेशीं धात्री । आपणचि जो

12.149

आणि मी हे भाष नेणें । माझें काहींचि न म्हणे ।
सुख दुःख जाणणें । नाहीं जया

12.150

तेवींचि क्षमेलागीं । पृथ्वीसि पवाडु आंगीं ।
संतोषा उत्संगीं । दिधलें घर

12.151

वार्षियेवीण सागरू । जैसा जळें नित्य निर्भरु ।
तैसा निरुपचारु । संतोषी जो

12.152

वाहूनि आपुली आण । धरी जो अंतःकरण ।
निश्चया साचपण । जयाचेनि

12.153

जीवु परमात्मा दोन्ही । बैसऊनि ऐक्यासनीं ।
जयाचिया हृदयभुवनीं । विराजती

12.154

ऐसा योगसमृद्धि । होऊनि जो निरवधि ।
अर्पी मनोबुद्धी । माझ्या ठायीं

12.155

आंतु बाहेरि योगु । निर्वाळलेयाहि चांगु ।
तरी माझा अनुरागु । सप्रेम जया

12.156

अर्जुना गा तो भक्तु । तोचि योगी तोचि मुक्तु ।
तो वल्लभा मी कांतु । ऐसा पढिये

12.157

हें ना तो आवडे । मज जीवाचेनि पाडें ।
हेंही एथ थोकडें । रूप करणें

12.158

तरी पढियंतयाची काहाणी । हे भुलीची भारणी ।
इयें तंव न बोलणीं । परी बोलवी श्रद्धा

12.159

म्हणौनि गा आम्हां । वेगां आली उपमा ।
एऱहवीं काय प्रेमा । अनुवादु असे ?

12.160

आतां असो हें किरीटी । पैं प्रियाचिया गोष्टी ।
दुणा थांव उठी । आवडी गा

12.161

तयाही वरी विपायें । प्रेमळु संवादिया होये ।
तिये गोडीसी आहे । कांटाळें मग ?

12.162

म्हणौनि गा पंडुसुता । तूंचि प्रियु आणि तूंचि श्रोता ।
वरी प्रियाची वार्ता । प्रसंगें आली

12.163

तरी आतां बोलों । भलें या सुखा मीनलों ।
ऐसें म्हणतखेंवीं डोलों । लागला देवो

12.164

मग म्हणे जाण । तया भक्तांचे लक्षण ।
जया मी अंतःकरण । बैसों घालीं

12.165

तरी सिंधूचेनि माजें । जळचरां भय नुपजे ।
आणि जळचरीं नुबगिजे । समुद्रु जैसा

12.166

तेवीं उन्मत्तें जगें । जयासि खंती न लगे ।
आणि जयाचेनि आंगें । न शिणे लोकु

12.167

किंबहुना पांडवा । शरीर जैसें अवयवां ।
तैसा नुबगे जीवां । जीवपणें जो

12.168

जगचि देह जाहलें । म्हणौनि प्रियाप्रिय गेलें ।
हर्षामर्ष ठेले । दुजेनविण

12.169

ऐसा द्वंद्वनिर्मुक्तु । भयोद्वेगरहितु ।
याहीवरी भक्तु । माझ्यां ठायीं

12.170

तरी तयाचा गा मज मोहो । काय सांगों तो पढियावो ।
हें असे जीवें जीवो । माझेनि तो

12.171

जो निजानंदें धाला । परिणामु आयुष्या आला ।
पूर्णते जाहला । वल्लभु जो

12.172

जयाचिया ठायीं पांडवा । अपेक्षे नाहीं रिगावा ।
सुखासि चढावा । जयाचें असणें

12.173

मोक्ष देऊनि उदार । काशी होय कीर ।
परी वेचावें लागें शरीर । तिये गांवीं

12.174

हिमवंतु दोष खाये । परी जीविताची हानि होये ।
तैसें शुचित्व नोहे । सज्जनाचें

12.175

शुचित्वें शुचि गांग होये । आणि पापतापही जाये ।
परी तेथें आहे । बुडणें एक

12.176

खोलिये पारु नेणिजे । तरी भक्तीं न बुडिजे ।
रोकडाचि लाहिजे । न मरतां मोक्षु

12.177

संताचेनि अंगलगें । पापातें जिणणें गंगे ।
तेणें संतसंगें । शुचित्व कैसें

12.178

म्हणौनि असो जो ऐसा । शुचित्वें तीर्थां कुवासा ।
जेणें उल्लंघविलें दिशा । मनोमळ

12.179

आंतु बाहेरी चोखाळु । सूर्य जैसा निर्मळु ।
आणि तत्त्वार्थींचा पायाळु । देखणा जो

12.180

व्यापक आणि उदास । जैसें कां आकाश ।
तैसें जयाचें मानस । सर्वत्र गा

12.181

संसारव्यथे फिटला । जो नैराश्यें विनटला ।
व्याधाहातोनि सुटला । विहंगु जैसा

12.182

तैसा सतत जो सुखें । कोणीही टवंच न देखे ।
नेणिजे गतायुषें । लज्जा जेवीं

12.183

आणि कर्मारंभालागीं । जया अहंकृती नाही आंगीं ।
जैसें निरिंधन आगी । विझोनि जाय

12.184

तैसा उपशमुचि भागा । जयासि आला पैं गा ।
जो मोक्षाचिया आंगा । लिहिला असे

12.185

अर्जुना हा ठावोवरी । जो सोऽहंभावो सरोभरीं ।
द्वैताच्या पैलतीरीं । निगों सरला

12.186

कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं ।
वांटूनियां आंगीं । सेवकै बाणी

12.187

येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी ।
न भजतया दावी । योगिया जो

12.188

तयाचे आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान ।
किंबहुना समाधान । तो मिळे तैं

12.189

तयालागीं मज रूपा येणें । तयाचेनि मज येथें असणें ।
तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये

12.190

जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे ।
म्हणौनि भोगविशेखें । हरिखेजेना

12.191

आपणचि विश्व जाहला । तरी भेदभावो सहजचि गेला ।
म्हणौनि द्वेषु ठेला । जया पुरुषा

12.192

पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतींहीं न वचे ।
हें जाणोनि गताचें । न शोची जो

12.193

आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुल्या ठायीं ।
जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना

12.194

वोखटें कां गोमटें । हें काहींचि तया नुमटे ।
रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं

12.195

ऐसा बोधुचि केवळु । जो होवोनि असे निखळु ।
त्याहीवरी भजनशीळु । माझ्या ठायीं

12.196

तरी तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें ।
नाहीं गा साचोकारें । तुझी आण

12.197

पार्था जयाचिया ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं ।
रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु

12.198

कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा ।
हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा

12.199

जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली ।
दोघां एकचि साउली । वृक्षु दे जैसा

12.200

नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु ।
गाळितया कडु । नोहेंचि जेवीं

12.201

अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा ।
मानापमानीं सरिसा । होतु जाये

12.202

तिहीं ऋतूं समान । जैसें कां गगन ।
तैसा एकचि मान । शीतोष्णीं जया

12.203

दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पंडुसुता ।
तैसा सुखदुःखप्राप्तां । मध्यस्थु जो

12.204

माधुर्यें चंद्रिका । सरिसी राया रंका ।
तैसा जो सकळिकां । भूतां समु

12.205

आघवियां जगा एक । सेव्य जैसें उदक ।
तैसें जयातें तिन्ही लोक । आकांक्षिती

12.206

जो सबाह्यसंग । सांडोनिया लाग ।
एकाकीं असे आंग । आंगीं सूनी

12.207

जो निंदेतें नेघे । स्तुति न श्लाघे ।
आकाशा न लगे । लेपु जैसा

12.208

तैसें निंदे आणि स्तुति । मानु करूनि एके पांती ।
विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं

12.209

साच लटिकें दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी ।
जो भोगितां उन्मनी । आरायेना

12.210

जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे ।
पाउसेवीण न सुके । समुद्रु जैसा

12.211

आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं ।
तैसा न धरीच कहीं । आश्रयो जो

12.212

आघवाची आकाशस्थिति । जेवीं वायूसि नित्य वसती ।
तेवीं जगचि विश्रांती- । स्थान जया

12.213

हें विश्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला

12.214

मग याहीवरी पार्था । माझ्या भजनीं आस्था ।
तरी तयातें मी माथां । मुकुट करीं

12.215

उत्तमासि मस्तक । खालविजे हें काय कौतुक ।
परी मानु करिती तिन्ही लोक । पायवणियां

12.216

तरी श्रद्धावस्तूसी आदरु । करितां जाणिजे प्रकारु ।
जरी होय श्रीगुरु । सदाशिवु

12.217

परी हे असो आतां । महेशातें वानितां ।
आत्मस्तुति होतां । संचारु असे

12.218

ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाहें ।
अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें

12.219

जे पुरुषार्थसिद्धि चौथी । घेऊनि आपुलिया हातीं ।
रिगाला भक्तिपंथीं । जगा देतु

12.220

कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी ।
कीं जळाचिये परी । तळवटु घे

12.221

म्हणौनि गा नमस्कारूं । तयातें आम्ही माथां मुगुट करूं ।
तयाची टांच धरूं । हृदयीं आम्हीं

12.222

तयाचिया गुणांचीं लेणीं । लेववूं अपुलिये वाणी ।
तयाची कीर्ति श्रवणीं । आम्हीं लेवूं

12.223

तो पहावा हे डोहळे । म्हणौनि अचक्षूसी मज डोळे ।
हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें

12.224

दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि ।
आलिंगावयालागुनी । तयाचें आंग

12.225

तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे ।
किंबहुना आवडे । निरुपमु

12.226

तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ? ।
परी तयाचें चरित्र । ऐकती जे

12.227

तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।
जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती

12.228

जो हा अर्जुना साद्यंत । सांगितला प्रस्तुत ।
भक्तियोगु समस्त- । योगरूप

12.229

तया मी प्रीति करी । कां मनीं शिरसा धरीं ।
येवढी थोरी । जया स्थितीये

12.230

ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य ।
करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे

12.231

तेसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचे ठायीं विस्तरे ।
जीवीं जयां थारे । जे अनुष्ठिती

12.232

परी निरूपली जैसी । तैसीच स्थिति मानसीं ।
मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली

12.233

परी मातें परम करूनि । इयें अर्थीं प्रेम धरूनि ।
हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं

12.234

पार्था गा जगीं । तेचि भक्त तेचि योगी ।
उत्कंठा तयांलागीं । अखंड मज

12.235

तें तीर्थ तें क्षेत्र । जगीं तेंचि पवित्र ।
भक्ति कथेसि मैत्र । जयां पुरुषां

12.236

आम्हीं तयांचें करूं ध्यान । ते आमुचें देवतार्चन ।
ते वांचूनि आन । गोमटें नाहीं

12.237

तयांचें आम्हां व्यसन । ते आमुचें निधिनिधान ।
किंबहुना समाधान । ते मिळती तैं

12.238

पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पंडुसुता ।
ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही

12.239

ऐसे निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें ।
बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे

12.240

राया जो निर्मळु । निष्कलंक लोककृपाळु ।
शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो

12.241

पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु ।
प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा

12.242

जो धर्मकीर्तिधवलु । आगाध दातृत्वें सरळु ।
अतुळबळें प्रबळु । बळिबंधनु

12.243

जो भक्तजनवत्सळु । प्रेमळजन प्रांजळु ।
सत्यसेतु सकळु । कलानिधी

12.244

तो श्रीकृष्ण वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा ।
सांगे येरु दैवाचा । आइकतु असे

12.245

आतां ययावरी । निरूपिती परी ।
संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें

12.246

तेचि रसाळ कथा । मऱहाठिया प्रतिपथा ।
आणिजेल आतां । आवधारिजो

12.247

ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही ।
हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं

मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0

Esc