भाषा

ENहिગુ
ग्रंथ पाठ

ज्ञानेश्वरी · अध्याय 11

11.1

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥
॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥
। अथ एकादशोऽध्यायः - अध्याय अकरावा । ।
। विश्वरूपदर्शनयोगः ।
आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोहीं रसीं ।
येथ पार्था विश्वरूपेंसीं । होईल भेटी

11.2

जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा ।
आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु

11.3

अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं ।
तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरविले रस

11.4

परी शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें ।
जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा

11.5

ना तरी अंवसेच्या दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैशीं ।
तेवीं एकवळा रसीं । केला एथ

11.6

मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग ।
म्हणौनि सुस्नात होत जग । आघवें एथ

11.7

माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त ।
यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा

11.8

एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थीं रिघतां सोपारें ।
ज्ञानदेवो म्हणे दातारें । माझेनि केलें

11.9

तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मऱहाठियां शब्दसोपानें ।
रचिली धर्मनिधानें । श्रिइनिवृत्तिदेवें

11.10

म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्वरूप पहावें ।
येतुलेनि संसारासि द्यावें । तिळोदक

11.11

हें असो ऐसें सावयव । एथ सासिन्नले आथी रसभाव ।
तेथ श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा

11.12

जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे ।
हें अल्पचि परी उघडें । कैवल्य एथ

11.13

तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो ।
परी अर्जुन सदैवांचा रावो । जो एथही पातला

11.14

एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला ।
जे गीतार्थु हा आला । मऱहाठिये

11.15

याचिलागीं माझें । विनविलें आइकिजे ।
तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्ही

11.16

तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करूं न लभे ।
परी मानावें जी तुम्ही लोभें । अपत्या मज

11.17

अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे ।
कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय

11.18

तेवीं मी जें जें बोलें । तें प्रभु तुमचेंचि शिकविलें ।
म्हणौनि अवधारिजो आपुलें । आपण देवा

11.19

हें सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।
तरी आतां अवधानामृतें वाड । सिंपोनि कीजे

11.20

मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।
तुमचेनि धर्में होईल । सुरवाडु जगा

11.21

या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें ।
आतां सांगैं जें बोलिलें । अर्जुनें तेथ

11.22

तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें ।
मी प्राकृत काय सांगों जाणें । परी सांगवा तुम्ही

11.23

अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविले लंकेश्वरा ।
एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ?

11.24

म्हणौनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं ।
तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें

11.25

आतां बोलिजतसें आइका । हा गीताभाव निका ।
जो वैकुंठनायका- । मुखौनि निघाला

11.26

बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदीं प्रतिपाद्य देवता ।
तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं

11.27

तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें श्रीशंभूचिये मती नागवे ।
तें आतां नमस्कारिजे जीवेंभावें । हेंचि भलें

11.28

मग आइका तो किरीटी । घालूनि विश्वरूपीं दिठी ।
पहिली कैसी गोठी । करिता जाहला

11.29

हें सर्वही सर्वेश्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु ।
तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनांसी

11.30

हे जिवाआंतुली चाड । परी देवासि सांगतां सांकड ।
कां जें विश्वरूप गूढ । कैसेनि पुसावें ?

11.31

म्हणे मागां कवणीं कहीं । जें पढियंतेनें पुसिलें नाहीं ।
ते सहसा कैसें काई । सांगा म्हणों ?

11.32

मी जरी सलगीचा चांगु । तरी काय आइसीहूनी अंतरंगु ।
परी तेही हा प्रसंगु । बिहाली पुसों

11.33

माझी आवडे तैसी सेवा जाहली । तरी काय होईल गरुडाचिया येतुली ? ।
परी तोही हें बोली । करीचिना

11.34

मी काय सनकादिकांहूनि जवळां । परी तयांही नागवेचि हा चाळा ।
मी आवडेन काय प्रेमळां । गोकुळींचिया ऐसा ?

11.35

तयांतेंही लेकुरपणें झकविलें । एकाचे गर्भवासही साहिले ।
परी विश्वरूप हें राहविलें । न दावीच कवणा

11.36

हा ठायवरी गुज । याचिये अंतरीचें हें निज ।
केवीं उराउरी मज । पुसों ये पां ?

11.37

आणि न पुसेंचि जरी म्हणे । तरी विश्वरूप देखिलियाविणें ।
सुख नोहेचि परी जिणें । तेंही विपायें

11.38

म्हणौनि आतां पुसों अळुमाळसें । मग करूं देवा आवडे तैसें ।
येणें प्रवर्तला साध्वसें । पार्थु बोलों

11.39

परी तेंचि ऐसेनि भावें । जें एका दों उत्तरांसवें ।
दावी विश्वरूप आघवें । झाडा देउनी

11.40

अहो वांसरूं देखिलियाचिसाठीं । धेनु खडबडोनि मोहें उठी ।
मग स्तनामुखाचिये भेटी । काय पान्हा धरे ?

11.41

पाहा पां तया पांडवाचेनि नांवें । जो कृष्ण रानींही प्रतिपाळूं धावे ।
तयांतें अर्जुनें जंव पुसावें । तंव साहील काई ?

11.42

तो सहजेंचि स्नेहाचें अवतरण । आणि येरु स्नेहा घातलें आहे माजवण ।
ऐसिये मिळवणी वेगळेपण । उरे हेंचि बहु

11.43

म्हणौनि अर्जुनाचिया बोलासरिसा । देव विश्वरूप होईल आपैसा ।
तोचि पहिला प्रसंगु ऐसा । ऐकिजे तरी

11.44

मग पार्थु देवातें म्हणे । जी तुम्ही मजकारणें ।
वाच्य केलें जें न बोलणें । कृपानिधे

11.45

जैं महाभूतें ब्रह्मीं आटती । जीव महदादींचे ठाव फिटती ।
तैं जें देव होऊनि ठाकती । तें विसवणें शेषींचें

11.46

होतें हृदयाचिये परिवरीं । रोंविलें कृपणाचिये परी ।
शब्दब्रह्मासही चोरी । जयाची केली

11.47

तें तुम्हीं आजि आपुलें । मजपुढां हियें फोडिलें ।
जया अध्यात्मा वोवाळिलें । ऐश्वर्य हरें

11.48

ते वस्तु मज स्वामी । एकिहेळां दिधली तुम्ही ।
हें बोलों तरी आम्ही । तुज पावोनि कैंचे

11.49

परी साचचि महामोहाचिये पुरीं । बुडालेया देखोनि सीसवरी ।
तुवां आपणपें घालोनि श्रीहरी । मग काढिलें मातें

11.50

एक तूंवांचूनि कांहीं । विश्वीं दुजियाची भाष नाहीं ।
कीं आमुचें कर्म पाहीं । जे आम्हीं आथी म्हणों

11.51

मी जगीं एक अर्जुनु । ऐसा देहीं वाहे अभिमानु ।
आणि कौरवांतें इयां स्वजनु । आपुलें म्हणें

11.52

याहीवरी यांतें मी मारीन । म्हणें तेणें पापें कें रिगेन ।
ऐसें देखत होतों दुःस्वप्न । तों चेवविला प्रभु

11.53

देवा गंधर्वनगरीची वस्ती । सोडूनि निघालों लक्ष्मीपती ।
होतों उदकाचिया आर्ती । रोहिणी पीत

11.54

जी किरडूं तरी कापडाचें । परी लहरी येत होतिया साचें ।
ऐसें वायां मरतया जीवाचें । श्रेय तुवां घेतलें

11.55

आपुलें प्रतिबिंब नेणता । सिंह कुहां घालील देखोनि आतां ।
ऐसा धरिजे तेवीं अनंता । राखिलें मातें

11.56

एऱहवीं माझा तरी येतुलेवरी । एथ निश्चय होता अवधारीं ।
जें आतांचि सातांही सागरीं । एकत्र मिळिजे

11.57

हें जगचि आघवें बुडावें । वरी आकाशहि तुटोनि पडावें ।
परी झुंजणें न घडावें । गोत्रजेशीं मज

11.58

ऐसिया अहंकाराचिये वाढी । मियां आग्रहजळीं दिधली होती बुडी ।
चांगचि तूं जवळां एऱहवीं काढी । कवणु मातें

11.59

नाथिलें आपण पां एक मानिलें । आणि नव्हतया नाम गोत्र ठेविलें ।
थोर पिसें होतें लागलें । परि राखिलें तुम्ही

11.60

मागां जळत काढिलें जोहरीं । तैं तें देहासीच भय अवधारीं ।
आतां हे जोहरवाहर दुसरी । चैतन्यासकट

11.61

दुराग्रह हिरण्याक्षें । माझी बुद्धि वसुंधरा सूदली काखे ।
मग माहार्णव गवाक्षें । रिघोनि ठेला

11.62

तेथ तुझेनि गोसावीपणें । एकवेळ बुद्धीचिया ठाया येणें ।
हें दुसरें वराह होणें । पडिलें तुज

11.63

ऐसें अपार तुझें केलें । एकी वाचा काय मी बोलें ।
परी पांचही पालव मोकलिले । मजप्रती

11.64

तें कांहीं न वचेचि वायां । भलें यश फावलें देवराया ।
जे साद्यंत माया । निरसिली माझी

11.65

आजीं आनंदसरोवरींचीं कमळें । तैसे हे तुझे डोळे ।
आपुलिया प्रसादाचीं राउळें । जयालागीं करिती

11.66

हां हो तयाही आणि मोहाची भेटी । हे कायसी पाबळी गोठी ? ।
केउती मृगजळाची वृष्टी । वडवानळेंसीं ?

11.67

आणि मी तंव दातारा । ये कृपेचिये रिघोनि गाभारां ।
घेत आहें चारा । ब्रह्मरसाचा

11.68

तेणें माझा जी मोह जाये । एथ विस्मो कांहीं आहे ? ।
तरी उद्धरलों कीं तुझे पाये । शिवतले आहाती

11.69

पैं कमलायतडोळसा । सूर्यकोटितेजसा ।
मियां तुजपासोनि महेशा । परिसिलें आजीं

11.70

इयें भूतें जयापरी होती । अथवा लया हन जैसेनि जाती ।
ते मजपुढां प्रकृती । विवंचिली देवें

11.71

आणि प्रकृती कीर उगाणा दिधला । वरि पुरुषाचाही ठावो दाविला ।
जयाचा महिमा पांघरोनि जाहला । धडौता वेदु

11.72

जी शब्दराशी वाढे जिये । कां धर्माशिया रत्नांतें विये ।
ते एथिंचे प्रभेचे पाये । वोळगे म्हणौनि

11.73

ऐसें अगाध माहात्म्य । जें सकळमार्गैकगम्य ।
जें स्वात्मानुभवरम्य । तें इयापरी दाविलें

11.74

जैसा केरु फिटलिया आभाळीं । दिठी रिगे सूर्यमंडळीं ।
कां हातें सारूनि बाबुळीं । जळ देखिजे

11.75

नातरी उकलतया सापाचे वेढे । जैसें चंदना खेंव देणें घडे ।
अथवा विवसी पळे मग चढे । निधान हातां

11.76

तैसी प्रकृती हे आड होती । ते देवेंचि सारोनि परौती ।
मग परतत्त्व माझिये मती । शेजार केलें

11.77

म्हणौनि इयेविषयींचा मज देवा । भरंवसा कीर जाहला जीवा ।
परी आणीक एक हेवा । उपनला असे

11.78

तो भिडां जरी म्हणों राहों । तरी आना कवणा पुसों जावों ।
काय तुजवांचोनि ठावो । जाणत आहों आम्ही ?

11.79

जळचरु जळाचा आभारु धरी । बाळक स्तनपानीं उपरोधु करी ।
तरी तया जिणया श्रीहरी । आन उपायो असे ?

11.80

म्हणौनि भीड सांकडी न धरवे । जीवा आवडे तेंही तुजपुढां बोलावें ।
तंव राहें म्हणितलें देवें । चाड सांगैं

11.81

मग बोलिला तो किरीटी । म्हणे तुम्हीं केली जे गोठी ।
तिया प्रतीतीची दिठी । निवाली माझी

11.82

आतां जयाचेनि संकल्पें । हे लोकपरंपरा होय हारपे ।
जया ठायातें आपणपें । मी ऐसें म्हणसी

11.83

तें मुद्दल रूप तुझें । जेथूनि इयें द्विभुजें हन चतुर्भुजें ।
सुरकार्याचेनि व्याजें । घेवों घेवों येसी

11.84

पैं जळशयनाचिया अवगणिया । कां मत्स्य कूर्म इया मिरवणिया ।
खेळु सरलिया तूं गुणिया । सांठविसी जेथ

11.85

उपनिषदें जें गाती । योगिये हृदयीं रिगोनि पाहाती ।
जयातें सनकादिक आहाती । पोटाळुनियां

11.86

ऐसें अगाध जें तुझें । विश्वरूप कानीं ऐकिजे ।
तें देखावया चित्त माझें । उतावीळ देवा

11.87

देवें फेडूनियां सांकड । लोभें पुसिली जरी चाड ।
तरी हेंचि एकीं वाड । आर्तीं जी मज

11.88

तुझें विश्वरूपपण आघवें । माझिये दिठीसि गोचर होआवें ।
ऐसी थोर आस जीवें । बांधोनि आहें

11.89

परी आणीक एक एथ शारङ्गी । तुज विश्वरूपातें देखावयालागीं ।
पैं योग्यता माझिया आंगीं । असे कीं नाहीं

11.90

हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे ।
तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ?

11.91

आणि जी आर्तीचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे ।
जैसा तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज

11.92

ऐशा सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली ।
यालागीं योग्यता जेवीं माउली । बालकाची जाणे

11.93

तयापरी श्रीजनार्दना । विचारिजो माझी संभावना ।
मग विश्वरूपदर्शना । उपक्रम कीजे

11.94

तरी ऐसी ते कृपा करा । एऱहवीं नव्हे हें म्हणा अवधारा ।
वायां पंचमालापें बधिरा । सुख केउतें देणें ?

11.95

एऱहवीं येकले बापियाचे तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे ? ।
परी जहालीही वृष्टि उपखे । जऱही खडकीं होय

11.96

चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण वाहूनि काय वारिलें ? ।
परी डोळ्यांवीण पाहलें । वायां जाय

11.97

म्हणौनि विश्वरूप तूं सहसा । दाविसी कीर हा भरवंसा ।
कां जे कडाडां आणि गहिंसा- । माजी नीत्य नवा तूं कीं

11.98

तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देतां न म्हणसी पात्रापात्र ।
पैं कैवल्या ऐसें पवित्र । जें वैरियांही दिधलें

11.99

मोक्षु दुराराध्यु कीर होय । परी तोही आराधी तुझे पाय ।
म्हणौनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा

11.100

तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु दिधला पूतने ।
जे विषाचेनि स्तनपानें । मारूं आली

11.101

हां गा राजसूय यागाचिया सभासदीं । देखतां त्रिभुवनाची मांदी ।
कैसा शतधा दुर्वाक्य शब्दीं । निस्तेजिलासी

11.102

ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपें ठावो दिधला गोपाळा ।
आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदीं चाड ?

11.103

तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचिया उत्संगीं ।
कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्लाघ्यु केला

11.104

ऐसा वनवासिया सकळां । देतां एकचि तूं धसाळा ।
पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी

11.105

जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा ।
अझुनी वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना

11.106

ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परी उदारु ।
दान म्हणौनि दारवंठेकरु । जाहलासी बळीचा

11.107

तूंतें आराधी ना आयकें । होती पुंसा बोलावित कौतुकें ।
तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला

11.108

ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । आपणपें देवों लागसी वानिवसें ।
तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी

11.109

हां गा दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें ।
तिये कामधेनूचे पाडे । काय भुकेले ठाती ?

11.110

म्हणौनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं ।
परी देखावयालागीं देईं । पात्रता मज

11.111

तुझें विश्वरूप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे ।
तरी आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा

11.112

ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करूं सरला सुभद्रापती ।
तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना

11.113

तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु ।
नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु

11.114

नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे ।
तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लसितु जाहला

11.115

मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें ।
पार्था देख देख अमुपें । स्वरूपें माझीं

11.116

एक विश्वरूप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें ।
कीं विश्वरूपमय आघवें । करूनि घातलें

11.117

बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु ।
असे सहस्रवरी देतु । सर्वस्व आपुलें

11.118

अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले ।
लक्ष्मीयेही राहविलें । जिव्हार जें

11.119

तें आतां प्रकटुनी अनेकधा । करीत विश्वरूपदर्शनाचा धांदा ।
बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया

11.120

जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये ।
तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला

11.121

ते सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली ।
किंबहुना उघडिली । योगऋद्धी

11.122

परी हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं ।
एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर

11.123

अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरी काय दाविलें ।
आतां देखें आघवें भरिलें । माझ्याचि रूपीं

11.124

एकें कृशें एकें स्थूळें । एकें ऱहस्वें एकें विशाळें ।
पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें

11.125

एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें एकें निश्चळें ।
उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें

11.126

एके घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें ।
एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें

11.127

एकें शांतें सन्मदें । स्तब्धें एकें सानंदें ।
गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें

11.128

एकें साभिलाषें विरक्तें । उन्निद्रितें एकें निद्रितें ।
परितुष्टें एकें आर्तें । प्रसन्नें एकें

11.129

एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें ।
भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें

11.130

एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें ।
एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें

11.131

एवं नानाविधें परी बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें ।
तेवींचि एकका ऐसें । वर्णेंही नव्हे

11.132

एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें ।
एकें सर्वांगीं जैसें सेंदुरें । डवरलें नभ

11.133

एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं ।
एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें

11.134

एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें ।
एकें अंजनवर्णें सकाळें । रक्तवर्णें एकें

11.135

एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं ।
एकें चांपेगौरीं केवळीं । हरितें एकें

11.136

एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्वेतचंद्र चोखडीं ।
ऐसीं नानावर्णें रूपडीं । देखें माझीं

11.137

हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण ।
लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसीं सुंदरें एकें

11.138

एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपु मनोहरें ।
शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिली जैसीं

11.139

एकें पीनावयवमांसाळें । एकें शुष्कें अति विक्राळें ।
एकें दीर्घकंठें विताळें । विकटें एकें

11.140

एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती ।
ययांच्या एकेकीं अंगप्रांतीं । देख पां जग

11.141

जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी ।
पुढती निमीलनीं मिठीं । देत आहाती

11.142

वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें ।
जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचा

11.143

आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहतीं एकवट ।
तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें

11.144

पैं सौम्यतेचा बोलावा । मिती नेणिजे अश्विनौदेवां ।
श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु

11.145

यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें ।
ऐसीं अपारें आणि विशाळें । रूपें इयें पाहीं

11.146

जयांतें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोकडें ।
धातयाही परी न सांपडे । ठाव जयांचा

11.147

जयांतें देवत्रयी कधीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें ।
भोगीं आश्चर्याची कवतिकें । महासिद्धी

11.148

इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी ।
सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे

11.149

चंडवाताचेनि प्रकाशें । उडत परमाणु दिसती जैसे ।
भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं

11.150

एथ एकैकाचिया प्रदेशीं । विश्व देख विस्तारेंशी ।
आणि विश्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते

11.151

तरी इयेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं ।
सुखें आवडे तें माझिया देहीं । देखसी तूं

11.152

ऐसें विश्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें ।
तंव देखत आहे कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु

11.153

एथ कां पां हा उगला ? । म्हणौनि श्रीकृष्णें जंव पाहिला ।
तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे

11.154

मग म्हणें उत्कंठे वोहट न पडे । अझुनी सुखाची सोय न सांपडे ।
परी दाविलें तें फुडें । नाकळेचि यया

11.155

हे बोलोनि देवो हांसिले । हांसोनि देखणियातें म्हणितलें ।
आम्हीं विश्वरूप तरी दाविलें । परी न देखसीच तूं

11.156

यया बोला येरें विचक्षणें । म्हणितलें हां जी कवणासी तें उणें ? ।
तुम्ही बकाकरवीं चांदिणें । चरऊं पहा मा

11.157

हां हो उटोनियां आरिसा । आंधळिया दाऊं बैसा ।
बहिरियापुढें हृषीकेशा । गाणीव करा

11.158

मकरंदकणाचा चारा । जाणतां घालूनि दर्दुरा ।
वायां धाडा शारङ्गधरा । कोपा कवणा

11.159

जें अतींद्रिय म्हणौनि व्यवस्थिलें । केवळ ज्ञानदृष्टीचिया भागा फिटलें ।
तें तुम्हीं चर्मचक्षूंपुढें सूदलें । मी कैसेनि देखें

11.160

परी हें तुमचें उणें न बोलावें । मीचि साहें तेंचि बरवें ।
एथ आथि म्हणितलें देवें । मानूं बापा

11.161

साच विश्वरूप जरी आम्ही दावावें । तरी आधीं देखावया सामर्थ्य कीं द्यावें ।
परी बोलत बोलत प्रेमभावें । धसाळ गेलों

11.162

काय जाहलें न वाहतां भुई पेरिजे । तरी तो वेलु विलया जाइजे ।
तरी आतां माझें निजरूप देखिजे । तें दृष्टी देवों तुज

11.163

मग तिया दृष्टी पांडवा । आमुचा ऐश्वर्ययोगु आघवा ।
देखोनियां अनुभवा । माजिवडा करीं

11.164

ऐसें तेणें वेदांतवेद्यें । सकळ लोक आद्यें ।
बोलिलें आराध्यें । जगाचेनि

11.165

पैं कौरवकुलचक्रवर्ती । मज हाचि विस्मयो पुढतपुढती ।
जे श्रियेहूनि त्रिजगतीं । सदैव असे कवणी ?

11.166

ना तरी खुणेचें वानावयालागीं । श्रुतीवांचूनि दावा पां जगीं ।
ना सेवकपण तरी आंगीं । शेषाच्याचि आथी

11.167

हां हो जयाचेनि सोसें । शिणत आठही पहार योगी जैसे ।
अनुसरलें गरुडासें । कवण आहे ?

11.168

परी तें आघवेंचि एकीकडे ठेलें । सापें कृष्णसुख एकंदरें जाहलें ।
जिये दिवूनि जन्मले । पांडव हे

11.169

परी पांचांही आंतु अर्जुना । श्रीकृष्ण सावियाचि जाहला अधीना ।
कामुक कां जैसा अंगना । आपैता कीजे

11.170

पढविलें पाखरूं ऐसें न बोले । यापरी क्रीडामृगही तैसा न चले ।
कैसें दैव एथें सुरवाडलें । तें जाणों न ये

11.171

आजि हें परब्रह्म सगळें । भोगावया सदैव याचेचि डोळे ।
कैसे वाचेनि हन लळे । पाळीत असे

11.172

हा कोपे कीं निवांतु साहे । हा रुसे तरी बुझावीत जाये ।
नवल पिसें लागलें आहे । पार्थाचें देवा

11.173

एऱहवीं विषय जिणोनि जन्मले । जे शुकादिक दादुले ।
ते विषयोचि वानितां जाहले । भाट ययाचें

11.174

हा योगियांचें समाधिधन । कीं होऊनि ठेले पार्थाआधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया

11.175

तेवींचि संजय म्हणे कायसा । विस्मयो एथें कौरवेशा ।
श्रीकृष्णें स्वीकारिजे तया ऐसा । भाग्योदय होय

11.176

म्हणौनि तो देवांचा रावो । म्हणे पार्थाते तुज दृष्टि देवों ।
जया विश्वरूपाचा ठावो । देखसी तूं

11.177

ऐसी श्रीमुखौनि अक्षरें । निघती ना जंव एकसरें ।
तंव अविद्येचे आंधारें । जावोंचि लागे

11.178

तीं अक्षरें नव्हती देखा । ब्रह्मसाम्राज्यदीपिका ।
अर्जुनालागीं चित्कळिका । उजळलिया श्रीकृष्णें

11.179

मग दिव्यचक्षुप्रकाशु प्रगटला । तया ज्ञानदृष्टी फांटा फुटला ।
ययापरी दाविता जाहला । ऐश्वर्य आपुलें

11.180

हे अवतार जे सकळ । ते जिये समुद्रींचे कां कल्लोळ ।
विश्व हें मृगजळ । जया रश्मीस्तव दिसे

11.181

जिये अनादिभूमिके निटे । चराचर हें चित्र उमटे ।
आपणपें श्रीवैकुंठें । दाविलें तया

11.182

मागां बाळपणीं येणें श्रीपती । जैं एक वेळ खादली होती माती ।
तैं कोपोनियां हातीं । यशोदां धरिला

11.183

मग भेणें भेणें जैसें । मुखीं झाडा द्यावयाचेनि मिसें ।
चवदाही भुवनें सावकाशें । दाविलीं तिये

11.184

ना तरी मधुवनीं ध्रुवासि केलें । जैसें कपोल शंखें शिवतलें ।
आणि वेदांचियेही मतीं ठेलें । तें लागला बोलों

11.185

तैसा अनुग्रहो पैं राया । श्रीहरी केला धनंजया ।
आतां कवणेकडेही माया । ऐसी भाष नेणेंचि तो

11.186

एकसरें ऐश्वर्यतेजें पाहलें । तया चमत्काराचें एकार्णव जाहलें ।
चित्त समाजीं बुडोनि ठेलें । विस्मयाचिया

11.187

जैसा आब्रह्म पूर्णोदकीं । पव्हे मार्कंडेय एकाकीं ।
तैसा विश्वरूप कौतुकीं । पार्थु लोळे

11.188

म्हणे केवढें गगन एथ होतें । तें कवणें नेलें पां केउतें ।
तीं चराचर महाभूतें । काय जाहलीं ?

11.189

दिशांचे ठावही हारपले । आधोर्ध्व काय नेणों जाहले ।
चेइलिया स्वप्न तैसे गेले । लोकाकार

11.190

नाना सूर्यतेजप्रतापें । सचंद्र तारांगण जैसें लोपे ।
तैसीं गिळिलीं विश्वरूपें । प्रपंचरचना

11.191

तेव्हां मनासी मनपण न स्फुरे । बुद्धि आपणपें न सांवरें ।
इंद्रियांचे रश्मी माघारे । हृदयवरी भरले

11.192

तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिलें । टकासी टक लागले ।
जैसें मोहनास्त्र घातलें । विचारजातां

11.193

तैसा विस्मितु पाहे कोडें । तंव पुढां होतें चतुर्भुज रूपडें ।
तेंचि नानारूप चहूंकडे । मांडोनि ठेलें

11.194

जैसें वर्षाकाळींचे मेघौडे । कां महाप्रळयींचें तेज वाढे ।
तैसें आपणावीण कवणीकडे । नेदीचि उरों

11.195

प्रथम स्वरूपसमाधान । पावोनि ठेला अर्जुन ।
सवेचि उघडी लोचन । तंव विश्वरूप देखें

11.196

इहींचि दोहीं डोळां । पाहावें विश्वरूपा सकळा ।
तो श्रीकृष्णें सोहळा । पुरविला ऐसा

11.197

मग तेथ सैंघ देखे वदनें । जैसी रमानायकाचीं राजभुवनें ।
नाना प्रगटलीं निधानें । लावण्यश्रियेचीं

11.198

कीं आनंदाची वनें सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली ।
तैसीं मनोहरें देखिलीं । हरीचीं वक्त्रें

11.199

तयांही माजीं एकैकें । सावियाचि भयानकें ।
काळरात्रीचीं कटकें । उठवलीं जैसीं

11.200

कीं मृत्यूसीचि मुखें जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं ।
कीं महाकुंडें उघडलीं । प्रळयानळाचीं

11.201

तैसीं अद्भुतें भयासुरें । तेथ वदनें देखिलीं वीरें ।
आणिकें असाधारणें साळंकारें । सौम्यें बहुतें

11.202

पैं ज्ञानदृष्टीचेनि अवलोकें । परी वदनांचा शेवटु न टके ।
मग लोचन तें कवतिकें । लागला पाहों

11.203

तंव नानावर्णें कमळवनें । विकासिलीं तैसे अर्जुनें ।
डोळे देखिले पालिंगनें । आदित्यांचीं

11.204

तेथेंचि कृष्णमेघांचिया दाटी- । माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी ।
तैसिया वन्हि पिंगळा दिठी । भ्रूभंगातळीं

11.205

हें एकैक आश्चर्य पाहतां । तिये एकेचि रूपीं पंडुसुता ।
दर्शनाची अनेकता । प्रतिफळली

11.206

मग म्हणे चरण ते कवणेकडे । केउते मुकुट कें दोर्दंडें ।
ऐसी वाढविताहे कोडें । चाड देखावयाची

11.207

तेथ भाग्यनिधि पार्था । कां विफलत्व होईल मनोरथा ।
काय पिनाकपाणीचिया भातां । वायकांडीं आहाती ?

11.208

ना तरी चतुराननाचिये वाचे । काय आहाती लटिकिया अक्षरांचे साचे ? ।
म्हणौनि साद्यंतपण अपारांचे । देखिलें तेणें

11.209

जयाची सोय वेदां नाकळे । तयाचे सकळावयव एकेचि वेळे ।
अर्जुनाचे दोन्ही डोळे । भोगिते जाहले

11.210

चरणौनि मुकुटवरी । देखत विश्वरूपाची थोरी ।
जे नाना रत्न अळंकारीं । मिरवत असे

11.211

परब्रह्म आपुलेनि आंगें । ल्यावया आपणचि जाहला अनेगें ।
तियें लेणीं मी सांगें । काइसयासारिखीं

11.212

जिये प्रभेचिये झळाळा । उजाळु चंद्रादित्यमंडळा ।
जे महातेजाचा जिव्हाळा । जेणें विश्व प्रगटे

11.213

तो दिव्यतेज शृंगारु । कोणाचिये मतीसी होय गोचरु ।
देव आपणपेंचि लेइले ऐसें वीरु । देखत असे

11.214

मग तेथेंचि ज्ञानाचिया डोळां । पहात करपल्लवां जंव सरळा ।
तंव तोडित कल्पांतींचिया ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे

11.215

आपण आंग आपण अलंकार । आपण हात आपण हतियार ।
आपण जीव आपण शरीर । देखें चराचर कोंदलें देवें

11.216

जयाचिया किरणांचे निखरपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे ।
तेजें खिरडला वन्हि म्हणे । समुद्रीं रिघों

11.217

मग कालकूटकल्लोळीं कवळिलें । नाना महाविजूंचें दांग उमटलें ।
तैसे अपार कर देखिले । उदितायुधीं

11.218

कीं भेणें तेथूनि काढिली दिठी । मग कंठमुगुट पहातसे किरीटी ।
तंव सुरतरूची सृष्टी । जयांपासोनि कां जाहली

11.219

जिये महासिद्धींचीं मूळपीठें । शिणली कमळा जेथ वावटे ।
तैसीं कुसुमें अति चोखटें । तुरंबिलीं देखिलीं

11.220

मुगुटावरी स्तबक । ठायीं ठायीं पूजाबंध अनेक ।
कंठीं रुळताति अलौकिक । माळादंड

11.221

स्वर्गें सूर्यतेज वेढिलें । जैसें पंधरेनें मेरूतें मढिलें ।
तैसें नितंबावरी गाढिलें । पीतांबरु झळके

11.222

श्रीमहादेवो कापुरें उटिला । कां कैलासु पारजें डवरिला ।
नाना क्षीरोदकें पांघरविला । क्षीरार्णवो जैसा

11.223

जैसी चंद्रमयाची घडी उपलविली । मग गगनाकरवीं बुंथी घेवविली ।
तैसीं चंदनपिंजरी देखिली । सर्वांगीं तेणें

11.224

जेणें स्वप्रकाशा कांतीं चढे । ब्रह्मानंदाचा निदाघु मोडे ।
जयाचेनि सौरभ्यें जीवित जोडे । वेदवतीये

11.225

जयाचे निर्लेप अनुलेपु करी । जे अनंगुही सर्वांगीं धरी ।
तया सुगंधाची थोरी । कवण वानी ?

11.226

ऐसी एकैक शृंगारशोभा । पाहतां अर्जुन जातसें क्षोभा ।
तेवींचि देवो बैसला कीं उभा । का शयालु हें नेणवें

11.227

बाहेर दिठी उघडोनि पाहे । तंव आघवें मूर्तिमय देखत आहे ।
मग आतां न पाहें म्हणौनि उगा राहे । तरी आंतुही तैसेंचि

11.228

अनावरें मुखें समोर देखे । तयाभेणें पाठीमोरा जंव ठाके ।
तंव तयाहीकडे श्रीमुखें । करचरण तैसेचि

11.229

अहो पाहतां कीर प्रतिभासे । एथ नवलावो काय असे ? ।
परि न पाहतांही दिसे । चोज आइका

11.230

कैसें अनुग्रहाचें करणें । पार्थाचें पाहणें आणि न पाहणें ।
तयाही सकट नारायणें । व्यापूनि घेतलें

11.231

म्हणौनि आश्चर्याच्या पुरीं एकीं । पडिला ठायेठाव थडीं ठाकी ।
तंव चमत्काराचिया आणिकीं । महार्णवीं पडे

11.232

तैसा अर्जुनु असाधारणें । आपुलिया दर्शनाचेनि विंदाणें ।
कवळूनि घेतला तेणें । अनंतरूपें

11.233

तो विश्वतोमुख स्वभावें । आणि तेचि दावावयालागीं पांडवें ।
प्रार्थिला आतां आघवें । होऊनि ठेला

11.234

आणि दीपें कां सूर्यें प्रगटे । अथवा निमुटलिया देखावेंचि खुंटे ।
तैसी दिठी नव्हे जे वैकुंठें । दिधली आहे

11.235

म्हणौनि किरीटीसि दोहीं परी । तें देखणें देखें अंधारी ।
हें संजयो हस्तिनापुरीं । सांगतसे राया

11.236

म्हणे किंबहुना अवधारिलें । पार्थें विश्वरूप देखिलें ।
नाना आभरणीं भरलें । विश्वतोमुख

11.237

तिये अंगप्रभेचा देवा । नवलावो काइसया ऐसा सांगावा ।
कल्पांतीं एकुचि मेळावा । द्वादशादित्यांचा होय

11.238

तैसे ते दिव्यसूर्य सहस्रवरी । जरी उदयजती कां एकेचि अवसरीं ।
तऱही तया तेजाची थोरी । उपमूं नये

11.239

आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे । आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे ।
तेवींचि दशकुही मेळविजे । महातेजांचा

11.240

तऱही तिये अंगप्रभेचेनि पाडें । हें तेज कांहीं कांहीं होईल थोडें ।
आणि तया ऐसें कीर चोखडें । त्रिशुद्धी नोहे

11.241

ऐसें महात्म्य या श्रीहरीचें सहज । फांकतसे सर्वांगीचें तेज ।
तें मुनिकृपा जी मज । दृष्ट जाहलें

11.242

आणि तिये विश्वरूपीं एकीकडे । जग आघवें आपुलेनि पवाडें ।
जैसे महोदधीमाजीं बुडबुडे । सिनानें दिसती

11.243

कां आकाशीं गंधर्वनगर । भूतळीं पिपीलिका बांधे घर ।
नाना मेरुवरी सपूर । परमाणु बैसले

11.244

विश्व आघवेंचि तयापरी । तया देवचक्रवर्तीचिया शरीरीं ।
अर्जुन तिये अवसरीं । देखता जाहला

11.245

तेथ एक विश्व एक आपण । ऐसें अळुमाळ होतें जें दुजेपण ।
तेंही आटोनि गेलें अंतःकरण । विरालें सहसा

11.246

आंतु आनंदा चेइरें जाहलें । बाहेरि गात्रांचें बळ हारपोनि गेलें ।
आपाद पां गुंतलें । पुलकांचलें

11.247

वार्षिये प्रथमदशे । वोहळलया शैलांचें सर्वांग जैसें ।
विरूढे कोमलांकुरीं तैसे । रोमांच जाहले

11.248

शिवतला चंद्रकरीं । सोमकांतु द्रावो धरी ।
तैसिया स्वेदकणिका शरीरीं । दाटलिया

11.249

माजीं सापडलेनि अलिकुळें । जळावरी कमळकळिका जेवीं आंदोळे ।
तेवीं आंतुलिया सुखोर्मीचेनि बळें । बाहेरि कांपे

11.250

कर्पूरकर्दळीचीं गर्भपुटें । उकलतां कापुराचेनि कोंदाटें ।
पुलिका गळती तेवीं थेंबुटें । नेत्रौनि पडती

11.251

उदयलेनि सुधाकरें । जैसा भरलाचि समुद्र भरे ।
तैसा वेळोवेळां उर्मिभरें । उचंबळत असे

11.252

ऐसा सात्त्विकांही आठां भावां । परस्परें वर्ततसे हेवा ।
तेथ ब्रह्मानंदाची जीवा । राणीव फावली

11.253

तैसाचि तया सुखानुभवापाठीं । केला द्वैताचा सांभाळु दिठी ।
मग उसासौनि किरीटी । वास पाहिली

11.254

तेथ बैसला होता जिया सवा । तियाचिया कडे मस्तक खालविला देवा ।
जोडूनि करसंपुट बरवा । बोलतु असे

11.255

म्हणे जयजयाजी स्वामी । नवल कृपा केली तुम्हीं ।
जें हें विश्वरूप कीं आम्हीं । प्राकृत देखों

11.256

परि साचचि भलें केलें गोसाविया । मज परितोषु जाहला साविया ।
जी देखलासि जो इया । सृष्टीसी तूं आश्रयो

11.257

देवा मंदराचेनि अंगलगें । ठायीं ठायीं श्वापदांचीं दांगें ।
तैसीं इयें तुझ्या देहीं अनेगें । देखतसें भुवनें

11.258

अहो आकाशचिये खोळे । दिसती ग्रहगणांचीं कुळें ।
कां महावृक्षीं अविसाळें । पक्षिजातीचीं

11.259

तयापरी श्रीहरी । तुझिया विश्वात्मकीं इये शरीरीं ।
स्वर्गु देखतसें अवधारीं । सुरगणेंसीं

11.260

प्रभु महाभूतांचें पंचक । येथ देखत आहे अनेक ।
आणि भूतग्राम एकेक । भूतसृष्टीचें

11.261

जी सत्यलोकु तुजमाजीं आहे । देखिला चतुराननु हा नोहे ? ।
आणि येरीकडे जंव पाहें । तंव कैलासुही दिसे

11.262

श्रीमहादेव भवानियेशीं । तुझ्या दिसतसे एके अंशीं ।
आणि तूंतेंही गा हृषीकेशी । तुजमाजीं देखे

11.263

पैं कश्यपादि ऋषिकुळें । इयें तुझिया स्वरूपीं सकळें ।
देखतसें पाताळें । पन्नगेंशीं

11.264

किंबहुना त्रैलोक्यपती । तुझिया एकेकाचि अवयवाचिये भिंती ।
इयें चतुर्दशभुवनें चित्राकृती । अंकुरलीं जाणों

11.265

आणि तेथिंचे जे जे लोक । ते चित्ररचना जी अनेक ।
ऐसें देखतसे अलोकिक । गांभीर्य तुझें

11.266

त्या दिव्यचक्षूंचेनि पैसें । चहुंकडे जंव पाहात असें ।
तंव दोर्दंडीं कां जैसें । आकाश कोंभैलें

11.267

तैसे एकचि निरंतर । देवा देखत असें तुझे कर ।
करीत आघवेचि व्यापार । एकेचि काळीं

11.268

मग महाशून्याचेनि पैसारें । उघडलीं ब्रह्मकटाहाचीं भांडारें ।
तैसीं देखतसें अपारें । उदरें तुझीं

11.269

जी सहस्रशीर्षयाचें देखिलें । कोडीवरी होताति एकीवेळें ।
कीं परब्रह्मचि वदनफळें । मोडोनि आलें

11.270

तैसीं वक्त्रें जी जेउतीं तेउतीं । तुझीं देखितसे विश्वमूर्ती ।
आणि तयाचिपरी नेत्रपंक्ती । अनेका सैंघ

11.271

हें असो स्वर्ग पाताळ । कीं भूमी दिशा अंतराळ ।
हे विवक्षा ठेली सकळ । मूर्तिमय देखतसें

11.272

हें तुजवीण एकादियाकडे । परमाणूहि एतुला कोडें ।
अवकाशु पाहतसें परि न सांपडे । ऐसें व्यापिलें तुवां

11.273

इये नानापरी अपरिमितें । जेतुलीं साठविलीं होतीं महाभूतें ।
तेतुलाहि पवाडु तुवां अनंतें । कोंदला देखतसें

11.274

ऐसा कवणें ठायाहूनि तूं आलासी । एथ बैसलासि कीं उभा आहासि ।
आणि कवणिये मायेचिये पोटीं होतासी । तुझें ठाण केवढें

11.275

तुझें रूप वय कैसें । तुजपैलीकडे काय असे ।
तूं काइसयावरी आहासि ऐसें । पाहिलें मियां

11.276

तंव देखिलें जी आघवेंचि । तरि आतां तुज ठावो तूंचि ।
तूं कवणाचा नव्हेसि ऐसाचि । अनादि आयता

11.277

तूं उभा ना बैठा । दिघडु ना खुजटा ।
तुज तळीं वरी वैकुंठा । तूंचि आहासी

11.278

तूं रूपें आपणयांचि ऐसा । देवा तुझी तूंचि वयसा ।
पाठीं पोट परेशा । तुझें तूं गा

11.279

किंबहुना आतां । तुझें तूंचि आघवें अनंता ।
हें पुढत पुढती पाहतां । देखिलें मियां

11.280

परि या तुझिया रूपाआंतु । जी उणीव एक असे देखतु ।
जे आदि मध्य अंतु । तिन्हीं नाहीं

11.281

एऱहवीं गिंवसिलें आघवां ठायीं । परि सोय न लाहेचि कहीं ।
म्हणौनि त्रिशुद्धी हे नाहीं । तिन्ही एथ

11.282

एवं आदिमध्यांतरहिता । तूं विश्वेश्वरा अपरिमिता ।
देखिलासि जी तत्त्वतां । विश्वरूपा

11.283

तुज महामूर्तीचिया आंगी । उमटलिया पृथक् मूर्ती अनेगी ।
लेइलासी वानेपरींची आंगीं । ऐसा आवडतु आहासी

11.284

नाना पृथक् मूर्ती तिया द्रुमवल्ली । तुझिया स्वरूपमहाचळीं ।
दिव्यालंकार फुलीं फळीं । सासिन्नलिया

11.285

हो कां जे महोदधीं तूं देवा । जाहलासि तरंगमूर्ती हेलावा ।
कीं तूं एक वृक्षु बरवा । मूर्तिफळीं फळलासी

11.286

जी भूतीं भूतळ मांडिलें । जैसें नक्षत्रीं गगन गुढलें ।
तैसें मूर्तिमय भरलें । देखतसें तुझें रूप

11.287

जी एकेकीच्या अंगप्रांतीं । होय जाय हें त्रिजगती ।
एवढियाही तुझ्या आंगीं मूर्ती । कीं रोमा जालिया

11.288

ऐसा पवाडु मांडूनि विश्वाचा । तूं कवण पां एथ कोणाचा ।
हें पाहिलें तंव आमुचा । सारथी तोचि तूं

11.289

तरी मज पाहतां मुकुंदा । तूं ऐसाचि व्यापकु सर्वदा ।
मग भक्तानुग्रहें तया मुग्धा । रूपातें धरिसी

11.290

कैसें चहूं भुजांचें सांवळें । पाहतां वोल्हावती मन डोळे ।
खेंव देऊं जाइजे तरी आकळे । दोहींचि बाहीं

11.291

ऐसी मूर्ति कोडिसवाणी कृपा । करूनि होसी ना विश्वरूपा ।
कीं अमुचियाचि दिठी सलेपा । जें सामान्यत्वें देखिती

11.292

तरी आतां दिठीचा विटाळु गेला । तुवां सहजें दिव्यचक्षू केला ।
म्हणौनि यथारूपें देखवला । महिमा तुझा

11.293

परी मकरतुंडामागिलेकडे । तोचि होतासि तूं एवढें ।
रूप जाहलासि हें फुडें । वोळखिलें मियां

11.294

नोहे तोचि हा शिरीं ? । मुकुट लेइलासि श्रीहरी ।
परी आतांचें तेज आणि थोरी । नवल कीं बहु हें

11.295

तेंचि हें वरिलियेचि हातीं । चक्र परिजितया आयती ।
सांवरितासि विश्वमूर्ती । ते न मोडे खूण

11.296

येरीकडे तेचि हे नोहे गदा । आणि तळिलिया दोनी भुजा निरायुधा ।
वागोरे सांवरावया गोविंदा । संसरिलिया

11.297

आणि तेणेंचि वेगें सहसा । माझिया मनोरथासरिसा ।
जाहलासि विश्वरूपा विश्वेशा । म्हणौनि जाणें

11.298

परी कायसें बा हें चोज । विस्मयो करावयाहि पाडू नाहीं मज ।
चित्त होऊनि जातसें निर्बुज । आश्चर्यें येणें

11.299

हें एथ आथि कां येथ नाहीं । ऐसें श्वसोंही नये कांहीं ।
नवल अंगप्रभेची नवाई । कैसी कोंदलीं सैंघ

11.300

एथ अग्नीचीही दिठी करपत । सूर्य खद्योतु तैसा हारपत ।
ऐसें तीव्रपण अद्भुत । तेजाचें यया

11.301

हो कां महातेजाचिया महार्णवीं । बुडोनि गेली सृष्टी आघवी ।
कीं युगांतविजूंच्या पालवीं । झांकलें गगन

11.302

नातरी संहारतेजाचिया ज्वाळा । तोडोनि माचू बांधला अंतराळां ।
आतां दिव्य ज्ञानाचिया डोळां । पाहवेना

11.303

उजाळु अधिकाधिक बहुवसु । धडाडीत आहे अतिदाहसु ।
पडत दिव्यचक्षुंसही त्रासु । न्याहाळितां

11.304

हो कां जे महाप्रळयींचा भडाडु । होता काळाग्निरुद्राचिया ठायीं गूढु ।
तो तृतीयनयनाचा मढू । फुटला जैसा

11.305

तैसें पसरलेनि प्रकाशें । सैंघ पांचवनिया ज्वाळांचे वळसे ।
पडतां ब्रह्मकटाह कोळिसे । होत आहाती

11.306

ऐसा अद्भुत तेजोराशी । जन्मा नवल म्यां देखिलासी ।
नाहीं व्याप्ती आणि कांतीसी । पारु जी तुझिये

11.307

देवा तूं अक्षर । औटाविये मात्रेसि पर ।
श्रुती जयाचें घर । गिंवसीत आहाती

11.308

जें आकाराचें आयतन । जें विश्वनिक्षेपैकनिधान ।
तें अव्यय तूं गहन । अविनाश जी

11.309

तूं धर्माचा वोलावा । अनादिसिद्ध तूं नित्य नवा ।
जाणें मी सदतिसावा । पुरुष विशेष तूं

11.310

तूं आदिमध्यांतरहितु । स्वसामर्थ्यें तूं अनंतु ।
विश्वबाहु अपरिमितु । विश्वचरण तूं

11.311

पैं चंद्र चंडांशु डोळां । दावितासि कोपप्रसाद लीळा ।
एकां रुससी तमाचिया डोळां । एकां पाळितोसि कृपादृष्टी

11.312

जी एवंविधा तूंतें । मी देखतसें हें निरुतें ।
पेटलें प्रळयाग्नीचें उजितें । तैसें वक्त्र हें तुझें

11.313

वणिवेनि पेटले पर्वत । कवळूनि ज्वाळांचे उभड उठत ।
तैसी चाटीत दाढा दांत । जीभ लोळे

11.314

इये वदनींचिया उबा । आणि जी सर्वांगकांतीचिया प्रभा ।
विश्व तातलें अति क्षोभा । जात आहे

11.315

कां जे द्यौर्लोक आणि पाताळ । पृथिवी आणि अंतराळ ।
अथवा दशदिशा समाकुळ । दिशाचक्र

11.316

हें आघवेंचि तुंवा एकें । भरलें देखत आहे कौतुकें ।
परि गगनाहीसकट भयानकें । आप्लविजे जेवीं

11.317

नातरी अद्भुतरसाचिया कल्लोळीं । जाहली चवदाही भुवनांसि कडियाळीं ।
तैसें आश्चर्यचि मग मी आकळीं । काय एक ?

11.318

नावरे व्याप्ती हे असाधारण । न साहवे रूपाचें उग्रपण ।
सुख दूरी गेलें परि प्राण । विपायें धरीजे

11.319

देवा ऐसें देखोनि तूंतें । नेणों कैसें आलें भयाचें भरितें ।
आतां दुःखकल्लोळीं झळंबतें । तिन्हीं भुवनें

11.320

एऱहवीं तुज महात्मयाचें देखणें । तरि भयदुःखासि कां मेळवणें ? ।
परि हें सुख नव्हेचि जेणें गुणें । तें जाणवत आहे मज

11.321

जंव तुझें रूप नोहे दिठें । तंव जगासि संसारिक गोमटें ।
आतां देखिलासि तरी विषयविटें । उपनला त्रासु

11.322

तेवींचि तुज देखिलियासाठीं । काय सहसा तुज देवों येईल मिठी ।
आणि नेदीं तरी शोकसंकटीं । राहों केवीं ?

11.323

म्हणौनि मागां सरों तंव संसारु । आडवीत येतसे अनिवारु ।
आणि पुढां तूं तंव अनावरु । न येसि घेवों

11.324

ऐसा माझारलिया सांकडां । बापुड्या त्रैलोक्याचा होतसे हुरडा ।
हा ध्वनि जी फुडा । चोजवला मज

11.325

जैसा आरंबळला आगीं । तो समुद्रा ये निवावयालागीं ।
तंव कल्लोळपाणियाचिया तरंगीं । आगळा बिहे

11.326

तैसें या जगासि जाहलें । तूंतें देखोनि तळमळित ठेलें ।
यामाजीं पैल भले । ज्ञानशूरांचे मेळावे

11.327

हे तुझेनि आंगिकें तेजें । जाळूनि सर्व कर्मांचीं बीजें ।
मिळत तुज आंतु सहजें । सद्भावेसीं

11.328

आणिक एक सावियाचि भयभीरु । सर्वस्वें धरूनि तुझी मोहरु ।
तुज प्रार्थिताति करु । जोडोनियां

11.329

देवा अविद्यार्णवीं पडिलों । जी विषयवागुरें आंतुडलों ।
स्वर्गसंसाराचिया सांकडलों । दोहीं भागीं

11.330

ऐसें आमुचें सोडवणें । तुजवांचोनि कीजेल कवणें ? ।
तुज शरण गा सर्वप्राणें । म्हणत देवा

11.331

आणि महर्षी अथवा सिद्ध । कां विद्याधरसमूह विविध ।
हे बोलत तुज स्वस्तिवाद । करिती स्तवन

11.332

हे रुद्रादित्यांचे मेळावे । वसु हन साध्य आघवे ।
अश्विनौ देव विश्वेदेव विभवें । वायुही हे जी

11.333

अवधारा पितर हन गंधर्व । पैल यक्षरक्षोगण सर्व ।
जी महेंद्रमुख्य देव । कां सिद्धादिक

11.334

हे आघवेचि आपुलालिया लोकीं । सोत्कंठित अवलोकीं ।
हे महामूर्ती दैविकी । पाहात आहाती

11.335

मग पाहात पाहात प्रतिक्षणीं । विस्मित होऊनि अंतःकरणीं ।
करित निजमुकटीं वोवाळणी । प्रभुजी तुज

11.336

ते जय जय घोष कलरवें । स्वर्ग गाजविताती आघवे ।
ठेवित ललाटावरी बरवे । करसंपुट

11.337

तिये विनयद्रुमाचिये आरवीं । सुरवाडली सात्त्विकांची माधवी ।
म्हणौनि करसंपुटपल्लवीं । तूं होतासि फळ

11.338

जी लोचनां भाग्य उदेलें । मना सुखाचें सुयाणें पाहलें ।
जे अगाध तुझें देखिलें । विश्वरूप इहीं

11.339

हें लोकत्रयव्यापक रूपडें । पाहतां देवांही वचक पडे ।
याचें सन्मुखपण जोडें । भलतयाकडुनी

11.340

ऐसें एकचि परी विचित्रें । आणि भयानकें वक्त्रें ।
बहुलोचन हे सशस्त्रें । अनंतभुजा

11.341

अनंत चारु बाहु चरण । बहूदर आणि नानावर्ण ।
कैसें प्रतिवदनीं मातलेपण । आवेशाचें

11.342

हो कां महाकल्पाचिया अंतीं । तवकलेनि यमें जेउततेउतीं ।
प्रळयाग्नीचीं उजितीं । आंबुखिलीं जैसीं

11.343

नातरी संहारत्रिपुरारीचीं यंत्रें । कीं प्रळयभैरवाचीं क्षेत्रें ।
नाना युगांतशक्तीचीं पात्रें । भूतखिचा वोढविलीं

11.344

तैसीं जियेतियेकडे । तुझीं वक्त्रें जीं प्रचंडें ।
न समाती दरीमाजीं सिंव्हाडे । तैसे दशन दिसती रागीट

11.345

जैसें काळरात्रीचेनि अंधारें । उल्हासत निघतीं संहारखेंचरें ।
तैसिया वदनीं प्रळयरुधिरें । काटलिया दाढा

11.346

हें असो काळें अवंतिलें रण । कां सर्व संहारें मातलें मरण ।
तैसें अतिभिंगुळवाणेंपण । वदनीं तुझिये

11.347

हे बापुडी लोकसृष्टी । मोटकीये विपाइली दिठी ।
आणि दुःखकालिंदीचिया तटीं । झाड होऊनि ठेली

11.348

तुज महामृत्यूचिया सागरीं । आतां हे त्रैलोक्य जीविताची तरी ।
शोकदुर्वातलहरी । आंदोळत असे

11.349

एथ कोपोनि जरी वैकुंठें । ऐसें हन म्हणिपैल अवचटें ।
जें तुज लोकांचें काई वाटे ? । तूं ध्यानसुख हें भोगीं

11.350

तरी जी लोकांचें कीर साधारण । वायां आड सूतसे वोडण ।
केवीं सहसा म्हणे प्राण । माझेचि कांपती

11.351

ज्या मज संहाररुद्र वासिपे । ज्या मजभेणें मृत्यु लपे ।
तो मी एथें अहाळबाहळीं कांपें । ऐसें तुवां केलें

11.352

परि नवल बापा हे महामारी । इया नाम विश्वरूप जरी ।
हे भ्यासुरपणें हारी । भयासि आणी

11.353

ठेलीं महाकाळेंसि हटेंतटें । तैसी कितीकें मुखें रागिटें ।
इहीं वाढोनियां धाकुटें । आकाश केलें

11.354

गगनाचेंनि वाडपणें नाकळे । त्रिभुवनींचियाही वारिया न वेंटाळे ।
ययाचेनि वाफा आगी जळे । कैसें धडाडीत असे

11.355

तेवींचि एकसारिखें एक नोहे । एथ वर्णावर्णाचा भेदु आहे ।
हो कां जें प्रळयीं सावावो लाहे । वन्ह्ं ययाचा

11.356

जयाचिये आंगींची दीप्ती येवढी । जे त्रैलोक्य कीजे राखोंडी ।
कीं तयाही तोंडें आणि तोंडीं । दांत दाढा

11.357

कैसा वारया धनुर्वात चढला । समुद्र कीं महापुरीं पडिला ।
विषाग्नि मारा प्रवर्तला । वडवानळासी

11.358

हळाहळ आगी पियालें । नवल मरण मारा प्रवर्तलें ।
तैसें संहारतेजा या जाहलें । वदन देखा

11.359

परी कोणें मानें विशाळ । जैसें तुटलिया अंतराळ ।
आकाशासि कव्हळ । पडोनि ठेलें

11.360

नातरी काखे सूनि वसुंधरी । जैं हिरण्याक्षु रिगाला विवरीं ।
तैं उघडले हाटकेश्वरीं । जेवीं पाताळकुहर

11.361

तैसा वक्त्रांचा विकाशु । माजीं जिव्हांचा आगळाचि आवेशु ।
विश्व न पुरे म्हणौनि घांसु । न भरीचि कोंडें

11.362

आणि पाताळव्याळांचिया फूत्कारीं । गरळज्वाळा लागती अंबरीं ।
तैसी पसरलिये वदनदरी- । माजीं हे जिव्हा

11.363

काढूनि प्रळयविजूंचीं जुंबाडें । जैसें पन्नासिलें गगनाचे हुडे ।
तैसे आवाळुवांवरी आंकडे । धगधगीत दाढांचे

11.364

आणि ललाटपटाचिये खोळे । कैसें भयातें भेडविताती डोळे ।
हो कां जे महामृत्यूचे उमाळे । कडवसां राहिले

11.365

ऐसें वाऊनि भयाचें भोज । एथ काय निपजवूं पाहातोसि काज ।
तें नेणों परी मज । मरणभय आलें

11.366

देवा विश्वरूप पहावयाचे डोहळे । केले तिये पावलों प्रतिफळें ।
बापा देखिलासि आतां डोळे । निवावे तैसे निवाले

11.367

अहो देहो पार्थिव कीर जाये । ययाची काकुळती कवणा आहे ।
परि आतां चैतन्य माझें विपायें । वांचे कीं न वांचे

11.368

एऱहवीं भयास्तव आंग कांपे । नावेक आगळें तरी मन तापे ।
अथवा बुद्धिही वासिपे । अभिमानु विसरिजे

11.369

परी येतुलियाही वेगळा । जो केवळ आनंदैककळा ।
तया अंतरात्मयाही निश्चळा । शियारी आली

11.370

बाप साक्षात्काराचा वेधु । कैसा देशधडी केला बोधु ।
हा गुरुशिष्यसंबंधु । विपायें नांदे

11.371

देवा तुझ्या ये दर्शनीं । जें वैकल्य उपजलें आहे अंतःकरणीं ।
तें सावरावयालागीं गंवसणी । धैर्याची करितसें

11.372

तंव माझेनि नामें धैर्य हारपलें । कीं तयाहीवरी विश्वरूपदर्शन जाहलें ।
हें असो परि मज भलें आतुडविलें । उपदेशा इया

11.373

जीव विसंवावयाचिया चाडा । सैंघ धांवाधांवी करितसे बापुडा ।
परि सोयही कवणेंकडां । न लभे एथ

11.374

ऐसें विश्वरूपाचिया महामारी । जीवित्व गेलें आहें चराचरीं ।
जी न बोलें तरि काय करीं । कैसेनि राहें ?

11.375

पैं अखंड डोळ्यांपुढें । फुटलें जैसें महाभयाचें भांडें ।
तैशीं तुझीं मुखें वितंडें । पसरलीं देखें

11.376

असो दांत दाढांची दाटी । न झांकवे मा दों दों वोठीं ।
सैंघ प्रळयशस्त्रांचिया दाट कांटी । लागलिया जैशा

11.377

जैसें तक्षका विष भरलें । हो कां जे काळरात्रीं भूत संचरलें ।
कीं आग्नेयास्त्र परजिलें । वज्राग्नि जैसें

11.378

तैशीं तुझीं वक्त्रें प्रचंडें । वरि आवेश हा बाहेरी वोसंडे ।
आले मरणरसाचे लोंढे । आम्हांवरी

11.379

संहारसमयींचा चंडानिळु । आणि महाकल्पांत प्रळयानळु ।
या दोहीं जैं होय मेळु । तैं काय एक न जळे ?

11.380

तैसीं संहारकें तुझीं मुखें । देखोनि धीरु कां आम्हां पारुखे ? ।
आतां भुललों मी दिशा न देखें । आपणपें नेणें

11.381

मोटकें विश्वरूप डोळां देखिलें । आणि सुखाचें अवर्षण पडिलें ।
आतां जापाणीं जापाणीं आपुलें । अस्ताव्यस्त हें

11.382

ऐसें करिसी म्हणौनि जरी जाणें । तरी हे गोष्टी सांगावीं कां मी म्हणें ।
आतां एक वेळ वांचवी जी प्राणें । या स्वरूपप्रळयापासोनि

11.383

जरी तूं गोसावी आमुचा अनंता । तरी सुईं वोडण माझिया जीविता ।
सांटवीं पसारा हा मागुता । महामारीचा

11.384

आइकें सकळ देवांचिया परदेवते । तुवां चैतन्यें गा विश्व वसतें ।
तें विसरलासी हें उपरतें । संहारूं आदरिलें

11.385

म्हणौनि वेगीं प्रसन्न होईं देवराया । संहरीं संहरीं आपुली माया ।
काढीं मातें महाभया- । पासोनियां

11.386

हा ठायवरी पुढतपुढतीं । तूंतें म्हणिजे बहुवा काकुळती ।
ऐसा मी विश्वमूर्ती । भेडका जाहलों

11.387

जैं अमरावतीये आला धाडा । तैं म्यां एकलेनि केला उवेडा ।
जो मी काळाचियाही तोंडा । वासिपु न धरीं

11.388

परी तया आंतुल नव्हे हें देवा । एथ मृत्यूसही करूनि चढावा ।
तुवां आमुचाचि घोटू भरावा । या सकळ विश्वेंसीं

11.389

कैसा नव्हता प्रळयाचा वेळु । गोखा तूंचि मिनलासि काळु ।
बापुडा हा त्रिभुवनगोळु । अल्पायु जाहला

11.390

अहा भाग्या विपरीता । विघ्न उठिलें शांत करितां ।
कटाकटा विश्व गेलें आतां । तूं लागलासि ग्रासूं

11.391

हें नव्हे मा रोकडें । सैंघ पसरूनियां तोंडें ।
कवळितासि चहूंकडे । सैन्यें इयें

11.392

नोहेति ? हे कौरवकुळींचे वीर । आंधळिया धृतराष्ट्राचे कुमर ।
हे गेले गेले सहपरिवार । तुझिया वदनीं

11.393

आणि जे जे यांचेनि सावायें । आले देशोदेशींचे राये ।
तयांचें सांगावया जावों न लाहे । ऐसें सरकटित आहासी

11.394

मदमुखाचिया संघटा । घेत आहासि घटघटां ।
आरणीं हन थाटा । देतासि मिठी

11.395

जंत्रावरिचील मार । पदातींचे मोगर ।
मुखाआंत भार । हारपताति मा

11.396

कृतांताचिया जावळी । जें एकचि विश्वातें गिळी ।
तियें कोटीवरी सगळीं । गिळितासि शस्त्रें

11.397

चतुरंगा परिवारा । संजोडियां रहंवरां ।
दांत न लाविसी मा परमेश्वरा । कसा तुष्टलासि बरवा

11.398

हां गा भीष्मासा कवणु । सत्यशौर्यनिपुणु ।
तोही आणि ब्राह्मण द्रोणु । ग्रासिलासि कटकटा

11.399

अहा सहस्रकराचा कुमरु । एथ गेला गेला कर्णवीरु ।
आणि आमुचिया आघवयांचा केरु । फेडिला देखें

11.400

कटकटा धातया । कैसें जाहलें अनुग्रहा यया ।
मियां प्रार्थूनि जगा बापुडिया । आणिलें मरण

11.401

मागां थोडिया बहुवा उपपत्ती । येणें सांगितलिया विभूती ।
तैसा नसेचि मा पुढती । बैसलों पुसों

11.402

म्हणौनि भोग्य तें त्रिशुद्धी न चुके । आणि बुद्धिही होणारासारिखी ठाके ।
माझ्या कपाळीं पिटावें लोकें । तें लोटेल कांह्यां

11.403

पूर्वीं अमृतही हातां आलें । परी देव नसतीचि उगले ।
मग काळकूट उठविलें । शेवटीं जैसें

11.404

परी तें एकबगीं थोडें । केलिया प्रतिकारामाजिवडें ।
आणि तिये अवसरीचें तें सांकडें । निस्तरविलें शंभू

11.405

आतां हा जळतां वारा कें वेंटाळे ? । कोणा हे विषा भरलें गगन गिळे ? ।
महाकाळेंसि कें खेळें ? । आंगवत असे

11.406

ऐसा अर्जुन दुःखें शिणतु । शोचित असे जिवाआंतु ।
परी न देखें तो प्रस्तुतु । अभिप्राय देवाचा

11.407

जे मी मारिता हे कौरव मरते । ऐसेनि वेंटाळिला होता मोहें बहुतें ।
तो फेडावयालागीं अनंतें । हें दाखविलें निज

11.408

अरे कोण्ही कोणातें न मारी । एथ मीचि हो सर्व संहारीं ।
हें विश्वरूपव्याजें हरी । प्रकटित असे

11.409

परी वायांचि व्याकुलता । ते न चोजवेचि पंडुसुता ।
मग अहा कंपु नव्हता । वाढवित असे

11.410

तेथ म्हणे पाहा हो एके वेळे । सासिकवचेंसि दोन्ही दळें ।
वदनीं गेलीं आभाळें । गगनीं कां जैसीं

11.411

कां महाकल्पाचिया शेवटीं । जैं कृतांतु कोपला होय सृष्टी ।
तैं एकविसांही स्वर्गां मिठी । पाताळासकट दे

11.412

नातरी उदासीनें दैवें । संचकाचीं वैभवें ।
जेथींचीं तेथ स्वभावें । विलया जाती

11.413

तैसीं सासिन्नलीं सैन्यें एकवटें । इये मुखीं जाहलीं प्रविष्टें ।
परी एकही तोंडौनि न सुटे । कैसें कर्म देखा

11.414

अशोकाचे अंगवसे । चघळिले कऱहेनि जैसे ।
लोक वक्त्रामाजीं तैसे । वायां गेले

11.415

परि सिसाळें मुकुटेंसीं । पडिली दाढांचे सांडसीं ।
पीठ होत कैसीं । दिसत आहाती

11.416

तियें रत्नें दांतांचिये सवडीं । कूट लागलें जिभेच्या बुडीं ।
कांहीं कांहीं आगरडीं । द्रंष्ट्रांचीं माखलीं

11.417

हो कां जे विश्वरूपें काळें । ग्रासिलीं लोकांचीं शरीरें बळें ।
परि जीवित्व देहींचीं सिसाळें । अवश्य कीं राखिलीं

11.418

तैसीं शरीरामाजीं चोखडीं । इयें उत्तमांगें होतीं फुडीं ।
म्हणौनि महाकाळाचियाही तोंडीं । परि उरलीं शेखीं

11.419

मग म्हणे हें काई । जन्मलयां आन मोहरचि नाहीं ।
जग आपैसेंचि वदनडोहीं । संचारताहे

11.420

यया आपेंआप आघविया सृष्टी । लागलिया आहाति वदनाच्या वाटीं ।
आणि हा जेथिंचिया तेथ मिठी । देतसे उगला

11.421

ब्रह्मादिक समस्त । उंचा मुखामाजीं धांवत ।
येर सामान्य हे भरत । ऐलीच वदनीं

11.422

आणीकही भूतजात । तें उपजलेचि ठायीं ग्रासित ।
परि याचिया मुखा निभ्रांत । न सुटेचि कांहीं

11.423

जैसे महानदीचे वोघ । वहिले ठाकिती समुद्राचें आंग ।
तैसें आघवाचिकडूनि जग । प्रवेशत मुखीं

11.424

आयुष्यपंथें प्राणिगणी । करोनि अहोरात्रांची मोवणी ।
वेगें वक्त्रामिळणीं । साधिजत आहाती

11.425

जळतया गिरीच्या गवखा- । माजीं घापती पतंगाचिया झाका ।
तैसे समग्र लोक देखा । इये वदनीं पडती

11.426

परि जेतुलें येथ प्रवेशलें । तें तातलिया लोहें पाणीचि पां गिळिलें ।
वहवटींहि पुसिलें । नामरूप तयांचें

11.427

आणि येतुलाही आरोगण । करितां भुके नाहीं उणेपण ।
कैसें दीपन असाधारण । उदयलें यया

11.428

जैसा रोगिया ज्वराहूनि उठिला । का भणगा दुकाळु पाहला ।
तैसा जिभांचा लळलळाटु देखिला । आवाळुवें चाटितां

11.429

तैसें आहाराचे नांवें कांहीं । तोंडापासूनि उरलेंचि नाहीं ।
कैसी समसमीत नवाई । भुकेलेपणाची

11.430

काय सागराचा घोंटु भरावा ? । कीं पर्वताचा घांसु करावा ? ।
ब्रह्मकटाहो घालावा । आघवाचि दाढे

11.431

दिशा सगळियाचि गिळाविया । चांदिणिया चाटूनि घ्याविया ।
ऐसें वर्तत आहे साविया । लोलुप्य बा तुझें

11.432

जैसा भोगीं कामु वाढे । कां इंधनें आगीसि हाकाक चढे ।
तैसी खातखातांचि तोंडें । खाखांतें ठेलीं

11.433

कैसें एकचि केवढें पसरलें । त्रिभुवन जिव्हाग्रीं आहे टेकलें ।
जैसें कां कवीठ घातलें । वडवानळीं

11.434

ऐसीं अपार वदनें । आतां येतुलीं कैंचीं त्रिभुवनें ।
कां आहारु न मिळतां येणें मानें । वाढविलीं सैंघ

11.435

अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा ।
जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें

11.436

आतां तैसें यां विश्वा जाहालें । देव नव्हे हें कर्म आलें ।
कां जग चळचळां पांगिलें । काळजाळें

11.437

आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें ।
हीं वक्त्रें नोहेती जोहारें । वोडवलीं जगा

11.438

आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे ।
परी जया लागे तया प्राणें । सुटिकाची नाहीं

11.439

नातरी माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें ।
कां आपुलियां मारा नेणें । विष जैसें

11.440

तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं ।
परी ऐलीकडिले मुखीं खाई । हो सरली जगाची

11.441

अगा आत्मा तूं एकु । सकळ विश्वव्यापकु ।
तरी कां आम्हां अंतकु । तैसा वोडवलासी ?

11.442

तरी मियां सांडिली जीवित्वाची चाड । आणि तुवांही न धरावी भीड ।
मनीं आहे तें उघड । बोल पां सुखें

11.443

किती वाढविसी या उग्ररूपा । आंगींचें भगवंतपण आठवीं बापा ।
नाहीं तरी कृपा । मजपुरती पाही

11.444

तरी एक वेळ वेदवेद्या । जी त्रिभुवनैक आद्या ।
विनवणी विश्ववंद्या । आइकें माझी

11.445

ऐसें बोलोनि वीरें । चरण नमस्कारिलें शिरें ।
मग म्हणें तरी सर्वेश्वरें । अवधारिजो

11.446

मियां होआवया समाधान । जी पुसिलें विश्वरूपध्यान ।
आणि एकेंचि काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी

11.447

तरी तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं ।
आघवियाचि करीं परिजिलीं । शस्त्रें कांह्या

11.448

जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें ।
कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी

11.449

एथ कृतांतेंसि देवा । कासया किजतसे हेवा ।
हा आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज

11.450

या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु ।
आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी

11.451

तरी मी काळु गा हें फुडें । लोक संहारावयालागीं वाढें ।
सैंघ पसरिलीं आहातीं तोंडें । आतां ग्रासीन हें आघवें

11.452

एथ अर्जुन म्हणे कटकटा । उबगिलों मागिल्या संकटा ।
म्हणौनि आळविला तंव वोखटा । उवाइला हा

11.453

तेवींचि कठिण बोलें आसतुटी । अर्जुन होईल हिंपुटी ।
म्हणौनि सवेंचि म्हणे किरीटी । परि आन एक असे

11.454

तरी आतांचिये संहारवाहरे । तुम्हीं पांडव असा बाहिरे ।
तेथ जातजातां धनुर्धरें । सांवरिले प्राण

11.455

होता मरणमहामारीं गेला । तो मागुता सावधु जाहला ।
मग लागला बोला । चित्त देऊं

11.456

ऐसें म्हणिजत आहे देवें । अर्जुना तुम्ही माझें हें जाणावें ।
येर जाण मी आघवें । सरलों ग्रासूं

11.457

वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी ।
तैसें जग हें माझिया तोंडीं । तुवां देखिलें जें

11.458

तरी तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं ।
इये वायांचि सैन्यें पाहीं । बरवतें आहाती

11.459

ऐसा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा ।
वांटिवेचिया मदा । वघळले जे

11.460

हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें ।
यमावरी गजदळें । वाखाणिजताती

11.461

म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं ।
आणि जगाचा भरूं । घोंटु यया

11.462

पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरी जाळूं ।
कां बाणवरी खिळूं । वारयातें

11.463

बोल हतियेराहूनि तिखट । दिसती अग्निपरिस दासट ।
मारकपणें काळकूट । महुर म्हणत

11.464

तरी हे गंधर्वनगरींचे उमाळे । जाण पोकळीचे पेंडवळें ।
अगा चित्रीव फळें । वीर हे देखें

11.465

हां गा मृगजळाचा पूर आला । दळ नव्हे कापडाचा साप केला ।
इया शृंगारूनियां खाला । मांडिलिया पैं

11.466

येर चेष्टवितें जें बळ । तें मागांचि मियां ग्रासिलें सकळ ।
आतां कोल्हारिचे वेताळ । तैसे निर्जीव हे आहाती

11.467

हालविती दोरी तुटली । तरी तियें खांबावरील बाहुलीं ।
भलतेणें लोटिलीं । उलथोनि पडती

11.468

तैसा सैन्याचा यया बगा । मोडतां वेळू न लगेल पैं गा ।
म्हणौनि उठीं उठीं वेगां । शाहाणा होईं

11.469

तुवां गोग्रहणाचेनि अवसरें । घातलें मोहनास्त्र एकसरें ।
मग विराटाचेनि महाभेडें उत्तरें । आसडूनि नागाविलें

11.470

आतां हें त्याहूनि निपटारें जहालें । निवटीं आयितें रण पडिलें ।
घेईं यश रिपु जिंतिले । एकलेनि अर्जुनें

11.471

आणि कोरडें यशचि नोहे । समग्र राज्यही आलें आहे ।
तूं निमित्तमात्रचि होयें । सव्यसाची

11.472

द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं ।
कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण

11.473

कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतूं चित्त तुझें ।
आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर

11.474

तेही एक एक आघवें । चित्रींचे सिंहाडे मानावे ।
जैसे वोलेनि हातें घ्यावें । पुसोनियां

11.475

यावरी पांडवा । काइसा युद्धाचा मेळावा ? ।
हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां

11.476

जेव्हां तुवां देखिले । हे माझिया वदनीं पडिले ।
तेव्हांचि यांचें आयुष्य सरलें । आतां रितीं सोपें

11.477

म्हणौनि वहिला उठीं । मियां मारिले तूं निवटीं ।
न रिगे शोकसंकटीं । नाथिलिया

11.478

आपणचि आडखिळा कीजे । तो कौतुकें जैसा विंधोनि पाडिजे ।
तैसें देखें गा तुझें । निमित्त आहे

11.479

बापा विरुद्ध जें जाहलें । तें उपजतांचि वाघें नेलें ।
आतां राज्येंशीं संचलें । यश तूं भोगीं

11.480

सावियाचि उतत होते दायाद । आणि बळिये जगीं दुर्मद ।
ते वधिले विशद । सायासु न लागतां

11.481

ऐसिया इया गोष्टी । विश्वाच्या वाक्पटीं ।
लिहूनि घाली किरीटी । जगामाजीं

11.482

ऐसी आघवीचि हे कथा । तया अपूर्ण मनोरथा ।
संजयो सांगे कुरुनाथा । ज्ञानदेवो म्हणे

11.483

मग सत्यलोकौनि गंगाजळ । सुटलिया वाजत खळाळ ।
तैशी वाचा विशाळ । बोलतां तया

11.484

नातरी महामेघांचे उमाळे । घडघडीत एके वेळे ।
कां घुमघुमिला मंदराचळें । क्षीराब्धी जैसा

11.485

तैसें गंभीरें महानादें । हें वाक्य विश्वकंदें ।
बोलिलें अगाधें । अनंतरूपें

11.486

तें अर्जुनें मोटकें ऐकिलें । आणि सुख कीं भय दुणावलें ।
हें नेणों परि कांपिन्नलें । सर्वांग तयाचें

11.487

सखोलपणें वळली मोट । आणि तैसेचि जोडले करसंपुट ।
वेळोवेळां ललाट । चरणीं ठेवी

11.488

तेवींचि कांहीं बोलों जाये । तंव गळा बुजालाचि ठाये ।
हें सुख कीं भय होये । हें विचारा तुम्हीं

11.489

परि तेव्हां देवाचेनि बोलें । अर्जुना हें ऐसें जाहलें ।
मियां पदांवरूनि देखिलें । श्लोकींचिया

11.490

मग तैसाचि भेणभेण । पुढती जोहारूनि चरण ।
मग म्हणे जी आपण । ऐसें बोलिलेती

11.491

ना तरी अर्जुना मी काळु । आणि ग्रासिजे तो माझा खेळु ।
हा बोलु तुझा कीर अढळु । मानूं आम्ही

11.492

परि तुवां जी काळें । आजि स्थितीचिये वेळे ।
ग्रासिजे हें न मिळे । विचारासी

11.493

कैसेनि आंगींचें तारुण्य काढावें ? । कैचें नव्हे तें वार्धक्य आणावें ? ।
म्हणौनि करूं म्हणसी तें नव्हे । बहुतकरुनी

11.494

हां जी चौपाहारी न भरतां । कोणेही वेळे श्रीअनंता ।
काय माध्यान्हीं सविता । मावळतु आहे ?

11.495

पैं तुज अखंडिता काळा । तिन्ही आहाती जी वेळा ।
त्या तिन्ही परी सबळा । आपुलालिया समयीं

11.496

जे वेळीं हों लागे उत्पत्ती । ते वेळीं स्थिति प्रळयो हारपती ।
आणि स्थितिकाळीं न मिरविती । उत्पत्ति प्रळयो

11.497

पाठीं प्रळयाचिये वेळे । उत्पत्ति स्थिति मावळे ।
हें कायसेनही न ढळे । अनादि ऐसें

11.498

म्हणौनि आजि तंव भरें भोगें । स्थिति वर्तिजत आहे जगें ।
एथ ग्रसिसी तूं हें न लगे । माझ्या जीवीं

11.499

तंव संकेतें देव बोले । अगा या दोन्ही सैन्यांसीचि मरण पुरलें ।
तें प्रत्यक्षचि तुज दाविलें । येर यथाकाळें जाण

11.500

हा संकेतु जंव अनंता । वेळु लागला बोलतां ।
तंव अर्जुनें लोकु मागुता । देखिला यथास्थिति

11.501

मग म्हणतसे देवा । तूं सूत्रीं विश्वलाघवा ।
जग आला मा आघवा । पूर्वस्थिति पुढती

11.502

परी पडिलिया दुःखसागरीं । तूं काढिसी कां जयापरी ।
ते कीर्ति तुझी श्रीहरी । आठवित असे

11.503

कीर्ति आठवितां वेळोवेळां । भोगितसें महासुखाचा सोहळा ।
तेथ हर्षामृतकल्लोळा । वरी लोळत आहें

11.504

देवा जियालेपणें जग । धरी तुझ्या ठायीं अनुराग ।
आणि दुष्टां तयां भंग । अधिकाधिक

11.505

पैं त्रिभुवनींचिया राक्षसां । महाभय तूं हृषीकेशा ।
म्हणौनि पळताती दाही दिशां । पैलीकडे

11.506

येथ सुर नर सिद्ध किन्नर । किंबहुना चराचर ।
ते तुज देखोनि हर्षनिर्भर । नमस्कारित असती

11.507

एथ गा कवणा कारणा । राक्षस हे नारायणा ।
न लगतीचि चरणा । पळते जाहले

11.508

आणि हें काय तूंतें पुसावें । येतुलें आम्हांसिही जाणवे ।
तरी सूर्योदयीं राहावें । कैसेनि तमें ?

11.509

जी तूं प्रकाशाचा आगरु । आणि जाहला आम्हासि गोचरू ।
म्हणौनिया निशाचरां केरु । फिटला सहजें

11.510

हें येतुले दिवस आम्हां । कांहीं नेणवेचि श्रीरामा ।
आतां देखतसों महिमा । गंभीर तुझा

11.511

जेथूनि नाना सृष्टींचिया वोळी । पसरती भूतग्रामाचिया वेली ।
तया महद्ब्रह्मातें व्याली । दैविकी इच्छा

11.512

देवो निःसीम तत्त्व सदोदितु । देवो निःसीम गुण अनंतु ।
देवो निःसीम साम्य सततु । नरेंद्र देवांचा

11.513

जी तूं त्रिजगतिये वोलावा । अक्षर तूं सदाशिवा ।
तूंचि सदसत् देवा । तयाही अतीत तें तूं

11.514

तूं प्रकृतिपुरुषांचिया आदी । जी महत्तत्वां तूंचि अवधी ।
स्वयें तूं अनादि । पुरातनु

11.515

तूं सकळ विश्वजीवन । जीवांसि तूंचि निधान ।
भूतभविष्याचें ज्ञान । तुझ्याचि हातीं

11.516

जी श्रुतीचियां लोचनां । स्वरूपसुख तूंचि अभिन्ना ।
त्रिभुवनाचिया आयतना । आयतन तूं

11.517

म्हणौनि जी परम । तूंतें म्हणिजे महाधाम ।
कल्पांतीं महद्ब्रह्म । तुजमाजीं रिगे

11.518

किंबहुना तुवां देवें । विश्व विस्तारिलें आहे आघवें ।
तरि अनंतरूपा वानावें । कवणें तूंतें

11.519

जी काय एक तूं नव्हसी । कवणे ठायीं नससी ।
हें असो जैसा आहासी । तैसिया नमो

11.520

वायु तूं अनंता । यम तूं नियमिता ।
प्राणिगणीं वसता । अग्नि तो तूं

11.521

वरुण तूं सोम । स्रष्टा तूं ब्रह्म ।
पितामहाचाही परम । आदि जनक तूं

11.522

आणिकही जें जें कांहीं । रूप आथि अथवा नाहीं ।
तया नमो तुज तैसयाही । जगन्नाथा

11.523

ऐसें सानुरागें चित्तें । नमन केलें पंडुसुतें ।
मग पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो

11.524

पाठीं तिये साद्यंते । न्याहाळी श्रीमूर्तीतें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो

11.525

पाहतां पाहतां प्रांतें । समाधान पावे चित्तें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो

11.526

इये चराचरीं जीं भूतें । सर्वत्र देखे तयांतें ।
आणि पुढती म्हणे नमस्ते । नमस्ते प्रभो

11.527

ऐसीं रूपें तियें अद्भुतें । आश्चर्यें स्फुरती अनंतें ।
तंव तंव नमस्ते । नमस्तेचि म्हणे

11.528

आणिक स्तुतिही नाठवे । आणि निवांतुही न बैसवे ।
नेणें कैसा प्रेमभावें । गाजोंचि लागे

11.529

किंबहुना इयापरी । नमन केलें सहस्रवरी ।
कीं पुढती म्हणे श्रीहरी । तुज सन्मुखा नमो

11.530

देवासि पाठी पोट आथि कीं नाहीं । येणें उपयोगु आम्हां काई ।
तरि तुज पाठिमोरेयाही । नमो स्वामी

11.531

उभा माझिये पाठीसीं । म्हणौनि पाठीमोरें म्हणावें तुम्हांसी ।
सन्मुख विन्मुख जगेंसीं । न घडें तुज

11.532

आतां वेगळालिया अवयवां । नेणें रूप करूं देवा ।
म्हणौनि नमो तुज सर्वा । सर्वात्मका

11.533

जी अनंतबळसंभ्रमा । तुज नमो अमित विक्रमा ।
सकळकाळीं समा । सर्वरूपा

11.534

आघविया आकाशीं जैसें । अवकाशचि होऊनि आकाश असे ।
तूं सर्वपणें तैसें । पातलासि सर्व

11.535

किंबहुना केवळ । सर्व हें तूंचि निखिळ ।
परी क्षीरार्णवीं कल्लोळ । पयाचे जैसे

11.536

म्हणौनिया देवा । तूं वेगळा नव्हसी सर्वां ।
हें आलें मज सद्भावा । आतां तूंचि सर्व

11.537

परि ऐसिया तूतें स्वामी । कहींच नेणों जी आम्ही ।
म्हणौनि सोयरे संबंधधर्मीं । राहाटलों तुजसीं

11.538

अहा थोर वाउर जाहलें । अमृतें संमार्जन म्यां केलें ।
वारिकें घेऊनि दिधलें । कामधेनूतें

11.539

परिसाचा खडवाचि जोडला । कीं फोडोनि आम्ही गाडोरा घातला ।
कल्पतरू तोडोनि केला । कूंप शेता

11.540

चिंतामणीची खाणी लागली । तेणें करें वोढाळें वोल्हांडिली ।
तैसी तुझी जवळिक धाडिली । सांगातीपणें

11.541

हें आजिचेंचि पाहें पां रोकडें । कवण झुंज हें केवढें ।
एथ परब्रह्म तूं उघडें । सारथी केलासी

11.542

यया कौरवांचिया घरा । शिष्टाई धाडिलासि दातारा ।
ऐसा वणिजेसाठीं जागेश्वरा । विकलासि आम्हीं

11.543

तूं योगियांचें समाधिसुख । कैसा जाणेचिना मी मूर्ख ।
उपरोधु जी सन्मुख । तुजसीं करूं

11.544

तूं या विश्वाची अनादि आदी । बैससी जिये सभासदीं ।
तेथें सोयरीकीचिया संबंधीं । रळीं बोलों

11.545

विपायें राउळा येवों । तरि तुझेनि अंगें मानु पावों ।
न मानिसी तरी जावों । रुसोनि सलगी

11.546

पायां लागोनि बुझावणी । तुझ्या ठायीं शारङ्गपाणी ।
पाहिजे ऐशी करणी । बहु केली आम्हीं

11.547

सजणपणाचिया वाटा । तुजपुढें बैसें उफराटा ।
हा पाडु काय वैकुंठा ? । परि चुकलों आम्हीं

11.548

देवेंसि कोलकाठी धरूं । आखाडा झोंबीलोंबी करूं ।
सारी खेळतां आविष्करूं । निकरेंही भांडों

11.549

चांग तें उराउरीं मागों । देवासि कीं बुद्धि सांगों ।
तेवींचि म्हणों काय लागों । तुझें आम्ही

11.550

ऐसा अपराधु हा आहे । जो त्रिभुवनीं न समाये ।
जी नेणतांचि कीं पाये । शिवतिले तुझे

11.551

देवो बोनयाच्या अवसरीं । लोभें कीर आठवण करी ।
परी माझा निसुग गर्व अवधारीं । जे फुगूनचि बैसें

11.552

देवाचिया भोगायतनीं । खेळतां आशंकेना मनीं ।
जी रिगोनियां शयनीं । सरिसा पहुडें

11.553

ऽकृष्ण म्हणौनि हाकारिजे । यादवपणें तूंतें लेखिजे ।
आपली आण घालिजे । जातां तुज

11.554

मज एकासनीं बैसणें । कां तुझा बोलु न मानणें ।
हें वोतटीचेनि दाटपणें । बहुत घडलें

11.555

म्हणौनि काय काय आतां । निवेदिजेल अनंता ।
मी राशि आहें समस्तां । अपराधांचि

11.556

यालागीं पुढां अथवा पाठीं । जियें राहटलों बहुवें वोखटीं ।
तियें मायेचिया परी पोटीं । सामावीं प्रभो

11.557

जी कोण्ही एके वेळे । सरिता घेऊन येती खडुळें ।
तियें सामाविजेति सिंधुजळें । आन उपायो नाहीं

11.558

तैसी प्रीती कां प्रमादें । देवेंसीं मज विरुद्धें ।
बोलविलीं तियें मुकुंदें । उपसाहावीं जी

11.559

आणि देवाचेनि क्षमत्वें क्षमा । आधारु जाली आहे या भूतग्रामा ।
म्हणौनि जी पुरुषोत्तमा । विनवूं तें थोडें

11.560

तरी आतां अप्रमेया । मज शरणागता आपुलिया ।
क्षमा कीजो जी यया । अपराधांसि

11.561

जी जाणितलें मियां साचें । महिमान आतां देवाचें ।
जे देवो होय चराचराचें । जन्मस्थान

11.562

हरिहरादि समस्तां । देवा तूं परम देवता ।
वेदांतेंही पढविता । आदिगुरु तूं

11.563

गंभीर तूं श्रीरामा । नाना भूतैकसमा ।
सकळगुणीं अप्रतिमा । अद्वितीया

11.564

तुजसी नाहीं सरिसें । हें प्रतिपादनचि कायसें ? ।
तुवां जालेनि आकाशें । सामाविलें जग

11.565

तया तुझेनि पाडें दुजें । ऐसें बोलतांचि लाजिजे ।
तेथ अधिकाची कीजे । गोठी केवीं

11.566

म्हणौनि त्रिभुवनीं तूं एकु । तुजसरिखा ना अधिकु ।
तुझा महिमा अलौकिकु । नेणिजे वानूं

11.567

ऐसें अर्जुनें म्हणितलें । मग पुढती दंडवत घातलें ।
तेथें सात्त्विकाचें आलें । भरतें तया

11.568

मग म्हणतसे प्रसीद प्रसीद । वाचा होतसे सद्गद ।
काढी जी अपराध- । समुद्रौनि मातें

11.569

तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं ।
तुज विईश्वेश्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें

11.570

तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे ।
तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक

11.571

आतां ऐसिया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा ।
म्हणौनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोनियां

11.572

जी हेंचि विनवावयालागीं । कैंची योग्यता माझिया आंगीं ।
परी अपत्य जैसें सलगी । बापेंसीं बोले

11.573

पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध ।
तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी

11.574

सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत ।
तैसें तुवां समस्त । साहिजो जी

11.575

प्रियाचिया ठायीं सन्मान । प्रिय न पाहें सर्वथा जाण ।
तेवीं उच्छिष्ट काढिलें आपण । ते क्षमा कीजो जी

11.576

नातरी प्राणाचें सोयरें भेटे । मग जीवें भूतलीं जियें संकटें ।
तियें निवेदितां न वाटे । संकोचु कांहीं

11.577

कां उखितें आंगें जीवें । आपणपें दिधलें जिया मनोभावें ।
तिया कांतु मिनलिया न राहवें । हृदय जेवीं

11.578

तयापरी जी मियां । हें विनविलें तुमतें गोसाविया ।
आणि कांहीं एक म्हणावया । कारण असे

11.579

तरी देवेंसीं सलगी केली । जे विश्वरूपाची आळी घेतली ।
ते मायबापें पुरविली । स्नेहाळाचेनि

11.580

सुरतरूंची झाडें । आंगणीं लावावीं कोडें ।
देयावें कामधेनुचें पाडें । खेळावया

11.581

मियां नक्षत्रीं डाव पाडावा । चंद्र चेंडुवालागीं आणावा ।
हा छंदु सिद्धी नेला आघवा । माउलिये तुवां

11.582

जिया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास ।
पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणी पेरिले

11.583

ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं ।
दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं

11.584

मा देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी ।
ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली

11.585

जी कल्पादीलागोनि । आजिची घडी धरुनी ।
माझीं जेतुलीं हौनी । गेलीं जन्में

11.586

तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु ।
परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना

11.587

बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें ।
हे सादही अंतःकरणें । करवेचिना

11.588

तेथा डोळ्यां देखी होआवी । ही गोठीचि कायसया करावी ।
किंबहुना पूर्वीं । दृष्ट ना श्रुत

11.589

तें हें विश्वरूप आपुलें । तुम्हीं मज डोळां दाविलें ।
तरी माझें मन झालें । हृष्ट देवा

11.590

परि आतां ऐसी चाड जीवीं । जे तुजसीं गोठी करावी ।
जवळीक हे भोगावी । आलिंगावासी

11.591

ते याचि रूपीं करूं म्हणिजे । तरि कोणे एके मुखेंसी चावळिजे ।
आणि कवणा खेंव देईजे । तुज लेख नाहीं

11.592

म्हणौनि वारियासवें धावणें । न ठके गगना खेंव देणें ।
जळकेली खेळणें । समुद्रीं केउतें ?

11.593

यालागीं जी देवा । एथिंचें भय उपजतसे जीवा ।
म्हणौनि येतुला लळा पाळावा । जे पुरे हें आतां

11.594

पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे ।
तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसांवा आम्हां

11.595

आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें ।
शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि

11.596

आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें ।
तीर्थें होतु सकळें । याचिलागीं

11.597

आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे ।
तया फळीं फळ तुझें । चतुर्भुज रूप

11.598

ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणौनि तेंचि देखावया लवडसवडी ।
वर्तत असे ते सांकडी । फेडीजे वेगीं

11.599

अगा जीवींचें जाणतेया । सकळ विश्ववसवितेया ।
प्रसन्न होईं पूजितया । देवांचिया देवा

11.600

कैसें नीलोत्पलातें रांवित । आकाशाही रंगु लावित ।
तेजाची वोज दावित । इंद्रनीळा

11.601

जैसा परिमळ जाहला मरगजा । कां आनंदासि निघालिया भुजा ।
ज्याचे जानुवरी मकरध्वजा । जोडली बरव

11.602

मस्तकीं मुकुटातें ठेविलें । कीं मुकुटा मुकुट मस्तक झालें ।
शृंगारा लेणें लाधलें । आंगाचेनि जया

11.603

इंद्रधनुष्याचिये आडणी । माजीं मेघ गगनरंगणीं ।
तैसें आवरिलें शारङ्गपाणी । वैजयंतिया

11.604

आतां कवणी ते उदार गदा । असुरां देत कैवल्य पदा ।
कैसें चक्र हन गोविंदा । सौम्यतेजें मिरवे

11.605

किंबहुना स्वामी । तें देखावया उत्कंठित पां मी ।
म्हणौनि आतां तुम्हीं । तैसया होआवें

11.606

हे विश्वरूपाचे सोहळे । भोगूनि निवाले जी डोळे ।
आतां होताति आंधले । कृष्णमूर्तीलागीं

11.607

तें साकार कृष्णरूपडें । वांचूनि पाहों नावडे ।
तें न देखतां थोडें । मानिताती हे

11.608

आम्हां भोगमोक्षाचिया ठायीं । श्रीमूर्तीवांचूनि नाहीं ।
म्हणौनि तैसाचि साकारु होईं । हें सांवरीं आतां

11.609

या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला ।
म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी

11.610

कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी ।
मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा

11.611

आम्हीं सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणें देणें ।
वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा

11.612

तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें ।
कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान

11.613

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।
म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं

11.614

तें हें अपारां अपार । स्वरूप माझें परात्पर ।
एथूनि ते अवतार । कृष्णादिक

11.615

हें ज्ञानतेजाचें निखिळ । विश्वात्मक केवळ ।
अनंत हे अढळ । आद्य सकळां

11.616

हें तुजवांचोनि अर्जुना । पूर्वीं श्रुत दृष्ट नाहीं आना ।
जे जोगें नव्हे साधना । म्हणौनियां

11.617

याची सोय पातले । आणि वेदीं मौनचि घेतलें ।
याज्ञिकी माघौते आले । स्वर्गौनियां

11.618

साधकीं देखिला आयासु । म्हणौनि वाळिला योगाभ्यासु ।
आणि अध्ययनें सौरसु । नाहीं एथ

11.619

सीगेचीं सत्कर्मे । धाविन्नलीं संभ्रमें ।
तिहीं बहुतेकीं श्रमें । सत्यलोकु ठाकिला

11.620

तपीं ऐश्वर्य देखिलें । आणि उग्रपण उभयांचि सांडिलें ।
एक तपसाधन जें ठेलें । अपारांतरें

11.621

तें हें तुवां अनायासें । विश्वरूप देखिलें जैसें ।
इये मनुष्यलोकीं तैसें । न फवेचि कवणा

11.622

आजि ध्यानसंपत्तीलागीं । तूंचि एकु आथिला जगीं ।
हें परम भाग्य आंगीं । विरंचीही नाहीं

11.623

म्हणौनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ ।
हें वांचूनि अन्य चांग । न मनीं कांहीं

11.624

हां गा समुद्र अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला ।
मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजैल म्हणौनि ?

11.625

नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु ।
ऐसें म्हणौनि अव्हेरु । करणें घडे ?

11.626

दैवें चिंतामणी लेईजे । कीं हें ओझें म्हणौनि सांडिजे ? ।
कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणौनि ?

11.627

चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा ।
पडिसायि पाडितोसि दिनकरा । परता सर

11.628

तैसें ऐश्वर्य हें महातेज । आजि हातां आलें आहे सहज ।
कीं एथ तुज गजबज । होआवी कां ?

11.629

परि नेणसीच गांवढिया । काय कोपों आतां धनंजया ।
आंग सांडोनि छाया । आलिंगितोसि मा ?

11.630

हें नव्हे जो मी साचें । एथ मन करूनियां काचें ।
प्रेम धरिसी अवगणियेचें । चतुर्भुज जें

11.631

तरि अझुनिवरी पार्था । सांडीं सांडीं हे व्यवस्था ।
इयेविषयीं आस्था । करिसी झणें

11.632

हें रूप जरी घोर । विकृति आणि थोर ।
तरी कृतनिश्चयाचें घर । हेंचि करीं

11.633

कृपण चित्तवृत्ति जैसी । रोंवोनि घालीं ठेवयापासीं ।
मग नुसधेनि देहेंसीं । आपण असे

11.634

कां अजातपक्षिया जवळा । जीव बैसवूनि अविसाळां ।
पक्षिणी अंतराळा- । माजीं जाय

11.635

नाना गाय चरे डोंगरीं । परि चित्त बांधिलें वत्सें घरीं ।
प्रेम एथिंचें करीं । स्थानपती

11.636

येरें वरिचिलेनि चित्तें । बाह्य सख्य सुखापुरतें ।
भोगिजो कां श्रीमूर्तींतें । चतुर्भुज

11.637

परि पुढतपुढती पांडवा । हा एक बोलु न विसरावा ।
जे इये रूपींहूनि सद्भावा । नेदावें निघों

11.638

हें कहीं नव्हतेंचि देखिलें । म्हणौनि भय जें तुज उपजलें ।
तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम

11.639

आतां करूं तुजयासारखें । ऐसें म्हणितलें विश्वतोमुखें ।
तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं

11.640

ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो ।
हें ना परि नवलावो । आवडीचा तिये

11.641

श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरि सर्वस्व विश्वरूपायेवढें ।
हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासि

11.642

वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे ।
नातरी कन्या पाहूनियां म्हणिजे । मना न ये हे

11.643

तया विश्वरूपायेवढी दशा । करितां प्रीतीचा वाढू कैसा ।
सेल दीधलीसे उपदेशा । किरीटीसिं देवें

11.644

मोडोनि भांगाराचा रवा । लेणें घडिलें आपलिया सवा ।
मग नावडे जरी जीवा । तरी आटिजे पुढती

11.645

तैसें शिष्याचिये प्रीती जाहलें । कृष्णत्व होतें तें विश्वरूप केलें ।
तें मना नयेचि मग आणिलें । कृष्णपण मागुतें

11.646

हा ठाववरी शिष्याची निकसी । सहातें गुरु आहाती कवणे देशीं ? ।
परि नेणिजे आवडी कैशी । संजयो म्हणे

11.647

मग विश्वरूप व्यापुनि भोंवतें । जें दिव्य तेज प्रगटलें होतें ।
तेंचि सामावलें मागुतें । कृष्णरूपीं तये

11.648

जैसें त्वंपद हें आघवें । तत्पदीं सामावे ।
अथवा द्रुमाकारु सांठवे । बीजकणिके जेवीं

11.649

नातरी स्वप्नसंभ्रमु जैसा । गिळी चेइली जीवदशा ।
श्रीकृष्णें योगु हा तैसा । संहारिला तो

11.650

जैसी प्रभा हारपली बिंबीं । कीं जळदसंपत्ती नभीं ।
नाना भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया

11.651

हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी ।
ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली

11.652

तंव परिमाणा रंगु । तेणें देखिलें साविया चांगु ।
तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणौनि घडी केली पुढती

11.653

तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें ।
तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें

11.654

किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें ।
परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी

11.655

जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला ।
तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी

11.656

नातरी गुरुकृपेसवें । वोसरलेया प्रपंचज्ञान आघवें ।
स्फुरे तत्त्व तेवीं पांडवें । श्रीमूर्ति देखिली

11.657

तया पांडवा ऐसें चित्तीं । आड विश्वरूपाची जवनिका होती ।
ते फिटोनि गेली परौती । हें भलें जाहलें

11.658

काय काळातें जिणोनि आला । कीं महावातु मागां सांडिला ।
आपुलिया बाही उतरला । सातही सिंधु

11.659

ऐसा संतोष बहु चित्तें । घेइजत असे पंडुसुतें ।
विश्वरूपापाठीं कृष्णातें । देखोनियां

11.660

मग सूर्याचिया अस्तमानीं । मागुती तारा उगवती गगनीं ।
तैसी देखों लागला अवनीं । लोकांसहित

11.661

पाहे तंव तेंचि कुरुक्षेत्र । तैसेंचि देखे दोहीं भागीं गोत्र ।
वीर वर्षताती शस्त्रास्त्र । संघाटवरी

11.662

तया बाणांचिया मांडवाआंतु । तैसाचि रथु देखे निवांतु ।
धुरे बैसला लक्ष्मीकांतु । आपण तळीं

11.663

एवं मागील जैसें तैसें । तेणें देखिलें वीरविलासें ।
मग म्हणे जियालों ऐसें । जाहलें आतां

11.664

बुद्धीतें सांडोनि ज्ञान । भेणें वळघलें रान ।
अहंकारेंसी मन । देशोधडी जाहलें

11.665

इंद्रियें प्रवृत्ती भुललीं । वाचा प्राणा चुकली ।
ऐसें आपांपरी होती जाली । शरीरग्रामीं

11.666

तियें आघवींचि मागुतीं । जिवंत भेटलीं प्रकृती ।
आतां जिताणें श्रीमूर्ती । जाहलें मियां

11.667

ऐसें सुख जीवीं घेतलें । मग श्रीकृष्णातें म्हणितलें ।
मियां तुमचें रूप देखिलें । मानुष हें

11.668

हें रूप दाखवणें देवराया । कीं मज अपत्या चुकलिया ।
बुझावोनि तुवां माया । स्तनपान दिधलें

11.669

जी विश्वरूपाचिया सागरीं । होतों तरंग मवित वांवेवरी ।
तो इये निजमूर्तीच्या तीरीं । निगालों आतां

11.670

आइकें द्वारकापुरसुहाडा । मज सुकतिया जी झाडा ।
हे भेटी नव्हे बहुडा । मेघाचा केला

11.671

जी सावियाची तृषा फुटला । तया मज अमृतसिंधु हा भेटला ।
आतां जिणयाचा जाहला । भरंवसा मज

11.672

माझिया हृदयरंगणीं । होताहे हरिखलतांची लावणी ।
सुखेंसीं बुझावणी । जाहली मज

11.673

यया पार्थाचिया बोलासवें । हें काय म्हणितलें देवें ।
तुवां प्रेम ठेवूनि यावें । विश्वरूपीं कीं

11.674

मग इये श्रीमूर्ती । भेटावें सडिया आयती ।
ते शिकवण सुभद्रापती । विसरलासि मा

11.675

अगा आंधळिया अर्जुना । हाता आलिया मेरूही होय साना ।
ऐसा आथी मना । चुकीचा भावो

11.676

तरी विश्वात्मक रूपडें । जें दाविलें आम्ही तुजपुढें ।
तें शंभूही परि न जोडे । तपें करितां

11.677

आणि अष्टांगादिसंकटीं । योगी शिणताति किरीटी ।
परि अवसरु नाहीं भेटी । जयाचिये

11.678

तें विश्वरूप एकादे वेळ । कैसेनि देखों अळुमाळ ।
ऐसें स्मरतां काळ । जातसे देवां

11.679

आशेचिये अंजुळी । ठेऊनि हृदयाचिया निडळीं ।
चातक निराळीं । लागले जैसे

11.680

तैसे उत्कंठा निर्भर । होऊनियां सुरवर ।
घोकीत आठही पाहार । भेटी जयाची

11.681

परि विश्वरूपासारिखें । स्वप्नींही कोण्ही न देखे ।
तें प्रत्यक्ष तुवां सुखें । देखिलें हें

11.682

पैं उपायांसि वाटा । न वाहती एथ सुभटा ।
साहीसहित वोहटा । वाहिला वेदीं

11.683

मज विश्वरूपाचिया मोहरा । चालावया धनुर्धरा ।
तपांचियाही संभारा । नव्हेचि लागु

11.684

आणि दानादि कीर कानडें । मी यज्ञींही तैसा न सांपडें ।
जैसेनि कां सुरवाडें । देखिला तुवां

11.685

तैसा मी एकीचि परि । आंतुडें गा अवधारीं ।
जरी भक्ति येऊनि वरी । चित्तातें गा

11.686

परि तेचि भक्ति ऐसी । पर्जन्याची सुटिका जैसी ।
धरावांचूनि अनारिसी । गतीचि नेणें

11.687

कां सकळ जळसंपत्ती । घेऊनि समुद्रातें गिंवसिती ।
गंगा जैसी अनन्यगती । मिळालीचि मिळे

11.688

तैसें सर्वभावसंभारें । न धरत प्रेम एकसरें ।
मजमाजीं संचरे । मीचि होऊनि

11.689

आणि तेवींचि मी ऐसा । थडिये माझारीं सरिसा ।
क्षीराब्धि कां जैसा । क्षीराचाचि

11.690

तैसें मजलागुनि मुंगीवरी । किंबहुना चराचरीं ।
भजनासि कां दुसरी । परीचि नाहीं

11.691

तयाचि क्षणासवें । एवंविध मी जाणवें ।
जाणितला तरी स्वभावें । दृष्टही होय

11.692

मग इंधनीं अग्नि उद्दीपें । आणि इंधन हें भाष हारपे ।
तें अग्निचि होऊनि आरोपें । मूर्त जेवीं

11.693

कां उदय न कीजे तेजाकारें । तंव गगनचि होऊनि असे आंधारें ।
मग उदईलिया एकसरें । प्रकाशु होय

11.694

तैसें माझिये साक्षात्कारीं । सरे अहंकाराची वारी ।
अहंकारलोपीं अवधारीं । द्वैत जाय

11.695

मग मी तो हें आघवें । एक मीचि आथी स्वभावें ।
किंबहुना सामावे । समरसें तो

11.696

जो मजचि एकालागीं । कर्में वाहातसे आंगीं ।
जया मीवांचोनि जगीं । गोमटें नाहीं

11.697

दृष्टादृष्ट सकळ । जयाचें मीचि केवळ ।
जेणें जिणयाचें फळ । मजचि नाम ठेविलें

11.698

मग भूतें हे भाष विसरला । जे दिठी मीचि आहें सूदला ।
म्हणौनि निर्वैर जाहला । सर्वत्र भजे

11.699

ऐसा जो भक्तु होये । तयाचें त्रिधातुक हें जैं जाये ।
तैं मीचि हौनि ठायें । पांडवा गा

11.700

ऐसें जगदुदरदोंदिलें । तेणें करुणारसरसाळें ।
संजयो म्हणे बोलिलें । श्रीकृष्णदेवें

11.701

ययावरी तो पंडुकुमरु । जाहला आनंदसंपदा थोरु ।
आणि कृष्णचरणचतुरु । एक तो जगीं

11.702

तेणें देवाचिया दोनही मूर्ती । निकिया न्याहाळिलिया चित्तीं ।
तंव विश्वरूपाहूनि कृष्णाकृतीं । देखिला लाभु

11.703

परि तयाचिये जाणिवे । मानु न कीजेचि देवें ।
जें व्यापकाहूनि नव्हे । एकदेशी

11.704

हेंचि समर्थावयालागीं । एक दोन चांगी ।
उपपत्ती शारङ्गी । दाविता जाहला

11.705

तिया ऐकोनि सुभद्राकांतु । चित्तीं आहे म्हणतु ।
तरि होय बरवें दोन्हीं आंतु । तें पुढती पुसों

11.706

ऐसा आलोचु करूनि जीवीं । आतां पुसती वोज बरवी ।
आदरील ते परिसावी । पुढें कथा

11.707

प्रांजळ ओंवीप्रबंधें । गोष्टी सांगिजेल विनोदें ।
तें परिसा आनंदें । ज्ञानदेवो म्हणे

11.708

भरोनि सद्भावाची अंजुळी । मियां वोंवियाफुलें मोकळीं ।
अर्पिलीं अंघ्रियुगुलीं । विश्वरूपाच्या

मूल पाठ: jñāneśvarī · Marathi Wikisource contributors · Sanskrit Wikisource · CC BY-SA 4.0

Esc